Thursday 24 September 2020

 पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दौरा

      नागपूर, दि. 24 : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचे उद्या शुक्रवार, दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी आयोजित केलेल्या कोविड उपाययोजनेबाबत बैठकीला उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता सावनेर तालुक्यातील पाटणसांवगी येथील सुतगिरणी संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतील.

****

 ग्राम रोजगार सेवकाचे मानधन आता थेट ग्रामपंचायतीमार्फत

                         * राज्यातील 25 हजार 258 ग्रामरोजगार सेवकांना लाभ

                         * रोहयोमार्फत 48 कोटी 93 लाखाचे वितरण

                         * थेट मानधन वितरणाचा कामठी पॅटर्न यशस्वी

         नागपूर, दि. 24 :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामस्तरावर कामांच्या सुसूत्रतेसाठी तसेच मजुरीसंदर्भात अभिलेखे व नोंदवह्या ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामरोजगार  सेवकांना  यापुढे थेट ग्रामपंचायतीमार्फत मानधन वितरण करण्यात येणार आहे.  मानधन वितरणाच्या या नव्या प्रणालीमुळे राज्यातील सुमारे 25 हजार 258 ग्रामरोजगार सेवकांना वेळेवर मानधन मिळणार आहे.

             ग्रामपंचायतीमार्फत थेट मानधन वितरणाचा कामठी तालुक्यातील पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यामुळे संपूर्ण राज्यात नविन प्रणालीनुसार मानधन वितरणाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त ए. एस. आर. नायक यांनी आज दिली.

            रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्राम रोजगार सेवकांना दिल्या जाणाऱ्या मानधनाचा विलंब टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात प्रायोजिक तत्वावर हा प्रयोग राबविण्यात आला. तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामरोजगार सेवक नियुक्त करण्यात आले आहे. या सेवकांना 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत 26 हजार 869 मनुष्य दिवस निर्मिती झाली. त्यानुसार 3 लक्ष 67 हजार 974 रुपयांचे अनुदान थेट संबंधीत ग्रामपंचायतीमध्ये जमा करण्यात आले असून ग्रामपंचायतीमार्फत ग्रामरोजगार सेवकांना सुलभपणे मानधन वितरीत करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण राज्यात हा प्रयोग राबविण्याचा निर्णय आयुक्त ए. एस. आर. नायक यांनी घेतला.

            ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी ग्रामरोजगार सेवकांची महत्वाची भूमिका असून रोहयोवरील मजुरांना त्यांनी केलेल्या कामाच्या नोंदी तसेच मिळणारी मजुरी यांचे हजेरी बुक तयार करून मजुरांच्या  खात्यात थेट मजुरी जमा करण्याची जबाबदारी आहे. राज्यात 25 हजार 258 ग्रामरोजगार सेवकांमध्ये नागपूर विभागात 3 हजार 409, अमरावती विभागात 4 हजार, औरंगाबाद विभागात 6 हजार 344, नाशिक विभागात 4 हजार 861, कोकण विभागत 2 हजार 645 तर पुणे विभागात 3 हजार 996 ग्रामरोजगार सेवक आहेत. त्यांना या नव्या मानधन वितरण प्रणालीमुळे  वेळेवर मानधन मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

 

            राज्यात 28 हजार 642 ग्रामपंचायातीमार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेच्या अंमलबजावणी ग्रामपंचायतस्तरावर अभिलेख व नोंदवह्यासाठी ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती केली जाते. राज्यात 25 हजार 258 ग्रामरोजगार सेवक मानधन तत्वावर नियुक्त करण्यात आले असून त्यांना मानधनापोटी 48 कोटी 93 लक्ष रुपयापेक्षा जास्त मानधन वितरीत केल्या जाते. ग्रामरोजगार सेवकांना मानधनापोटी 1 लक्ष 90 हजार 403 रुपये म्हणजेच सरासरी मासिक 15 हजार 867 रुपये मानधनाचे वितरण केल्या जाते हे मानधन एकूण वार्षिक मनुष्य दिवस व एकूण मजुरी प्रदानाच्या खर्चाच्या टक्केवारीवर देण्यात येते. पूर्वी मानधन खंडविकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येत होते. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींना वितरीत झाल्यानंतर मानधन मिळत होते. या प्रक्रियेला होणारा विलंब कमी करून आयुक्तालयाने थेट मानधनाचा निर्णय घेतला आहे.

            महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपातळीवर रोहयोची कामे प्रभावी व परिणामकारक राबविण्याकरिता ग्रामपंचायतीमार्फत ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामसेवकांमार्फत रोजगार हमी योजनेचे अभिलेख व नोंदवह्या ठेवण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवकांना देण्यात आली आहे. या ग्राम रोजगार सेवकांना मनुष्य दिवस निर्मिती तसेच एकूण मजुरी प्रदानाच्या सरासरी 6, 4 व 2.5 टक्केपर्यंत मानधन देण्यात असून मानधन वितरणामध्ये होणारा प्रचंड विलंब टाळण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त ए. एस. आर. नायक यांनी विहित पध्दतीचा अवलंब करून थेट ग्रामपंचायतीमार्फत अनुदान वाटपाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना वेळेवर व नियमित मानधन ग्रामपंचायतीमार्फत‍ देण्याची सुविधा निर्माण झाली आहे. यापूर्वी मानधन तालुकास्तरावर वितरीत झाल्यानंतर प्रत्यक्ष वितरणाला मोठ्या प्रमाणात विलंब होत होता.

           

             

****

Wednesday 23 September 2020

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा नागपूर दौरा

 


 

      नागपूर, दि. 23 : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे उद्या गुरुवार, दिनांक 24 सप्टेंबर रोजी मुंबईहून सकाळी 11.20 वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. 11.45 वाजता शासकीय विश्रामगृह रविभवन येथे आगमन व राखीव.  दुपारी 1 वाजता मोटारीने गोंदियाकडे प्रयाण. गोंदिया येथील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचे रात्री 8.30 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व रात्री 9.05 वाजता विमानाने ते  मुंबईकडे प्रयाण करतील.

****

कोरोनाग्रस्त रुग्णांसाठीच्या तात्काळ ॲम्बूलन्स सेवेचा लाभ घ्या - रविंद्र ठाकरे *टोल फ्री क्रमांक 102 व 108 वर सेवा उपलब्ध

 



              नागपूर, दि. 23 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे  बाधित रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे तात्काळ ॲम्बूलन्स सेवा सुरु केली आहे. रुग्ण वाहिकेसाठी टोल फ्री क्रमांक 102 व 108 यावर दूरध्वनी केल्यास तात्काळ ॲम्बूलन्स सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.

    कोरोनाग्रस्त बाधित रुग्णांसाठी टोल फ्री क्रमांक 102 व 108 या क्रमांकावर सुरु करण्यात आलेल्या ॲम्बूलन्स रुग्ण सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

****

कोरोना उपाययोजनांचा शुक्रवारी आरोग्य मंत्री, गृहमंत्री घेणार आढावा * गुरुवारी भंडारा, गोंदिया जिल्ह्याला भेट * जिल्हा व कोविड रुग्णालयांना भेटी

 

नागपूर, दि. 23 : कोरोना विषाणूमुळे बाधित झालेले रुग्ण तसेच त्यांच्यावर वैद्यकीय उपचारासाठी उपलब्ध सुविधा याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख विभागातील भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय तसेच कोविड रुग्णालयांना भेट देवून पाहणी करणार आहेत.

            आरोग्य मंत्री राजेश टोपे व गृहमंत्री अनिल देशमुख गुरुवार, दिनांक 24  सप्टेंबर  भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत.  सकाळी 12.30 वाजता भंडारा व सायंकाळी  5 वाजता गोंदिया जिल्ह्याचा आढावा घेतील. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवारी नागपूर जिल्ह्याचा आढावा

 

            आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख नागपूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्य:स्थिती व उपाययोजना यासंदर्भात शुक्रवार, दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा घेणार आहेत. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत आढावा बैठकीत सहभागी होणार आहेत. आढावा बैठकीनंतर येथील कोविड रुग्णालयांना भेट देवून पाहणी करणार आहेत. त्यानंतर आरोग्य मंत्री  राजेश टोपे अमरावती ‍जिल्ह्यातील कोरोनासंदर्भात उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी अमरावतीकडे प्रयाण करणार आहेत.

                                                                   ****

 


Sunday 13 September 2020





        कोरोना नियंत्रणासाठी प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित

       पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आढावा बैठक

·         तूर्तास लॉकडाउन नाही; स्वयंशिस्त वाढवण्याचे आवाहन

·         मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

·         बेड मॅनेजमेंटसाठी आयएएस अधिकाऱ्यांनी आणखी सक्रिय व्हावे

·         ट्रेसिंग वाढवा; मृत्यूदर कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

·         मेयो व मेडिकलमध्ये वॉर रूम सुरू करण्याचे निर्देश

·         ऑक्सीजन पुरवठ्यातील सुलभता व उपलब्धतेवर चर्चा

·         गर्दी नियंत्रण, गृह अलगीकरणासाठी व्यापक मोहीम राबवा

·         वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची सेवा घ्या

  नागपूर, दि. 13 : नागपूरमधील मृत्यूदर कोणत्याही परिस्थितीत वाढता कामा नये. तसेच रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची अर्थात डब्लिंग रेट वाढावा, यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने दिलेले काम काटेकोरपणे पार पाडणे आवश्यक आहे. प्रत्येकाकडे जबाबदारी निश्चित करण्यात आली असून उद्यापासून पोलिसांनी शहरातील गर्दी नियंत्रित व शिस्तबद्ध करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे घेतलेल्या संयुक्त बैठकीत दिले.

         नागपुरातील वाढत्या रुग्ण संख्येला नियंत्रित करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणेसोबत प्रशासकीय अनुभव असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना बेड मॅनेजमेंट, कॉन्टक्ट ट्रेसिंग, प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात आल्या आहेत. प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यामुळे आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून आणीबाणीच्या परिस्थितीत कोरोना नियंत्रणाची कामे करावी, असे स्पष्ट निर्देश आज जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत दिले.

      पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी मुंबई येथून घेतलेल्या गर्दीवर नियंत्रणाच्या व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आज सर्व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाचारण करीत विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आढावा घेतला.

या बैठकीला पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, कोविड 19 च्या नोडल अधिकारी तथा वस्त्रोद्योग संचालक डॉ. माधवी खोडे-चवरे, मिताली सेठी, मनीषा खत्री, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, अतिरिक्त आयुक्त राम जेाशी, उपायुक्त मिलिंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी आशा पठाण, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. अविनाश गावंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार यांच्यासह वैद्यकीय तज्ज्ञ व कोविड19 नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

       नागपूरमध्ये खाटांची उपलब्धता नसल्याची सर्वत्र तक्रार आहे. त्यामुळे महानगरपालिकेने डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलची संख्या आणखी वाढवावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

     यावेळी त्यांनी बेड मॅनेजमेंट आणि मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या सनदी अधिकाऱ्यांसोबत खाटा उपलब्धतेच्या स्थितीबद्दलची चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत या दोन्हीही सरकारी हॉस्पिटलमधून कोरोनाचा रुग्ण परत जाता कामा नये. त्यासाठी खाटांची उपलब्धता दर्शविणारा डॅशबोर्ड सर्वांसाठी तातडीने उपलब्ध करावा. दोन्ही रुग्णालयांमध्ये वॉर रूमचे गठण करावे, वेगवेगळ्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढवा, रुग्णांच्या नातेवाईकांची संख्या हॉस्पिटलमधून कमी करा, रुग्णाबाबतची माहिती सुलभतेने मिळेल, असे नियोजन करा, अशा सूचना त्यांनी बैठकीत केल्या.

      या बैठकीला ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात आले होते. नागपूर व विदर्भातील अन्य जिल्ह्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची पूर्तता सुलभ पद्धतीने होण्यातील अडचणी जाणून घेतल्या. आवश्यकतेनुसार अन्य जिल्ह्यांना थेट ऑक्सिजन मिळेल, अशा पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तथापि, नागपूरमधल्या शासकीय व खाजगी दोन्हीही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही, याची जबाबदारी देण्यात आली.

    मनुष्यबळाच्या कमतरतेला लक्षात घेता नागपूर व परिसरातील शासकीय-निमशासकीय सर्व कॉलेजमधील शेवटच्या वर्षातील व शेवटच्या वर्षाची परीक्षा दिलेल्या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना रुग्ण सेवेमध्ये रूजू करून घ्यावे. तसेच आशा व अंगणवाडी सेविकांसोबतच परिचारिकांना देखील आवश्यक मानधन वाढवून देण्यावर त्यांनी भर दिला.

        नागरिकांमध्ये लक्षणे दिसल्याशिवाय चाचणी करायची नाही, असा गैरसमज आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी, मास्क वापरूनच बाहेर पडावे, अनावश्यक बाहेर पडू नये, अशा पद्धतीच्या मोहिमेला व्यापक प्रसिद्धी महानगरपालिकेने राबविण्याचे देखील त्यांनी सांगितले.

     यावेळी पालकमंत्री व गृहमंत्री यांनी रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी उद्यापासून गर्दीचे नियंत्रण व मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक व सक्त कारवाई करावी, असे निर्देश केले. 4 सप्टेंबर रोजी गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई मनपा आयुक्त आय. एस. चहल व तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने डॅशबोर्ड तयार करणे, वॉर रुम तयार करणे, दररोज आढावा घेणे अशा सूचना केल्या होत्या. या सूचनासंदर्भात आठ दिवसातील अंमलबजावणीबाबतचा आढावा यावेळी गृहमंत्र्यांनी घेतला.

    उपलब्ध औषध पुरवठा, ऑक्सिजन उपलब्धता, तसेच पोलिसांसाठी व यंत्रणेत काम करणाऱ्या अन्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राखीव खाटा ठेवण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. महानगरपालिकेने कोवीड योध्दांसाठी समर्पित अत्याधुनिक सोयीसुविधांसह रुग्णालय तयार करावे, ही सूचना केली. मात्र हे आरक्षण पाळताना दवाखान्यामध्ये कोणत्याही गंभीर रुग्णांची हेळसांड होता कामा नये, याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी देखील त्यांनी अधिकाऱ्यांवर निश्चित केली.

         यावेळी प्रशासनाची लॉकडाऊन संदर्भातील मते देखील त्यांनी जाणून घेतली. तथापि, हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्या समस्यांना लक्षात घेता, तूर्तास हा निर्णय घेणे योग्य नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. तथापि, यापुढे कोरोना सोबत लढताना व जगताना प्रत्येक नागरिकाला स्वयंशिस्तीने वागणे गरजेचे आहे. गरज नसताना बाहेर पडणे हे धोक्याचे असून मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे, तपासणी स्वयंप्रेरणेने करून घेणे या बाबींसाठी जनजागृती वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

 ********

Monday 7 September 2020

 जिल्हयात आज 1 हजार 390 रुग्णांना डिस्चार्ज

1 हजार 550 पॉझिटिव्ह तर 50 मृत्यू

 

            नागपूर, दिजिल्हयात आज 1 हजार 390 कोरोबाधित बरे होऊन घरी गेले. 1 हजार 550 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 41 हजार 32 झाली आहे. आता पर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 28 हजार 658  झाली आहे.

             एकूण क्रियाशील रुग्णापैकी 6 हजार 339 गृह विलगिकरणात आहेत. आज 50 मृत्यु झाले असून त्यापैकी 4 जिल्ह्याबाहेरील मृत्यू आहेत. आजघडीला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.84 टक्के आहे.

*****

 बाल शक्ती व बालकल्याण पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रित

            नागपूर, दि:  महिला व बालविकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कार 2021 साठी विविध व्यक्ती आणि संस्थांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. हे अर्ज www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने 15 सप्टेंबर 2020 पर्यंत स्विकारले जाणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी दिली आहे. 

            बाल शक्ती पुरस्कार हा 18 वर्ष पर्यंतच्या मुलांना शिक्षण, कला सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य या क्षेत्रात विशेष नाविन्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल दिला जातो. बालकल्याण पुरस्कार हा वैयक्तिक स्तरावर मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. तसेच संस्था स्तरावर बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. संस्था ही शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी तसेच बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

****

 दहेगाव ते कामठी रस्ता 11 सप्टेंबरपर्यंत बंद

            नागपूर, दि:  दहेगाव ते कुही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 246 चे बांधकाम पुर्णत्वास आले आहे. या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या कोलार नदीवरील पुलाची भार वाहण्याची क्षमता चाचणी करण्यात येत असून त्याकरिता दहेगाव ते कामठी रस्त्याचा भाग उद्या मंगळवार दि. 8 पासून 11 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. दहेगाव ते कामठी राष्ट्रीय महामार्ग 247 रस्त्यावरील वाहतूक सुरादेवी, कोराडी मंदीर, राष्ट्रीय महामार्ग 47, दहेगाव (रंगारी) ते खापरखेडा या मार्गाने वळविण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता न.व.बोरकर यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.

****

 राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नागपूर, दि.७ : राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त हरिष भामरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तहसीलदार अरविंद सेलोकार यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
*****