Saturday 31 July 2021

परस्पर सहकार्यातून राज्यातील रस्ते व लोहमार्ग आधुनिक तंत्रज्ञानाने मजबूत करु या - मुख्यमंत्री

कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डान पुलाचा शानदार भूमीपूजन सोहळा ब्रॉडगेजवरील ३०० कोटींच्या उड्डाण पुलांचेही भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची उपस्थिती नागपूर दि. 31 : महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थितीत काही रस्ते-रेल्वे मार्ग नादुरुस्त झाले आहेत. ते दुरुस्त करताना तसेच नवे रस्ते करताना अनेक पिढ्यांसाठी टिकतील अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. यासाठी राज्य व केंद्र सरकार समन्वयातून काम करेल. देशभर उच्च दर्जाच्या महामार्गाच्या निर्मितीचे कार्य रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी करीत आहेत. या परिस्थितीत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग राज्याच्या दर्जात्मक रस्ते निर्मितीसाठी होईल यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. नागपूर - नागभीड रेल्वे मार्गावरील कोट्यवधीच्या महत्वाकांक्षी उड्डाण पुलांच्या उद्घाटन सोहळ्याला त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. उत्तर नागपूर मधील वाहतुकीची कोंडी कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी कडबी चौक ते गोळीबार चौक दरम्यानच्या जवळपास तीन किलोमीटर लांबीच्या १४६ कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे उड्डाण पुलाचे आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते भूमीपूजन झाले. महाराष्ट्र राज्य रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडने ( महारेल ) आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. या शानदार भूमीपूजन सोहळ्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण दूरस्थ प्रणालीव्दारे तसेच राज्याचे उर्जा तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री विकास कुंभारे, राजू पारवे, कृष्णा खोपडे, मोहन मते, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल, जिल्हाधिकारी विमला आर. उपस्थित होते. उत्तर नागपूर परिसरातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यासाठी मोतीबाग येथील एसईसीआर नॅरोगेज संग्रहालयासमोर महारेलमार्फत भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. १४६ कोटीच्या कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाणपुलाच्या भूमीपूजनासोबतच आज या कार्यक्रमामध्ये कळमना मार्केट ते नागपूर जोड रस्ता, रेल्वे फाटक क्रमांक - ७३ ( ६९ कोटी ) भांडेवाडी जवळ रेल्वे फाटक क्रमांक -६९ (२५ कोटी ) उमरेड शहराजवळील जोडरस्ता बसस्थानकाजवळील रेल्वे फाटक क्रमांक - ३४ ( २६ कोटी ) उमरेड भिवापूर बायपास रोडवरील रेल्वे फाटक क्रमांक - ३३ ( ३८ कोटी ) अशा एकूण १५८ खर्चाच्या नागपूर इतवारी ते नागभिड रेल्वे लाईन वरील चार नवीन उड्डाणपुलाचेही भूमीपूजन करण्यात आले. ३०४ कोटींच्या पाचही उड्डाणपुलाचे आज प्रत्यक्ष कामही सुरु झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांनी या कामासाठी घेतलेल्या पुढाकाराचे भाषणात कौतुक केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या दर्जेदार कामाचे कौतुक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही केले होते याची आठवण सांगितली. सोबतच राज्यामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीची आठवण करुन देत सध्या कोरोनासोबतच नैसर्गिक आपत्तीशी महाराष्ट्र झुंजत आहे. तौक्ते वादळाचे, पूर अतिवृष्टीचे संकट, खचणारे रस्ते, दरडी यातून राज्य निश्चितच सावरेल. मात्र यावर कायमस्वरुपी तोडगा म्हणून अनेक पिढ्यांसाठी टिकेल अशा नवीन तंत्रज्ञानाने बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठी वाहतूक व महामार्ग मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले. समृध्दी महामार्गामुळे राज्याची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर जवळ येत आहे. समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम दृष्टीपथात आहे. मात्र नव्या पायाभूत सुविधा उभ्या राहत असताना सामान्य नागरिकांची काळजी घेतो तशीच काळजी वन्यजीव व वन्य प्राण्यांचीही घेण्याचे आवाहन त्यांनी केले. नागभीड येथे ब्रॉडगेज तयार करताना ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी जंगलामध्ये उन्नत मार्गाचा वापर करा. जेणेकरुन वन्यजीव, वनसंपदा यांचे नुकसान होणार नाही. निसर्ग व पर्यावरणपूरक नवतंत्रज्ञानाची जोड असलेले रस्ते हे दिर्घकालीन प्रगतीसाठी गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी यावेळी संबोधित करताना या प्रकल्पासाठी सर्व राजकीय पक्षांनी, नेत्यांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख केला. राज्याचे ऊर्जा मंत्री व ऊर्जा विभागाने यासाठी केलेली मदत उल्लेखनीय आहे. उत्तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे करताना या ठिकाणचे अतिक्रमण अडचण ठरणार नाही, यासाठी स्थानिक नेत्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. नागपूर ते वडसा हा ब्रॉडगेज मार्ग पूर्णत्वास जाईल. सोबतच उमरेड पुढील भिवापूर पर्यंतच्या चार पदरी रस्ते मार्गामध्ये वने व पर्यावरण विभागाच्या आक्षेपांची पूर्तता झाल्यास हा रस्ता देखील पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले. नव्या रेल्वे लाईन मुळे विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांना कोळसा पुरवताना 20 ते 22 तास याठिकाणी लागायचे. त्या ठिकाणी केवळ दोन तासांमध्ये कोळशाची सुलभ वाहतूक होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नितीन गडकरी यांनी समृद्धी महामार्गाला जालना येथून मराठवाड्याला जोडण्याचे आवाहन केले. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी यावेळी बोलतांना विकास कामात परस्परांना सहकार्य करण्याची नागपूरची संस्कृती असून नागपूरच्या मेट्रोला हिरवी झेंडी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले असल्याचे स्पष्ट केले. नागपूरच्या विकासासाठी आजचा कार्यक्रम अतिशय उत्तम कार्यक्रम असून यामध्ये राज्याचे ऊर्जा मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे मंत्रालय यांनी समन्वयातून काम केले असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी आमदार राजू पारवे यांनी घेतलेल्या पुढाकाराचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. पशुसंवर्धन व क्रीडा विकास मंत्री सुनील केदार यांनी रस्ते रेल्वेमार्ग तयार करताना शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. स्थानिक भूमिपुत्रांना प्रकल्पाचा त्रास होता कामा नये. याकडे सर्व यंत्रणांनी लक्ष घालावे, असे आवाहनही त्यांनी केले. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनीही यावेळी संबोधित केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल यांनी केले. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. *****

Friday 30 July 2021

गरीब व गरजू रुग्णांना कर्करोगावरील उपचार माफक दरात मिळावे - सुनिल केदार

नागपूर दि. 31 : गोर - गरीब कर्करोगग्रस्त रुग्णांना माफक दरात सर्वोत्तम उपचार मिळावे. तसेच कर्करोगावर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनिल केदार यांनी व्यक्त केले. जामठा येथील डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेअंतर्गत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कार्यरत आहे. श्री. केदार यांनी आज तेथे सदीच्छा भेट देऊन पाहणी केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनिल मनोहर, सचिव शैलेश जोगळेकर, प्रशांत वैद्य, अनिल वडपल्लीवार उपस्थित होते. मध्य भारतातील सगळयात मोठ्या कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांवर उपचार होणे गरजेचे आहे, असे श्री. केदार म्हणाले. यावेळी शैलेश जोगळेकर यांनी इन्स्टिट्यूटच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. 25 एकरच्या परिसरात साधारणत: 470 बेड क्षमतेच्या या कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कर्करोग रुग्णांना आरोग्य सुविधेसोबतच, जेवण, रुग्णांसाठी बससेवा, औषधोपचार, आदीसह अन्य सुविधा विनाशुल्क उपलब्ध आहेत.

Thursday 29 July 2021

बांधकाम सुरु असलेल्या भूखंडांवर डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना राबवा - प्राजक्ता लवंगारे –वर्मा

• क्रेडाई, बांधकाम संघटना, नासुप्र यांची संयुक्त बैठक • शहरात सहाशे भूखंडांवर बांधकाम सुरु • बांधकाम मजुरांची तपासणी करा • सर्व मोकळ्या भूखंडांवर फवारणी नागपूर, दि. 29: शहर तसेच जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे बांधकाम सुरु असलेल्या व मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचणार नाही, याची खबरदारी घेतानाच डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी क्रेडाई व बांधकाम संघटना यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे केले. नागपूर शहरात सुमारे सहाशे भूखंडांवर बांधकाम सुरु आहे. तसेच विविध रस्त्यांचे बांधकाम व सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरु असून या ठिकाणी पावसाचे पाणी साठत असल्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहरातील मोकळ्या भूखंडांवरसुद्धा डासांची प्रजननक्षमता वाढत असल्यामुळे अशा सर्व ठिकाणी तत्काळ फवारणीसह स्वच्छता करण्याचे काम महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास यांनी सुरु करावे, असे निर्देश यावेळी विभागीय आयुक्तांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी क्रेडाई व विविध बांधकाम संघटनांच्या प्रतिनिधी तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. दीपाली नासरे यांच्यासमवेत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. क्रेडाईचे अध्यक्ष संतदास चावला, माजी अध्यक्ष प्रशांत सरोदे, सचिव गौरव अग्रवाल, कोषाध्यक्ष राजमोहन साहू इमारत बांधकाम संघटनेचे अध्यक्ष प्रदीप नगरारे आणि कोषाध्यक्ष पुरुषोत्तम हरडे उपस्थित होते. महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या मदतीने बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी डेंग्यू डास उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना करताना विभागीय आयुक्त म्हणाल्या की, शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक सुरु असलेल्या बांधकामाची तसेच मोकळ्या भूखंडांची तपासणी करावी. या ठिकाणी डास प्रतिबंधक औषध तसेच अबेट या द्रावणाची फवारणी करावी. कायमस्वरुपी पाणी साचत असल्यास तिथे गप्पी मासे सोडून डासाची उत्पत्ती होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. डेंग्यू तसेच मलेरियाच्या आजारासंदर्भात प्रत्येक घराची तपासणी करुन ज्या ठिकाणी तापाने आजारी असलेले रुग्ण आढळतील त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन प्रतिबंधात्मक उपचार तत्काळ सुरु करावेत. शहरात मागील 15 दिवसात 177 रुग्ण आढळले असून सर्वाधिक रुग्ण धरमपेठ व सतरंजीपुरा झोनमध्ये आहेत. डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये आऊटब्रेक कंट्रोल तसेच बायोलॉजिकल कंट्रोल महत्त्वाचा आहे. यामध्ये डास व अंडी नष्ट करण्याला प्राधान्य देण्यात आले असून घरातील साचलेले पाणी नष्ट करण्यासाठी एक कोरडा दिवस पाळण्यात यावा व यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. नागपूर सुधार प्रन्यास सभापती मनोज सूर्यवंशी यांनी नागपूर शहर व परिसरात 600 ठिकाणी बांधकाम सुरु असून क्रेडाईच्या माध्यमातून या सर्व जागांवर डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय राबविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच बांधकाम कामगारांचीही तपासणी करण्यात येत आहे. महानगरपालिका तसेच नागपूर सुधार प्रन्यास हद्दीत असलेल्या मोकळ्या भूखंडांचीसुद्धा तपासणी करुन आवश्यक फवारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. क्रेडाई व बांधकाम असोसिएशनच्या प्रतिनिधींनी डेंग्यू निर्मूलन उपक्रमात संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली. ******

Wednesday 28 July 2021

सामाईक प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविले

नागपूर, दि. 28 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत अकरावीच्या प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी दहावीची परीक्षा उत्तीर्ण तसेच प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई व अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून 2 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सामाईक प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 178/- रुपये बॅकींग चार्जेस व पेमेंट गेटवे चार्जेस शुल्क भरावे लागणार आहे. पेमेंट गेटवेची सुविधा https://cet.11thadmission.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे.

दहा लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण

नागपूर, दि. 28: कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेत ग्रामीण भागातील जनतेने दिलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे जिल्ह्यात 10 लाख 9 हजार 358 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली. लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामीण भागात विविध विभागांच्या समन्वयातून विशेष प्रयत्न सुरु असून यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी – कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे या मोहिमेला गती मिळाली आहे. 10 लाख लसीकरणामध्ये 7 लाख 86 हजार 879 नागरिकांनी पहिला डोस घेतला असून 2 लाख 22 हजार 479 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणासाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच ग्रामपंचायत स्तरावर लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या लसीकरणामध्ये शासकीय लसीकरण केंद्र 9 लाख 54 हजार 140 नागरिकांनी तर खासगी लसीकरण केंद्रांवर 55 हजार 218 नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे. तालुकानिहाय झालेल्या लसीकरणामध्ये भिवापूर 40 हजार 717, हिंगणा 1 लाख 9 हजार 947, कळमेश्वर 67 हजार 096, कामठी 1 लाख 6 हजार 669, काटोल 76 हजार 701, कुही 45 हजार 976, मौदा 59 हजार 357, नागपूर ग्रामीण 1 लाख 21 हजार 678, नरखेड 60 हजार 976, पारशिवनी 66 हजार 209, रामटेक 51 हजार 896, तर सावनेर तालुक्यात 1 लाख 1 हजार 182 तसेच उमरेड तालुक्यातील नागरिकांचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे 1 लाख 954 लसीकरण पूर्ण झाले आहे. ******

राष्ट्रीय लोक अदालत 1 ऑगस्टला

नागपूर, दि. 28 : राज्यात एकाच वेळी उच्च न्यायालय व त्यांची खंडपीठे, जिल्हा न्यायालय, सर्व न्यायधीकरण व तालुका न्यायालयाच्या ठिकाणी 1 ऑगस्टला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरच्यामार्फत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा सर्व संबंधित पक्षकारांनी लाभ घ्यावा व राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्देश पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस. सी. मोरे तसेच सचिव अभिजित देशमुख यांनी केले आहे. लोक अदालत आयोजित करण्यामागचा उद्देश मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेली प्रकरणे, तसेच नवीन प्रकरणे किंवा महत्त्वाची प्रकरणे लोक न्यायालय सारख्या यंत्रणेच्या माध्यमातून त्वरित निकाली काढून त्यांचे निवारण करणे आहे. मोठ्या प्रमाणावरील प्रलंबित प्रकरणामधून योग्य प्रकरणांची छाननी करुन आपसी समझोत्यासाठी प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नागपूर जिल्ह्यातील एकूण 30 हजार प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. या लोक अदालतीमध्ये कोर्टातील खालील प्रकारची प्रकरणे विविध स्थानी आपसी समझोत्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. समझोता योग्य फौजदारी प्रकरणे, पराक्राम्य दस्तावेज अधिनियमाच्या कलम 138 ची प्रकरणे, अधिकोष वसुली प्रकरणे, मोटार अपघात दावा प्राधिकरणातील प्रकरणे, अपघात माहिती अहवाल व कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणे, श्रमिकांचे वाद व त्यांच्या पुनर्नियुक्तीमधील जुन्या वेतनासंबंधीची प्रकरणे(कामगारांसंबंधी निस्तारणासंबंधीचे दावे, पॉलिसी, औद्योगिक कामगारांच्या वेतनासंबंधीचे आणि इतर प्रलंबित फायद्याची प्रकरणे), भू-संपादन प्रकरणे, विजेची आणि पाणी बिलाची (चोरीची) प्रकरणे, नोकरी संबंधी प्रकरणे ज्यामधील पैसे आणि भत्ते आणि सेवानिवृत्तीनंतरच्या फायद्यासंबंधी प्रकरणे, महसूल प्रकरणे, दिवाणी दावे-भाडेसंबंधी, वहीवाटसंबंधीचे दावे आणि दूरध्वनी प्रकरणे आदींचा समावेश राहणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर अभिजित देशमुख यांनी केले आहे. ******

पुरामुळे होणारी हानी टाळण्यासाठी संपर्क यंत्रणा अधिक बळकट करा - प्राजक्ता लवंगारे-वर्मा

* आंतरराज्य समन्वय समितीच्या बैठकीत नियोजन * पाणी सोडताना चोवीस तास आधी पूर्वसूचना देण्यात येणार * समन्वयाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे * नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरु ठेवण्याचे आदेश * मध्य प्रदेश, केंद्रीय जल आयोग व जलसंपदा समन्वय ठेवणार नागपूर, दि. 28 : मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांच्या पुरामुळे महाराष्ट्रात होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी चौराई, बावनथडी तसेच संजय सरोवर या प्रमुख प्रकल्पामधून पाणी सोडण्यापूर्वी चोवीस तासापूर्वी पूर्वसूचना देतानाच मध्य प्रदेशातील संबंधित जिल्ह्याचे जिल्हा प्रशासन तसेच नागपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्हा प्रशासनाने समन्वय ठेवून नदी काठावरील बाधित गावांना पूर्वसूचना देणारी यंत्रणा अधिक बळकट करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आंतरराज्य समन्वय समितीची बैठक विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे जबलपूरचे विभागीय आयुक्त बी. चंद्रशेखर, तेलंगणा येथील कालेश्वर प्रकल्पाचे मुख्य अभियंता तिरुपती राव, नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी तसेच छिंदवाडा, सिवनी, बालाघाट या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, वैनगंगा नदी खोऱ्याचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता जे. जी. गवई, चंद्रपूरचे अधीक्षक अभियंता पी. एन. पाटील, भंडाऱ्याचे आय. जी. पराते. नागपूरचे अंकुर देसाई व सहारे आदी यावेळी उपस्थित होते. वैनगंगा, वर्धा व त्यांच्या उपनद्यांमुळे नागपूर विभागात पुराचा धोका निर्माण होत असून या नद्यांवरील प्रकल्पातून अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येते. अतिवृष्टी व पुरामुळे विभागातील बरीच गावे बाधित होत असल्याने पुराचे पाणी सोडताना मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांमध्ये कायमस्वरुपी समन्वयाची आवश्यकता व्यक्त करताना श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या की, संबंधित जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांनी पुराच्या धोकापातळीच्या परिस्थितीनुसार जनतेला सतर्क करावे. तसेच इतर जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत संबंधितांना पूर्वसूचना द्याव्यात. अतिवृष्टीमुळे प्रकल्पसाठ्यात होणारी वाढ व प्रकल्पाचा विसर्ग याबाबत दोन्ही राज्यातील अधिकारी व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून संदेश आदान-प्रदान करतात. परंतु अतिवृष्टीच्या काळात थेट संपर्क करावा व त्यानुसार पूर परिस्थितीची माहिती जिल्हा प्रशासनासोबतच बाधित गावांपर्यंत पोहचवावी. यासाठी केंद्रीय जल आयोग, जलसंपदा व संबंधित यंत्रणांमध्ये अधिक समन्वय ठेवून पूर परिस्थितीबाबतची पूर्वसूचना चोवीस तासापूर्वी देण्याची यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे निर्देश श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी दिले. केंद्रीय जल आयोग आणि जलसंपदा विभागातर्फे वैनगंगा व वर्धा नद्यांना यापूर्वी आलेला महापूर तसेच त्यामुळे झालेली हानी टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात बोलताना विभागीय आयुक्त म्हणाल्या की, प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, प्रकल्पाची पाणी पातळी तसेच हवामान विभागातर्फे देण्यात येणाऱ्या अतिवृष्टीच्या सूचनेसंदर्भातील संपूर्ण माहिती सर्व संबंधित यंत्रणांना कळविण्याची व्यवस्था करण्यात यावी. ही माहिती दर तासाला दिल्यास सर्व यंत्रणा सतर्क राहून पुढील उपाययोजना करण्यास सक्षम राहतील. बावनथडी व चौराई या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दैनंदिन पडणाऱ्या पावसाची माहिती सुद्धा दोन्ही राज्यांनी एकमेकांना कळवावी. छिंदवाड्याचे जिल्हाधिकारी सौरव कुमार सुमन यांनी चौराई सिंचन प्रकल्पाची साठवणूक क्षमता तसेच पावसामुळे निर्माण झालेला पाणीसाठा याबद्दल माहिती दिली. या प्रकल्पातील पाणीपातळीबाबत तोतलाडोह प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्यांना नियमित माहितीचे आदान-प्रदान करण्यात येत असल्याचे सांगितले. सिवनीचे जिल्हाधिकारी डॉ. राहुल फटिंग यांनी संजय सरोवर या प्रकल्पामध्ये उपलब्ध जलसाठा तसेच अतिवृष्टीमुळे दैनंदिन होणारी वाढ याबाबत जिल्हा प्रशासन तसेच केंद्रीय जल आयोगाकडे माहितीचे आदान-प्रदान करण्यात येत असल्याचे सांगितले. जबलपूरचे विभागीय आयुक्त बी. चंद्रशेखर यांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्यांना पूर परिस्थिती तसेच अतिवृष्टीबाबतच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यात येत असून यासंदर्भात प्रकल्पामधील जलसाठ्याच्या बदलाची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा तात्काळ देण्यात येते. यासंदर्भात चांगला समन्वय वाढविण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. अतिवृष्टी, पूर परिस्थिती तसेच प्रकल्पामधून पुराचे पाणी सोडण्यासंदर्भात माहिती देणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली असून चोवीस तासापूर्वी पूर परिस्थितीची माहिती उपलब्ध करुन देण्यात येईल. नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती, वित्त व मनुष्यहानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याचे नागपूर विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले. *****

Tuesday 27 July 2021

डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्यामुळे तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करा - प्राजक्ता लवंगारे-वर्मा

· डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होणार नाही, याची खबरदारी घ्या · कोरडा दिवस पाळण्याला प्राधान्य · साचलेले पाणी आढळल्यास संबधितांवर कठोर कारवाई · जिल्ह्यात डेंग्यूच्या 374 रुग्णांची नोंद · बालकांमध्ये डेंग्यूचे रुग्ण
नागपूर, दि. 27 : डेंग्यू आजाराचे रुग्ण जिल्ह्यात वाढत असून, विशेषत: लहान मुलांमध्येसुद्धा हे प्रमाण असल्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होणार नाही. तसेच घर व परिसरात पाणी साचणार नाही, याची खबरदारी घेतानाच डेंग्यूच्या आजारावर प्रतिबंध करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे केले. नागपूर जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे 374 रुग्ण आढळले असून, यामध्ये ग्रामीण भागात 212 तर शहरातील 162 रुग्णांचा समावेश आहे. डेंग्यूच्या नियंत्रणासाठी महानगरपालिका तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेने तत्काळ उपाययोजना करण्यासोबतच लोकजागृतीला प्राधान्य द्यावे, असे निर्देश यावेळी विभागीय आयुक्तांनी दिलेत. डेंग्यू नियंत्रणासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा दैनंदिन अहवाल सादर करण्यासंदर्भातही संबंधित यंत्रणांना यावेळी सूचना देण्यात आल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात डेंग्यू आजाराच्या नियंत्रणासोबतच कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात टास्क फोर्सची बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी विमला आर, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायसवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. प्रकाश देव, टास्क फोर्सचे डॉ. मिलींद भृशुंडी, डॉ. सरनाईक, इंदिरा गांधी महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता तसेच डॉ. अभिमन्यू निसवाडे, डागा रुग्णालय, एम्स तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढत असून, यामध्ये लहान मुलांचाही समावेश असल्यामुळे डेंग्यू डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी कोरडा दिवस पाळण्यासोबतच विविध उपाययोजनांबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना करताना विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या की, ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत, त्या भागातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करावे. ज्या घरामध्ये पाणी साचलेले आढळेल अशा घरांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करावी. नागरिकांनीही आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळून घरातील संपूर्ण भांडे रिकामे करावेत. तसेच कुलर व ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साठू शकते, अशा सर्व भागात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागात 212 रुग्ण आढळले असल्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी तसेच खंडविकास अधिकारी यांनी तालुकानिहाय विशेष अभियान राबवावे. नागपूर ग्रामीण तसेच उमरेड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण असल्यामुळे विशेष दक्षता घ्यावी. नागपूर शहरातील नागरिकांसाठी महानगरपालिकेने विशेष अभियान राबवावे, असे निर्देशही यावेळी बैठकीत देण्यात आले. जिल्ह्यात डेंग्यूसह विविध आजारांच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असून, जिल्हा प्रशासनाने तसेच महानगरपालिकेने पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, अशी सूचना करताना विभागीय आयुक्तांनी सामाजिक संस्था तसेच युवकांनी रक्तदानासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. रक्तदान शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे संपूर्ण सहकार्य असल्याचे यावेळी सांगितले. *****

Saturday 24 July 2021

पर्यावरणाचे संतुलन राखून शाश्वत विकास व्हावा - विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा

नागपूर दि.24 - भविष्यातील गरजा लक्षात घेवून नैसर्गिक संसाधनाचा वापर सुयोग्य रितीने करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत नागरिकरणाच्या प्रक्रियेचा विचार करतांना शाश्वत विकास व पर्यावरणाचे संतुलन यांचा समन्वय साधावा, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे केले. ‘पर्यावरण व वने’ या विषयावर वनराई फाऊंडेशनमार्फत आज एक दिवसीय कार्यशाळा शंकरनगर येथील राष्ट्रभाषा संकुलातील देव संवाद कक्षात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्रीमती लवंगारे-वर्मा बोलत होत्या. यावेळी वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे, प्रधान मुख्य वनसरंक्षक ( वन्यजीव ) सुनील लिमये, पेंच वनक्षेत्राचे मुख्य वनसरंक्षक डॉ. रवी गोवेकर, निसर्ग प्रेमी ॲङ फिरदोस मिर्झा,नीरी वायू प्रदुषण नियंत्रण विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख डॉ. के. व्ही. जॉर्ज, नीरी संसाधन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख डॉ. नितीन लाभशेटवार आदी यावेळी उपस्थित होते. पर्यावरणाच्या शाश्वत विकासाबाबत श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या, आज माणूस प्रचंड प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. परंतू ही प्रगती करतांना निसर्गाचे संतुलन ढळणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. निसर्गचक्रामध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे महापूर ,दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत वाढ होत आहे. अशा आपत्तीग्रस्त कुटुंबियांचे पर्यायी स्थलांतर करणे सोपी बाब नाही. पर्यावरण संवर्धनासाठी लोकांचा सहभाग तसेच श्रमदान गरजेचे आहे. ‘मी आणि माझा परिसर’ येथील पर्यावरणाच्या संवर्धनाची जबाबदारी माझ्यावर आहे, हा विचार प्रत्येकाने अंगी बाळगून कृती करणे गरजेचे आहे. पाण्याची नासाडी, विजेचा अनावश्यक वापर, प्लास्टीकचा अमर्यादित वापर, अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपले विश्व जवळ येत आहे तसे क्लिष्टही होत आहे. आपण जे करतो त्याचा परिणाम इतरांवर होतो. यासाठी प्रत्येकानेच पर्यावरणाविषयी संवेदनशील असणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. प्रशासनातर्फे पर्यावरण संवर्धनासाठी विविध योजना राबविल्या जातात. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करुन पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कोविड -19च्या साथीमुळे आयुष्य जगण्यासाठी फार कमी गरजा आवश्यक असल्याचे सर्वांनाच जाणवले आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. पर्यावरण संवर्धनासाठी ‘सुयोग्य नियोजन’ ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे सांगून श्री. गांधी म्हणाले, काही भागात दुष्काळ तर काही भागात महापूर अशी परिस्थिती निर्माण होते. यासाठी पावसाचे पाणी वाहून न जावू देता ते जमिनीत जिरविणे गरजेचे आहे .तसेच दिवसेंदिवस नदीच्या पात्रांची रुंदी वाढत आहे परंतु खोली कमी होत आहे. यामुळे नदीला पूर आल्यास वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचे प्रमाण वाढत आहे. जमिनीची धूप थांबविणे गरजेचे आहे.जमिनीचा एक इंच जाडीचा थर तयार होण्यासाठी खूप वर्षे लागतात. ही धूप थांबविण्यासाठी पावसाळ्यात मोकळया जागा, टेकडया, दऱ्या अशा ठिकाणांवर फळांच्या बिया फेकाव्यात. काही बिया रुजतात व नवीन रोपे तयार होतात. या अशा साध्या प्रयोगानेही आपण वृक्षारोपण करुन वनराई निर्माण करू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकेत श्री. वटे यांनी जागतिक पर्यावरणाचे प्रश्न व उपाय यासबंधी माहिती दिली. जैवविविधेतेचे नुकसान, जलसंसाधनाचा अपुरा साठा, अन्न सुरक्षा, जीवाष्म इंधनाचे विक्षेपण, वेगाने वाढणारा ऊर्जा वापर, शहर आणि पर्यावरण याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेत श्री. सुनील लिमये यांनी ‘वनांचे संवर्धन आणि वन्यजीव संरक्षण व त्याचा प्रसार’ ,ॲङ मिर्झा यांनी ‘पर्यावरण संवर्धनात लोकसहभागाचे महत्त्व’, डॉ. के.व्ही.जॉर्ज यांनी ‘नागपूर शहरातील वायू गुणवत्ता स्थिती व्यवस्थापन’ ,डॉ. लाभशेटवार यांनी ‘हरित वायू उत्सर्जन व नियंत्रण’ यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन वनराई फाऊंडेशनचे समन्वयक नितीन जतकर तर सचिव निलेश खांडेकर यांनी आभार मानले. ******

Tuesday 20 July 2021

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ अंतर्गत रत्नागिरी येथे सुरू होणाऱ्या उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करावे - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 20 : कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, नागपूर अंतर्गत रत्नागिरी येथे उपकेंद्र तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून उपकेंद्राच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केल्या. आज मंत्रालयात याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला रत्नागिरी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ कुलगुरू श्रीनिवास वरखेडी, संबंधित अधिकारी उपस्थित होते. श्री.सामंत म्हणाले, उपकेंद्रासाठी लागणारी जमीन उपलब्ध करून देण्यात येईल.या उपकेंद्राचे काम तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. रत्नागिरी उपकेंद्र स्वयंपूर्ण होण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ यांच्याशी समन्वय करून बीएस्सी.हॉस्पिटँलिटी स्टडीज हा अभ्यासक्रम सुरू केल्यास रत्नागिरी परिसरातील पर्यटन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना लाभ होईल. तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन प्रशिक्षीत मनुष्यबळाची निर्मिती होईल. या उपकेंद्रामध्ये सन 2021-22 करिता एम.ए.(संस्कृत,योगशास्त्र,ज्योतिषशास्त्र), बी.ए.(योगशास्त्र), बीसीसीए.पदविका (संस्कृत,योग, वास्तुशास्त्र) सन2022-23पासून सुरू होणार अभ्यासक्रम बी. एससी.(हॉपिटँलिटी स्टडीज),बी.बी.ए,बी.ए,(सव्हील सर्व्हिसेस, कौशल्य विकासोन्मुख अभ्यासक्रम.सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. 000

बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या माहितीमधील दुरुस्तीचे प्रस्ताव पाठवा

नागपूर, दि. 20: सन 2021 परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत 3 एप्रिल रोजी ऑनलाइन प्रवेशपत्र देण्यात आली आहेत. त्यात काही दुरुस्ती असतील त्या विद्यार्थ्यांच्या दुरुस्तींचे प्रस्ताव शाळा - महाविद्यालयांनी तात्काळ पाठवावेत, असे शिक्षण मंडळाकडून कळविण्यात आले आहे. प्रवेशपत्रामध्ये विषय, माध्यम, फोटो, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, नाव, जन्मतारीख, इतर तत्सम दुरुस्ती असल्यास याबाबत संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलित पध्दतीप्रमाणे संबंधित विभागीय मंडळाकडे दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करणेबाबत संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व सर्व माध्यमिक शाळा यांना आपल्या स्तरावर सूचित करावे. सर्व विभागीय मंडळांनी यासंदर्भातील दुरुस्ती विभागीय मंडळातील, निर्धारित गणकयंत्र विभागामार्फत करून राज्य मंडळाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्य मंडळाच्या गणकयंत्र विभागाकडे पाठवाव्यात, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. *****

इयत्ता 11 वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा 21 ऑगस्ट रोजी

नागपूर, दि. 20: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षा आयोजन शनिवार दि. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेदरम्यान घेण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2021-22 मधील 11 वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यासाठी पूर्णतः ऐच्छिक स्वरूपाची आहे. ही परीक्षा ऑफलाईन स्वरुपाची असून ती राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण किंवा प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र सादर करणे आवश्यक आहे. आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत दि. 26 जुलैपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे आवेदनपत्र भरण्यासंदर्भात तसेच सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी तपशीलवार सूचना मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. *****

Sunday 18 July 2021

आयकर पात्र निवृत्तीवेतनधारकांनी पँन कार्ड प्रत, भ्रमणध्वनी क्रमांक सादर करावेत

नागपूर, दि. १७: वरिष्ठ कोषागार कार्यालयांतर्गंत निवृत्तीवेतन घेणा-या सर्व आयकर पात्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी ज्याचे निवृत्तीवेतनापासून मिळणारे वार्षिक उपन्न हे साडेपाच लाखापेक्षा जास्त आहे आणि अद्यापही कोषागार कार्यालयात पँन कार्डची झेराक्स प्रत व दूरध्वनी क्रमांक सादर केले नाहीत, त्यांनी पॅन कार्डची झेराक्स प्रत व दूरध्वनी क्रमांक सादर करावेत. ते nagpur@zillamahakosh.in ईमेलद्वारे किंवा कोषागार कार्यालयात लवकरात लवकर सादर करावे अन्यथा निवृत्तीवेतनातून सरसकट २० टक्के दराने टीडीएस कपात करण्यात येईल व फॉर्म १६ देता येणार नाही, असे प्र. वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे. ******

Thursday 15 July 2021

आर्थिक व सामाजिक योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याला प्राधान्य - रवींद्र ठाकरे

आदिवासी विकास अपर आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला नागपूर, दि. 15 : अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना तसेच विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या प्रत्यक्ष लाभाच्या योजना पोहचविण्यासोबतच आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासाला प्राधान्य राहणार असल्याचे नागपूर विभागाचे नवनियुक्त आदिवासी अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. अमरावती रोडवरील आदिवासी विकास भवन येथे अपर आयुक्त म्हणून श्री. ठाकरे यांनी नवीन पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. यावेळी आदिवासी विकास उपायुक्त दशरथ कुळमेथे, सहायक आयुक्त नयन कांबळे व विलास सावळे उपस्थित होते. नागपूर विभागातील आदिवासी अपर आयुक्त म्हणून रवींद्र ठाकरे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. यापूर्वी नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून रवींद्र ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर राज्यात कोरोनामुळे उद् भवलेल्या परिस्थितीत नागपूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी पहिल्या व दुसऱ्या लाटेत केलेल्या कामामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा पुरवठा, रेमडेसिव्हिर व त्यानंतर म्युकरमायकोसिसची परिस्थितीसुद्धा कौशल्यपूर्ण पद्धतीने हाताळली आहे. मदर डेअरीच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी रवींद्र ठाकरे यांनी पुढाकार घेवून सुरु केलेल्या दूध संकलनामध्ये शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून विदर्भातील शेतकरी दूध उत्पादनाकडे वळले असून दररोज मदर डेअरीच्या माध्यमातून दोन लाख लिटरपेक्षा जास्त दुधाचे संकलन होत असून पहिल्यांदाच विदर्भातील मुंबई व दिल्लीसाठी दूध पाठविण्याला सुरुवात झाली आहे. शेतकरी बचत गट तसेच शेतकऱ्यांच्या कंपन्यांची स्थापना करुन संत्र्यासह विविध फळे व भाजीपाला निर्यातीला प्रोत्साहन दिले आहे. वनामतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणालाही रवींद्र ठाकरे यांनी सुरुवात केली आहे. आदिवासी विकास विभागातही रोजगारासह प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यासाठी मानस असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले. *****

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा अद्ययावत ठेवा - विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

· सुविधांचा घेतला आढावा · सामान्य रुग्णालयाला भेट · सनफ्लॅग प्राणवायू प्रकल्पाची पाहणी · जम्बो कोविड रुग्णालयाच्या जागेची पाहणी भंडारा दि.14- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्हा प्रशासनाने मूलभूत आरोग्य सुविधांचे योग्य नियोजन करून जिल्ह्याला कोरोनामुक्तीच्या वाटेवर आणून ठेवल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक करतांनाच दुसऱ्या लाटेत जाणवलेल्या उणिवा दूर करून संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा अद्ययावत व सज्ज ठेवा, अशा सूचना विभागीय आयुक्त प्राजक्तायांनी दिल्या. विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आल्या असता त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, नितीन सदगीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, तहसीलदार अक्षय पोयाम, साहेबराव राठोड, यावेळी उपस्थित होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता ऑक्सिजन निर्मितीमध्ये जिल्हा स्वयंपूर्ण व्हावा यासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात येत आहे. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्ट व 70 खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी सामान्य रूग्णालयात अद्ययावत व सर्व सोई सुविधायुक्त विशेष वार्ड तयार करण्यात आले आहेत. या सर्व सुविधांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. सामान्य रुग्णालयातील प्राणवायू प्रकल्प, पेडियाट्रिक वार्ड, कोविड वार्ड, आयसीयू वार्ड, आरटीपीसीआर चाचणी केंद्र आदी ठिकाणी भेट देऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सामान्य रुग्णालयात वैद्यकीय सोई सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. तिसऱ्या लाटेच्या पूर्व तयारीची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोविड काळात उत्तम काम केल्याबद्दल श्रीमती लवंगारे यांनी आरोग्य विभागाची प्रशंसा केली. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी निर्माण झाली होती. सनफ्लॅग कंपनी मधील ऑक्सिजन प्रकल्पातून ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता. या प्रकल्पाला आज त्यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे तिसऱ्या संभाव्य लाटेची पूर्वतयारी म्हणून सनफ्लॅग कंपनी जवळ 500 खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या जागेची पाहणी करून त्यांनी सूचना केल्या. हे जम्बो रुग्णालय निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कोरोनामुक्त गाव करण्यावर भर द्या कोरोनामुक्त गाव करण्यावर भर देण्यात यावा असे सांगून श्रीमती लवंगारे म्हणाल्या की, कोरोनामुक्त गावात शाळा सुरू होतील असे नियोजन करावे. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू करणे आवश्यक असून सर्व खबरदारी घेऊन याबाबत पावले उचलावीत. क्रियाशील रुग्ण नाहीत तसेच शून्य रुग्ण असलेल्या गावांना प्राधान्य देण्यात यावे. धान खरेदी व धान भरडाईचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. धान भरडाई बाबत मिलरची बैठक घेतली असून हा विषय मार्गी लागला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बारदाना कमी आहे तो पुरेसा मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. कोरोना मुळे बारदाना उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनी उत्पादन कमी केले. ही खरी अडचण असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गोसेखुर्द पुनर्वसन, सातबारा संगणकीकरण, रेती घाट लिलाव, नगरपालिका कर वसुली, लसीकरण यासह विविध विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी उपस्थित होते. रूट मार्च चे कौतुक कोरोनाची 'ब्रेक द चैन' करण्यासाठी शासनाने काही निर्बंध शिथिल केले असता बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने भंडारा शहरासह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 'रूट मार्च' द्वारे जनजागृती केली. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात यश आले. लोकांमध्ये जागृती झाली. त्याचाच परिणाम म्हणून आज जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. या प्रयोगाची श्रीमती लवंगारे यांनी प्रसंशा केली. जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांचे कौतुक केले.

डेंग्यू वाढतोय काळजी घ्या - आर. विमला

· कोरडा दिवस पाळा · विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा - 15 ते 30 जुलै नागपूर, दि. 14 : डेंग्यूचा आजार जिल्ह्यात वाढत असल्याने नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा तसेच घरात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आर विमला यांनी केले आहे. अनियमित पावसामुळे साथीचे आजार सुध्दा वाढत आहे. यामध्ये लहान मुलांची काळजी घ्यावी व घरात असलेले कुलर्स तात्काळ काढावे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाड्यानिमित्ताने राबवायच्या विविध योजना संदर्भात जिल्हा टास्क फोर्सची बैठक आज आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. उप मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. दावल साळवे, अमित टंडन, डॉ. शैलजा गायकवाड, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी सुरेखा चौबे उपस्थित होते. पंधरवाडा राबवितांना कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचा अवलंब करावा. याकामासाठी आशा कार्यकर्तींना प्रत्येकी शंभर रुपये मानधन देण्यात येणार असून आशा सेविकांनी घरोघरी जावून माहिती संकलित करावी, असे त्यांनी सांगितले. घरातील साचलेले पाणी काढून टाकावे. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. तसेच स्वच्छतेवर जास्त भर देण्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर, हातांची स्वछता व सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा. पालक आणि काळजी वाहकांमध्ये अतिसार तसेच कोविड प्रतिबंधक आणि व्यवस्थापन विषयक योग्य वर्तणूक बिंबवणे आवश्यक आहे. अतिसार असलेल्या बालकांमध्ये ओआरएस आणि झिंकच्या वापराबाबतचे प्रमाण जास्तीत जास्त होईल याची खबरदारी घ्यावी. सामाजिक व आरोग्य संस्था स्तरावर बालकांमधील अतिसाराच्या रुग्णांचे व्यवस्थापन काळजीपूर्वक होत असल्याबाबत खात्री करावी. जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतमार्फत गावात डासअळी नाशक फवारणी तसेच धुर फवारणी व सार्वजनिक स्वच्छता करावी. रुग्णाची माहिती घेवून तात्काळ उपाययोजना सुरु कराव्या. गटसभा, पोस्टर्स, पॉम्पलेट, बॅनर दंवडी, तसेच सोशल मिडियाद्वारे जनजागृती करण्याचे निर्देश श्रीमती आर. विमला यांनी दिले. अनियमित पावसामुळे नागरिकांनी घरातील कुलर्स त्वरित काढावेत. कुलर्समधील पाणी काढण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सूचना कराव्या. त्यामुळे डेंग्यू नियंत्रणास मदत होईल, असे त्या म्हणाल्या. जिल्ह्यात वाढत असलेला डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी संबंधितांना दिल्या. विशेषत: शहरात व ग्रामीण भागात संशयित डेंग्यू रुग्ण आढळल्यास तात्काळ रुग्णाचे रक्तजल नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठवा. डबक्यात जमा झालेले पाणी फेकून द्यावे. या पाण्यात डास आढळल्यास किटकनाशक घालून तसेच पाणी फेकून डास उत्पत्ती नष्ट करावी, असे त्यांनी सांगितले. पंधरवाडा राबविण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर, नर्स व आशांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तांबे यांनी सांगितले. यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या पंधरवाड्यात आशा सेविकांमार्फत बालकांची यादी तयार करण्यात येऊन अतिसाराच्या उपचारासाठी ओआरएस व झिंक कॉर्नर स्थापन करण्यात येणार आहे. तसेच ओआरएसचे द्रावण तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. कॉर्नरमध्ये ओआरएस पाकिटे व झिंकच्या गोळया उपलब्ध करुन देण्यात येणार असून प्रत्येक तालुक्याचे संनियंत्रण व मुल्यमापन करण्यासाठी तालुकास्तरावर एक अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे श्री. तांबे यांनी सांगितले. या बैठकीस मनपा वैद्यकीय अधिकारी, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. ****

बालकांच्या आरोग्य रक्षणासाठी न्युमोकोकल लसीकरण अत्यावश्यक - जि. प. अध्यक्षा रश्मी बर्वे

नागपूर, दि. 14 : न्युमोकोकल कॉज्यूगेट लसीमुळे बालकांना निमोनिया आजारापासून संरक्षण मिळणार आहे. पालकांनी बालकांना लस देत लसीकरणास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी केले आहे. जिल्ह्यात न्युमोकोकल कॉज्यूगेट लसीकरणाची सुरुवात कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रापासून करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. पारशिवनी पंचायत समिती सभापती मीनाताई कावळे, सरपंच तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य बळवंत पडोळे, सतीश घारड, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. दावल साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. लसीकरणाचे महत्व पटवून देताना निमोनियापासून लहान बाळांच्या संरक्षणासाठी त्यांना न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन देणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील पालकांनी पुढाकार घेऊन लसीकरणास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. जास्तीत जास्त बालकांचे लसीकरण करणे हे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. न्युमोकोकल कॉज्यूगेट लसीचे महत्व सांगताना या लसीमुळे लहान मुलांना निमोनिया मेनिनजायटीस, बॅक्टेरीयल सेक्सीस, ओरायसीस आणि सायनूसायटीस या आजारापासून संरक्षण मिळते. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रात ही लस उपलब्ध असून मोफत दिली जाते. या लसीकरणाचा पालकांनी लाभ घ्यावा, असे डॉ. साळवे यांनी सांगितले. ****

Saturday 10 July 2021

कोरोना‍ नियंत्रण आणि विकासकामांवर भर देणार - आर. विमला

जिल्हाधिकारी पदाचा स्विकारला पदभार नागपूर, दि. 10: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविणे आणि जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देणार असल्याचे नूतन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज सकाळी येथे पदभार स्विकारल्यानंतर सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्विकारल्यानंतर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पोटनिवडणूक स्थगित झाली असल्यामुळे निवडणूकविषयक कामकाज आणि कोविड नियंत्रणाबाबत आढावा घेतला. अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरिष पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, उपजिल्हाधिकारी जगदीश काटकर, आशिष बिजवल, ज्ञानेश भट, श्रीमती सुजाता गंधे, शितल देशमुख, विजया बनकर, हेमा बढे, मिनल कळसकर, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, अन्नधान्य वितरण अधिकारी अनिल सवई, अधीक्षक निलेश काळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, जिल्हा प्रशासन अधिकारी अतुल पंत उपस्थित होते. जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण स्थितीची माहिती देताना टेस्टिंग, कॉन्टँक्ट ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटवर भर दिल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आल्याचे डॉ. पातूरकर यांनी सांगितले. मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्यासह म्युकरमायकोसिस नियंत्रणावर प्रशासनाने भर दिला आहे. तसेच केंद्र शासनाकडून दोन ऑक्सिजन प्लॉट उभारण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिका-यांना देण्यात आली. अल्पपरिचय श्रीमती आर. विमला या 2009 च्या तुकडीच्या आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी राज्य ग्रामीण आजीविका मिशन (एमएसआरएलएम) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. गेल्या 27 वर्षात श्रीमती विमला यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यात लघु उद्योग उद्योग विकास महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, करमणूक शुल्क आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन उपायुक्त आणि दादासाहेब फाळके फिल्म सिटीच्या सहव्यवस्थापक संचालक आदी पदांचा समावेश आहे. राज्यातील मनरेगाच्या अंमलबजावणीतही त्यांनी उपसचिव म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महिला सशक्तीकरणाच्या कार्यात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामीण महाराष्ट्रात महिला सबलीकरणासाठी त्यांनी 2016 पासून कार्य केले असून, एमएसआरएलएमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विमला यांनी स्वयं-सहायता गट (एसएचजी) आणि समुदाय-आधारित संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात बदल घडवून आणविले आहे. ******

Thursday 1 July 2021

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना विधान भवन येथे अभिवादन

हरित क्रांतिचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवन येथे आमदार निलय नाईक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक अभियंता संजय सतदेवे, कक्ष अधिकारी कैलास पझारे, प्रा. मोहन चव्हाण, तुकाराम चव्हाण, शिक्षणाधिकारी श्रीराम चव्हाण, अजय पाटील, श्रीकांत राठोड, अजय चव्हाण, धुलसिंग राठोड, उदल राठोड, मुकुंद्र आडेवार, डॉ. के. झेड. राठोड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

विभागीय आयुक्त कार्यालय हरित क्रांतिचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त चंद्रभान पराते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहाय्यक आयुक्त हरीश भामरे, तहसीलदार अरविंद सेलोकर, प्रताप वाघमारे, नायब तहसीलदार आर. के. दिघोळे यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय हरित क्रांतिचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी श्रीमती विजया बनकर, तहसीलदार सुधारकर इंगळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. *****