Friday 30 April 2021

लसीकरणाच्या माध्यमातूनच कोरोनावर मात - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

• महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा नागपूर दि.01 : आजपासून राज्यात सर्वत्र 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. लसीकरणाच्या माध्यमातूनच कोरोनावर मात करता येणार आहे. त्यामुळे अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने ही मोहीम पार पडण्यास नागरिकांनी मदत करावी. तसेच या संकटावर यशस्वीपणे मात करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सशस्त्र पोलीस दलाकडून देण्यात आलेली मानवंदना पालकमंत्र्यांनी स्विकारली. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांच्यासह उपायुक्त चंद्रभान पराते, सहाय्यक आयुक्त हरीष भामरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात कोरोना उपाययोजनांचे पालन करून आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले की, राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, कोरोनाच्या संक्रमणापासून बचावासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, वारंवार हात धुवा, मास्क लावा व सुरक्षित अंतर ठेवा. कोविड त्रिसुत्रीच्या आधारेच कोरोनावर मात करता येईल, असे त्यांनी सांगितले. लसीकरण हाच कोरोनावर रामबाण उपाय आहे. आजपासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून शांत व शिस्तबद्ध पद्धतीने ही मोहीम पार पडण्यास नागरिकांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. *****

Thursday 22 April 2021

आग प्रतिबंधात्मक व सुरक्षात्मक ‘एसओपी’ कठोरपणे पाळण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

• दोन दिवसात अहवाल सादर करा नागपूर दि.22 : नाशिक येथील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर विभागातील कोविड रुग्णालयांनी आग प्रतिबंधात्मक व सुरक्षात्मक एसओपी कठोरपणे पाळण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी रुग्णालयांना आज दिले. विभागात यापूर्वी नागपूर आणि भंडारा येथील रुग्णालयांमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्व कोविड रुग्णालय प्रशासनाने आग प्रतिबंधात्मक आणि उपाययोजनांच्या साधनांची तपासणी करुन घेण्याचे निर्देश दिले असून, रुग्णालयात सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेताना काही अडचणी, शंका किंवा तक्रारी असल्यास अभियंता निलेश उकुंडे यांच्याशी संपर्क साधावा आणि पुढील दोन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी केल्या आहेत. रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा किंवा प्लँट आणि वितरण व्यवस्थेतील आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना येणाऱ्या त्रुटी दूर कराव्यात. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नोज मास्क 20 आणि फेसशिल्ड रुग्णालयाच्या गेटवर आणि उर्वरीत अतिदक्षता विभागामध्ये पुरविण्याच्या सूचना केल्या आहेत. रुग्णालयातील सर्व इलेक्ट्रीकल फिटींग आणि त्यांच्या जोडण्या सुस्थितीत असल्याची खातरजमा करुन घ्यावी. ही जोडणी आणि फिटींग अधिकृत विद्युत अभियंत्याकडून तपासून घ्यावी. तसेच रुग्णालयात अतिरिक्त वीज जोडणी देण्यापूर्वी व्हेंटीलेटर आणि इतर बाबींसंबंधी विद्युत अभियंत्याचा सल्ला घ्यावा, असेही विभागीय आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. वातानुकुलित खोलीतील इलेक्ट्रीकल बोर्ड आणि बटनांपासून सर्व पडदे आणि ज्वलनशील पदार्थ दूर ठेवावेत. कोविडच्या अतिदक्षता विभागामध्ये ज्वलनशील पदार्थाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे अचानक आग लागल्यास त्याची तात्काळ माहिती मिळावी, यासाठीची तपास यंत्रणा सुस्थितीत असल्याचे तपासून घ्यावे. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णांना वापरण्यासाठी आयसीयु कक्षातील रुग्णसंख्येसाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचे दोन प्रतीत किमान 15 मिनिटे चालतील, असे संच भरुन ठेवावेत. तसेच ते वापरण्याबाबतचे वैद्यकीय चमूला प्रशिक्षण द्यावे. संकटकाळात रुग्ण, नातेवाईक आणि रुग्णालयातील इतरांना सहजरित्या हलविता येईल, अशी व्यवस्था असावी. संकटकाळी बाहेर पडताना पुरेसा प्रकाश असला पाहिजे तसेच ऐनवेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची पर्यायी व्यवस्था करुन ठेवावी. या काळात पुरेशा वैद्यकीय सोयी-सुविधांनीयुक्त यंत्रणा, जसे की अतिरिक्त पाणीपुरवठा, वॉटर हिटर, मोबाईल चार्जरसाठी जोडण्यांची व्यवस्था करुन ठेवावी. जेणेकरुन संकटकाळी या यंत्रणेवर अतिरिक्त ताण येवून ती ठप्प पडता कामा नये. संपूर्ण रुग्णालय इमारतीमध्ये सार्वजनिकरित्या संवाद साधता येईल, अशी ध्वनीक्षेपक यंत्रणा बसवावी. इमारतीमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्रणा हाताळणी आणि रुग्णांना हलवण्यासंबंधी सर्व डॉक्टर, परिचारिका आणि स्टाफला प्रशिक्षित करावे. अग्निशमन यंत्रणा, फायर एक्सटिंग्वशर्स, हायड्रंट, स्प्रिंकलर हे अद्यावत आणि सुस्थितीत ठेवावेत. अग्निशमनाबाबतची सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची निलेश उकुंडे यांच्याकडून खात्री करुन घ्यावी. तसेच तो अहवाल सादर करण्यास विभागीय आयुक्तांनी सांगितले आहे. *****

Saturday 17 April 2021

वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता डोझी उपकरकरणाचा वापर वाढवा - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

· शहरातील प्रमुख रुग्णालयांची पालकमंत्र्यांकडून पाहणी · रात्रंदिवस काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आस्थेने चौकशी नागपूर दि.17 : कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक रुग्णाला वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे. अशावेळी अतिदक्षता कक्षाबाहेरील रुग्णांसाठी डोझी उपकरण उपयुक्त ठरत आहे. यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार डोझी उपकरणाच्या पूर्वचेतावणी प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डोझी उपकरण कंट्रोल रुमचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डोझी उपकरणाचे मुख्य संस्थापक मुदीत दंडवते, बधीरिकरण विभाग प्रमुख प्रा. डॉ. वैशाली शेलगावकर आदी यावेळी उपस्थित होते. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सध्या 150, मेडिकलमध्ये 100 तर किंग्जवे रुग्णालयात 25 डोझी उपकरण आहे. या उपकरणाद्वारे डॉक्टर दूरस्थपध्दतीने रुग्णांचे निरीक्षण करुन त्यांच्यावर उपचार करु शकतात. कोरोना संसर्गाच्या काळात हे उपकरण अत्यंत उपयुक्त आहे. गंभीर टप्यावर असलेल्या रुग्णांवर त्वरित उपचार करण्यासाठी डॉक्टरांना यामुळे मदत होत आहे. यासाठी डोझी उपकरणाचा आवश्यकतेनुसार वापर करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डोझी उपकरण लावण्यात आलेले असून याद्वारे रुग्णाच्या ह्दयाची गती, श्वसनदर, रक्तदाब, स्लीप एपनिया निर्देशांक, रुग्णाचा अस्वस्थता निर्देशांक तसेच ह्दयासंबंधी सर्व माहिती मिळते. हे उपकरण रुग्णाच्या गादीखाली लावण्यात येते. यामुळे रुग्णाची अस्वस्थता, रुग्णाची प्रकृती जोखमीची किंवा अतिजोखमीची आहे का, याबाबत डॉक्टरांना माहिती मिळते. या उपकरणाला वैद्यकीय भाषेत ‘स्टेपडाऊन आयसीयु’ म्हणतात. येथे सप्टेंबर 2020 पासून डोझी उपकरण लावण्यात आले आहे. येथे आतापर्यंत डोझी उपकरणाद्वारे 2009 रुग्णांवर देखरेख ठेवण्यात आली आहे. यातील 73 रुग्ण हायरिक्समध्ये गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांना तात्काळ अतिदक्षता कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे 48 रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी मदत झाली आहे. तसेच 162 रुग्णांची प्रकृतीतील बदल बघता त्यांच्यावर वेळीच ऑक्सिजन, व्हेंटीलेटर पुरवून उपचार करण्यात आले आहे. अतिदक्षता कक्षामधून बरे झालेले रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठीही डोझी मशीन उपयुक्त ठरते, अशी माहिती डॉ. वैशाली शेलगावकर यांनी यावेळी दिली. सध्या कोरोना संसर्गामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे ऑक्सिजनचा वापर करताना तो जपून करावा. रुग्ण जेवत असताना, स्वच्छतागृहात गेल्यानंतर तसेच ज्या रुग्णांची ऑक्सिजनची पातळी 95 च्यावर अशावेळी ऑक्सिजनचा वापर टाळावा. परिचारिका, वार्डबॉय यांना याबाबत अवगत करावे. नर्सिंग स्टेशनमधून ऑक्सिजनचा योग्य वापर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. पालकमंत्र्यांनी शहरातील विविध रुग्णालयांना भेट देवून तेथे कोविड सेंटर उभारण्याबाबत पाहणी केली. त्यांनी सोमवारपेठ येथील महाराष्ट्र राज्य कामगार रुग्णालयाला भेट दिली. येथे कोविड सेंटर उभारणीबाबत त्यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. नागपूरमध्ये कोरोनाचा कहर वाढत असून रुग्णांवर वेळीच तातडीने उपचार व्हावे यासाठी शक्य असेल त्या रुग्णालयात कोविड सेंटर तयार करा. जेणेकरुन कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. वैद्यकीय अधीक्षिका डॉ. मीना देशमुख यांनी यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका तसेच आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती दिली. डॉ. राऊत यांनी हज हाऊस इमारतीला भेट देवून तेथे कोविड सेंटर उभारण्याबाबत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राला भेट देवून तेथील वैद्यकीय व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून पूरक काम करणाऱ्या यंत्रणेने गेल्या काही दिवसात केलेल्या कामांचे कौतुक केले. ****** --

Thursday 15 April 2021

कोरोनाची लक्षणे आढळताक्षणी वेळ न घालवता तात्काळ तपासणी करा

• कोविड टास्क फोर्सच्या सूचना • अनलॉकच्या निर्बंधामध्येही लसीकरणाला प्राधान्य • दोन लाखापेक्षाही जास्त लसीकरणाचे डोस उपलब्ध • रेमडेसीव्हीरचा वापर काळजीपूर्वक आवश्यक • जनतेने घाबरुन न जाता प्रशासनाला सहकार्य करावे नागपूर, दि.15: कोरोनाची परिस्थिती हाताळण्याला प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेतर्फे बाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यकतेनुसार बेडच्या उपलब्धतेसाठी शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात येत आहे. ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करण्यासाठी भोपाळ, भिलाई तसेच इतर ठिकाणाहूनही प्रयत्न सुरु आहेत. जनतेने घाबरुन जाऊ नये व उपचाराला सहाकार्य करावे, असे आवाहन कोविड टास्क फोर्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आज जनतेला केले आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, कोविड टास्क फोर्सचे सदस्य, तज्ज्ञ डॉक्टर व माध्यम प्रतिनिधी यांच्यासोबत वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या संवादामध्ये कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. मिलिंद भ्रुशुंडी, डॉ. राजन बारोकर, डॉ. राजेश गोसावी व डॉ. निर्मल जयस्वाल सहभागी झाले होते. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शहरातील व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी बेडची उपलब्धता, ऑक्सिजन तसेच रेमडेसिव्हीरसारख्या औषधांचा मर्यादित पुरवठा होत असल्यामुळे जनतेमध्ये काळजीचे वातावरण निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सच्या सदस्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण वाचविण्याला प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. बाधित रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्याांने उपचार करण्यात येतात. उपचार करताना रुग्णांना केवळ रेमडिसीव्हीर इंजेक्शन देण्याचा आग्रह होत आहे. हा अत्यंत चुकीचा असून, सर्वांनाच याची आवश्यकता नाही. इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईक व जनतेमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. त्यामुळे या एकाच इंजेक्शनचा आग्रह न धरता कोविडच्या प्रोटोकॉलनुसार औषधोपचाराला प्राधान्य देण्यात येत असल्याचे टास्क फोर्सचे डॉ. मिलिंद भ्रुशुंडी यांनी यावेळी सांगितले. कोविड रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, एम्स यासह इतर खासगी रुग्णालयांमध्ये बेडची सुविधा वाढविण्यात येत आहे. रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी उपलब्ध बेडचे नियोजन करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांनासुद्धा कोविड रुग्णालयामध्ये मान्यता देण्यात येत असल्याचे यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या झोपडपट्टी व इतर भागातही वाढत असल्यामुळे अशा भागांमध्ये ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंटला प्राधान्य देण्यात आले आहे. जनतेने लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन 45 वर्षांवरील सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राऊत यांनी केले. लसीकरणासाठी दोन लाख डोस प्राप्त झाले असल्याने सर्वच केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. अनलॉक प्रक्रियेमुळे प्रतिबंध असले तरीही लसीकरणासाठी जनतेने लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत. कोरोनासंदर्भात लक्षणे आढळून आल्याबरोबर तात्काळ तपासणी करा. यासाठी घरी वेळ घालवू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. गृहविलगीकरणात असलेल्या नागरिकांनी बाहेर फिरु नये, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गृहविलगीकरणातील रुग्ण बाहेर आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिलेत. ********

Wednesday 14 April 2021

‘जनता’च्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांचे विचार समाजातील सर्व घटकांपर्यत पोहचतील – पालकमंत्री

ल, असे एकही वृत्तपत्र नव्हते. मराठी वृत्तपत्रांच्या साखळीमध्ये डॉ. * जनता खंडाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन * पालकमंत्र्यांची दूरदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती नागपूर, दि.14 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिकट परिस्थितीला समर्थपणे तोंड देत, अस्पृश्य समाजात त्यांच्या लेखनीतून त्यांचे विचार समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचतील आणि समाज जागृतीचे कार्य अखंडपणे सुरु राहील. बाबासाहेबांच्या पत्रकारितेने जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने संपादित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोअर्स मटेरियल खंड क्रमांक 3-1 जनता या खंडाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाले. त्यावेळी प्रास्ताविकात डॉ. राऊत बोलत होते. या प्रकाशन सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा समितीचे उपाध्यक्ष प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ.कृष्णा कांबळे, डॉ. भालचंद्र मुणगेकर आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते. शतकभरापूर्वी भारतीय संस्कृतीत अस्पृश्य तसेच बहिष्कृत समाजाची ठामपणे बाजू घेईबाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत व जनता पत्र मुंबईतून प्रकाशित करत बहिष्कृतांचा आवाज बुलंद केला. त्यानंतर बाबासाहेबांनी 24 नोव्हेंबर 1930 रोजी जनता हे पाक्षिक प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. 1920 साली मूकनायक, 1927 साली बहिष्कृत भारत, 1930 साली जनता आणि 1956 साली प्रबुद्ध भारत या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी जनतेमध्ये प्रबोधन घडवून आणण्याचे अतुलनीय कार्य केले. याच काळात आंदोलने आणि विचार या दोन्ही साधनांचा अत्यंत समृद्ध आणि प्रभावी उपयोग त्यांनी त्याकाळी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनभर मोठा संघर्ष केला असून, त्यांच्या संघर्षातून प्रत्येक विचार हा समाजजागृतीचे कार्य करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या उर्वरित लेखन साहित्याचा शोध घेऊन ते संपूर्ण साहित्य प्रकाशित करण्याची आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी डॉ. राऊत यांनी केली. अप्रकाशित लेखन साहित्याचे प्रकाशन केल्यानंतर समाजातील विविध घटक, समाजातील भाग, विद्यार्थी, प्राध्यापक अर्थतज्ज्ञ अशा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 'जनता' मधील हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे संदर्भमूल्य असलेला हा ठेवा देशाच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. हा धगधगता दस्तावेज पुस्तकरूपात प्रकाशित होत आहे याचा खूप आनंद होत असल्याचे श्री. राऊत यांनी यावेळी सांगितले. आंबेडकरी चळवळीचे आंबेडकर कालीन दीर्घकाळ प्रवास करणारे साप्ताहिक वृत्तपत्र म्हणून ‘जनता’चा उल्लेख केला जातो. या काळातील राजकीय, सामाजिक, धार्मिक स्थितीचे यामधून आंबेडकरी दृष्टीने केलेले विश्लेषण यात बघायला मिळते. तसेच भारतातील तत्कालीन वेगवेगळ्या विचारांच्या चळवळीचा आणि घटनांचा तपशील व संदर्भ यात पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने तो त्या काळातील घडामोडींचा दस्तऐवज म्हणजेच ऐतिहासिक ठेवा आहे. ******

राष्ट्रीय दृष्टीकोन विकसीत करण्यासाठी विधी विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे - सरन्यायाधीश शरद बोबडे

*बांधिलकी जोपासणारी पिढी घडावी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे *महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन
*न्यायमूर्ती भूषण गवई विद्यापीठाचे कुलपती होणार नागपूर, दि 14: न्यायव्यवस्था हा लोकशाही व्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा स्तंभ आहे. तो मजबुत करण्यासाठी उत्तम दर्जाच्या विधी शिक्षणाची आवश्यकता असून येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठ त्या दृष्टीने महत्त्वाचे आणि जागतिक दर्जाचे ठरणार आहे. राष्ट्रीय दृष्टीकोन आणि चारित्र्य विकसीत करण्यासाठी हे विद्यापीठ निश्चितच महत्त्वाचे योगदान देईल, असा आशावाद देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आज येथे व्यक्त केला. शहराजवळच्या वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश तथा या विद्यापीठाचे संस्थापक कुलपती शरद बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तथा दिपांकर दत्ता, उर्जा मंत्री तथा पालकमंत्री नागपूर नितीन राऊत, ऊर्जा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.विजेंद्रकुमार आदी उपस्थित होते. भाषणाच्या प्रारंभी विधी विद्यापीठाच्या निर्मितीमागचा ओझरता प्रवास सरन्यायाधीशांनी मांडला. नागपूर शहराला असलेली उत्तम विधिज्ञांची गौरवशाली परंपरा पाहता इथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ असावे, अशी येथील नागरिकांची इच्छा होती. आज त्यांची स्वप्नपूर्ती होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून न्या. बोबडे म्हणाले, विद्यापीठाची शैक्षणिक इमारत हा आधुनिक वास्तुकलेचा सुंदर अविष्कार आहे. या इमारतीमधील वर्गखोल्यांचे बांधकाम हे जागतिक दर्जाचे आहे. अद्यावत तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा या क्लासरुम आहेत. उत्कृष्ट दर्जाचे पर्यावरणपूरक असे या इमारतीचे बांधकाम विद्यार्थ्याच्या आकांक्षाना पल्लवीत करणारे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. न्यायमूर्ती भूषण गवई व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता यांनी विधी विद्यापीठाच्या निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख सरन्यायाधीशांनी केला. न्यायमूर्ती भूषण गवई हे या विधी विद्यापीठाचे कुलपती असतील, असे सरन्यायाधीशांनी यावेळी जाहीर केले. ते म्हणाले, येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठ हे वैशिष्टपूर्ण आहे. या विद्यापीठातून राष्ट्रीय दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होणार आहे. कारण देशभरातील प्राध्यापक आणि विद्यार्थी येथे अध्ययन-अध्यापन करणार आहेत. इथे प्रादेशिकता, संकुचितता यापेक्षा पुढे जाऊन राष्ट्रीय चारित्र्य असलेले विधिज्ञ घडतील. ऑक्सफर्ड- हॉर्वर्ड-केंम्ब्रीज या विद्यापीठाच्या तोडीचे विद्यापीठ ठरणार असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. या विद्यापीठाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे न्यायशास्त्र अभ्यासक्रमाचा समावेश. यामुळे भारतातील या बाबतची समृध्द ज्ञान परंपरा विद्यापीठाशी जोडली गेली आहे. त्यातून तयार होणाऱ्या भावी पिढ्या निश्चितच धन्यवाद देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. कायद्याची चौकट पाळणाऱ्या महाराष्ट्राला न्यायदानाची मोठी आणि आदर्श परंपरा लाभली असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातही न्यायदानाची परंपरा अत्यंत आदर्शवत होती. रामशास्त्री प्रभुणेसारख्या न्यायदात्यांनी ती पुढे चालवली. लोकशाहीत चार स्तंभाची भूमिका महत्त्वाची असते. त्यातून लोकशाहीला मजबुत आधार मिळत असतो. लोकशाहीचे छत समर्थपणे तोलून धरणारे वकील, विधिज्ज्ञ या विद्यापीठात घडावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कलाकार जीव ओतून जशी मूर्ती घडवतो, तशी भूमिका घेऊन विधी विद्यापीठातील प्राध्यापकांनी जीव ओतून विद्यार्थ्याना घडवले पाहिजे. बाबासाहेबांनी सामान्यांसाठी रस्त्यावर उतरुन लढाई केली. त्याप्रमाणे, या संस्थेतून गोरगरिबांशी बांधिलकी जोपासणारे न्यायमूर्ती तयार व्हावेत. न्यायदानाच्या क्षेत्राला आदर आणि आधार देणारी विधी विद्यापीठ मोठी संस्था आहे. या मोठेपणाचा उपयोग छोट्यातील छोट्या माणसाला व्हावा, त्यातून हे जगातील सर्वेात्तम विद्यापीठ व्हावे, असा आशावाद श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला. विधी क्षेत्रात गुणात्मक बदल व्हावा, त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ उभारावे या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना करण्यात आल्याचे सांगून श्री.गडकरी म्हणाले की, मजबुत लोकशाहीचा एक स्तंभ न्यायव्यवस्थेचा असतो. तो उभारण्यासाठी विधी विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. विद्यमान सरन्यायाधीशासोबत, निवृत्त न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर व न्यायमूर्ती भूषण गवई यांचे या विद्यापीठाच्या स्थापनेत मोलाचे योगदान आहे. विधी विद्यापीठाची निर्मिती ही आपल्या वैयक्तिक सार्थकतेचाही क्षण असल्याचे सांगून न्या. गवई म्हणाले, गुरुकुलाची संकल्पना या विद्यापीठाच्या माध्यमातून मूर्त रुपात साकारत आहे. लोकशाहीसाठी आवश्यक असणारी मूल्ये या वास्तुच्या रचनेतून प्रतिबिंबीत झाली आहेत. गेल्या पाच वर्षात बहुतांशी काम पूर्ण करण्यात आम्हाला यश आले आहे. सरन्यायाधीशासह तत्कालीन आणि विद्यमान शासनकर्ते यांच्यासह शासनाच्या विविध विभागांनी जाणिवेने सहयोग दिल्याने हे काम उत्तमप्रकारे पूर्ण होत आहे. न्या.गवई यांनी यावेळी विद्यापीठाच्या उभारणीत सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचा तपशीलवार उल्लेख केला. इमारत बांधणी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी विद्यापीठाच्या निर्मितीमागची आणि आजवरच्या वाटचालीची संपूर्ण माहिती दिली. जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले हे विद्यापीठ असून यातून सर्वोत्कृष्ट न्यायाधिश व विधीज्ञ घडावेत, अशी अपेक्षा न्यायाधीश दिपांकर दत्ता यांनी व्यक्त केली. या संस्थेतून न्यायव्यवस्था समृध्द करणारा अधिकारी वर्ग ही तयार व्हावा, असे ते म्हणाले. विद्यापीठाची ही इमारत आणि परिसरातील इतर काम अतिशय कठीण अशा कोविड काळात करण्यात यश आल्याचे समाधान व्यक्त करून पालकमंत्री डॉ.राऊत म्हणाले जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी या कामाला वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी दिली होती. ती पार पाडण्यासाठी आपण पुरेपुर प्रयत्न केले आहेत. राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे स्वप्न जणू प्रत्यक्षात साकारणार आहे. या विद्यापीठाच्या स्थापनेत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख ही डॉ.राऊत यांनी केला. नागपूर,औरंगाबाद व मुंबईत उभारण्यात येत असलेली राष्ट्रीय विधी विद्यापीठे महाराष्ट्राची शैक्षणिक परंपरा समृध्द करणारी आहेत, असे सांगून श्री. सामंत म्हणाले या विद्यापीठांसाठी पुरेसा निधी दिला जाईल. मुंबईतील जागेचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल. नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद अशा तीन ठिकाणी विधी विद्यापीठ असणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही मूल्य प्रस्थापित होण्यासाठी कायद्याचे राज्य गरजेचे आहे. तर कायद्याच्या राज्यासाठी मजबुत न्यायव्यवस्था आवश्यक आहे त्यासाठी हे विद्यापीठ मोठे योगदान देईल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. विधी विद्यापीठाचे काम जलदगतीने झाल्याबदल त्यांनी समाधान व्यक्त केले. समतेची शिकवण देणाऱ्या दीक्षाभूमीच्या शहरात विधी विद्यापीठ स्थापन होणे हे आनंददायी असल्याचे मत न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी व्यक्त केले. विद्यापीठाची वास्तू निसर्गातील पंचमहाभूतांचा अविष्कार घडविणारी असल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेल्या संदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले. त्यामध्ये कायद्याचे सच्चे पाईक घडविणे हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकराना खरी आदरांजली ठरेल. त्यादृष्टीने या विद्यापीठाची उभारणी हे या महामानवाला खरेखुरे अभिवादन आहे, असे गौरवोदगार काढून विधी विद्यापीठाच्या पुढील कामाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी संदेशाद्वारे दिली. प्रास्ताविक प्रा.आशिष सिंग यांनी केले तर आभार प्रा. सी. रमेशकुमार यांनी मानले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्हि.एस. सिरपूरकर यांची यावेळी उपस्थिती होती. उद्घाटनानंतर मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली. विधी विद्यापीठाच्या इमारतीची वैशिष्ट्य दाखवणारी छोटी चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. ******

Monday 12 April 2021

केंद्रीय पथकाकडून कोविडबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर

नागपूर,दि. 12 : कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी प्रशासनातर्फे सध्या राबविण्यात येत असलेल्या व भविष्यात करावयाच्या उपाययोजना त्यासोबतच उपलब्ध वैद्यकीय सुविधा यासंदर्भात केंद्रीय आरोग्य पथकाने जिल्हयात मागील तीन दिवसात केलेल्या प्रत्यक्ष पाहणीवर आधारित अहवाल आज जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना सादर करण्यात आला. केंद्रीय आरोग्य पथकातर्फे जिल्हयातील कोविडसंदर्भातील वस्तुस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपला अहवाल तयार केला. केंद्रीय आरोग्य पथकातील सदस्य दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे तज्ञ डॉ. हर्षल साळवे व नागपूर एम्स चे प्रोफेसर डॉ. पी.पी. जोशी यांनी हा अहवाल आज जिल्हा प्रशासनाला सादर केला. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य पथकाने मागील तीन दिवसात शहर व ग्रामीण भागातील कोविड सेंटर, लसीकरण केंद्र, आरटीपीसीआर तपासणी, गृहविलगीकरणाचा प्रोटोकॉल कंटेन्मेंट झोन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड रुग्णांसाठी असलेल्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हयात कोविड नियंत्रणासाठी तपासण्यांवर विशेष भर देण्यात आला असून कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्याच्या तपासण्या मोठया प्रमाणात करण्यात येत आहेत. ज्या भागात मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण आढळून आले आहेत. अशा भागात मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करण्याला विशेष प्राधान्य देण्याची शिफारस केंद्रीय पथकाने केली आहे. कोरोनाबाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता खाजगी तसेच विविध संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयांना प्रशासनातर्फे तांत्रिक व आवश्यक मदत करण्यात यावी. नागपूर शहरात वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्याला प्राधान्य देण्यात यावे. कोविडच्या तपासण्यासंदर्भात आयसीएमआरच्या पोर्टलवर दररोज माहिती भरण्यात यावी. ही माहिती नियमित अद्ययावत करण्यात यावी. त्यासोबत आयसोलेशन बेडच्या संख्येत वाढ करण्यात यावी. यासाठी आवश्यक मनुष्यबळ करुन देण्यास प्राधान्य असावे. लसीकरणासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी. लसीकरण करतांना लस वाया जाणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे, अशा सूचना या अहवालात करण्यात आल्या आहेत. कोविड महामारीचा सामना करताना मनुष्यबळाचे व्यवस्थापन करण्याला प्राधान्य देण्याचे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासन तसेच महानगर पालिका प्रशासन कोविड नियंत्रणासाठी विशेष तज्ञ व एमबीबीएस डॉक्टरांच्या नियुक्त्यांना प्राधान्य दयावे. कोविड रुग्णालयामध्ये डॉक्टर व सहाय्यक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा परिणामकारक कशा ठरतील याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपरुग्णालय येथेही आवश्यकतेनुसार मनुष्यबळाची उपलब्धता असणे आवश्यक आहे. जिल्हयात आयसोलेशन 6 हजार 506 तर 2 हजार 026 आयसीयु बेड आहेत. या बेडसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा याबाबतही केंद्रीय आरोग्य पथकाकडून प्रशासनाला आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. प्रारंभी जिल्हाधिकारी ठाकरे म्हणाले, जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा वाढता प्रभाव पहाता त्याअनुषंगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हयात रुग्णांची संख्या व उपलब्ध बेड्स लक्षात घेता अमरावती येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काही रुग्णांना उपचाराची सुविधा देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य पथकानी केलेल्या सूचनानूसार आवश्यक बदल करुन यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न असेल, असेही ठाकरे यांनी सांगितले. 00000

भिती न बाळगता लस घ्या - सुनील केदार

नागपूर,दि. 12: कोविड प्रतिबंधासाठी लस घेतल्याने कोणताही त्रास होत नाही, मनात कसलीही भिती न बाळगता लस घ्या व लसीकरण मोहिमेस सहकार्य करा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले. त्यांनी कोविड लसीचा दुसरा डोस आज शहरातील मेडिकल कॉलेज लसीकरण केंद्रात घेतला. त्यांच्यासह सौ. अनुजा केदार यांनीही लस घेतली. श्री. केदार यांनी यापूर्वी लसीचा पहिला डोस घेतला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यावेळी उपस्थित होते. दुरगामी परिणामापासून वाचायचे असेल तर लसीकरण नक्कीच करा. स्वयंप्रेरणेचे लसीकरण करुन दुसऱ्याला प्रेरित करा. कोरोना महामारीवर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय आहे, असे श्री. केदार यांनी यावेळी सांगितले. शासनाने केलेल्या वेगवेगळया उपाययोजना, निर्बंध व नियमांचे तंतोतंत पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. या लसीकरण मोहिमेत मोठया संख्येने सहभागी होऊन स्वत:चे व समाजाचे कोविडपासून रक्षण करा, असेही ते म्हणाले. 00000

Friday 9 April 2021

दहावी व बारावीच्या खाजगी विद्यार्थी नावनोंदणी

अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज 11 एप्रिलपर्यंत स्विकारणार नागपूर, दि.9 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12वी) परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एप्रिल-मे 2021 च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याचा कालावधी दिनांक 28 नोव्हेंबर 2020 पासून ते दिनांक 10 फेब्रुवारीपर्यंत निश्चित करण्यात आला होता. याबाबत आपणास सूचित करण्यात येत आहे. खाजगीरित्या इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज अतिविलंब शुल्काने ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याच्या अंतिम तारीख शुक्रवार दिनांक 9 एप्रिल 2021 ते रविवार दिनांक 11 एप्रिल 2021 अशा निश्चित करण्यात आल्या आहेत. माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी अतिविलंब शुल्क प्रती विद्यार्थी 20 रुपये प्रतिदिन स्विकारुन विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज भरुन इयत्ता 10 वीसाठी http://form17.mh-ssc.ac.in आणि इयत्ता 12 वीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षेची आवेदनपत्रे संबंधित शाळा/कनिष्ठ विद्यालयामार्फत त्वरित परीक्षेपूर्वी समक्ष विभागीय मंडळात अती विशेष अती विलंब शुल्कासह सादर करणे आवश्यक राहील. असे विभागीय सचिव माधुरी सावरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. *****

Wednesday 7 April 2021

लेख : दूध भुकटी लॉकडाऊनमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला भुकटीने आधार

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचा पुढाकार महात्मा गांधी यांच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशावरुन आजही त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. खेडी विकसित झाली तरच देशाचा विकास होईल, हे ते जाणून होते. आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेवरच देशाचा‍ विकास अवलंबून आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था विकसीत होण्यासाठी ग्रामोद्योग स्थापित होणे आणि ते उत्तमरित्या चालणे आवश्यक झाले आहे, हे ही तितकेच खरे! विद्यमान स्थितीत ग्रामविकासाची संकल्पना ही शेतीपूरक उद्योगांचा विकास होणे, त्यांची भरभराट होणे, कृषीपूरक व्यवसायातून सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, शेतमजुरांच्या हाताला काम मिळणे, यावर अवलंबून आहे. शासन सेवाक्षेत्रावर भर देत आहे. त्यामुळे केवळ पारंपरिक शेती करुन चालणार नसून, शेतीला पूरक असा दूध व्यवसायही करता येतो. कोरोना या जागतिक महामारीचा सर्वच क्षेत्राला फटका बसला त्यात कृषीपूरक उत्पादनांचाही समावेश होतो. नागपूर विभागाचा विचार करता, कोरोनामुळे सर्व व्यवहार काही काळासाठी थांबले. पूर्व विदर्भातील जिल्ह्यात दुधाचे उत्पादन होते. मात्र दुधाची मागणी वाढली असली तरीही वाहतूक व वितरण व्यवस्था बंद राहिली. एरव्ही खासगी दूध खरेदीदार दूध उत्पादकांकडून 30 ते 32 रुपये प्रति लिटर दराने दुधाची खरेदी करतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात त्यांनी भाव पाडल्याची तक्रार असून, परिणामी शेतक-यांना शासकीय दूध संकलन केंद्राकडे अतिरिक्त दुधाची विक्री करावी लागली, आणि शासनाच्या दुग्धविकास विभागाने ती खरेदी केली. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यविकास मंत्री सुनील केदार यांच्या निर्देशानुसार नागपूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांकडून त्याचे संकलन करुन त्यापासून भुकटी बनविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. दरवर्षी दुधाच्या वाढत्या मागणीनुसार शेतकरी खासगी डेअरींना जास्त भावाने विकतात. मात्र लॉकडाऊनमुळे वितरण व्यवस्था बंद राहिल्यामुळे दुधाची मागणी घटली आणि जिल्ह्यातील उत्पादित दूध हे शासनाने संकलित केले. या कालावधीत शासकीय दूध संकलन केंद्रांच्या माध्यमातून दूध संकलनातून तब्बल एक लाख 11 हजार 908 किलो दुधाची भुकटी तयार करण्यात आली. घटलेल्या मागणीमुळे शिल्लक राहिलेल्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यातील दुधापासून दूध भुकटी बनविण्यात आली. गतवर्षी जानेवारी 2020 मध्ये 2 लाख 54 हजार 665 लिटर, फेब्रुवारी 2 लाख 47 हजार 863, मार्च 3 लाख 43 हजार 418, तर एप्रिल 4 लाख 28 हजार 790, मे 5 लाख 51 हजार 87, जून 6 लाख 18 हजार 210 आणि जुलै 5 लाख 66 हजार 866 लिटर दुधाची खरेदी करण्यात आली. मात्र नंतर लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्यानंतर दुधाच्या मागणीत वाढ झाली. लॉकडाऊन कालावधीत 13 लाख 34 हजार 84 लिटर दुधापासून 1 लाख 11 हजार 908 किलो दूध भुकटी बनविण्यात आली. भुकटीपूर्वी दुधावरील सायीपासून 55 टन 239 किलो बटर बनविण्यात आले. साधारणत: दुधाच्या सायीपासून बनणाऱ्या बटरला 315 रुपये प्रती किलोचा दर बाजारात मिळत असतो. तर दूध भुकटी 296 रुपये प्रति किलो दराने बाजारात विकली जाते. दरवर्षी दुधाचे वाढीव उत्पादन हे ऑक्टोबर ते मार्च दरम्यान होत असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून विदर्भातील पर्जन्यमानातील बदल, दुभती जनावरांमध्ये झालेली घट, शेतकऱ्यांचा दुभत्या जनावरांवर चारा पाणी, सांभाळण्याचा, आणि औषधी, पोषक खुराकावर होणारा वाढता खर्च या बाबी कारणीभूत ठरत आहेत. परिणामी शेतकरी दुभती जनावरे सांभाळण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. दुधाच्या वाढत्या मागणीमुळे भुकटी बनविण्यासाठी दूध मिळत नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात दूध भुकटी तयार होत नाही. मात्र लॉकडाऊनमुळे राज्य शासनाच्या दुग्धविकास व पशूसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांकडील अतिरिक्त दुधापासून दूध भुकटी तयार करुन त्यांना आधार दिला आहे. नागपूर विभागात उत्पादक शेतकऱ्यांकडून शासकीय दूध संकलन केंद्रावर दूध संकलन करण्यात आले. शेतकऱ्यांना खासगी दूध संकलन केंद्रांनी अडचणीत आणले असले तरीही शासनाने मदतीचा हात देत त्यांच्याकडील दुधापासून भुकटी व दुग्धजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले. दरवर्षी वाढीव संकलनातील मिळणाऱ्या दुधापासून भंडारा जिल्ह्यातील जिल्हा दूध उत्पादक संघ, दाभा, वरठी रोड येथे भुकटी बनविली जाते. प्रभाकर बारहाते माहिती सहायक नागपूर

Tuesday 6 April 2021

जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश बंद

नागपूर, दि. 6 : राज्य शासनाच्या महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना प्रवेश प्रतिबंध करण्यात आला आहे. राज्य शासनाने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावला असून, या कालावधीमध्ये नागरिकांनी शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष न येता त्यांचे अर्ज, तक्रारी ऑनलाईन स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या collectoratenagpur@gmail.com या मेल आयडीवर नोंदवाव्यात, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. ******

सरपंचांचा संकल्प गावाच्या लसीकरणाचा !

कळमेश्वर तालुक्यात साठ टक्के उद्दिष्ट पूर्ण
नागपूर, दि. 6 : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण गावावर येणारे संकट टाळण्यासाठी तसेच गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लसीकरण पूर्ण करण्याचा संकल्प कळमेश्वर तालुक्यातील सर्व सरपंचांनी केला आहे. तालुक्यातील 12 गावे कोरोनामुक्त आहेत. तर 86 गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे स्वयंस्फूर्तीने प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यात आल्या असून तालुक्यात 60 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळमेश्वर येथील तहसील कार्यालयात सोशल डिस्टन्सिंग पाळत सरपंचांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच पन्नासपेक्षा जास्त गावातील सरपंचांनी उपस्थिती दर्शवित माझे गाव, संपूर्ण लसीकरण असलेले गाव म्हणून ओळख निर्माण करण्याचा संकल्प केला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, माहिती विभागाचे माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर, ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र ढवळे, तहसीलदार सचिन यादव, खंड विकास अधिकारी महेश्वर डोंगरे आदी उपस्थित होते. कळमेश्वर तालुक्यात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यासोबतच कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविणे तसेच 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत असलेला गैरसमज दूर करुन लसीकरणासाठी पात्र नागरिकांना प्रवृत्त करुन त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी गावातील सरपंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. गावाचा प्रमुख म्हणून प्रत्येक सरपंचाने या विशेष मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन श्री. भुयार यांनी नागरिकांना यावेळी केले. लसीकरणासंदर्भातील नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर गावनिहाय मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये लोक सहभाग वाढविण्यासाठी गावातील सरपंच व इतर पदाधिकारी यांनी पुढाकार घेवून नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी स्वीकारावी. तसेच माझे गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तालुक्यात 19 हजार 706 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून यापैकी 60 वर्षांवरील 8 हजार 451 नागरिकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. 45 वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस देण्याच्या दृष्टीने गावांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी. तसेच गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सचिन यादव यांनी केले. कोरोना लसीकरणासाठी तसेच कोविड नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यात रुग्णांची संख्या वाढली असून त्याप्रमाणात चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. मार्च महिन्यात सर्वाधिक 1 हजार 684 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून एप्रिलमध्ये 509 रुग्ण कोरोनाबाधित होते. यामध्ये सरासरी 16 हजार अति जोखमीचे तर 18 हजार 800 रुग्ण कमी जोखमीचे रुग्ण वाढीमध्ये 15.79 टक्के रुग्ण तर एप्रिलमध्ये 16.23 टक्के रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे तालुक्यात आतापर्यंत 58 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी कोरोनावरील लस प्रभावी व परिणामकारक असून तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंचांच्या बैठकीत करण्यात आले. गाव सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण मोहिमेला सहकार्य करण्याचे सर्व सरपंचांनी यावेळी सांगितले. श्री. महेश्वर डोंगरे यांनी आभार मानले. ******

Monday 5 April 2021

कोरोनामुळे निवृत्तीवेतनधारकांच्या ओळख तपासणीला मुदतवाढ नागपूर, दि. 5 : निवृत्तीवेतनधारकांना वेतन देण्यापूर्वी ओळख तपासणी प्रक्रिया राबविण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात प्रस्तावित ओळख तपासणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, परिस्थितीनुसार या महिन्यातील निवृत्तीवेतनधारकांची ओळख तपासणी एक महिना पुढे ढकलण्यात आली आहे. माहे मे 2021 च्या दुसऱ्या आठवड्यात तसेच माहे मे 2021 मध्ये या अगोदर बोलावण्यात आलेले आहे त्यांची ओळख तपासणी आता माहे जून 2021 च्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात येईल. कोषागार कार्यालयामार्फत दिनांक 7 ते 15 एप्रिल 2021 या कालावधीत जवळपास 350 निवृत्तीवेतनधारकांना प्रथम ओळख तपासणीसाठी बोलावण्यात आले आहे. परंतु कोरोना विषाणूजन्य आजाराने थैमान घातले असल्याने शासकीय कार्यालयात अभ्यागतांना न बोलावण्याचे शासनाचे निर्देश आहेत. नागपूर कोषागार कार्यालयात दिनांक 1 एप्रिल 2021 रोजीपर्यंत 19 कर्मचारी कोरोनाग्रस्त झालेले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे अनेक कर्मचाऱ्यांना प्राथमिक लक्षणे असून ते गृह विलगीकरणात आहेत. त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी पत्रकाद्वारे केले आहे. ******

बांबू उद्योगासाठी कामगारांना प्रशिक्षण द्यावे - पालकमंत्री

· बांबू ऑक्सिजन पार्कची पाहणी नागपूर दि. 5: महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून स्थानिक बुरड, कुंभार, पेंटर आदी कामगारांना त्यांच्या परंपरागत व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन कुशल बनवावे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून या युवकांना काम मिळेल. सेमिनरी हिल येथे येणाऱ्या स्थानिक पर्यटकांना येथे प्रत्यक्ष काम पाहता येईल तसेच बांबूपासून तयार वस्तूही विकत घेता येतील, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे सांगितले. सेमिनरी हिल येथील महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या बांबू ऑक्सिजन पार्क येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सकाळी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपवनसंरक्षक प्रभू नाथ शुक्ल, आरएफओ विजय गंगावणे यावेळी उपस्थित होते. वन विभागाच्या महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून सेमिनरी हिल येथील अडीच एकर जागेवर 49 प्रकारच्या बांबूची लागवड करण्यात आली असून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे. येथे बांबूआधारित लघुउद्योग सुरु करण्यावर भर देण्याची सूचना दिली. त्यासाठी बांबू आधारित व्यवसाय करणाऱ्या युवकांना चंद्रपूर येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यास सांगितले. प्रशिक्षणानंतर या तरुणांना सेमिनरी हिल येथे गाळे अथवा जागा देऊन व्यवसाय करण्यासाठी मदत करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. त्यामुळे येथे येणाऱ्या स्थानिक पर्यटकांना बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या विविध वस्तू विकत घेता येतील. बांबू ऑक्सिजन पार्क बांबू ऑक्सिजन पार्क येथे विविध प्रकाराच्या 49 जातीची बांबूची रोपे असलेले विशेष उद्यान विकसित करण्यात येत असून येथे स्थानिक पर्यटकांना चांगला विरंगुळा मिळणार आहे. शिवाय या पार्कमधील पायवाटांच्या दुतर्फा बांबूपासूनच कठडे बनविण्यात आले आहे. बांबूपासून बनविण्यात आलेले कारंजेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतील. या पार्कमधील कँटीनही पूर्णत: बांबूपासून तयार केली आहे. शिवाय बांबू पार्कमधील टेबल, खुर्ची, बाके, मोठ्या झाडांचे ओटे असलेले बांबू हट बनविण्यात आले आहे. *****

नारा जैवविविधता उद्याननिर्मितीत स्थानिक रोजगारांना प्राधान्य द्यावे - पालकमंत्री डॉ नितीन राऊत

नागपूर, दि. 5 : नारा जैवविविधता उद्यानामुळे शहरालगतच निसर्गभ्रमंतीची संधी नागपूरकरांना प्राप्त होणार असून प्रस्तावित उद्यान निर्मिती कार्यामध्ये स्थानिक रोजगारांना विशेष प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केली. नारा जैवविविधता उद्यान निर्मितीबाबत डॉ. राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, प्रादेशिक उपवनसंरक्षक प्रभू नाथ शुक्ल, सल्लागार रवी बनकर आदी यावेळी उपस्थित होते. नारा जैवविविधता उद्यानामध्ये पर्यटकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे. येथील प्रस्तावित जलाशयाचे काम महापालिकेच्या अमृत योजनेअंतर्गत करण्यात यावे. या जलाशयामध्ये कासव, विविध प्रजातीच्या माशांचे जतन करून त्यांची पैदास करावी. हे मासे विक्रीसाठीही उपलब्ध ठेवावे. या अधिवासात असणाऱ्या प्राण्यांसाठी निवास तसेच खाद्यान्नाची जागोजागी सुविधा निर्माण करावी. येथील हिरवीगार वनराई, विस्तीर्ण जलाशय, स्थानिक तसेच स्थलांतरीत पक्षी, फुलपाखरे, प्राणी, वनस्पतींचे विविध प्रकार, गवती प्रजाती यामुळे पर्यटकांना येथे पक्षीनिरीक्षणाचाही आनंद लुटता येणार आहे. या दृष्टीने व्यवस्थापन करण्यात यावे. या उद्यानात रोपवाटिकेची निर्मिती करावी. यात मोसमी फुलांसह औषधी गुणधर्मयुक्त वनस्पती, लाख, डिंक, रानमेवा तसेच विविध फुलझाडांची लागवड करण्यात यावी. स्थानिक स्तरावर ज्या फुलझाडांची विशेष मागणी होते, त्याचा अभ्यास करून त्यांचे उत्पादन घेण्यात यावे. येथील फुलांची तसेच रोपांची विक्री रोप वाटीकेमार्फत करावी. मासे, रोपवाटिकेतील रोपे, फुलझाडे, मध या सर्वांच्या विक्रीतून मिळालेला महसूल उद्यानाच्या व्यवस्थापनासाठी उपयोगात आणावा, अशा सूचना श्री. राऊत यांनी यावेळी केल्यात. जैवविविधता उद्यानामुळे नागरिकांना वनस्पती, पशुपक्षी तसेच प्राण्यांची विविधता निसर्गाच्या अधिवासात अनुभवता येईल. हे उद्यान लवकरात लवकर पूर्णत्वास यावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन श्री. राऊत यांनी यावेळी केले. कोराडी रोडवरील नारा जैवविविधता उद्यानाची प्रस्तावित जागा 21.75 हेक्टर असून या उद्यानाचे व्यवस्थापन नागरी संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे. येथे सद्यस्थितीत कडूनिंब, शिवपुरा. निलगिरी, गुलमोहर, साग, चंदन असे विविध प्रकारचे जवळपास 253 वृक्ष आहेत. तसेच प्राण्यांमध्ये 200 चितळ आहेत. या प्रस्तावित जैवविविधता उद्यानामध्ये ट्रेकिंग, योगा, ध्यानधारणा कक्ष, खुले सभागृह, गांडूळ खत निर्मिती, स्वच्छतागृहे, स्वच्छ पिण्याचे पाणी, पार्किंग या सर्व सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती श्री. शुक्ल यांनी यावेळी दिली. *****

यशवंत स्टेडीयम अद्ययावतीकरणाच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणार - डॉ. नितीन राऊत

नागपूर, दि. 05 : यशवंत स्टेडीयमचे अद्ययावतीकरण करुन 20 हजार प्रेक्षक क्षमता असणारे अद्ययावत स्टेडीयम बांधण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, व्यापारी संकुल, म्युझियम व गेस्ट हाऊस व पार्किंगचा समावेश राहणार आहे. या अद्ययावतीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सांगितले. शहरातील नामांकित यशवंत स्टेडीयमच्या अद्ययावतीकरणाबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय येथे आढावा बैठक घेण्यात आली. आमदार अभिजित वंजारी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व नागपूर सुधार प्रन्यास व महानगर पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यशवंत स्टेडीयमच्या नूतनीकरणाच्या आराखड्याची सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, व्यापारी संकुल, म्युझियम, अभ्यास केंद्र, मेमोरियल हॉल, गेस्ट रुम, वाहनांसाठी पार्किंग आदी चार लाख स्क्वेअर मीटर क्षेत्रात हे बांधकाम करण्यात येणार आहे. यशवंत स्टेडीयम शहराच्या मध्यभागी असून ही जागा शासकीय आहे. सन 1970 पासून ही जागा महानगरपालिकेकडे लिजवर देण्यात आली आहे. या जागेवर महानगर पालिकेचा ताबा आहे. अद्ययावतीकरणासाठीचा प्रस्ताव मेट्रोकडे देण्यात आला होता. हे काम मेट्रोला दिल्यास व्यवस्थित होईल. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्री यांना सादरीकरण दाखवून निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन या कामास गती द्यावी. महापालिका आयुक्तांनी लवकरात लवकर प्रस्तावावर अभ्यास करुन प्रस्ताव सादर करावा, असे त्यांनी सांगितले. बांधकामासाठी नागपूर सुधार प्रन्यास व महानगर पालिकेकडून सुध्दा प्रस्ताव मागवावे, असे पालकमंत्री म्हणाले. ताजबाग दर्गा समितीच्या स्थापनेसाठी बैठक ताजबाग दर्गा समितीच्या स्थापनेसाठी पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. ही समिती राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असून समितीवर जिल्हा न्यायाधीश नियुक्त केले जातात. समितीचे पूर्ण अधिकार त्यांना असतात, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यावेळी सांगितले. समिती स्थापनेसाठी शासननिर्णय व इतर तद्अनुषंगिक कागदपत्रे यांची तपासणी करुन त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे लवकरात लवकर पाठवावा, असे पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले. समिती स्थापनेसाठी विधी व न्याय सचिवांशी बैठक घेवून येणाऱ्या तांत्रिक त्रुट्या दूर करण्यात येतील, असेही ते म्हणाले. आतापर्यंत 103 कोटी खर्च झालेला असून 29 कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समिती कडून अप्राप्त असल्याने तो खर्च झाला नाही, असे सांगण्यात आले. 00000

Sunday 4 April 2021

कोविडवर मात करण्यासाठी सर्वांचे लसीकरण आवश्यक : डॉ. नितीन राऊत

लसीकरण केंद्र, कोविड केअर सेंटरला पालकमंत्र्यांची भेट व पाहणी नागपूर दि. 4 : वाढता कोविड प्रादूर्भाव पाहता प्रत्येक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. सर्वांचे लसीकरण झाल्यावर आपण या संकटावर मात करु, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. डॉ.राऊत यांनी शहरातील विविध लसीकरण केंद्र तसेच कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. आमदार निवास येथील इमारत क्रं. 2 येथे कोविड केअर सेंटरला त्यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन् बी, महापालिका उपायुक्त राम जोशी तसेच येथील वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. काही रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे इतरांपेक्षा वेगळी आढळतात. अशा केसेसचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यानुसार कोविड प्रोट्रोकॉलमध्ये बदल करता येईल. कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना सर्व आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे असल्याचे श्री.राऊत यावेळी म्हणाले. पाचपावली येथील महिला रुग्णालयातील लसीकरण केंद्रालाही पालकमंत्र्यांनी भेट दिली. प्रभारी वैद्यकीय अधिकारी संगीता बालकोटे यांनी लसीकरण केंद्रामध्ये असलेल्या सुविधांची माहिती दिली. लसीकरण झाल्यानंतर विश्रांतीसाठी असलेल्या निरीक्षणगृहामधील नागरिकांशी पालकमंत्र्यांनी यावेळी संवाद साधला. त्यानंतर पाचपावली पोलीस क्वॉर्टर सभागृहातील कोविड चाचणी केंद्राला भेट दिली. येथील दैनदिन कोविड चाचणी क्षमता, दाखल रुग्ण व त्यांचे औषधोपचार याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्रत्येक रुग्णाला वैद्यकीय उपचार तातडीने मिळावे याबाबत सबंधितांना निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दुसरा डोज पालकमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या केंद्रावर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोज घेतला. मेडिकलचे अधीष्ठाता डॉ.सुधीर गुप्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यावेळी उपस्थित होते. विक्रमी लसीकरण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन व प्रशासनाने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला आहे. दररोज चाळीस हजारांवर लोकांचे लसीकरण करण्याचे नियोजन आखले असून त्यासाठी शहर व ग्रामीण भागात महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रभावी जनजागृतीही करणे सुरू आहे नागरिकांना लसीकरणाचे फायदे समजावून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात मोठ्या संख्येने लसीकरण होत आहे. काल शनिवारी (ता. 3)जिल्ह्यामध्ये लसीकरणाची विक्रमी नोंद झाली . शनिवारी जिल्ह्यात एकूण 41 हजार 556 लोकांचे लसीकरण झाले. हे आजवरचे एका दिवसातील सर्वाधिक लसीकरण आहे. काल राज्यात एकाच दिवशी 4 लाख 62 हजार नागरिकांचे लसीकरण झाले पुणे जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक 76 हजार 594, मुंबई उपनगर (46 हजार 937), नागपूर (41 हजार 556), ठाणे (33 हजार 490) या जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) आणखी शंभर खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात अतिदक्षता विभागातील 30, ऑक्सीजन सुविधा असणारे 30, सारी रुग्णांसाठी 10 व रात्री उशिरापर्यंत कार्यरत होणाऱ्या 30 अतिदक्षता अशा एकूण शंभर खाटांचा समावेश आहे. यापूर्वीच्या सहाशे खाटा मेडिकल मध्ये उपलब्ध आहेत. आता आणखी शंभर खाटांचे भर पडली असून पुढील काही आठवड्यांमध्ये ही संख्या एक हजारपेक्षा जास्त वाढविण्यात येणार आहे. कॉल सेन्टर सुरू ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना नागपूर शहरातील व जिल्ह्यातील प्रमुख हॉस्पिटलमधील खाटांची संख्या व अन्य माहिती उपलब्ध व्हावी यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. 0712-25 62 668 या क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांना आता मेयो व मेडिकलसह अन्य हॉस्पिटलची माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरिकांनी अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा. 00000

Saturday 3 April 2021

वन्यजीवांच्या मृगयाचिन्हांचे संवर्धन कार्य नागपुरात व्हावे - पालकमंत्री

·वन्यजीव जतन व संवर्धन प्रयोगशाळेला भेट ·मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन · गोरेवाड्याच्या मृगयाचिन्हांच्या धर्तीवर विकास करण्याची ग्वाही नागपूर दि. 3: विदर्भात पुरातन काळातील वन्यजीव प्राण्यांच्या मृगयाचिन्हांच्या (ट्रॉफीच्या) जतन व संवर्धनासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करा. तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करुन या प्रयोगशाळेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे सांगितले. मध्य भारतातील एकमेव असलेल्या सेमीनरी हिल्स येथील वन्यजीव जतन व संवर्धन प्रयोगशाळेला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपवनसंरक्षक प्रभुदास शुक्ल, यांच्यासह माजी महानिदेशक डॉ. बी. व्ही. खरबडे, संवर्धन तज्ज्ञ लीना झिलपे-हाते, वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते यावेळी उपस्थित होते. वन्यजीव प्राण्यांच्या ट्रॉफीचे जतन करणे, त्यांचे संवर्धन करणे आणि त्यातून भावी पिढीला याबाबतची माहिती उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. विदर्भात आणि त्यातही नागपूर येथे यामध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. येथे पुरातत्व वस्तुसंग्रहालय आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर येथे वन्यप्राण्यांच्या ट्रॉफी आहेत. त्यामुळे येथील वन्यप्राण्यांचा इतिहास जनतेला सहजपणे या ट्रॉफींच्या माध्यमातून उपलब्ध होतो. शिंगे, कागद, कपडे इतर भाग हे सर्व सद्यस्थितीत प्राथमिक अवस्थेत आहे. त्यांचे जतन व्हायला पाहिजेत. राज्यभरात जिथे जिथे आहे, त्या सर्व ट्रॉफींना एकत्र केल्यास एक चांगला ठेवा तयार होईल, अशी माहिती लीना झिलपे-हाते यांनी पालकमंत्र्यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी नुकतेच गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात येथील स्थानिक गोंडवाना आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्याच धर्तीवर या प्रयोगशाळेच्या माध्यमातून काम करता येणार असून, त्याचा संयुक्त प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री राऊत यांनी विभागाला दिल्या. नागपूरचे स्थानिक कल्चर वाचवायचे आहे. त्यामुळे त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून द्या, त्यावर चांगले काम करुन स्थानिक तसेच विदेशी पर्यटकांना येथील संस्कृतीची माहिती मिळेल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. 00000

मेडिकलमध्ये 100 नवे बेड कार्यान्वित ; जिल्हयात 237 लसीकरण केंद्र सुरू - डॉ. नितीन राऊत

ग्रामीण भागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी संवाद आजच्या बैठकीतील निर्णय Ø मनपाप्रमाणे ग्रामीण भागासाठी कॉल सेन्टरची सुरुवात Ø निर्देश न मानणाऱ्या डॉक्टरांवर पोलिसांमार्फत कारवाई Ø मौदा, रामटेक, इंदोऱ्याच्या आंबेडकर केंद्रात कोविडकेअर सेंटर Ø ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांचीही चाचणी Ø ग्रामीण भागात पोलिसांमार्फत लसीकरण मित्र उपक्रम Ø खाणी, वीज केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चाचणी व लसीकरण नागपूर, दि. 03 : ग्रामीण व शहरी भागातून सर्वाधिक ताण असणाऱ्या मेडिकलमध्ये 100 बेड आणखी उपलब्ध झाले असून ते रुग्णांसाठी कार्यरत झाले आहे. तसेच कोरोनावर एकमेव पर्याय असणाऱ्या लसीकरणामध्ये नागपूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून ग्रामीण व शहर मिळून आता 237 केंद्रांवर लसीकरण सुरू झाले असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिली. कोरोना संदर्भातील सद्यस्थिती व गेल्या पंधरा दिवसांपासून बैठकांच्या माध्यमातून केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी ऑनलाइन चर्चा केली. त्यानंतर माहिती देताना त्यांनी गेल्या काही दिवसातील सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 100 बेड आणखी उपलब्ध झाल्याची माहिती दिली. यामध्ये अतिदक्षता विभागातील 30, ऑक्सीजन सुविधा असणारे 30, सारी रुग्णांसाठी 10 व आज रात्री उशिरापर्यंत कार्यरत होणाऱ्या 30 अतिदक्षता अशा एकूण 100 बेडचा समावेश आहे. यापूर्वी 600 बेड मेडिकलमध्ये उपलब्ध होते. आता आणखी शंभर बेडची भर पडली असून पुढील काही आठवड्यांमध्ये ही संख्या एक हजार बेडपेक्षा अधिक असेल असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना आजाराची घातकता व मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक ठरत असलेल्या लसीकरणात नागपूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. काल एका दिवसात नागपूर जिल्ह्यात 31 हजार 244 नागरिकांना लस देण्यात आली. जिल्ह्यामध्ये नागपूर शहरात 90 शासकीय तर 74 खाजगी अशा 164 केंद्रांना सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागांमध्ये 173 केंद्रांना सुरुवात झाली आहे. एकूण 237 केंद्र नागपूर जिल्ह्यामध्ये सुरू झाले असून दररोज तीस हजारावर लसीकरण होत असून नागरिकांनी कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरणामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना नागपूर शहरातील व जिल्ह्यातील प्रमुख हॉस्पिटलमधील बेडची संख्या व अन्य माहिती उपलब्ध व्हावी यासाठी महानगरपालिकेप्रमाणेच कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. 0712-2562668 या क्रमांकावर संपर्क साधून ग्रामीण भागातील जनतेला आता मेयो मेडिकलसह अन्य हॉस्पिटलची माहिती उपलब्ध केली जाणार आहे. ग्रामीण भागातील लोक प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी मौदा, रामटेक व नागपूर शहरातील इंदोरा भागातील आंबेडकर अनुसंधान केंद्र येथे नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा केली. बुटीबोरी येथे नव्याने लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती, खाण कर्मचारी, विद्युत निर्मिती केंद्रातील कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण व चाचणी करण्याचे निर्देशही आजच्या बैठकीत देण्यात आले. ग्रामीण भागात खासगी डॉक्टरांकडे मोठ्या संख्येने या काळात रुग्ण जात आहेत. त्याची नोंद व कोरोना चाचणीची खातरजमा करण्याच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला आज निर्देश देण्यात आले. यापुढे ग्रामीण भागातील कोणत्याही खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णाची कोरोना चाचणी व लसीकरण झाल्याबाबतची नोंद ठेवली जाणार आहे. ग्रामीण भागामध्ये लसीकरणासंदर्भात गैरसमज आहेत. काही अफवा पसरविल्या जात आहे. मात्र कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी व कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी लसीकरण प्रभावी असून त्यासाठी ग्रामीण भागात पोलिसांच्या मदतीने 'लसीकरण मित्र ' उपक्रम राबविले जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी माध्यमांना दिली. तत्पूर्वी आज झालेल्या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, वनामतीच्या संचालक मनीषा खत्री, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला,माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, आयएमएच्या अध्यक्ष अर्चना कोठारी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी व कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. 00000