Wednesday 27 June 2018

नांदेड गुरुद्वारा अधिनियमात सुधारणा

नांदेड येथील शीख गुरुद्वारा व्यवस्थापनाबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
दि नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब अधिनियम-1956 च्या कलम 61 नुसारया कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शासनास नियम तयार करण्याचे अधिकार आहेत. या अधिनियमाच्या कलम 6 (1) मध्येगुरुद्वारा मंडळावर नामनिर्देशन किंवा निवडणुकीद्वारे एकूण 17 सदस्य नियुक्त करण्याची तरतूद आहे. यामधील कलम 6 (1) (i) नुसार,  शासनाने नामनिर्देशित केलेले दोन सदस्य समाविष्ट असतात. मंडळावर शासनाकडून 2 सदस्य नामनिर्देशित करण्याच्या सध्याच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार शासनास मंडळावर आता आठ सदस्य नामनिर्देशित करण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.
------०------

सुलवाडे जामफळ उपसा सिंचन प्रकल्पास सुधारित मान्यता

धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ (कनोली) उपसा सिंचन योजनेस (ता. शिंदखेडा) अटींच्या अधीन राहून 2407 कोटी 67 लाख रूपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 33 हजार 367 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत अवर्षणप्रवण भागात कायमस्वरूपी सिंचन उपलब्ध व्हावे यासाठी 1999 मध्ये सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या 788.89 कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील 48 गावातील 26 हजार 907 हेक्टर तर धुळे तालुक्यातील 23 गावातील 6 हजार 460 हेक्टर असे एकूण 33 हजार 367 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. योजनेकरिता शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावाजवळ तापी नदीतून अस्तित्वातील सुलवाडे बॅरेजच्या वरच्या (U/S) भागातून उपसा करण्यात येणार आहे. प्रकल्पाची आवश्यकता आणि त्या माध्यमातून शेतीच्या विकासाला चालना देण्यासाठी शासनाने व्यय अग्रक्रम समितीच्या मान्यतेने 2 नोव्हेंबर 2017 ला सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेस 2407.67 कोटी रूपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता काही अटींच्या अधीन राहून दिली होती. या योजनेस केंद्रीय जलआयोग आणि वन व पर्यावरण विभागाची मान्यता प्राप्त झाली आहे. यातील काही अडचणीच्या अटी वगळून आज प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
------०------

उद्योगांसाठी शेतजमीन खरेदी प्रक्रियेच्या सुलभीकरणासाठी अधिनियमात सुधारणा

खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनासाठी शेतजमीन खरेदीच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या होत्या. या तरतुदींच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कुळवहिवाट व शेतजमिनीसंदर्भातील अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनासाठी खरेदी केलेल्या वर्ग-2 धारणाधिकाराच्या शेतजमिनींच्या बाबतीत खरेदीदाराने विहित मुदतीत अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना खरेदीची रक्कम, ती कोणत्या स्वरुपात आणि कोणत्या लेखाशीर्षाखाली जमा करावी याबाबत कळविणे आवश्यक असते. या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कालावधीची गणना खरेदीदाराने केलेल्या अर्जानंतरच्या 30 दिवसांमध्ये करावी किंवा वेगळी करावी याबाबत स्पष्टता नव्हती. आजच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालयास यासाठी लागणाऱ्या कालावधीची गणना अर्जानंतरच्या कालावधीत समाविष्ट करता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. तसेच अर्जदारास नजराणा रक्कम भरण्यासाठी पूर्वी असलेला 30 दिवसांचा कालावधी आता 90 दिवस करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
            या निर्णयानुसार महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्या कलम 63-एक-अ, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) अधिनियमाच्या कलम-89-अ आणि हैद्राबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम-1950 च्या कलम 47 अ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विधेयक आगामी अधिवेशनामध्ये विधिमंडळात मांडण्यात येणार आहे.
-----000-----

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा नागपूर दौरा

नागपूर, दि. 27 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांचे गुरुवार , दिनांक 28  जून रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबई येथून नागपूर विमानतळावर आगमन व मोटारीने रविभवनकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता रविभवन येथे आगमन व राखीव.
*****

इयत्ता 10 वी, 12 वीची तोंडी परीक्षा 9 जुलैपासून

नागपूर दि.27 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10वीच्या फेरपरीक्षे अंतर्गत तोंडी परीक्षा दिनांक 9 ते 16 जुलैपर्यंत घेण्यात येणार आहे.
नागपूर विभागीय मंडळाच्या वतीने महाविद्यालयांना तोंडी परीक्षेचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वाटप केंद्र तयार करण्यात आले आहे. यामध्ये लालबहादूर कनिष्ठ महाविद्यालयनंदलाल पाटील कापगते कनिष्ठ महाविद्यालय साकोलीभंडाराजिल्हा परिषद ज्युबिली कनिष्ठ महाविद्यालय व जनता कनिष्ठ महाविद्यालय नागभीड चंद्रपुरन्यु इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय वर्धाजिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयधर्मराव कनिष्ठ महाविद्यालय आलापल्लीहितकारीणी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी गडचिरोलीगुजराथी नॅशनल कनिष्ठ महाविद्यालय गोंदियानागपूर विभागीय मंडळ नागपूर आदीचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयास गुणतक्ते पांढऱ्या रंगाच्या सिलबंद पाकिटात महाविद्यालयाचा निर्देशांकसंबंधित विषयाचा कोडमहाविद्यालयाच्या शिक्क्यासह जिल्हा केंद्रास सादर करावे लागेल. 12वीची आऊट ऑफ टर्न परीक्षा 6 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असून परीक्षेचे गुणतक्ते 7 ऑगस्ट रोजी निर्धारित शुल्क देऊन कार्यालयात जमा करावे लागेल.
मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार परीक्षेच्या गुणतक्त्याची माहिती मंडळ प्रतिनिधींनी दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा केंद्रास सादर करावी. अन्यथा संबंधित महाविद्यालयांना विलंब शुल्क आकारण्यात येईल.
इयत्ता 10वीची तोंडी परीक्षा दिनांक 9 ते 16 जुलै दरम्यान संबंधित शाळेमार्फत घेण्यात येईल. विज्ञान आणि तंत्रज्ञानमाहिती सप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) विषयासह पूर्व व्यावसायिक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विषयाची प्रात्यक्षिक व कार्यशिक्षण लेखी परीक्षा देखील याच कालावधीत घेण्यात येईल. याशिवाय आऊट ऑफ टर्न परीक्षा 3 ऑगस्ट रोजी होईल. सदर परीक्षेचे गुण मंडळ प्रतिनिधीमार्फत दिनांक 4 ऑगस्ट रोजी जिल्हा केंद्रात सादर करणे आवश्यक राहीलअशी माहिती नागपूर विभागीय मंडळाचे सचिव रविकांत देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

इयत्ता 10वी व 12 वीच्या जुलै-ऑगस्ट पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नागपूर दि.27 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत 9 विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12वी) पुरवणी परीक्षेच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिनांक 17 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत परीक्षा घेण्यात येईल.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10वी) परीक्षा दिनांक 17 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12वी) परीक्षा सर्वसाधारण विषयासह दिनांक 17 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधी होणार आहे. याशिवाय नवीन व्यवसाय अभ्यासक्रमावर आधारित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12वी) परीक्षा दिनांक 17 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येईल. दोन्ही परीक्षाचे वेळापत्रक मंडळाच्या संकेत स्थळ www.mahahsscboard.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे.
माध्यमिक शाळाउच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालय यांना विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात देण्यात येणारे परीक्षांचे वेळापत्रक अंतिम राहील. त्यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळ किंवा सोशल मिडियाद्वारे प्राप्त वेळापत्रक ग्राह्य मानू नयेअशा सूचना देखील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.
*****  

बारावी फेरपरीक्षेकरिता अतिविलंबासह ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया 29 जूनपासून

     नागपूर दि.27 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीनुसार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) फेरपरीक्षा जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. या फेरपरीक्षेकरिता विद्यार्थी अतिविलंबविशेष अतिविलंबअतिविशेष अतिविलंब शुल्कासह शुक्रवारदिनांक 29 जूनपासून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्रे www.mahahsscborad.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरू शकतील.
बारावी फेरपरीक्षेकरिता विद्यार्थी शुक्रवार 29 जून ते रविवार 8 जुलैपर्यंत अतिविलंब शुल्क प्रतिदिन 50 रुपये प्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात. याशिवाय विशेष अतिविलंब शुल्क प्रतिदिन 100 रुपयेसह दिनांक 9 जुलै ते 12 जुलैपर्यंत तसेच अतिविशेष अतिविलंब शुल्क प्रतिदिन 200 रुपये भरून विद्यार्थी 13 ते 16 जुलैपर्यंत अर्ज सादर करू शकतील. विभागीय मंडळाच्या वतीने श्रेणीतोंडीप्रात्यक्षिक परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यसाठी अंतिम संधी देण्यात येत आहे. संबंधित शुल्क भरून प्राचार्यांच्या स्वाक्षरीचे विद्यार्थ्यांना आवेदनपत्र संबंधित महाविद्यालयात जमा करावे लागेल.
विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेत 12वी फेरपरीक्षेकरीता अर्ज सादर करण्यासाठी मंडळाच्या संकेतस्थळाला www.mahahsscboard.maharashtra.gov.in भेट देण्याचे आवाहन सचिव यांनी दिले आहे.
*****  

शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरिता अर्ज आमंत्रित

नागपूर दि.27 : समाज कल्याण विभागांतर्गत शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून शालेय विद्यार्थी दिनांक 4 जुलैपर्यंत अर्ज सादर करु शकतीलअशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय वाकुलकर यांनी दिली आहे.
 ऑफलाईन पद्धतीने चालणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये शालेय विद्यार्थी दिनांक 4 जुलैपर्यंत अर्ज सादर करु शकतील. प्राप्त अर्जानुसार विद्यार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्धी दिनांक 7 जुलैपर्यंत,यादीनुसार प्रवेश प्रक्रिया दिनांक 21 जुलैपर्यंतरिक्त जागेनुसार दुसरी यादी दिनांक 23 जुलैला करण्यात येईल. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना दिनांक 31 जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. पहिल्या व दुसऱ्या यादीत वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात स्पॉट ॲडमिशनद्वारे दिनांक 3 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येईल.
इयत्ता 10वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता) विद्यार्थी दिनांक 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतील. पहिली निवड यादी दिनांक 23 ऑगस्टपर्यंतअंतिम प्रवेश दिनांक 31 ऑगस्टपर्यंतरिक्त जागेनुसार दुसरी यादी दिनांक 4 सप्टेंबरलादुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश दिनांक 11 सप्टेंबरपर्यंत तसेच स्पॉट ॲडमिशन दिनांक 15 सप्टेंबरपर्यंत करता येईल.
पदवीपदविकापदव्युत्तर पदवीपदविका अभ्याक्रमासाठी प्रवेशित (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता) विद्यार्थी दिनांक 24 जुलैपर्यंत अर्ज सादर करू शकतील. प्राप्त अर्जानुसार पहिली यादी दिनांक 27 जुलैपर्यंतप्रवेश दिनांक 13 ऑगस्टपर्यंतरिक्त जागेनुसार दुसरी यादी दिनांक 16 ऑगस्टलायादीनुसार प्रवेश दिनांक 24 ऑगस्टपर्यंत तसेच स्पॉट ॲडमिशन दिनांक 29 ऑगस्टपर्यंत करता येणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना दिनांक 28 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येईल. प्राप्त अर्जानुसार विद्यार्थ्यांची पहिली यादी दिनांक 30 ऑगस्टपर्यंतप्रवेश दिनांक 9 सप्टेंबरपर्यंतरिक्त जागेनुसार दुसरी यादी दिनांक 7 सप्टेंबरलादुसऱ्या यादीतील प्रवेश दिनांक 12 सप्टेंबरपर्यंत तसेच वंचित विद्यार्थ्यांचे स्पॉट ॲडमिशन दिनांक 17 सप्टेंबरपर्यंत करण्यात येईल.
शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास इच्छूक मुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहराजनगरदिक्षाभूमी चौकनागपूर तसेच मुली संत मुक्ताबाई मुलींचे शासकीय वसतीगृहसिव्हील लाईनमहालेखाकार द्वितीय कार्यालयाच्या बाजुलानागपूर येथे विहित दिनांकापर्यत अर्ज सादर करू शकतीलअसे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय वाकुलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  
*****  

अपंग प्रशिक्षण केंद्रासाठी 30 जूनपर्यंत अर्ज आमंत्रित

          नागपूर दि.27 : तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्रदेगलूर या संस्थेत मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी अपंग व मुकबधीर मुला-मुलींची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून इच्छूकांनी दिनांक 30 जूनपर्यत अर्ज सादर करावे.   
            अपंग कल्याण आयुक्तालय पुणे यांची मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्रदेगलूर येथे व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये संगणक प्रशिक्षण (हार्डवेअर व कॉम्प्युटराईज्ड अकाँटींग अँन्ड ऑफिस ॲटोमेशन)वेल्डर कम फॅब्रीकेटरकंपोजींग प्रिटींग ॲन्ड बायडींगशिवण कर्तनकलाटंकलेखनविजतंत्री इत्यादी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.  
              अपंग व मुकबधीर प्रशिक्षणार्थ्यांना यशवतंराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी प्रदान करण्यात येईल. याशिवाय उमेदवारांना निवासवैद्यकिय औषधोपचाराची व प्रशिक्षण साहित्याची सेवा विनामुल्य राहील.
            इच्छूक अपंग उमेदवारांच्या पालकांनी दिनांक 30 जूनपर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्रशिवनेरी नगररामपूर रोड देगलूर जिल्हा नांदेडभ्रमणध्वनी क्रमांक 9403207100,9960900369 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
*****

समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना लाभार्थ्यांपर्यत पोहोचवा - चंद्रशेखर बावनकुळे

योजनेच्या माहितीपटाचे विमोचन   
नागपूर दि.27 : समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरी शेततळेफळबाग योजनेसह ग्राम विकासासाठी विविध योजनांचा समावेश असून या सर्व एकत्रित योजना प्रत्येक गावापर्यत पोहोचवून विकास योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.
बचत भवन सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच ग्रामीण जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी योजनेतील लाभार्थ्यांच्या मुलाखती तसेच योजनेबद्दल माहितीपटाची तसेच सोशल मिडियासाठी लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या लघुपटाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी खासदार कृपाल तुमानेआमदार आशिष देशमुखडॉ. मिलींद मानेजिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकरजिल्हाधिकारी अश्विन मुदगलजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादवउपजिल्हाधिकारी सुभाष चौधरीमुख्य वन संरक्षक मल्लिकार्जूनशिक्षण समिती सभापती उकेश चव्हाणउपजिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जायभायेजिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर आदी उपस्थित होते.
समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यात अहिल्यादेवी सिंचन विहिर उपक्रमांतर्गत हजार 131 विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले असून कल्पवृक्ष फळबाग लागवडीमध्ये हजार860 निर्मल शौचालय, 4 हजार 270, नंदनवन वृक्षलागवड अंतर्गत हजार 848 त्यासोबतच निर्मल शोष खड्डेअमृत शेततळेस्मशानभूमी सुशोभिकरणग्रामपंचायत भवनघरकुल योजना आदी योजनेसोबतच वैयक्तीक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. या योजनेची यशोगाथा लघुपटाच्या मार्फत सर्व जनतेपर्यत पोहोचविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ सर्व जनतेने घ्यावा असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्वागत करुन समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. लघुपटाच्या माध्यमातून तालुकास्तरावर सुरु असलेल्या कामासंदर्भातील विकास गाथा जनतेपर्यत पोहोचावी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी या माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. हा माहिती पट व लघुपट जिल्हा माहिती अधिकारी नागपूर यांनी तयार केला असून यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व उपजिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जायभाये यांनी मार्गदर्शन केले आहे.
प्रारंभी उपजिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जायभाये यांनी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या माहिती पटाच्या निर्मितीबद्दल माहिती दिली. आभार जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी मानले.
*****  

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे 184 मोबाईल टॉवर उभारणार



नवी दिल्ली, दि. 27 : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाईल व इंटरनेट सुविधेत वाढ होणार असून या जिल्ह्यात लवकरच 184 अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी केंद्रीय वाणिज्य, व्यापार व नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांना पत्राद्वारे दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाईल व ब्रॉडबॅंड नेटवर्कचे जाळे विस्तारण्याच्या योजनेअंतर्गत टू-जी क्षमतेचे 74 व थ्री-जी क्षमतेचे 110 मोबाईल टॉवर नजिकच्या काळात उभारण्याच्या प्रस्तावास मंजूरी प्रदान करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोबाईल व ब्रॉडबॅंड सुविधांचे जाळे विस्तारण्यासाठी राष्ट्रीय ऑप्टीकल फायबर नेटवर्कचे जाळे व पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत श्री. सिन्हा यांना श्री प्रभू यांनी पत्र लिहीले होते.
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांमध्ये 188 टू-जी व 68 थ्री-जी मोबाईल टॉवर्स आहेत. मात्र, या भागातील रम्य समुद्रकिनारे व इतर परिसरातही पर्यटकांची गर्दी कायम असते. त्यामुळे या जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात मोबाईल सुविधांमध्ये सुधारणा आवश्‍यक असल्याची गरज केंद्रीय मंत्री श्री. प्रभू यांनी पत्राद्वारे व्यक्त केली होती. श्री. सिन्हा यांनी आपल्या पत्रोत्तरात मोबाईल टॉवर्सची संख्या आणखी 184 ने वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे कळविले आहे.
त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील 365 ग्राममंचायतींमध्येही आधुनिक ब्रॉडबॅंड सुविधा पुरविण्यात येईल, अशीही माहिती सिन्हा यांनी पत्राव्दारे कळविली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 368 ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबॅंडद्वारे जोडणी करण्यात येणार आहे. यामुळे या जिल्ह्यातील दूरसंचार पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री श्री. प्रभू यांना लिहीलेल्या पत्रात केंद्रीय दूरसंचारमंत्री सिन्हा यांनी ही माहिती दिली.
००००

सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू


मुंबई, दि. 27:सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक व वसई- विरार शहर महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 97 च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून त्यानुसार 1 ऑगस्ट 2018 रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झालू आहे. आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहणार आहे.
या निवडणुकीची सूचना महानगरपालिका आयुक्त दिनांक 4 जुलै 2018 रोजी प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे ऑनलाईनरित्या भरण्यासाठी आयोगाने निश्चित केलेली वेबसाईट दि. 4 जुलै 2018 रोजी सकाळी 11 वाजता ते दिनांक 11 जुलै 2018 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. ही भरलेली नामनिर्देशनपत्रांची छापील प्रत दिनांक 4 ते 11 जुलै 2018 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3या वेळेत स्वीकारण्यात येतील. रविवार दिनांक 8 जुलै 2018 रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.
नामनिर्देशनपत्रांची छाननी दिनांक 12 जुलै 2018 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून करण्यात येईल. छाननी झाल्यानंतर लगेच वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 जुलै 2018 रोजी  दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. रविवार दिनांक 15 जुलै 2018 रोजी उमेदवारी मागे घेता येणार नाही. दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारांना निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येईल. अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी दि. 18 जुलै 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यक असल्यास दिनांक 1 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 7.30 वा. ते 5.30 वा. या वेळेत मतदान घेण्यात येईल. मतमोजणी दिनांक 3 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात येईल तसेच निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
००००

दिलखुलासमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला


मुंबई, दि. 27 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत गुरुवार दि. 28 जून आणि शुक्रवार दि.29 जून रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात येईल. निवेदिका पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत  घेतली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात, त्यामागचा उद्देश व संकल्पना, अभियानाची वैशिष्ट्ये, महिलांचे सक्षमीकरण, या अभियानाचा फायदा मिळवून घेण्यासाठीचे निकष, महिला व तरूणांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, या अभियानाबद्दल करण्यात आलेली जनजागृती तसेच ऑन अ बॅचही संकल्पना या विषयांची माहिती श्रीमती आर. विमला यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००



विशेष शिक्षक आणि परिचर यांचे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समायोजन करावे - विनोद तावडे



मुंबई, दि.27:केंद्र पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण (माध्यमिक स्तर) योजनेअंतर्गत नियुक्त केलेल्या विशेष शिक्षक व परिचर यांना समायोजीत करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयानुसार संबंधित १ हजार १८५ विशेष शिक्षक आणि ७२ परिचर यांना सेवेत समायोजीत करण्यात यावेत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दिले.
मंत्रालयात आज केंद्र पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या समायोजनेसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री तावडे बोलत होते. या बैठकीस विधानपरिषद सदस्य नागो नाणार, श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत, विभागाच्या उपसचिव चारूशिला चौधरी आदीसह संबंधित शिक्षक आणि अधिकारी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले, सदर योजनेची अंमलबजावणी करताना नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी. त्यानंतर संबंधित १ हजार १८५ आणि ७२ परिचर यांचे समायोजन करण्यात यावे. तसेच, पडताळणी करताना अथवा तदनंतर या जागांसाठी पात्र म्हणून शिक्षकांचे अर्ज प्राप्त झाल्यास त्यांचे विहित तपासणी करूनच निर्णय घेण्यात यावा, असेही श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.
०००

बचत गटातील महिलांनी उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा - सुभाष देसाई


राज्यस्तरीय महिला उद्योजिका चर्चासत्र
 मुंबई, दि. 27 : राज्यात बचत गट चळवळ यशस्वी ठरली आहे. आता या बचतगटातील महिलांनी उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेऊन यशस्वी उद्योजक व्हावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. उद्योग विभाग आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय एम. एस. एम. ई दिनानिमित्ताने आयोजित राज्यस्तरीय महिला उद्योजक चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी राज्यभरातील शेकडो यशस्वी उद्योजक महिलांनी चर्चासत्रात सहभाग नोंदवला.
चर्चासत्राचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, उद्योजिका कल्पना सरोज, पूनम सोनी,  वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संचालक रुपा नाईक, उद्योजक विजय कलंत्रीआदी उपस्थित होते. यावेळी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अंकिता श्रॉफ, अरुंधती जोशी, मुमताज पठाण, पुजा अहिरे या यशस्वी उद्योजिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री. देसाई म्हणाले, राज्य शासन महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. महिला उद्योजकांची संख्या केवळ नऊ टक्के असून ती 20 टक्के वाढवण्याचे राज्य शासनाने उद्द‍िष्ट ठेवले आहे. महिलांनी ठरवल्यास हे प्रमाण लवकरच पन्नास टक्के जावू शकते.  महिलांसाठीचे उद्योग धोरण केवळ कागदावर राहू नये, तर त्याची प्रत्यक्ष अमलंबजावणी होण्याची गरज श्री. देसाई यांनी व्यक्त केली. महिलांना उद्योग उभारण्यासाठी लागणारी जमीन, अनुदान, कर्ज सवलत देण्यास राज्य शासन तयार आहे. केवळ महिलांना या क्षेत्रात पुढे येण्याची गरज आहे. महिलांना उत्पादित केलेल्या मालाचे परदेशात मार्केटिंग करण्यासाठीदेखील राज्य शासन अनुदान उपबल्ध करून देत आहे. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी परदेशात आपल्या वस्तुंचे प्रदर्शन भरवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शंभर टक्के महिलांची मालकी असे तरच शासनाच्या सर्व सवलतींचा महिलांना फायदा होईल, असेही श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. असे असले तरी पुरूषांच्या मालकीचा एखादा उद्योग बंद पडला असेल तर महिलांना एकत्र येऊन तो चालवण्याची तयारी दर्शवल्यास त्यांना मदत केली जाईल. महिला बचत गटांनी एकत्र येऊन मोठा उद्योग उभा करू शकतात, त्यासाठी त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. महिला उद्योजिकांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रत्येक जिल्ह्यात चर्चासत्राचे आयोजन केले जाणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.
उद्योग राज्यमंत्री श्री पोटे पाटील यांनी जास्तीत जास्त महिलांनी उद्योग क्षेत्रात यावे व शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले. आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते असेही ते म्हणाले. आता पर्यंत सुमारे 28 हजार महिला उद्योजिकांना प्रशिक्षण दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
अतिरिक्त मुख्य सचिव श्री. गवई यांनी महिलांच्या उद्योग वाढीसाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदल येण्याची आवश्यकता आहे असे सांगितले.  महिला उद्योजिकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरजही त्यांनी बोलून दाखविली.
विकास आयुक्त डॉ. कांबळे यांनी धोरण आखण्यामागची पार्श्वभूमी आणि धोरणातील फायद्यांची माहिती दिली. परदेश दौरे करण्यासाठी, पेटंट घेण्यासाठी आणि  भाग भांडवल उभारण्यासाठी शासन मदत करण्यास तयार आहे. त्याचप्रमाणे मैत्रीइथे महिलांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. 
कमानीट्यूबच्या व्यवस्थापकीय संचालक कल्पना सरोज म्हणाल्या, खेडेगावातून मुंबईत आल्यानंतर एकाही रस्त्याची ओळख नव्हती.  राहण्यासाठी घर नव्हते. कपडे पुरेसे नव्हते. असे असताना कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर केवळ पन्नास हजाराच्या भागभांडवलावर दोन हजारकोटी रुपयांचा उद्योग उभारला. याच मुंबई शहरातील दोन रस्त्यांना आपले नाव लागल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे हे यश साधता आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्वेलरी क्षेत्रातील पुनम सोनी यांनी आपला अनुभव सांगितला. ज्वेलरी क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सरकारने सवलत देण्याची गरज आहे. सकारात्मक बदल आणि यशस्वी मार्केटिंगच्या जोरावर कुठल्याही गरूडझेप घेता येते, असे त्या म्हणाल्या. ज्वेलरी क्षेत्रात अनेक अडचणी असताना त्यावर मात करून आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा फडकवला. तरीही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याकडे पुरेशा सुविधा मिळत नाही, त्या मिळणे गरजेचे आहे
दिवसभर चाललेल्या या चर्चा सत्रात उद्योग क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांनी मार्गदर्शन केले. यात अभियांत्रिकी उद्योग- महिला उद्योजिकांसाठी संधी, ग्रामीण उद्योग, वित्तीय सहाय्य, आतंरराष्ट्रीय बाजारपेठ व उद्योगांचे व्यवस्थापन या सारख्या विविध विषयांवर चर्चा सत्र पार पडले. या कार्यक्रमाला सुमारे 600 महिलांनी सहभाग नोंदविला.
००००