Sunday 30 September 2018

आदिवासी समाजाला वनजमीन पट्टे देण्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार- मुख्यमंत्री




          शिर्डी येथील वीर राघोजी भांगरे नगर येथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम आयोजित अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते.  यावेळी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष जगदेवराम ओराममेघालयचे माजी राज्यपाल रंजीत शेखर मुशाहारीमहंत रामगिरीजी महाराजश्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष सुरेश हावरेस्वागत समितीचे अध्यक्ष सुरेश कोते,पद्मश्री लक्ष्मीकुटी अम्मा,  निलीमा पट्टेडॉ. दासरी श्रीनिवासनलक्ष्मणराव टोकलेकमलचंद भजदेव आदी उपस्थित होते.
        श्री. फडणवीस म्हणालेराज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. आदिवासी क्षेत्रात विविध विकासकामांच्या माध्यमातून आदिवासी  समाजाला सक्षम बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पेसा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून त्यानुसार पाच टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे.  आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावायासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदिवासींना जमीन अधिकार प्राप्त व्हावायासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून डिसेंबर अखेरीस जमीन पट्टे देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईलअसे त्यांनी स्पष्ट केले.
        आदिवासी समाजाने आपली संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न केला असून ब्रिटीशांच्या आक्रमणानंतरही त्यांनी आपली भाषासंस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवली आहे . छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रजांच्या काळात आदिवासी बांधवांनी पराक्रम गाजविला. जलजमीन आणि जंगलाच्या अधिकारासाठी बिहारमधील तिखामाजीमहाराष्ट्रातील बाबुराव शरमाकेबिरसा मुंडा आदींनी अपार साहस दाखवले,असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
        देशात विविध भाषापरंपरा आहेत. मात्र विविधतेतून एकता हे देशाचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य जपत वनवासी कल्याण आश्रमाने शिक्षण आणि संस्कृतीच्या प्रसारात महत्त्वाचे योगदान दिले. ब्रिटीशांनी शिक्षणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलेल्या वनवासी समाजाला वनवासी कल्याण आश्रमाने शिक्षणाशी जोडले. त्यांच्या मूलभूत क्रीडा कौशल्याला वाव दिला. त्यामुळे विविध क्रीडा प्रकारात या समाजातील तरुण-तरुणी देशाचे नाव उंचावताना दिसतातअसेही ते म्हणाले.
             डॉ. मुशाहिरी यांनी देशातील विविधता हे वैशिष्ट्य असल्याचे सांगत आदिवासींनी ही परंपरा जोपासल्याचे सांगितले. जातीभेद विसरुन सर्वांनी मानवधर्माचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले. श्री. ओराम यांनी आदिवासी समाज मुख्य प्रवाहात यावा, त्याच्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात यासाठी वनवासी कल्याण आश्रमाचे काम सुरु असल्याचे सांगितले.
          यावेळी महंत रामगिरीजी महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  श्री. कोते यांना प्रास्ताविकात अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे हे संमेलन इतिहासातील सर्वांत मोठे संमेलन आहेअसे सांगितले.
          श्री. हावरे यांनी यावेळी शिर्डी संस्थानच्या माध्यमातून महिला बचत गटांना रोजगाररक्तदानासारखे उपक्रमसाईसेवक योजना आदी उपक्रम राबविले असल्याची माहिती दिली.
        गेल्यावर्षी वनवासी कल्याण आश्रमाद्वारा भोपाळ येथे  आयोजित तिरंदाजी स्पर्धेत एकावेळी  306 तिरंदाजांचा समावेश होता. या विक्रमाची नोंद  गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये करण्यात आली. त्याचे प्रमाणपत्र आशिया विभागाचे प्रमुख मनीष बिष्णोई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत कल्याण आश्रमांच्या अध्यक्षांना प्रदान करण्यात आले.
          तत्पूर्वीमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी खासदार दिलीप गांधीआमदार स्नेहलता कोल्हेसंस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरेजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवालजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत मानेराहाताच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा आदींची उपस्थिती होती.
                                                                *****

स्पेन येथील संत्रा विशेषज्ञ रॅमॉन नेव्हिया यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट ·तीन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर


     


नागपूर, दि. 30 : स्पेन, इजिप्त आणि मध्यपूर्व आशियात उत्पादित संत्रा विशेषज्ञ रॅमॉन नेव्हिया हे  आज, दि.30 सप्टेंबरपासून तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी महाऑरेंजचे राहुल ठाकरे यांच्यासोबत भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत महाऑरेंजचे राहुल ठाकरे उपस्थित होते.
       नितीन गडकरी यांनी उत्पादकांच्या संत्रे बट्टीदार होणे, सारख्या आकाराची फळे असणे, फाययटोपथोरा मुक्त असणे, संत्र्यांचा गोडवा वाढवणे, संत्र्यांची ‍टिकवनक्षमता वाढवणे आणि मुख्य म्हणजे संत्र्यांची उत्पादकता कशी वाढवता येईल यावर चर्चा केली. भारत आणि स्पेन या दोन्ही देशांमध्ये संत्र्यासंदर्भात तंत्रज्ञान व विविध अडचणींसंदर्भात चर्चा केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
  स्पेन येथील संत्रा विशेषज्ञ रॅमॉन नेव्हिया यांचा हा दौरा महाऑरेंज, स्पेन येथील ट्रेडकॉर्प इंटरनॅशनल, धनश्री ॲग्रो इंडस्ट्रीज पुणे, प्रगती इंटरप्रायजेस प्रा. लि. अमरावती व श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.  यावेळी महेश दामोदरे आणि सुधीर जगताप उपस्थित होते.
*****

Saturday 29 September 2018

हडपक्या (मसकऱ्या) गणेशोत्सव मंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सदिच्छा भेट

महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट हडपक्या (मसकऱ्या) गणेशोत्सव मंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सदिच्छा भेट दिली.  यावेळी त्यांच्या सोबत स्थायी समितीचे अध्यक्ष विकी कुकरेजा, माजी महापौर प्रवीण दटके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 




 
 

12 वीच्या परीक्षेकरिता 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन आवेदन प्रक्रिया


     नागपूर दि.29 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2019 करीता नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजना व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना सोमवार, दिनांक 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन पद्धतीने आवेदने सादर करता येईल.
नियमित शुल्कासह कला, शास्त्र, व वाणिज्य शाखेतील नियमित विद्यार्थी दि. 1 ते 21 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करु शकतील. पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजना व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणारे विद्यार्थी दि. 22 ते 30 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतील. याशिवाय सर्व विद्यार्थी विलंब शुल्कासह दि. 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करु शकतील.
नियमित तसेच विलंब शुल्कासह प्राप्त अर्जाची रक्कम चलनाद्वारे बँकेत जमा करण्यासाठी महाविद्यालयांना दि.12 ते 17 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदन करण्यासाठी तसेच अधिक माहितीकरिता मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
                                                                                *****


६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमी येथे पुरेशा सुविधा उपलब्ध करा - अश्विन मुदगल


* विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर, दि. 29 : 62व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी तसेच ड्रॅगन पॅलेस येथे दि. 18 ऑक्टोबर रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.   
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे आज 62व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी उपायुक्त संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, पोलीस उपायुक्त हर्ष पोतदार, दीक्षाभूमीचे ट्रस्टी विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले यांच्यासह महापालिका तसेच शहर पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  
दीक्षाभूमी येथे दरवर्षी प्रमाणे 7 लाखापर्यंत अनुयायी उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, 24 तास वीजपुरवठा, भाविकांसाठी बसेसची व्यवस्था, औषधोपचार व तात्पुरते दवाखाने, सुरक्षा व्यवस्था, अन्नदान वाटप, आग प्रतिबंधक उपाययोजना, होर्डींग व सूचना फलक, नियंत्रण कक्ष, सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावणे अशा विविध सुविधा येथे संबंधित विभागांनी उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.
दीक्षाभूमीतसेच ड्रॅगन पॅलेसयेथे दिनांक 14 ते 19 ऑक्टोबर दरम्यान भाविकांची उपस्थिती राहणार आहे. या दरम्यान तसेच कार्यक्रम समाप्तीनंतर परिसराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी मुदगल यांनी दिल्या. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी संबंधित विभागांनी कार्यक्रमाचे नियोजन करुन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
दीक्षाभूमी येथे 62 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम हा एकदिवसीय अर्थात 18 ऑक्टोबर रोजी असला तरी भाविकांची गर्दी 14 ऑक्टोबरपासून वाढण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळात परिसरात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करु द्याव्यात, असे डॉ. सुधीर फुलझेले यांनी सांगितले.
*****

नागपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडांगणे विकसित करणार - देवेंद्र फडणवीस














* खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप

* माजी महापौर अटलबहादूर सिंग यांचा क्रीडा महर्षी पुरस्काराने सन्मान

* पुढील वर्षी 12 ते 27 जानेवारी दरम्यान आयोजन

नागपूरदि. 29 : नागपूर शहराला महान खेळाडू, क्रीडा संघटक व क्रीडा प्रशिक्षकांची उज्ज्वल परंपरा लाभली असून विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर शहर व जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असणारी क्रीडांगणे विकसित करण्यात येणार असल्याचे तसेच यासाठी भरीव निधीही उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कविवर्य सुरेश भट सभागृह येथे खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, नागो गाणार, लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष विकी कुकरेजा, माजी खासदार दत्ता मेघे, माजी महापौर अटलबहादूर सिंग, माजी महापौर कुंदाताई विजयकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार, मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र ठाकरे व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी नागपूरचे माजी महापौर अटलबहादूर सिंग यांचा क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल नागपूर क्रीडा महर्षी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खेळाच्या माध्यमातून सुदृढ व निकोप समाजाची निर्मिती होत असून खेळामुळेच खिलाडूवृत्ती व चिकाटी निर्माण होते. नागपूर शहराला नामवंत खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा संघटक यांची उज्वल परंपरा लाभली असून नागपूर क्रीडानगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे. विविध राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंनी यश मिळविण्यासाठी नागपुरातील क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा संघटक अथक परीश्रम घेत आहेत. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही देशातील खेळाडूंनी दर्जेदार प्रदर्शन केले. हे सर्व खेळाडू ग्रामीण भागातून पुढे आलेले व प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन आपले स्वप्न पूर्ण केलेले खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंनी देशाचा गौरव वाढविला आहे.
खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपूर येथे भव्य क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही बाब नागपूरसाठी निश्चितच गौरवास्पद आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वांगिण पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. साईसह मानकापूर तसेच शहर व जिल्ह्यातील विविध क्रीडांगणे विकसित करुन ती आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविण्यावर भर देण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, कला, शिक्षण, संस्कृती तसेच क्रीडा यासह समाजातील सर्वच क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येत असून याअंतर्गतच खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा संघटक यांनी उत्साहाने सहभाग घेतला व सहकार्य केले व हा क्रीडा महोत्सव यशस्वी केला. नागपूर शहर व जिल्ह्यात अनेक क्रीडांगणे असून या क्रीडांगणांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून याअंतर्गत  साईचे अत्याधुनिक सुविधा असणारे मोठे क्रीडा प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे उभारण्यात येत आहे. वरिष्ठ नागरिकांसाठीही विविध प्रकारच्या क्रीडा सुविधा उभारण्यात येणार आहेत. नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात अटलबहादूर सिंग यांचे योगदान अतुलनिय असल्याचे गौरवपूर्ण उद् गारही श्री.गडकरी यांनी काढले.
यावेळी   विजय मुनीश्वर – पॅराऑलम्पिक, संजय (भाऊ) काणे - ॲथलेटिक्स, सलिम बेग – फुटबॉल, सी.डी.देवरस – बॅडमिंटन, सितारामजी भोतमांगे – कुस्ती, एस.जे.अँथोनी – मॅरॉथॉन, लखिरामजी मालविय – जलतरण, बळवंत देशपांडे (बाबा) – स्केटिंग, यशवंत रामू चिंतले (गुरुजी) – कॅरम, त्रिलोकीनाथ सिध्रा – हॉकी, अरविंद गरुड – बॉस्केटबॉल, डॉ.विजय दातारकर – खो-खो, शरद नेवारे – कबड्डी, अनुप देशमुख – बुद्धीबळ, डॉ.दर्शन दक्षिणदास –लॉन-टेनिस, दिनेश चावरे – बॉडी बिल्डिंग, सुनील हांडे – व्हॉलीबॉल, अविनाश मोपकर – टेबल-टेनिस, अनिरुद्ध रईच – सायकलिंग, सुहासिनी गाडे – महिला क्रिकेट या क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा संघटकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक व लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले. पुढील वर्षीच्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन 12 ते 27 जानेवारी 2019 दरम्यान करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. आभार माजी महापौर प्रवीण दटके यांनी मानले.
'वनामती'च्या दोन माहिती पुस्तिकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन
यावेळी वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, (वनामती) नागपूर या संस्थेत Agribusiness Incubation Centre व कृषी उत्पादन निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षण असे दोन नविन उपक्रम सुरु करण्यात  येत आहेत. या  उपक्रमाबाबतच्या दोन माहिती पुस्तिका तयार करण्यात आल्या. त्या पुस्तिकांचे विमचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार यांची उपस्थिती होती.
*****


पोलिओ लसीत व्हायरस आढळल्याच्या वृत्ताने नागरिकांनी घाबरून जाऊ नये महाराष्ट्रात संबंधित कंपनीच्या लसींचा वापर बंद - आरोग्यमंत्र्यांची माहिती

             मुंबईदि. 29 : गाझियाबादमधील कंपनीने तयार केलेल्या पोलिओ लसीत टाईप टू व्हायरस आढळल्याच्या वृत्तामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार संबंधित कंपनीमार्फत तयार करण्यात आलेल्या लसींचा वापर दि. 11 सप्टेंबर 2018 पासून राज्यात थांबविण्यात आला आहेअशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली.
          यासंदर्भात सविस्तर माहिती देताना आरोग्य मंत्री श्री. सावंत यांनी सांगितले कीपोलिओ निर्मूलनासाठी दोन प्रकारे लसीकरण केले जाते. एक इंजेक्शन द्वारे आणि दुसरे तोंडावाटे. शरीरामध्ये रोगप्रतिबंधक शक्ती तयार करण्यासाठी क्षीण व्हायरस या लसींमध्ये असतात. ते संबंधित आजाराविरुद्ध लढण्याची ताकद शरीरात निर्माण करतात,  असे स्पष्ट करत आरोग्यमंत्री म्हणाले कीकेंद्र शासनातर्फे दि. 10 सप्टेंबर 2018 रोजी या कंपनीच्या व्हॅक्सिनचा वापर न करण्याबाबतच्या सूचना राज्य शासनाला प्राप्त झाल्या असून दि. 11 सप्टेंबरपासून त्याचा वापर राज्यात बंद झाला आहे. पोलिओ लसीकरणात 2016 पर्यंतच टाईप टू व्हॅक्सिनचा वापर करण्यात आलेला आहे. यासंदर्भात केंद्र शासनासोबत चर्चा करून पुढील दिशा ठरविली जाईलअसे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
0000

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्यावतीने "ज्येष्ठोत्सव-2018"चे पुण्यात आयोजन

मुंबईदि.29 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने ऍस्कॉप संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त"ज्येष्ठोत्सव-2018" या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि.1 ऑक्टोबर  रोजी सकाळी 9:30 वाजता शुभारंभ लॉन्सडी.पी. रोडम्हात्रे पुलाजवळएरंडवणेपुणे येथे करण्यात आले आहे.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली व पुण्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळेजलसंपदा राज्यमंत्री विजय ‍शिवतारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. खासदार अनिल शिरोळेस्थानिक आमदार प्रा. मेधाताई कुलकर्णीपुणे जिल्हयातील खासदारआमदार व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.  
यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्येशां.ग. महाजनअभिनंदन थोरातप्रतिभा शाहू मोडक,माधव वझेसुधीर गाडगीळविश्वास मेहंदळेडॉ. मोहन आगाशेमाजी एअर चीफ मार्शल श्री. भूषण गोखलेज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागूज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे आदींचा सन्मान करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरणविनामुल्य आरोग्य तपासणी शिबिरबचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री तसेच करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
००००

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत एकवेळ समझोता साठी 31 डिसेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ

            मुंबईदि. 29 :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत एकवेळ समझोता साठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या संदर्भातील शासन निर्णय दि. 29 सप्टेंबर 2018 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
            ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017’ या योजनेअंतर्गत मुद्दल व व्याजासह    रु. 1.5 लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (One Time Settlement) योजनेखाली  पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी दि. 1 ऑक्टोबर 2018 ते दि. 31 डिसेंबर 2018 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
            राज्यामध्ये सन 2009-10 पासून असलेल्या सततच्या दुष्काळ व नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दि. 24 जून 2017 च्या मंत्रिमंडळ बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार शासन निर्णय दि. 28 जून 2017 अन्वये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017’ घोषित करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत एक वेळ समझोता योजनेत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम दि. 30 सप्टेंबर 2018 पर्यंत बँकेत जमा करण्यास मुद्दत देण्यात आली आहे. सदरची मुदत दि. 30 सप्टेंबर 2018 रोजी संपुष्टात येत असल्याने त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
            सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक 201809291237003802 असा आहे.
000

नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी निधी उभारणीच्या पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी मंत्रीगटाची स्थापना

सुधीर मुनगंटीवार यांचा सदस्य म्हणून समावेश
मुंबई दि. 29 : नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी निधी उभारणीच्या पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर परिषदेने बिहारचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या संयोजनाखाली मंत्रीगटाची स्थापना केली असून यामध्ये महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
काल वस्तू आणि सेवा कर परिषदेची ३० वी बैठक संपन्न झाली या बैठकीत हा मंत्रिगट स्थापनण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे अधिकृत  पत्रक केंद्रीय वस्तू आणि सेवा कर परिषदेने दि. २८ सप्टेंबर २०१८ रोजी निर्गमित केले आहे.
या मंत्रीगटात श्री. मुनगंटीवार यांच्याबरोबर आसामचे वित्त मंत्री हेमंता बिस्व सर्मा, केरळचे वित्तमंत्री डॉ. टी.एम.थॉमस इसाक, ओडीसाचे अर्थमंत्री शशीभूषण बेहरा, पंजाबचे अर्थमंत्री मनप्रीतसिंह बादल आणि उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रकाश पंत यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
हा मंत्रिगट अनेक विषयाच्या अनुषंगाने अभ्यास करील. यामध्ये  राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीअंतर्गत राज्यांना आपत्ती निवारण आणि मदत कार्यासाठी देण्यात येणारा निधी पुरेसा आहे किंवा कसे, वस्तू आणि सेवाकराच्या माध्यमातून यासाठी काही पूरक पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे किंवा कशी, असल्यास ती कशास्वरूपात असावी, अतिरिक्त कर असावा किंवा उपकर (सेस) लावावा, हा उपकर विशिष्टपणे राज्यासाठी लागू असावा किंवा देशभरात त्याची अंमलबजावणी व्हावीराज्यांना आपत्ती निवारणासाठी मिळणाऱ्या निधीशिवाय अतिरिक्त निधी द्यावयाचा झाल्यास असा निधी मिळण्यास पात्र होण्यासाठी  उद्भवणाऱ्या परिस्थिती कोणत्या असाव्यात, सध्याच्या वस्तू आणि सेवा कर कायद्यातील तरतूदीमधून ते करणे  (वस्तू आणि सेवा कर आपत्ती निवारण निधी उभारणे)  शक्य आहे का, किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्ती म्हणून पात्र ठरलेल्या विशिष्ट घटनेसाठी असा निधी उभारता येईल, याची संकलनाची पद्धत काय असावी अशा विविध विषयांचा समावेश आहे. या सर्व विषयांवर अभ्यास करून हा मंत्रीगट दि. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी आपला अहवाल सादर करील असेही वस्तू आणि सेवा कर परिषदेने निर्गमित केलेल्या मंत्रिगटाच्या स्थापनेच्या पत्रकात नमूद केले आहे.
                                                                  ००००