Wednesday 31 March 2021

पंचेचाळीस वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी कोविड लसीकरणाला आजपासून सुरुवात - डॉ. नितीन राऊत

Ø लसीकरण मोहीम बेड उपलब्धतेबाबत आढावा Ø जिल्ह्यात अडीच हजार लसीकरण केंद्र Ø सहा लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट Ø रुग्णालयासाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या Ø वैद्यकीय महाविद्यालयातील बेड वाढविण्यावर भर Ø लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाच्या सूचनांची अंमलबजावणी नागपूर, दि. 31 : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून लसीकरण करुन घेणे हा त्यावरील एकमेव उपाय आहे. जिल्ह्यात नवीन स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी जनतेने आरटीपीसीआर तपासणी करुन आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासोबतच गृह विलगीकरणातील रुग्णांनी विशेष दक्षता घ्यावी. लॉकडाऊनसंदर्भातील राज्य शासनाच्या निर्देशाचे कडकपणे पालन करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस मुंबईहून गृहमंत्री अनिल देशमुख, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे, महापौर दयाशंकर तिवारी, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री गिरीश व्यास, अभिजित वंजारी, विकास कुंभारे, ॲड. आशिष जयस्वाल, समीर मेघे, टेकचंद सावरकर, राजू पारवे, प्रवीण दटके आदी लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिका अपर आयुक्त जलज शर्मा, आयएमएच्या अध्यक्षा अर्चना कोठारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, टास्क फोर्सचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवीन स्ट्रेनच्या कोरोना विषाणूचे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले असून नागरिकांनी आरटीपीसीआर ही तपासणी प्राधान्याने करण्याचे आवाहन करताना पालकमंत्री म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे तपासण्यांची संख्या वाढविण्यासाठी अडीच हजार केंद्रे सुरु केली आहेत. ती वाढविण्यासाठी केंद्र शासनाला विनंती करण्यात आली आहे. मास्कचा वापर,सोशल डिस्टन्सिंग व नियमित हात धुणे यासह कोरोना लस घेण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे त्यासोबतच रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. बेडच्या उपलब्धतेसंदर्भात समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून जनतेलाही बेडच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. कोरोनाबाधित रुग्ण होमक्वारन्टाईन असताना बाहेर फिरत असल्याच्या तक्रारींबाबत डॉ. राऊत म्हणाले की, अशा रुग्णांसाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाने संहिता तयार करावी व त्यानुसार कडक निर्बंध लागू करावे. रुग्णालयात बेड उपलब्ध होण्यासाठी बेड मॅनेजमेंट, ऑक्सिजनचा पुरवठा तसेच रेमडिसिवर या औषधाची उपलब्धता यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना करताना ते पुढे म्हणाले की, कोविड हॉस्पिटलमधील रुग्ण व नातेवाईक यांचा संवाद तसेच आहार व्यवस्था चोख ठेवावी. ब्रिटेन, दक्षिण आफ्रिका व ब्राझिल येथील नवीन स्ट्रेनचे रुग्ण आढळल्यामुळे यासंदर्भातील उपचाराबाबत प्रोटोकॉल तयार करावा व त्यासंदर्भातील संपूर्ण माहिती जनतेला उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिलेत. कोरोनासंदर्भातील तपासणी, लसीकरण आदीबाबतची माहिती लोकप्रतिनिधींना उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच कोरोना रुग्णांच्या औषोधोपचार आदीबाबत नियंत्रणासाठी विशेष नोडल ऑफिसरच्या नियुक्त्या करण्यात येणार असून ग्रामीण भागासाठी संबंधित तहसीलदार तर शहरासाठी उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी असे निर्देशही यावेळी देण्यात आले. ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून यामध्ये काटोल, नरखेड, सावनेर,कामठी, हिंगणा आदी क्षेत्रात तपासण्यांचे प्रमाण व लसीकरण वाढविण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा, अशा सूचना गृहमंत्री देशमुख यांनी दिल्या. जिल्ह्यात सरासरी अडीचशे लसीकरण केंद्र आहेत. यापैकी शहरात 81 तर ग्रामीण भागात 163 केंद्रे आहेत. सहा लाख नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन त्यांची संख्या वाढविण्यात येतील, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच लसीकरण केंद्र वाढविणे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे बेडची संख्या वाढवून रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन देणे यासोबतच खासगी रुग्णालयात शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार उपचाराची सुविधा आदीबाबत लोकप्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी या सूचनांची तात्काळ पूर्तता करावी, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. राऊत यांनी प्रशासनाला दिले. महापौर तिवारी यांनी शहरात कोविड रुग्णांसाठी तात्काळ पाचशे बेड वाढविण्याची आवश्यकता आहे. यासोबतच बाधित रुग्णांना रेमडिसिव्हीर इंजेक्शन देण्यासाठी स्वतंत्र रुग्णालय असावे. गृहविलगीकरणातील रुग्णांना योग्य मार्गदर्शन करुन उपचार केल्यास बेडची संख्या वाढवू शकेल असे यावेळी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी बाधित रुग्णांना ग्रामीण भागात गृह विलगीकरणासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे क्वारंटाईन केंद्र सुरु करुन अशा रुग्णांची व्यवस्था करावी, अशी सूचना केली. खासदार डॉ. महात्मे यांनीही विविध सूचना केल्या. मुंबई, ठाणे, पुणे यानंतर नागपूरमध्ये लसीकरण चांगले झाले, असून जिल्ह्यात 3 लाख 59 हजार 953 लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात केंद्राची संख्या वाढवून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी दिली. प्रारंभी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी लसीकरण मोहीम, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यावर विशेष भर देण्यात आला आहे. लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी नागरिकांना बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले असून प्रत्येक केंद्रावर दोनशेपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागात 163 केंद्राद्वारे लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून तपासणी वाढविण्यात आली आहे. कोरोनाच्या सर्वाधिक रुग्ण असलेल्या भागात 4 हजार 402 कन्टोन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. ज्या गावात पाचपेक्षा जास्त रुग्ण आहेत अशा तालुक्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कळमेश्वर- 41, काटोल-20, सावनेर-64, नागपूर ग्रामीण-30, मौदा-10 हिंगणा -21, पाशिवनी-14, कामठी-21 या गावांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. *****

कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण वाढविणे हा सर्वोत्तम पर्याय - डॉ. नितीन राऊत

महानगर व जिल्ह्यातील अनेक केंद्रांना भेटी नागपूर, दि 31 : सातत्याने वाढणारे रुग्ण व मोठ्या संख्येने दगावणारे रुग्ण यामुळे नागपूर सध्या देशात कोरोनाच्या केंद्रस्थानी आहे. अशा परिस्थितीत लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय असून जिल्ह्यात उद्यापासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने कोरोना प्रतिबंधासोबतच लसीकरण मोहिमेकडे बारकाईने लक्ष वेधावे, असे आवाहन ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सकाळी दहा वाजतापासून नागपूर महानगर तसेच नागपूर ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांना भेटी दिल्यात. या भेटीदरम्यान विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी आज महानगर परिसरातील इंदिरा गांधी हॉस्पिटल, काटोल रोड परिसरातील के. टी. हॉस्पिटल, बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र, इमामवाडा आयसोलेशन केंद्र आणि उमरेड तालुक्यातील पाचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी दिल्यात. या भेटीदरम्यान त्यांनी उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांशी प्रत्येक ठिकाणी संवाद साधला. कोरोना काळामध्ये जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देणाऱ्या यंत्रणेचे आभार मानताना त्यांनी लसीकरण हे आगामी काळात कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपक्रम ठरणार आहे. त्यामुळे कोरोना आजाराचा अधिक प्रभाव पडणाऱ्या वयस्क गटातील सर्व नागरिकांचे लसीकरण प्राथम्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी पाचगाव येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी दाखविलेल्या उपस्थितीबद्दल आभार मानले. ज्यांनी लस घेतली त्यांनी लसीकरणाचे ब्रँड अँबेसिडर होत प्रत्येक गावांमध्ये ही लस सुरक्षित असल्याचा प्रचार करावा. ज्यांनी ही लस घेतली नाही त्यांनीही लस घेण्यासाठी आग्रह करावा, उद्यापासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. इंदिरा गांधी हॉस्पिटल, के. टी. हॉस्पिटल, बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र इमामवाडा आयसोलेशन केंद्र या ठिकाणी त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधला. नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत साडेतीन लाखावर लोकांनी लसीकरणामध्ये सहभाग नोंदविला आहे. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही अनुचित घटनेची तक्रार नाही. लसीकरणामुळे कोणालाही कुठला आजार झाला अथवा कुणाची प्रकृती बिघडल्याचे देखील पुढे आले नाही. त्यामुळे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम असून प्रत्येकाने स्वतःच्या लसीकरणासाठी जागरूक राहावे, असे त्यांनी आवाहन केले. काही केंद्रावर त्यांच्याहस्ते लसीकरणाचे प्रमाणपत्रही नागरिकांना देण्यात आले. नागपूर जिल्ह्यामध्ये लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे, अशी सर्व लोक प्रतिनिधींची मागणी आहे. या संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा केल्या जात आहे. काल 30 मार्च रोजी 9972 लोकांनी लस घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 3 लक्ष 59 हजार 943 लोकांनी लस घेतली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे या शहरानंतर सर्वात प्रभावीपणे नागपूर जिल्ह्यामध्ये लसीकरण होत आहे. *****

Saturday 27 March 2021

कोरोना वाढतोय; होळी आणि धुलीवंदनाच्या सुटीला घरातच रहा - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर दि. 27 :- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून यंदा सार्वजनिक होळी आणि धुलीवंदन सार्वत्रिक साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. काल शुक्रवारला जिल्हातील कोरोना बाधिताची संख्या 4 हजारावर पोहचली आहे. अशा वेळी होळी व धुलीवंदन उत्सव नागरिकांनी अत्यंत साधेपणाने, घरामध्येच साजरा करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. अर्थचक्र बंद होऊ नये म्हणून काही सवलती देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये याची देखील काळजी घेतली जात आहे. मात्र बाहेर पडण्यासाठी कोणतेही कारण नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. गेल्या वर्षभरात आतापर्यंत एकट्या नागपूर जिल्हयामध्ये 4 हजार 784 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाधितांची संख्या अचानक वाढल्यास वैद्यकीय यंत्रणेवर देखील ताण येऊ शकतो. नागपूर शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात हॉटस्पॉट तयार झाले आहे. अशावेळी कोरोना प्रोटोकॉल पाळणे गरजेचे असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यासाठी सहकार्य घरात राहून करणे आवश्यक आहे. मास्क लावणे, शारिरीक दूरी पाळणे, वारंवार हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. सध्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण असून उपाययोजना करण्यासाठी दररोज आढावा घेतला जात आहे. प्रशासन आपले काम करीत आहे. मात्र जनतेनेही या काळात सहयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर , मेयो, मेडिकल व जिल्हा आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांशी पालकमंत्री रोज संपर्कात आहे आणि आढावा घेत आहे. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करीत आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी देखील चाचणी आणि लसीकरणासाठी सहकार्य करतानाच रस्त्यावरील गर्दी कमी होईल यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. प्रशासनाचे निर्देश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी यंदा होळी, धुलीवंदन तसेच शब-ए-बारात उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करावे. या उत्सवांच्या निमित्ताने मिरवणूक काढता येणार नाही. कोरोना प्रतिबंधक नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये. मोठ्या स्वरूपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये. दूध विक्री व पुरवठा, भाजीपाला विक्री व पुरवठा, फळे विक्री, किराणा दुकाने, चिकन, मटण ,अंडी व मांस दुकाने, वाहन दुरुस्ती, पशुखाद्य दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील, असे आदेश काल रात्री प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच भारतीय दंड संहिता कलम 188 अंतर्गत आवश्यक दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. *******

Thursday 25 March 2021

नागपूर फ्लाईंग क्लबची तीन विमाने उड्डाणासाठी नव्याने सज्ज

नागपूर, दि. 25 : उड्डाण क्षेत्रात करिअर करणाऱ्या युवकांसाठी नागपूर फ्लाईंग क्लब नव्याने सज्ज होत असून नागरी विमान उड्डयण संचालनालय (डीजीसीए) परवानगीने तीन विमानांचे तपासणीपूर्व उड्डाण यशस्वी झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीनही विमाने प्रशिक्षणासाठी सज्ज झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली. नागपूर फ्लाईंग क्लबकडे चार विमाने असून त्यापैकी तीन विमाने सेसना 152 श्रेणीतील तर एक विमान 172 श्रेणीतील आहे. यापैकी तीन विमाने प्रशिक्षणासाठी सज्ज झाली आहेत. विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने तीनही विमानांचे आज टेस्ट फ्लाईट यशस्वी पार पडले आहे. उड्डाण यशस्वी झाल्यासंबंधीचा अहवाल नागपूर उड्डाण विभागाच्या महासंचालकांना यांना सादर करण्यात येणार आहे. महासंचालकांच्या मान्यतेनंतरच Airworthiness Redrew प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी आज दिली. विमानतळ परिसरातील नागपूर फ्लाईंग क्लबच्या हँगरमधून विमानतळ धावपट्टीपर्यंत व त्यानंतर या तीनही विमानाने आकाशात झेप घेतली. विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ विविध पद्धतीने उपलब्ध करुन घेण्यात आले आहे. त्यामुळे डीजीसीएकडून उड्डाण प्रशिक्षण संघटना (एफसीओ) ही मान्यता प्राप्त करुन घेण्यात येईल व त्यानंतर लवकरच विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. नागपूर फ्लाईंग क्लबकडे चार विमाने असून यापैकी दोन विमाने क्लबच्या मालकीची आहेत. तसेच नवी दिल्लीच्या एरो क्लब ऑफ इंडिया यांच्याकडून करार तत्त्वावर दोन विमाने घेण्यात आली आहेत. मागील साडेतीन वर्षांपासून बंद असलेले वैमानिक प्रशिक्षण पुन्हा सुरु करण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले आहेत. कोविड-19 च्या अनुषंगाने लॉकडाऊन सुरु असतानाही येणाऱ्या विविध अडचणींवर मात करत विमान प्रशिक्षणाला प्राधान्य देवून नव्याने विमानाचे उड्डाण सुरु करण्यात आले आहे. नागपूर फ्लाईंग क्लबची स्थापना 1947मध्ये झाली असून विदर्भातील महत्त्वाची संस्था म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या क्लबतर्फे आतापर्यंत बरेच पायलट प्रशिक्षित झाले आहेत. उड्डाण क्षेत्रातील करिअर लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने या क्लबची (नागपूर फ्लाईंग क्लब प्रा. लि.) शासनाच्या मालकाची कंपनी म्हणून 21 डिसेंबर 2006 रोजी नोंदणी केली आहे. या कंपनीचे काम कंपनी ॲक्टनुसार सुरु आहे. नागपूर फ्लाईंग क्लबच्या संचालक मंडळातर्फे प्रारंभी तीन विमानांचे अनिवार्य असलेले पुअर एक्सचेंज व एका विमानाचे स्ट्रीप इन्स्पेक्शन करण्यात आले. चारही विमाने मानकाप्रमाणे करुन घेण्यात येवून एन. डी. टी. तपासणी करण्यात आली. त्यासोबतच हँगरचेसुद्धा नूतनीकरण करण्यात आले. विमानांसाठी अत्यावश्यक असलेले रेडिओ उपकरणांची दुरुस्ती सीएएमओचे नूतनीकरण आदी सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. त्यासोबत एरो क्लब ऑफ इंडियाच्या एरो मोबाईल लायसन्सचे डी - रजिस्ट्रेशन व रजिस्ट्रेशन करणे तसेच विमानांच्या चाचणीसाठी परवानगी घेतल्यानंतरच आज नागपूर फ्लाईंग क्लबचे तीनही विमानाने यशस्वीरित्या आकाशात उड्डाण केले असल्याची माहिती यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली. **** सर्व छायाचित्रे #राकेश_वाटेकर

Wednesday 24 March 2021

कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी खाटांच्या उपलब्धतेची एकत्र माहिती द्या - डॉ. संजीव कुमार

* कोविड उपाययोजना व आरोग्य सुविधांचा आढावा * मेडिकलमध्ये 90 अतिरिक्त खाटांची सुविधा * मेघे रुग्णालयात आयसीयूसह अतिरिक्त खाटा * ऑक्सिजनचे दोन अतिरिक्त टँकर मागविणार * कोरोनासंबंधित आरटीपीसीआर तपासण्या वाढवा नागपूर, दि. 24 : नवीन कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागपूरसह विभागातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये अतिरिक्त खाटांची व्यवस्था करुन उपलब्ध असलेल्या खाटांची एकत्रित माहिती नागरिकांना उपलब्ध करुन दिल्यास रुग्णांची गैरसोय होणार नाही, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले. कोरोनासंदर्भात नागपूर शहरासह विभागात राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना तसेच बाधित रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांचा आढावा विभागीय आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. बैठकीत महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे आयुक्त शंतनु गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप गोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, माहिती संचालक हेमराज बागुल, उद्योग सहसंचालक श्री. धर्माधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूर विभागात 2 लाख 85 हजार 497 बाधित रुग्णांपैकी 2 लाख 41 हजार 680 रुग्ण बरे झालेले आहेत. सद्य:स्थितीत 5 हजार 284 रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी नागपूर जिल्ह्यात 3 हजार 856 रुग्ण भरती आहेत. त्यात वर्धा-342, भंडारा-156, गोंदिया-103, चंद्रपूर-524 तर गडचिरोली जिल्ह्यातील 293 रुग्णांचा समावेश आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे विविध रुग्णालयात भरती असलेले रुग्ण व रिक्त असलेल्या खाटा याची एकत्रित माहिती नागरिकांना दिल्यास कोविड रुग्णांची गैरसोय होणार नाही. महापालिकेतर्फे शहरातील सर्व रुग्णालयांमधील उपलब्ध व्यवस्थेबद्दलची माहिती संकलित करावी, असे निर्देश डॉ. संजीव कुमार यांनी दिले. शासकीय रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय व एम्समध्ये भरती असलेल्या रुग्णांना महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ अनुज्ञेय असल्यामुळे या योजनेतून कोविड रुग्णांना लाभासंदर्भातील प्रकरणे तात्काळ सादर करावीत, असे निर्देश देताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 5 हजार 945 पैकी 2 हजार 732 प्रकरणे सादर झाली आहेत. तसेच इंदिरा गांधी वैद्यकीय 1 हजार 427 प्रकरणांपैकी 1 हजार 990 प्रकरणे सादर झाली असून इतरही प्रकरणे प्राधान्याने सादर करुन रुग्णांना यो योजनेचा लाभ मिळवून द्यावा. अशा सूचना यावेळी केल्या. नागपूर जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढते असून त्याप्रमाणात तपासणी मोहीम महापालिका व जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. बाधित रुग्णांची सरासरी 31.35 टक्के या प्रमाणात आहे. कोरोनाबाधित रुग्णासोबत त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची तपासणी मोहीम राबवण्यासोबतच ज्या परिसरात रुग्णवाढीचे प्रमाण जास्त आहे. अशा परिसरात तात्काळ कठोर निर्बंध लागू करावे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना वेळेवर औषध व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. बाधित रुग्ण बाहेर फिरणार नाही याची दक्षता घेवून कठोर कारवाई करावी. असेही बैठकीत सांगण्यात आले. नागपूर जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात सरासरी आयसीयू नसलेले एक हजार खाटा तसेच खासगी रुग्णालयात 2 हजार 367 खाटा उपलब्ध आहेत. आयसीयूसह शासकीय रुग्णालयात 380 तर खासगी रुग्णालयात 818 खाटा उपलब्ध असून यामध्ये शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय तसेच मेडिकल कॉलेजमध्ये अतिरिक्त 90 खाटांची वाढ होत आहे. रुग्णांच्या संख्येनुसार खासगी रुग्णालयामध्येही खाटांच्या संख्येत वाढ करावी, अशा सूचना यावेळी बैठकीत करण्यात आल्या. नागपूर जिल्ह्यासह विभागासाठी भिलाई स्टिल प्लँट येथून दररोज ऑक्सिजन टँकर उपलब्ध होत आहेत. यामध्ये वाढ करुन अतिरिक्त दोन टँकर उपलब्ध करुन देण्यासंबंधी संबंधित कंपनीला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. अकोला व नांदेडसाठी पुण्यावरुन ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्यामुळे नागपूर विभागासाठी मागणीनुसार ऑक्सिजन उपलब्ध होवू शकेल. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजन वापरावर निर्बंध आणून 80 टक्के ऑक्सिजन आरोग्य सेवेसाठी तर 20 टक्के ऑक्सिजन उद्योगासाठी वापरण्यासंबंधी निर्देश जाहीर करावे, अशा सूचना डॉ. संजीव कुमार यांनी बैठकीत दिल्यात. नागपूर विभागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत 60 वर्षांवरील नागरिक तसेच 45 वर्षांपर्यंतच्या आजारी रुग्णांना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत 1 लाख 75 हजार 912 लसीकरणाचे डोस देण्यात आले असून 64 टक्क्यांपेक्षा पत्र नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी लसीकरण केंद्राची वाढ करण्यात आली असून नागपूर जिल्ह्यात दररोज दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त लसीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. जयस्वाल यांनी बैठकीत सांगितले. *****

Tuesday 23 March 2021

जागतिक क्षयरोग दिनाचे आज आयोजन

Ø क्षयरुग्णांसाठी योजना व सुविधा नागपूर, दि. 23 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनानिमित्त क्षयरोगावर नियंत्रण करण्यासाठी 21 ते 30 मार्चपर्यंत जिल्ह्यातील तालुकामध्ये विविध उपक्रमांद्वारे मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासोबतच शासनाने क्षयरोग मुक्तीसाठी जास्तीत जास्त जनजागृती कार्यक्रम राबविण्यासाठी तालुके ठरविण्यात आले असून या तालुक्यामध्ये क्षयरोग मुक्त गाव करण्यासाठी विविध उपक्रम राबविली जाणार आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त काही रुग्णामध्ये क्षयरोगाचे लक्षणे आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, सायंकाळी चढत जाणारा ताप, वजनात झालेली लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त पडणे, छातीत दुखणे आढळून आले तर थुंकी तपासणी करण्यात येत आहे. आवश्यकता असल्यास रुग्णांची सिबीनेट व ट्रुनेट तपासणी अत्याधुनिक मशीनद्वारे करण्यात येते. तसेच त्यांची यु-डिएसटी पण केली जाते. वेळेत उपचार होणे गरजेचे असून क्षयरोग बरा होणारा रोग आहे. शासकीय रुग्णालयात क्ष-किरण तपासणी करुन रुग्ण क्षयरोगग्रस्त असल्यास त्याला शासकीय रुग्णालयात मोफत उपचार दिले जाते. प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद घेवून त्यांच्यावर उपचार करणे बंधनकारक असल्याने सर्व खाजगी डॉक्टर्स व पॅथॉलॉजी, रुग्णालयांनी शासनाच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. क्षयरुग्णांसाठी योजना व सुविधा निश्चय पोषण आहार योजनेंतर्गत सकस आहारासाठी दरमहा क्षयरुग्णाला पाचशे रुपये पूर्ण औषधोपचारादरम्यान सरळ बँकेत जमा करण्यात येतात. आदिवासी विभागातील क्षयरुग्णांसाठी सातशे पन्नास रुपये सरळ बँकेत जमा करण्यात येते. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरुग्ण नोंदणी केल्यास पाचशे रुपये व पूर्ण औषधोपचार केल्यास पाचशे असे एकूण हजार रुपये बँकेत जमा करण्यात येते. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे शासनाची क्षयरोगाची डॉट्स औषधी मोफत उपलब्ध करण्यात आले आहे. कोरोना व क्षयरोगाची लक्षणे मिळती जुळती असली तरी सर्व रुग्णांनी लक्षणे न लपविता तसेच भीती दूर करुन क्षयरोगाविषयी स्वत:ची तपासणी करावी व त्वरित उपचार घ्यावे. तसेच शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ममता सोनसरे यांनी केले आहे. 00000

दहा दिवसीय ऑनलाईन उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

नागपूर, दि. 23 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व विव्हितन सोल्युशन्स इंडिया लिमीटेड, गुडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील पहिला गेम आणि क्रियाकलाप या विषयावर आधारित दहा दिवसांचे ऑनलाईन उद्योजकता विकास प्रशिक्षण सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 व दुपारी 2.30 ते 5.30 या दोन बॅचेस मध्ये सुरु करण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारास स्वत:ची वेबसाइट डेव्हलप करता येईल. त्यासोबतच स्टार्टअप इंडिया प्रमाणपत्र, व्हर्च्युअल इंटर्नंशिप सर्टिफिकेट, विविध शासकीय फंडिंग योजनांची माहिती, आजीवन विनामूल्य सल्ला, सहा महिन्यांसाठी उद्योजक मासिक मोफत मिळणार आहे. प्रशिक्षणाचे विषय याप्रमाणे आहेत. उद्योजकता आणि स्टार्टअप, स्टार्टअप जर्नी गेम, संधी ओळख, कल्पना निर्मिती, कार्यसंघ आणि कौशल्य अंतर, डिझाईन, विचार आणि वापरकर्ता-केंद्रीत मॉडेल, सहानुभूती मॅपिंग आणि वापरकर्ता व्यक्तिमत्व, समस्या विधान कॅनव्हास, मूळ कारण समस्या, विचारांचे प्रमाणिकरण, नाविन्य फ्लॉवरिंग इनोव्हेशन, स्कॅनर, सिक्स थिंकिंग हॅट्स, किमान व्यवहार्य उत्पादन, लीन स्टार्ट-अप, कर्षण आणि टिकाव, किमान व्यवहार्य उत्पादन, पीच डेक, गुंतवणूकदार, एमसीईडी क्रियाकलाप, उद्योजकीय गुण आणि कार्यक्षमता, एमएसएमई, सरकारी योजना व इतर अनुदानाची माहिती, निधी उभारणी, पर्याय भूमिका आदी विषयावर प्रशिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षण भारतातील कोठेही असलेल्या अठरा ते पन्नास वयोगटातील सर्व पुरुष व महिला उमेदवारांना उपयुक्त ठरणार आहे. ज्यांना उद्योग, उपक्रम आणि किमान व्यवहार्य उत्पादन राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या सहाय्याने सुरु करावयाचे आहे. त्यांनी नोंदणीसाठी https://mced.co.in/Training/Upcomming_Training/ या लिंक वर किंवा जिल्हा उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन पहिला मजला सिव्हिल लाईन, नागपूर येथे भेट द्यावी. वंदना मो. 6265346755, आलोक मो. 9403078763 या भ्रमणदुरध्वनीवर संपर्क साधावा. ****

शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृतीस विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

नागपूर, दि. 23 : विभागीय आयुक्त कार्यालयात आज शहीद दिनानिमित्त उपायुक्त चंद्रभान पराते यांनी शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. सहायक आयुक्त सुनील निकम, तहसीलदार प्रताप वाघमारे, अरविंद सेलोकर, नायब तहसीलदार आर. के. दिघोळे तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात आज शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
****

Thursday 18 March 2021

जलशक्ती अभियान जिल्हयात पन्नास गावात उत्साहात

नागपूर, दि.18: केंद्र सरकारचे जल शक्ती मंत्रालय व नेहरु युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी ते मार्च पर्यंत जल शक्ती अभियान जिल्हयात आयोजन करण्यात आले. नेहरु युवा केंद्राच्या स्वयंसेवकांद्वारे जिल्ह्यात 14 तालुक्यातील 50 गावात जल शक्तीअभियान राबविण्यात आला. गावागावात वॉल पेटींग, पोस्टर मेकिंग, शपथ, रॅली व घरोघरी जावून पाण्याची बचत कशी करावी, पाण्याचा योग्य उपयोगाबाबत माहिती देवून जनजागृती करण्यात आली, असे नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी उदयवीर यांनी कळविले आहे. 00000

दस्तऐवज नोंदणीच्या मुद्रांक सवलतीचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी

नागपूर, दि. 18 : महसूल व वन विभागाच्या 29 ऑगस्ट 2020 च्या शासन राजपत्रानुसार कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर अधिनियमास जोडलेल्या अनुसूचीच्या अनुच्छेद 25 च्या खंडान्वये अन्यथा आकारणी योग्य असलेले मुदा्रंक शुल्क 1 सप्टेंबर 2020 पासून सुरु होणाऱ्या आणि 31 डिसेंबर 2020 रोजी संपणाऱ्या कालावधीसाठी दोन टक्के तर 1 जानेवारी 2021 पासून सुरु होणाऱ्या आणि 31 मार्च 2021 रोजी संपणाऱ्या कालावधीसाठी दीड टक्क्यांनी कमी केले आहे. शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत 31 मार्च 2021 अखेरपर्यंत असल्याने या संधीचा लाभ घेण्यासाठी नागपूर ग्रामीण येथील एकूण 12 दुय्यम निबंधक कार्यालयात सवलत संपत असल्याने दस्तऐवज नोंदणीच्या तरतुदीनुसार मुद्रांक सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. नगर विकास विभागाच्या 31 ऑगस्ट 2020 च्या शासन निर्णयान्वये नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमाअन्वये महानगरपालिका क्षेत्रात स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कावरील अधिभार 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीसाठी एक टक्का इतका कमी तसेच 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 या कालावधीसाठी अर्धा टक्के इतका कमी करण्यात आला आहे. ग्राम विकास विभागाचे 28 ऑगस्ट 2020 च्या शासन निर्णयान्वये, जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियमान्वये स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणारा एक टक्का अधिभार हा 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीसाठी शून्य टक्के तर 1 जानेवारी ते 31 मार्च 2020 पर्यंत अर्धा टक्का करण्यात आले आहे. मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून निष्पादीत केलेले व आवश्यक मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज नोंदणी अधिनियमांच्या कलमानुसार दस्त निष्पादीत केलेल्या दिनांकापासून चार महिन्याच्या आत नोंदणीसाठी सादर करता येईल. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून मास्क व सॅनिटायझरचा उपयोग करावा, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कळविले आहे. 00000

कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी प्रभावी अंमलबजावणी करा - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

कडकडीत लॉकडाऊन पाळा नागपूर, दि.18: जिल्ह्यात झपाट्याने वाढणारा कोराना विषाणूचा प्रादूर्भाव व होणाऱ्या प्रसाराला रोखण्यासाठी तसेच नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय पथकाने सुचविलेल्या मार्गदर्शक सूचना व शिफारसींची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. कोविड आजाराबाबत सर्वत्र दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा. नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वोत्तम निरीक्षण करावे. कॅन्टेमेंट प्लॉननुसार प्रतिबंधीत क्षेत्रात अधिक प्रमाणात घरोघरी जावून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे निरीक्षण करावे. तसेच आयएलआय व सारीच्या रुग्णांवर पाळत ठेवावी. या कामासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, व खाजगी डॉक्टरांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. प्रत्येक रुग्णांमागे कमीत कमी 20 ते 30 जवळचे संपर्कातील सदस्य, शेजारी यांचे कॉन्टक्ट ट्रेसिंग व ट्रॅकींग करावे. तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची काटेकोरपणे तपासणी करावी. यासाठी नेमून दिलेल्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. चाचण्याची संख्या वाढविल्यास वेळीच कोविड रुग्णांची नोंद होवून त्यांच्यावर उपचार करता येतील. आरटीपीसीआर मुख्य आधार असला तरी त्यानुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कॅन्टेमेंट झोन आणि बसस्थानक, रेल्वे स्टेशन, झोपटपट्टी व जास्त घनता असलेल्या अति जोखमीच्या क्षेत्रात रॅट किटस्‍ चाचणीसाठी वापर करा. कॅन्टेमेंटबाबत शासनाने आखलेले धोरण अंमलात आणा. पॉझिटिव्ह प्रकरणांची संपर्क सूची आणि संपर्काचे डिजीटल मॅपींग, मोठ्या प्रमाणात करुन प्रतिबंधीत क्षेत्र तयार करण्यात यावेत. बफर झोन निश्चित करणे आवश्यक आहे. झोनमध्ये आवागमनावर नियंत्रण ठेवावे व जलद प्रतिसाद पथकाद्वारे योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. गृह विलगीकरणातील रुग्णांचा आरोग्य विभागामार्फत आढावा घेवून होम आयसोलेशन करतांना आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. रुग्णांचे ऑक्सिजन पातळी नियमितपणे तपासावी. आवश्यकता असल्यास रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयात दाखल करावे. विविध रोगाने आजारी रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. आवश्यक सेवा वितरीत करण्यासाठी कोरोना योध्दाच्या मनातील लसीकरणाबाबतची भिती व संकोच दूर करावा. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण, कॉन्ट्रक्ट ट्रेसिंग, कॅन्टेमेंट ऑपरेशन, होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांवर पाळत ठेवावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. कोविड रोगावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील विवेक हॉस्पीटल, सुभाष नगर येथे व्हॅक्सीनेशन सेंटर सुरु करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्र दिले असून त्याबाबत शासन मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कडकडीत लॉकडाऊन पाळा जिल्ह्यामध्ये 15 ते 21 या काळामध्ये कडक लॉकडाऊन सुरू आहे. मात्र अजूनही नागरिक गंभीरतेने या बाबी घेतांना दिसत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रुग्ण संख्या वाढीला नियंत्रण करण्यासाठी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये. प्रशासन मोठ्या प्रमाणात चाचण्या लसीकरण आणि रुग्ण संख्येत घट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे प्रशासनाला सर्व पद्धतीने साथ द्यावी. वेळोवेळी निघणाऱ्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. राऊत यांनी केले आहे 00000

जि.प. आणि पं.स.तील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 एप्रिलला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई, दि. 18 : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर जिल्हा परिषदतील 85 निवडणूक विभाग आणि त्यांतर्गतच्या विविध पंचायत समित्यांमधील 144 निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 एप्रिल 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 12 एप्रिल 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. श्री. मदान यांनी सांगितले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने संबंधित ठिकाणच्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या सर्व जागा 4 मार्च 2021 पासून रिक्त झाल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या रिक्त पदांच्या पोटनिडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रमही देणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार 15 जानेवारी 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय विभाजित केल्यानंतर 5 एप्रिल 2021 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 12 एप्रिल 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर छापील मतदार याद्या 20 एप्रिल 2021 रोजी अधिप्रमाणित करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 27 एप्रिल 2021 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली. प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणाऱ्या निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांची जिल्हानिहाय संख्या जिल्हा जिल्हा परिषद निवडणूक विभाग पंचायत समितीत निर्वाचक गण धुळे 15 30 नंदुरबार 11 14 अकोला 14 28 वाशीम 14 27 नागपूर 16 31 पालघर 15 14 (Jagdish More, PRO, SEC) ००००

Wednesday 17 March 2021

कोविड रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा - डॉ. संजीव कुमार कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधांचा आढावा शासकीय व खासगी रुग्णालयांतील कोविड रुग्णांसाठी सुविधा नागपूर दि. 17: कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, यापैकी ज्या रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा तसेच ऑक्सिजनची आवश्यकता आहे. अशा रुग्णांसाठी शासकीय व खासगी रुग्णालयात ऑक्सिजन, बेड, मनुष्यबळ आदि सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोविडसंदर्भात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त बोलत होते. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, मेयो, मेडिकल, दत्ता मेघे, एम्स, लता मंगेशकर आदि वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, टास्क फोर्सचे सर्व सदस्य तसेच महसूल, उद्योग, पोलिस, अन्न व औषध प्रशासन आदि विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यासह विभागात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, एम्स, विविध खासगी वैद्यकीय महाविद्यालये तसेच खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांसाठी आवश्यक सर्व सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना देताना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बेडची संख्या वाढवतानाच ऑक्सिजनसह बेड निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा नियोजन व खनिज विकास निधीमधून 127 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीमधून कोविड रुग्णांसाठी तात्काळ आवश्यक सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी दिले. कोविड रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनसह आवश्यक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही तपासणी करण्यात येत आहे. विभागात तसेच जिल्ह्यात तपासण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे कोविड रुग्णही त्याच प्रमाणात वाढत असून, यापैकी ज्या रुग्णांना तात्काळ ऑक्सिजनसह उपचाराची आवश्यकता आहे, अशा रुग्णांसाठी प्राधान्याने बेड उपलब्ध होईल, यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेडसंदर्भात माहिती जनतेला उपलब्ध होईल. तसेच ज्या रुग्णांना तात्काळ भरती करण्याची आवश्यकता नाही, अशा रुग्णांसाठी महानगरपालिकेतर्फे गृहविलगीकरणाबद्दल मार्गदर्शन करुन त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत आहे. रुग्णांनी अनावश्यक रुग्णालयांमध्ये भरती न होता प्रशासनाच्या सूचनांनुसार आवश्यक औषधोपचारासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे अतिरिक्त ऑक्सिजनयुक्त बेडची उपलब्धता करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या तसेच ऑक्सिजन प्लँट आदिबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी विविध विभागाचे अधिकारी व टास्क फोर्सचे अधिकारी यांनी भेट देऊन हे काम तात्काळ पूर्ण होईल, यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. कोविड रुग्णांसाठी आमदार निवास, पाचपावली तसेच वनामती येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येत असून, यापैकी वनामती येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कोविड सेंटरमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येऊन आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध राहील, यादृष्टीने नियोजन करावे. तसेच रेमिडेसिवीर हे इंजेक्शन वैद्यकीय सल्ल्यानुसारच उपलब्ध होईल, असेही बैठकीत सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कोविड केअर सेंटर तसेच मेयो व मेडिकल येथे अतिरिक्त आरोग्यसुविधा निर्माण करुन बेडसंख्या वाढविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. निर्धारित वेळेत ही कामे पूर्ण करुन रुग्णांसाठी अतिरिक्त बेड तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबतही वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना सूचना दिल्यात. कोविडसंदर्भात नागपूर महानगरपालिकेतर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, कोविड रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन तसेच गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना औषधपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी सुविधा वाढविण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. *****

Monday 15 March 2021

;
लॉकडाऊनला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पोलीसांचा कडक बंदोबस्त * प्रशासनाला सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन * अत्यावश्यक असेल तरच नागपूर शहरात प्रवेश करा * कोरोना रुग्ण संख्येत वाढ कायम ; सोमवारची २ हजार २९७ संख्या नागपूर, दि. 15: कोरोनाचा वाढता आलेख बघता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५ ते २१ मार्च पर्यंत कडक लॉकडाऊन नागपूर शहरात लागू करण्यात आला असून आज पहिल्याच दिवशी संचारबंदीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुढील २१ मार्चपर्यंत कोरोना वाढीची श्रृंखला तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. १५ ते २१ च्या लॉकडाऊनमध्ये नागपूर लगतच्या कामठी शहरातील जुने व नवीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावे, हिंगणा, सोनेगाव, कोराडी, कळमना, हुडकेश्वर आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. या संपूर्ण हद्दीमध्ये आज संचारबंदी कायम होती .शहरात पोलीसांचा कडक बंदोबस्त असल्यामुळे रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. नागरिकांनी या संचारबंदीस सकारात्मक प्रतिसाद दिला. शहरातील शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था, धार्मिक व राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, शहरातील सभागृह, मंगल कार्यालये, लॉन या ठिकाणी होणारे लग्नसभारंभ, रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्यगृह, जलतरण तलाव, मॉल्स, चित्रपटगृह नाट्यगृह, खाजगी आस्थापना, दुकाने मार्केट, उद्याने, व्यायामशाळा, जिम, दारु दुकाने आदी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. मात्र अत्यावशक सेवा वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स, वृत्तपत्र मीडियासंदर्भातील सेवा, भाजीपाला, दुधविक्री व पुरवठा, फळविक्री, कोरोनाविष्यक लसीकरण सेवा व चाचणी केंद्र, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, मालवाहतूक सेवा, किराणा दुकाने, चिकन मटन अंडी, मांस दुकाने, पशुखाद्य दुकाने, खते, बी-बियाणे आदी सुरु होते. सर्वत्र या बंदला सकारात्मक प्रतिसाद नागपूरकरांनी दिला. तथापि, शहरातील रुग्णसंख्याच्या वाढीचा आलेख कायम असून सोमवारी 1933 रुग्ण शहरात आढळले तर ग्रामीण भागात 361 रुग्ण पुढे आलेत. अन्य जिल्ह्यातील तीन रुग्ण मिळून सोमवारची एकूण संख्या 2297 झाली आहे. ही आकडेवारी धोक्याचा इशारा देणारी असून पुढील सात दिवस नागरिकांनी सहकार्य कायम ठेवून रुग्णसंख्येची वाढ कमी करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे स्पष्ट करण्यात आले असून ज्यांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडायचे आहे त्यांनी आपल्यासोबत ओळखपत्र ठेवावे. तसेच लसीकरण करण्यासाठी ज्येष्ठांना बाहेर पडायचे असेल त्यांनीदेखील आपले ओळखपत्र सोबत ठेवावे, असे आवाहन केले आहे. या काळात लसीकरणामध्ये कोणताही खोळंबा नसून लसीकरणाचा लाभ सर्वांनी घेण्याबाबतही प्रशासनाने सूचित केले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी तसेच अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी गंभीर वैद्यकीय कारण किंवा अत्यावश्यक कार्य असल्याशिवाय नागपूर शहरांमध्ये शक्यतो प्रवेश करू नये. ज्या कारणांसाठी प्रवेश करायचा आहे त्यासंदर्भातील कागदपत्रे व ओळखपत्रे सोबत बाळगणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांशी वाद न घालता आवश्यक कामाची कागदपत्रे ठेवावी. ओळखपत्रे सोबत ठेवावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. प्रशासनाला सहकार्य करा : पालकमंत्री नागपूर शहरामध्ये दररोज वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 ते 21 मार्च या दरम्यान लॉकडाऊनची घोषणा केली आहे. आज पोलीस आयुक्तालय परिसरातील या लॉकडाऊनला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पुढील सात दिवस अशाच प्रकारे घराबाहेर न पडता कोरोना सोबत लढा द्यायचा आहे. जेणेकरून ही परिस्थिती कायम राहणार नाही. यासाठी 'मी जबाबदार ', म्हणत प्रत्येकाने कोविड प्रोटोकॉल पाळणे आवश्यक आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, कोरोनाचे रुग्ण अधिक वाढल्यास लॉकडाऊन हा पर्याय नाही, त्यासाठी निर्बंध अधिक कठोर करावे लागतील. त्यामुळे पुढील काळात लॉकडाऊनची सक्ती वाढू नये यासाठी सर्वांनी या सात दिवसात प्रशासनाला साथ देणे आवश्यक आहे. नागपूरकर जनतेने पहिल्याच दिवशी या बाबतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या सर्व सूज्ञ नागरिकांचा आभारी आहे. मला माहिती आहे की, व्यापारी, दुकानदार, याशिवाय किरकोळ विक्रेते हातावर पोट असणारे अनेक छोटे व्यावसायिक यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत कठीण आहे. मात्र जीवित्वाच्या पुढे आपण सर्व हतबल असून या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ही उपाययोजना आहे. सध्या संसर्गाचे प्रमाण वाढू नये यासाठी ट्रॅकिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार जिल्ह्यात काम सुरू आहे. चाचण्यांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. दुसरीकडे लसीकरण देखील अतिशय वेगाने सुरू आहे. त्यामुळे आपण सहकार्य कराल,अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. ****
समाजमाध्यमांवरील त्या पोस्ट फसव्या आर्थिक मदतीचे आमिष : नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन नागपूर, दि. 15 : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात समाजकंटकांनी ‘सोशल मीडियाद्वारे फसव्या पोस्ट टाकून नागरिकांना आमिष देणे सुरु केले आहे. या माध्यमातून आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन केले आहे. 1 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ज्या घरातील 21 ते 70 या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले, त्या व्यक्तीच्या विधवेला महिला व बाल विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या जिजामाता/जिजाऊ या योजनेतंर्गत 50 हजार रुपये मदत मिळणार असल्याची पोस्ट ‘व्हाट्स-ॲप’ वर फिरत आहे. मात्र हा संदेश पूर्णत: चुकीचा बनावट असून अशी कुठलीच योजना विभागामार्फत कार्यान्वित नाही, असे महिला व बाल विकास विभागाच्या उपायुक्तांनी 10 मार्च रोजी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे. वेगाने ‘व्हायरल’ होत असलेल्या अशाप्रकारच्या संदेशामुळे नागरिकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अशा फसव्या संदेशांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी केले आहे. ********

Thursday 11 March 2021

सार्वजनिक सुटीच्या दिवशी आरटीओ कार्यालये सुरु नागपूर दि. 11 : शासकीय महसुलामध्ये वाढ व आर्थिक वर्षाच्या शेवटी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहन खरेदीला चालना देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मार्च महिन्यातील 31 तारखेपर्यंतच्या सर्व सार्वजनिक सुटीच्या काळात कार्यालये सुरु ठेवली आहेत. नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळविणे, वाहनांचा ताबा मिळविणे व यासंदर्भातील अनुषंगिक कामे नागरिकांनी सुटीच्या दिवशीदेखील करुन घ्यावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. *****
जिल्हा माहिती कार्यालयाच्या घडीपुस्तिकांचे प्रकाशन नागपूर दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमातीसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या सामाजिक, अर्थसहाय्य योजनांवर आधारित घडीपुस्तिकांचे प्रकाशन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. अमरावती व नागपूर विभागाचे माहिती संचालक हेमराज बागुल यांच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर यांनी या घडीपुस्तिका तयार केल्या आहेत. सामान्य नागरिकांना आपल्या हक्काच्या न्याय्य योजनांची माहिती व्हावी तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत या घडीपुस्तिकांचे वितरण केले जाणार आहे. कोरोना आढावा बैठकीपूर्वी झालेल्या प्रकाशन कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, बसवराज तेली, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर, मनपा सहआयुक्त उपायुक्त राम जोशी व कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. सामाजिक अर्थसहाय्य योजनांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तर सांगावा समाज कल्याणाचा या अनुसूचित जाती घटक योजनेतील रमाई आवास घरकुल योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, गटई कामगारांना पत्र्यांचे स्टॉल वाटप,अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवकांसाठी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना, कन्यादान योजना, बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजना, भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे.
*****
नागपूर शहरात 15 ते 21 मार्चदरम्यान कडक लॉकडाऊन - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत शहर पोलीस मुख्यालयाच्या हद्दीत लॉकडाऊन नागपूर दि. 11 : कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागपूर शहरात नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीने नागपूर शहर पोलीस मुख्यालयाच्या हद्दीत येत्या 15 ते 21 मार्चदरम्यान कडक लॉकडाऊन संचारबंदीसह लागू करण्यात येत आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, अशी घोषणा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालमंत्री डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी व कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी ग्रामीण, महानगरपालिका क्षेत्रामधील बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, नागरिकांनी या काळात घरीच राहणे आवश्यक असल्याबाबत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एकमत झाले. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून शनिवार-रविवार या दोन्ही दिवशी पाळण्यात येणारी संचारबंदी आता सलग आठवडाभर सुरु राहणार आहे. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशनच्या परिसरात यामध्ये कामठी, जुने व नवीन, हिंगणा, सोनेगाव, कोराडी, कळमना, हुडकेश्वर आदी पोलीस स्टेशनचा यात समावेश आहे. आज बैठकीत झालेले निर्णय लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग सुरु राहतील. मात्र, सर्व संबंधित आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. खासगी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तर शासकीय कार्यालयांमध्ये 25 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, ज्या खासगी व शासकीय आस्थापनांमध्ये 31 मार्च या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या कालावधीतील महत्त्वपूर्ण कामे सुरु असतील, त्या ठिकाणी आवश्यक कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. वैद्यकीय, पॅरामेडिकल व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. प्रसारमाध्यमांसाठी कामे करणाऱ्या प्रतिनिधी व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक असेल. या कालावधीत मद्यविकी दुकाने बंद राहतील. मात्र, ऑनलाईन मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरु राहील. यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. शहर व ग्रामीण भागात 128 केंद्रांवर ज्येष्ठांचे कोविड लसीकरण सुरु आहे. लसीकरण मोहीम या कालावधीतही सुरु राहील. तथापि, लसीकरण केंद्रापर्यंत ज्येष्ठांना पोहचविण्यासाठी या कालावधीत लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. अत्यावश्यक सेवा बँक, पोस्ट, मेडिकल स्टोअर्स, शासकीय व खासगी रुग्णालये, डोळ्यांचे रुग्णालये, चष्माविक्री केंद्र सुरु असतील. फळे, भाजीपाला, मांस, मासे, दूध, अंडी आदि विक्री करणारी दुकाने सुरु राहतील. गृह विलगीकरण (होम आयसोलेशन ) गृह विलगीकरणात असणाऱ्या बाधितांनी नियम न पाळल्यामुळे स्वत:चे कुटूंब व परिसरातील नागरिकांमध्ये पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार पद्धतीने वागणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आकस्मिक भेटी देवून कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. यासाठी आमदार निवासात विलगीकरण केंद्र सुरु करण्यात यावे, तसेच वनामती येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागपूर शहरात लक्ष्मीनगर, मंगळवारी, हनुमाननगर आणि धरमपेठ हे भाग हॉटस्पॉट झाले आहेत. त्यामुळे शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी सक्त कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी नागपूर शहरासह विभागात कोरानाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असून विभागात बाधीत रुग्णांवर वैद्यकीय उपचारासंदर्भात माहिती दिली. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागपूर ग्रामीणमध्ये कोरोनावर नियंत्रणासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे बैठकीत सांगितले. पोलीस, नागपूर महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद, आदी विभागातर्फे सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. *****

Wednesday 10 March 2021

नागपूर शहरासाठी कलम 33(1) व 37(1)(3) लागू नागपूर, दि. 10 : महाशिवरात्री, शहाजी महाराज जयंती या उत्सवानिमित्त दिनांक 11 मार्च व 18 मार्च तसेच 14 मार्चपर्यंत हजरत बाबा जलालउद्दीन मीठानिम वार्षिक उर्स साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांची गैरसोय, उपद्रव व नुकसान होवू नये यासाठी शहरात कलम 33(1) तसेच कलम 37(1) (3) लागू करण्यात आले आहे. असे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. या आदेशान्वये पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती विना परवाना एकत्र जमण्यास, शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका ,सुरे, काठ्या किंवा लाठ्या, शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी इतर कोणतील वस्ते बाळगणे, कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे, व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी घोषणा करणे, गाणी म्हणणे,वाद्य वाजविणे यामुळे शहराची शांतता व सुव्यवस्था धोक्यात येवू नये यासाठी 33(1) तसेच कलम 37(1) (3) लागू करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारी तसेच खाजगी सुरक्षा व्यवस्थेत असलेले पहारेकरी, गुरखा, चौकीदार, लग्न समारंभ, प्रेतयात्रा, धार्मिक सणांना हा आदेश लागू होणार नाही. दिनांक 19 मार्च 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश अंमलात राहील. सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून जारी परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. *****
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेची अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी नागपूर, दि.10 : कुही तालुक्यात लिंग गुणोत्तर तपासणीत मुलींचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले आहे. मुलांमुलींतील गुणोत्तर प्रमाण तपासणीवर प्रामुख्याने भर द्या. त्यासाठी गावातील ग्रामसेवकांकडून जन्म दाखले तपासा. मुलींचे प्रमाण वाढण्यावर जास्त लक्ष देवून ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेस गती द्या व योजना प्रभावीपणे राबवा, अशा सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिल्या. केंद्र पुरस्कृत ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी विजया बनकर, हेमा बढे, शिवनंदा लंगडापूरे, तहसीलदार राहुल सारंग व महिला व बाल विकास विभागाच्या अधिकारी यावेळी उपस्थित होत्या. तालुक्यातील महसूल उपविभागात लिंग गुणोत्तराबाबत कारणमीमांसा तपासून घ्यावी. आशा वर्कर ग्रामीण भागात सक्रीय असतात, त्यांना या कामात सहभागी करुन तपशीलवार प्रमाण तपासावे. तसेच गर्भपाताबाबत माहिती घ्यावी, तरच ही योजना प्रभावीपणे राबविणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. समृध्द लोकांची मानसिकता बदलण्यासाठी स्वयंसेवी महिला संघटनेची मदत घेवून त्यांचे समुपदेश करा. जिल्ह्यातील ग्रामीण भागात दहावीनंतर शैक्षणिक प्रवाहातून गळती होते, ती थांबवण्यावर भर द्या. यासाठी माध्यमातील महिला प्रतिनिधीचे सहकार्ये घेऊन मुलांमुलींचे व्यस्त गुणोत्तर कमी करा. स्वयंसेवी संस्थेसोबतच गावातील उमेद कार्यकर्त्या, कृषी सखी, पशुसखींच्या माध्यमातून समुपदेशन करुन गरोदर मातेचे सर्व्हेक्षण करा व त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. या माध्यमातून बेटी बचाओ-बेटी पढाओ योजना यशस्वी करा, असे त्यांनी सांगितले. सक्रीय राहील्यास चांगले काम निश्चितच शक्य आहे. महिलांविषयी शिक्षण, आरोग्य तसेच इतर बाबींचा विचार करुन महिलांचा सर्वांगिण विकास कसा साध्य होईल या सकारात्मक विचारधारेतून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची पोलीस स्टेशनमधून माहिती घ्या. देशातील 100 अत्याचारग्रस्त शहरात नागपूरचा 25 वा क्रमांक आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन अत्याचार कमी करण्यावर भर द्या. आश्रमशाळांना भेट देवून तेथील मुलींची परिस्थिती जाणून घ्या. खाजगी शाळेत मुलींसाठी स्वतंत्र बाथरुमची व्यवस्था तसेच त्यासाठी महिला सेवक आहेत काय, हे तपासण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तालुका समन्वयकाकडून महिला बचत गटाची माहिती घ्या. व्यवस्थेला जागृत करण्याचे काम करायचे आहे. जनतेमध्ये मुलींबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करा. जागरुक समाज निर्माण करण्‍यासाठी जनजागृती हे एकमेव कार्य असून जिल्हयातील मुलींच्या जन्मदर प्रमाण वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करा. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी जनजागृती करा. बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेच्या सफलतेसाठी जिल्हास्तरीय जिंगल्स स्पर्धेचे आयोजन करा. समाजातील संवाद वाढवा. कल्पकतेस चालना देवून योजनेस गती द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले. 00000

Tuesday 9 March 2021

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 31 पर्यंत मुदतवाढ नागपूर, दि.9: सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागामार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. त्यानुषंगाने महाडीबीटी संगणकीय प्रणाली 2020-21 या शैक्षणिक सत्रासाठी नवीन अर्ज व नुतनीकरणाचे अर्ज 3 मार्च पासून ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, योजनेचे निकष, अटी व शर्तीबाबतची माहिती htpps://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व आवश्यक कागदपत्राची पूर्तता करुन अर्ज विहित मुदतीत नोंदणीकृत करण्यात यावे जेणेकरुन पात्र विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येईल. महाविद्यालयास प्राप्त अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, एसबीसी, विजेएनटी या प्रवर्गाचे अर्ज तपासून घ्यावे व पात्र अर्ज तात्काळ समाज कल्याण कार्यालयास पाठवावे. मार्च महिना संपण्यापूर्वी अर्ज मंजूर करण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांना लवकरात लवकर शैक्षणिक लाभ अदा करता येईल. शिष्यवृत्ती, फ्रीशीपसाठी पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ नोंदणी करुन घ्यावी. तसेच अर्जाचे नोंदणीकरण विशिष्ट कालावधीसाठी असल्याने मुदत संपल्यानंतर महाविद्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे. 00000
जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 13 सदस्यांचे सदस्यत्व रद्द नागपूर, दि.9: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2020 च्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिकेमधील दिनांक 4 मार्च रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांचा मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या 16 जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे सदस्यत्व व पंचायत समितीच्या 15 सदस्यांचे सदस्यत्व 4 मार्च 2021 पासून पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. नागपूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या 13 पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अनसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण देण्यात आलेल्या एकूण जागांची संख्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण जागांच्या 50 टक्के पेक्षा जास्त होत असल्यास, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागा 50 टक्के आरक्षित जागेमधून वजा केल्यानंतर, उर्वरित जागेमधून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 27 टक्के मर्यादेत आरक्षण देय होत आहे. त्याप्रमाणे नागपूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या 13 पंचायत समितीमध्ये 50 टक्के मर्यादेबाहेर आरक्षित झालेल्या जागांची आणि सर्वोच्च न्यायालयांच्या आदेशानूसार देय असलेल्या नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या जागांचा तपशिल निवडणूक आयोगाकडे देण्यात आला आहे. त्यानुसार सदस्यत्व रद्द झालेल्या जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा तपशिल पुढील प्रमाणे आहे. नरखेड जिल्हा परिषद क्षेत्र सावरगांव- बोडखे देवका पुरुषोत्तम, भिष्णूर- जोध पुनम प्रविणराव, काटोल जिल्हापरिषद क्षेत्र येवना- उमप समीर शंकरराव, पारडसिंगा- कोल्हे चंद्रशेखर, सावनेर जिल्हा परिषद क्षेत्र वाकोडी- शिरसकर ज्योती अनिल, केळवद-कुंभारे मनोहर शंकरराव, पारशिवनी जिल्हा परिषद क्षेत्र करभांड- भोयर अर्चना दीपक, रामटेक जिल्हा परिषद क्षेत्र बोथिया(पालोरा)- राऊत कैलाश यशवंत, मौदा जिल्हा परिषद क्षेत्र अरोली- देशमुख योगेश नागोराव, कामठी जिल्हा परिषद क्षेत्र गुमथळा- निधान अनिल रामभाऊ, वडोदा- लेकूरवाळे अवंतिका रमेश, नागपूर(ग्रामीण) जिल्हा परिषद क्षेत्र गोधनी (रेल्वे)- राऊत ज्योती दीपक, हिंगणा जिल्हा परिषद क्षेत्र निलडोह- हरडे राजेंद्र विठ्ठल, डिगडोह- ठाकरे सुचिता विनोद, डिगडोह इसासनी- गिरी अर्चना कैलाश, कुही जिल्हा परिषद क्षेत्र राजोला- ठवकर भोजराज हनुमान असे 16 सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यासोबतच पंचायत कळमेश्वर समिती गण तेलकामठी- वसू मालती धनराज, कोहळी- भिंगारे श्रावण महिपतरावजी, सावनेर पंचायत समिती गण बडेगाव- चिखले भावना अरुण, वाघोडा- केसरे ममता प्रशांत, नांदागोमुख- ठाकरे गोविंदा बारकू, रामटेक पंचायत समिती गण उमरी- कुंभलकर भुमेश्वरी विश्वनाथ, मनसर- ठाकरे कला उमेश, नगरधन- होलगीरे भूषण गजानन, हिंगणा पंचायत समिती गण निलडोह वडधामना- आंबटकर बबिता राहुल, डिगडोह-1- काळबांडे सुरेश सुखदेवराव, डिगडोह इसासनी- अव्हाळे बबनराव अवधूतराव, नेरी मानकर- ठाकरे अंकिता रविंद्र, उमरेड पंचायत समिती गण मकरधोकडा- गिल्लुरकर शालू धनराज, देवळी- लेंडे सुरेश दयाराम, भिवापूर पंचायत समिती गण नांद- नारनवरे नंदाबाई दयाराम असे 15 सदस्याचे सदस्यत्व 4 मार्च 2021 पासून पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद आहे. 00000