Sunday, 11 September 2016

नागपूरला स्मार्ट सिटी बनविणार -मुख्यमंत्री

  • शहरातील रस्त्यांचे तीन वर्षात सिमेंटीकरण
  • नागपूर जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती डिजिटल होणार
  • डिजिटल शाळांमूळे जिप शाळातील विद्यार्थ्याच्या संख्येत वाढ

नागपूर दि. 11 :- नागपूर शहराला स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्ती या चर्चासत्राच्या निमित्ताने एकत्र येऊन नागपूर शहर विकासाचे प्रश्न आणि आवाहने यावर चर्चा करीत आहे. ही स्वागतार्ह बाब आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केले.
नागपूर मनपा व नासूप्र व्हीजन 2020 च्या दैनिक लोकमत तर्फे कामठी रोडवरील ईडन ग्रीन्ज येथे आयोजित महाचर्चा कार्यक्रमाचे उद्वघाटन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,महापौर प्रविण दटके,या चर्चासत्राचे आयोजक माजी खासदार विजय दर्डा,लोकप्रतिनिधी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योगपती उपस्थित होते.
महाराष्ट्र हे 50 टक्के शहरीकरण झालेले राज्य आहे. पुर्वी ग्रामीण भागात जनता मोठया संख्येने रहात होती. परंतू रोजगाराच्या निमिताने येणाऱ्या व्यक्तीमुळे शहरे वाढायला लागली . शहराच्या भोवताल असणाऱ्या शेत जमिनीमध्ये वस्त्या आकारास आल्या. त्यांना नागरी सुविधा देणारी व्यवस्था मात्र निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे नागपूर शहरातच 5 हजार अनधिकृत ले-आऊटस तयार झाले. शहराची वाहतूक,आरोग्य व पाणीपुरवठा सेवा जलद गतीने पूरविण्यासाठी नागपूर महानगरपालिका वेगाने पावले उचलीत आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
नागपुरात मोठया प्रमाणात केंन्द्रीय कार्यालये आहेत. येथे नोकरी करणारा अधिकारी निवृत्त झाल्यानंतर येथेच स्थानिक होतो. त्यामुळे नागपूर शहराला मिनी इंडियाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे आपण मेट्रो रिजन, नवीन नागपूर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. रोजगार व आर्थिक सोयीसुविधा निर्माण करतांना त्या एकाच ठिकाणी न होता शहराच्या सभोवताल होणे गरजेचे आहे. कारण शहरात कामाला येणारा व्यक्ती जर खूप दूर राहात असेल तर त्याला वाहतूक सुविधाही मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी मेट्रो व बस व्यवस्थाही तेवढीच वेगवान असण्याची गरज आहे. मुंबईत अशा प्रकारची एकमेकांना जोडणारी वाहतूक व्यवस्था निर्माण  करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. प्रवाशाने एकदा तिकिट काढलेकी त्या तिकिटावर बस,रेल्वे,टॅक्सी असा प्रवास करता येणे शक्य होईल. यासाठी ई-तिकीटचा प्रयोग करण्याचा विचार आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आपण जेवढी शहरे विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तेवढेच प्रयत्न ग्रामविकासासाठी करीत आहोत.नागपूर जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती 2 ऑक्टोबरपासून डिजिटल होत आहे. त्याचा फायदा आरोग्य सुविधा नवे तंत्रज्ञान, शाळेतील मुलांना निश्चितपणे फायदा होणार आहे. जिल्हापरिषद शाळा या डिजिटल झाल्यामुळे खाजगी इंग्रजी शाळेतून राज्यातील 22 हजार विद्यार्थी परत जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या योजने अंतर्गत 17 हजार शाळामधील विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा दर्जा उंचावला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सागितले आहे.
नागरिकांना यापुढे समाधान शिबिरातून डिजिटल सेवा देण्यात येतील अशा प्रकारची 30 हजार सेवा केन्द्रे राज्यात सुरू करण्यात येणार आहे. यापुढे कुठलेही प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नागपुरातील रस्ते खड्डे मुक्त असावे यासाठी सिमेंटचे रस्ते बांधण्यात येणार आहे. दरवर्षी 300 कोटी रूपये यासाठी खर्च करण्यात येतील. येत्या तीन वर्षात ही कामे पूर्ण होतील. यापैकी सावरकरनगर चौक ते उच्च न्यायालयापर्यंतचा 6 किलोमीटर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. भविष्यात रस्ते खड्डे मुक्त होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही सुधारेल अशी मुख्यमंत्र्यांनी खात्री दिली.
नागपूर महानगरपालिका शहरातील सांडपाण्याचे शुध्दीकरण करून 200 MLD पाणी महाजेनकोला वीज निर्मितीसाठी विकत आहे. शहरात गेल्या 4 वर्षापासून अखंडित पाणीपुरवठा 24X7 या योजनेअंतर्गत देत आहे. याचा फायदा लाखो लोकांना होत आहे. पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात आल्याचे मुखमंत्र्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी राजकीय मतैक्य होणे हेसुध्दा तेवढेच गरजेचे आहे. नागनदी शुध्दीकरण हा महत्वाकांसी प्रकल्प आहे. मनपाने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. यात लोकांना सहभागही तेवढाच महत्वाचा आहे. शहराला स्वच्छ ठेवण्याची जवाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. नागपूर सुधार प्रशासने कमी दरात 1 लाख घरे बांधण्याची संकल्प केला आहे. त्यामुहळे झोपडपट्टयांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सागितले.
भविष्यात नागपूर हे लॉजिस्टिक हब होण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू या शहरातील कचऱ्याची विल्हेवाट असो, स्वच्छ पाणी पुरवठा असो, की वाहतूक व्यवस्था असो त्या चांगल्या पध्दतीने कशा पुरविता येतील याचा सर्वानीच विचार करावा असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले.
सुरूवातीला माजी खासदार विजय दर्डा यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात नागपूर शहराती सर्वसामान्य जनतेला भेडसावणाचा समस्या सांगितल्या त्यात वाढणाचा झोपडपट्टय, पिण्याचे पाणी, वाहतूक, प्रदुषण या समस्यांचा उल्लेख केला.
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी प्रथम माजी मंत्री व लोकमत दैनिकाचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करुन आपली आदरांजली वाहिली. या चर्चासत्राचे संचालन  दैनिक लोकमतचे शहर आवृती प्रमुख गजानन जानभोर यांनी केले.
यावेळी आमदार सर्वश्री अनिल सोले,सुधाकर कोहळे,जोगेन्द्र कवाडे,प्रकाश गजभिये,सुधाकर देशमुख,विकास कुंभारे, पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर,चंद्रपाल चौकसे, माजी आमदार एस. क्यु. जमा इतर सन्माननीय नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
000000

टेक्‍सटाईल पार्कमुळे कृषी क्षेत्रात बदल घडू शकतो -मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • विदर्भातील पहिल्‍या टेक्‍सटाईल पार्कचे भूमिपूजन  
  • टेक्‍सटाईल पार्कमुळे मध्‍यस्‍थांची साखळी तुटेल
वर्धा,दि.11- टेक्‍सटाईल पार्कच्‍या माध्‍यमातून शेतकरी आणि उद्योगाच्‍या सहकार्याने कृषी क्षेत्रात बदल घडू शकतेा. शेतीपूरक उद्योग आणि मुल्‍यवर्धित प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून मोठया प्रमाणात शेतक-यांपर्यंत पैसा पोहोचवून त्‍यांच्‍या जीवनात आमुलाग्र बदल घडवण्‍यासाठी शासनाने इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्क योजना सुरु केली .यामुळे मध्‍यस्‍थांची साखळी दूर होऊन शेतक-यांच्‍या  कापसाला चांगला भाव मिळेल असे प्रतिपादन राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज हिंगणघाट येथे विदर्भातील पहिल्‍या इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्कच्‍या भूमिपूजन  प्रसंगी केले.
हिंगणघाट जवळ वणी येथे असलेल्‍या गिमाटेक्‍स इंडस्टि्रज प्रायव्‍हेट लिमिटेड यांच्‍या हिंगणघाट इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्कचे भू‍मीपूजन आणि नविन विस्‍तारित स्पिनींग युनीट चे उद्घाटन  मुख्‍यमंत्र्यांचे हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत  होते. या कार्यक्रमाला राज्‍याचे वित्‍त व नियोजन मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार समिर कुणावार, डॉ. पंकज भोयर, गिमाटेक्‍स कंपनीचे अध्‍यक्ष वसंतकुमार मोहता, व्‍यवस्‍थापकीय संचालक प्रशांतकुमार मोहता, अनुरागकुमार मोहता, जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, जिल्‍हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल, भाजपचे जिल्‍हा‍ध्‍यक्ष राजेश बकाने उपस्थित होते.
पुढे बोलतांना मुख्‍यमंत्री म्‍हणाले आज उद्योगाच्‍या क्षेत्रात महाराष्‍ट्र सर्वाधिक सुलभता असणारे राज्‍य आहे. असे  लिकान यु या जागतिक स्‍तरावरच्‍या उद्योगाचे मानां‍कन ठरविणा-या संस्‍थेने म्‍हटले आहे. महाराष्‍ट्रात एक वर्षात दीड लाख कोटी रुपयांची प्रत्‍यक्ष गुंतवणूक झाली असून देशातली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. तरुणांना रोजगार उलब्‍ध करुन देणे हे राज्‍य शासनाचे कर्तव्‍य आहे त्‍यासाठी गुंतवणूक झाली पाहिजे. आज राज्‍याच्‍या सकल उत्‍पनात शेतीचा वाटा केवळ अकरा टक्‍के आहे. मात्र यामधून 45 टक्‍के रोजगार निर्मिती होते. तयामुळे कृषी क्षेत्राची अवस्‍था अशी आहे. कृषी क्षेत्र जोपर्यंत उद्योग आणि सेवा क्षेत्राशी जोडणार नाही तोपर्यंत कृषी क्षेत्रात बदल होऊ शकत नाही असेही ते यावेळी म्‍हणाले.
आज महाराष्‍ट्र हे कापूस  उत्‍पादक राज्‍य म्‍हणुन ओळखले जाते. राज्‍यात निर्माण होणा-या कापसापैकी 25 टक्‍के कापसावर प्रक्रिया होते, उर्वरित 75 टक्‍के कापसावर पूरक उद्योगाच्‍या साखळी अभावी आपण प्रक्रिया करु शकत नाही. यासाठी   इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्क ही योजना शासनाने  सुरु केली असून त्‍यातील पहिला पार्क विदर्भातील हिंगणघाट येथे सुरु होत असल्‍याबाबत त्‍यांनी मोहता कुंटूबियाचे अभिनंदन केले.. यापुढे उद्योजक शेतक-यांकडून थेट कापूस खरेदी करतील. त्‍यामुळे शेतक-यांच्‍या कापसाला चांगला भाव मिळेल. यामध्‍ये कुणाचीही मध्‍यस्‍थी नसल्‍यामुळे थेट शेतक-याला कापसाची परिपूर्ती मिळेल. उद्योग आणि शेतक-यामध्‍ये सहकार्य असेल तर नव-नवीन तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहचवता येईल. कापसाची उत्‍पादकता वाढविण्‍यासाठी सुध्‍दा उद्योगाने संशोधन करुन ते शेतक-यांपर्यंत पोहचविले पाहिजे असेही मुख्‍यमंत्री यांनी यावेळी म्‍हणाले.
यावेळी बोलतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, शेतक-याच्‍या जीवनात बदल घडविण्‍यासाठी शासन फार्म टू फॅशन ही संकल्‍पना रा‍बवित आहे. त्‍याचा प्रत्‍यय इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्क च्‍या माध्‍यमातून आज येत आहे. हिंगणघाट सारख्‍या छोटया शहरात मोहता कुंटूंबियाच्‍या सहा पिढयांपासून कापड प्रक्रिया उद्योग सुरु आहे. यामध्‍ये इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्कमुळे नविन तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून उच्‍च गुणतत्‍तेच्‍या कापडाची निर्मिती होईल, असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला.
आमदार समिर कुणावार म्‍हणाले, आठ गुंतवणूकदारानी मिळून ही इंटिग्रेटेड पार्क ची संकल्‍पना साकारली आहे. यामध्‍ये 2 हजार 500 लोकांना रोजगाराची संधी  मिळणार आहे. हिंगणघाटच्‍या कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती मध्‍ये   29 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली जाते.  त्‍यामुळे हिंगणघाट हे कापूस उद्योगासाठी महत्‍वाचे शहर आहे. हिंगणघाटचा कामगार कापूस उद्योगात निष्‍णात त्‍यामुळे कापड उद्योगासाठी इथे कुशल मनुष्‍यबळ मिळेल, असेही ते म्‍हणाले. तसेच यावेळी त्‍यांनी मुख्‍यमंत्र्याकडे हिंगणघाटसाठी नाटयगृह आणि कामगारांसाठी 2 हजार घराची योजना तयार करण्‍याची मागणी केली.
यावेळी वसंतकुमार मोहता यांनी गिमाटेक्‍स इंडस्‍ट्रीबाबत माहिती दिली. तर अनुरागकुमार मोहता यांनी इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्कबाबत प्रस्‍तावना केली. यावेळी गिमाटेक्‍स इंडस्‍ट्रीच्‍या वतीने तयार करण्‍यात आलेल्‍या जी फोर्स या अॅपचे लोकार्पण  करण्‍यात आले. यावेळी  कार्यक्रमाला उद्योजक, नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.
00000

जलयुक्त शिवार अभियानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 50 हजाराचा धनादेश सुपूर्द

नागपूर दि. 11 :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या “जलयुक्त शिवार” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा चांगला परिमाण आज सर्वत्र दिसून येत आहे. या अभियानाने प्रेरित  होऊन सेन्ट्रल एक्साईज कार्यालयाचे अधिक्षक  रमेश थोटे  यांनी आज रामगिरी येथे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जलयुक्त शिवार योजनेसाठी त्यांच्या वतीने  50 हजार रूपयांचा धनादेश सुपूर्द केला.
  रमेश थोटे यांनी  सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतून प्राप्त झालेली संपूर्ण रक्कम  जलयुक्त शिवार योजनेसाठी दिली.  जलयुक्त शिवार या अभिनव उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समाजाच्या सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. अधिक्षक रमेश थोटे यांच्यापासून समाजबांधवांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले .
00000

गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करा --- मुख्यमंत्री

  • विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट

नागपूर दि. 10 :- गणेशोत्सव हा यावर्षी जन्मसिद्ध स्वराज्याचा सिंहगर्जनेचे शतक म्हणून लोकमान्य उत्सव संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव हा सर्वांनी उत्साहात व शांततेत साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  
गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेऊन सार्वजनिक गणेश मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती घेतली. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी उपस्थित होते.
बजाज नगर येथील युवक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष अनंत धोटे, संजय अदमाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करुन मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी माधव कोकडे, आनंद माखनकर, श्रीकांत सुटे, विजय मांजरेकर आदी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी गोपालनगर, गणेश उत्सव मंडळ तसेच राजे संभाजी गणेश उत्सव मंडळास भेट देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नितीन महाजन, योगेश खापे, श्रीकांत ढोक आदी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानाला 25 हजार रुपये
 भेंडे लेआऊट येथे श्री सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळातर्फे पंचतत्व हेच जीवन तत्व आहे या आधारावर आर्कषक सजावट केली असून मोठ्या प्रमाणात भाविक या उत्सवात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाल गणेश उत्सव मंडळात भेट देऊन श्रीचे दर्शन घेतले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष ईश्वर ढेंगळे, उपाध्यक्ष महेश गुडदे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी जलयुक्त शिवार अभियानासाठी मंडळातर्फे 25 हजार रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. यावेळी मंडळाचे दीपक चोपडे, राजेश राऊत, निलेश राऊत, मदन कर्निक आदी सदस्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे व्यसनमुक्ती, जलसंवर्धन, बेटी बचाव बेटी बडाओ, प्रदूर्षण निर्मूलनासाठी लोकजागर, वृक्षारोपन, सार्वजनिक स्वच्छता मोहीम आदी विषयावर लोकजागृतीपर सचित्र देखावे तयार करण्यात आले असून जनतेमध्ये या माध्यमातून जागृती निर्माण करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बर्डे लेआऊट येथील रिद्धीसिद्धी गणेश उत्सव मंडळ, खामला येथील बाल गणेश उत्सव मंडळ तसेच जयताळा त्रिमृतीनगर, लक्ष्मीनगर आदी सार्वजनिक तसेच वैयक्तिक गणेश उत्सवात सहभागी झाले.
** * * * **