Saturday, 1 September 2018

जैन तत्त्वदर्शनाचा आदर्श प्रचारक हरपला - मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली


मुंबई, दि. 1 : आपल्या प्रबोधनकारी प्रवचनांतून जागृती निर्माण करुन समाजाला योग्य मार्गावर चालण्यास प्रवृत्त करणारे क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनी तरुण सागरजी महाराज यांच्या निधनामुळे जैन तत्त्वदर्शनाचा आदर्श प्रचारक हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांनी सांगितलेल्या आदर्शांनुसार निष्ठेने वाटचाल करीत तरुण सागरजी महाराज यांनी संसारातील सत्य आणि भ्रामकता आपल्या प्रवचनांतून कठोर शब्दांत मांडल्या. जैन तत्त्वज्ञानाचा नेमका अर्थ सर्वसामान्यांना समजावून सांगितला. सत्य, अहिंसा, संयम, करुणा व अपरिग्रह या तत्त्वांचे कट्टर पाठिराखे असलेले तरुण सागरजी महाराज यांचा उपदेश व कार्य हे फक्त जैन समुदायालाच नव्हे तर संपूर्ण मानव समाजाला प्रेरित करणारे होते. त्यांचे ‘कडवे प्रवचन’ समाजाला दीपस्तंभ म्हणून सदैव मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या समाधी निर्वाणामुळे जैन संत परंपरेतील एका प्रभावी व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत.
००००

वाद-विवाद परस्पर संमतीने सोडविण्यासाठी जनजागृती महत्त्वाची - न्यायाधीश एस.एस. दास

नागपूर 1 :  प्रत्येक घरामध्ये निर्माण होणारे वाद समोपचाराने मिटविले तर न्यायालयात जाण्याची वेळ येणार नाही. मध्यस्थी ही एक प्रकिया आहे. न्यायालयात येणारे वाद विवाद परस्पर संमतीने सोडविण्याची आवश्यकता आहे. यासाठी लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा न्यायाधीश एस.एस. दास यांनी व्यक्त केले.
जिल्हा न्यायालय येथे मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी न्यायाधीश ए. के. शर्मा, जिल्हा मध्यस्थी केंद्राचे समन्वयक धनराज काळे, बार असोसिएशनचे वकील प्रकाश जयस्वाल तसेच पक्षकार आदी उपस्थित होते.
न्यायालयात तक्रार घेवून येणाऱ्या पक्षकारांचे मध्यस्थीकडून योग्य समायोजन होणे गरजेचे आहे असे न्यायाधीश दास यावेळी म्हणाले.
न्यायालयात आज असंख्य केसेस प्रलंबित आहेत. मध्यस्थीच्या माध्यमातून अशी प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावे त्‍यामुळे वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टीचा अपव्यय होणार नाही, असे मत बार असोसिएशनचे वकील प्रकाश जयस्वाल यांनी व्यक्त केले.
            याप्रसंगी न्यायाधीश ए. के. शर्मा यांनी ‘मध्यस्थीचे मूलतत्वे’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर धनराज काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार ॲड. सुरेखा बोरकुटे यांनी मानले.
*****

‘लोकराज्य’ मासिक स्पर्धा परीक्षांसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी उपयुक्त - डॉ. प्रमोद लाखे

                नागपूर, दि. 01 : महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकातील माहिती विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसह सर्वांगिण विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ‘लोकराज्य’ हे शासनांच्या विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करते, त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्तही प्रत्येकाने ‘लोकराज्य’ अंकाचे नियमित वाचन करावे, असे आवाहन प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षा केंद्राचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी आज केले. 
            जिल्हा माहिती कार्यालयाच्या


वतीने जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राच्या सभाकक्षात आयोजित केलेल्या ‘लोकराज्य वाचक मेळाव्या’चा शुभारंभ प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षा केंद्राचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
            यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक संचालक प्रवीण खंडारे,  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, सहाय्यक संचालक श्रीमती शैलजा वाघ-दांदळे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आजपासून राज्यभर ‘लोकराज्य वाचक अभियाना’स सुरुवात झाली आहे. हे अभियान 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.  
            विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संचालक डॉ. प्रमोद लाखे म्हणाले, शासनाच्या विविध योजनांच्या माहितीचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोकराज्य मासिक प्रकाशित केले जाते. लोकराज्य मासिकात राज्य शासनाची अधिकृत माहिती व आकडेवारी उपलब्ध असते. ही माहिती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. यामुळे लोकराज्य केवळ शासनाने मुखपत्र नाही तर मौल्यवान असा संदर्भग्रंथ आहे. म्हणूनच माहिती व तंत्रज्ञानाच्या युगातही आजही लोकराज्याची विश्वार्साहता कायम आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी ही लोकराज्य अंकाच्या वाचनाशिवाय अपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी संदर्भासाठी यातील दिलेली अधिकृत माहिती कोणताही परिक्षक नाकारु शकत नाही, असेही ते म्हणाले. 
            स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बाजारात विपूल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. परंतू यातील नेमके काय वाचावे, हे ज्या विद्यार्थ्यांला कळाले, त्याचा अभ्यास अल्पावधीत आणि परिपूर्ण होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चिती करुन त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यावर यश निश्चितच मिळेल. युवकांनी आपल्या पायावर उभे होऊन केवळ स्वत:ची प्रगती साधू नये तर आपण सामाजिक ऋण फेडू शकलो पाहिजे एवढे स्वत:ला सक्षम करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक राधाकृष्ण मुळी म्हणाले, लोकराज्य मासिकाची फार जूनी परंपरा आहे. लोकराज्याचे आजतायागतचे अंक बघता ‘महाराष्ट्राचा धावता इतिहास’ आपल्या नजरेसमोर उभा राहतो. लोकराज्य अंकात लिखाण करणारे लेखक त्या-त्या विषयातील तज्ज्ञ असतात. लोकराज्याचे बरेच अंक हे त्याकाळातील महत्त्वाच्या घडामोडीवर आधारित असतात. त्यामुळे एखाद्या विषयाची सखोल व अधिकृत माहिती मिळविण्यासाठी लोकराज्याशिवाय पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या अभ्यासकाच्या दृष्टीने जी मुलभूत माहिती लागते, ती लोकराज्याच्या माध्यमातून सहजगत्या आणि अल्प किमतीत उपलब्ध होते. नागरिकांचा सर्वांगिण विकास हेच शासनाचे ध्येय आहे. ग्रामीण भागात देखील शासनाच्या विविध योजनांची माहितीचा प्रचार व प्रसार होण्यासाठी लोकराज्य मासिक फायदेशीर ठरत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम सुरु करण्यात आला असून या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली.  
            प्रास्ताविक करताना जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी लोकराज्य मासिकाचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वाचन करावे तसेच इतरांनाही याबाबत माहिती द्यावी. ते म्हणाले, लोकराज्यासारख्या मासिकातून करियर घडविण्यास इच्छूक विद्यार्थ्यांना रोजगाराची नवी दालने, शासकीय योजना यांची अधिकृत माहिती उपलब्ध होते. लोकराज्य मासिकाचे विविध विशेषांक हे वाचनीय व माहितीपूर्ण असतात. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे व याबाबत इतरांनाही माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाचे ‘महाराष्ट्र वार्षिकी- 2018’ जिल्हा माहिती कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले.
            यावेळी सहाय्यक संचालक प्रवीण खंडारे यांनी देखील मनोगत व्यक्त करुन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आजपासून सुरु करण्यात आलेल्या लोकराज्य वाचक मेळाव्याच्या स्तृत्य उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहाय्यक संचालक श्रीमती शैलजा वाघ-दांदळे यांनी मानले.
*****

गावातील विद्युतविषयक अडचणींच्या निराकरणासाठी जिल्ह्यात 600 ग्राम विद्युत व्यवस्थापक

                                               * राज्यातील पहिल्या उपक्रमांला नागपूरपासून सुरुवात
                                                               * कौशल्य विकासांतर्गत प्रशिक्षण
                                                    * राज्यात 23 हजार ग्राम विद्युत व्यवस्थापकांची जाळे
                                                    * महावितरणतर्फे मिळणार मानधन
            नागपूर, दि. 1 :   ग्रामीण भागात विद्युत विषयक अडचणी सोडविण्यासाठी  तसेच महावितरणमार्फत पुरविण्यात येणाऱ्या काही सेवा ग्रामपंचायतींनी फ्रान्चायझी म्हणून काम करण्यासाठी ग्राहकांना आवश्यक सेवा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्यात आली असून यांतर्गत  पहिल्या 600 युवकांच्या तुकडीला कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाला येत्या सोमवारपासून सुरुवात होत आहे.
            महावितरणतर्फे सदर येथील नागपूर शहर मंडळ कार्यालयात प्रशिक्षण  सहा दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी महावितरणचे कार्यकारी संचालक मानव संसाधन चंद्रशेखर येरमे, प्रादेशकि संचालक भालचंद्र खंडाईत, मुख्य अभियंता दिलीप घुगल,अधीक्षक अभियंता मनीष वाट, नारायण आमधरे, बंडू वासनिक आदींच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होत आहे.
            ग्रामीण भागामध्ये महावितरण कंपनीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवेसाठी  गावाच्या समूहाकरिता लाईनमनची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु  यामध्ये बिघाड झाल्यास किंवा दुरुस्ती करायची असल्यास तातडीने सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावातच अडचणींचे तातडीने निराकरण कसे व्हावे यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापक निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्राम विकास विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायत  फ्रान्चायझी म्हणून काम करणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीमार्फत आयटीआय झालेल्या उपयुक्त व क्षमता असलेल्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. अशाप्रकारच्या राज्यात 23 हजार ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
            ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून निवड केलेल्या व्यक्तींना महावितरण कंपनीतर्फे सहा दिवसांचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार असून नागपूर जिल्ह्यातील या सुमारे 600 प्रशिक्षणार्थ्यांना येत्या  3 सप्टेंबरपासून प्रशिक्षणाला सुरुवात होत आहे. यासाठी महावितरणतर्फे प्रतिग्राहक 9 रुपये याप्रमाणे उत्पन्न किंवा 3 हजार रुपये मानधन महावितरण कंपनीमार्फत देण्यात येणार आहे.
            ग्रामीण भागातील  विद्युत ग्राहकांच्या सुरक्षेसोबतच गावामध्ये उद् भवणाऱ्या विद्युत विषयक अडचणींचे निराकरण तातडीने करणे शक्य व्हावे यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुषंगाने ग्राम विकास विभागातर्फे ग्राम पंचायतींनी  फ्रान्चायझी म्हणून काम करणार आहे. राज्यातील 3 हजार लोकसंख्यापर्यंतच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतस्तरावर आवश्यक सेवा पुरविण्यात येणार आहे. यामध्ये मीटर रिडिंग घेणे, वीज देयके वाटप करणे, ब्रेक डाऊन अटेंड करुन सप्लाय पूर्ववत करणे, रस्त्यावरील दिवाबत्तीची देखभाल, दिवे बदलविणे, नवीन जोडणीचे कामे, थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणे आदी कामे ग्राम विद्युत व्यस्थापकांमार्फत करण्यात येणार आहे.
            ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या निवड प्रक्रियेसंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होवून ग्राम विद्युत व्यवस्थापकांना जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत महावितरणला व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर म्हणून मान्यता देण्यात आली असल्याची जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक संचालक प्रवीण खंडारे यांनी दिले.
****