Tuesday 31 October 2017

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे 62 हजार 263 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ


·         केंद्रीय जल आयोगातर्फे 750 कोटी रुपये
·         अपूर्ण कामांना मिळाली गती
·         वितरण प्रणालीच्या कामामुळे शेतकऱ्यांना थेट पाणी
·         बंद नालीका वितरणामुळे पाण्याचा अपव्यय टळणार
·         421 कोटी रुपयाचे निविदा, 30 हजार 600 हेक्टरला पाणी

नागपूर,दि.31 : गोसीखुर्द या राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाने नाबार्डमार्फत 750 कोटी रुपये उपलबध करुन दिल्यामुळे मुख्य कालव्यापासून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत थेट पाणी पोहचविण्याचे बंदनालिका वितरण प्रणालीद्वारे पाणी देण्यात येणार आहे. यासाठी 421 कोटी रुपयाच्या निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली असून यामुळे लाभक्षेत्रातील 30 हजार 600 हेक्टर प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प हा नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्हयाच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्यामुळे राज्य व केंद्र शासनाने अपूर्ण असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे मुख्य धरणाचे काम पूर्ण झाले असून प्रकल्पामध्ये 620 दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पातून 62 हजार 263 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असून या प्रकल्पाच्या पाणी वितरीकेचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे 2 लाख 50 हजार 800 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी 2019-20 पर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे.
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प नऊ घटका मिळून तयार झाला असून यामध्ये मुख्य धरण चार उपसासिंचन योजना, उजवा कालवा, डावा कालवा, असोला-मेंढा प्रकल्प व इतर छोटया पाच उपसासिंचन योजनेचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या कामांना गती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनासाठी पाणी मिळत असल्यामुळे भात पिकासह इतर पीकांच्या उत्पादनामध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रकल्पाचे काम नियोजित आराखडयानुसार पूर्ण करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राथमिकता दिली असून केंद्र शासनाकडूनही निधी उपलब्ध होत आहे.
पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पामधून उजवा कालवा 99 किलोमीटरचा असून भंडारा व चंद्रपूर या जिल्हयातील सुमारे 71 हजार 810 हेक्टर सिंचन निर्माण होणार असून त्यापैकी 13 हजार 926 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. डावा कालवा हा 23 किलोमीटरचा असून यामधून 31 हजार 577 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणारअसून त्यापैकी 10 हजार 683 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. उजवा कालव्याच्या पुढे आसोला मेंढा प्रकल्प व मुख्य कालव्यापर्यंत राहणार असून त्याची लांबी 43 किलोमीटरची आहे. यामधून 12 हजार 356 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे.
गोसीखुर्द प्रकल्पामधून तीन जिल्हयांना प्रत्यक्ष लाभ मिळत असून यामध्ये नागपूर जिल्हयातील 22 हजार 997 हेक्टर सिंचन क्षमतेपैकी 13 हजार 696 हेक्टर क्षेत्राला सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. भंडारा जिल्हयातील 87 हजार 647 क्षमतेपैकी 24 हजार 300 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुरु आहे, तर चंद्रपूर जिल्हयातील 1 लक्ष 40 हजार 156 सिंचन क्षमतेपैकी 24 हजार 206 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. या प्रकल्पावर चार उपसासिंचन योजना असून यामध्ये टेकेपार उपसासिंचन योजनेवर 7 हजार 710 हेक्टर, आंभोरा उपसासिंचन योजनेवर 11 हजार 195 हेक्टर, मोखाबर्डी उपसासिंचन योजना तसेच नेरला उपसासिंचन योजनेवरही प्रत्यक्ष सिंचनाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तीन वर्षाचा कालबध्द नियोजन आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता अरुण कांबळे, तसेच अधीक्षक अभियंता जे.एम. शेख यांनी दिली.
प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्ट
Ø  डिसेंबर-2017 पर्यंत 940 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा व ऑक्टोबर-2018 पर्यंत 1146 दलघमी पूर्ण पाणीसाठा निर्माण करणे.
Ø  धरणाचे सांडव्यामधील चार बांधकाम विमाचके बंद करण्याचे काम पूर्ण करणे.
Ø  मोखाबर्डी उपसासिंचन योजना कार्यान्वीत करुन 1498 हेक्टर व जून-2018 पर्यंत अतिरिक्त 7 हजार 250 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे.
Ø  बंदनलिकेद्वारे 42 हजार 200 हेक्टर क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण करणे.
Ø  कालव्यावरील पाच उपसासिंचन योजना जून-2019 पर्यंत पूर्ण करणे.

अनिल गडेकर
मो.989
0157788
000000000

वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राकरीता चाचणी स्थळात बदल

        नागपूर दि. 31 : योग्यता प्रमाणपत्राकरीता वाहनांची चाचणी बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी नवीन इमारत परिसर, ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या बाजुला, इंदोरा, टेका नाका येथे घेण्यात येणार आहे. याकरीता 250 मिटर ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे.
            यापुर्वी ही चाचणी वायुसेना नगर, दाभा येथे घेण्यात येणार होती. स्थळातील बदलाची सर्व वाहनधारकांनी नोंद घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद कृ. वाडेकर यांनी केले आहे.
******

राष्ट्रीय एकता दौड एकतेला, एकात्मतेला समर्पित करणारी

 सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

        नागपूर दि. 31 :  नेहरु युवा केंद्र, केंद्रीय खेळ मंत्रालय तथा केंद्रीय रिझर्व पोलिस बल यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन  करण्यात आले होते. दौडचा शुभारंभ महापौर नंदा जिचकार, पोलिस उपमहानिरीक्षक संजय कुमार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.  
            यावेळी सीआरपीएफ कमांडन्ट मनोज ध्यानी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रदीप लोणारे, असिस्टंट कमांडर सुबोध कुमार, हरिनारायण, सुनील पाटील, नेहरु युवा केंद्राचे युवा समन्वयक शरद साळुंके, निस्वार्थ अखंड सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन घोडे, लाईट ऑफ होप फाऊंडेशनचे अध्यक्ष अक्षय पाटील, स्पर्श जनहिताय बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कपिलकुमार  आदमाने उपस्थित होते.
            दौडला बास्केट बॉल ग्राऊंड, बजाज नगर येथून प्रारंभ झाला. व्हीएनआयटी गेट, अभ्यंकर नगर चौक येथून मार्गक्रमण करत कस्तुरबा भवन येथे दौडचा समारोप करण्यात आला. दौडमध्ये  सीआरपीएफचे 85 कमांडर, नेहरु युवा केंद्राचे सदस्य, औद्योगि‍क प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी, निस्वार्थ फाऊंडेशनचे सदस्य, लाईट ऑफ होप फाऊंडेशनचे सदस्य, राजीव गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. उपस्थितांना नेहरु युवा केंद्राचे युवा समन्वयक शरद साळुंके यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.
             सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाची अखंडता राखण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात येते. ही दौड एकतेला, एकात्मतेला समर्पित असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
            प्रारंभी प्रास्ताविक युवा समन्वय शरद साळुंके यांनी केले. संचालन राखी उके यांनी तर, आभार कपिलकुमार आदमाने यांनी मानले.
******

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

        नागपूर दि. 31 : विभागीय आयुक्त कार्यालयात आज राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती  आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिनाची  व संकल्प दिनाची शपथ दिली.
            यावेळी  उपायुक्त संजय धिवरे, पराग सोमन, श्रीधर फडके, सहाय्यक आयुक्त  घनश्याम भुगांवकर, तहसिलदार श्रीराम मुंदडा, रविंद्र माने, श्रीमती इंदिरा पाखले,  सहाय्यक संचालक कमलकिशोर राठी, श्रीमती कुमुदिनी होडोळे, नायब तहसिलदार नितीन गौर, श्रीमती सुजाता गावंडे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                                   जिल्हाधिकारी कार्यालय
 नागपूर दि. 31 :  : जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के.राव, उपजिल्हाधिकारी रविंद्र खजानजी, प्रकाश पाटील, सुनिल पडोळे, श्रीमती विजया बनकर, श्रीमती मनिषा जायभाये, तहसीलदार प्रदिप कापसे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****      

एलफिन्स्टन रोड रेल्वे पादचारी पूल 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करणार

लष्करामार्फत पहिल्यांदाच नागरीकरणासाठी बांधकाम
संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
·         रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एलफिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनला दिली भेट
·         लष्करामार्फत एलफिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन, करी रोड रेल्वे स्टेशन आणि अंबिवली रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलाचे होणार बांधकाम
मुंबई, दि.31: एलफिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन येथे बांधण्यात येणाऱ्या नवीन पादचारी पुलाच्या (फूट ओव्हर ब्रीज) जागेची पाहणी आज केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे राज्यमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि पुलाच्या आराखड्याची माहिती घेतली. या पुलासह करी रोड रेल्वे स्टेशन आणि अंबिवली रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलांची बांधणी लष्करामार्फत 31 जानेवारी 2018 पर्यंत करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी श्रीमती सीतारामन यांनी केली.
        संरक्षणमंत्री श्रीमती सीतारामन म्हणाल्या, सैन्यदलाकडून लष्करी कारणासाठी तसेच आपत्‍ती काळामध्ये अशी बांधकामे होत असतात. मात्र एलफिन्स्टन येथे झालेली दुर्घटना अत्यंत मोठी होती. मुंबई येथे देशातील अनेक भागातील नागरिक कामानिमित्त राहतात. या दुर्घटनेत अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. हे लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने संरक्षण मंत्रालयाकडे केलेली विनंती लक्षात घेऊन लष्कराने हे काम करावे असे ठरविण्यात आले. नागरी कारणासाठी लष्कराकडून बांधकाम होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही श्रीमती सीतारामन म्हणाल्या.
            एलफिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन येथे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी होती, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून राज्य शासनाकडून उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. नेहमीच्या कार्यपद्धतीने येथे नवीन पुल बांधावयाचे काम हाती घेतले असते तर त्यास खूप कालावधी जातो. मात्र भारतीय सेनेकडे अशा प्रकारचे काम कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचे कौशल्य असल्याने संरक्षण मंत्रालयाकडे हे काम करण्याची विनंती करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने ही विनंती मान्य केली. याअंतर्गत एलफिन्स्टन रोड येथील पुलासोबतच करी रोड रेल्वे स्टेशन आणि अंबिवली रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलांचे कामही लष्कराकडून केले जाणार आहे.
           यावेळी पियुष गोयल म्हणाले, एलफिन्स्टन येथील दुर्घटनेनंतर रेल्वेकडून उपनगरीय रेल्वे स्थानकांची पाहणी करुन सुरक्षाविषयक पाहणी केली. त्यानुसार कोणत्या उपाययोजना करता येतील तसेच आवश्यक सुधारणांबाबत अहवाल तयार करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाकडे तीन रेल्वे स्टेशन वरील पादचारी पुलांचे काम हाती घेण्याची विनंती केली. लष्कर देशाच्या संरक्षणासाठी सतत तत्पर असतेच मात्र हे पुलांच्या कामानिमित्ताने राष्ट्रबांधणीचे काम हाती घेऊन एक नवीन आदर्श घालून दिला आहे, असेही ते म्हणाले.
            शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार, राज पुरोहित, लष्कराचे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातचे जनरल ऑफ कमांड जनरल विश्वम्बर, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आदी उपस्थित होते.

0000

दिलखुलास कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई,दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात  महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटीलयांची  विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीवरून उद्याबुधवार, दि.१ नोव्हेंबर आणि गुरुवार, दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५  ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका मनाली दीक्षित यांनी घेतली आहे.
        गेल्या तीन वर्षातील महसूल,मदत व पुनर्वसन,सार्वजनिक बांधकाम विभागाची वाटचाल, शेती  क्षेत्राच्या विकासासाठी घेण्यात आलेले शासनाचे निर्णय व कर्जमाफी, मराठा आरक्षणाच्या महत्वपूर्ण निर्णयाची कार्यवाही, संगणकीकृत सातबारा, तलाठी सजाची निर्मिती, आपत्ती व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत सुधारणा, राज्यातील महामार्गांच्या कामांना गती मिळण्यासाठी  घेण्यात आलेल्या निर्णयांची सविस्तर माहिती महसूल मंत्रीश्री. पाटील यांनी 'दिलखुलास'कार्यक्रमातून दिली आहे. 

००००

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई, दि. 31 :श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.
माजी राष्ट्रपती श्री राजपक्षे हे महाराष्ट्र भेटीवर आले आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
श्री. राजपक्षे यांनी औरंगाबाद येथील अजंठा व वेरूळ लेण्यांना भेट दिली. या भेटीची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. या लेण्या म्हणजे शिल्पकलेच्या अदभुत नमुना आहेत. या ठिकाणी श्रीलंकेतील नागरिक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. त्यांना तेथे पुष्पहार अर्पण करण्याची सोय करावी, अशी विनंती श्री. राजपक्षे यांनी यावेळी केली.
श्री. राजपक्षे यांच्या विनंतीनुसार अजंठा येथे सोय करण्यात येईल, असे सांगून श्रीलंकेने गेल्या काही वर्षात केलेल्या प्रगतीने आपण प्रभावित झाल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
श्रीलंकेला दिलेल्या भेटीच्या जुन्या आठवणी यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पर्यटन, गुंतवणूक आदी विषयावर चर्चा झाली.

००००

मराठा समाजातील तरुणांना कर्ज वाटप करण्यासाठी त्वरित कार्यवाही सुरू करा

मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई, दि.३१ : मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करता यावे यासाठी तीन योजना तयार करण्यात आल्या आहेत. या योजनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने प्रस्ताव तयार करून उपसमितीसमोर मंजुरीसाठी ठेवावेत आणि त्वरित कर्ज वाटप सुरू करावे, असे निर्देश आज मराठा मोर्च्याच्या मागण्यांसंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले.
            मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.     यापूर्वी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या बाबींचा सुरुवातीला आढावा घेण्यात आला.
            यावेळी श्री.पाटील म्हणाले, मराठा समाजातील नागरिकांनी रोजगार उभारावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत १० लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, ५० लाखांपर्यंत गट कर्ज परतावा योजना आणि एफपीओ कर्ज योजना आखल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणी आठवड्याभरात प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी मंत्रिडळ उपसमितीकडे पाठवावा.     ओबीसी प्रमाणपत्र सहजपणे मिळण्यासाठी शासन निर्णय जारी करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी असलेली क्लिष्टता संपविण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत श्री.पाटील यांनी दिले.
            मराठा समाजातील विद्यार्थ्यांना राज्यभर वसतिगृह उपलब्ध व्हावे इतर ठिकाणी असलेल्या वसतिगृहांसाठी भाडे देण्याबाबत उपसमितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. वसतिगृहांना भाडे देण्याबाबत वित्त विभागासोबत चर्चा करावी आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा सूचना महसूल मंत्री श्री.पाटील यांनी दिल्या.
कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमाला लवकरच सुरुवात
            कौशल्य विकास विभागामार्फत मराठा समाजातील तरुण-तरुणींना स्वयंरोजगार उभारता यावा यासाठी कौशल्य विकास उपक्रम राबविला जाणार आहे. शेतीपूरक व्यवसायाशी निगडित कौशल्य विकास उपक्रम राबवून २ लाख ८२ हजार इतक्या मोठ्याप्रमाणावर तसेच ४५ हजार व्यक्तींना वैयक्तिक स्वरूपात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमाला केंद्र शासनाने मान्यता दिली असून लवकरच या उपक्रमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी उपसमितीच्या बैठकीत दिली. याबाबत पुढील आठवड्यात उपसमितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
यावेळी समितीचे सदस्य सहकार मंत्री सुभाष देशमुख, शिक्षण मंत्री विनोद तावडे, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर उपस्थित होते.
0 0 0



मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आधारकार्डशी जोडावे

          मुंबई, दि. 31 :समाज कल्याण अधिकारी, बृहन्मुंबई या कार्यालयामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता विविध योजना राबविण्यात येतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शाळांना व पालकांना कळविण्यात येते की, 2017-18 या वर्षापासून अनुसूचित जाती, विमुक्त व भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्गात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे अर्ज https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर भरावेत.
            संकेत स्थळावरील योजनेचा लाभ मिळविण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आधार कार्ड स्वत:च्या नावे असलेल्या बँक खात्याशी लिंक करुन घ्यावे, तसेच योजनेचा अर्ज भरण्याबाबत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी संपर्क साधावा, असे समाज कल्याण अधिकारी, बृहन्मुंबई यांनी कळविले आहे.

००००

शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क इत्यादी लाभासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाडीबीटी संकेत स्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

          मुंबई, दि. 31 :विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गामधील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता व इतर अनुज्ञेय फीचा लाभ मंजुरीसाठी लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजना (DBT) लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागांतर्गत मंजूर करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता व इतर अनुज्ञेय फीचा लाभ मिळण्यासाठीचे अर्ज वित्तीय वर्ष 2017-18 पासून https://mahadbt.gov.in हे संकेतस्थळ विकसीत करण्यात आले आहे.
            सर्व संबंधितांनी उपरोक्त संकेतस्थळावर त्यांचे अर्ज तात्काळ अपलोड करण्याची कार्यवाही करावी. यासाठी काही तांत्रिक अडचणी किंवा शंका उद्भवल्यास DBT टोल फ्री क्र. 18001025311 किंवा mahadbt.helpdesk@maharashtra.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, मुंबई शहर यांनी कळविले आहे.

००००

सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त इंदिरा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली

मुंबई, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त 'राष्ट्रीय एकता दिवस' आणि दिवंगतप्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'राष्ट्रीय संकल्प दिन' निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस  मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुष्पहार व फुले अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. 
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थितांना 'राष्ट्रीय एकता दिवसा’चीशपथ दिली. या प्रसंगी राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे, कामगार मंत्री संभाजी पाटील, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुमित मल्लिक, अपर मुख्य सचिव भगवान सहाय, उपसचिव छाया वडते, मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

००००

मी लाभार्थी, हे माझे सरकार’ प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 31:माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित मी लाभार्थी, हे माझे सरकारया प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात झाले.
            यावेळी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक अजय अंबेकर, शिवाजी मानकर उपस्थित होते.
            महासंचालनालय निर्मित लाभार्थ्यांवर आधारित ध्वनीचित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि अन्य मान्यवरांनी प्रदर्शनाची पहाणी केली. प्रदर्शनातील माहितीबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

००००

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त ‘रन फॉर युनिटी’ दौड


मुंबई दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस निमित्ताने रन फॉर युनिटीया दौडीचा प्रारंभ राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  एनसीपीएयेथूनकरण्यातआला.
           या कार्यक्रमास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार संजय काकडे, आमदार राज पुरोहित, मुख्य सचिव सुमित मल्लिकउपस्थित होते.
           यावेळी राज्यपाल महोदय यांनी इंग्रजी भाषेत उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी मराठीमध्ये शपथ दिली. दौडमध्ये विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, एन.सी.सी., एन.एस.एस. चे विद्यार्थी, भारत स्काऊट गाईडचे विद्यार्थी, विविध जिमखान्यांचे खेळाडू, शासकीय कार्यालयाचे कर्मचारी, विविध बँका तसेच नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मरीन ड्राईव्हमार्गे दौडचा समारोप शेवटी ग्रँट मेडिकल जिमखाना येथे झाला.
           यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाची अखंडता राखण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. आज त्यांच्या नावाने संपूर्ण देशभरात रन फॉर युनिटीदौड आयोजित केली जात आहे. ही धाव राष्ट्रीय एकतेला, एकात्मतेला समर्पित आहे. सर्व वयोगटातील नागरिक यामध्ये सहभागी होऊन हा देश एक राहील, देशाची अखंडता कोणीही दूर करू शकत नाही अशा प्रकारचा संदेश या दौडीच्या माध्यमातून देण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
           कार्यक्रमास बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, जिल्हाधिकारी संपदा मेहता उपस्थित होत्या.

००००

Monday 30 October 2017

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवन अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा


मुंबई, दि. 30 : केंद्रीय दक्षता आयोगाकडून दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले जाते. सदर सप्ताहाची सुरुवात सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2017 रोजी झाली आहे.
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सोमवारी (दिनांक 30) राज्यपाल चे विद्यासागर राव यांचे सचिव बी वेणूगोपाल रेड्डी यांनी राजभवनातील अधिकारीकर्मचारी तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा दिली. कालबाह्य आणि अतिरिक्त प्रक्रियाकमी करून कामकाजातील पारदर्शकता वाढविल्यास भ्रष्टाचारावर नियंत्रण आणता येऊ शकेल असेराज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी यावेळी दिलेल्या संदेशात सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य प्रशासन विभागामार्फत राज्यात राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आपल्या संदेशाद्वारे यावेळी केले.
जीवनाच्या सर्व क्षेत्रातून भ्रष्टाचाराचे उच्चाटण करण्याची तसेच कार्यक्षेत्रात सचोटी व पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली.
००००

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील


मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात  महसूलमदत व पुनर्वसनसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांची  विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दिनांक ३१  ऑक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका मनाली दीक्षित यांनी घेतली आहे.
             गेल्या तीन वर्षातील महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम विभागाची वाटचालशेती  क्षेत्राच्या विकासासाठी घेण्यात आलेले सरकारचे निर्णय व कर्जमाफीमराठा आरक्षणाच्या महत्वपूर्ण निर्णयाची कार्यवाही,संगणकीकृत सातबारातलाठी सज्जांची निर्मितीआपत्ती व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत सुधारणाराज्यातील महामार्गांच्या कामांना गती मिळण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांवर सविस्तर माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे. 
००००

सोयाबीन खरेदीसाठी तालुकास्तरावरील कमाल उत्पादकता ग्राह्य धरावी - पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत

मुंबई दि. 30 : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंडलनिहाय हेक्टरी उत्पादकता निश्चित करुन त्यातील कमाल उत्पादकता तालुका सरासरी म्हणून ग्राह्य धरावी आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांकडून सोयाबीन तसेच मूग आणि उडीदाची खरेदी करण्यात यावी, असे निर्देश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.
किमान आधारभूत दराने शासकीय खरेदी केंद्रांवर खरेदी करण्यात येत असलेल्या सोयाबीनउडीद व मूग आदीच्या कमाल खरेदी प्रमाणाबाबत बैठक श्री. खोत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज पार पडली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमारमहाराष्ट्र राज्य को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक जे. पी. गुप्ताकृषी विभागाचे संचालक डॉ. सु. ल. जाधवपणन सहसंचालक ए. एल. घोलकरमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक अविनाश पांडेसुभाषचंद्र महन्ती आदी याप्रसंगी उपस्थित होते.
नाफेडकडून 10 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात येणार असून राज्य शासनाकडूनही अतिरिक्त 10 लाख क्विंटल सोयाबीन खरेदीच्या तयारीबाबत‍ कार्यवाही करावीअसे निर्देश देऊन श्री. खोत म्हणाले कीराज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावेत. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर सोयाबीनउडीद आणि मूग खरेदीसाठी आणताना चांगल्या दर्जाचा कृषीमाल आणणे गरजेचे आहे. सोयाबीनची खरेदी करण्याची परवानगी शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही देण्यात आली आहे. त्यामुळेही सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी होईल. सध्या 121 सोयाबीन खरेदी केंद्रे86 मूग खरेदी केंद्रे तर 87 उडीद खरेदी केंद्रे सुरु आहेत. शेतकऱ्यांकडून हा कृषीमाल खरेदी करण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलता बाळगून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावेअसेही श्री. खोत यावेळी म्हणाले.
००००