Sunday 28 July 2019

कार्गो, लॉजिस्टिक, एव्हिएशनसह नागपूर शैक्षणिक हब म्हणून जगाच्या नकाशावर - देवेंद्र फडणवीस










·         सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे उद्घाटन
·         परिसरात वृक्ष लागवडही करणार
·         कौशल्य विकासासह विविध अभ्यासक्रम सुरु होणार

        नागपूर,दि.28:  युवाशक्ती हे भारताचे बलस्थान असून या शक्तीला सर्वोत्तम बनविण्यासाठी गुणवत्तापुर्ण शिक्षणावर भर देण्याची आवश्यकता आहे. सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून नागपूर आता कार्गो, लॉजिस्टिक आणि एव्हिएशन हबबरोबरच शैक्षणिक हब म्हणून जगाच्या नकाशावर येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            वाठोडा येथे सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, कुलपती डॉ. शां.ब.मुजुमदार, कुलगुरु डॉ. रजनी गुप्ते, प्र.कुलगुरु डॉ. विद्या येरवडेकर, माजी खासदार विजय दर्डा व मान्यवर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी नागपूर येथे कार्यरत होत असून नागपूरकरांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. अल्पावधीत विद्यापीठाचे भव्यदिव्य कॅम्पस उभे राहिले असून, विद्यार्थ्यांसाठी हे स्वप्नवत विद्यापीठ ठरेल. निव्वळ देखणी वास्तूच नव्हे तर शैक्षणिक गुणवत्ता हे सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे वैशिष्टय आहे. कोणतीही मोठी स्वप्ने विशाल दृष्टीच्या नेतृत्वातून साकार होतात. सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून नागपूर आणि पर्यायाने विदर्भाच्या विकासाला चालना मिळणार आहे.
            आजपर्यंतचा इतिहास पाहता नामवंत विद्यापीठांनीच मोठी शहरे, औद्योगिकरण व सामाजिक, सांस्कृतिक चळवळींना आकार दिला आहे. विद्यापीठ मानव संसाधनाची निर्मिती करतात व याद्वारे विकासाला चालना मिळते. भारताकडे आज युवाशक्ती मोठया प्रमाणात आहे. या युवाशक्तीला सर्वार्थाने सर्वोत्तम बनविण्यावर आता भर द्यावा लागेल. यासाठी गुणवत्तापुर्ण शिक्षण महत्वाचे ठरत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशात औद्योगिकरणाचा वेग वाढत असून नागपूरही आता कार्गो, लॉजिस्टिक, एव्हिएशनबरोबरच शैक्षणिक हब म्हणून जगाच्या नकाशावर आले आहे. याविषयासंदर्भातील विविध अभ्यासक्रमही सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत सुरु होतील. या विद्यापीठामुळे नागपूर आणि विदर्भातीलच नव्हे तर परदेशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचीही दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
       केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपूर आता एज्युकेशन हब म्हणून पुढे येत असून सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध होत आहे. शिक्षणासाठी पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ आता नागपूरकडे वळेल, याचा विदर्भातील विद्यार्थ्यांना लाभ होईल. विद्यापीठाच्या परिसरातील रिंगरोड सिमेंट काँक्रेटचा होत आहे. जवळच मेट्रोचे स्टेशन आहे. याबाबी विद्यापीठासाठी जमेच्या ठरणार आहे. मिहान येथे 26 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला असून आगामी काळातही याठिकाणी मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. लघु उद्योगांच्या विकासावर विशेष भर देण्यात असून यासाठी उद्योगांनी पुढे यावे. नागपूर येथे वैद्यकिय उपकरणांच्या निर्मितीचे क्लस्टर पार्क उभारण्यासाठी राज्यशासनाने पुढाकार घ्यावा, केंद्रशासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल असेही श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले.
            सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. शां.ब. मुजुमदार म्हणाले, विद्यापीठे नागपूर येथे होत असलेले कॅम्पस संस्थेसाठी आणि नागपूरकरांसाठी अभिमानास्पद आहे. जगाच्या सीमारेषा फुसट होत असून विनोबांची जय जगत’ संकल्पना पुढे नेत वसुधैव कुटुंबकमची भावना जोपासली पाहिजे. सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून नागपूर येथे विदर्भातील विद्यार्थ्यांबरोबरच परदेशी विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. आगामी काळात नागपूर केम्ब्रिज ऑफ ईस्ट’ म्हणून ओळखले जाईल असा विश्वास श्री. मुजुमदार यांनी व्यक्त केला. विद्यापीठाच्या परिसरात 1 लाख वृक्ष लावण्याचा मनोदयहीश्री. मुजुमदार यांनी व्यक्त केला.
            प्र-कुलगुरु डॉ.विद्या येरवडेकर म्हणाले, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे नागपूर कॅम्पस संस्थेचे सर्वात मोठे आणि सुसज्ज कॅम्पस ठरणार आहे. कौशल विकासावर आधारित अभ्यासक्रमांबरोबरच विविध विद्याशाखा येथे सुरु करण्यात येत असून विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा नक्कीच लाभ होईल.


******


पंडीत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गंत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गँस व शिधापत्रिका वाटप


            नागपूर, दि.२८: पंडीत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान अंतर्गंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पात्र लाभार्थींना गँस जोडणी तर दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदयद्वारे शिधापत्रिका वितरीत करण्यात आले. गँस जोडणी व शिधापत्रिका वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान 'रामगिरी' येथे पार पडला. 
            यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी महापौर प्रवीण दटके, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी लिलाधर वार्डेकर उपस्थित होते.
            शिवणगाव येथील श्रीमती देवकाबाई तुळशीराम मेश्राम आणि सोनाली संजय टोम्पे यांना गँस जोडणी देण्यात आली. तर श्रीमती योगिता राजू डोंगरे, श्रीमती भावना शैलेश मानकर आणि आनंदा शिवराम चामटे हे दिव्यांग अंत्योदय अंतर्गत शिधापत्रिकेचे लाभार्थी होते. यावेळी जिल्हा पुरवठा विभागाचे अनिल सवई, अर्चना निमजे, प्रियंका सोनकुसळे, अनिता वानखडे आणि किशोर टालाटुले उपस्थित होते.
000000