Friday 28 April 2017

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'रूद्र वीणा माझी साधना' या विषयावर सुवीर मिश्र यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित' जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात 'रूद्र वीणा माझी साधना' या विषयावर सीमा शुल्क, निर्यात विभागाचे आयुक्त सुवीर मिश्र यांची मुलाखत घेण्यात आली आहे.
ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि.28 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होणार आहे.ही मुलाखत  हेमंत बर्वे यांनी घेतली आहे.                                          
००००

‘ दिलखुलास’ कार्यक्रमात 'पर्यावरण आणि हवामान साक्षरता' या विषयावर विशेष मुलाखत


मुंबई, दि. 27 : 'पर्यावरण आणि हवामान साक्षरता' या विषयाच्या अनुषंगाने  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित' दिलखुलास' या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.अन्‌बलगन यांची मुलाखत घेण्यात आली आहे.          
          या मुलाखतीत पर्यावरण विषयक प्रश्न आणि शासन करत असलेल्या उपाययोजना या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून शुक्रवार दि. 28 व 29 एप्रिल 2017 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत हेमंत बर्वे यांनी घेतली आहे.
००००

तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यात पहिल्यांदाच बाजार हस्तक्षेप योजना - पणन मंत्री सुभाष देशमुख

मुंबई, दि. २७ : राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी  राज्यात पहिल्यांदाच तूर खरेदीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दिनांक २२ एप्रिल २०१७  पर्यंत खरेदी केंद्रांवर आलेल्या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मदत होणार आहे, असे पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
या योजनेंतर्गत दिनांक २२ एप्रिल २०१७ पर्यंत खरेदी केंद्रांवर नोंद झालेली आहे परंतू ती खरेदी झाली नाही अशा शिल्लक राहिलेल्या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. याअंतर्गत तूर खरेदी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ, नागपूर या ‘नोडल एजन्सी’ म्हणून नियुक्त केलेल्या संस्थांकडे सोपविण्यात आली आहे. असे सांगून श्री. देशमुख पुढे म्हणाले की, खरेदी केंद्रावरील  शिल्लक असलेल्या तुरीचा पंचनामा करण्यासाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली सहायक निबंधक, सहकारी संस्था, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यवस्थापक, सबएजंट संस्था तसेच पणन महासंघ, विदर्भ पणन महासंघ प्रतिनिधी, यांची समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात खरेदी केंद्रावर दिनांक 22 एप्रिल 2017 रोजी प्रत्यक्ष आलेल्या तुरीची नोंद, टोकन किंवा उपलब्ध असलेल्या माहितीवरून शेतकऱ्यांची यादी अंतिम करुन जिल्हा उपनिबंधकामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून त्यांच्या मान्यतेनुसार त्या केंद्रावरील तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. या खरेदीच्या समन्वयाची जबाबदारी पणन संचालक, पुणे यांच्याकडे देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचा 7/12 उतारा, त्यावरील पीक पेरा पाहणी प्रमाणे तुरीची नोंद आहे का याची खात्री करुन, पीक पेऱ्यानुसार व कृषी विभागाने निश्चित केलेल्या हेक्टरी उत्पादनानुसार शेतकऱ्याकडून तूर खरेदी करण्यात येत आहे.
खरेदी केंद्राशी जोडलेले, संलग्न क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील तूर किंवा परराज्यातून आवक झालेल्या, व्यापाऱ्यांनी खरेदीला आणलेल्या तुरीसाठी ही योजना लागू राहणार नाही. या योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या तुरीच्या चुकाऱ्याची रक्कम ज्या शेतकऱ्यांच्या नांवे 7/12 चा उतारा आहे, त्यांच्या आधारकार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने एनईएफटी/आरटीजीएसद्वारे देण्यात येणार आहे.
या खरेदीसाठी राज्य पणन महासंघ, विदर्भ पणन महासंघ यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बारदानाचा सर्वप्रथम वापर करावा व आवश्यकता भासल्यास बारदाना ई-निविदेद्वारे पणन महासंघाने/विदर्भ पणन महासंघाने उपलब्ध करुन घ्यावा, असे आदेश देण्यात आले असल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले आहे.   
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
००००

‘उडान’द्वारे पर्यटन, औद्योगिक, शिक्षण क्षेत्रातील अमर्याद संधी खुल्या – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नांदेड-हैद्राबाद विमानसेवेस व्हिडीओलिंकींगद्वारे प्रारंभ
नांदेड, दि. 27 : ‘उडान’- उडे देश का आम नागरिक’ या योजनेद्वारे देशाचे अनेक भाग हवाई मार्गाने जोडून देशाची एकात्मता आणखी दृढ करण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून भारताकडे हवाई क्षेत्राच्या विकासाबरोबरच पर्यटन, औद्योगिक, व्यापार, शिक्षण अशा क्षेत्रातील अमर्याद संधी खुल्या होतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ‘उडान’ या केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी क्षेत्रीय संपर्क योजनेतील नांदेड–हैद्राबाद विमान सेवेचा प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओलिंकीगद्वारे आज करण्यात आला. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी शिमला येथून बोलत होते.
यानिमित्ताने नांदेड येथील गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगावकर, नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, डी. पी. सावंत, हेमंत पाटील, डॉ. तुषार राठोड, एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे किशनलाल शर्मा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे,  मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर नांदेड-हैद्राबाद विमानाच्या प्रवाशांना शुभेच्छा देऊन विमान हैद्राबादकडे रवाना करण्यात आले.
प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते नांदेड-हैद्राबाद विमानसेवेसह, शिमला –दिल्ली, कडप्पा-हैद्राबाद या विमानसेवांचाही प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्रधानमंत्री मोदी म्हणाले, परवडेल अशा दरात हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने, देशातील नागरिकांना आपल्या विविध क्षमतांचा विकास करण्याची संधी मिळेल. यामुळे देश विकासाच्या वाटेवर अग्रेसर होईल. उडानमध्ये सामान्य नागरिकांना हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. देशाचा कानाकोपरा जोडला जाईल. यातून देशाची एकात्मता आणखी दृढ होईल. पर्यटन, औद्योगिकीकरण, व्यापार, शिक्षण अशा क्षेत्रातील अमर्याद संधीही खुल्या होतील. नांदेड, अमृतसर आणि पाटणा या शिख धर्मियांच्या तीर्थस्थळांसाठी विमानसेवा सुरु करण्याने जगभरातील शिखबांधव या सेवेला चांगला प्रतिसाद देऊ शकतात, असेही प्रधानमंत्री मोदी यांनी विमान कंपन्यांना सूचित केले.
तत्पुर्वी, नांदेड विमानतळ येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना श्रीमती मुंडे म्हणाल्या की, देशाच्या प्रगतीत सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून उडान या संकल्पनेला प्रधानमंत्री मोदी यांनी चालना दिली आहे. केवळ पायाभूत सुविधांचा विकास नव्हे, तर त्या सुविधांचा सामान्य नागरिकांसाठी वापर होणे आवश्यक आहे. या योजनेमुळे विमान प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येईल. नांदेड येथून सुरु होणाऱ्या विमानसेवेचा फायदा लगतच्या जिल्ह्यांनाही होणार आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासह, या परिसरातील प्रत्येक क्षेत्रासाठी विमानसेवा महत्त्वाची ठरणार आहे.
श्री. संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले की, विमानसेवा केवळ खास वर्गासाठी असू नये, तर ती देशातील आम नागरिकांनाही उपयुक्त ठरावी, अशी ही योजना आहे. या विमान सेवेचा नांदेडसह अन्य जिल्ह्यांना निश्चितच फायदा होणार आहे. या विमानसेवेचा भविष्यात चांगला विस्तारही होईल, असेही त्यांनी सांगितले.
खासदार अशोक चव्हाण यांनीही या विमान सेवेमुळे नांदेडमधील पर्यटन, औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल, तसेच मराठवाड्याच्या विकासाच्यादृष्टीने विमान सेवा उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
०००
तोडकर / आरेवार 27.4.2017

‘महावेधा’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर, दि. 27  :   राज्यातील सर्व महसुल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचा प्रकल्प कृषि विभागाने सार्वजनिक खाजगी भागीदारीतून बांधा-मालक व्हा-चालवा (Built-Own-Operate-BOO) या तत्वावर महावेध प्रकल्पाची अंमलबजावधी करण्याकरिता निविदा प्रक्रियेतून मे.स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. यांची प्रकल्प अंमलबजावणीसाठी सेवा पुरवठादार संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकल्पातंर्गत राज्यातील सर्व 2065 महसुल मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या केंद्राचे उद्घाटन डोंगरगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार दिनांक 30 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.
यावेळी कृषि व फलोत्पादन मंत्री श्री. पांडुरंग फुंडकर, उर्जा, नवीन व नविकरणीय उर्जा तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाशिव खोत, जिल्हा परिषद अध्यक्षा निशाताई सावरकर, खासदार कृपाल तुमाने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महावेध प्रकल्पांतर्गत सर्व महसुल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रांच्या उभारणी करिता 5मी x 7मी. जागा 7 वर्ष कालावधीसाठी शासन उपलब्ध करुन देणार आहे. या प्रकल्पाकरिता सर्व आर्थिक गुंतवणुक मे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. करणार आहे., स्वयंचलित हवामान केंद्रांच्या उभारणीकरिता शासनाने जागा हस्तांतरित केल्यापासून 6 महिन्याच्या कालावधीत मे.स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. स्व-गुंतवणुकीतून हवामान केंद्राची उभारणी करुन पुढील 7 वर्ष कालावधीकरीता महावेध प्रकल्प स्वखर्चाने चालवणार आहे. महावेध प्रकल्पांतर्गत प्रत्येक स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामान विषयक घटकाची Real Time माहितीची नोंद दर 10 मिनीटांनी उपलब्ध होणार आहे.,
महावेध प्रकल्पांतर्गत हवामान विषयक माहिती मे.स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. यांचेकडून शासनास सार्वजनिक उपयोगाच्या प्रकल्पाकरीता मोफत उपलब्ध होणार आहे., प्राप्त होणाऱ्या हवामान विषयक माहितीचा उपयोग पीक विमा योजना, हवामान आधारीत पीक विमा योजना, कृषि हवामान सल्ला व मार्गदर्शन, कृषि संशोधन व आपत्ती व्यवस्थापनासाठी होणार आहे., स्वयंचलित हवामान केंद्राच्या राज्यात निर्माण होणाऱ्या जाळ्यामुळे हवामानाच्या माहितीमध्ये अचुकता येणार., संशोधन व अव्यावसायिक स्वरुपाच्या सेवा देण्यासाठी हवामान घटकांच्या नोंदीची माहिती केंद्र अथवा राज्य शासनाच्या अधिनस्त संस्थांना, विद्यापीठांना संशोधन कार्यासाठी शासन निशुल्क उपलब्ध करुन देईल.
****

निवृत्ती वेतनधारकांना सूचना

नागपूर, दि 27 : वरिष्ठ कोषागार कार्यालयातंर्गत सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांना शासन निर्णयानुसार दिनांक 24 एप्रिल 2017 नुसार महागाई वाढीचा दर 125 टक्क्यांवरून 132 टक्क्यांवर करण्यात आले आहे. सदर महागाई वाढ माहे एप्रिल 2017 चे निवृत्तीवेतनासोबत देण्यात येत असल्यामुळे माहे एप्रिल 2017 चे निवृत्तीवेतन दिनांक 6 मे 2017 रोजी संबंधित बँकेमार्फत होईल. मात्र जुलै 2016 ते मार्च 2017 या कालावधीतील थकबाकी माहे मे 2017 चे निवृत्तीवेतनासोबत देण्यात येईल. याची नोंद निवृत्त वेतन धारकांनी घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी केले आहे.
****

कसारी माजी माल गुजारी तलावाच्या पुनर्स्थापनेसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान

नागपूर, दि. 27  : विदर्भ विकास पाटबंधारे विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यामधील देसाईगंज तहसिल क्षेत्रातील कसारी माजी माल गुजारी तलावाच्या पुनर्स्थापना, दुरूस्ती आणि अनुषंगिक कामांना मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
पुर्व विदर्भातील प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 134 राज्यस्तरीय ब्रिटीशकालीन मालगुजारी तलाव जलसंपदा विभागाकडे व्यवस्थापनाकरिता आहेत. या तलावांची पुरेशा दुरूस्ती अभावी सिंचन कार्यक्षमता कमी झाली आहे. त्यांच्या दुरूस्तीचे, पुनर्स्थापनेचे काम हाती घेतले जात आहे. विदर्भ विकास पाटबंधारे विभागाच्या वतीने देसाईगंज तहसिल क्षेत्रातील कसारी माल गुजारी तलावाची दुरूस्ती करून सिंचन प्रणाली सुरळीत करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान  करण्यात आली आहे.
या तलावाचे काम नियोजित वेळेत आणि प्रशासकीय मान्यतेच्या तुलनेत पूर्ण करावे, गाळ काढण्याची कामे विभागाच्या यांत्रिकी संघटनेमार्फत करण्यात यावी, तसेच कसारी माजी मालगुजारी तलाव दुरूस्तीनंतर लाभ धारकांच्या पाणी वापर संस्थांना हस्तांतरीत करण्यात यावी, अशा अटी घालण्यात आल्या असल्याचे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूरचे कार्यकारी अभियंता यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.
****

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेसंदर्भात आजार शुल्काबाबत माहिती प्रसिध्द करावी - सचिन कुर्वे

  • योजनेतील विविध आजारावरील उपचाराचा आढावा
  • नोंदणीकृत 35 रुग्णालयांची अकस्माक तपासणी

नागपूर, दि.27 :    गरीब रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे हृदयरोगापासून इतर महत्वाच्या आजारासंदर्भात नोंदणीकृत झालेल्या जिल्हयातील 35 रुग्णालयामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध आहे. रुग्णांना उपचारासंदर्भात संपूर्ण माहिती असावी यादृष्टीने उपचाराच्या शुल्कासंदर्भातील संपूर्ण माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावावी, अशी सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिली.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा व उपचारासंदर्भात रुगणालयाकडून उपलब्ध सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. यु. बी. नवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाय.आर. सवई, जिल्हा पुरवठा अधिकारी एल.टी. वार्डेकर, एन.आर. वंजारी, राजीव गांधी जीवनादायी आरोग्य योजनेचे फनिंद्र चंद्रा, डॉ. लोहित लांजेवार, निलेश बागडे आदी उपस्थित होते.
नागपूर जिल्हयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेसंदर्भात 35 हॉस्पीटल  नोंदणीकृत असून यामध्ये 4 शासकीय हॉस्पीटलचा समावेश आहे. 24 मल्टी स्पेशालिटी, 11 सिंगल स्पेशालिटी व 31 खाजगी रुग्णालय आहे. गरीब तसेच दारिद्रय रेषेखाली कुटुंबांना सुलभपणे आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात संबंधित हॉस्पीटलला सुचना देण्यात आल्या असल्याचे सांगतांना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे म्हणाले की, या सर्व रुग्णालयांमध्ये आकस्मीक तपासणी करावी. या तपासणीमध्ये योग्य उपचार होतो किंवा नाही याबाबतही पाहणी करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक यु.बी. नवाडे, तसेच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीचे फनिंद्र चंद्रा यांनी गरीब रुग्णांना या योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या उपचारासंदर्भात माहिती दिली.

00000000

लेखापरीक्षक नामतालिका 12 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले

गोंदिया,दि.26 : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 नुसार सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण, निबंधकांनी तयार केलेल्या व राज्य शासनाने मान्यता दिलेल्या नामिकेसंदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 ब आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चे नियम 69 (1) (फ) मधील तरतुदीनुसार सहकारी संस्थाच्या लेखापरीक्षणासाठी सन 2017 ते 20120 या कालावधीसाठी लेखापरीक्षक नामिका तयार करण्यासाठी www.mahasahakar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर        27 एप्रिल ते 12 मे 2017 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज संदर्भातील सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
     तरी सद्यस्थितीत सहकार खात्याच्या लेखापरीक्षक नामिकेवर असलेल्या लेखापरीक्षकांनी तसेच नामिकेवर नव्याने येवू इच्छिणाऱ्या लेखापरीक्षकांनी निर्धारित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया व सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयास संपर्क साधावा.

00000

जिएसटीच्या कार्यशाळेला व्यापा-यांचा प्रतिसाद


चंद्रपूर, दि.26 एप्रिल- 1 जुलै पासून केंद्र सरकारने वस्तु व सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी करण्यासाचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात स्थानिक व्यापारी प्रतिनिधी यांच्या शंकाचे समाधान करण्यासाठी चंद्रपूरमध्ये महेश भवन येथे रविवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  त्याला मोठया प्रमाणात व्यापारी प्रतिनिधी भाग घेतला असून त्यांच्या शंकाचे या कार्यशाळेत निराकरण करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हा कंझुमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर असोशियन तर्फे महेश भवन येथे  दुपारी 12 वाजता चंद्रपूर शहरातील सर्व व्यापा-यांसाठी जीएसटी संदर्भात कार्यशाळा ठेवण्यात आली होती. कर प्रणालीत राष्ट्रव्यापी बदल होत असतांना त्याची अमलबजावणी व्यापा-यांनीही करावी. राज्या राज्यातील करप्रणालीतील सूसुत्रता आणि एक कर एक राष्ट्र या संकल्पनेचा उहापोह करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
उपआयुक्त विक्रीकर सुनील लहाने यांनी यावेळी जमलेल्या शेकडो व्यापारी बंधुना वस्तु व सेवाकरासंबंधातील सादरीकरणाव्दारे शंका समाधान केले. जिएसटी म्हणजे काय आणि त्याचा उद्योजकांवर काय फरक पडेल याबाबतची माहिती त्यांनी दिली. यावेळी व्यापा-यांनी विचारलेल्या अनेक शंकाचे त्यांनी समाधान केले. यावेळी आयकर कायदयामध्ये 1 एप्रिल 2017 पासून रोखीने व्यवहार करण्यासंदर्भात काही बदल झाले आहे. त्या संदर्भात चंद्रपूरचे सनदी लेखापाल दामोधर सारडा यांनीही व्यापा-यांना मार्गदर्शन केले.  सद्या विक्रीकर विभागामार्फत या संदर्भातील जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात झाली असून पुढील कार्यक्रम तालुक्याच्या स्तरावर आयोजित करण्यात येत आहे.  
000

यशस्वी होण्यासाठी परिश्रमाला पर्याय नाही - प्रफुल्ल मारपकवार


माहिती केंद्रातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन

   नागपूर, दि. 26  : जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. तुमची मेहनतच तुम्हाला यश शिखरावर घेवून जाते. यासाठी स्वावलंबन आणि कठोर मेहनतीची तयारी बाळगल्यास प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यशश्री गवसेल असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार यांनी आज व्यक्त केला.
सीताबर्डी येथे माहिती व जनसंपर्क विभागाच्या माहिती केंद्रामध्ये आज ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार यांनी येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर तसेच माहिती केंद्राच्या अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते.
राजकीय संपादक पदाचा अनुभव कथन करताना प्रफुल्ल मारपकवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, प्रसार माध्यमांमध्ये राजकीय बाबींवर लिखाण करणे ही अत्यंत जोखमीची बाब आहे कारण एका चुकीच्या वृत्तामुळे एखाद्या राजकीय व्यक्तीची कारकीर्द नामशेष होवू शकते अथवा एखाद्या व्यक्तीची राजकीय कारकीर्द नावारूपाला देखील येवू शकते, एवढी ताकद प्रसार माध्यमातील लेखणीला आहे. यासाठी राजकीय विषयावर भाष्य करताना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या राजकीय बदलांचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे ते म्हणाले की, मी विदर्भाचा असून, मुंबईत जावून चांगली कारकीर्द बनवू शकलो कारण मी आजही आपल्या विषयात 18 तास काम करतो आहे.  मी विदर्भाचा म्हणून कधीच न्यूनगंड बाळगला नाही. तुमची मेहनत हिच तुमची खरी ओळख आहे. आज मुलांची वाचनाची आवड कमी होत आहे. ही बाब स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी मारक आहे. गुगलवर सर्वच प्रश्नांची उत्तरे गवसत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माहिती व जनंसपर्क विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नागपूर येथील माहिती केंद्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींची व्याख्याने आयोजित करण्यात येतात. अभ्यासाची तयारी सर्वच विद्यार्थी करतात. परंतु अभ्यास नेमका कसा करावा याबाबत अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. यासाठी विद्यार्थ्यांना माहिती केंद्राची विशेष मदत होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी मानले.
******

अनाथ, निराधार मुलांच्या बालगृहात आवश्यक सुविधा द्या - सचिन कुर्वे


जिल्हा महिला व बालकल्याण समितीची बैठक
बालगृहातील विविध सुविधांचा आढावा

नागपूर, दि.25 :  अनाथ तसेच मतिमंद मुलांच्या संरक्षणासोबतच त्यांच्या विकासासाठी बालगृहामध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देतांनाच बालगृहातील वातावरण मुलांच्या संगोपणासाठी पोशक राहिल याची खबरदारी घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा महिला व बाल कल्याण समिती बैठक जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती . त्याप्रसंगी बालगृहातील बालकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतांना ते बोलत होते.
यावेळी  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला सल्लागार समितीच्या कौटुंबिक न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायधिश श्रीमती मीरा खडतकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सिमा साखरे, श्रीमती माधुरी साकुळकर, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती विशाखा गुप्ते उपस्थित होते.
शासकीय वसतीगृहात 0 ते 6 वयोटातील मुलांची काळजी घेतली जाते. मुलांचे संरक्षण आणि काळजी घेण्याची जबाबदारी शासकीय वसतीगृहाची आहे. वसतीगृहात कोणताही गैरप्रकार होवू नये याकरिता सीसीटीव्ही कॅमेरा व पोलिसांची मदत घेण्याचेही निर्देष जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यावेळी दिले. तसेच मुले दत्तक घेण्याच्या प्रक्रियेबाबत, परराज्यातील बालकांना त्यांच्या स्वगृही स्थानांतर करण्याबाबत, मतीमंद मुकबधीर व विशेष काळजीची गरज असलेल्या अनाथ मुलांची  उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये समाज कल्याण विभागाने व्यवस्था करण्याबाबत सकारात्मक‍ चर्चा करण्यात आली.
अनाथ, निराधार, संकटग्रस्त मुलांसाठी तसेच मतीमंद मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या बालगृहातील मुलांना पोषक वातावरण मिळण्याकरिता आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात याव्या. सोबतच मुलांच्या समस्या समन्वयाने सोडवा, असे आदेश जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिलेत.
जिल्हा महिला सल्लागार समितीच्या कौटुंबिक न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायधिश श्रीमती मीरा खडतकर यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण  करण्याकरिता हुंडा पद्धतीच्या विरोधात जनजागृती कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिलांना सक्षम करण्याकरिता आर्थिक विकास महामंडळातर्फे विविध योजना राबविल्या जातात या योजना शहरी आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यावेळी सांगितले.
अपराधी परिविक्षा अधिनियम 1958 अंतर्गत 18 ते 21 या वयोगटातील किशोर वयीन गुन्हेगारास त्याचा गुन्हा सौम्य स्वरूपाचा असल्यास व तो सुधारण्याची शक्यता असल्यास न्यायालयाने तुरुंगाची शिक्षा न देता त्यास परिविक्षाधीनावर मुक्त केले जाते. अशा परिविक्षाधीनांचे पुनर्वसन करण्याकरिता 25 हजार रूपयांचे आर्थिक सहय्य शासनाकडून दिले जाते. सध्या स्थितीत पात्र असलेल्या परिविक्षाधी यांना 25 हजार रूपयांचे सहकार्य करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बैठकीला महिला व बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण समिती, जिल्हा महिला सल्लागार समिती आणि जिल्हा परिविक्षा समितीचे सदस्य उपस्थित होते.
                                                                 ******

Saturday 22 April 2017

खाण बाधित क्षेत्राचा निधी पिण्याचे पाणी, आरोग्य व शिक्षणावर खर्च करा - चंद्रशेखर बावनकुळे


  • बाधित क्षेत्रासाठी 43 कोटीचे नियोजन
  • घरपोच राशन अभिनव उपक्रम
  • खान बाधित क्षेत्रातमध्ये निधीचे विवरण
  • लोकप्रतिनिधीचा विश्वासात घेऊन आराखडा
नागपूर दि. 22 :   खनिज बाधित क्षेत्राचा विकास करतांना पर्यावरण आरोग्य, शिक्षण आदी  सामाजिक व आर्थिक विकासाला सहाय्यक होणाऱ्या योजनाचा समावेश करतांना संबंधित लोकप्रतिनिधीना विश्वासात घेऊन प्रस्ताव तयार करा अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा खनिज प्रतिष्ठान ची बैठक पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आली होती. त्या प्रसंगी मागदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. मल्लीकार्जुन  रेड्ढी ,सुधीर पारवे,समीर मेघे,जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य  कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, ग्रीन व्हीजन संस्थेचे कौस्तुभ चॅटर्जी खाणपट्टा धारकांचे प्रतिनिधी एस.एम. बोरीकर, के.एस. बोरीकर,के.एस. दिवे,एम.डी. मांगले, जिल्हा खनिकर्म अधिकारी एस.पी.कडू, आदी उपस्थित होते.
खाण व खनिजे विकास व नियम अधिनियमा अंतर्गत जिल्हात जिल्हा खनिज प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून प्रमुख व गौण खनिज पट्टाधारकाकडून स्वामित्व निधी म्हणून 43 कोटी रुपयाचा निधी गोळा झाला आहे. या निधी पैकी खाण बाधित क्षेत्रासाठी 28 कोटी 66 लक्ष रुपयांचे व  ईतर क्षेत्रासाठी 14 कोटी 34 लक्ष रुपये विविध विकास कामांवर खर्च करण्यात येणार आहेत. 60 टक्के निधी पिण्याचे पाणी पर्यावरण आरोग्य शिक्षण, कौशल्य विकास आदी नऊ बाबिंवर करावयाचा संपूर्ण संबंधित आमदारांनी  दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे प्रत्येक बाधित क्षेत्रानुसार निधी व विकास कामांचे नियोजन करुन प्रस्ताव 30 एप्रिल पर्यंत सादर करावे अशा सूचना पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.
खाण क्षेत्रात विकास कामे प्रस्तावित करतांना ज्या ग्रामपंयाचती पिण्याच्या पाण्याचे विद्युत देयक भरण्यास सक्षम नाही, अशा ठिकाणी सोलर पंप बलाविणे,आरोग्य केद्रांना सोलर द्वारा वीज पुरवठा, शालेय विद्यार्थ्थांना पोषण आहारामध्ये अंडी व दूध पुरविणे तसेच  या भागातील नागरिकांना घरपोच राशन पुरवठा करणे. पर्यावरण शिक्षण आरोग्य सुविधा. डिजीटल शाळा, आदी प्रस्ताव प्राधान्याने तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्यात.
खनिज प्रतिष्ठाण निधी मधील प्रस्थावित केलेल्यसा कामांना उच्चाधिकार समिती कडून मान्यता मिळाल्या नंतर योग्य कामांचे नियोजन कर तसेच प्रत्येक तीन महिन्यात कामांचा आढावा घेऊन फलश्रृती नोंदवा अशा सूचनाही या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यानी दिल्यात.
प्रारंभी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्वागत करून जिल्हा खनिज प्रतिष्ठाण मध्ये 43 कोटी रुपयाचा  निधी उपलब्ध असून उमरेड, रामटेक,हिंगणा आदी खाण क्षेत्रातील विकास योजनांसाठी 475 प्रस्ताव सादर झाले आहेत. यापैकी बाधित क्षेत्रातील 218अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रातील 256 प्रस्तावांचा समावेश आहे.

आभार प्रदर्शन जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. कडू यांनी मानले.
000000

Friday 21 April 2017

स्वाईन फ्लू आजाराच्या नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना करा - चंद्रशेखर बावनकुळे


  • आयएमए, खाजगी वैद्यकीय तज्ज्ञ व अधिकाऱ्यांची बैठक
  • स्वाईन फ्लूच्या रुग्णाला तात्काळ औषधोउपचार
  • व्हेंटिलेटर व आयसीयु असणाऱ्या खाजगी रुगणालयातही उपचार
  • आजाराबाबत जागृती मोहिम राबविणार

नागपूर, दि.21 :    स्वाईन फ्लू या आजारासंदर्भात रुग्णांना तात्काळ औषधोउपचार मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करतांनाच व्हेंटिलेटर व आयसीयु असलेल्या रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करुन उपचार करण्यासाठी सहकार्य करावे, असे सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्यात.
नागपूर जिल्हयात स्वाईन फ्लूच्या आजारासंदर्भातील रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 13 रुग्ण दगावले आहे. या आजारावर तात्काळ नियंत्रण तसेच आवश्यक औषधोउपचार या संदर्भात आयएमए, खाजगीवैद्यकीय तज्ज्ञ तसेच आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना उपचारासंदर्भात सूचना देतांना ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सौ. वैशाली खंडाईत, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमेश नवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निशवाडे, महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त रामनाथ सोनवणे, आरोग्य अधिकारी डॉ. चिवाणे, डॉ. प्रफुल्ल पांडे, डॉ. पोद्दार, डॉ. गिल्लुरकर आदी तज्ज्ञ उपस्थित होते.
स्वाईन फ्लू संदर्भात  जिल्हयातील उपलब्ध वैद्यकीय सुविधांची माहिती घेतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शासकीय रुग्णालयांमध्ये टॅम्बीफ्लू या औषधी गोळयांचा आवश्यक पुरवठा उपलब्ध असून रुग्णांना मोफत वितरण करण्यात येते. या संदर्भात आवश्यक असलेले सिरप सर्व रुग्णालयांना त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करुन देण्यात यावे. स्वाईन फ्लू बाबत लक्षणे आढळून आल्यास प्रतिबंधक लसिकरण आवश्यक आहे. खाजगी रुग्णालयामध्ये स्वाईन फ्लूच्या रुगणांना भरती करण्यासंदर्भात मार्गदर्शन करतांनाते पुढे म्हणाले की, नागपूर महानगर पालिकेतर्फे 34 हॉस्पीटलची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 438 खाटा असून 147 व्हेंटिलेटर उपलब्ध आहे.
खाजगी रुग्णालयाकडे व्हेंटिलेटर  व आयसीयुची सेवा उपलब्ध असल्यास स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करावे. स्वाईन फ्लूची औषधे जिल्हयातील 19औषधी दुकानदांराकडे उपलब्ध आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक साठा असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
स्वाईन फ्लू आजारासंदर्भात रुगणांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक माहिती असावी या द्ष्टीने प्रबोधन करण्याचे आवश्यकता आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लू या आजाराबद्दल तसेच घ्यावयाचा काळजी संदर्भात मार्गदर्शन करण्यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्वाईन फ्लू झाल्यानंतर घ्यावयाच्या काळजी संदर्भात तसेच जनतेनेही पॅनिक न होता नियमित औषधोउपचार करण्यासंदर्भात माहिती देण्यात येणार असून शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांनाही या आजाराच्या रुग्णांना प्राधान्याने औषधोउपचार करावा. असे सूचना यावेळी केल्यात.
स्वाईन फ्लू या आजाराची सर्वसाधारणपणे सौम्य असून नागरिकांना या आजारा न घाबरता हा आजार पसरु नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्याने योग्य उपचार विनाविलंब सुरु करावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थंकू नये व फ्लूची लक्षणे असतील तर हस्तादोलन न करण्याची काळजी घ्यावी असे आरोगय उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले. या आजारासंदर्भात रुग्णांना आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी या दृष्टीने आरोगय विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात असे डॉ. पोद्यार यांनी सूचविले.
जिल्हा शल्य चिकित्सक उमेश नवाडे यांनी नागपूर शहर व ग्रामीण भागात रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यापैकी 22 रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आल्याचे सांगितले. महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. चिवाणे यांनी महानगरपालिके तर्फे 34 रुगणालयांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती दिली.
00000000

जनतेला सुलभ व जलद सेवेसाठी प्रशासन अधिक लोकाभिमूख असावे - चंद्रशेखर बावनकुळे



  • नागरी सेवादिनाचे आयोजन
  • उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
नागपूर, दि.21 :  प्रशासनाचे मुल्यमापन हे जनतेला दिलेल्या सेवेवरुन होत असते. त्यामुळे सूलभ व जलद सेवा देवून प्रशासन अधिक लोकाभिमूख असावे, नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात उत्कृष्ट प्रशासनाचा नावलौकिक मिळविला आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकराव्या नागरी सेवादिना निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
सेंट ऊर्सूला शाळेच्या सभागृहात जिल्हा प्रशासनतर्फे नागरी सेवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उपजिल्हाधिकारी ते वाहन चालकांपर्यत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी  सचिन कुर्वे, नागपूर मेट्रोपॉलीटन रिजन डेव्हलपमेंट ऑथोरीटीचे डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे, उपजिल्हाधिकारी एन. के. राव उपस्थित होते.
काम कोणतेही असो उत्कृष्ट झालेच पाहिजे असा एकच ध्यास घेवून काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक व्हायला पाहिजे. आणि हा कौतुकाचा दिवस म्हणजे नागरी सेवा दिन होय असे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शासन आणि जनता यांच्यात दुवा साधण्याच काम शासकीय अधिकारी करत असतात. त्यामुळे प्रत्येक काम जबाबदारी व प्रामाणिकपणे  पुर्ण करणे आवश्यक आहे. नागपूर जिल्हा प्रशासन अतिशय उत्तमरीत्या काम करीत असल्याने नागपूर जिल्ह्याचा विकास निश्चितच होणार असेही ते म्हणाले.
जिल्हा प्रशासनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले की, जिल्हाधिकारी यांच्या चमूने लोकाभिमूख प्रशासनाची ओळख निर्माण केली असून जनतेलाही चांगल्या सेवा मिळत असल्यामुळे ऊर्जा मंत्री म्हणून जिल्हयाऐवजी राज्याच्या कामांमध्ये अधिक लक्ष देणे सूलभ होत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्याकरिता जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सर्वोष्कृष्ट काम केले. त्याबद्दल त्यांचे व संपूर्ण चमूचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केले.
नागरी सेवा दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. उपजिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जयभाये, मौदा तहसीलदार चंद्रभान खंडाईत, तहसीलदार श्रीमती प्रियदर्शनी बोरकर, काटोल तहसिलदार रमेश कोळपे, अव्वल कारकुन ओमप्रकाश द्वारमवार, रामटेकचे मंडळ अधिकारी महेश पुल्लीवार, सावनेरचे कनिष्ठ लिपीक विनोद शेंबेकर, कामठी तलाठी श्री बोरोकर, शिपाई प्रदीप कोल्हे, वाहनचालक कमलेश पाटील, हिंगला येथील कोतवाल प्रकाश वासेकर, लघुटंकलेखक संजय गिरी यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नागरी सेवा दिनानिमित्त मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंजुषा सावरकर यांनी तर, आभार  उपजिल्हाधिकारी एन. के. राव यांनी मानले.

0000000

अनुभवाच्या आदान-प्रदानासाठी नागरी सेवा दिनाचे विशेष महत्त्व -अनूप कुमार


नागपूर, दि. 21 : शासनाच्या विविध विभागातील योजनांच्या अंमलबजावणीतील अनुभवांची तसेच विचारांची देवाण-घेवाण होण्यासाठी नागरी सेवा दिनाचे आयोजन उपयुक्त आहे. असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.
विभागीय आयुक्त  कार्यालयामध्ये आज 11वा नागरी सेवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम्, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर, पोस्टमास्टर जनरल मरीअम्मा थॉमस, रेव्हेन्यू खात्याचे राजकुमार घोष, उपायुक्त जितेंद्र पापळकर, पराग सोमण, डी. सी. पी. दीपाली मसिरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे तसेच नागरी सेवेतील इतर अधिकारी उपस्थित होते.
नागरी सेवांमध्ये येण्यासाठी युवापिढी प्रयत्न करीत आहे. नागरी सेवा दिनानिमित्ताने त्यांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल व युवकांतून कर्तव्यदक्ष अधिकारी निर्माण होऊन देशाच्या विकासाला नवी दिशा प्राप्त होईल असे सांगून विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की, स्वच्छ भारत मिशन, डिजिटल पेमेंट, डीजिधन, जनधन योजनेसारख्या विविध योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत व त्या यशस्वीपणे पूर्ण होत आहेत. भविष्यामध्ये शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व यशस्वीपणे राबविण्यासाठी शासनातील विविध विभागांच्या अधिकारी वर्गाने ‘रिफॉर्म’, ‘परफॉर्म व ‘ट्रान्सफॉर्म’ या मंत्राप्रमाणे कार्य करणे गरजेचे आहे.
रेल्वे, पोस्ट ऑफिस, महसूल, महानगरपालिका, परिवहन विभाग तसेच पोलिस विभागातील उपस्थित अधिकारी वर्गाने विभागातील नवीन योजना, जनतेला होणारा लाभ व योजनांची यशस्वीपणे होत असलेली अंमलबजावणी याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डीसीपी दीपाली मसिरकर यांनी मानले.
*****

कृषी उत्पादन वाढविण्यासाठी उत्कृष्ट बियाणे खतांचा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुरवठा करा - चंद्रशेखर बावनकुळे


  • खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा
  • 5 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपचे नियोजन
  • तूर, कापूस, सोयाबिनच्या क्षेत्रात वाढ
  • प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत मृदा आरोग्य पत्रिका
  • सिंचनाखाली क्षेत्र वाढविण्यासाठी आराखडा

नागपूर, दि.21 :   उन्नत शेती, समृध्द शेती या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढविण्याचा महत्वकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी उत्कृष्ट बियाणासोबतच खतांचा मागणीनुसार  पुरवठा करा, तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात खरीप हंगामपूर्व बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री बावनकुळे बोलत होते. यावेळी मागील वर्षाच्या कृषी उत्पादनाचा आढावा तसेच 2017-18 साठी खरीप कृषी उत्पादन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
यावेळी खासदार विकास महात्मे, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधीर पारवे, मल्लिकार्जुन रेड्डी, प्रा. जोगेंद्र कवाडे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे तसेच विविध अंमलबजावणी यंत्रणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खरीप आढाव्याचे नियोजन करताना तालुका स्तरावर लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, खरीप नियोजन करताना आधुनिक तंत्रज्ञानासह उत्पादन वाढीसाठी सूचविण्यात आलेल्या योजनासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तहसिलदारांनी सर्व विभागांचा अधिकाऱ्यांसह प्रत्येक गावात बैठक घ्यावी. शेतकऱ्यांच्या जीवनमानात प्रत्यक्ष परिवर्तन आणण्यासाठी या बैठकीमध्ये मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
शेतकऱ्यांना बियाणे व खतांसदर्भात अडचण जाणार नाही यादृष्टीने प्रत्येक केंद्रामध्ये दरपत्रक ठळकपणे लावण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना तक्रार करायची असल्यास दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन द्यावा. अशी सूचना करताना पालकमंत्री म्हणाले की, 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक गावातील वॉटक टेबल तयार करुन तालुका स्तरांवर एकत्र माहिती उपलब्ध करुन द्यावी. सिंचन क्षमता वाढविण्यासंदर्भात बोलतांना ते पुढे म्हणाले की, विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष सिंचन क्षमता व उपलब्ध झालेली सिंचन क्षमता याचा आढावा घेवून जेथे सिंचन होवू शकत नाही अशा ठिकाणी पर्यायी सिंचनासंदर्भात उपाययोजनाही 15 मे पर्यंत सादर कराव्यात.
खरीप पिकांच्या नियोजनाचा आढावाघेतांना जिल्हात मागील वर्षात 4 लाख 76 हजार हेक्टर क्षेत्रात नियोजन करण्यात आले असून यामध्ये सोयाबिनच्या क्षेत्रात 25 टक्के घट झाली असून यावर्षी 5 लाख 4 हजार 300 हेक्टर क्षेत्रात नियोजन करण्यात आले असून 94 हजार 200 हेक्टर क्षेत्रात भात, 60 हजार हेक्टर क्षेत्रात तूर, 2 लाख 15 हजार हेक्टर क्षेत्रात कापूस तर 1 लाख 10 हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबिन पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.
खरीप हंगामासाठी 85 हजार 629 क्विंटल बियाण्यांची तसेच 1 लाख 42 हजार मेट्रीक टन खतांची आवश्यकता असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खरीप कर्ज मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली असून 125 टक्के वितरणाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहेत. मागील वर्षी 70 हजार 734 सभासदांना खरीप व रब्बी मिळून 971 कोटी 43 लक्ष रुपयाचे कर्ज राष्ट्रीयकृत बँकांनी, तर सहकारी बँकांनी 32 कोटी 85 लाख रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले होते.
शेतकऱ्यांना जमीन आरोग्य प्रत्रिका वितरणाचा दोन वर्षाचा कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात आला असून मागील वर्षी 1 लाख 34 हजार 282 शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात आल्या होत्या, तर 2018-19 वर्षात 1 लाख 34 हजार 283 अशा एकूण 2 लाख 68 हजार 565 जमीन आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात येणार आहे. प्रधान मंत्री सिंचन योजनेअंतर्गत मागील वर्षी 1 हजार 970 शेतकऱ्यांना 2 हजार 145 क्षेत्रात सिंचनाचा लाभ देण्यात आला होता यासाठी 436 लाख 59 हजार रुपये खर्च झाला आहे. यावर्षी 2 हजार 417 लाभार्थ्यांना 2 हजार 645 हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.
उत्पादन वाढीसाठी विशेष कार्यक्रम अंतर्गत कापूस, सोयाबीन, भात, तूर आदी पिकांना प्रोत्साहन देण्यात येत असून शेतकऱ्यांनाही उत्‍पादन वाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.
प्रारंभी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्वागत करुन खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीस विविध पिकांच्या नियोजनासोबतच बियाणे, खते आदीबाबतही या बैठकीत माहिती दिली. जिल्हयातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी कर्ज सहज व सूलभपणे व्हावे यासाठी तालुकास्तरावर विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार असून जिल्हयात खरीप हंगामासाठी 659 कोटी 3 लक्ष रुपये तर रब्बी हंगामासाठी 247 कोटी 46 लक्ष रुपये असे एकूण 916 कोटी 49 लक्ष रुपये कर्ज वितरणाचे लक्ष ठेवण्यात आले आहे. तसेच सहकारी बँकांना 45 कोटी उद्दिष्ट देण्यात आले आहे.
तूर खरेदी करण्यासाठी केंद्र सुरु ठेवा
जिल्हयातील शेतकऱ्यांकडील तूर खरेदीसाठी सुरु करण्यात आलेली सर्व केंद्र तूर खरेदी बंद होईपर्यंत सुरु ठेवावी, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांनी केली. नाफेडतर्फे चार केंद्रावर 54 हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आले आहे. विदर्भ मार्केटिंगद्वारा नऊ केंद्रावर 53 हजार क्विंटल अशी एकूण 1 लाख 7 हजार क्विंटल तूरीची खरेदी झाली आहे. तूर खरेदी करताना आवश्यक बारदाना तसेच तूरीचे खरेदी केल्या तूरचे संरक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.
खरीप नियोजनासंदर्भात 1 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत तहसिलदारांनी प्रत्येक गावात जावून सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठकी आयोजित कराव्यात यामध्ये लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित करावे, अशी सूचना करताना पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पिक पध्दती, उत्पादन वाढविण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शनासोबत खरीप नियोजनासंदर्भात माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे आदींनी खरीप हंगाम नियोजना संदर्भात विविध सूचना केल्यात. सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याबाबत यावेळी सूचविण्यात आले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी आभार मानले. यावेळी कृषी, सिंचन, फलोत्पादन, महसूल, जिल्हा परिषदेसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000000