Friday 29 April 2022

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी व जवानांच्या पाठीशी संपूर्ण सरकार - उपमुख्यमंत्री अजित पवार

कटेझरी येथील पोलीस इमारतीचे उद्घाटन, शौर्य स्थळाला भेट व सी-60 जवानांचा केला सन्मान गडचिरोली,(जिमाका)दि.29: गडचिरोली जिल्ह्यातील विकासासाठी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा तसेच आर.आर. पाटील पालकमंत्री होते तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही या जिल्ह्याचा प्राधान्याने विचार केला आहे. येथील विकास कामांसाठी तसेच जवानांच्या पाठीशी गृह विभाग, अर्थ विभाग आहेच. परंतू संपूर्ण कॅबिनेट संपूर्ण सरकार यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली येथे कार्यक्रमात दिली. ते पोलिस विभागातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आले होते. सी- 60 जवानांच्या सन्मान कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अर्थमंत्री या नात्याने आम्हाला गृह विभागाकडून सी-60 जवानांच्या भत्त्यामधील वाढीचा प्रस्ताव आला होता तो तातडीने मंजूर केला. तसेच यापूर्वी नक्षल भागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनातही वाढ केली आहे. आता गडचिरोलीत सैन्य दलातील दवाखान्याच्या धर्तीवर सुसज्ज दवाखाना निर्माण करण्यास मंजूरी दिली आहे. आरोग्य प्रतिपूर्ति देयकाच्या यादीत अकरा नवीन आजारांचा समावेश केला आहे. अशा प्रकारे जवानांची सुरक्षा, चांगले आरोग्य व त्यांचे चांगले राहणीमान यासाठी प्रयत्न करु असे ते पुढे म्हणाले. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उप महानिरिक्षक संदीप पाटील, पोलीस अधिक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्रीताई आत्राम व सी-60 जावानांचे पथकं उपस्थित होती. सी-60 जवानांच्या कार्यक्रमात आतापर्यत विविध चकमकीत जवानांच्या चांगल्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना सन्मानीत केले. यावेळी प्रत्येक जवानांशी मंचावर आल्यावर आदराने विचारपूस केली व कौतूकाची थाप मारली. यावेळी बोलतांना ते म्हणाले मर्दीनटोला येथील नक्षल चकमक ही ऐतिहासिक घटना आहे. याची नोंद पंतप्रधानांनी घेतली. मुख्यमंत्री यांनी विशेष कौतूकही केले. राज्यात जिल्ह्यात शांतता अखंड रहावी म्हणून तुम्ही आहोरात्र मेहनत घेता यासाठी मी सर्व सी-60जवानांना सलाम करतो असे गौरवोद्गार त्यांनी बोलतांना काढले. राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी नक्षलवाद्याविरुद्ध लढत असतांना आता सी-60 जवानांची नवीन ओळख निर्माण झाल्याचे म्हटले. नक्षलवाद्यांचा बिमोड करणारी टिम म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते. नक्षल चळवळीतील लोकांमध्येही या सी-60 पथकाचा दरारा निर्माण झाला असल्याचे ते यावेळी म्हणाले. कर्तव्याला श्रेष्ठ माननाऱ्या जवानांसाठी आम्ही त्यांच्या भत्त्यामध्ये वाढ केली. आता पुढील मागण्याही लवकरच पुर्ण करु यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन अतिरिक्त पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी मानले. रेल्वे मार्गाच्या कामासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात रेल्वे मार्गावर भाष्य केले. यासाठी जिल्हा‍धिकारी, पोलीस अधीक्षक यांना उद्देशून पुढील अडचणी सोडविण्यासाठी तातडीने मुंबईला बैठक आयोजित करु असे सांगितले. यावेळी अडचणी, निधी, तसेच कामे वेळेत कशी पुर्ण होतील याबाबत विचार विनिमय करु असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कटेझरी पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन- महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरच्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटेझरी गावाच्या परिसरातील नागरिकांशी, आरोग्य सेविका, आदिवासी बांधव, बालकांशीही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी साधला संवाद. यावेळी उपस्थित मुलांशी त्यांनी शालेय स्तरावरील गप्पा मारल्या. तसेच नागरिकांनाही शेतीविषयक प्रश्न विचारले. दैनंदिन स्वरूपात आदिवासी बांधवांचा दिनक्रम कसा चालतो याबाबत ही विचारणा केली. उपस्थितांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी विविध साहित्याचे वाटपही करण्यात आले. **

जनतेला सौजन्याची वागणूक देवून त्यांची कामे सुलभ करा - अजित पवार

* सावनेर पोलीस प्रशासकीय इमारत व पोलीस निवासस्थानाचे लोकार्पण * अद्ययावत पोलीस प्रशासकीय इमारतीमुळे सावनेरच्या सौदर्यात भर * या परिसरातील कॅम्युनिटी हॉल बांधकामास मान्यता नागपूर, दि. 29 : कायदा व सुव्यवस्था कायम ठेवतानाच जनतेची कामे सुलभ व्हावीत. या नूतन इमारतीमुळे कार्यक्षमता वाढून गतीने काम करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. सावनेर येथील सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा असलेल्या पोलीस प्रशासकीय इमारत व पोलीस निवासस्थानाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील होते. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, पशुसंवर्धन व कृषी सभापती तापेश्वर वैद्य, महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोंढारे, पोलीस गृहनिर्माण कल्याण मंडळाचे महासंचालक विवेक फणसळकर, अपर पोलीस महासंचालक श्रीमती अर्चना त्यागी, पोलीस उप महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजय मगर आदी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था राखण्याची उत्तम जबाबदारी सांभाळत असताना विभागाने निष्पक्ष काम करताना द्वेषभावना न ठेवता व समाजात तेढ निर्माण होईल, असे न वागता सामोपचाराने काम करण्याच्या सूचना करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, पोलीस प्रशासकीय इमारत सावनेरच्या सौदर्यात भर घालणारी आहे. सर्वसामान्य जनतेला उत्कृष्ट सेवा मिळेल या दृष्टीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे काम करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील पोलीस विभागाची परंपरा व नावलौकिक संपूर्ण देशभर आहे आणि ते वेळोवेळी सिद्ध झाले आहे. राज्याची उज्ज्वल परंपरा कायम ठेवून सर्वांनी काम करावे, असेही ते म्हणाले. कोरोना महामारीमध्येही विकासकामांना खिळ बसू दिली नाही. नवीन पायाभूत सुविधा निर्माण केल्या. त्याचबरोबर राज्यातील पोलीस विभागाच्या इमारत बांधकामास सुध्दा निधीची कमतरता पडू दिली नाही. त्यामुळे आज ही इमारत उभी असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस प्रशासकीय इमारत व निवासस्थानाच्या ठिकाणी कॅम्युनिटी हॉल बांधण्यास मंजुरी देण्यात येत असून यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. सतत विकासाचा ध्यास ठेवल्यामुळे ही प्रशासकीय इमारत व इतर सोयी सुविधा पूर्ण करण्यात आल्या. पोलिसांनी प्रामाणिकपणे काम करुन जनतेस सौजन्याची वागणूक द्यावी, असे ते म्हणाले. पोलिसांना एक लाख घरे बांधून देण्याचा महाविकास आघाडीचा मानस आहे. पोलीस विभागास घरासाठी शासनातर्फे गृहकर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासंदर्भात बोलताना गृहमंत्री म्हणाले की, ५ हजार २०० पोलिसांची भरतीप्रक्रिया पूर्ण होत असून दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. राज्यातील जुन्या व मोडकळीस आलेल्या पोलीस स्टेशनच्या इमारती बांधण्यात येणार आहेत. पोलिसांना गृहनिर्माणासाठी कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. समाजातील विविध घटकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. पोलीस प्रशासकीय इमारत व निवास्थानात एक कॅम्युनिटी हॉल बांधण्यात यावा. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना सांस्कृतिक व इतर कार्यक्रम करण्यास सोयीचे होईल असे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार म्हणाले. पोलीस व नागरिक यांच्यामध्ये सहकार्याची भूमिका असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सावनेर येथील कोची मध्यम प्रकल्पाच्या उर्वरित बांधकामासाठी निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. यामुळे नागपूरसाठी हा प्रकल्प भगीरथ योजना म्हणून कायमस्वरुपी होईल. नागपूरच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असेही त्यांनी सांगितले. सावनेर तालुक्यातील ट्रामा सेंटरसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी केली. पोलीस अधीक्षक(ग्रामीण ) विजय मगर यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात पोलीस प्रशासकीय इमारत व निवास्थानाच्या नवीन इमारतीसंदर्भात माहिती दिली. या इमारतीमध्ये पोलीस विभागाच्यासंबंधी सुविधा उपलब्ध असून १६७४ चौरस फूट जागेवरील इमारतीसाठी २७ कोटी ५४ लाख खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी पोलीस प्रशासकीय इमारत व निवासस्थानाच्या कोनशिलेचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

सर्वसामान्य जनतेस सन्मानाची वागणूक द्या - अजित पवार

* पोलीस भवन इमारतीचे लोकार्पण * राज्यातील सुसज्ज व उत्कृष्ट पोलीस भवन * अमृत महोत्सवी वर्षात 87 पोलीस स्टेशन बांधणार
नागपूर, दि. 29 : कायदा व सुव्यवस्था कायम ठेवतानाच सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूकद्यावी.असे बजावतानाच पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासह आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूर येथील सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा असलेल्या पोलीस भवन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील होते. यावेळी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस गृहनिर्माण कल्याण मंडळाचे महासंचालक विवेक फणसळकर, अपर पोलीस महासंचालक श्रीमती अर्चना त्यागी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उप महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजय मगर आदी उपस्थित होते. नागपूर येथील कायदा व सुव्यवस्था राखण्याची उत्तम जबाबदारी सांभाळत असताना विभागाने निष्पक्ष काम करताना कुणाच्याही दबावाला बळी न पडण्याची सूचना करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, पोलीस भवन ही वास्तू नागपूरच्या वैभवात भर घालणारी आहे. सर्वसामान्य जनतेला उत्कृष्ट सेवा मिळेल या दृष्टीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे काम करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील पोलीस विभागाची परंपरा व नावलौकिक संपूर्ण देशभर आहे आणि ते वेळोवेळी सिद्ध झाले आहे. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या सराफा व्यापाऱ्याचा चोरीसंदर्भात पोलिसांनी सत्तावीस तासांत तपास करुन सहा कोटी रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याबद्दल नागपूर पोलिसांचे अभिनंदन करताना सर्व सराफा व्यापाऱ्यांनी कामावर असलेल्या कामगारांची संपूर्ण माहिती ठेवावी. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या 87 पोलिस ठाण्यांच्या इमारतींचे बांधकाम करण्यात येणार असून राज्यातील सर्व जिल्हा नियोजन मंडळाने पोलीस विभागासाठी वाहने व इतर आवश्यक सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. अशा सूचना पालकमंत्र्यांना दिल्या. नागपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची सुसज्ज इमारत बांधण्यासाठी तसेच पुण्याच्या धर्तीवर सर्व सुविधा असलेल्या शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस विभागाची असून नागपूर शहरातील गुन्हेगारी कमी करण्यास पोलिसांना यश आल्याचे सांगताना गृहमंत्री श्री. वळसे-पाटील म्हणाले की, गुन्हेगारीचे स्वरुप बदलत असून त्यावर निर्बंध घालण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. अमली पदार्थांचा वाढता व्यापार हा चिंतेचा विषय असून त्यावर कठोर निर्बंध घालून संपवायचा आहे. यासंदर्भात कुणालाही पाठीशी न घालता कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासंदर्भात बोलताना गृहमंत्री म्हणाले की, 5 हजार 200 पोलिसांची भरतीपक्रिया पूर्ण होत असून दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. राज्यातील जुन्या व मोडकळीस आलेल्या पोलीस स्टेशनच्या इमारती बांधण्यात येणार आहेत. पोलिसांना गृहनिर्माणासाठी कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल. समाजातील विविध घटकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पोलीस भवन या सुसज्ज इमारतीमध्ये सर्व सेवा एकत्र मिळणार असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पोलीस विभागाचे पाच ऐवजी सात झोन करणे आवश्यक आहे. पाचपावली, कोतवाली आदी पोलीस स्टेशनच्या इमारतींच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. तसेच मनुष्यबळ सुद्धा वाढविण्याची आवश्यकता व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत तसेच पुण्याच्या धर्तीवर सुसज्ज विश्राम गृहाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी नागपूर या उपराजधानीच्या शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागांचे योग्य नियोजन आहे. मोटर व्हे‍ईकल ॲक्टमध्ये पोलीस व परिवहन विभागातर्फे वेगवेगळ्या प्रकारे कारवाई करण्यात येते. त्यामध्ये एकसूत्रता यावी, अशी सूचना यावेळी त्यांनी दिली. प्रारंभी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात पोलीस भवनाच्या नवीन इमारतीसंदर्भात माहिती दिली. सात मजली सुसज्ज इमारतीमध्ये नागपूर शहर पोलीस आयुक्तालय व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय राहणार आहे. या इमारतीमध्ये पोलीस विभागाच्यासंबंधी सुविधा उपलब्ध असून वीस हजार चौरस फूट जागेवरील इमारतीसाठी 97 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शहरात नुकत्याच झालेल्या सराफा व्यापाऱ्याच्या दुकानातील सहा कोटी रुपयांच्या चोरीसंदर्भात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सहा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा मुद्देमाल उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते संबंधित सराफा व्यापाऱ्याला सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार पोलीस उपायुक्त डॉ.संदीप पखाले यांनी केले. **

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे स्वागत

नागपूर, दि. 29 : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे नागपूर विमानतळावर आज सकाळी आगमन झाले. शहरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत (एनएडीटी) भारतीय महसूल सेवेच्या 74व्या तुकडीतील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपासाठी त्यांची प्रमुख उपस्थिती असेल. विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त श्रीमती माधवी खोडे-चवरे, एअर मार्शल पी. आर. मोहन, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर उपस्थित होते. शहरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत दुपारी चारला भारतीय महसूल सेवेच्या 74व्या तुकडीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप होत आहे. ******