Thursday 2 May 2024

समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प घेवूया - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


 








नागपूर, दि. 1 : महाराष्ट्राने देशाच्या विकासात सामाजिक सुधारणांचा भक्कम पाया रोवला आहे. राज्याने औद्योगिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे तसेच विविध क्षेत्रात राज्याने प्रगतीचे मानके साध्य केले आहे. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने आपण सिंहावलोकन करून समृद्ध राज्य घडवण्याचा संकल्प करुया, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

 

येथील कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विशेष पोलीस आयुक्त छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह केंद्र व राज्य सरकारच्या नागपूर स्थित विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी-कर्मचारी  यावेळी उपस्थित होते.

 

राज्याने स्थापनेपासून विविध क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली आहे. विकासाच्या वाटचालीत नागपूर व विदर्भाने नागरी सुविधांवर भर देवून पायाभूत सुविधेच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीने अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल आदी नव्या प्रगतीची नांदी असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

 

श्रमातून नवनवीन सृजन करणाऱ्या कामगारांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत कामगारदिनाच्या शुभेच्छा  दिल्या.

 

तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री  श्री. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलीस बँडपथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताचे सादरीकरण केले. पथसंचलनात सहाभागी होणाऱ्या विविध पथकांचे त्यांनी निरीक्षण केले. परेड कमांडर सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक कोते यांच्या नेतृत्वात राज्य राखीव पोलीस बल, नागपूर शहर व ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस अशा विविध पथकांचे पथसंचलन झाले.

00000

Tuesday 30 April 2024

नागपूर शहरातील वाहतूक सुधारणांसोबतच पार्कीगचा प्रश्न प्राधान्याने सोडवा - विजयलक्ष्मी बिदरी

 नागपूर शहरातील वाहतूक सुधारणांसोबतच



पार्कीगचा प्रश्न प्राधान्याने सोडवा

-         विजयलक्ष्मी बिदरी

Ø शहर वाहतूक व्यवस्थेचा आढावा

Ø सिग्नल व्यवस्था आधुनिकीकरणासाठी  197.63 कोटी

Ø पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा

Ø समन्वयातून अपघातमुक्त शहरासाठी आराखडा

 

        नागपूर,दि.३० : नागपूर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासोबतच सिग्नल व्यवस्था  एकाचवेळी कार्यान्वीत होण्यासाठी (सिंक्रोनाईस) १९७ कोटी ६३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून येत्या जून अखेरपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

 

          विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर शहर व सभोवतालच्या परिसरातील वाहतूक व्यवस्था तसेच पार्कीगचा प्रश्न सोडविण्यासाठी  श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी सूचना केल्या.

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिणा, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, महसूल उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशीकांत सातव, नगररचना विभागाचे सहसंचालक श्रीमती सु.प्र.थुल, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार आदी उपस्थित होते.

          नागपूर शहर  सभोवतालच्या परिसरात वाहतुकीसंदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

          नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल करुन नागरिकांना  उत्तम वाहतूक सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले असून त्याअंतर्गत रस्ते सुरक्षेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याअंतर्गत ट्रॉफिक सिग्नलच्या सिंक्रोनायझेशनचा १९७ कोटी ६३ लक्ष रुपयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून येत्या जून पासून कामाला सुरुवात होत आहे. शहरातील वाहतूक शाखेचे आधुनिकीकरण व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक अत्याधुनिक साधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यामध्ये दहा टोइंग व्हॅन, पाच अतिरिक्त इंटरसेफ्टर वाहनांचा समावेश आहे.

२३ अपघात प्रवण स्थळांची विशेष दुरुस्ती

          नागपूर शहर व परिसरात २३ अपघात प्रवण स्थळ निश्चित करण्यात आले असून भविष्यात अपघात होणार नाही यादृष्टिने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. महानगरपालिकेतर्फे १५ अपघात प्रवण स्थळांवर गतीरोधक, झेब्रा क्रॉसिंग, सूचना फलक, सिग्नल व्यवस्था, अतिक्रमण निर्मुलन तसेच डिव्हायडर दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. अपघात प्रवण स्थळांवर होणारे अपघात टाळण्यासाठी  या ठिकाणांवर यापूर्वी झालेले अपघात, जीवीत हानी तसेच अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबतचे सचित्र माहितीफलक तात्काळ लावण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी यावेळी दिले.

          रस्त्यावर पार्कीगमुळे होणारा वाहतूक अडथळा दूर करण्यासाठी शहरात ७५ रस्त्यांची निवडकरुन ऑन स्ट्रीट पार्कीगची सुविधा निर्माण करण्यात येत आहे. त्यापैकी पोलीस विभागाच्या समन्वयाने १५ रस्त्यांवर पार्कीग सुविधा येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सूचना फलक व पार्कींगची जागा निश्चित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

          शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या  पार्कींगसाठी विविध भागात जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यासोबतच बळकस चौक, नेताजी मार्केट, महात्मा फुले भाजी बाजार आदी ठिकाणी पार्कींगची सुविधा तसेच वाहन तळासाठी राखीव असलेल्या जागेचा शोध घेण्याची सूचना यावेळी करण्यात आल्या.

 पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीला प्राधान्य

          पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पाणी साचणार नाही यादृष्टिने नागपूर महानगरपालिकेतर्फे खड्डे भरण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत ४२ हजार ६८ चौ.मिटर क्षेत्रावरील ६३४ खड्डे भरण्यात आली आहेत.यासोबतच रस्त्यांवरील झाडांच्या आवश्यकतेपेक्षा वाढलेल्या फांद्यांची कापणी करणे, विद्युत वाहिन्यांना अडथळा निर्माण होणार नाही यादृष्टिने उपाययोजना करण्यात याव्यात. यादिशेने तात्काळ कार्यवाही सुरु करण्यात आली असून यासाठी कंत्राटदाराची नियुक्त करण्यात आल्याची माहिती प्रभारी आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी दिली.

          महसूल विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या विविध उपायोजनांची यावेळी माहिती दिली.

0000


हज यात्रेकरुंना प्राधान्याने सोई-सुविधा पुरवा -विभागीय आयुक्त बिदरी Ø 'हज यात्रा’ सुविधा संबंधी आढावा

 




        नागपूर,दि.३० : हज यात्रेसाठी नागपूर येथून प्रस्थान करणाऱ्या यात्रेकरुंना प्राधान्याने आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध विभाग प्रमुखांना सोपविलेली जबाबदारी  वेळेत व चोखपणे पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी  बिदरी यांनी आज दिले.

 

         विभागीय आयुक्त कार्यालयात श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली ‘हज यात्रा २०२४’ सुविधा संबंधी आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य हज समितीचे कार्यकारी अधिकारी  इम्तीयाज काजी, पोलीस प्रशासन, महानगरपालिका, विमानतळ प्रशासन, वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, एअर इंडिया आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

          नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून हज यात्रेसाठी  दिनांक २६ मे ते ९ जून २०२४ दरम्यान महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील हज यात्रेकरु प्रस्थान करणार आहेत. तर दिनांक १ ते २१ जुलै २०२४ दरम्यान यात्रेकरु हज यात्रेवरुन परतणार आहेत. या दरम्यान यात्रेकरुंची शहरातील 'हज हाऊस' येथे निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

 

       हज हाऊस येथे यात्रेकरुंसाठी उभारण्यात येणारे विविध मदत कक्ष, विमानतळावर पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सुविधा तसेच विमानतळावरील मदत कक्षांच्या तयारीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. यात्रेकरुंचा ‘हज हाऊस’ येथील वास्तव्य तसेच विमानतळ परिसरातील व्यवस्था याबाबत संबं‍धित शासकीय यंत्रणांनी पुरवावयाच्या सुविधा व  व्यवस्थेबाबत गतीने कार्य करावे व उत्तमोत्तम सोईसुविधा उपलब्ध करुन द्याव्या, अशा सूचना यावेळी श्रीमती बिदरी यांनी दिल्या.

 

00000

 

 

Monday 29 April 2024

मनरेगांतर्गत बांबू लागवडीला प्राधान्य द्या -मिशन महासंचालक नंदकुमार Ø नागपूर विभागाची आढावा बैठक



 

मनरेगांतर्गत बांबू लागवडीला प्राधान्य द्या

                                                                                 -मिशन महासंचालक नंदकुमार

 

Ø नागपूर विभागाची आढावा बैठक

नागपूर दि.२९ : बांबू लागवडीमुळे रोजगार निर्मिती,  पर्यावरण रक्षण, हरित आच्छादनात वाढ होते व सिंचन व्यवस्था बळकट होण्यास मदत होत असल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) नागपूर विभागात  बांबू लागवडीची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांनी आज संबंधीत विभागांच्या यंत्रणांना दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘समता मुलक शाश्वत पर्यावरणीय विकासातून समृध्दीसाठी मनरेगा मिशन मोडवर राबविणे’ विषयावर  श्री. नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

 विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, आदिवासी  विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, पर्यावरण व वातावरणीय बदलाचे संचालक अभिजीत घोरपडे, रोहयोच्या उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांच्यासह नागपूर, चंदपूर, वर्धा, भंडारा,गोंदिया आणि गडचिरोली जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंधारण, वने व पर्यावरण, पाटबंधारे, कृषी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

मनरेगांतर्गत चालू आर्थिक वर्षात राज्यात १ लक्ष हेक्टर क्षेत्रावर हरित आच्छादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून गरिबी निर्मूलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये बांबू लागवडीला प्राधान्य द्यावे, अशा सूचना श्री.नंदकुमार यांनी दिल्या. बांबू लागवडीसाठी जलव्यवस्थापन आराखडा, कुरण विकास तसेच ‘जलतारा’संकल्पनेच्या अंमलबजावणीसंदर्भात  त्यांनी मार्गदर्शन केले.

मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन, महसूल, वने व पर्यावरण, ग्रामीण विकास, कृषी, सार्वजनिक बांधकाम, मृद संधारण, सिंचन आदी विभागांनी उत्तम समन्वय राखून शेतकऱ्यांना शेती पूरक बांबू लागवडीच्या माध्यमातून आर्थिक्‍ स्त्रोत उपलब्ध करुन द्यावा. तसेच,या कार्यक्रमाच्या गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीतून जनतेला गरिबीतून बाहेर काढणेही शक्य होईल. जिल्हयाच्या हवामानानुसार बांबूच्या जातिची निवड करण्याबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी नागपूर विभागात मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच, बांबू लागवडीला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. कोनबॅक बांबू संस्थेचे संजीव करपे यांनी बांबू लागवड, उत्पादन आणि विपनण आदी विषयांवर मार्गदर्शन केले. राज्यात बांबू लागवडीसाठी नेमण्यात आलेल्या टास्कफोर्स, स्टिअरिंग कमिटी आणि टेक्निकल कमिटी आदींविषयी अभिजीत घोरपडे यांनी  माहिती दिली. राजलक्ष्मी शहा यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

0000000