Sunday 29 November 2020

पदवीधरांनो मतदान करा : विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार


नागपूर, दि.29 -लोकशाही बळकट व समृध्द करण्यासाठी येत्या 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या पदवीधर निवडणुकीत  नोंदणी केलेल्या पदवीधर मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तसेच विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार यांनी आज केले.

कोविड सुरक्षा मानकांनुसार पदवीधर निवडणूक घेण्यात येणार आहे.मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून निवडणुकीचा हक्क अधिक सुरक्षीतपणे मतदारांना बजावता येणार आहे.

येणा-या 1 डिसेंबर रोजी पदवीधर निवडणुकीसाठी मतदान होईल, त्यासाठी योग्य व्यवस्थापन व तयारीसह प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार यांनी आज दिली.

3 नोव्हेंबर रोजी  पदवीधर  निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता.आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार व छाननीनंतर  नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 19 उमेदवार रिंगणात आहेत.

विभागात साधारण दोन लक्ष मतदार असून त्यापैकी 1 लक्ष 10 हजार मतदार हे एकटया नागपूर जिल्हयातील आहेत.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाच्या आधी 48 तास आधी म्हणजे  आज सायंकाळी  5 वाजता प्रचार थांबणार  आहे. निवडणुकीत 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

******

 

कोविडग्रस्तांना शेवटच्या तासात करता येईल मतदान : जिल्हाधिकारी


मनपा क्षेत्रात आजच जाणून घ्या आपले कुठे आहे मतदान

झोनल ऑफिसमध्ये सोमवारीही कर्मचाऱ्यांची तैनाती

 

नागपूर, दि.29 :  मंगळवारी 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या पदवीधर मतदानाच्या दिवशी मतदारांचे नाव शोधण्यासाठी जाणारा वेळ लक्षात घेता मतदानाच्या उदया एक दिवस आधी देखील शहरात महानगरपालीकेच्यावतीने दहा झोननिहाय मतदान केंद्रावर संगणक व टॅबसहीत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय मतदानाच्या दिवशीही हे सहाय सुरू असेल,असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

     प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही झोनमधील मतदान केंद्रावर हे कर्मचारी मतदाराला त्यांचे नाव व मतदान केंद्र  शोधण्यासाठी मदत करतील. तथापि,आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे याची एक दिवस आधीच माहिती करून घेण्याचे आवाहनही  जिल्हा प्रशासनाने केले आहे .

      ऐनवेळी जाणारा वेळ लक्षात घेता यासंदर्भात उपाय योजना प्रशासनाने केल्या असून यासाठी नागपूर महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या महानगरपालिकेच्या झोनल कार्यालयात कर्मचारी या कार्यासाठी विशेषतः तैनात करण्यात आले आहे. कार्यालयीन वेळेमध्ये उद्या सोमवारी देखील हे कर्मचारी उपस्थित असतील.या ठिकाणी आपले नाव नेमके कोणत्या केंद्रावर आहे, याची माहिती मतदारांना मिळू शकते. सोबतच सोमवारी मतदान केंद्रावर सुरूवातीच्या काही तासांमध्ये हे कर्मचारी मदतीसाठी तैनात असतील.

  कोविड संसर्ग काळातील ही निवडणूक असल्यामुळे यासाठी  मतदारांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात आली आहे. या सोबतच कोविडसंसर्ग झालेल्या मतदाराला सुध्दा शेवटच्या तासात  म्हणजे 4 ते 5 या काळात मतदान करता  येणार आहे. सुरक्षीततेचे सगळी खबरदारी घेवून कोविडग्रस्तांना मतदान करता येईल.

    भारत निवडणूक आयोगाने  नागपूर पदवीधर मतदारसंघांमध्ये एकूण सहा जिल्ह्यांसाठी मतदान केंद्राची अंतिम यादी जाहीर केली आहे.आता 322 केंद्रावर मतदान होणार आहे.

  कोवीड-19 संदर्भातील सूचनांचे पालन करून हे मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहे. नव्या यादीनुसार आता नागपूर जिल्ह्यामध्ये 164, भंडारा जिल्ह्यांमध्ये 31, गोंदिया जिल्ह्यामध्ये 21, वर्धा जिल्ह्यामध्ये 35, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 50, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 21 असे एकूण 322 मतदान केंद्र असतील.

******


 

 

दिव्यांग मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन

  

नागपूर दि .29 : नागपूर विभाग पदवीधार मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीकरीता 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतदानाचा हक्क बजावण्यात  दिव्यांग मतदारांना काही अडचण असल्यास त्यांच्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. 

0712-2700900  7262801201 या दोन क्रमांकावर दिव्यांगाना काही अडचण असल्यास ते संपर्क करु शकतात.

काल जिल्हयात 218 दिव्यांग व 80 वर्षावरील मतदारांना त्यांच्या घरपोच मतपत्रिका निवडणूक पथकांमार्फत  देण्यात आल्या. त्यामुळे 154 दिव्यांग व  जेष्ठ मतदारांनी घरूनच मतदानाचा हक्क बजावला होता. रविवारी पुन्हा निवडणूक पथके उर्वरीत घरी मतदान प्रक्रिया पूर्ण करीत आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  रविंद्र ठाकरे यांनी दिली.

*******



मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तिक रजा

 


       नागपूर, दि.29 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधार मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीकरीता 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुख तसेच खाजगी औद्योगिक आस्थापनामधील अधिकारी व कर्मचारी मतदार यांना एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी रविंद्र खजांजी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

हि रजा अनुज्ञेय नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 8 ते सांयकाळी 5 वाजेपर्यत आहे.मतमोजणी 3 डिसेंबर रोजी मानकापूर क्रीडा संकुल येथे होणार आहे.

******

Friday 27 November 2020

 क्रीडा प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन नियमावली आणणार

                                                            - सुनील केदार

            मुंबईदि. 27 : राज्यामध्ये बोगस प्रमाणपत्राच्या आधारे खेळाडू दाखवून शासकीय सेवेचा लाभ घेतल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. असे प्रकार भविष्यात होणार नाहीत यासाठी नवीन नियमावली आणणार असल्याचे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

            राज्यातील क्रीडा विभागाचा विभागनिहाय आढावा बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा राज्यमंत्री कु.अदिती तटकरे, क्रीडा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या सह क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थिती होते.

            श्री. केदार म्हणाले, राज्यात यापुढे बोगस प्रमाणपत्र देण्याचे कोणाचे धाडस होणार नाही. कोणी मागण्याची हिम्मतही करणार नाही, अशी नियमावली तयार करण्यात येणार आहे. नोकरीत प्रमाणपत्राचा लाभ घेताना प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहे.

            राज्यात उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलासाठी जो निधी वितरीत करण्यात आला. त्याची कामे तातडीने सुरु करावीत. जागेचा प्रश्न निर्माण झाला तर संबंधित विभागाशी संपर्क करून त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावेत. यापुढे निधी वितरण झाल्यानंतर निधी खर्च करण्याची कार्यवाही तात्काळ करावी. तालुकाजिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलांची कामे गुणवत्तापुर्ण असावीत, यासाठी क्रीडा अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे. काही ठिकाणी निधी कमी पडत असेल तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना श्री. केदार यांनी केल्या.

            क्रीडा राज्यमंत्री कु.तटकरे यांनी क्रीडा संकुलाकरिता सपाट असेल अशीच जागा निवडावी जेणेकरुन येणारा निधी सपाटीकरणासाठी खर्च न होता तो  इमारत उभारणीकरिता आणि क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी उपयोगात आणता येईल, असे सांगितले.

0000





 

मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक व नि:पक्षपणे राबवा 

--   विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार

निवडणूक निरिक्षक एस.आर व्ही. श्रीनिवासन यांची भेट

* पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे तिसरे प्रशिक्षण संपन्न

 

 

            नागपूर, 27: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व नि: पक्षपणे पार पाडण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले. निवडणूक निरिक्षक एस.आर व्ही. श्रीनिवासन यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाला भेट दिली.

            यावेळी विभागीय आयुक्त यांनी मतमोजणी दरम्यान अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतप्रदर्शन करु नये, चोख व शिस्तबध्द पध्दतीने काम करुन निवडणूक मतमोजणी प्रक्रिया  अचूक व योग्य रितीने पार पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

            २ डिसेंबरला निवडणुकीच्या मतमोजणीचे प्रात्यक्षिक ( मॉकड्रिल ) होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मतमोजणीचे तिसरे प्रशिक्षण कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक निरीक्षक  एस.आर व्ही. श्रीनिवासन, नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. ही निवडणूक प्रक्रिया थोडी वेगळी असल्याने संबंधितांनी मोबाईल व्हॉटस्ॲप ग्रूपवर सहभागी होऊन याबाबत चर्चा करुन प्रक्रिया समजून घ्यावी, असे आयुक्तांनी सांगितले.

3 डिसेंबर रोजी  होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेची माहिती निशिकांत सुके यांनी सादरीकरणातून संबंधितांना दिली. मतमोजणीच्या वेळी 28 टेबल राहणार आहेत. प्राथमिक मतमोजणीत पोस्टल बॅलेट पेटीतील सर्व बॅलेट खाली करुन डिक्लेरेशन व पोस्टल बॅलेट वेगवेगळे करावे. डिक्लेरेशन नसल्यास, फाटले असल्यास, संशयित असल्यास  ते वेगळ्या पेटीत ठेवावे. नंतर त्यांची योग्य तपासणी करुन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

निवडणूक आचारसंहितेचे पालन करुन मतमोजणीच्या वेळी कोणतीही  चूक होणार नाही यावर बारीक लक्ष द्यावे. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल किंवा टॅब नेण्यास मनाई राहणार आहे. याची पर्यवेक्षक व निवडणूक प्रतिनिधी यांनी दक्षता घ्यावी. प्रत्येक टेबलवर बॅलेट पेटी राहणार असून मतमोजणी प्रक्रिया सकाळी 7.30 वाजतापासून सुरु होणार आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधीसोबत कोणतीही चर्चा करुन मतप्रदर्शन करु नये. कोणताही वाद उत्पन्न होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सांगण्यात आले.

बॅलेट पेटीमधील बॅलेट उघडे करु नये, तसेच फोल्ड करुन मतमोजणी करावी. मतमोजणी अधिकाऱ्यांनी मतपत्रिकेबाबत माहिती क्षेत्रनिहाय द्यावी. तसेच मोजणी करतांना आवश्यक ती काळजी घ्यावी. ही माहिती 16 क्रमांकाच्या नमुन्यात भरावी. विस्तृत  मतमोजणीमध्ये १ हजार बॅलेट पेपर राहणार आहेत. त्यातील संशयात्मक मतपत्रिका वेगळ्या करण्यात येणार आहेत. या निवडणुकीत एकूण 19 उमेदवार असल्याने 19 पेट्या असणार आहेत व संशयात्मक मतपत्रिकेसाठी एक पेटी अशा 20 पेट्या राहणार आहेत. प्रथम पसंतीच्या मतास मतमोजणीत प्राधान्य देण्यात येऊन नंतर इतर पसंतीक्रमानुसार मतमोजणी होणार आहे. ही प्रक्रिया थोडी क्लिष्ट असल्याने मतमोजणी करणाऱ्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. मतपत्रिकेत शब्दात पसंती लिहणाऱ्या मतदार, पसंतीक्रम एकाच उमेदवारांच्या समोर 1,2,3 असा क्रम लिहिल्यास ते मत अवैध समजले जाणार आहे. मतदार केंद्रात असलेल्या जांभळया शाईच्या पेनाने पसंती क्रम लिहावा.अन्य पेनने लिहिल्यास मत अवैध होईल. प्रथम पसंती दर्शविली नसल्यास मत अवैध होणार आहे. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करणा-या मतदारास कोणत्याही पेनने पसंती दर्शविली तरी मत वैध ठरविण्यात येणार आहे. हे अपवादात्मक आहे. मतमोजणी प्रक्रियेत 25 मतपत्रिकेचे गठ्ठे राहणार असून त्यावर चेकलिस्ट जोडण्यात येणार आहे. मर्यादित मतदार असल्याने या निवडणुकीत प्रत्येक मताला महत्त्व राहणार आहे.  कोट्यानुसार विजयी उमेदवार घोषित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणास नागपूर विभागातील निवडणुकीशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पदवीधर मतदारसंघ निवडणूक अंतिम टप्प्यात असून १ डिसेंबरला मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासन तयारीत आहे.

 

00000

Thursday 26 November 2020

 कोराना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेतंर्गत रामटेक येथील यात्रा रद्द

Ø  जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारली झाकीची परवानगी

 

नागपूर, दि.26 : रामटेक येथील भारतीय जनसेवा मंडळ यांनी रामटेक शहरात वैकुंठ चर्तुदशी निमित्त 28 नोव्हेंबर रोजी  होणाऱ्या प्रतिकात्मक 5 झाकी करीता परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. परंतु कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव व दुसऱ्या टप्प्यातील कोरोना विषाणूच्या प्रसारात झपाटयाने वाढ होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व त्याखालील नियमावली मधील नियम 2 व 10 नुसार श्रीराम गडमंदीर रामटेक येथे होणाऱ्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूरचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांनी एका आदेशाद्वारे शोभायात्रेला परवानगी नाकारली आहे.

रामटेक शहरात वैकुंठ चतुर्दशी निमित्त 1980 पासून सामाजिक बंधुत्व व राष्ट्र निर्माण, सदभाव निर्माण करण्याच्या दृष्टीने फक्त मनोरंजन  सांस्कृतिक झाकीचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी शोभायात्रेत 40 झाकी संम्मेलित होत असतात. त्यामुळे या वर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे शासकीय नियमांचे पालन करुन  सार्वजनिक आरोग्याची काळजी घेत मागील 39 वर्षापासून सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक तसेच सर्व जाती धर्मामध्ये बंधुत्व व राष्ट्रप्रेम जागृत करण्याच्या उपक्रमास खंड पडु नये याकरीता 28 नोव्हेंबरला प्रतिकात्मक 5 झाकीकरीता परवानगी मिळावी, यासाठी निवेदन देण्यात आले होते. वैकुंठ चर्तुदशी निमित्ताने रामटेक येथे 40 ते 50 हजाराच्या संख्येने भाविकांची गर्दी होते. रामटेक शहरात सुध्दा मोठया प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव झाला असून शासनातर्फे वेळोवेळी तिव्र व सौम्य प्रकारची जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या टप्प्यातील  प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत आदेश निर्गमित करण्यात  आले आहे.

 तसेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुध्दा तसे आदेश निर्गमित केले आहे.

00000

 

 

 

मुक्त विद्यालयांतील इयत्ता पाचवी, आठवीसाठी मंगळवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरु

            नागपूर, दि. 26: महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी व आठवीमध्ये प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया मंगळवार, दिनांक 1 डिसेंबरपासून सुरु होत आहे.  

            मंगळवार, दिनांक 1 ते गुरुवार, 31 डिसेंबर 2020 दरम्यान विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरावेत. तसेच बुधवार दिनांक 2 डिसेंबर 2020 ते शनिवार, दिनांक 2 जानेवारी 2021  दरम्यान विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज व कागदपत्रे, विहित शुल्कांसह अर्जावरील नमूद संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावीत आणि शुक्रवार, दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 

****

 

विभागीय माहिती केंद्र येथे संविधान दिन

  नागपूर, दि. 26 : विभागीय माहिती केंद्र, नागपूर येथे आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यालयातील कर्मचारी प्रमोद खडसे, मिलिंद टेंभूरकर, अतुल भलावी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. 

****

      विभागीय आयुक्त कार्यालयात संविधान दिन

            नागपूर, दि. 26: विभागीय आयुक्त कार्यालयात आज संविधान दिनानिमित्त उपायुक्त अंकुश केदार यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून सर्वत्र  पाळण्यात येतो.

            सहाय्यक आयुक्त सुनील निकम, तहसीलदार अरविंद सेलोकर, प्रताप वाघमारे, प्रियदर्शनी बोरकर तसेच  अधिकारी व कर्मचारी यांनी देखील यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिकरित्या वाचन केले.

                                                                *****                                                                                  


 

महा आवास अभियानांतर्गत  प्रलंबित घर बांधणीला गती द्यावी

                                                                                  -विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार

 




            नागपूर, दि. 26: ग्रामीण भागातील  प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल कामगार आवास योजना या सर्व योजनेतील प्रलंबित व अपूर्ण असलेल्या घरबांधणीला  महा आवास अभियानास गती देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज  विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत दिले.

   यावेळी  आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दपक हेडाऊ, उपायुक्त विकास शाखा अंकुश केदार, सहाय्यक विकास शाखा सुनल निकम, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण डॉ. सिद्धार्थ गायकवाड,  सहाय्यक आयुक्त कामगार विभाग राजदप धुर्वे उपस्थित होते. 

            या ऑनलाईन कार्यशाळेत विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी यासह अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महा आवास अभियानांतर्गत सर्वांसाठी घरे या धोरणांतर्गत अभियान राबवून सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये पंचायत राज संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी, खाजगी संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग असणार आहे. ग्रामीण भागातील घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यावर भर असणार आहे. 

            महा आवास अभियान 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येईल. या अभियानात भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे. घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे मंजरी देणे, मंजूर घरकुलांना हप्त्यांचे वितरण करणे तसेच घरकुल भौतिकदृष्टया पूर्ण करणे व प्रलंबित घरकुलांच्या कामांना गती देण्याचे नियोजन आहे. यासाठी ग्रामीण गवंडी प्रशिक्षण तसेच पंचायत समिती निहाय्य  डेमो हाऊसेस उभारणे  या अभियानात फक्त घर न बांधून देता लाभार्थ्यांला त्या व्यतिरिक्त स्वच्छ भारत मिशन मधून शौचालय, जल जीवन मिशन मधून पिण्याचे पाणी, उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी व सौभाग्य योजनेतून विद्युत जोडणी तसेच जीवनोन्नती उपजविकेचे साधन देण्यात येईल. 

            या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकताच 20 नोव्हेंबर रोजी सहयाद्री अतिथीगृहावर पार पडला. ग्रामीण बेघरांसाठी महा आवास अभियान महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. राज्यात सुमारे 8.82 लक्ष घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठीच विभागस्तरीय कार्यशाळा आज घेण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय कार्यशाळा देखील घेण्यात येणार आहे. या योजनेचा नागरिकांमध्ये  प्रचार, प्रसार व जाणीव जागृती होऊन अभियानाचा हेत साध्य करण्याचे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित केले.  

            अभियानासाठी जिल्हा पातळीवर पाठपुरावा करुन तसेच वेळोवेळी आढावा घेवून अभियानात येणाऱ्या अडचणींना सोडविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अपूर्ण घरांच्या बांधकामावर लक्ष केंद्रीत करुन ती पूर्णत्वास नेण्याला प्राधान्य देण्याचेही विभागीय आयुक्तांनी सांगितले. 

                                                                          00000