Tuesday 20 September 2016

स्पर्धा परीक्षेसाठी मोठे ध्येय ठेवा --- श्रावण हर्डिकर




नागपूर दिनांक 20- स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लहान ध्येय न ठेवता असामान्यत्व राखण्यासाठी  कठोर परिश्रम करण्याची गरज नागपूर महानगर पालिका आयुक्त श्री. श्रावण हर्डिकर यांनी आज येथे व्यक्त केली.
माहिती व जनसंपर्क खात्याच्या सिताबर्डी येथील माहिती केंद्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. हर्डिकर बोलत होते.
अध्यक्षस्थानी माहिती संचालक श्री. मोहन राठोड होते, तर  प्रमुख पाहुणे म्हणून मनपाच्या प्रभाग नगरसेविका श्रीमती लता यादव, कौशल्य विकास उपसंचालक सुनिल काळबांडे, जेष्ठ पत्रकार राहुल पांडे, नाथे करिअर अकादमीचे संजय नाथे, जिल्हा माहिती अधिकारी  सर्वश्री अनिल गडेकर, अनिल ठाकरे हे उपस्थित होते.
स्पर्धा आणि परीक्षा या दोहोमधील फरक स्पष्ट करतांना श्रावण हर्डिकर पुढे म्हणाले की, परीक्षा केवळ पास व्हावी लागते, परंतु स्पर्धा ही सगळयांना मागे टाकून जिंकावी लागते. स्पर्धा ही करिअर असल्यामुळे उपलब्ध संधी मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी. अभ्यास करतांना सामुहिकपणे तयारी केल्यास विविध विषयाचे आकलन होण्यास मदत होते. स्पर्धा मीच जिंकेन असा आत्मविश्वास ठेवून पुढे जा असा सल्ला  त्यांनी यावेळी दिला.
स्पर्धा परीक्षासाठी माहिती केंद्रातर्फे निशुल्क अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. काही जादा सुविधा येथे महानगर पालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यामुळे अभ्यासिकेसाठी येथे चांगले वातावरण निर्माण होईल, अशी ग्वाही देखील मनपा आयुक्त यांनी शेवटी दिली.
अध्यक्षीय भाषणात संचालक मोहन राठोड यांनी विभागीय माहिती केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षासाठी विविध सुविधा उपलब्ध करतांनाच संदर्भ ग्रंथालय, विविध विषयावर चर्चासत्रे आदी उपक्रम येथे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. माहिती केंद्राच्या स्थापनेचा हाच हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कौशल्य विकास उपसंचालक सुनिल काळबांडे यांनी शासनाने युवकांमध्ये कौशल्य विकसित करुन प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण देण्याचा उपक्रम  राबविण्यात येत असल्याचे सांगितले .
जेष्ठ पत्रकार राहूल पांडे यांनी विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षाची तयारी करतांना जिद्द, परिश्रम व चिकाटी ठेवली तरच यश निश्चित आहे असे सांगितले. आपण परिश्रम करतांना कुठेही कमी पडणार नाही याची खबरदारी  घ्या असेही त्यांनी आवाहन केले.
माहिती केंद्राच्या दुरुस्तीसाठी धंतोली झोनचे विभागीय अधिकारी जयदेव व अभियंता श्री. सांभारे यांचा आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात आला.
माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी प्रास्ताविकामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिकेबद्दल माहिती केंद्रात स्पर्धा परीक्षासाठी 160 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून येथे संदर्भ ग्रंथासह आवश्यक सुविधा निशुल्क उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे सांगितले.  विभागीय विशेषत: ग्रामीण भागातील गरिब विद्यार्थी अभ्यासिकेचा लाभ घेतात, असे ते म्हणाले.
प्रारंभी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी व्दिप प्रज्वलीत करुण अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. स्वागत  सचिन काळे, अपर्णा यावलकर, श्रीमती फाले यांनी  केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे यांनी मानले. यावेळी वृत्तपत्र विभागाचे प्रमुख बबन नाखले, माहिती विभागाचे माजी संचालक शरद चौधरी, भि. म. कौशल, माजी जिल्हा माहिती अधिकारी  नरेश मेश्राम आदि अधिकारी  तसेच विद्यार्थी  व विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.
******

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विदर्भातील शहीदांना श्रद्धांजली





नागपूर दि. 20 : जम्मू कश्मीरच्या  उरी सेक्टरमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी कडवी झुंज देतांना विदर्भाचे दोन जवान शहीद झाले. यात यवतमाळ जिल्ह्यातील पुरळ गावाचे विकास जनार्दन कुळमेथे व अमरावती जिल्ह्यातील नांदगाव येथील  विकास  उर्फ पंजाब  जानराव उईके यांचे पार्थिव  आज वायूसेनेच्या विमानाने सोनेगाव विमानतळावर आणण्यात आले. विमान तळावर कर्नल बलबीर सिंह व एअर कमांडर अलोक शर्मा, विंग कमांडर डी. के. पांडे, ग्रुप कमांडर जी. एल. नागेंद्र  यांनी शहीद जवानांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
जिल्हा प्रशासनातर्फे  आमदार. अनिल सोले, सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी कॅप्टर दीपक लिमये यांनी पुष्पचक्र अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
19 सप्टेंबर रोजी रात्री  11 वाजेच्या सुमारास शहीद विकास कुळमेथे   यांचे पार्थिव विमानाने नागपूर विमानतळावर आणण्यात आले  विमानतळावर  कर्नल बलबीर सिंह यांनी  पार्थिव सन्मानाने राष्ट्रध्वजात ठेवून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर शहीद विकास कुळमेथे यांचा पार्थिव  सैन्यदलाच्या  वाहनाने कामठी येथील गार्ड रेजिमेंट सेंन्टर येथील सैन्यदलाच्या  रुग्णालयात ठेवण्यात आला. आज सकाळी  6.30 वाजता शहीद विकास कुळमेथे यांचे पार्थिवावर कामठी येथील गार्ड रेजिमेंट सेंन्टर येथे कर्नल बलबीर सिंह   व प्रहार समाज जागृती संस्थांच्या वतीने निवृत्त कर्नल सुनील देशपांडे व फ्लाईंग ऑफिसर श्रीमती शिवाली देशपांडे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजल वाहिली. त्यानंतर पार्थिव सोनेगांव विमातळावर मिलटरी वाहनाने आणण्यात आले. कर्नल बलवीर सिंह, नायब सुभेदार जय लाल, जवान चंदन राम, अरविंद यादव, महेंद्र सिंह, विनोदकुमार, हनुमान यादव, उगले मुगले विष्णू अर्जुन, डी. श्रीकांत यांनी शहीद जवानांना गार्ड ऑफ ऑन दिले. त्यानंतर शहीद जवानांचे पार्थिव वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने अमरावतीकडे नेण्यात आले.
*****

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना प्रभावीपणे राबवावी - केंद्रीय वित्त राज्यमंत्री मेघवाल




  • 24 राष्ट्रीयकृत बॅकांच्या माध्यमातून लोन अर्जाचे रजिस्ट्रेशन
  • वित्तीय साक्षरता प्रगतीपथावर
  • 6 हजार 491 गरजूंना प्रधानमंत्री मुद्रा लोनचे वाटप

चंद्रपूर दि.19- समाजातील  सर्व सामान्य, पारंपारिक व्यवसाय  करणाऱ्या माणसांना व्यवसायासाठी  सावकाराकडे हात पसरावा लागु नये यासाठी केंद्र शासनाने  प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून  राष्ट्रीयकृत बँकांच्या सहकार्याने  गरजूंना मोठया प्रमाणात लोन  उपलब्ध करून दयावे अशा सूचना केंद्रीय वित्त राज्य मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी आज केले आहे.
चंद्रपूर येथील चांदा क्लब मैदानावर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा रोजगार व स्वयं रोजगार संकल्प, राष्ट्रीयकृत बँका व विविध शासकीय संस्थांच्या सहकाऱ्याने प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनाचा  भव्य लोन मेळावा व  चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे दिपप्रज्वलन करुन  केंद्रींय वित्त राज्य मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी  उदघाटन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर हे होते.
प्रमुख पाहुणे  खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर राखी कंचर्लावार, आमदार नानाभाऊ शामकुळे, आ. ॲड संजय धोटे, माजी मंत्री संजय देवतळे, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी आमदार जैनुद्दीन जवेरी, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा मध्यवत्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, विजय राऊत आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री मुद्रा लोन वाटप मेळाव्यात केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल म्हणालेकी, देशात वित्तीय साक्षरता धिरे धिरे पुढे चालली आहे. चंद्रपूर येथे राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी प्रधानमंत्री मुद्रा लोन मेळाव्याचे एवढे उत्कृष्ट नियोजन करून त्यांनी वित्त विभागाचे काम सोपे केले असून मी त्यांचे प्रथम अभिनंदन करतो असेही यांनी त्यावेळी सांगितले.
वित्त राज्यमंत्री मेघवाल पुढे म्हणाले की लहान मोठया व्यवसायासाठी  गरजू लोकांना ज्या बँकांनी लोन दिले त्यांचा सन्मान करावा व ज्या बँकांनी लोन दिले नाही व लोन देण्यासाठी  टाळा टाळ करत आहे अशा बॅकांना लोन देण्यासाठी प्रवृत्त करण्यात येईलअसेही त्यांनी सांगीतले. ते पुढे म्हणाले की गरिब कष्टकरी माणसाला लोन देण्याचे बँका टाळतात या लोनची परतफेड  होईल का नाही अशी भिती बँकांना वाटते परंतु गरीब माणूस लोन वेळेवर फेडतो याची  हमी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. त्यामुळे बँकांनी  पारंपारिक व्यावसायिकांना  लोन देतांना जामीनदाराची  गरज भासणार नाही असेही त्यांनी सांगीतले.
ते पुढे म्हणाले की मुद्रा लोन योजनेतुन तीन  प्रकारचे लोन दिले जाते. शिशु लोन साठी 50 हाजार पर्यंत, किसान लोन साठी 50 हजार ते 5 लाखापर्यंत, तर तरुण लोन साठी 5 ते 10 लाखापर्यंत लोन  दिले जाते.आज देशातील पारंपारिक व्यवसाय करणा-या  1 कोटी 16 लाख लोकांना 45 हजार 514 कोटी  रुपयांचे लोन वाटप करण्यात आले आहे. असे त्यांनी सांगीतले.  प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेत कृषी  लोनचा समावेश करण्यात आला असून भविष्यात शहरी जनतेलाही लोनसाठी  सहभागी केले जाईल.
उपस्थित  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की  विद्यार्थी ते देशाचे भवीतव्य  असून  विद्यार्थ्याना  जीवन जगतांना  अनेक संघर्ष येतात त्यावर  मात करण्यासाठी आपण संघर्ष सूरू ठेवावे व चांगले नागरिक बनून या देशाची सेवा करावी  असेही  आवाहन  त्यांनी विद्यार्थ्याना केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर मार्गदर्शन करतांना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रधान मंत्री मुद्रा लोन ही महत्वकांशी योजना आहे. प्रधानमंत्र्यांनी सर्व सामान्य , कष्टकारी जनतेची  गरज  ओळखून  ही योजना सूरू केली आहे. योजनेचा लाभ पारंपारीक व्यवसाय करणाऱ्या सर्व जनतेला व्हावा असे स्वप्न त्यांनी  पाहिले असून त्याची पुर्त्तता आपल्याला अधिकाधिक गरजूंना बॅकांच्या सहाय्याने लोन मंजूर करुन करावयाची  आहे.
ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच शेतीपुरक जोडधंदा करणे आवश्यक आहे. जिल्हातील 24 बँकांनी 6 हजार 491 गरजू लाभार्थ्यांना लोन उपलब्ध करून दिले. त्यात 4 हजार 335 शिशु  लोन, 1 हजार 778 लोकांना किशोर लोन तर 378 लोकांना तरूण लोन दिले आहे असे त्यांनी सांगितले.
हंसराज अहिर पुढे म्हणाले की  प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा समाजातील गरिबातील गरिब माणसाला लाभ व्हावा यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी  1 लाख 80 हजार कोटी रूपयांचे लोन  विविध पारंपारिक व्यवसाय करणा-या गरीब माणसाला  बँकांच्या मार्फत कर्ज वितरण करण्याचे धोरण असून या कर्जाच्या माध्यमातून देशातील तरूण, बेरोजगार, पारंपारीक व्यवसायीक  स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होतील असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी  केंद्रिय वित्त राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते  पारंपारिक व्यवसासीकांना कर्जाचे धनादेश  वितरण करण्यात आहे. यावेळी खा. विकास महात्मे व महापौर राखी कंचर्लावार यांचे समयोचीत भाषण झाले.
या मेळाव्यात विविध राष्ट्रीयकृत 24 बँकांचे लोन मेळाव्यासाठी स्टॉल लावण्यात आले असून पारंपारिक व्यावसायीकांकडून लोनसाठी  अर्ज भरुन घेण्यात  आले. यावेळी विविध बॅकांच्या अधिका-यांनी लोन घेण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी आ. नानाभाऊ शामकुळे यांनी प्रास्तावीक केले  तर आभार राजेश मुन यांनी मानले तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन नासीर खान यांनी केले. मेळाव्यात पारंपारीक व्यवसायीक कारागिर सर्व सामान्य नागरिक व विद्याथी महिला व्यवसायीक मोठया संख्येने उपस्थित होते.
000

बाल स्वच्छता दुतांचा एक दिवस सीईओ सोबत



  • बाल स्वच्छता दुतांचा सीईओ सोबत थेट संवाद
  • पोस्ट कार्डच्या माध्यमातून गाव स्वच्छतेचा उपक्रम
  • शालेय मुलांनी अनुभवला जिल्हा परिषदेतील एक दिवस
  • विविध शाळांतील 25 विद्यार्थ्यांचा सहभाग

नागपूर, दि. 16 :  माझ्या घरी आधी शौचालय नव्हते. बाबांना आग्रह करुन शौचालय बांधून घेतले आणि घरातील सर्वांनाच शौचालय वापराबद्दल आग्रह केला. माझ्या सोबतच गावातील लोकांना शौचालय बांधण्यासाठी आग्रह  धरल्यामुळे  गावात  व  शाळेतसुद्धा  आम्ही  शौचालयाचा वापर करतो. हे उद् गार आहेत मौदा तालुक्यातील सहाव्या वर्गात शिकणाऱ्या कु. साक्षी मधुकर राजगिरे या विद्यार्थिनीचे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील 25 विद्यार्थ्यांना बाल स्वच्छता दूत म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी एक दिवस मुलांसोबत घालविला. यावेळी मुलांनी स्वच्छतेबाबत उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षण संवाद या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने गावातील स्वच्छता व हागणदारी मुक्त गाव ही संकल्पना राबविण्यात येत आहे. आज जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत स्वयंस्फूर्तीने सुरु केलेल्या कार्याबद्दल मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीमती बलकवडे यांनी माहिती घेतली.  तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचेही कौतुक केले.
नरखेड, काटोल, पारशिवनी, उमरेड, भिवापूर आदी तालुक्यातून आलेल्या जिल्हा परिषदेच्या विविध शाळांचे 25 विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासोबत घालविला. जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामाची ओळख व्हावी. तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, या अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आई-वडील तसेच आजी-आजोबांना आग्रह करुन घरात शौचालय बांधून घेतलेल्या 25 विद्यार्थ्यांचा या उपक्रमामध्ये सहभाग होता.

स्वच्छतेचे बाल ॲम्बॅसॅडर

स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारी मुक्त जिल्हा ही संकल्पना ग्रामीण जनतेमध्ये अत्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी विविध उपक्रम राबवितांना मुलांनी वडिलांकडे आग्रह धरुन शौचालय बांधून घेतले. ही घटना इतरांसाठी प्रेरणा देणारी आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेसोबत शौचालय या उपक्रमात सहभागी करुन त्यांना बाल स्वच्छता दूत म्हणून प्रोत्साहन देण्याचा उपक्रम प्रथमच नागपूर जिल्हा परिषदेतर्फे संपूर्ण जिल्ह्यात सुरु करण्यात आला आहे.
स्वच्छता आणि आरोग्य यासंदर्भात समाजजागृती आवश्यक असून विद्यार्थी घरात व समाजात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शिक्षण संवाद या उपक्रमांतर्गत मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी फेटरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेपासून या उपक्रमाची सुरुवात केली. या शाळेतील 50 विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्डच्या माध्यमातून स्वच्छतेबाबतच्या आपल्या संकल्पना व शाळेबद्दल असलेल्या भावना कळविल्या आहेत. हाच पत्रसंवाद जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांच्या माध्यमातून सुरु करण्यात येणार असून मुख्य कार्यपालन अधिकारी यासुद्धा दर महिन्याला पाठविलेल्या पत्रांना उत्तर देणार आहेत.
वानाडोंगरी येथील पाचव्या वर्गातील कु. धनश्री राजेंद्र गोडबोले, कु. प्रियंका भिमराव भारद्वाज तसेच उपरवाही या शाळेतील कु. पूजा चिटके, झुनकी येथील सारिका भोयर, आलिशा मेश्राम, कु. जान्हवी राऊत, कु. रितू मेश्राम आदी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबद्दल केलेल्या कार्याची माहिती देतांना डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या आजाराबाबत काळजी घेतांना वैयक्तिक शौचालय बांधल्यामुळे आरोग्य चांगले असल्याचे तसेच शाळेतील वातावरण बदलत असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्वच्छता विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निखील रौंदळकर, दिनेश मासोदकर, चैताली देशमुख, राधा राहांगडाले, अंजली पाटणकर, हर्षा सांबारे, श्वेता साबळे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेसंदर्भात विविध माध्यमाद्वारे माहिती देतांना चित्रकला तसेच पोस्ट कार्डद्वारे पत्र संवाद, माहितीपट आदी उपक्रम राबविले. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना भेटी  देवून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
***

Sunday 11 September 2016

कौशल्ययुक्त महाराष्ट्र माहितीपटाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन


नागपूर दि. 11 : उद्योगशील महाराष्ट्र व समृध्द महाराष्ट्र हे स्वप्न उराशी बाळगून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील मनुष्यबळाचं कौशल्य विकसीत करण्यासोबत रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध कौशल्य विषयक योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
विदर्भातील अकराही जिल्हयात कौशल्य विकासातून झालेल्या प्रगतीचा आढावा घेणाऱ्या कौशल्ययुक्त महाराष्ट्र या माहितीपटाचे विमोचन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते आज दीक्षाभूमीवरील सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी  पालकमंत्री राजकुमार बडोले,उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी,पाणी पुरवठा  विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार,उर्जा विभागाचे प्रधान सचिव विपीन श्रीमाळी, सामाजीक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुरेंदकुमार बागडे,ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, जलसंधारण सचिव डॉ. पुरूषोत्तम भापकर, कृषी आयूक्त विकास देशमुख,जमाबंदी आयुक्त एस पी कडू पाटिल, विभागीय आयुक्त अनुप कुमार, मनरेगा आयुक्त अभय महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर माहितीपट माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर-अमरावती नागपूरचे संचालक मोहन राठोड यांनी तयार केला आहे. कौशल्ययुक्त महाराष्ट्र या माहितीपटात प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान या योजनेचे यश मांडण्यात आले असून कौशल्ययुक्त महाराष्ट्र रोजगार युक्त विदर्भातून विदर्भातील उद्योजकांना पुढाकार घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेले आवाहन, नक्षलग्रस्त गडचिरोली व गोंदियातील युवकांना रोजगार आणि स्वंरोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास अभियानाने मारलेली बाजी ,कौशल्य विकास प्रशिक्षअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे प्रशिक्षण रोजगार मेळावे,महिलांचा कौशल्य विकास यातून महिलांचे होत असलेले सबलीकरण याचे प्रतिबिंब या माहितीपटात उमटले आहे. या माहितीपटाच्या विमोचन प्रसंगी नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांची मोठया संख्येने  उपस्थिती होती.
00000

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गोंदियाच्या पर्यटन व सारस माहितीपटाचे विमोचन


नागपूर दि. 11 : गोंदिया जिल्हयातील पर्यटनस्थळांवर आधारीत असलेल्या गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया आणि राज्यात केवळ गोंदिया जिल्हयात आढळणाऱ्या दुर्मिळ अशा सारस पक्षावरील सारस वैभव गोंदियाचे या दोन्ही माहितीपटाचे विमोचन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते आज दीक्षाभूमी येथील सभागृहात नागपूर विभागातील विविध योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात तालूकास्तरीय आढावा सभेत करण्यात आले. या प्रसंगी पालकमंत्री राजकुमार बडोले,उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय,मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रविण परदेशी,पाणी पुरवठा  विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार,उर्जा विभागाचे प्रधान सचिव विपीन श्रीमाळी, सामाजीक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुरेंदकुमार बागडे,ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, जलसंधारण सचिव डॉ. पुरूषोत्तम भापकर, कृषी आयूक्त विकास देशमुख,जमाबंदी आयुक्त एस पी कडू पाटिल, विभागीय आयुक्त अनुप कुमार, मनरेगा आयुक्त अभय महाजन व गोंदिया जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी,सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्हा तलावांचा व धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा वनराई व वन्यजीवांनी समृध्द असून जिल्हयात नवेगांवबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प,हाजफॉल,चुलबंद,बोदलकसा,मांडोदेवी यासह अनेक पर्यटन व तिर्थस्थळे आहेत. या स्थळांची माहिती राज्यभर व्हावी व जास्तीत जास्त पर्यटक व वन्यजीवप्रेमी पर्यटनासाठी व सारस पक्षांसह वन्य-प्राण्यांना बघण्यासाठी गोंदिया जिल्हयात यावे यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनातून व जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून जिल्हा पर्यटन समितीने तयार केलेला गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया हा माहितीपट 13 मिनीटाचा आहे. या माहितीपटात पाहुणे कलाकार म्हणून प्रसिध्द अभिनेते डॉ. गिरीष ओक यांनीसुध्दा काम केले आहे.
गोंदिया जिल्हयातील धानाची शेती,विदेशात निर्यात होणारा  उच्च प्रतीचा तांदुळ,नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पातील वनराई-वन्यजीव चुलबंद,बोदलकसा, नवेगावबाध जलाक्षय,इटियाडोह प्रकल्प,बोदलकसा, चुलबंद,हाजराफॉल तसेच जिल्हयातील दंडार ही लोककला, ऐतिहासिक व तिर्थक्षेत्र असलेले कचारगड, मांडोदेवी,तिबेटियन शरणार्थी वसाहत यासह अनेक पर्यटन स्थळांची माहिती या माहितीपटातून  देण्यात आली आहे.
राज्यात केवळ गोंदियात आढळणाऱ्या दुर्मिळ व सुंदर दिसणाऱ्या सारस पक्षांसह जिल्हयातील मालगुजारी तळावांवर येणाऱ्या स्थलांतरीत व विदेशी पक्षांवर जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांनी तयार केलेल्या सारस वैभव गोंदियाचे या वृत्तपटात सारस पक्षांचे सौदर्य आणि प्रेमाचे प्रतिक म्हणून दिलेली उपमा, ऐतिहासिक काळापासून आदिवासी बांधवांमध्ये सारस पक्षांच करण्यात येत असलेल पूजन, मागील वर्षीपासून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून सारस पक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी  आयोजित करण्यात येत असलेला सारस महोत्सव, सारस पक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उभी झालेली लोकचळवळ, पर्यटक आणि पक्षीप्रेमींनी सारस पक्षांना बघण्यासाठी गोंदिया जिल्हयात येण्यासाठी घातलेली साद या वृत्तपटातून सारस पक्षी गोंदिया जिल्हयाचे वैभव असल्याचे वर्णन करण्यात आले आहे.
या माहितीपट व वृत्तपटाच्या विमोचन प्रसंगी नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी,सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक  कृषी अधिकारी,उपजिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,उप मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिलदार,गट विकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी यांचेसह अन्य यंत्रणाचे अधिकारी देखील उपस्थित होते.
00000

गरिबांची सेवा हाच संत मदर तेरेसाचा संदेश --- मुख्यमंत्री





  • मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदर तेरेसाच्या पुतळ्याचे अनावरण
 
नागपूर दि. 11 :-   गरिबांची सेवा करताना मदर तेरेसांना ईश्वराची अनूभूती झाली. आता त्या जगाच्या आई झाल्या आहेत. त्यांचे कार्य जगाच्या 52 देशात सुरु आहे. समाजातील शेवटच्या घटकाची सेवा हाच संत मदर तेरेसाच्या जीवनाचा संदेश आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
कामठी रोडवरील सेंट फ्रान्सिस डिसेल्ट कॅथेड्रालच्या प्रांगणात मदर तेरेसा यांना संत ही सर्वोच्च पदवी बहाल केल्याबद्दल आयोजित संत समारोहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. याप्रसंगी आर्च बिशप अब्राहाम विरुया कुलंगरा, आमदार सुधाकर देशमुख, प्रकाश गजभिये, माजीमंत्री अनिस अहमद, विविध धर्माचे धर्म गुरु उपस्थित होते.
व्यक्तीचे संस्कार व धर्माचे अनुष्ठान सेवेसाठी आवश्यक आहे. आज जगातील सर्व शक्ती संत मदर तेरेसाला नमन करतात. त्यांचे सेवेचा वसा आपण पुढे चालवावा. गरीब अनाथांची सेवा करावी व त्यांचे कार्य समाजाच्या सर्व थरात पोहचवावे असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
नितीन गडकरी
संत मदर तेरेसा या ममतेच्या सागर होत्या. त्यांचे जीवन रंजल्या गांजल्यासाठी समर्पित होते. जीवनामध्ये ऐहिक सुखापेक्षा गरीबांच्या सेवेला मी जास्त महत्व देतो. मी आमदार असतांना अनेक हृदयरुग्णांना उपचारासाठी मदत केली. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझी कमाई आहे. आतापर्यत अशा 6 हजार रुग्णांवर शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याची संधी मला लाभल्याचे नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले.
जात धर्म पंथ भाषेच्या पलिकडे जाऊन काम करावे. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटल्या प्रमाणे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा या मार्गावर मदर तेरेसा चालल्या आणि त्यांना संतत्व बहाल झाले. सेवेसाठी कुठल्याही देशाच्या सिमा आडव्या येत नाही. त्यांचे कार्य जगभर होते असेही गडकरी म्हणाले.  
प्रास्ताविक भाषण आर्च बिशप अब्राहाम विरुया कुलंगरा यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते मदर तेरेसाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत आर्च बिशप अब्राहाम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पत्रकार जोसेफ राव यांनी करुन दिला. मोमबत्ती पेटवून मदर तेरेसा यांची प्रार्थना करण्यात आली.
संचालन फादर प्रशांत यांनी केले तर आभार सिस्टर कुरिया कोसा यांनी मानले. यावेळी बिशप पॉल दुपारे, रेव्हरंट फादर क्रिस्टोफर, नेल्सन फ्रान्सिंस, फिलिप्स जैसवाल, पिटर घाटगे, गुरुद्वाराचे गुरुग्रंथी मनदीप सिंग, मौलाना पारेख, अर्चना सिंग उपस्थित होत्या.
00000

स्वच्छ नागपूर मोबाईल ॲपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोर्कापण


  • ॲप वापरा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा
 
नागपूर दि. 11 :-   स्वच्छ शहर, सुंदर शहर ही संकल्पना साकार करत असताना प्रत्येक नागरिकांच्या योगदानाची आवश्यकता असून शहरातील नागरिकांच्या तक्रारीसाठी महानगरपालिकेतर्फे मोबाईल ॲप तयार करण्यात आला असून मोबाईल ॲपचे लोर्कापण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
दीक्षाभूमी येथील सभागृहात स्वच्छ नागपूर या गुगल प्लेस स्टोअरवरील मोबाईल ॲपचे लोर्कापण समारंभास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी,  विभागीय आयुक्त अनूप कुमार, महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्वच्छ नागपूर हे मोबाईल ॲप व ऑनलाईन ट्रॅकींग शहरातील पाच लाख घरापर्यंत पोहचविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात लक्ष्मीनगर झोन परिसरातील 50 हजार घरापर्यंत ही सेवा उपलब्ध होणार आहे. स्वच्छ नागपूरमध्ये सहभागी होण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर स्वच्छ नागपूर ॲप शोधून इस्टांल करणे आवश्यक आहे. आपण नोंदविलेल्या तक्रारीवर होणाऱ्या कार्यवाहीचा तपशील तक्रार कर्त्याला या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन बघता येणार आहे. या प्रकारची पारदर्शी घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया राबविणारी पहिली महानगरपालिका असून संपूर्ण नागपुरात ही सेवा लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी यावेळी दिली.
प्रारंभी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वागत करत प्रास्ताविकात स्वच्छ नागपूर मोबाईल ॲप बद्दल माहिती दिली.
00000

स्मार्ट सिटीसाठी जिओग्राफीकल इनफॉरमेशन सिस्टीम सुधार प्रन्यास व सुदूर संवेदन केंद्र सामंजस्य करार



  • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
  • डिजिटल गर्व्हनर्स महत्वाकांक्षी संकल्पनेला चालना
 
नागपूर दि. 11 :-  नागपूर सुधार प्रन्यास व महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्र यांच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. नागरी ग्रामीण भागामध्ये स्मार्ट सिटी आणि स्मार्ट गावे निर्माण करण्यासाठी आवश्यक जिओग्राफीकल इनफॉरमेशन सिस्टीम या प्रणालीचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राची या करारामुळे आवश्यक मदत मिळणार आहे.
दीक्षाभूमी येथील सभागृहात नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर आणि महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्राचे संचालक सुब्रोतो दास यांनी सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनूप कुमार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नागपूर सुधार प्रन्यासचे मुळ शहरातील कार्यक्षेत्र वाढवून नागपूर महानगर क्षेत्राच्या नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल गर्व्हनर्स या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य दिल्यामुळे रिमोर्ट सेन्सींग आणि जीओग्राफीकल इन्फॉरमेशन सिस्टीम या प्रणालीचा वापर प्रशासनामध्ये निर्णय प्रक्रियेत गतिमानता वाढविण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. तसेच नियोजनामध्ये आवश्यक ती संगणक प्रणाली व निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करण्यासाठी आवश्यक माहिती तयार करण्यासाठी महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राची मदत होणार आहे.
महानगर क्षेत्राच्या विकास योजनांचा नकाशे बेस मॅपसोबत इंटीग्रेशन करणे, सुधार प्रन्यासच्या विकास कामांच्या देखरेख करण्यासाठी मोबाईल अप्लीकेशन तयार करणे, तसेच सर्व माहिती संकेत स्थळावर देण्याकरिता वेब ब्रावझर अप्लीकेशन, पोर्टल तयार करणे ही या प्रकल्पाची मुख्य उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाअंतर्गत नागपूर महानगरक्षेत्राचा तीन हजार पाचशे छहात्तर चौरस किलोमीटर क्षेत्राचे आणि नागपूर शहराचे 217 चौरस किलोमीटर क्षेत्राचे जीओ मॅपींग करणे सुलभ होणार आहे. या सामंजस्य करारामुळे नागपूर सुधार प्रन्यासतर्फे  विकास कामांचे नकाशे, जलवाहिका, अतिउच्चदाबाचा व इतर विद्युत लाईनचा जिओ स्पॅचीअल डेटा बेस तयार होणार आहे.
00000

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे विभागात परिवर्तनाला सुरुवात --- देवेंद्र फडणवीस

  • मुख्यमंत्र्यांनी घेतला विविध योजनांचा आढावा
  • अंमलबजावणीमध्ये नागपूर विभागाची आघाडी
  • तालुकास्तरावरील विकासाचा पहिल्यांदाच आढावा
  • घोषणेनंतर तात्काळ चार शासन निर्णय जारी
  • घरकुल योजनेसाठी 800 अभियंत्यांच्या नियुक्त्या
 
नागपूर दि. 11 :- शासनाचा प्राधान्यक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, स्वच्छ भारत मिशन व सर्वांसाठी घरे आदी योजनांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य दिल्यामुळेच सामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. प्रशासकीय यंत्रणांनी योजनांची अंमलबजावणी करताना स्वयंस्फूर्तीने व कल्पकतेने योजना राबवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
दीक्षाभूमी येथील सभागृहात आज नागपूर विभागातील विविध योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. तसेच अंमलबजावणी संदर्भात येणाऱ्या अडचणीची माहिती घेतली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव विपीन श्रीमाळी, सामाजिक न्याय सचिव सुरेंद्र बागडे, ग्राम विकास सचिव असिम गुप्ता, जलसंधारण सचिव डॉ. पुरुषोत्तम भापकर, कृषी आयुक्त विकास देशमुख, जमावबंदी आयुक्त एस.पी.कडुपाटील, विभागीय आयुक्त अनूप कुमार, मरेगा आयुक्त अभय महाजन आदी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये लोकसहभागातून पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्त काम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल प्रशासकीय यंत्रणाच्या कार्याचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वैज्ञानिक पद्धतीने जलसंधारणाची कामे करुन शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाचा लाभ मिळवून दिल्यामुळे प्रशासन व जनता यांची नवी मैत्री तयार झाली आहे. विभागात 1077 गावांमध्ये 21 हजार 685 कामे पूर्ण झाली असून यामुळे 1 लाख 40 हजार 765 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
जलयुक्त शिवार अभियानामध्ये यावर्षी 904 गावांची निवड केली असून 28 हजार 740 कामांसाठी 750 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून ही कामे दिलेल्या वेळात पूर्ण करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले की, मागेल त्याला शेततळे या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागात पाण्याची पातळी चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांकडून बोडीची मागणी केली होती त्यानुसार शासन निर्णय आजच जाहीर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मालगुजारी तलावांच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला असून विभागातील 6 हजार 489 तलावांपैकी यावर्षी 1 हजार 414 तलावांचे पुनरुजीवनासाठी 150 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तलावांच्या खोलीकरणासह खोदकामासाठी जेसीबी सारख्या यंत्राची अडचण लक्षात घेऊन बेरोजगार युवकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. जेबीसी चालविण्यासाठी कौशल्य विकासाअंतर्गत संबंधित कंपंन्यामार्फत प्रत्येक जिल्हा प्रशिक्षण देण्याची सुविधा सुरु करण्यात येणार आहे.
11 हजार धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम
नागपूर विभागातील गडचिरोलीसह इतर जिल्ह्यात पाण्याची पातळी चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 11 हजार धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून यासाठी 275 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यांना यामध्ये प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
मरेगाअंतर्गत सिचंन विहिरींना प्राधान्य देण्यात आले असून या विहिरी पूर्ण झाल्याबरोबर त्यांना विजेचे कनेक्शन तातडीने देण्याची सूचना करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की विद्युत जोडणीचे काम पूर्ण करण्यासाठी 325 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कृषीपंपांना वीज जोडणी अभावी प्रलंबित असलेल्या सर्व शेतकरी ग्राहकांना विशेष कार्यक्रम राबवून मागील दोन वर्षात सरासरी 25 हजार पेक्षा जास्त जोडण्या देण्यात आल्या आहेत. यापूर्वी  केवळ 11 हजार कनेक्शन दिल्या जात होते. कृषी पंपांचे वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वीज जोडणी देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
31 मार्च पर्यंत चार जिल्हे हागणदारीमुक्त
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशात शहरी व जिल्हास्तरावर राज्यात उत्कृष्ट काम झाले असून येत्या 21 मार्च पर्यंत गोंदिया, नागपूर, भंडारा व वर्धा हे जिल्हे हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपूर विभाग स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 2 ऑक्टोबर पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
पायाभूत सर्वेक्षणाअंतर्गत विभागात ऑगस्ट अखेर पर्यंत 3 लाख 14 हजार 943 वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले असून 20 टक्क्यावरुन 75 टक्के पर्यंत वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले आहे. विभागात 284 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून 2 हजार 609 ग्रामपंचायती व 3 लाख 9 हजार 340 वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
घरकुल योजनेंसाठी 800 अभियंतांची नियुक्ती
सर्वांसाठी घरे हा महत्वाकांक्षी कार्यक्रमाच्या प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करताना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, सबरी आवास योजना या योजना एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या योजनांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासोबतच तज्ज्ञ व्यक्तिंच्या उपलब्धतेसाठी 500 अभियंत्यांची नियुक्त करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात या अभियंत्यामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. नागपूर विभागासाठी कंत्राटी पद्धतीने 170 अभियंत्यांच्या नियुक्तीसाठी मान्यता देण्यात आली असून मार्च 2019 पर्यंत अनुसूचित जाती व जमाती पैकी एकही कुटुंब घरकुलाशिवाय राहणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत आपले सरकार या ऑनलाईन वेबपोर्टलवर महसूल विभागाच्या 27 लाख 30 हजार 709 अर्ज प्राप्त झाले आहे. तर ग्राम विकास विभागाअंतर्गत 5 लाख 36 हजार 923 अर्ज ग्राम विकास विभागातर्फे निकाली काढण्यात आले आहे. आपले सरकार हे 100 टक्के ऑनलाईन व्हावे व जनतेच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या सेवा सुरु कराव्यात, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

चार शासन निर्णयाचे लोर्कापण
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच जलसंधारण विभागातर्फे  चार योजनांच्या शासन निर्णयाचे विमोचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतल्यानंतर तात्काळ शासन निर्णय तयार होऊन त्याची लोर्कापण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामध्ये मागेल त्याला शेततळी ऐवजी बोडी घेण्याचा हक्क. याअंतर्गत 17 हजार ते 42 हजार 800 रुपयाचे अनुदान व सहा प्रकारच्या बोडी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
जलसंधारण विभागाचे सचिव डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी निर्णया संदर्भात माहिती दिली. धडक सिंचन विहिरींच्या कार्यक्रमाअंतर्गत 11 हजार विहिरी घेण्यात येणार असून यासाठी 275 कोटी रुपयाचे अनुदान उपलब्ध होणार आहे. विभागात गडचिरोली जिल्ह्यात 4500 विहिरी, चंद्रपूर 3 हजार, गोंदिया 2 हजार, भंडारा 1 हजार व नागपूर 500 विहिरी घेण्यात येते. माजी मालगुजारी तलावाचे पुनरुज्जीवन अंतर्गत या वर्षासाठी 150 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी 120 कोटी रुपयाचे निधी जलसंधारण विभागाकडे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील यशोधा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण या कार्यक्रमासाठी 100 कोटी रुपयाचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी शासनाच्या प्राधान्यक्रम असलेल्या योजनांची अंमलबजावणी करतांना लाभार्थ्यांना थेट योजनांचा लाभ मिळेल यादृष्टीने नियोजन करावे तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देताना बँक खात्यासोबत आधार क्रमांक संलग्न करावा अशा सूचनाही यावेळी दिल्यात. आधार नोंदणीमध्ये नागपूर विभागात उत्कृष्ट कार्य झाले असले तरी 0 ते 5 व 18 वर्षे वयोगटातील आधार नोंदणीसाठी विभागात विशेष शिबिराचे आयोजन करावे अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
प्रारंभी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात नागपूर विभागात जलयुक्त शिवारासह विविध योजनांचा अंमलबजावणी संदर्भात सादरी करणाद्वारे माहिती दिली. नागपूर विभाग हा योजनांचा अंमलबजावणीमध्ये राज्यात आघाडीवर असून शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाविषयी अनुलोम संस्थेचे अतुल वजे, सेंटर फॉर सोशल वेलफेअरचे कृष्णा मराठे, ऑर्ट ऑफ लिव्हींग आदींनी सादरीकरण केले.
संचलन दिनेश मासोदकर यांनी तर आभार उपायुक्त पराग सोमन यांनी मानले. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अंमलबजावणी यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते.
00000