Monday 31 May 2021

सिंचन योजनेच्या कामास गती द्या - सुनील केद्रार

सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी अपूर्ण सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देतानांच कालमर्यादा निश्चित करा, असे निर्देश सूनील केदार यांनी आज येथे दिलेत. नवेगाव खैरी पुरक कालवा उपसा सिचन योजनेचा आढावा पशुसंवर्धन मंत्री केदार व आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख्य उपस्थितीत सिंचन भवन येथे घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक विजयकुमार मोहिते, मुख्य अभियंता ब. शं. स्वामी, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. चौराई धरणामुळे उद्भवलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पेंच प्रकल्पांतर्गत उपाययोजना प्रस्तावित आहे.नागपूर शहरातील पिण्याच्या पाण्याचा टंचाईचा प्रश्न उद्भवत आहे. नवेगाव खैरी उपसा सिंचनामुळे मुबलक पाणी नागपूर शहरास उपलब्ध होईल, असे श्री. केदार यांनी सांगितले. दिवसेंदिवस नागपूर शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यादृष्टीने आता पासूनच पाण्याचे स्त्रोत तयार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. नवेगाव खैरी पूरक कालावा उपसा सिंचन प्रकल्पामुळे 15 टिएमसी पाणी मिळणार असून यापैकी 7 टिएमसी पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी महत्त्वपूर्ण अशा कन्हान नदी वळण योजना आणि इतर सात आदिवासी भागातील गावांना उपसा सिंचन पूर्ण करण्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेस निधी कमी पडू देणार नाही सिंचन प्रकल्पाची संपूर्ण माहिती तयार करुन अपूर्ण प्रकल्पाची कामे, प्रशासकीय मान्यता व सुधारित प्रशासकीय मान्यता प्राधान्याने घेण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सचिवालयात पाठविण्याच्या सूचना देवून सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. नवेगाव खैरी पूरक कालवा उपसा सिंचन योजनेच्या कामाला प्राधान्य दिल्यास सावनेर तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासह पाणी सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे. सिंचनासाठी कायमस्वरुपी सुविधा निर्माण होणार असल्यामुळे ही योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्यात येणार असून, यासंदर्भात निधी उपलब्ध करण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. कोच्छी बॅरेज प्रकल्पामुळे सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे. मध्य प्रदेशातील पेंच नदीवरील सिंचन प्रकल्पामुळे निर्माण झालेला सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार आहे. कन्हान नदीवर रबर डॅम बाधण्यासाठी सन 2020-2021 साठी 1 हजार कोटीचा निधी मंजूर असून अंतर्गत तीन भागांत करावयाच्या उपाययोजनांना दुष्काळ निवारण कार्यक्रमांतर्गत तत्वतः मान्यता देण्यात आली असल्याचे माहिती श्री. मोहिते यांनी यावेळी बैठकीत दिली.

Sunday 30 May 2021

जागतिक तंबाखू नकार दिन

• तंबाखूला द्या नकार, सुदृढ आरोग्याचा करा स्विकार • मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 1800-11-2356 राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत दरवर्षी 31 मे हा दिवस 'जागतिक तंबाखू नकार दिन ' म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी 60 लाख लोकांचा तंबाखू सेवनाने मृत्यू होतो. ही संख्या 2030 पर्यंत 80 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे तंबाखू सेवनामुळे संपूर्ण शरीरावर हानिकारक परिणाम होतात. तंबाखूजन्य पदार्थ चघळल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तंबाखू थुंकणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर होतेच पण त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊन कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, पक्षाघात, अंधत्व, श्रवणाचे आजार, पुनरुत्पादन संस्था तसेच पचनसंस्थेचे आजार, क्षयरोग इत्यादी आजार होतात. याशिवाय कोरोनाचा आजार होण्याचा धोका वाढतो. तंबाखू सोडल्यास 8 तासामध्ये ऑक्सीजनची पातळी सर्वसाधारण होण्यास मदत होते. 72 तासांमध्ये फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. तसेच एका वर्षामध्ये हृदयरोग होण्याचा धोका अर्ध्यापेक्षा कमी होतो. शिवाय 15 वर्षामध्ये हा धोका सामान्य व्यक्तीप्रमाणे राहतो. व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीने घाबरु नये. व्यसन हा इतर आजाराप्रामाणे आजार आहे व तो उपचाराने व प्रयत्नाने बरा होऊ शकतो. त्यामुळे आजपासून व्यसन करणार नाही, असा निर्धार करा व तंबाखूचा त्याग करा. तंबाखू व ई-सिगारेटला नकार देवून सुदृढ आरोग्याचा स्विकार करा. तंबाखू सोडण्यासाठी मदत हवी असल्यास टोल फ्री क्रमांक 1800-11-2356 वर संपर्क साधा. आपणास निश्चित मदत मिळेल. *****

Friday 28 May 2021

कोरोना प्रतिबंधाचे अनोखे वझ्झर मॉडेल !

नागपूर, दि.28 : कोरोनामुळे बाधित झालेल्या नागरिकांची संख्या पहिल्या लाटेपासून वाढत असतानाच वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहातील 123 बालकांना कोरोनाची लागण झालेली नाही. कोरोना प्रतिबंधाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतानाच त्यांच्या विशेष संगोपणाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे ही संपूर्ण बालके कोरोनामुक्त ठेवण्यात यश आले आहे. बालगृहातील एकाही मुलाला कोरोनाची लागण होऊ नये ही अतिशय वैशिष्टयपूर्ण अशी बाब ठरली आहे. स्वर्गीय अंबादासपंत दिव्यांग बेवारस बालगृहाच्या माध्यमातून मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या परतवाडा तालुक्यातील वझ्झर येथे ज्येष्ठ समाज सुधारक शंकरबाबा पापडकर अंध, अपंग व मतिमंद असलेल्या 123 मुलांचा सांभाळ करीत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनामुळे गावे बाधित झाली असताना वझ्झर येथे बालगृह त्यापासून मुक्त राहिले आहे. एकमेकांच्या मदतीशिवाय ज्या मुलांचा सांभाळ शक्य नाही, अशा मुलांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी शंकरबाबांची धडपड निश्चितच गौरवास्पद आहे. अनाथ मतिमंद बालकांचा सांभाळ करताना त्यांच्यामध्ये स्वयंशिस्त ठेवण्याची किमया या बालगृहात पाडल्यामुळे एकाच छताखाली एकत्र राहूनही मागील दीड वर्षापासून एकाही मुलाला ताप अथवा सर्दी झाली नाही. त्याच महत्वाच कारण म्हणजे स्वच्छतेला दिलेले प्राधान्य. 123 मुलापैकी 98 मुली एकत्र राहतात. मतिमंद असल्यामुळे अनेक मुलांना जेवणसुध्दा भरवावे लागते. अशा परिस्थितीतही बालकांमध्ये विश्वास जागृत करण्याचे काम सातत्याने केले जाते. मुलांनी जगविली 15 हजार झाडे बेवारस असलेल्या मतिमंद तसेच अंध व अपंग मुलांनी बालगृहाच्या परिसरात विविध प्रजातीची 15 हजार झाडे लावली आहेत. या वृक्षांचा सांभाळ करण्याची जबाबदारी बालकांनी स्वीकारली आहे. त्यामुळे 200 पेक्षा जास्त प्रजाती असलेल्या झाडांची वनराई निर्माण झाली आहे. यामध्ये 5 हजार कडुलिंबाची झाडे असून आता बहारदार वनराई फुलल्यामुळे प्रसन्न व आरोग्यदायी वातावरण निर्माण झाल्याचे शंकरबाबा पापडकर यांनी सांगितले. कोरोनासंदर्भात मागील 21 मार्च रोजी पहिल्यांदा टाळेबंदी जाहीर करण्यात आली. तेव्हापासून बालगृहामध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. आरोग्य पथकाच्या तपासणी व्यतिरिक्त कुणालाही या परिसरात प्रवेश नाही. कडुलिंबाचा निर्जंतुकीकरणासाठी वापर करताना औषध म्हणूनही याचा वापर केला जात आहे. बालसुधारगृहातील सर्व 123 बालकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यात यश आले असतानाच येथील मुलांना कोरोनावरील लस मिळावी यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नेवाल यांना विनंती केली आहे. या बालगृहात 18 वर्ष व त्याहून अधिक वयाचे असलेल्यांना लस मिळावी हा शंकरबाबांचा आग्रह आहे. वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या प्रचलित नियमानुसार बालगृहात मुलांना प्रवेश नसल्यामुळे अशा मुलांच्या भविष्यातील संगोपनाचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे शासनाच्या प्रचलित कायदयामध्ये बदल करुन मतिमंद मुलांचे आजीवन पुनर्वसन व्हावे असा आग्रह शंकरबाबा पापडकर सातत्याने धरत आहेत. ******

‘काश, मास्क ठिक से पहना होता’ कोरोनाविषयक जागृती मोहिमेचा प्रारंभ

नागपूर, दि.28 : कोरोनापासून वाचायचे असेल तर मास्क घालणे अत्यावश्यक आहे. एक छोटीशी मुखपट्टी (मास्क) कोणाचा तरी जगण्याचा आधार वा आयुष्याचे छत्र हिरावण्यापासून वाचवू शकते. परंतु नागरिकांमध्ये असलेल्या बेफिकिरीमुळे अनेकांना आपले प्राणसुध्दा गमवावे लागले आहेत. कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर मास्कची आवश्यकता सर्वसामान्य नागरिकांना कळावे यासाठी ज्येष्ठ छायाचित्रकार व कलावंत विवेक रानडे यांच्या कल्पकतेतून जनजागृती मोहीम साकारली आहे. या विशेष मोहिमेचा प्रारंभ विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते झाला. कॅलामिटी रिस्पॉन्स ग्रुप नागपूर व माहिती व जनसंपर्क विभाग हे संयुक्तपणे कलात्मक कोरोना प्रतिबंधासाठी प्रबोधन मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेला जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य मिळणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात एक छोटेखानी कार्यक्रमात या जनजागृती मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी विवेक रानडे, अमित पंचेमेतीया, माहिती संचालक हेमराज बागुल, माध्यम समन्वयक अनिल गडेकर, दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या उपसंचालक गौरी पंडीत-मराठे , आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच मास्क घालणे, हात साबणाने स्वच्छ धुणे व सामाजिक अंतर पाडणे या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे निर्देश आयसीएमआरने दिले होते. नागरिकांकडून मास्क न घालण्याबद्दल स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुध्दा सुरु केली आहे. परंतु मास्क न घालणे व घातला असल्यास व्यवस्थित न घालणे याबद्दल बेफिकिरीची वृत्ती सर्वत्र दिसून येत आहे. मास्क घातला तर आपले अमूल्य प्राण वाचू शकतात या कल्पनेच्या आधारे विवेक रानडे यांनी कलात्मक जाहिरात मोहीम तयार केली आहे. ही माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावी यासाठी प्रशासनातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. कोरोनामुळे आई, वडील, भाऊ, मित्र, मुलगा आजोबा असे आप्तजन आपण गमावले आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमाचे आपण काटेकोर पालन केले असते तर या सर्वांचे प्राण वाचू शकले असते. दुसऱ्या लाटेनंतर तरी आता जागृत होण्याची वेळ आली आहे. मुखपट्ट्यांचा वापर करणे आवश्यक आहेच परंतु मुखपट्टी वापरताना ती केवळ दंडात्मक कारवाई होवू नये ऐवढयापुरतीच नसून कोरोनापासून संरक्षणासाठी आहे. याची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेची तिव्रता आदीच्या लाटेपेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मुखपट्यांचा योग्य व शास्त्रोक्त करावा यासाठी ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. कोरोनापासून बचावासाठी मुखपट्टी हेच शस्त्र राहणार आहे. मुखपट्टी घाला नाही तर कोरोना होण्याचे प्रमाण वाढेल, आपले कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी मुखपट्टीचे महत्त्व या जागृती मोहिमेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर विभागीय कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. ******

Thursday 27 May 2021

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांची योग्य काळजी घ्या - डॉ. आनंद भुतडा

नागपूर, दि.27: आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त धोका असल्याचे संकेत दिले आहे. प्रत्येक पालकाने आपापल्या मुलांची सुयोग्य काळजी घेतल्यास मुलांना कोरोनापासून वाचविता येऊ शकते, असे बालरोग तज्ज्ञ डॉ. आनंद भुतडा यांनी स्पष्ट केले. नागपूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोनाची तिसरी लाट आणि म्युकरमायकोसिससंदर्भात लोकजागृती अभियानामध्ये कोरोनाची तिसरी लाट परतवून लावण्यासाठी प्रशासन सुसज्ज असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यावेळी उपस्थित होते. नवजात बालकांची काळजी घ्या मार्गदर्शक म्हणून डॉ.आनंद भुतडा बोलत होते. नवजात बाळांसह कोणत्याही वयोगटातील मुलांना कोरोनाचा धोका संभवतो. त्यामुळे गाफिल राहू नका, असे आवाहन करतांना डॉ. भुतडा म्हणाले. मोठ्या व्यक्तींप्रमाणे मुलांमध्येही कोरोनाची लक्षणे सारखीच आहेत. कोरोनाची लक्षणे दिसताच मुलांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. घरात एकापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाल्यास लहान मुलांची तपासणी करून घ्यावी. लहान मुलांना कोरोना होत नाही हा गैरसमज असल्याचे ते म्हणाले. रॅपीड अॅण्टीजेन टेस्ट किंवा आरटी-पीसीआर चाचणींच्या माध्यमातून कोरोनाचे निदान करून घेता येईल, असेही त्यांनी सांगितले. पोस्ट कोविड एमआयएस-सी लहान मुलांना कोरोनानंतर दीड ते दोन महिन्यानंतर पोस्ट कोविड एमआयएस-सी होऊ शकतो. यात जास्त प्रमाणावर ताप येतो. बाळाच्या लिव्हर, किडनी, हृदयावर सूजही येते. त्यामुळे बाळांची प्रकृती जास्त खराब होऊ शकते. अंगावर लाल चट्टेही येऊ शकतात. त्यामुळे कोरोना आणि एमआयएस-सीचे वेळीच निदान करून घेणे गरजेचे असते, असे डॉ.भुतडा म्हणाले. ‘बाळाची काळजी’ या सत्राचा समारोप करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कोरोनाचा लढा सर्वांनी एकत्र येत मजबूत करण्याचे आवाहन केले. मुलांना देण्यात येणारे उपचार v कोरोनाबाधित मुलांना मोठ्या व्यक्तींची औषधे देण्यात येत नाही. v कोरोना झाल्यास किंवा लक्षणे असल्यास पाण्याचे प्रमाण व पातळ आहार जास्त प्रमाणात दिला जातो. v पचायला अत्यंत सहज असे पातळ पदार्थ, पेस्ट मुलांना दिली जाते. v तापासाठी पॅरासिटामॉल देण्यात येते. v व्हिटॅमीन सी, झिंकचे औषध देण्यात येते. पालकांनो, कोणती खबरदारी घ्याल? v मुलांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून रोखा. v लक्षणे आढळल्यास मुलांचे 17 दिवस विलगीकरण. v मुलांना कोरोना झाल्यास पालकांनीही घराबाहेर पडू नये. v पालकांना कोरोना झाला असल्यास मुलांना दूर ठेवा. v मास्क, सॅनिटायजर, सुरक्षित अंतराचे पालन करा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ग्रामीण व शहरी भागात लहान मुलांची तपासणी व उपचार यासंदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. ******

खबरदारीतून परतवून लावू तिसरी लाट - डॉ. प्रकाश देव

सर्वेक्षणासाठी पंचसुत्रीचा अवलंब करा नागपूर, दि.27: कोरोनाचे संकट गेल्या दीड वर्षांपासून देशावर घोंघावत आहे. नागरिकांनी एकत्र लढा देत, संयमाने आतापर्यंत दोनदा कोरोनाची लाट परतवून लावली आहे. तिसरी लाट येणार असे सांगण्यात येत आहे. पण घाबरण्याचे कारण नाही. सर्वांनी एकत्रपणे संयमातून खबरदारी घेतल्यास तिसरी लाटही आपण परतवून लावू, असा ठाम विश्वास इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. प्रकाश देव यांनी व्यक्त केला. नागपूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोनाची तिसरी लाट आणि म्युकरमायकोसिससंदर्भात लोकजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाचा भाग म्हणून डॉ. देव बोलत होते. डॉ. देव यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करण्यापूर्वी बोलताना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले, दुसरी लाट नागपूर जिल्ह्याने परतवून लावली. तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना काही तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन सत्र जिल्हा प्रशासनाने आयोजित केले आहे. त्याचा नागपूरकरांना निश्चितच फायदा होईल. चुकीच्या नव्हे, योग्य माहितीवर विश्वास ठेवा कोरोना झाल्यानंतर काही लोक नशिबाला दोष देत बसतात. अनेकदा काही जण विविध माध्यमातून येणाऱ्या चुकीच्या माहितीला, एमएसएम, व्हिडीओला बळी पडतात. असे न करता डॉक्टर, अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा यांच्या माध्यमातून जी अधिकृत माहिती येईल, त्यावरच विश्वास ठेवा, असे आवाहन डॉ. देव यांनी केले. प्रशासकीय यंत्रणेने जसा हिवताप (मलेरीया) नष्ट केला, अगदी त्याचप्रमाणे कोरोनाशी युद्ध करायचे आहेत. यात दोन प्रकारची जबाबदारी आरोग्य सेवकांवर येणार आहे. आशा, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आदींनी यासाठी घरोघरी जाऊन (अॅक्टिव्ह) सर्वेक्षण करावे, असे आवाहन डॉ.प्रकाश देव यांनी केले. सर्वेक्षणाची पंचसूत्री v आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक व्यक्तीची घरोघरी तपासणी करावी. v संबंधित व्यक्तींच्या संपूर्ण माहितीचा डाटा सुसज्ज ठेवावा. v संशयित रुग्ण असल्यास तो कुठून आला, त्याला ताप वगैरे किती आहे, याच्या नोंदी ठेवाव्यात. v संशयित व्यक्तीला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, फुप्फुसाचे आजार आहे का, याची माहिती घ्यावी. v रॅपीड अॅण्टीजेन टेस्ट, आरटी-पीसीआर चाचणी करावी. योग्य उपचार करी, तो रुग्णाला तारी आरोग्य सेवकांनी कोरोनाबाधितावर योग्य उपचार करणे गरजेचे आहे. कोरोनाबाधिताचे विलगीकरण करणे सर्वांत आधी गरजेचे आहे. रुग्णाला 99 फॅरनहिट ताप असेल, पल्स ऑक्सिमीटरमध्ये ऑक्सिजनची पातळी 94-95 असेल, दम लागत नसेल तर अशा रुग्णांना घरीच पॅरासिटामॉल देऊन बरे करता येऊ शकते. अशा रुग्णांनी स्वत:च्या मनाने इतर कोणतीही औषधे घेऊ नये. फक्त विलगीकरणात राहत योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्यावा. सत्राचा समारोप करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले की, कोरोनाबद्दल योग्य माहिती कमी आणि अफवा अधिक आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम पसरत आहे. हा संभ्रम नागरिकांनी दूर करावा. कोणत्याही माहितीची योग्य यंत्रणेकडून खात्री करून घ्यावी, असे आवाहन डॉ.प्रकाश देव यांनी केले आहे. ग्रामस्थांनी घ्यावा पुढाकार v गावागावात आता कोरोना शोध पथके स्थापन करणे गरजेचे झाले आहे. v गावात नवीन व्यक्ती आल्यास त्याचे 17 दिवस विलगीकरण करणे गरजेचे आहे. v पथके तयार करण्यासाठी गावातील तरुणाईने पुढाकार घ्यावा. v प्रशासकीय यंत्रणेच्या सूचनेप्रमाणे लसीकरण करून घ्यावे. v रुग्णालयांची यादी, सेवांची माहिती अद्ययावत ठेवावी. ग्रामीण भागात कोरोना विरुध्द लढण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. माझे गाव सुरक्षित ठेवण्यासाठी गावांमध्ये स्पर्धा सुरु झाल्याचे श्री. कुंभेजकर यावेळी म्हणाले.

Tuesday 25 May 2021

बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका - डॉ. दीप्ती जैन

नागपूर, दि.25 : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका संभविण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अशात सर्व बालकांकडे आणि त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून नका, असे कळकळीचे आवाहन नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाल चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. दीप्ती जैन यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीसंदर्भात बाल रोग विभागाच्या प्रमुख डॉ.दीप्ती जैन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाच्यावतीने कारोनाची तिसरी लाट आणि म्युकर मायकोसिससंदर्भात लोकजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाचा भाग म्हणून डॉ. जैन बोलत होत्या. शहरी आणि ग्रामीण भागातील शिशुंच्या संगोपनाच्या पद्धतीत थोडा फरक आहे. कोरोना झालेल्या बाळांमध्ये थोडी वेगळी लक्षणे आढळतात. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील वातावरण, राहणीमानही थोडे वेगळे असते. त्यामुळे अशा भागात राहणाऱ्या बाळांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे असते. लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यास ताप, सर्दी, खोकला, मळमळ, उलटी, पोट दुखणे, जुलाब अशी लक्षणे दिसू शकतात. अशी माहिती देतांना डॉ.दीप्ती जैन म्हणाल्या की, बाळांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसताच तातडीने उपचारात्मक पावले उचलावी. रॅपीड अॅण्टीजेन टेस्ट आणि आरटी-पीसीआर चाचणीच्या माध्यमातून कोरोनाचे निदान करून घेता येते. सौम्य प्रकारच्या कोरोनात रक्ताच्या चाचण्यांची फारशी गरज भासत नाही. परंतु तरीही आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे त्या म्हणाल्या. बाल आरोग्यासंदर्भात डॉ. जैन यांनी दिलेल्या टीप्स v बालकांना भरपूर पाणी पाजा. v बालकांना पातळ आहार द्यावा. v ताप, ऑक्सिजन पातळी मोजत रहा. v 100 फॅरनहिट किंवा त्यापेक्षा जास्त ताप असेल तर पॅरासिटामॉल द्या. v ताप असल्यास दर सहा तासांनी पॅरासिटामॉल देता येईल. v कोरोनासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून नका. v चार दिवसांपेक्षा जास्त ताप असेल तर बाळाला दवाखान्यात न्यावे. v बाळाला श्वसनास त्रास होत असेल तरी दवाखान्यात न्यावे. v भूक कमी होणे, बाळ सुस्त असल्याही तातडीने सल्ला घ्यावा. आई कोरोनाबाधित असल्यास नवजात शिशूला कोरोना होऊ शकतो. परंतु अशा परिस्थितीत घाबरण्याची गरज नाही. अशा बाळांना आईला स्तनपान करू द्यावे. मातांनी सॅनिटायजर, मास्कचा वापर करावा. आशा, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हा संदेश घराघरात पोहोचविणे गरजेचे असल्याचे डॉ. जैन यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भात प्रशानातर्फे आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. जनतेने कोरोना प्रतिबंधासाठी दिलेल्या प्रोटोकॉलचे पालन करावे तसेच सर्व पात्र नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले की, कोरोना नवनवीन रुपात पुढे येत आहे. अशात आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अद्ययावत माहिती सामान्यांपर्यंत पोहोचावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. ******

Friday 21 May 2021

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त प्रतिज्ञा

नागपूर, दि. 21 : माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांची पुण्यतिथी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो. विभागीय आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्त संजय धिवरे यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जीवित मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु, अशी प्रतिज्ञा अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. यावेळी उपायुक्त श्रीकांत फडके, चंद्रभान पराते आणि तहसीलदार अरविंद सेलोकार, नायब तहसीलदार संदिप वडसे, आर. के. दिघोळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातही प्रतिज्ञा वाचन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त प्रतिज्ञा वाचन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरिष पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, सुजाता गंधे, शितल देशमुख आदी उपस्थित होते. 00000

म्युकरमायकोसिसला सहज ठेवता येते दूर - डॉ. प्रशांत निखाडे

• म्युकरमायकोसिस आजाराच्या जनजागृती अभियानाला सुरुवात नागपूर, दि. 21 : काळी बुरशी अर्थात म्युकर मायकोसिस हा आजार आपण सहजपणे दूर ठेवू शकतो. रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन आणि काळजी यातून कोरोना व म्युकरमायकोसिस हा आजारही दूर राहू शकतो. परंतु, जनतेने कोरोनातून बरे झाल्यानंतर काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे विदर्भ कान, नाक, घसा संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनामधून बरे झालात पण म्युकरमायकोसिसपासून काळजी घ्या, यासंदर्भात लोकजागृती अभियानाला सुरुवात केली आहे. या आजाराची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपायांबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांकडून सल्ला व मार्गदर्शन सुरु करण्यात आले आहे. विदर्भ कान नाक घसा संघटनेच्या अध्यक्षांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. कोरोना विषाणू, कोरोनानंतर घ्यावयाची काळजी, म्युकरमायकोसिस आजार व घ्यावयाची दक्षता तसेच तिसऱ्या संभाव्य लाटेसंदर्भात वैद्यकीय सज्जता याबाबत आशा वर्करपासून प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी – कर्मचारी तसेच जनतेसाठीसुद्धा विविध माध्यमांद्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. डॉ. प्रशांत निखाडे म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. त्यामुळे घाबरु नका. हा रोग वातावरणातून शरीरात येतो. मधुमेह असलेल्या किंवा कोरोनाच्या उपचारादरम्यान मधुमेह झाला, अशांना म्युकरमायकोसिसचा त्रास होत आहे. शरीरात तीन ठिकाणी याची लक्षणे आढळतात. दातांमध्ये, नाकातून सायनसमध्ये नंतर डोळ्यांमध्ये आणि नंतर मेंदूमध्ये हा विकार आढळून येतो. यात दात हे प्रथम लक्ष्य असते. दातांना यामुळे प्रचंड वेदना होऊ शकतात, असे प्रतिपादन डॉ. निखाडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले. म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यास नाक बंद होते. तो सायनसमध्ये जास्त पसरल्यास डोळ्याने अंधुक दिसू लागते. आणि नंतर याचा संसर्ग मेंदूमध्ये झाल्यास फिट्स येतात. काळ्या बुरशीला आवर घालण्यासाठी रुग्णालयांनी रोज रुग्णाची रक्तशर्करा चाचणी करावी. रुग्णालयातून सुटी झाल्यावरही आहाराचे काही नियम पाळणे रुग्णाला जरुरी असल्याचे ते म्हणाले. मातीकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना या बुरशीचा धोका जास्त आहे. त्यामुळे पावसाळ्यात शेतात काम करताना शेतकऱ्यांनी मास्क, हातमोजे घालणे गरजेचे आहे, असे डॉ. निखाडे यांनी नमूद केले आहे. ******

Wednesday 19 May 2021

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा नागपूर दौरा

नागपूर, दि. 19 : गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांचे उद्या गुरुवार, दिनांक 20 मे रोजी दुपारी तीनला नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते मोटारीने कारंजा (लाड) जि. वाशिमकडे प्रयाण करतील. सोईनुसार त्याचदिवशी रात्री नागपूरला परत येत रविभवनला मुक्काम करतील. शुक्रवार, दिनांक 21 मे रोजी दिवसभर राखीव व रात्री सातचाळीसला विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील. *****

Tuesday 18 May 2021

तोक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन तात्काळ मदत करा - आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार

वीज पुरवठा सुरळीत करा, पडझड झालेली घरे तत्काळ दुरुस्त करा नागपूर दि. 18. तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, खंडित झालेला वीज पुरवठा त्वरित सुरळीत करा तसेच पुढील पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन पडझड झालेल्या घरांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. वडेट्टीवार बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता आणि मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते. श्री वडेट्टीवार म्हणाले, गेल्या दोन- तीन दिवसांपासून तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई जिल्ह्याला जोरदार फटका बसला आहे. तुफानी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. घरांचे पत्रे उडून गेले आहेत तर अनेक घरांच्या भिंती पडून मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचा मुख्य स्रोत असलेल्या फळ बागांचे नुकसान झाले आहे तसेच मच्छिमारांच्या बोटींचेही नुकसान झाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनामुळे आधीच संकटाचा सामना करत असलेल्या जनतेला या तोक्ते वादळाचा फटका बसून मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने विचार करुन लवकरात लवकर मदतकार्य सुरू करावे. चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे, सर्व नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करणाऱ्यांसाठी नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्यात यावेत. वीज, रस्ते, पाणीपुरवठा योजना यांची दुरुस्ती युद्ध पातळीवर करण्यात यावी. तसेच पुढील पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता ज्या लोकांच्या घराचे नुकसान झाले आहे त्याची दुरुस्ती लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्तांना अन्न धान्य केरोसिन व जीवनावश्यक साहित्याची तत्काळ मदत करा, असे निर्देश श्री. वडेट्टीवार यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'ब्रेक द चेन' च्या कडक निर्बंधातही चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी हार्डवेअरची दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात येतील. नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करण्यासाठी नुकसानीचा प्राथमिक अंदाज लगेच सादर करण्याचे निर्देशही श्री वडेट्टीवार यांनी यावेळी दिले. कोकणात येणा-या विविध चक्रीवादळामुळे येथील वीजवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे या वीजवाहिन्या भूमिगत करण्याबाबत राज्य शासनाचा विचार असल्याचे सांगून तसे सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे आदेश श्री. वडेट्टीवार यांनी दिले. नुकसानग्रस्त भागाचा लवकरच दौरा करण्यात येणार आहे. झालेल्या नुकसानीच्या अंदाजित निधीबाबत आणि केद्र शासनाच्या मदतीसाठी केंद्रीय पथकाला पाठविण्यासाठी केंद्र शासनाला तात्काळ पत्रव्यवहार करण्याच्या सूचनाही विभागाच्या अधिकाऱ्यांना श्री वडेट्टीवार यांनी केल्या. यावेळी विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांनी नुकसानीची प्राथमिक माहिती दिली तसेच संबंधित जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. 00000

Monday 17 May 2021

'बारामती अँग्रो'कडून नागपूर विभागाला 38 ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचे वाटप

नागपूर, दि. 17: 'बारामती अँग्रो'चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आमदार रोहित पवार यांच्याकडून कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज पाहता नागपूर विभागाला 38 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे आज 18 कॉन्संट्रेटर सुपूर्द करण्यात आले. विभागात आवश्यकतेनुसार त्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले. यावेळी नगरसेवक दुनेश्वर पेठे, नगरसेविका आभा पांडे, बारामती अँग्रोचे वितरण सहायक व्यवस्थापक सुखदेव नागले उपस्थित होते. बारामती अँग्रोकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याला कॉन्संट्रेटरचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज पाहता ही मदत करण्यात आली आहे. विदर्भात अमरावती विभागात 15 आणि नागपूर विभागासाठी 38 असे एकूण 53 कॉन्संट्रेटरचे वाटप करण्यात आले आहे. यापैकी नागपूर विभागासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे 18 आणि नागपूर महानगरपालिकेकडे 20 कॉन्संट्रेटरचे वाटप करण्यात आले आहे. नागपूर विभागातील जिल्ह्यांची गरज पाहून ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचे वितरण करण्यात येणार असल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. बारामती अँग्रोतर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 500 कॉन्संट्रेटरचे वाटप करण्यात येत आहेत. *****

Sunday 16 May 2021

लसीकरणाला निघतांना ज्येष्ठांनी घ्यावी काळजी - जिल्हाधिकारी

कोव्हिशील्ड लसीचा दुसरा डोस ३ महिन्यानंतर नागपूर, दि. 16 : केंद्र शासनाच्या लसीकरणाबाबतच्या नवीन निर्देशाप्रमाणे आता कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसेसमधील अंतर बारा ते सोळा आठवडे असणे अपेक्षित आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस बारा ते सोळा आठवड्यांच्या अंतराने देण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणाला निघताना कोव्हिशील्ड घेतली असेल आणि तीन माहिन्याचा कालावधी झाला असेल तरच लसीकरणाची तारीख व लसीची उपलब्धता लक्षात घेऊनच दुसऱ्या डोससाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. कोव्हिशील्डसाठी हा नियम असला तरी, कोव्हॅक्सिन लसीच्या यापूर्वीच्या सूचनांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत. राज्यामध्ये कोविड लसीकरणाचा कार्यक्रम दिनांक 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाला असून टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या वयोगटांचे लसीकरण सुरू आहे. पूर्वी कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमध्ये सुरूवातीला सहा ते आठ आठवड्यांचा अंतर ठेवण्यात येत होते. आता या लसीच्या दोन डोसमधील कालावधी आणखी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे लसीकरणाच्या दुसऱ्या डोसबाबत घरातील तरुणांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन करावे, असेही ते म्हणाले. लसीकरणासंदर्भात सध्या 45 वर्षावरील नागरिकांना प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी लसीकरण करण्याच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र केंद्र सरकारने लसीकरणासंदर्भातील नियम सध्या बदलविले आहे. जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी कोव्हिशील्ड लसीचे लसीकरण झाले आहे. या लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर वाढविण्यात आले आहे. अनेक जण तीन महिन्यांचे अंतर लक्षात न घेता लसीकरण केंद्रावर पोहोचत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून नागरिकांनी या काळामध्ये घराबाहेर पडताना आपल्या लसीकरणाच्या नेमक्या तारखा, लसीची उपलब्धता लक्षात घेऊन बाहेर पडावे, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले आहे. *****

Saturday 15 May 2021

पालकमंत्र्यांची कामठी कॅन्टोनमेंट कोविड केअर सेंटरला भेट

· 10 ऑक्सिजन बेड सुरु करणार नागपूर दि.15: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे राज्य शासन व प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज कामठी कॅन्टोनमेंट कोविड सेंटरला आज भेट देत पाहणी केली. यावेळी तहसीलदार अरविंद हिंगे, डॉ. अरुंधती काळे, डॉ. विवेक कुऱ्हाडे, अभियंता दीपक ठाकरे, राकेश सिंह आणि राजकुमार गजभिये उपस्थित होते. कँन्टोनमेंट कोविड सेंटर येथे अगोदरपासून 26 खाटांचा विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आलेला असून, आता येथे 10 ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या कोविड सेंटरसाठी लागणारी आवश्यक वैद्यकीय उपकरणे, रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, डिजीटल एक्स रे मशीन येथे पुरविण्यात येणार आहे. कामठी कॅन्टोनमेंट येथे 10 ऑक्सिजनयुक्त बेडची सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे येथील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे रुग्णांचा होणार त्रास, वेळ आणि पैसाही वाचणार आहे. कोविड केअर सेंटरच्या निर्मितीसाठी पालकमंत्री डॉ. राऊत यांनी वैद्यकीय उपकरणांसह, इतर आवश्यक बाबींचा आढावा घेतला. तसेच हे लवकरात लवकर जनतेच्या सेवेत दाखल करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली. *****

खासगी हॉस्पिटलमधील आक्षेपार्ह बिलांची तपासणी करण्यासाठी समिती गठीत करा - डॉ. नितीन राऊत

पालकमंत्र्यांच्या कोविड आढावा बैठकीत सूचना नागपूर, दि. 15 : कोरोना संसर्ग काळात प्रशासनाच्या आवाहनानंतर खाजगी हॉस्पिटलने केलेले सहकार्य अनमोल आहे. मात्र याच काळात काही असामाजिक तत्वांनी संधीचा फायदा तर घेतला नाही ना..? याची तपासणी करा. खासगी हॉस्पिटलमधील तक्रार, आक्षेप असणाऱ्या बिलांचे परीक्षण करण्यासाठी तटस्थ पद्धतीने काम करणाऱ्या वैद्यकीय समितीचे गठन करा. सत्य जनतेपुढे येऊ द्या, असे निर्देश ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज महापालिका आयुक्तांना दिले. शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये नागपूर जिल्ह्यातील कोविडसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. सेलोकार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष अनूप मरार, कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीत सर्वप्रथम लसीकरण सद्य:स्थिती, केंद्रे, साठा वाढविण्यासाठी उपाययोजना, लोकसहभाग, यावर चर्चा झाली. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी या चर्चेमध्ये सद्य:स्थिती विशद केली. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांना वेळेत दुसरा डोस देण्याचे नियोजन करण्याबाबतच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केल्या. तिसरी लाट दारात असून त्यापूर्वी जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्याचे निर्देश दिले. गाव पातळीवर लसीकरणासंदर्भातील प्रबोधन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांमध्ये गावांची विभागणी केली.लस मिळाल्याबरोबर वितरण सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तिसऱ्या लाटेसाठी केलेल्या उपाययोजनेचा तपशील पालकमंत्र्यांनी मागितला. ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणाकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेचे उग्ररूप ग्रामीण भागात राहील, अशी शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व आरोग्य यंत्रणा बळकट करणे सुरू असून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, औषध पुरवठा, आवश्यक यंत्र पुरवठा आणि बेड वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. यासोबतच ग्रामीण भागात उपलब्ध असणाऱ्या खाजगी डॉक्टरांकडून रुग्णसेवा व्हावी, यासाठी त्यांचे प्रशिक्षण व त्यांच्याशी समन्वय ठेवला जात असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा नसल्याने नागरिकांची नाराजी असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी अस्तित्वात असणाऱ्या आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरणावर भर देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. नागपूर जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट उभारणीची सद्य:स्थितीवरही बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यामध्ये 22 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट तयार करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असून पायाभूत सुविधा काही ठिकाणी उभारली जात आहे. इएसआयसी हॉस्पिटलची माहिती घेतली. सध्या मनुष्यबळासाठी जाहिरात देण्यात आली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेपूर्वी आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळाची समस्या सोडविण्यासाठी लक्ष घालण्याचे निर्देश श्री. राऊत यांनी दिले. हॉस्पिटल्समध्ये 80 टक्के बेड राखीव ठेवण्याच्या संकल्पनेला कोरोना प्रादुर्भाव अधिक असणाऱ्या काळात फायदा झाला. हॉस्पिटल्सने 80 टक्के बेड्स उपलब्धतेबाबत दर्शनी भागात फलक लावतानाच महानगरपालिकेने निश्चित करून दिलेल्या दराप्रमाणे वैद्यकीय उपचार दिले गेले नसल्याच्या काही ठिकाणी तक्रारी आहेत. या तक्रारी दूर करण्यासाठी वैद्यकीय समिती गठीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. खाजगी लॅब, आरटीपीसीआर, सीबीसी, सीआरपी,डी-डायमर, एलएफटी, केएफटी, एचआरसीटी तपासणीचे वेगवेगळे दर आकारत आहेत. याची चौकशी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाच्या आरोग्याची माहिती दररोज मोबाईलवर देणारी यंत्रणा विकसित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कडक निर्बंधांच्या काळात विनाकारण बदनामी करणाऱ्या खोट्या बातम्या समाज माध्यमांवर पसरविणाऱ्याबाबत सायबर सेलकडे तक्रार नोंदवा व कारवाई करण्याबाबतचे त्यांनी सांगितले. लसीकरणाबाबत राजकारण व्हायला नको, सर्व राजकीय मतभेद विसरून नागपूरमध्ये सध्या काम चालू असून त्याला गालबोट लागू नये. संयुक्त प्रयत्नातून नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले. भारत बायोटेक प्रकल्प नागपुरात मिहानमध्ये यावा तसेच नागपुरात फार्मा कंपनी आणण्यासाठी ठोस कृती आराखडा एक आठवड्यात सादर करावा, एअर लिक्विड फ्रांस ही कंपनी नागपुरात 100 मेट्रिक टन ऑक्सिजन प्लांट टाकण्यास इच्छुक आहे. तातडीने त्यांच्या समवेत चर्चा करून पुढील रोड मॅप निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी विभागीय आयुक्तांना दिल्या. स्टेरॉईडच्या अतिवापराने म्युकरमायकोसीस सारखे भयंकर आजार वाढत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वृत्तपत्रातून लेख, मुलाखती, संवाद साधून यावर जनजागरण केले पाहिजे. ओरल हायजीन विषयक माहिती दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. म्युकरमायकोसीस औषधांची मात्रा कशी असते, औषध किंमत, शस्त्रक्रिया खर्च आणि गोर-गरिबांसाठी माफक दरात कसे करता येईल. या क्षेत्रातील तज्ज्ञाचा एक गट तयार करून एस.ओ.पी.निश्चित करून सात दिवसात जिल्हा प्रशासन या संदर्भात अहवाल देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मेडिकलमध्ये पॅथॉलोजी नमुने तपासणीसाठी बाहेर पाठविण्याच्या तक्रारीबाबत मेडिकलच्या अधिष्ठात्यांनी चौकशी करून अहवाल सादर करावा. शासनाने निर्बंध 31 मे पर्यंत वाढविले आहे. नागपूर शहरातील रुग्ण संख्या कमी व्हायला लागली म्हणून नागरिक बाहेर पडणार नाहीत याची काळजी पोलिसांनी घ्यावी. रिकामटेकडयांवर कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू ठेवावी. तसेच त्यांची चाचणी करून त्यांना 14 दिवस कॉरन्टाईन करण्याच्या मोहिमेला गती देण्याबाबतही त्यांनी पोलीस आयुक्तांना निर्देशित केले. नागपुरात 24 तासात दोन हत्येच्या घटना घडल्या. त्याचा आढावा त्यांनी घेतला. तसेच ग्रामीण भागातही 31 मेपर्यंत कडक निर्बंध कायम ठेवण्याबाबत, ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सुरु ठेवल्याबाबत संबंधितांवर कारवाई करावी . बैठकीत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा देखील घेण्यात आला. *****

Friday 14 May 2021

महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

नागपूर, दि. 14 : आद्य समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात उपायुक्त श्रीकांत फडके यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपायुक्त चंद्रभान पराते, नायब तहसीलदार आर. के. दिघोळे तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी यावेळी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयातही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. 00000

Wednesday 12 May 2021

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हा कृती दल

• चाईल्ड हेल्पलाईनच्या 1098 या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन • बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल स्थापन नागपूर, दि.12 : कोरोनामुळे बाधित झालेल्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावरही गंभीर परिणाम होत आहेत. कोरोनामुळे आई व वडील गमावलेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल (टास्क फोर्स) तयार करण्यात आला आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची संपूर्ण जबाबदारी या कृती दलामार्फत घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज येथे दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर अशा बालकांची काळजी व संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, महिला व बाल विकास उपायुक्त भागवत तांबे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सचिन जाधव, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, चाईल्ड लाईनच्या शहर समन्वयक श्रीमती श्रध्दा टल्लू आदी यावेळी उपस्थित होते. कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्यानंतर निराधार झालेल्या बालकांची माहिती जनतेने द्यावी. जिल्हा प्रशासनाला तात्काळ कळविण्याचे आवाहन करताना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले की, अशा बालकांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा कृती दलामार्फत घेण्यात येणार आहे. अशा निराधार बालकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. जिल्हा कृती दलाच्या माध्यमातून अशा बालकांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त व जिल्हा प्रशासन संरक्षणासोबतच समुपदेशनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता असल्यास अशा बालकास बालगृहामध्ये दाखल करुन घेण्यात येणार आहे. यासाठी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 यावर सुध्दा संपर्क साधता येईल. कोविड रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत असणारे बालगृहे, निरीक्षण गृहे यांच्यामार्फत तात्काळ उपचार पुरविण्यात येणार असून यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथकसुध्दा नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी दिली. कोरोना संसर्ग झाल्यामुळे विलगीकरणात राहत असलेल्या तसेच दवाखान्यात दाखल केल्यामुळे बालकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच अशा बालकांच्या पालकांचा मृत्यू झाल्यामुळे संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. अशा बालकांसाठी एक शिशुगृह तसेच 18 वर्षापर्यंतच्या बालकांसाठी एक बालगृह निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती कोविड हॉस्पीटल व मदतकेंद्रांना सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे मदत उपलब्ध करुन देणे सुलभ झाले आहे. अडचणीत सापडलेल्या पालकांबाबत संबंधित रुग्णालयाने तात्काळ माहिती कळवावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. तत्पूर्वी महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय ए कुंदन यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. कोरोनामुळे आई आणि वडील असे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत जिल्हा कृती दल स्थापन करण्यात आला आहे, अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करीसारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी अशा बालकांची माहिती नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला कळवावी. अशा बालकांचे आर्थिक व मालमत्ताविषयक हक्क अबाधित राहतील, यासाठी दक्षता बाळगण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. या संदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या 0712-256991 यावर संपर्क साधावा. या बैठकीस महिला व बाल कल्याण संदर्भात कार्य करणाऱ्या विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. *****

Saturday 8 May 2021

नागपूर शहरासाठी रेल्वे मार्गाने ऑक्सिजनचे ४ टँकर पोहोचले

शनिवारी एकूण १६९ मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा नागपूर जिल्हयाला आज ३ हजार ८६७ रेमडेसिवीर प्राप्त कोरोना प्रतिबंधात्मक २९ हजार लसीची नवीन खेप प्राप्त नागपूर दि ८ : कोरोना संसर्ग काळामध्ये जीवनदायी ठरलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वायुदल व रेल्वेच्या मदतीने ओडीसा राज्यातून चार ऑक्सिजन टँकर शहरात पोहोचले आहे. 58 मेट्रिक टन ऑक्सिजनचा अतिरिक्त पुरवठा आज झाला आहे. आज शनिवारी एकूण १६९ मेट्रीक टन पुरवठा करण्यात आला. ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी तातडीच्या पुरवठयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. दोन दिवसापूर्वी वायू दलाच्या विशेष विमानाने चार टँकर ओडीसाची राजधानी असलेल्या भुवनेश्वर नजीकच्या अंगुळ येथील स्टील प्लांटसाठी रवाना करण्यात आले होते. ७ मे च्या रात्री तीन वाजता रेल्वे स्थानकावर हे चारही टँकर प्राप्त झाले आहे. भिलाई येथून होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठा व्यतिरिक्त हा ऑक्सिजन नागपूर शहराला मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व पालकमंत्री नितीन राऊत यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सतीश जाधव, मोटार वाहन निरीक्षक अभिजित खरे, रोहन सासने, सुर्यकांत पाटील आदींनी या मोहिमेसाठी वायुदल व रेल्वे विभागाशी समन्वय ठेवला. उद्यापर्यंत आणखी चार टँकर रेल्वेने येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान,शनिवारी भिलाई व अंगूळ येथून एकूण १६९ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यापैकी जिल्ह्यातील ऑक्सिजन रिफिलिंग सेंटरला ६२ मेट्रिक टन व मेडिकल व अन्य रुग्णालयांना ७१ मेट्रिक टनाचे वितरण करण्यात आले आहे. ३ हजार ८६७ रेमडेसिवीर प्राप् नागपूर जिल्ह्यासाठी जिल्हा प्रशासनाला शनिवारी ३ हजार ८६७ रेमडेसिवीर प्राप्त झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यकतेनुसार सर्व मागणी करणाऱ्या हॉस्पिटलला याचे वितरण केले जाणार आहे. तथापि, हॉस्पिटलकडून होणारी मागणी आणि होणारा पुरवठा अत्यंत कमी असून यासंदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे. २९ हजार लसीची खेप प्राप्त नागपूर जिल्ह्यामध्ये 45 वर्षावरील नागरिकांना पुरवण्या प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी उशिरा २९ हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. यामधील १४ हजार ५०० शहर व १४ हजार ५०० ग्रामीण भागात वितरण करण्यात आले असून या उपलब्ध लसीतून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात या लसीची देखील मागणी नोंदविली आहे.

ग्रामीणभागातील कोविड संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे संयुक्त दौरा अभियान सुरू

प्रादुर्भाव असणारे व लसीकरणात मागे असणारे गाव प्रमुख लक्ष्य पालकमंत्र्यांकडून अभियानाचे कौतुक; जनजागृती वाढविण्याचे आदेश नागपूर दि. ८ : प्रशासनाकडून सर्व प्रयत्न केल्यानंतरही अनेक गावांमध्ये लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याचे पुढे आले आहे. तसेच अनेक गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे अहवाल आहे. प्रत्येक तालुक्यातील अशी गावे निवडून त्या ठिकाणी अधिकारी व तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष भेटीचा दौरा कार्यक्रम नागपूर जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. अशा गावांमधून कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. गेल्या काही दिवसात नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. शहरासोबतच ही वाढ धोकादायक आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी काल संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावागावांचा ऑनलाईन आढावा घेतला. त्यानंतर ज्या गावांमध्ये संख्या वाढली आहे. त्या गावात संबंधित तालुक्याचे तहसीलदार, गट विकास अधिकारी, संबंधित ग्रामसेवक, तलाठी ग्रामपंचायतीचे नियुक्त पालक अधिकारी, नियुक्त लसीकरण संबंधी शिक्षक, अंगणवाडी सेविका, कृषी सहाय्यक, आशा वर्कर या सर्वांनी कोविड प्रोटोकॉल पाळत सरपंच सदस्य यांच्यासह गावांना भेटी देण्याचे निश्चित केले आहे. यासाठी आठ मे पासून आरोग्याच्या दृष्टीने अशा पद्धतीने माघारलेल्या गावांना भेटी दिल्या जाणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या अडचणींचा अहवाल सादर करण्याचे सुद्धा निर्देशित करण्यात आले असून माघारलेली ही गावे आरोग्यदृष्ट्या जागृत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आजपासून सुरु झालेल्या या अभियानातील गावांमध्ये पुढील प्रमाणे अधिकाऱ्यांच्या भेटी होणार आहेत. तालुका पारशिवणी 10 मे रोजी सुवरधरा, अबाझरी ( ग्रा.प. सुवरधरा) 9 मे रोजी कोलीतमारा 10 मे रोजी सावळी, भागेंमहारी, पालासावळी 12 मे रोजी नयाकुंड, गवना (गरांडा), वराडा, 13 मे रोजी केरडी,टेकाडी( को.ख.)गोंडेगाव 15 मे रोजी बोरी (सिंगारदीप) कांद्री, हिंगणा ( बाराभाई) तालुका कळमेश्वर 8 मे रोजी गोंडखैरी, निमजी, घोराड, 11 मे रोजी तेलकामठी, मांडवी, म्हसेपठार, 12 मे रोजी कोहळी, सुसुंद्री, उपरवाही,13 मे रोजी वरोडा, धापेवाडा (बु), बोरगाव (बु), 14 मे मोहपा, पिपळा (किन) तालुका नागपूर 9 मे रोजी बेसा, पिपळा, सालई गोधणी, पांजरी बजुर्ग, जामठा.10 मे रोजी सोनेगाव बोरी, रामा, किन्हाळनाकडी, आलागोदी, बाम्हणी, सोनंगांव लोधी, मांगली, दुधा, बोरखेडी, कोलार,12 मे रोजी डोंरगाव, बोथली, मांगरुळ, पांजरी लोधी, खरसोली, रुई पांजरी,13 मे रोजी सावंगा, पेठ, सातनवरी, सुराबर्डी, दवलामेटी, दुराधामणा,सोनेगाव निपाणी, घोगली, गुमथंळा,14 मे रोजी बैलवाडा, भरतवाडा, बोरगाव, ब्राम्हणवाडा, माहुरझरी, पारडी, वलनी, येरला, चिचोली, कापसी खुर्द, बहादुरा, चिकना, विहिरगाव, हुडकेश्वर खुर्द, वेळाहरी. तालुका काटोल 8 मे रोजी झिलपा, मेंडकी, तपनी, गोंडीमोहगाव,9 मे रोजी सोनोली, खामली, राजनी,गोंडीदिग्रस, मसली, येनवा, 10 मे रोजी गोन्ही. वंडली खु, नंदनपारडी, कोंढाळी, दुधाळा, पांजरा काटे, 11 मे रोजी पुसागोंदी, जाटलापुर, खैरी (चिखली) तरोडा, कोंढासावळी, राउळगांव,12 मे रोजी गरमसुर, सोनखांब, आजंनगाव, मेंढेपठार( बा), मेढपांजरा, ताराबोडी, 13 मे रोजी डोरली(भिं) , रिधोरी, वाई (खु),कचारी सावंगा, ढवळापुर, कातलाबोडी.15 मे रोजी कोतवालबर्डी , मुर्ती, अंबाडा(सो), परसोडी, खंडाळा(खु) हातला, पारडसिंगा, खानगाव,16 मे रोजी पानवाडी, सिर्सावाडी, डोंगरगाव, पारडी (गो), कुकडी पांजरा, वाघोडा. तालुका हिंगणा 8 मे रोजी देवळी सांवगी, सांवगी देवळी, आमगाव देवळी, सुकळी घारापुरे, दाताळा 8 मे रोजी गुमगाव, वागधरा, धानोली गुमगाव, कान्होली धानोली. तालुका मौदा 8 मे रोजी लापका, कुंभारी 10 मे रोजी अडेगाव, बेरडेपार, कांदामेंढी,इंदोरा,11 मे रोजी तोंडली,धानोली, वायगाव, सुकळी,12 मे रोजी चाचेर, नरसाळी, निमखेडा, आष्टी, बारशी.13 मे रोजी तरोडी, अरोली, खापरखेडा तेली, रेवराळ, राजोली, खरडा,14 मे रोजी, तारसा,आजनगाव, मौदा, 15 मे रोजी पिपरी, कोटगाव, धानला, मारोडी, मोहाडी, 17 मे रोजी ताडा, सिरसोली, खात, निहारवाणी, तालुका भिवापूर, 8 मे रोजी नांद,10 मे रोजी आलेसूर, खापरी, खोलदोडा, 11 मे रोजी,12 मे रोजी किन्हीखुर्द, किटाळी, किन्हीकला,13 मे रोजी, 15 मे रोजी,17 मे रोजी,18 मे रोजी पांढरवाणी,18 मे रोजी नवेगाव देश, रानमांगली. तालुका उमरेड, 8 मे रोजी आंबोली, मकरधोकडा, धुरखेडा, कळमना, ठाणा,10 मे रोजी फुकेश्वर, सिर्सी, शेडेश्वर, पिपळा,11 मे रोजी हिवरा, हळदगाव सायकी, पाचगांव, अकोला 12 मे रोजी चांपा, सालई राणी, पवणी, सुराबर्डी, जैतापुर, तालुका रामटेक, 8 मे रोजी सावरा, टुयापार, गर्रा,9 मे रोजी खिडकी, बांद्रा, रामपूर, 10 मे रोजी देवळी, बोथीया पालोरा, डोंगरताल,11 मे रोजी मनसर, नगरधन, महादुला, 12 मे रोजी कटटा, हिवरा बाजार, फुलझरी, पिंडकापार (लोधा),13 मे रोजी, वरघाट, तुमडीटोला, करवाही, दाहोदा,14 मे रोजी मांद्री,चौगान, कांद्री, 15 मे रोजी देवलापार, वडाम्बा, रयतवाडी-1. तालुका सावनेर 8 मे रोजी वलनी, सिल्लेवाडा,9 मे रोजी दहेगाव रं, चिचोली, भानेगाव चनकापूर, 10 मे रोजी, पोटा, 11 मे रोजी पाटणसावंगी, वाघोडा, मंगसा, केळवद, 12 मे रोजी वाकोडी, खापा, वडेगाव, टोंभुरडोह , तालुका कामठी, 8 मे रोजी कोराडी, महादुला, नांदा,बाबुलखेडा, खापरी, वारेगाव, 9 मे रोजी, येरखेडा, रनाळा,गादा, सोनेगाव, भिलगाव, झोवरी, नेरी, 10 मे रोजी पोवारी, कापसी, आसल वाडा, पांढूर्णा, निंबा, झरप, 11 मे रोजी, वडोदा, झूगाव, बिडगाव, शिवणी, तालुका कुही 8 मे रोजी, सावळी, भुयळगांव, तारसा, परसोडी,कटारा.9 मे रोजी, तितुर, कुही,10 मे रोजी कचाडी, किन्ही, तेलगांव, मोहगांव, गोन्हा, 11 मे रोजीकुही, खवासना, तारणा, शिवणी, रवोना, 12 मे रोजी मोहाडी, नवेगाव देवी, चिचाळ, खांकली. येथे हा दौरा होणार असून, नागरिकांमध्ये लसीकरणासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. *****

तिसरी लाट दारावर ; मास्टर प्लॅन तयार करा - पालकमंत्री

कमी रुग्ण होताहेत म्हणून सुखावून जाऊ नका... तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनासोबत पालकमंत्र्यांची महत्वाची बैठक बैठकीतील निर्णय ⚫ मानकापूर येथे नऊशे खाटांचे जम्बो हॉस्पिटल लवकर पूर्ण करा ⚫जिल्ह्यात २५ ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचे नियोजन ⚫जिल्ह्यात दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारणार ⚫कोरोना रुग्णांसाठी ५ हजार जंबो सिलेंडर उपलब्ध केले जाणार ⚫दररोज दहा हजार चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन ⚫१ हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले जाणार ⚫प्रत्येक तालुक्यातील कोविड सेंटर सक्षम करणार ⚫आंबेडकर हॉस्पिटल, ईएसआयसी, हज हाऊसचे श्रेणी वर्धन ⚫कोराडी, कामठी, रामटेक, मौदा,उमरेड, काटोल हॉस्पिटलचे श्रेणी वर्धन ⚫लहान मुलांना वाचविण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्याचे निर्देश ⚫स्थानिक डॉक्टरांना होम कॉरेन्टाइन रुगणाची शुश्रूषा करण्याचे निर्देश ⚫ ट्रिटमेंट प्रोटोकॉल न पाळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई ⚫लसीकरण वाढविण्यासाठी आता अधिकार्‍यांची टीम गावांच्या भेटीवर ⚫जिल्ह्याच्या बॉर्डर सील करण्याचे पोलिसांना आदेश ⚫पोलिसांनी पकडलेल्या रिकामटेकड्याना 14 दिवस सोडू नका ⚫रमजानच्या काळात घरातच सण साजरा करण्याचे आवाहन ⚫ रेमडेसिवीर व औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर गंभीर कारवाई ⚫ बोगस आरटीपीसीआर अहवाल देणाऱ्या प्रयोगशाळेवर कारवाई नागपूर दि ८ मे : महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये ओसरलेली लाट पुन्हा उग्र झाली आहे. तज्ञांच्या मते पुन्हा नागपूर शहर व ग्रामीण भागात तिसऱ्या लाटेची शक्यता निश्चित आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी मी जबाबदार म्हणून स्वतःची जबाबदारी पार . पाडावी. नागपूर शहर व ग्रामीण भागात कमीत कमी नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी व मृत्यू संख्या नियंत्रणात राहावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने तिसरी लाट रोखण्यासाठी मास्टर प्लान तयार करावा. त्यामध्ये महत्त्वाचे निर्णय कालमर्यादेत पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिल्या. गेल्या वर्षभरात सतराशे बेडवरून सुमारे ९ हजार बेड आम्ही निर्माण केले. मोठ्या प्रमाणात कोविड हॉस्पिटलची सुरुवात केली. ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता होईल यासाठी थेट हवाईदलापासून रेल्वे पर्यंत मदत घेतली. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. आरोग्यविषयक मनुष्यबळातही वाढ केली आहे. वर्षभरात केवळ आरोग्यावर काम सुरू असून नागपूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक दशलक्ष रुग्णसंख्येमागे साधारण बेड, आयसीयू बेडसह व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेत महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांना मागे सोडले आहे. मात्र तरीही तज्ञ व शास्त्रज्ञांच्या मते येणारी तिसरी लाट ही अतिशय गंभीर असेल. यामध्ये ही यंत्रणा देखील तोकडी पडू शकते. त्यामुळे युद्धस्तरावर कामाला लागा. तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा.. असा इशारा त्यांनी उच्चस्तरीय बैठकीत दिला. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. आजच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांसंदर्भातील माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली. जिल्ह्यामध्ये ज्या गावांमध्ये कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे व ज्या गावांमध्ये कोरोनाचा उद्रेक अधिक झाला आहे. त्याची यादी तयार करण्यात आली असून स्थानिक नागरिकांशी चर्चा करण्यासाठी थेट तहसीलदार व सर्व संबंधित यंत्रणा गावागावात पोहोचणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोना संसर्गसंदर्भातील जनजागृती व संबंधित गावातील लसीकरण व पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर जिल्हा हा तातडीने ऑक्सिजन निर्मिती बाबत स्वयंपूर्ण बनविण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एकीकडे मानकापूर येथे नऊशे खाटांचे जम्बो हॉस्पिटल लवकर पूर्ण करताना जिल्ह्यात 25 ऑक्सिजन पीएसए उभारण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. ऑक्सिजनची उपलब्धता यावरच पुढे बेडची उपलब्धता अवलंबून असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा संकल्प पूर्ण करा.कोरोना रुग्णांसाठी ५ हजार जंबो सिलेंडर उपलब्ध करणे पुढच्या लाटेत आवश्यक ठरणार आहे.१ हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मोठ्या रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन पुरवठा हे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे निर्देश आज त्यांनी बैठकीत दिले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एकीकडे लॉकडाउनसाठी आग्रही राहावे लागत आहे. मात्र सुपरस्प्रेडरसुद्धा तपासले जातील याची काळजी महानगरपालिकेने घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी महानगरपालिका व शहर मिळून दररोज दहा हजार चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक तालुक्यातील कोविड केअर सेंटर सक्षम करणे गरजेचे आहे. मेडिकल, मेयो एम्स व शहरातील अन्य खाजगी हॉस्पिटल वरील ताण कमी करण्यासाठी याकडे लक्ष वेधा.इंदोरा भागातील आंबेडकर हॉस्पिटल, ईएसआयसी हॉस्पिटल, हज हाऊसचे श्रेणी वर्धन करण्यासाठी तसेच ग्रामीण मधील कोराडी, कामठी, रामटेक, मौदा,उमरेड, काटोल हॉस्पिटलचे श्रेणी वर्धन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. पुढच्या लाटेमध्ये लहान मुलेसुद्धा लक्ष्य ठरणार आहेत.लहान मुलांना वाचविण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहर व ग्रामीण भागात स्थानिक डॉक्टरांना होम कॉरेन्टाइनची शुश्रूषा करण्याचे निर्देश लवकरच राज्य शासन देणार आहे. त्यासाठी त्यांना मानधनही दिले जाईल. त्यामुळे शहरात व ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची यादी तयार करण्याचे त्यांनी सांगितले. रेमडेसिवीर अन्य काही औषधांचा अतिरेकी वापर केल्यामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम दिसत आहे. त्यामुळे ट्रिटमेंट प्रोटोकॉल न पाळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. लसीकरण वाढविण्यासाठी आता अधिकार्‍यांची टीम गावांच्या भेटीवर जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तथापि, त्या गावातील आरोग्य सुविधा व पायाभूत सुविधांकडे देखील लक्ष वेधण्या सूचना त्यांनी केली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना जिल्ह्याच्या सिमा बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले. अमितेश कुमार यांनी पोलिसांनी अँन्टीजन केलेल्या रिकामटेकड्यांना 14 दिवस सोडू नका, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त यांना केले. तसेच येत्या काळात शहरातील प्रमुख बाजारपेठा व अन्य ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी पोलिस सक्त कारवाई करेल असे स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्र्यांनी मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी रमजानच्या काळात घरातच सण साजरा करावे असे आवाहन केले.रमजानच्या काळात रात्री विनाकारण गर्दी वाढणार नाही व त्यातून कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुस्लिम बांधवांनी साथ रोगाला लक्षात घेता याबाबत मी जबाबदार मोहीम राबवावी,असे आवाहनही त्यांनी केले. रेमडेसिवीर व औषधांचा काळाबाजार, आरटीपीसीआर अहवाल बोगस देणाऱ्या प्रयोगशाळा मालकांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई, करण्याचे निर्देश त्यांनी दिले सोबतच अन्न व औषध प्रशासनाने या बाबींकडे बारकाईने लक्ष वेधावे अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली.

Friday 7 May 2021

लहान मुलांमधील कोरोना रोखण्यासाठी विभागीय टास्क फोर्सची निर्मिती - डॉ. संजीव कुमार

• एम्समध्ये 200 खाटांचे अद्ययावत मुलांचे कोविड सेंटर • तिसऱ्या लाटेचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाची तयारी • बालकांसाठी व्हेंटीलेटर, एनआयसीयू • उपचारासाठी खासगी डॉक्टरसह परिचारिकांना प्रशिक्षण • मुलांचे फिवर क्लिनिक तात्काळ सुरु करणार नागपूर दि.07 लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण वाढत असल्याचे निदर्शनास येत असून तिस-या लाटेमध्ये मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नागपूरसह विभागीय स्तरावरील उपचाराचा प्रोटोकॉल तसेच प्रशिक्षणाच्या नियोजनासाठी बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेला टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. लहान मुलांची काळजी व उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज येथे दिली. कोरोनाच्या तिस-या लाटेबद्दल दिलेल्या पूर्वसूचना लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी तात्काळ उपाययोजना लागू करण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे 200 खाटांचे लहान मुलांसाठी आयसीयू व एनआयसीयू असलेले सुसज्ज कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त यांनी आज दिली. कोरोनाच्या तिस-या लाटेची पूर्वसूचना व लहान मुलांमधील कोरोना संसर्ग हाताळण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्सबाबत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मनरेगा आयुक्त अंकीत गोयल, कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. मिलिंद भ्रुशूंडी, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ डॉ. प्रकाश देव, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, एम्सचे डॉ. मनिष श्रीगिरीवार, डॉ. दिप्ती जैन, डॉ. विनिता जैन, डॉ. देवपुजारी, डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. मीनाक्षी गिरीश, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. रवींद्र सावरकर, डॉ. निर्मल जयस्वाल, डॉ. रवी शंकर धकाते, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. राजेश गोसावी, डॉ. राम दुधे, डॉ. ओम धावडे उपस्थित होते. तिस-या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण आढळून आल्यास त्यावर तात्काळ उपचार करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यपद्धती निश्चित करणे, खासगी व शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांना प्रशिक्षण व प्रभावी उपचारासाठी निश्चित मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. विनिता जैन, डॉ. उदय बोधनकर, डॉ. देवपुजारी, डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. दिप्ती जैन एम्सच्या डॉ. मिनाक्षी गिरीश आदींचा समावेश करण्यात आला आहे. लहान मुलांमधील कोरोना उपचार करताना शून्य ते 18 वर्षे वयोगटाचे प्रमाण सरासरी 4 ते 6 टक्के आहे. मुलांमध्ये तीन प्रकारचा कोरोना होण्याची शक्यता आहे. यासाठी फिवर क्लिनिक तात्काळ सुरु करुन उपचाराबद्दलची माहिती देण्यात येईल. नागपूर विभागात या लाटेची शक्यता लक्षात घेऊन साधारणत: आयसीयू आणि एनआयसीयू बेड कसे सज्ज ठेवता येतील, यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच बालकांवर उपचार करणारे खासगी हॉस्पिटल यांचाही समावेश करण्यात येऊन त्यांनाही उपचाराबाबत प्रशिक्षण देण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या सदस्यांनी यावेळी चर्चा केली. नागपूर विभागात दुसऱ्या लाटेचा प्रभावीपणे सामना करताना कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक उपचारासह आयसीयू बेड, व्हेंटीलेटर तसेच ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागपूरसह विभागात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा पुरविण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगताना डॉ. संजीव कुमार म्हणाले की, लहान मुलांसाठी व्हेंटीलेटर तसेच मुलांसाठी ऑक्सिजनची सुविधा नव्याने निर्माण करावी लागणार आहे. ही सुविधा निर्माण करण्यासाठी वैद्यकीय उपकरणांची खरेदी, मुलांसाठी आवश्यक असलेले औषध तसेच प्रशिक्षण व उपचार यावर येणाऱ्या खर्चासंदर्भातही टास्क फोर्सने अहवाल तयार करुन सादर करावा, असे निर्देश यावेळी दिलेत. कोरोना उपचारासाठी रेमिडिसीवीर या इंजेक्शनबाबत खासगी रुग्णालये व रुग्णांच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. वस्तुत: रेमिडीसीवीर वापरण्यासंदर्भात ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानुसार सर्वांनीच याचा मर्यादित वापर करावा. त्याबरोबरच लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण लक्षात घेऊन अशा प्रकारच्या औषधांचा काळाबाजार होणार नाही. या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यासंदर्भातही टास्क फोर्सच्या सदस्यांनी विविध सूचना केल्यात. ******

Tuesday 4 May 2021

वेकोलिचा ऑक्सिजन प्लांटसाठी 15.38 कोटीचा धनादेश

• नागपूर व चंद्रपूर येथील प्लांटसाठी मदतीचा हात नागपूर दि.04 कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी वेस्टर्न कोल्ड फील्डस लिमिटेड (वेकोलि)ने सामाजिक दायित्वातून नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), ऑल इंडिया मेडिकल सायन्स एम्स आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट उभारणी वैद्यकीय उपकरणांसाठी एकूण 15 कोटी 38 लाख रुपयांची मदत केली आहे. आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे धनादेश सुपुर्द करण्यात आला. त्यावेळी वेकोलिचे अध्यक्ष सहप्रबंध व्यवस्थापक मनोज कुमार, संचालक (कार्मिक) डॉ. संजय कुमार, संचालक (वित्त) आर. पी.शुक्ला, सामाजिक दायित्व विभागाचे विभागप्रमुख ए. के. सिंह उपस्थित होते. यापूर्वी वेकोलिकडून जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांच्याकडे 2 कोटी 5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. तसेच वणी आणि चंद्रपूर क्षेत्राचे महाव्यवस्थापक उदय कावळे आणि बी. रामाराव यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे नुकताच साडेतीन कोटी रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला आहे. वेकोलिने सामाजिक दायित्वाच्या निधीतून केलेल्या मदतीमुळे नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यास मदत होणार आहे. *****

Sunday 2 May 2021

ग्रामीण भागात कोरोनाविषयक आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उभारा -डॉ. नितीन राऊत

• कोविड केअर सेंटरमुळे कोराडीवासियांना दिलासा • कामठी उपजिल्हा रुग्णालयात अतिरिक्त खाटा वाढवा • अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय सुविधा निर्माण करा • आशा हॉस्पीटलमधील ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन नागपूर दि. 02 : कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील रुग्णालयात कोरोनाविषयक आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उभारा, ग्रामीण भागातील एकही रुग्ण उपचाराअभावी वंचित राहता कामा नये, रुग्णांना उपचारासाठी नागपूरवर अवलंबून न राहता त्यांना वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागातच प्राप्त व्हाव्यात, यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले. महानिर्मिती कोराडी येथील कोविड केअर सेंटरला डॉ.राऊत यांनी भेट देवून पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. महानिर्मिती आणि दत्ता मेघे मेडिकल कॉलेज व शालिनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कोराडी येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, शालिनीताई मेघे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप गोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकेश गजभिये, डॉ. संजय देशपांडे, मुख्य अभियंता राजेश पाटील, राजकुमार तासकर, अनिल आष्टीकर, राजेंद्र राऊत, तहसीलदार अरविंद हिंगे, गटविकास अधिकारी अंशूजा गराटे आदी यावेळी उपस्थित होते. कोविड केअर सेंटरमुळे कोराडी भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. असे सांगत डॉ. राऊत म्हणाले, या सेंटरमुळे सौम्य कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर तात्काळ उपचार सुरु करता येतील. कोराडी, महादुला या भागातील रुग्णांना या सेंटरमुळे आता याच परिसरात उपचार मिळणार आहे, ही बाब समाधानकारक आहे. येथील खाटांची संख्या 20 वरून 50 पर्यंत वाढवा तसेच येथे रुग्णांसाठी पोस्ट कोविड सुविधा उभारा, वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता रुग्णखोल्या वाढविणे गरजेचे आहे. यासाठी येथील बांधकामाचे त्वरित प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवा, असेही ते यावेळी म्हणाले. विना लक्षण व सौम्य कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनाच विलगीकरण व उपचारासाठी येथे भरती करण्यात येणार आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये सद्यस्थितीत 20 खाटांची सुविधा असून यातील 10 खाटांना ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहे. रुग्णांवर येथे उपचार करण्यात येणार आहे. या कोविड केअर सेंटर मध्ये पाच डॉक्टर्स, पाच परिचारिका तसेच तीन अटेंडंट कार्यरत असल्याची माहिती डॉ. गोडे यांनी यावेळी दिली. डॉ. राऊत यांनी कामठी येथील उप जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील 42 घनमीटर क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट कामठी येथील उप जिल्हा रुग्णालय येथे हलवून त्याची उभारणी करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजू घुगे यांना दिले. येथे कोरोना रुग्णांसाठी अतिरिक्त 100 खाटाची संख्या वाढविण्यात यावी. ग्रामीण भागात आरोग्य विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसविण्यात यावी. याबाबत पातुरकर यांनी विभागीय आयुक्त यांना त्वरित प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. उप जिल्हा रुग्णालयामध्ये एका छताखालीच क्ष-किरण केंद्र, पॅथालॉजी लॅब यासारख्या सर्व सुविधा निर्माण करा. कोरोना संसर्ग काळात तसेच पुढील काळातही रुग्णांना येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील, यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी दिल्या. कामठी रोडवरील आशा रुग्णालयाच्या परिसरातील ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन डॉ. राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या ऑक्सिजन प्लांटमुळे 100 जम्बो सिलिंडर्सर्ची पुर्तता होणार आहे. येथील ऑक्सिजनच्या उपलब्धतेमुळे ग्रामीण भागाला दिलासा मिळणार असंल्याचे ते यावेळी म्हणाले. येथील कोविड केअर सेंटरमध्ये 160 खाटा असून प्रत्येक खाटेला ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे. पीएसए या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला असल्याचे रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र अग्रवाल यांनी यावेळी दिली. कोराडी येथील विरांगणा राणी अंवतीबाई तालुका क्रीडा संकुल येथे लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. डॉ. राऊत यांनी या लसीकरण केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. कोरोना मार्गदर्शक तत्वांची योग्य अंमलबजावणी करून लसीकरण होत असल्याचे बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. 00000