Friday 26 February 2021

शहीद बडोले यांच्या कुटुंबियांना १ कोटीची आर्थिक मदत नागपूर दि.२६ : जम्मू कश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलेले शहीद सहायक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले यांच्या कुटुंबीयांना आज ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कोरोना संसर्ग संदर्भात आढावा बैठक झाल्यानंतर पालकमंत्री श्री. नितीन राऊत यांनी शहीद बडोले यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. शहीद बडोले यांनी अतिरेक्यांशी लढताना दाखविलेले साहस, कर्तव्यपरायणता आणि बलिदानाकरिता त्यांची आठवण कायम केली जाणार आहे. समाजाला त्यांच्या या राष्ट्रप्रेमाचे ऋण कधीही पूर्ण करता येणार नाही, त्यांच्या कुटुंबीयांसोबत शासन कायम असेल, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यावेळी दिनांक 24 सप्टेंबर 2020 रोजी शहीद नरेश उमराव बडवणे यांनी दाखविलेल्या शौर्याची आठवण करून दिली. 24 सप्टेंबर रोजी नरेश उमराव बडोले हे आपल्या कंपनीसह श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमान तळाकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाच्या सुरक्षेत तैनात होते. अचानक सुरू झालेल्या गोळीबारात त्यांना वीरमरण आले. तत्पुर्वी त्यांनी हा हल्ला परतवताना आपल्या सहासाचे दर्शन घडविले. यामध्ये त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात त्यांची वीरपत्नी श्रीमती प्रमिला नरेश बडोले व दोन मुली आहेत. आज पालक मंत्री श्री राऊत यांनी त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सोबतच शासनामार्फत एक कोटी रुपयांचा धनादेशही बहाल केला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर श्रीमती शिल्पा खरपकर आदी उपस्थित होते. ******
दुचाकी वाहनांसाठी एमएच-49-बीक्यू मालिका 2 मार्चपासून नागपूर, दि. २६: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे एमएच-49-बीपी ही दुचाकी वाहनासाठी असलेली नोंदणी क्रमांकाची मालिका संपत आल्यामुळे आता दुचाकी वाहनासाठी एमएच-49-बीक्यू ही नवीन मालिका दिनांक 2 मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. या मालिकेतून आकर्षक वा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करायचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, पत्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र, पॅनकार्ड व पसंतीचा नोंदणी क्रमांकासाठी उप प्रादेशिक कार्यालय (पूर्व), नागपूर यांच्या नावे काढलेल्या फीच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासहित दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 या कालावधीत या कार्यालयात सादर करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास शासनाच्या अधिसूचनेनुसार नियमित फी व्यतिरिक्त सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्यास सदर नोंदणी क्रमांक देण्यात येईल. दुचाकी वाहन मालिकेतून इतर वाहनांसाठी तिप्पट शुल्क भरुन आकर्षक वा पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करता येईल व अशा अर्जदारास प्राधान्य देण्यात येईल. आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यासाठीची कार्यपद्धती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावलेली असून अनधिकृत व्यक्तीकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी संबंधित वाहनधारकांनी स्वत: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, (पूर्व) डिप्टी सिग्नल, नागपूर येथे अर्ज करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (पूर्व) यांनी केले आहे.
‘स्मार्ट व्हिलेज'च्या धर्तीवर बिना गावाचे पुनर्वसन करणार - पालकमंत्री •मेकोसाबाग येथील भूखंड मालकी वाटप पट्ट्यासंदर्भात चर्चा • मिहान पुनर्वसनासंदर्भातील सुनावणी जलदगतीने घेण्याच्या जिल्हाधिका-यांना सूचना • मासे विक्री संघाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट नागपूर, दि. २६: रस्ते, वीज, पाणीपुरवठा, गडरलाईन, बगीचे आदि सर्व पायाभूत सोयी-सुविधांनी युक्त 'स्मार्ट व्हिलेज'च्या धर्तीवर बिना गावाचे पुनर्वसन करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांशी संबंधित आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मिहानचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, उपजिल्हाधिकारी जगदिश काटकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वेस्टर्न कोल्ड फिल्ड (वेकोलि)ने सीएसआर फंडामधून बिना येथील पायाभूत सुविधा निर्मितीसाठी पुढाकार घेत ही विकासकामे जलदगतीने पूर्णत्वास न्यावीत. राज्य शासन आवश्यकता असेल तिथे मदत करेल, असे सांगून डॉ.राऊत म्हणाले की, या गावाचे पुनर्वसन करताना जागेचे १२२ कोटी रुपये महानिर्मितीने वेकोलिला द्यावेत. येथून निघणारा कोळसा सामंजस्य करार करून कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, महाजेनकोला नोटीफाइड दरानेच देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. गतवर्षी नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे गावालगतचा काही भाग खचला असून, वेकोलिने सीएसआर फंडातून गावालगतही मातीचा भराव टाकावा. त्यामुळे पावसाळ्यात नदीच्या पुरामुळे धोका निर्माण होणार नाही. त्यासाठी वेकोलि व राज्य शासनाच्या महसूल विभागाचे अधिकारी संयुक्त पाहणी करतील आणि पुढील सूचना देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना डॉ. राऊत यांनी दिल्या. मेकोसाबागेतील ख्रिश्चन कॉलनी येथील भूखंडाच्या मालकी हक्काचे पट्टेवाटपासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. येथील जमिनीच्या काही भागावर प्लॉट पाडण्यात आले असून, ते नियमित करावेत, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. तसेच येथे असलेल्या चर्चला नोटीशी पाठवाव्यात, त्यानंतरही चर्चने जागा खाली करून न दिल्यास राज्य शासनाकडून करण्यात येणा-या कारवाईला सामोरे जावे. कारण नागपूर महानगरपालिकेला येथून कोणताही कर मिळत नसून, या जागेच्या शासनदरबारी नोंदी घेतल्यास महापालिकेला कर मिळेल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. मिहान प्रकल्पांतर्गंत शिवणगाव पुनर्वसनाबाबत घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सुनावण्या जलदगतीने घ्याव्यात तसेच त्या नोंदी घेऊन येथील पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी दिले. मासे विक्रेता संघाच्या शिष्टमंडळासोबत यावेळी चर्चा करण्यात आली असून, शहरातील मासे विक्रेत्यांना सर्व सोयीसुविधांनी युक्त असे गाळे रेल्वेस्थानकाजवळील परिसरात उपलब्ध करून द्यावेत. तसेच घाऊक विक्रेत्यांसाठी सर्व सोयीसुविधा ओट्यांची सोय करून देण्याबाबत महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली. *****
कोरोना वाढतोय...शनिवार-रविवार गरज नसेल तर घराबाहेर पडू नका -डॉ. नितीन राऊत 'मी जबाबदार ' मोहीम राबवा ; कोरोना प्रोटोकॉल पाळा नागपूर, दि. २५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मी जबाबदार', मोहीम महाराष्ट्रात सुरू केली असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज नागपूरमध्ये सध्या आहे. रुग्ण संख्या सतत वाढत असून कोरोना शहरात वाढत आहे. त्यामुळे शनिवार व रविवार या दोन दिवशी सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवावी. नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडूच नये, असे आवाहन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. पालकमंत्र्यांनी आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर,नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. अविनाश गावंडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, , जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. सेलोकर, मनपा उपायुक्त राम जोशी व कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. नागपूर महानगरपालिका क्षेत्र व नागपूर ग्रामीण क्षेत्रांमधील आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा त्यांनी प्रामुख्याने आढावा घेतला. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये बेडची उपलब्धता, अतिदक्षता कक्ष, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धता, रक्तसाठ्याची उपलब्धता, मनुष्यबळाची उपलब्धता, कन्टेनमेंट झोनची सद्य:स्थिती, नियंत्रण कक्ष, रिअल टाईम बेड उपलब्धता, कोविड मित्राची तैनाती, आरोग्य पथकाच्या ग्रुप भेटीत झालेली वाढ, चाचण्यांची संख्या, सुपर स्प्रेडरच्या किती चाचण्या सुरू झाल्या, शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी द्यावयाच्या सूचना, जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या उपाय योजना, शनिवार-रविवार मार्केट बंद तयारी ठेवण्यासाठीच्या पूर्व तयारीसंदर्भातही आज सर्व विभागाकडून आढावा घेण्यात आला. महसूल, पोलीस, महानगरपालिका, प्रशासन, आरोग्य विभाग, शहरातील शाळा कॉलेजची सद्य:स्थिती, शहरातील खाजगी दवाखाने, तसेच मेयो व मेडिकलमधील आरोग्य विषयक स्थितीवरही यावेळी चर्चा झाली. नागपूर मध्ये सद्य:स्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी चिंता करू नये मात्र सोबतच 'मी जबाबदार ' मोहीम प्रत्येक नागरिकांनी घराघरात पाळावी, जेणेकरून प्रत्येक घरातील व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण केले जाईल. या बैठकीनंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रशासनाला निर्देश दिले. यामध्ये उद्या शनिवार व रविवार नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने दुकाने मॉल व गर्दीचे ठिकाण बंद ठेवण्याचे त्यांनी सांगितले. गरज नसेल तर कोणीही घराबाहेर पडू नये. मास्क न घालणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, चाचण्यांची संख्या सध्या तीनपट आहे. त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ करण्यात यावी. सुपर स्प्रेडर घटकांमध्ये हॉकर्सची तपासणी मोठ्याप्रमाणात करण्यात यावी. शाळा महाविद्यालये बंद असल्याबाबतची माहिती पालकांपर्यंत पोचविण्यात यावी. उद्योग समूहातील व व्यापारी प्रतिष्ठानमधील कामगारांचे लसीकरण करण्याची मोहीम आखण्यात यावी. पोलिसांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात यावे. मंगलकार्यालय, रिसॉर्ट बंद करण्यात आलेले आहेत. मात्र, घरी होणाऱ्या विवाहातील संख्येवर देखील नियंत्रण ठेवण्यात यावे, ज्या भागात ज्या बिल्डिंगमध्ये कोरोना बाधित आहे त्याच ठिकाणी कन्टेन्मेंट झोन करण्यात यावे, महानगरपालिका व पोलीस विभागाने कन्टेन्मेंट झोन व रेस्टोरेंट हॉटेल्स यावरील बंदीसंदर्भात निश्चित धोरण करावे. रात्री उशिरा हॉटेल्स खानावळी सुरू राहणार नाही याबाबत धोरण आखावे, मेयो, मेडिकल याठिकाणी यापूर्वीच्या सर्व व्यवस्था बहाल करण्यात याव्या. हॉस्पिटलमधील मनुष्यबळ गरजेनुसार वाढवावे. डाटा एंट्री मध्ये सुसूत्रता आणावी. लक्ष्मी नगर,धरमपेठ, हनुमान नगर, या भागातील वाढीव रूग्ण संख्येवर तातडीने नियंत्रण मिळवावे, नागपूर ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या पुन्हा वाढवावी. प्राथमिक आरोग्य केंद्रासोबतच मोबाईल व्हॅन मार्फत चाचण्या व्हाव्यात, सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कुठेच गर्दी जमणार नाही याची काळजी घ्यावी. या काळातील परीक्षांच्या ठिकाणी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. ****

Tuesday 23 February 2021

मजूरांची अंतरीम ज्येठतासूची प्रसिध्द नागपूर, दि.23 :- जिल्हास्तरावर रोजंदारी मजूरांची एकत्रित अंतरीम ज्येष्ठतासूची तयार करण्यात आलेली असून, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नागपूर कार्यालयाचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे. याबाबत ज्या रोजंदारी मजूरांना आक्षेप घ्यावयाचे असल्यास त्यांनी लेखी व पूराव्यानिशी आठ दिवसाचे आत संपर्क साधावा, असे सहाय्यक प्रशासन अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांनी कळविले आहे. 00000 --
माजी सैनिकांसाठी रोजगाराची संधी नागपूर, दि.23 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील माजी सैनिक विश्रामगृह, हिस्लॉप कॉलेज जवळ, सिव्हील लाईन्स, नागपूर यांचेसाठी माजी सैनिक प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरुपात एक अशासकीय विश्रामगृह पहारेकरी रुपये नऊ हजार नऊशे दोन या एकत्रित मानधनावर 175 दिवसांसाठी कंत्राटी पध्दतीने भरावयाचे आहे. इच्छुक माजी सैनिकांनी सैन्य सेवेतील मूळ कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र.1, तिसरा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता उपस्थित रहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे. 00000
क्षयरुग्णांची माहिती न दिल्यास खाजगी डॉक्टरांवर दाखल होणार गुन्हा नागपूर, दि.23 : कोणत्याही खाजगी रुग्णालयात उपचारास येणाऱ्या क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला देणे बंधनकारक करण्यात आले असून माहिती न देणाऱ्या खाजगी डॉक्टर्सवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ममता सोनसरे यांनी दिली. आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या अधिसूचनेनूसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद होऊन त्यांच्यावर उपचार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. क्षयरोगाचा प्रसार रोखणे व नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून निदान झालेल्या प्रत्येक रुग्णांची आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्थांनी क्षयरोग निदान करणाऱ्या राज्यातील सर्व पॅथालाजी, मायक्रोबायोलॉजी, प्रयोगशाळा रिव्हर्स, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते यांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करावी लागणार आहे. ज्या खाजगी प्रयोगशाळा, डॉक्टर, रुग्णालय, औषधी विक्रेते यांनी निदान झालेल्या क्षयरुग्णांची नोंदणी न केल्याचे दिसून आल्यास अशा संस्था व व्यक्तीविरुध्द क्षयरोग प्रसारास मदत भांदवि (45/1860) अन्वये कलम 269 व 270 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दोषी ठरलेल्या व्यक्तीस सहा महिने ते दोन वर्षापर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद आहे. 1 जानेवारीपासून अंमल क्षयरोग निदान व उपचारासंबंधी नव्या कायद्याची कडक अंमलबजावणी 1 जानेवारीपासून सुरु झाली आहे. त्यामुळे क्षयरोग निदान करणाऱ्या सर्व पॅथालाजी, मायक्रोबायोलॉजी, प्रयोगशाळा, रेडीओलॉजी, डॉक्टर व औषधी विक्रेत्यांना क्षयरोग विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. नव्याने आढळणारे रुग्ण व औषधी घेण्याची माहिती संबंधितांनी जवळचे आरोग्य केंद्र किंवा क्षयरोग कार्यालयास कळविणे बंधनकारक आहे, असे डॉ. दीपक सेलोकर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे. यास्तव खाजगी व्यावसायिक व रुग्णालये, औषध विक्रेते, रेडिओलॉजिस्ट व पॅथोलॉजिस्ट यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपणाकडे नवीन निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांची माहिती तात्काळ क्षयरोग पर्यवेक्षक व जिल्हा पीपीपएम समन्वयक यांच्या ईमेलवर प्रतीमहा कळविण्यात यावी, अधिक माहितीसाठी 1800116666 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 000000
कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा - डॉ. संजीव कुमार · कोरोना उपाययोजनाबाबत आढावा · गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करा · बाधितांच्या संपर्कातील प्रत्येकाची सक्तीने तपासणी नागपूर, दि.23 : कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढ असल्यामुळे बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेवून त्यांची प्राधान्याने कोविड तपासणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले. नागपूर जिल्ह्यात अत्यंत जोखमीचे बाधित तसेच कमी जोखमीचे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध वाढविणे आवश्यक असून, त्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व आरोग्य विभागाने संयुक्त मोहीम राबवून एका व्यक्तीमागे संपर्कात आलेल्या किमान दहा लोकांचा शोध घेवून त्यांची कोविड तपासणी करावी, असे निर्देशही यावेळी विभागीय आयुक्तांनी दिलेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबतचा आढावा डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, अप्पर जिल्हाधिकारी शिरीष पांडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आर.पी.सिंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, उद्योग सहसंचालक श्री. धर्माधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागात विशेष नागपूर जिल्हयात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच नियमांचे कठोर पालन करणे आवश्यक असल्याचे सांगताना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले की, जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक समारंभ यावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे सक्तीने पालन करताना ग्रामीण अथवा शहरी भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेतानाच प्रत्येक नागरिकाने सक्तीने मास्कचा वापर करावा. यासाठी पोलीस व महानगर पालिकेने संयुक्त मोहीम राबवावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेताना अत्यंत जोखमीचे व कमी जोखमीचे असलेले रुग्णांच्या संपर्कातील अत्यंत कमी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढत होत असून ती थांबवण्यासाठी किमान दहा ते पंधरा व्यक्तींचा शोध घेवून त्यांची तपासणी आवश्यक आहे. जिल्ह्यात 59 कंटोन्मेंट झोन असून या झोनचे मॉयक्रो प्लानिंग करुन आरटीपीसीआर व अँटीजेन तपासणीची संख्या वाढवावी, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिलेत. कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नये तसेच कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जनतेला केले आहे. फायर व सेफ्टी ऑडीट तात्काळ करा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, तसेच महानगरपालिकेच्या रुग्णालयांचे सेफ्टी व फायर ऑडीट प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे. कोविड रुग्णांसाठी अतिरिक्त सुविधा निर्माण केल्या आहेत. त्या इमारतींचेही फायर व सेफ्टी ऑडीट बंधनकारक आहे. सेफ्टी ऑडीटसाठी लागणारा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अथवा जिल्हा नियोजन विकास निधीमधून उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी अतिरिक्त निधीची मागणीसुध्दा प्राधान्याने करावी, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी बैठकीत दिलेत. जिल्ह्यात कोविड रुग्णांवर उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या सर्व रुग्णालयात ऑक्सीजनसह आवश्यक औषधींचा मुबलक पुरवठा असावा यासाठी नियोजन करावे. जिल्ह्यात विविध शासकीय व खाजगी रुग्णालयात एक हजारपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असून, रुग्ण संख्येतील अपेक्षित वाढ लक्षात घेवून त्याप्रमाणे नियोजन करणे आवश्यक असल्याचे महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. ग्रामीण भागात कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन करण्यात येत असून, मास्क न वापरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत. शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यात आले असून, कुठल्याही कारणासाठी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना महसूल तथा पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. नागपूर शहर व ग्रामीण भागात दररोज साडेसहा हजार आरटीपीसीआर तपासणी होत असून, त्यात दहा हजारापर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली. ******
खाण उद्योगात होत असलेला बदल आणि उद्योजकांसाठी संधी · शासकीय तंत्रनिकेतन येथे कार्यशाळा · विदर्भातील सहाशे विद्यार्थ्यांचा सहभाग नागपूर, दि. 23 : खाण उद्योगामध्ये होत असलेल्या बदलांचा तसेच संशोधनांचा वेध घेवून युवा उद्योजकांसाठी असलेल्या संधी या विषयावर शासकीय तंत्रनिकेतन येथे विदर्भातील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन संस्थांमध्ये खनिकर्म या विषयातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत खनिकर्म विषयात शिक्षण घेत असलेले 603 विद्यार्थी सहभागी झाले होते. खनिकर्म व खाण सर्वेक्षण विभाग, शासकीय तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने खाण उद्योगातील ‘अलीकडील ट्रेड आणि उद्योजकता संधी’ या विषयावर आयोजित एक दिवसीय वेबिनारमध्ये वेकोलीचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक दिवाकर गोखले, रॉकेट सिस्टिम्स ॲण्ड प्रोजेक्टचे संस्थापक मनोज गुऱ्हारीकर, युवा उद्योजक गौरव ब्राम्हणकर तसेच शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य व सहसंचालक डॉ. मनोजकुमार डायगव्हाणे उपस्थित होते. खाण उद्योगात नवीन उद्योजकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी देशात नव्याने विकसित होत असलेल्या उद्योगाकडे आकर्षित होवून स्वत:चा उद्योग सुरु करावा, असे आवाहन डब्ल्यूसीएलचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक दिवाकर गोखले यांनी केले. निसर्ग आणि खाण काम याचा उत्तम संतुलन राखण्याच्या दृष्टीने डब्ल्यूसीएलने हाताळलेल्या विविध इको संवर्धन प्रकल्पाची माहिती दिली. खनिकर्म पदविका अभ्यासक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. उद्योग क्षेत्रामध्ये परंपरागत उपलब्ध असलेल्या संधीपेक्षा नवसंशोधनावर आधारित उद्योग सुरु करण्यासाठी युवा अभियंत्यांनी पुढाकार घेताना या क्षेत्रातील अनुभव संपादन करण्यासाठी प्रत्यक्ष व्यवसायात काम करण्याची संधी उपलब्ध करुन देताना कुठेही भीती बाळगू नये, असे आवाहन मनोज गुऱ्हारीकर यांनी केले. यावेळी युवा उद्योजक गौरव ब्राम्हणकर यांनीही मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य तथा सहसंचालक डॉ. मनोजकुमार डायगव्हाणे यांनी उद्योग आणि संस्था सहकार्याच्या एकत्रिततेवर आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातच कामाच्या संस्कृतीत आणणे सोपी जाईल. तसेच समाजसेवेचे आणि उद्योगांना फायदा होण्याचे दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी डब्ल्यूसीएलने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. जीएचआरसीएसटी महाविद्यालयाच्या बीबीए विभागाच्या एचओडी डॉ. ज्योती समसरिया यांनी उद्योजकतेच्या आवश्यक बाबींवर ‘फर्स्ट फूट फॉरवर्ड’ सत्र आयोजित केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आयआयटी खडगपूर “भूमिगत खाणीत पावडर घटक सुधारण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आधारित संगणकीय मॉडेलिंग सिस्टम” या प्रोजेक्टसाठी पारितोषिक प्राप्त संस्थेच्या खनिकर्म विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. उद्योजकतेच्या उद्दिष्टांविषयी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे विभाग प्रमुख बी. जे. नायडू यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. राजेश्वरी वानखेडे, डॉ. रुपाली लोंढे, प्रा. जे. टी. रावण, प्रा. देवेंद्र सुरकार, प्रा. हेमंत शेंडे यांनी अथक प्रयत्न केले. सूत्रसंचालन डॉ. रुपाली लोंढे यांनी तर आभार प्रा. देवेंद्र सुरकार यांनी मानले. *****

Monday 22 February 2021

कोविड नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी सक्रीय सहभाग घ्यावा - रवींद्र ठाकरे काँटक्ट ट्रेसरचे काम महत्वाधीचे कोविड उपाययोजनाबाबत सावनेर येथे आढावा नागपूर, दि 22: जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी ‘माझे कार्यक्षेत्र माझा पुढाकार’ या प्रमाणे प्रशासनास सहकार्य करुन कोविड-19 प्रतिबंधात्मक उपायोजनेत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले. सावनेर व कळमेश्वर येथे जिल्ह्यातील वाढत्या कोवीड-19 च्या प्रादुर्भावामुळे कोविड उपाययोजनेबाबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज आढावा घेतला. जि.प.उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यानंतर कोविड उपाययोजनेसंदर्भातील अधिकारी व काँटक्ट टेसरची बैठक घेण्यात आली. नागपूर ग्रामीण नंतर सावनेर तालुक्याचा कोरोनावृध्दीमध्ये दुसरा क्रमांक आह. दररोज रुग्णांची संख्या वाढत असून तो आटोक्यात आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्वरीत कार्यवाही करा. जनमानसात लोकप्रतिनिधींनी संपर्क साधून लोकांना सर्दी, खोकला असल्यास तपासणी करण्यास सांगावे. त्याचे समुपदेशन करावे. खबरदारी न घेतल्यास मृत्युदरात वाढ होऊ शकते. काँट्रक्ट ट्रेसिंगसाठी दूध, भाजीपाला दुकान, सलून यांच्या याद्या मालक, नोकर,त्यांच्या संपर्कातील सर्व सदस्यांसहीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्रामीण भागात मायक्रो कन्टोंमेंट झोन स्थापन करण्यात येणार आहे. शिक्षण हे ऑनलाईनच राहणार आहे. कोरोना बाधितांनी घरातच राहावे, गृह विलगीकरणात असलेल्यांनी बाहेर पडू नये, घरी जागा नसल्यास त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येईल तसेच बाहेर फिरतांना रुग्ण आढळल्यास त्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना रोखण्यास नियमाचे कठोर पालन करणे आवश्यक आहे. नि:शुल्क तपासणी असल्याने नागरिकांनी न घाबरता तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कोविड-19 च्या नियमावलीनुसार मार्गदर्शक तत्वांचे आपणास पालन करायचे आहे.गर्दी वाढत आहे. समारंभात नियमांचे पालन होत नाही. मागील लॉकडाऊनप्रमाणे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याबाबत त्वरीत पावले उचलणे आवश्यक आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुंभेजकर यांनी सांगितले. चिचोली व खापरखेडा येथे जास्त रुग्ण संख्या आढळून आली असून नागरिकांनी कोविड नियमावलीचे तंतोतत पालन करणे आवश्यक आहे. लक्षणे असलेल्या लोकांवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधीचा नागरिकांशी जवळचा संबंध येत असल्याने कोविड तपासणी करण्यासाठी समुपदेशन करावे, असे श्री. कुंभेजकर म्हणाले. कॉन्ट्रक्ट टेसरनी तालुक्यात 14 पथके करावीत. त्यांनी सकाळी 8 ते 2 व दुपारी 2 ते 10 पर्यंत दोन भागात विभागणी करुन या कामास गती द्यावी. सावनेर तालुक्यात कोरोनाची भिती जास्त आहे. त्यानुषंगाने ट्रेसिंगला जास्त महत्व द्यावे. या पथकांमध्ये मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, इंजिनिअर यांचा समावेश आहे. प्रत्येक रुग्णामागे 20 लोकांचे ट्रेसिंग करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. हे प्रमाण सावनेर मध्ये अल्प असल्याने कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. सुपर स्पे्रडरची यादी मालक, नोकर, त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तीसह देण्यात यावी. त्यामुळे कोरोनास आळा घालणे सोयीचे होईल. याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. समन्वयाने काम केल्यास कोरोनास आळा घालता येईल, असे त्यांनी सांगितले. यासंबधी प्रोटोकाल पाठवा. त्यामध्ये विविध रोग असलेल्या रुग्णांची यादी तयार करा. अँटीजेन तपासणी करा. वेगवेगळया उद्योग समुहांची सुध्दा माहिती त्यात नमूद करा,अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. ठाकरे उपस्थितांना दिल्या. 00000
गारपीटग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा -पालकमंत्री डॉ.नितीन राऊत नागपूर, दि 22: कुही तालुक्यात पाऊस व गारपिटीमुळे मिरची, गहू, चना, धान व ज्वारी या पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. कुही तालुक्यातील वडेगाव या नुकसानग्रस्त गावाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. आमदार राजू पारवे, जि.प. सदस्य मनीषा फेंडर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार बी. एन. तिनघसे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप पोटदुखे, महावितरण उमरेडचे कार्यकारी अभियंता दिलीप घाटोड, उपकार्यकारी अभियंता भुपेश रंधये आदी उपस्थित होते. 2013, 2014 तसेच आता 2021 मध्ये पुन्हा निसर्गाने धोका दिला. त्यामुळे हाती आलेले मिरची, चना व धान पिक गेले, असे वडगाव येथील शेतकरी श्री. लुटे यांनी पालकमंत्र्यांशी संवाद साधताना सांगितले. कुही तालुक्यातील वडेगाव, पचखेडी, परसोडी, नवेगाव, मदनापूर, माजरी, मांढळ, भांडारबोडी, सोनगाव, रेंगातूर व बोरीसदाचार या नुकसानग्रस्त गावांचा समावेश आहे. या गावातील 701 शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे. पाऊस व गारपिटीमुळे तालुक्यातील एकूण क्षेत्राच्या 33 टक्के म्हणजेच 304.11 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. कुही तालुक्यात ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधीत 22 हजार सात शेतकऱ्यांना 19 कोटी 77 लाख 14 हजार 636 रुपयांचे बँकेमार्फत अनुदान वितरीत करण्यात आल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली . पालकमंत्री श्री. राऊत यांच्या हस्ते कुही पंचायत समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात व्हीलचेअर, ट्रायसिकल वितरण करण्यात आले. 00000
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 7 मार्चपर्यंत बंद -पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
* जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा आढावा * लॉकडाऊन नाही पण नियमांची कडक अंमलबजावणी * मायक्रो कन्टोन्मेंट झोन तयार करुन प्रभावी उपाययोजना * हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित करा * नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे नागपूर, दि. 22 : कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या शहरात तसेच जिल्ह्यात सातत्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासोबतच संसर्ग वाढणार नाही याची सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनासंदर्भातील नियमांची कठोर आणि परिणामकारक अंमलबजावणी लागू करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या “मी जबाबदार” या मोहिमेसोबतच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनाबाबत आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश सिंह, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. राजेश गोसावी, डॉ. महमद फजल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी आदी यावेळी उपस्थित होते. कोरोना विषाणूचे सद्य:स्थिती व प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना त्यासोबतच रुग्णसंख्या वाढीचा दर व मृत्यूदर याबाबत आढावा घेताना डॉ. राऊत यांनी कोरोनासंदर्भातील तपासण्यांची संख्या वाढवितानाच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. शहरात तसेच ग्रामीण भागातही होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लग्नसमारंभामुळे गर्दी वाढत असून यावर नियंत्रण ठेवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. ज्या भागात हॉटस्पॉट निर्माण झाले आहे, त्या हॉटस्पॉटनिहाय संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करा असे सांगून डॉ. राऊत म्हणाले की, कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होवून संसर्ग रोखण्यास खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी फ्ल्यू सदृश्य रुग्णांची तपासणी करुन घ्यावी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क,सॅनिटायझरचा वापर आदी प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी कोरोनासंदर्भातील तपासणी करताना संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक घेवूनच तपासणी करावी. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संपूर्ण माहिती तपासणी केंद्राकडे असावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी अपूर्ण माहिती असल्यामुळे शोध घेणे शक्य होत नाही व कोविड रुग्णांची संख्या वाढू शकते, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यात तपासण्या वाढविण्यात आल्या असून गर्दीवर नियंत्रण टाळण्यासाठी दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमात मास्क न घालणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिली. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गर्दी वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच बाजारपेठ बंद ठेवून नियंत्रण करणे आवश्यक आहे. शहरात नवीन हॉटस्पॉट तयार झाले आहे. यामध्ये जरीपटका, जाफरनगर, फ्रेण्डस् कॉलनी, न्यू बीडीपेठ, स्वावलंबीनगर, खामला सिंधी कॉलनी, दिघोरी, वाठोडा, लक्ष्मीनगर, अयोध्यानगर येथे येथे हॉटस्पॉट तयार झाले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाच रुग्ण आहेत, तेथे संपूर्ण इमारत, वीसपेक्षा जास्त रुग्ण आहेत त्या ठिकाणी संपूर्ण परिसर सिल करण्यात येत आहे. होम क्वारंटाईनमध्ये रुग्ण बाहेर आढळल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार यांनी गर्दी टाळण्यासाठी पोलीस विभागातर्फे तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. बाजारपेठ तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्याविरुद्ध अधिक प्रतिबंधात्मक कारवाईची आवश्यकता आहे. मंगलकार्यालय, लॉन, सभागृह, हॉटेल, उपहारगृह यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलीस व महानगरपालिकेतर्फे संयुक्त कारवाई सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यामुळे नागपूर जिल्ह्यात तसेच शहरात आजपासून लागू करण्यात येत असलेले निर्णय पुढीलप्रमाणे जाहीर केले आहे. · मा. मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेला “मी जबाबदार” मोहीम शहरात व जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार. · कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवणार. · जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा शनिवार व रविवार (अत्यावश्यक सेवा -वृत्तपत्र, दूध भाजीपाला, फळे, पेट्रोल पंप, औषध वगळून) बंद ठेवणार. · आठवडी बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवणार. · जिल्ह्यातील हॉटेल (रेस्टॉरंटस्) 50 टक्के क्षमतेने रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी. · लग्न, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम दिनांक 7 मार्चपर्यंत बंद. परंतु मंगलकार्यालय/ लॉन्स/रिसॉर्ट दिनांक 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत बंद राहतील. · कोविड सेंटर पुन्हा सुरु करणार. · कोरोना प्रतिबंधासाठी गृहभेटीची संख्या वाढवून फ्ल्यू, आयएलटी तसेच सारीची तपासणी करणार. · शहरातील तसेच जिल्ह्यातील नवीन हॉटस्पॉट झोन येथे इमारत, लेन, मोहल्लानिहाय मायक्रो कन्टोन्मेंट झोन तयार करुन सक्तीने उपाययोजना. हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित. · मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई. · नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. · जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी . · ऑनलाईन सर्व सेवा (खाद्य पुरवठा) सुरु राहतील. · शासकीय आणि खासगी प्रयोगशाळेमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासणी. · त्रिसूत्रीचे पालन अनिवार्य. · कोविडसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा दररोज विभागीय आयुक्त आढावा घेणार.

Sunday 21 February 2021

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासन सज्ज -जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे नियमांचे पालन न केल्यास कठोर दंडात्मक कारवाई नागपूर, दि. 21 : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता आगामी काळात जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जनतेला आज येथे आहे. गेल्या पाच दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रुग्णसंख्या अचानक वाढत असून, त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. शाळा आणि महाविद्यालये नुकतीच सुरु करण्यात आली होती. मात्र, शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक तसेच विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे पुढील 10 दिवसांसाठी ते बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी आदेश दिले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या शाळा-महाविद्यालयांचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. तसेच संबंधित तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती द्यावी. पॉझिटिव्ह रुग्णांच्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या तात्काळ आरटीपीसीआर चाचण्या करुन घ्याव्यात. शाळा महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर थर्मल गनने विद्यार्थ्यांचे तापमान मोजावे. तसेच कोविडची लक्षणे आढळल्यास त्याची तात्काळ चाचणी करुन घेण्याचे आणि त्याचा अहवाल येईपर्यंत संबंधित शिक्षक-विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात विविध मार्गदर्शक सूचना, लग्न समारंभ, अंत्यसंस्कार, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा व इतर सर्च प्रकारच्या व्यक्तींच्या एकत्रित येताना कोरोना विषाणूच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे श्री. ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. प्रशासकीय यंत्रणेने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना तालुका स्तरावर तहसीलदारांनी आवश्यक तपासणी, धाडी, दंड आकारणी व दंड वसुली ही कामे तालुका दंडाधिकारी यांच्या नियंत्रणात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लग्नसमारंभासाठी 50 व्यक्तींची अट कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 व्यक्तींच्या मर्यादेत कार्यक्रमाचे आयोजन करावे. कार्यक्रमादरम्यान सामाजिक अंतराचे पालन करुन खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालये, हॉल, समारंभासाठी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनस्थळी 50 टक्के मर्यादेपेक्षा जास्त संख्या असू नये. त्यापेक्षा जास्त असल्यास आणि कोविड नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आल्यास आयोजक आणि मंगल कार्यालय, दुकान मालकांवर दंडात्मक कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी घेणार आढावा जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे हे उद्या, सोमवारी नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर आणि नागपूर ग्रामीण तालुक्यांना भेटी देणार असून तेथे कोविड-19 संबंधी आढावा बैठका घेणार आहेत. या बैठकांना नगर परिषदेचे अध्यक्ष, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य यांच्यासह उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, खंड विकास अधिकारी, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पथक, नियंत्रण कक्ष आणि तपासणी पथकातील सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी सकाळी 9.30 वाजता नरखेड पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेणार असून या बैठकीमध्ये सहवासितांच्या शोध मोहिमेचे नियोजन, तपासणी संख्या वाढविण्याचे नियोजन, कोविड केअर सेंटर कार्यान्वित करणे, सुपर स्प्रेडर तपासणी सद्य:स्थिती आणि मृत्यूचे अन्वेषण आदी विषयावर आढावा बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर काटोल येथे 11 वाजता, कळमेश्वर दुपारी 1 वाजता, सावनेर दुपारी 3 वाजता आणि नागपूर ग्रामीण सायंकाळी 5 वाजता अशा आढावा बैठका घेणार आहेत.या बैठकांना पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ******

Friday 19 February 2021

‘समाजकार्य’च्या विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधन करावे - प्रधान सचिव श्याम तागडे

नागपूर, दि. 19 : सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधनावर भर द्यावा. या विभागाच्या विविध योजनांचा फायदा समाजातील वंचित घटकांना होण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी आज येथे केले. समाजकल्याण विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथे ‘जागर समतेचा, सामाजिक न्यायाचा-2021’ या मोहिमेचे उद्घाटन श्री. तागडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, नागपूरचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, वर्ध्याचे श्रीपाद कुळकर्णी तर गोंदियाचे मंगेश वानखेडे आदी यावेळी उपस्थित होते. सामाजिक न्याय विभागाच्या या स्तुत्य उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. खऱ्या अर्थाने ही लोकचळवळ व्हावी, असे सांगून श्री. तागडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना गावपातळीवर पोहोचण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. या विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधन करुन त्याचा फायदा तळागाळातील नागरिकांना करुन द्यावा. या विभागाच्या योजनांसोबतच संविधानाबाबत जागृती, व्यसनमुक्ती तसेच ॲट्रासिटी कायद्याबाबत (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) जनजागृती अभियान वर्षभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. या विभागामार्फत अनुसूचित जाती-जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसह वृध्दाश्रम, तृतीयपंथी व्यक्तीसाठी महामंडळ तयार करण्यात आले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, निराधार महिला, दिव्यांग मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती समाजातील वंचित घटकापर्यंत पोहोचविणे हे या मोहिमेचे ध्येय आहे. ज्या लाभार्थ्यांनी या योजना घेतल्या आहेत, त्यांचा सामाजिक, आर्थिक तसेच शैक्षणिक विकास झाला आहे की नाही याची तपासणी या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणी दरम्यान कोविड मार्गदर्शिकेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केले. सामाजिक न्याय विभागामार्फत समाजोपयोगी महत्त्वाच्या योजना तळागाळातील सर्वसामान्यपर्यंत पोहचण्यासाठी ‘जागर समतेचा, सामाजिक न्यायाचा-2021’ हा उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. समाजकार्य महाविद्यालयाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. व्यसनमुक्ती अभियानासाठी प्रा. विनोद गजघाटे, संविधान जनजागृतीसाठी प्रा. महेंद्रकुमार मिश्रा, ॲट्रासिटीबाबत प्रा. पुरुषोत्तम थोटे तर सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या प्रसिध्दीसाठी प्रा. निशांत माटे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या चारही समित्यांसोबत समन्वय ठेवण्यासाठी अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबा शंभरकर यांची मुख्य समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत प्राध्यापकांची निवड करण्यात येवून त्यांना तज्ज्ञांद्वारे प्रशिक्षण देण्यात येईल. यानंतर हे प्रशिक्षणप्राप्त प्राध्यापक आपआपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. उपक्रमात सहभागी विद्यार्थी गावागावात जावून संविधानाच्या तरतुदी, नागरिकांचे अधिकार, व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करतील, अशी माहिती डॉ. गायकवाड यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संध्या फटिंग तर आभार प्रा. विलास घोडे यांनी मानले. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. ******

छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली

नागपूर, दि.19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपायुक्त शैलेश मेश्राम यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सहसंचालक कमलकिशोर राठी, तहसिलदार अरविंद सेलोकर, नारायण ठाकरे तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी यावेळी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, अधीक्षक निलेश काळे, तहसिलदार सुर्यकांत पाटील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ******

Tuesday 16 February 2021

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2020 प्रवेशिका पाठविण्याकरिता 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची मुदत दि.15 फेबुवारी 2021 होती. तथापि या प्रवेशिका सादर करण्याकरिता दि.28 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 0000
जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवीले नागपूर, दि. 16 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. जिल्ह्यातील युवकांना समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा, तसेच त्यांना विकास कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी युवक-युवती तसेच संस्थांनी 2019-20 व 2020-21 साठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर एक युवक व युवती तसेच व नोंदणीकृत संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. गौरवपत्र, सन्मानचिन्ह तसेच रोख दहा हजार तर संस्थेसाठी 50 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. अर्ज दोन प्रतीत आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसह 15 मार्चपर्यंत सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्राद्वारे करण्यात आले आहे. *****
अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा
* शासकीय तंत्रनिकेतनमध्ये रस्ता सुरक्षा अभियान * अपघातमुक्त सेवा दिलेल्या वाहनचालकांचा गौरव नागपूर, दि. 16 : रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहतुकींच्या नियमांचे पालन करतानाच वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर केल्यास अपघातामध्ये होणारी जीवितहानी टळू शकते. त्यामुळे जनतेने वाहतुकीचे नियम पाळूनच वाहन चालवावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी मार्तंड नेवासकर यांनी केले. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शासकीय तंत्रनिकेतन येथे विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा व घ्यावयाची काळजी यासंदर्भात विशेष रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री. नेवासकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी हीरो मोटरचे वितरक प्रकाश जैन, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. मनोज डायगव्हाणे, श्री. सोलंकी, श्रीमती राधा, कार्यक्रमाच्या संयोजक श्रीमती राजश्री वानखेडे तसेच मान्यवर उपस्थित होते. रस्त्यावरील वाहनांची संख्या सातत्याने वाढत असून वाहनचालकांकडून वाहतूक नियमासंदर्भात आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे रस्त्यावरील अपघाताच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचे सांगताना श्री. नेवासकर म्हणाले की, दुचाकी वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात वाढत असून अपघात टाळण्यासाठी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. शासनातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाबद्दल जनजागृती अभियान राबविण्यात येत असल्यामुळे वाहतुकीच्या नियमांची माहिती सुलभपणे जनतेपर्यंत पोहचत आहे.या अभियानात स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचाऱ्यांची जनआक्रोश ही संस्था नागपूरमध्ये कार्यरत आहे. नागपूरातील 70 टक्के ब्लॉक स्पॉट कमी केले आहे. गाडी ही आपली सोबती आहे अशी भावना नागरिकांनी ठेवून तिची काळजी घेणे आवश्यक आहे तरच अपघात कमी करण्यास मदत होईल, असे श्री. नेवासकर यांनी सांगितले. जागातील एक मोठी वाहन निर्मिती कंपनी म्हणून हिरो कपंनीकडे पाहिले जाते, या कंपनीचे 10 कोटी टू-व्हिलर्स उत्पादित केली आहेत. शासकीय यंत्रणेसोबत खाजगी संस्थांचा सहभाग घेऊन रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रम राबविल्यास या अभियानास गती येऊन अपघात कमी करण्यास मदत होईल, असे प्रकाश जैन यांनी सांगितले. युनोने शून्य अपघाताचे प्रमाण करण्याचे ठरविले असून यामुळे त्यांच्या अभियानास मदत होईल. रस्त्यावर पार्किंगमुळे रस्ते लहान झालेले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन अपघाताचे प्रमाण वाढत आहे, असे त्यांनी सांगितले. जनतेमध्ये अपघाताविषयक विस्तृत जनजागृती करण्याची आवश्यक असल्याचे ते म्हणाले. एका लहान चुकीमुळे जीवन गमवू नका. विद्यार्थी व तरुणांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ‘फेस टू फेस विथ ॲक्सिडेंट व्हिक्टीम’ मध्ये दक्षिण भारतातील पांडेचरी ते त्रीची या मार्गावर अपघातात नर्व्हस सिस्टीमवर परिणाम झालेल्या श्रीमती राधा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व्यसन करुन वाहन चालवू नये असा संदेश त्यांनी दिला. आजही त्या कॅम्युनिटी कॉलेजमध्ये शिकवितात. जनआक्रोशचे श्री. लोणकर यांनी रस्त्यावर जनेतेमध्ये आक्रोश होऊ नये म्हणून संस्थेची स्थापना केली. त्याचबरोबर वाहतुकीस मदत करण्याचे ठरविले. सेवानिवृत्त असूनही ते दररोज 1 तास सेवा वाहतुक निट करण्यासाठी देतात. वाहतूकीचे नियम पाळा व आपले जीव वाचवा, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी प्राचार्य डॉ. डायगव्हाणे यांनी ‘कोशिश करने वालों की कभी हार नही होती’, ‘सुरक्षा जीवन का अर्थ है’, ‘सुरक्षा बिना सब व्यर्थ’ असा संदेश देवून सर्वशाळा, महाविद्यालयात रस्ता सुरक्षा कार्यक्रम राबवून समाजात जनजागृती करावी, स्वयंसेवी संस्थांनीही यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. बत्तीस वर्षाच्या सेवा काळात अपघात विरहित वाहन चालविणारे इमामवाडा डेपोचे मोहम्मद कादीर व इमामवाडा डेपोचे इस्तृजी मेश्राम या राज्य परिवहन महामंडळातील वाहन चालकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तंत्र निकेतनच्या विद्यार्थ्यांच्या चमूने व्यसन करुन वाहन चालविणे कसे धोकादायक असते याबाबत पथनाट्य सादर केले. अपघात कमी होण्यास मदत करणारे रेडियम स्टिकर चार चाकी व दू-चाकीला मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले. या कार्यक्रमास तंत्रनिकेतनचे प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. 00000

Saturday 13 February 2021

राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन वर्षात फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय होणार - सुनील केदार नागपूर, दि.13 : शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून राज्यातील प्रत्येक तालुक्यात 2022 पर्यंत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी आज येथे सांगितले. या उपक्रमांतर्गंत नागपूर विभागात 15 फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांचा जिल्हा परिषद प्रांगणात आज हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातूरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर आदी यावेळी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात नागपूर विभागात फिरत्या 15 पशुवैद्यकीय रुग्णालयांचा आज प्रारंभ करण्यात आला असून, यातील तीन रुग्णालये जिल्ह्यात असतील. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. पशुसंवर्धन विभागाने रुग्णालये सुरु करुन नवीन पर्वाला आज प्रारंभ केला आहे. शेतकरी, पशुपालकांचे पशुधन निरोगी ठेवण्याला या विभागाने महत्त्व दिले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषी आणि कृषिपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे फिरते पशुवैद्यकीय रुग्णालये ही विभागाची नितांत गरज होती. ती आज पूर्ण करत असल्याचे सांगून येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक तालुक्यात ही रुग्णालये सुरु होणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले. ग्रामीण भागात अशा प्रकारची रुग्णालये सुरु करत असून अद्यापही अशी रुग्णालये प्रत्येक गावात नाहीत. त्यामुळे आजारी पशुधनाला रुग्णालयापर्यंत नेणे मोठे अडचणीचे असते. आता शेतकऱ्यांची ही समस्या सुटणार असून, 1962 या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधला असता, वैद्यकीय पथकासह हे फिरते रुग्णालय शेतकऱ्याच्या बांधावर पोहचणार असून, ‘शासन आपल्या दारी’ योजना सुरु होत असल्याचे समाधान श्री. केदार यांनी व्यक्त केले. असा होणार शेतकऱ्यांना फायदा राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गंत फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालायांच्या माध्यमातून आता थेट आजारी पशुरुग्णांवर शेतक-यांच्या दारात उपचाराची सुविधा मिळणार आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून रोगप्रतिबंधक लसीकरण करता येणार आहे. तसेच उच्च उत्पादक क्षमता असणा-या वळूंच्या रेतमात्रा वापरून कृत्रिम रेतनाचीही सोय शेतक-यांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे. तसेच शेतक-यांना पशुआहार व आरोग्याबाबत तज्ञ पशुवैद्यकामार्फत मार्गदर्शन करण्याचीही व्यवस्था उपलब्ध करुन देणार असून शासनाच्या विविध योजनांची माहितीसुद्धा हे पथक देणार असल्याचे श्री. केदार म्हणाले. बर्ड फ्ल्यूपेक्षा अफवांमुळे जास्त नुकसान राज्यात बर्ड फ्ल्यू आटोक्यात आला असून, बर्ड फ्ल्यूने माणसांना कोणताही धोका नाही. अद्याप या आजाराने कोणीही दगावला नाही, असे सांगून श्री. केदार यांनी एका पक्षाला बर्ड फ्ल्यूची लागण झाल्यास 48 तासात त्याच्या पोल्ट्री फार्मचे मोठे नुकसान होते. मात्र त्यापेक्षा जास्त नुकसान समाजमाध्यमांवरील अफवांमुळे होते. भारतीय खाद्यसंस्कृती ही जगात सर्वाधिक सुरक्षित असून, पूर्णत: शिजविलेले चिकन बिनधास्त खाण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच मांसाहारी नागरिकांमधील भिती काढून टाकण्यासाठी त्यांनी नुकतेच ‘चिकन फेस्टीव्हल’चे आयोजन केले होते, याची माहितीही त्यांनी दिली. कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना नाममात्र दरात पक्ष्यांचा विमा उतरविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. *****

Thursday 11 February 2021

रस्ता सुरक्षाविषयक विशेष कार्यक्रम रविवारी नागपूर, दि. 11 : रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 17 फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा विषयक विशेष कार्यक्रम रविवार, 14 फेब्रुवारीला होणार असून अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कविवर्य सुरेश भट सभागृह, येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री नितीन राऊत, गृह मंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे, महापौर दयाशंकर तिवारी, खासदार डॉ. विकास महात्मे, विधान परिषद सदस्य नागो गाणार, गिरीष व्यास, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, समीर मेघे, आशिष जयस्वाल, राजू पारवे, टेकचंद सावरकर तसेच विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य अभियंता संजय दशपुते, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातूरकर, रेल्वे महामार्ग पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. ****
आज दिले.
सांडपाण्यामुळे अंबाझरीचे पाणी दुषित होणार नाही खबरदारी घ्या - रवींद्र ठाकरे · जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक · उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्यात आढावा · उद्योग विस्तारासाठी प्राधान्याने भुखंड · एमआयडीसी बाहेरील उद्योगांना सुविधा नागपूर, दि. 11 : हिंगणा औद्योगिक क्षेत्रासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी अंबाझरी तलावाच्या पाण्याचा वापर होत असून तलावातील पाणी प्रदुषित होणार नाही यासाठी वाडी तसेच औद्योगित क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुध्दीकरण संयंत्र तात्काळ कार्यान्वित करा, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बचत भवन सभागृहात जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हिंगणा, बुटीबोरी, भिवापूर, कळमेश्वर येथील उद्योजक तसेच विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशन, बुटीबोरी व हिंगणा मॅनिफॅक्चरींग असोसिएशनचे पदाधिकारी तसेच लघु उद्योग कोशिया संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. वाडी तसेच हिंगणा औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी अंबाझरी तलावात सोडल्या जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण व दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीची दखल घेवून अंबाझरी तलावजवळील नाल्यावर एसटीपीयंत्र बसविण्यासंदर्भात वाडी नगरपंचायतीने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देतानांच महानगरपालिकेतर्फे एसटीपी बसविण्याचे काम सुरु केले असून हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या. हिंगणा औद्योगिक क्षेत्रात खुल्या जागांवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या जात असल्यामुळे प्रदुषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज वीसटन कचरा गोळा करण्यासाठी तसेच कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी जिल्हापरिषदेने जागेचा शोध घेवून विलगिकरणाचे काम सुरु करावे. तत्पूर्वी औद्योगिक विकास मंडळाने तात्काळ कचरा उचलण्याची कार्यवाही सुरु करावी, असे निर्देश देण्यात आले. एमआयडीसीमधून वाडीकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे संरक्षण विभागाच्या जागेचे अधिग्रहन करुन बायपास तयार करण्याबाबतही बैठकीत सांगण्यात आले. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील ड्रेनेज लाईन परिसराची स्वच्छता, उद्योजकांना दैनंदिन आवश्यक सुविधा तसेच उद्योजकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्यात. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात राज्य कामगार विमा योजनेचे रुग्णालय सुरु होत असून त्याच धर्तीवर हिंगणा औद्योगिक क्षेत्रातही कामगारांना आरोग्य सुविधा मिळण्यासंदर्भात उद्योगजकांनी सूचना केली. औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांकडून नगर पचायत तसेच ग्रामपंचायतकडूनही कर गोळा करण्याकरिता हा कर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे गोळा करुन पन्नास टक्के ग्रामपंचायत व पन्नास टक्के एमआयडीसीला उपलब्ध होत असून या कराच्या माध्यमातून ग्रामपंचायततर्फे आवश्यक सुविधा मिळत नाहीत. उद्योजकांना आवश्यक सुविधा देण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिलेत. औद्योगिक क्षेत्राबाहेर जिल्ह्यात सुमारे एक हजार उद्योग सुरु आहेत. या उद्योगांना ग्रामपंचायततर्फे बांधकाम परवाना देण्यात आला असला तरी नागपूर महानगर विकास प्राधिकरणातर्फे नकाशा मंजुरी संदर्भात आदेश देण्यात आले आहे. यामुळे उद्योजकांने एकत्र निर्णय घेवून उद्योजकांना सुविधा देण्यासंदर्भात महानगर विकास प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना बैठकीत देण्यात आल्या. प्रारंभी उद्योग विभागाच्या महाव्यवस्थापक गजेंद्र भारती यांनी जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत उद्योजकांकडून समितीसमोर मांडण्यात आलेल्या विषयांची माहिती दिली. उद्योग मित्र समितीची बैठक यापुढे प्रत्येक महिन्याच्या बुधवारी घेण्यासंदर्भात उद्योजकांकडून सूचना मागितल्या. या बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी बी.ए. यादव, कोशियाचे झुल्पेश शहा, सचिन जैन, प्रविण अंबासेलकर, आर. एस. तिडके, जिल्हापरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, मिहानचे सल्लागार ए. पी. चहांदे, एस. के. चटर्जी, मुद्रांक जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, महावितरणचे एन. एल. आमधरे, ए. एस. परांजपे, व्ही.आर. कुलकर्णी, बुटीबोरी मॅनिफॅक्चरिंगचे श्री. प्रशांत मेश्राम तसेच विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. *****
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक -अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त दिनेश डोके नागपूर, दि. 11 : सामाजिक न्याय विभाग पाच स्तंभावर उभा आहे. या पाच विविध स्तंभांना बळकट केल्यास शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे सोयीचे होईल,असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिनेश डोके यांनी येथे केले. या उद्देशाने विदर्भातून कार्यशाळा सुरुवात करण्यात आली असून राज्यातील सर्व विभागात याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून कोविड महामारीमुळे प्रलंबित राहिलेली कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. विदर्भातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल, गृहप्रमुख व निवासी शाळेतील मुख्याध्यापकांसाठी आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय विभागाच्या निरीक्षण शाखेच्या सहाय्यक आयुक्त मनिषा फुले, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, अमरावतीचे प्रादेशिक उपायुक्त श्री. विजय साळवे, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख प्रामुख्याने कार्यशाळेस उपस्थित होते. सामाजिक न्याय विभागाच्या पाच स्तंभांपैकी एक असलेले अधीक्षक हे कार्यालय प्रमुख आणि कर्मचाऱ्यातील दुआ आहेत. अधिक्षकाच्या कार्यक्षमतेवर कार्यालय योग्य रितीने कार्य करते. समाज कल्याण निरीक्षक शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून त्या लाभार्थ्यांपर्यंत योग्य रितीने पोहचवितात. गृहपाल हा महत्वाचा घटक असून मागासवर्गीय मुले चांगली शिकू शकतील व त्यांचे जीवनमान उंचावता येईल यावर भर देतात. मुख्याध्यापकांनी तळागाळातील मुलांना चांगले शिक्षण दिले तरच समाज सुशिक्षित होईल. लेखा अधिकाऱ्यांनी निधीचा योग्य विनियोग केला तर योजना सफल होतील, असे श्री. डोके म्हणाले. या पाच स्तभांना कार्यशाळेद्वारे बळकट करुन विभागाने प्रभावीपणे योजनांची अंमलबजावणी करावी,असे त्यांनी सांगितले. या विभागाबद्दल लोकांचा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन बदलला पाहिजे तरच पारदर्शक व गतिमान कार्य विभागाला करता येईल. या कार्यशाळेद्वारे आपल्या अडचणी, सूचना यावर विचार करुन त्या शासनापर्यंत पोचविण्यात येणार आहोत. त्यावर एखादा शासन निर्णयसुध्दा तयार करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात डॉ. गायकवाड यांनी योजनांचा लाभ, प्रशासकीय बाबी,आर्थिक तरतूद, क्षेत्रीय तपासणी तसेच कार्यशाळेच्या आयोजनाबाबत माहिती विषद केली. कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाची आश्यकता असून त्याशिवाय कामाविषयी माहिती मिळत नसल्याचे श्रीमती फुले यांनी सांगितले. या कार्यशाळेच्या अनुषंगाने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत सादरीकरणाद्वारे कर्मचाऱ्यांनी नियोजन, सूचना तसेच अडचणी सादर केल्या. यात समाजकल्याण निरीक्षक श्री. हेडाऊ यांनी प्रशासकीय काम कमी केल्यास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करता येईल, असे सांगितले. गृहपाल प्रविण मडावी यांनी प्रवेश व प्रचलित प्रक्रिया याबाबत विचार व्यक्त केले. गोपाल खडासरे यांनी प्रशासनात आधूनिकीकरण व निधी मध्ये वाढ करण्याचे सांगितले. कार्यालय अधीक्षक राजेंद्र भुजाडे यांनी विभागाची रचना व कार्यपध्दतीवर प्रकाश टाकला. दुसऱ्या सत्रात अमरावती विभागाचे गृहपाल आर.जी. रकमे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत शासकीय इमारतीचे व्यवस्थापन, वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यावर भर देण्यात आला. तसेच कार्यपध्दती सॉफ्टवेअर अद्ययावत करुन विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली. या कार्यशाळेत नागपूर- अमरावती विभागातील मोठया प्रमाणात कर्मचारी उपस्थित होते. 00000
कामगारांच्या प्रश्नांबाबत कार्यवाही करण्याचे राज्यमंत्र्यांचे आदेश नागपूर, दि. 11 : औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांनी कामावरुन निलंबित केलेल्या कामगारांना येत्या सात दिवसांमध्ये कामावर परत बोलावण्याची कार्यवाही करावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कंपनी व्यवस्थापनाला आज येथे दिले. अप्पर कामगार आयुक्त कार्यालयात कंपनी व्यवस्थापनाचे प्रतिनिधी आणि कामगार प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. अपर कामगार आयुक्त विजय पानबुडे, सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे, उज्ज्वल लोया, सरकारी कामगार अधिकारी संजय धात्रक यांच्यासह जिल्ह्यातील मोरारजी टेक्सटाईल्स, बुटीबोरी, सनविजय रोलिंग ॲन्ड इंजिनिअरींग आणि डिफुजन इंजिनिअरींग या कंपन्यांचे व्यवस्थापन प्रतिनिधी आणि कामगार प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. कंपनी व्यवस्थापनाने कोरोना काळात काही कंत्राटी कामगारांना कामावरुन निलंबित केले असून, काही कंत्राटी कामगारांचे वेतन थकविले असल्याची बाब कामगार प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिल्यानंतर श्री. कडू यांनी हे आदेश दिलेत. कामगारांना वेतन देताना कोणतीही एक निश्चित तारीख देत त्या तारखेला नियमित वेतन करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. तसेच निलंबित कामगारांवरील कार्यवाही कंपनीने मागे घेत त्यांना कामावर परत बोलावून घेण्याची कार्यवाही येत्या सात दिवसांमध्ये पूर्ण करुन तसा अहवाल अपर कामगार आयुक्तालयामार्फत पाठविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मोरारजी कंपनीमध्ये नियमित आणि कंत्राटी कामगारांमध्ये कामाच्या वेळांमध्ये भेदभाव न करता दोन्ही कामगारांच्या वेळेत समानता ठेवावी. कंत्राटी आणि नियमित कामगारांमध्ये कामगार कायद्यानुसार प्रमाण योग्य आहे का, त्याची तपासणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. कामगारांना किमान वेतन मिळाले पाहिजे. तसेच अपर कामगार आयुक्तालयाने त्यांच्या वेतनाची तपासणी करावी. तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळल्यास कंपनी व्यवस्थापनाला दुरुस्तीची एक संधी देण्यात येईल. मात्र कामगार कायद्याचे उल्लंघन न करण्याचे स्पष्ट बजावत नियमित कामगारांप्रमाणे कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश श्री. कडू यांनी यावेळी दिले. कामगार संघटनेचे प्रतिनिधी कृती समितीवर नेमून त्यात कामगार प्रतिनिधी निम्मे सहभागी करुन घेण्यास सांगितले. कामगारांच्या सुरक्षित भविष्यासाठी वर्षाला नाममात्र 50 रुपयांमध्ये दोन लाख रुपयांचा विमा कवच मिळवून देण्यात येईल. त्यासाठी कंपनी व्यवस्थापनाला विमा कवच देणाऱ्या कंपनीबाबत माहिती देण्यात येईल. कामगारांना अतिकालिक भत्ता देताना त्यांच्या आठवड्यातील नियमित कामकाजाच्या वेळाही तपासून घ्याव्यात. कामगारांच्या काम करण्याच्या वेळा चक्रीय पद्धतीने ठेवाव्यात, जेणेकरुन कंपनी अडचणीत येणार नाही, असेही श्री. कडू यांनी सूचित केले. कंपनीने वर्षातून एकदा कामगारांचे आरोग्यविषयक संपूर्ण तपासणी शिबीर आयोजित करावे. कामाच्या वेळात कंपनीतील कामगार मृत्यूमुखी पडल्यास कंपनी व्यवस्थापनाने मृताच्या घरी जावून सांत्वनपर भेट आणि शक्य तेवढी आर्थिक मदत करावी. विमा काढला असल्यास दावा निकाली निघाल्यानंतर विमा रक्कमेतून ती कपात करुन घेता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोना काळ संपल्यानंतर डिफूजन कंपनीने 60 कामगारांचे वेतन थकविल्याची बाब कामगार प्रतिनिधींनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता, थकविलेले वेतन तात्काळ देण्याच्या सूचना करत निलंबित कामगारांना कामावर परत बोलविण्यास सांगितले. तसेच हा अहवाल सात दिवसांमध्ये सादर करण्याचे निर्देश श्री. कडू यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले. सनविजय रोलिंग ॲन्ड इंजिनिअरींगने नियमित कमी आणि कंत्राटी कामगार जास्त कामावर ठेवल्याची बाब योग्य नसल्याचे सांगून या कंपनीची तपासणी करण्यास सांगितले आहे. तसेच येथेही निलंबित कामगारांना कामावर घ्यावे अन्यथा कार्यवाही करण्यात येईल, असे सांगत कंपनीची सुरक्षा तपासणी करावी. दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही ते म्हणाले. यावेळी तीनही कंपन्यांमधील कामगारांचे तसेच कंपनी व्यवस्थापनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. *****
खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्प त्वरित पूर्ण करा - राज्यमंत्री बच्चू कडू
नागपूर, दि. 11: यवतमाळ जिल्ह्यातील (ता. बाभुळगाव) खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम मूळ प्रकल्प अहवालानुसार त्वरित पूर्ण करुन मौजा सरुळ गावाचे पुनर्वसन तातडीने करावे, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्यासह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, अमरावती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अनिल बहादुरे, यवतमाळ प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गणेश राठोड आदी यावेळी उपस्थित होते. श्री. कडू म्हणाले, आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण आहे. या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना बंदनलिका वितरण प्रणालीमार्फत लाभक्षेत्रातील 1 हजार 175 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होईल. यासाठी मुळ प्रकल्प अहवालानुसार खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्प त्वरित पूर्ण करावा. सरुळ गावाचे पुनर्वसन प्रस्तावित करुन मुळ प्रकल्प अहवालानुसार प्रकल्प पूर्ण करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव तातडीने सादर करावा. जेणेकरुन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. पूर्वी खर्डा प्रकल्पामध्ये सरुळ गावाचे पुनर्वसन प्रस्तावित होते. 1 हजार 175 हेक्टरमध्ये बाभुळगाव तालुक्यातील सात गावांना या सिंचनाचा लाभ मिळणार होता. प्रकल्पास 29 कोटी 16 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता 19 डिसेंबर 2006 ला प्राप्त झाली होती. त्यानंतर सरुळ गावाचे पुनर्वसन वगळून प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता सादर करण्याबाबत सूचना करण्यात आली होती. परंतु श्री. कडू यांनी सरुळ गावाचे पुनर्वसन करुन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचा फायदा व्हावा यासाठी पूर्वीच्या मुळ प्रकल्प अहवालानुसार खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या. *****

Wednesday 10 February 2021

राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या नोंदणी अर्जास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ नागपूर, दि. 10 : राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नाव नोंदणी प्रवेश अर्ज स्विकारण्याचा कालावधी 31 जानेवारी पर्यंत होता. त्यास 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 28 फेंब्रुवारी पर्यंत नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन भरुन 2 मार्च पर्यंत मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्रशाळेमध्ये जमा करणे आवश्यक आहे. संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज,विहित शुल्क,मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे 5 मार्च पर्यंत जमा करावी, असे राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणेचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे. 00000
जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन नागपूर, दि. 10 : चीनमध्ये शांघाई येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2021 चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने स्पर्धेसाठी सर्व आय.टी.आय, तंत्रनिकेतन,तंत्र विद्यालय, एमसीव्हीसी, बायोफोकल, प्रत्येक विद्यापीठाच्या अधिपत्याखालील सर्व अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, शास्त्र शाखेची आणि इतर कनिष्ठ महाविद्यालये तसेच राज्य कौशलय विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. सन 2021-22 मध्ये आयोजित जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने विविध क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सेक्टर स्कील कॉन्सील व औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने राज्यात स्कील कॉम्पीटीशन- 21 आयोजन करण्यात आले असून स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर करुन निवड केलेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेसाठी 1 ते 31 मार्च पर्यंतचा कालावधी असून राज्य, विभागीय स्तरासाठी 1 ते 30 एप्रिल पर्यंत कालावधी तर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 1 ते 10 मे पर्यंतचा कालावधी आहे. तदनंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 1999 किंवा तदनंतरचा असणे अनिवार्य आहे. एअरक्राफ्ट मेटेंनन्स, मेकाट्रॉनिक्स, इन्फॉरमेशन नेटवर्क केबलिंग, मॅन्युफॅक्चरिंग टीम चॅलेज, वॉटर टेक्नालॉजी, क्लाऊड कूप्यूटिंग आणि सायबर सिक्युरिटी या क्षेत्रातील उमेदवारीसाठी 1 जानेवारी 1996 किंवा तदनंतरचा जन्म असणे आवश्यक आहे. जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी वर्ल्ड स्कीलच्या लिंकवर भेट देवून 28 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र. ग. हरडे यांनी केले आहे. 00000
नागपूर जिल्हयातील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी पोस्ट कोविड सेंटर अधिक सक्षम करावे - डाॅ. दीपक म्हैसेकर नागपूर, दि. 10 : कोरोनाचा प्रादुर्भाव होवून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या रुग्णांच्या शारीरिक व मानसिक समस्यांचे निराकरण करुन त्यांना आवश्यक ते वैद्यकीय उपचार तात्काळ मिळावेत, यासाठी पोस्ट कोविड सेंटर अधिक सक्षम करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांचे कोरोना विषयक सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे केले. जिल्ह्यातील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच कोविड लसीकरणाबाबत उच्चस्तरीय बैठक बचत भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी श्री. म्हैसेकर बोलत होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, डॉ. देव, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंग, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. सेलोकर, तसेच जिल्हा टास्क फोर्सचे मेंबर्स डॉ. मिलींद भुरसुंडी, डॉ. रवींद्र सरनाईक, डॉ. पाटील, डॉ. अविनाश गावंडे यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ व तज्ज्ञ उपस्थित होते. कोविड लसीकरणाबाबत लाभार्थ्यांमध्ये काही प्रमाणात उदासिनता दिसत आहे. याबाबत श्री. म्हैसेकर म्हणाले की, लसीची निर्मिती, त्याचा उपयोग, त्यामुळे शरीरावर होणार परिणाम याबाबत लाभार्थ्यांना लसीकरणाच्या वेळी आगाऊ माहिती देण्यात यावी. लसीकरण झाल्यानंतर शरीरामध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्यास वेळ लागतो. म्हणून ती विकसित होईपर्यंत त्या व्यक्तीस कोविडची बाधा होऊ शकते. यामुळे लसीकरण झाल्यानंतरही कोविड मार्गदर्शिकेचे पालन होणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत जनजागृती करण्यात यावी. कोविड योद्धांना कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन प्रकारच्या लसी देण्यात येतात. इतर लसीप्रमाणेच या दोन्हीही सारख्याच सुरक्षित आहेत. लसीकरणासाठी कोविन ॲपमध्ये करण्यात येणाऱ्या नोंदींवर लक्ष ठेवावे. भारत सरकारने लसीकरणाच्या संदर्भात दिलेल्या निर्देशांचे तसेच कोविड उपचार मार्गदर्शिकेमध्ये येणाऱ्या नव्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत प्रशासनामार्फत घरोघरी जाऊन कोविडचे रुग्ण शोधण्यात आले आहेत. या उपक्रमातील माहितीचा वापर करुन कोविड लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोविडची परिस्थिती नियंत्रणात येत असून शाळांमध्ये कोविड संदर्भातील आरोग्य यंत्रणेने दिलेले सर्व सुरक्षा नियम, अटी पाळण्यात येत आहे की नाही, याबाबत विशेष लक्ष पुरवावे. खाजगी रुग्णालयामध्ये कोविडबाधित गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऐनवेळी नकार देण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. असे सांगून श्री. म्हैसेकर म्हणाले, यावर महापालिकेने नियंत्रण आणावे. विदर्भामध्ये अकोला, भंडारा तसेच यवतमाळ येथील कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोविड मार्गदर्शिकेचे पालन योग्य रितीने व्हावे यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. तसेच डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करावे. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु धोका कायम असल्यामुळे सर्वांनी कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन केले. नागपूरमध्ये तातडीने रुग्ण संख्या कमी झाली पाहिजे सोबतच चाचण्यांची संख्या वाढविणे आणि या आजाराबाबतच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्याचेही त्यांनी निर्देश दिले. *****