Sunday 31 July 2016

सौराष्ट्र लेवा पटेल समाजाचा देशाच्या विकासात वाटा - मुख्यमंत्री


समाज भवनाचे  थाटात लोकार्पण
                
नागपूर, दि.31 :  सौराष्ट्र लेवा पटेल समाजाने एकतेचा परीचय देत उभारलेले वातानुकूलित भवन नागपूरच्या सौदर्यांत भर टाकणारे असून या भवनाचा उपयोग लेवा पटेल समाजासोबतच इतर समाजालाही विविध कार्यक्रमासाठी उपयोग होईल असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
बेसा येथे सौराष्ट्र लेवा समाज यांच्या वतीने  आठ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सौराष्ट्र लेवा पटेल भवनाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फीत कापून झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार गोपालदास अग्रवाल, गुजरातचे आमदार प्रफुल्लभाई पानशिरोया पटेल,  गुजरात पटेल समाजाचे सुरेशभाई पटेल, रसिकभाई आकेलीया, बेसाचे संरपंच शालिनी कंगाले, मुंबई सौराष्ट्र समाजाचे अनंतराही काकडीया नगरसेवक संदीप जोशी, उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, सौराष्ट्र लेवा पटेल समाजाचे मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या समाजाबरोबर इतरांनाही ही वास्तू विविध कार्यक्रमासाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सौराष्ट्र लेवा पटेल समाजाबरोबर आपले जुने स्नेहाचे संबंध असून त्यांनी आयेाजित केलेल्या नवरात्र असो किंवा इतर कार्यक्रमांना आपण जात असतो. या समाजाने देशाला व महाराष्ट्राला व्यापार, उद्योग, बांधकाम, कर यांच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, लेवा पटेल समाज  राष्ट्राच्या व समाजाच्या कल्याणासाठी नेहमीच अग्रेसर असतो.  जलयुक्त शिवार कार्यक्रमास त्यांनी मोठया प्रमाणात आर्थिक सहभाग नोंदविला आहे.
यावेळी सौराष्ट्र लेवा पटेल समाजाचे सुरेशभाई पटेल, प्रवीण पटेल, सुदेश पटेल यांनी प्रत्येकी 51 हजार रुपयांचा धनादेश जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. प्रारंभी सौराष्ट्र लेवा पटेल समाजाच्या वतीने मुख्यमंत्री व प्रमुख अतिथींचा पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन डॉ. मनोज साल्पेकर यांनी केले.
 
*****

आंतरराष्ट्रीय शहराप्रमाणे येत्या तीन वर्षात नागपूरचा विकास -देवेंद्र फडणवीस


Ø 200 कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ
Ø 354 दिव्यांगाना विविध साहित्याचे वाटप
Ø झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप सुलभ
Ø अविकसित लेआऊटच्या विकासासाठी 100 कोटी रुपये
Ø नागपूर जिल्हा 2 ऑक्टोबर पर्यंत डिजीटल जिल्हा
Ø राज्यातील सर्व ग्रामपंचायती  डिजीटल करणार
                
नागपूर, दि.31 :  देशातील मध्यवर्ती  व महत्वपूर्ण शहर म्हणून नागपूरचा विकास करतांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाची सांगड घालून येत्या तीन वर्षात आंतरराष्ट्रीय शहराप्रमाणे नागपूरचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विदर्भ वैधानिक विकास महामंडळ कार्यालयाच्या परिसरात 354 दिव्यांगाना गरजेनुसार आधुनिक साहित्याचे वितरण तसेच दक्षिण- पश्चिम विधानसभा क्षेत्रातील दोनशे कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. तर विशेष पाहुणे म्हणून महापौर प्रवीण दटके,  जिल्हा परिषदेचे अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर, इमारत बांधकाम मजूर कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष मुन्नाजी यादव, आमदार सुधाकरराव कोहळे, मितेश भांगडीया, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदिप जोशी, रमेश शिंगाडे, अविनाश ठाकरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीमती कादंबरी बलकवडे, प्रा. राजीव हडप, श्रीमती सुमित्रा जाधव, प्रकाश भोयर आदी उपस्थित होते.
उपराजधानीचा दर्जा असलेल्या नागपूर शहराचा अपेक्षित विकास झाला नसल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने मिहानसह विविध योजनांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला चालना दिली आहे.शहराच्या सर्वंच भागात मोठया प्रमाणात विकास कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वेसह सुरु असलेल्या कामामुळे रस्ते खोदून ठेवले आहे. येत्या तीन वर्षात ही सर्व कामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जनतेला सर्व सुविधा उपलब्ध होतील. या विकासकामासाठी जनतेचा सहभाग मिळविण्यासाठी कामाच्या कालमर्यादेचे माहिती फलक प्रत्येक ठिकाणी लावण्यात यावे व कामांचा दर्जा कायम राहावा, यासाठी नागरिकांची समिती तयार करावी अशी सूचना यावेळी केली.
                                                    
झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क
झोपडपट्टयांनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करतांना अनेक अडचणी होत्या. परंतु सुलभपणे मालकी हक्काचे पट्टे मिळावे, यासाठी शासन निर्णयामध्ये बदल करण्यात आला असून झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नवीन नियमाप्रमाणे मालकी हक्काचे पट्टे वाटप तात्काळ वाटप करावे, अशी सूचना करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अविकसित लेआऊट मध्ये रस्ते, पाणी, वीज आदी मुलभूत सुविधा पुरविणाऱ्याला प्राधान्य देण्यात आले असून रस्ते विकासासाठी 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
समाधान शिबिराच्या माध्यमातून जनतेच्या अडचणी व तक्रारी सोडविण्यास मदत होत असल्यामुळे मुख्यमंत्री समाधान शिबिर ही योजना जोमाने राबवून या योजनेच्या माध्यमातून सोळा वेगवेगळया सेवा व प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येईल. शासन आपल्या दारी ही संकल्पना आता मतदार संघाऐवजी प्रत्येक भागात तसेच वार्डात सुरु करण्यात येऊन योजनांचा लाभ व सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजीटल करणार
नागरिकांना शासनाच्या सर्व सेवा घरपोच मिळाव्यात यासाठी नागपूर जिल्हा हा 2 ऑक्टोबर पर्यंत डिजीटल जिल्हा करण्यात येणार आहे.या अंतर्गत सर्व ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबरने जोडण्यात येऊन शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधा ऑनलाईन उपलब्ध होतील. जिल्हयात 350 सेवा 2 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन करुन या संपूर्ण सेवा मोबाईल ॲपवर उपलब्ध होणार असल्यामुळे जनतेला यापुढे शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
डिजीटल क्रांतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील सेवा व सुविधा यामध्ये फरक राहणार नाही. 11 हजार डिजीटल शाळामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी पालकांची संख्या वाढत आहे.
दिव्यांगांना साहित्याचे वाटप
समाजातील विविध घटकातील दिव्यांगांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करुन  दिल्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. यावेळी 354  दिव्यांगांना विविध वस्तू व साहित्याचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये अस्थिव्यंग अपंगत्व असलेल्यांना स्वयंचलित ट्रायसिकल, व्हिल चेअर आदी साहित्य, कृत्रिम अवयव व कॅलिपर्स, त्यानंतर मतीमंद व कर्णबधिर अपंगांना एमआर किट, ऐकण्याची मशीन तसेच अंध व अल्प दृष्टी धारकांना आवश्यक साहित्य त्यासोबतच अपंगत्व प्रमाणपत्र, अपंग वित्त, व विकास महामंडळातर्फे कर्ज पुरवठा, 20 झेरॉक्स मशीनचे वाटप आदी साहित्यांचे वितरण करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांगांना विविध साहित्यांचे वाटप केल्यानंतर सर्व  अपंगांना भेटून  त्यांच्याशी संवाद साधला.
चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाठी शासनाने प्रथमच मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे शहराच्या सर्वच भागात विकासकामांना सुरुवात झाली असल्याचे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शहरातील अंतर्गत रस्ते व रिंग रोडसाठी प्रत्येकी 300 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. दक्षिण-पश्चिम मतदार संघात रस्ते पाणी वीज आदी मुलभूत सुविधासाठी 200 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ होत आहे.
शहरात राहणाऱ्या नागरिकांना चांगल्या मुलभूत सुविधा मिळाव्यात तसेच दक्षिण-पश्चिम मतदार संघातील रस्ते विकासासाठी 120 कोटी रुपये आवश्यकता असून हा निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्याची मागणी करतांना ते पुढे म्हणाले की, आरक्षणाच्या माध्यमातून रस्त्यामध्ये येणाऱ्या  सुमारे आठ हजार परिवारांचे घरे  वाचविण्याचे महत्वपूर्ण काम करण्यात आले आहे.
दक्षिण- पश्चिम मतदार संघातील संपूर्ण विद्युत लाईन भूमिगत करण्यात आले. वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून 118 कोटी रुपये खर्चाचा स्मार्ट ग्रिडचा प्रकल्प मंजूर झाला आहे.  नागपूर शहर हे एज्युकेशन हब म्हणूनही विकसित होत असून दीक्षाभूमी, चिंचोली व ड्रॅगन पॅलेसला निधी देऊन बुद्ध सर्कीट म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक प्रकाश भोयर यांनी तर आभार प्रदर्शन संदीप जोशी यांनी मानले. संचलन श्रीमती नंदा जिचकार यांनी केले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त माधव झोड, मुख्यमंत्री सचिवालयाच्या श्रीमती  आशा पठाण,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता प्रशांत रेशमे तसेच दिलीप दिवे, संजय भेंडे, अनिल वाहने, किशोर वानखेडे, गिरीश देशमुख, गोपाल बोहरे, आशिष पाठक, सचिन कारलकर, श्रीपाद बोरीकर आदी उपस्थित होते.
*****

संस्कारक्षम शिक्षणाबरोबरच नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज -मुख्यमंत्री


नागपूर, दि.31 :  भारतीय संस्कृती आणि नितीशास्त्रासोबतच नवीन माहिती व तंत्रज्ञान देखील आत्मसात करणे आवश्यक आहे. दैनिक हितवादच्या नॉलेज मॅगझिनने सूरु केलेली ही मोहीम शाळा व विद्यार्थ्यांसाठी निश्चितच दिशादर्शक आहे. राज्यातील शाळांमध्ये डिजीटल शिक्षण पद्धती सुरु करण्यात आली असून भविष्यात जिल्हा परिषद व नगरपरिषदेच्या मराठी शाळाकडे पालक निश्चितपणे वळतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे दैनिक हितवादच्या नॉलेज मॅगझिनला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित सोहळयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, दैनिक हितवादचे प्रबंध संपादक बनवारीलाल पुरोहित, संपादक विजय फणशीकर, सहसंपादक सुभाष देवपुजारी, नॉलेज मॅगझिनच्या संपादक आसावरी शेणोलीकर प्रामुख्याने  उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात नवीन नवीन प्रयोग होत असल्याचे अभावानेच दिसते. परंतु हितवादने नॉलेज मॅगझिनच्या निमित्ताने सुरु केलेला हा नवीन प्रयोग निश्चितपणे यशस्वी झालेला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावणे सोबतच संस्कृतीविषयीही माहिती देणे गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञान विद्यार्थी उपयोगात आणत असतांना भारतीय संस्कृती आणि नितीमत्ता या दोन्ही गोष्टींची सांगड घालून शिक्षण सुसह्य करण्याची आवश्यकता आहे. समाजात साक्षरतेचे प्रमाण वाढवितांना त्याला तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. कारण तमसो मा ज्यो‍र्तिगमय म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या शिक्षण पद्धतीचा शाळांमधून प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आपल्या विचारवंतानी मांडलेल्या चांगल्या कल्पना समाजासमोर आणणे आवश्यक आहे. विज्ञानाधारित समाज निर्मिती करतांना मुलांना वैज्ञानिक निकषांवर आधारित शिक्षणाची गरज आहे. इस्त्राईल सारख्या छोटया देशाने कृषी क्षेत्रात मोठी आघाडी घेतली आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करुन कृषी उत्पादन वाढविले आहे. आता संगणकही शेती करु शकतो हे इस्त्राईलने खरे करुन दाखविले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
येत्या 15 ऑगस्टला राज्यात अनेक शासकीय योजना सुरु करण्याचा मानस आहे. 2 ऑक्टोबर पासून 350 सेवा जनतेला डिजीटल ॲपवर उपलब्ध करुन देणार आहोत. हाच खरा तंत्रज्ञानाचा फायदा आहे. भ्रमणध्वनीमुळे संपर्काचे मोठे साधन आपल्याला मिळाले आहे.परंतु त्याचे काही दुष्परिणामही समाजात दिसून येतात. विद्यार्थी यावर गेम खेळतात तसेच इतर गोष्टीही बघतात. या तंत्रज्ञानाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी मुलांवर शाळेतच मुल्याधारित संस्कार करण्याची प्रार्चाय व शिक्षकावर जबाबदारी  आहे. चांगले मुल्य शिक्षण नॉलेज मॅगझिनच्या माध्यमातून आपण निश्चितपणे देऊ शकू अशी खात्रीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देशातील 6 लाख गावे रस्त्याने जोडण्याची योजना राबविली होती. त्यामुळे गावामध्ये शिक्षण आणि आरोग्य सुविधा नागरिकांना मिळतात. यासोबतच त्यांनी उत्पादीत केलेल्या कृषी मालाला मोठया शहरात नेण्याची सोयही होते. एक रस्ता अनेक आर्थिक सुधारणांशी निगडीत आहे. त्यामुळे शासनाने कम्युनिकेशन एक्सप्रेस हायवे ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहय जगामध्ये विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती डिजीटल पद्धतीने होण्यासाठी गेल्या महिन्यात शाळांतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे यानिमित्ताने त्यांना देण्यात आली. शिक्षण हे सर्वसमावेशक असावे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये. यासाठी शासन तर प्रयत्नशील आहेच, सोबतच सामाजिक उत्तरदायित्व म्हणून काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थाचेही सहकार्य आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दैनिक हितवादचे प्रबंध संपादक बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या भाषणात हितवादने सुरु केलेले नॉलेज मॅगझिन राष्ट्रनिर्माणासाठी  काम करीत आहे.अत्यंत उज्जवल परंपरा लाभलेल्या दैनिक हितवाद महात्मा गांधी यांचे गुरु गोपाल कृष्ण गोखले यांनी सुरु केले. नितिमत्ता व संस्कृती यांची जोपासना व भ्रष्टाचारावर प्रहार करण्याची परंपरा आम्ही कायम ठेवली आहे. सर्व धर्मात प्रेम व सद् भावना वाढीस लागावी, ही प्रेरणा जोपासून या क्षेत्रात आम्ही काम करीत आहोत, असे सांगितले.
दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात हितवाद नॉलेज मॅगझिन 11 वर्षे पूर्ण करीत आहे. मुलांसाठी काहीतरी वेगळे करावे ही प्रेरणा घेऊन सुरुवात केली. यासाठी विविध विद्यालयांच्या प्राचार्याशी चर्चा करुन त्याचे स्वरुप कसे असावे त्यात मजकूर काय असावा याबाबत चर्चा झाली. विद्यालयांनीही ही कल्पना उचलून धरली. आता या मॅगझिनच्या लाखो प्रती विद्यार्थी व शिक्षकांना देण्यात येतात. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावे. डॉ. अब्दुल कलाम, सानिया मिर्जा, सचिन तेंडुलकर, यांच्या मोठया होण्यामागील परिश्रम विद्यार्थ्यांना सांगितले जातात. राजकीय व व्यावहारीक दृष्टीकोनाच्या पलीकडे जाऊन हे काम हाती घेतले आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही चांगले साहित्य वाचण्याची सवय लागली असल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले.
सुरवातीला मुख्यमंत्र्यांनी दीप प्रज्वलन करुन गोपाल कृष्ण गोखले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. स्वागत विजय फणशीकर यांनी केले. या  समारंभास सुमारे 400 प्रार्चाय व शिक्षक उपस्थित होते.
*****

महिला सक्षमीकरण सप्ताह म्हणून महाराजस्व अभियान राबविणार - विभागीय आयुक्त



महिला सक्षमीकरण सप्ताह म्हणून
महाराजस्व अभियान राबविणार
-         विभागीय आयुक्त

नागपूर, दि.30 :  येत्या 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महाराजस्व अभियान हे महिला सक्षमीकरण सप्ताह म्हणून राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिली.
यावर्षीचे महसूल अभियान हे महिला सक्षमीकरण म्हणून राबविण्यात येणार असून ताई, मावशी, आक्का आता जग जिंका असे घोषवाक्य असून या सप्ताहभरात जिल्हा, तालुका व गावपातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
आज सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे.
1 ऑगस्ट या महसूल दिन दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या    23 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायबतहसिलदार, मंडळ अधिकारी, लघुलेखक, अव्वल कारकून, लिपीक-नि-टंकलेखक, तलाठी, शिपाई, कोतवाल व पोलीस पाटील यांचा समावेश आहे.
महिला सक्षमीकरण सप्ताह राबविण्यासाठी खालील बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे.
लक्ष्मी-मुक्ती योजनेअंतर्गत 7/12 उताऱ्यावर पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकीहक्कांची नोंद करणेसाठी विशेष मोहिम राबविणे, वारस नोंदी करतांना कुटुंबातील महिला वारसदारांची नावे वगळली गेली असल्यास तर नव्याने वारस नोंद घेणे, तसेच महिला खातेदारांच्या अधिकार अभिलेख विषयीचे अर्जावर प्राधान्याने कार्यवाही करणे, महिला खातेदारांच्या वहिवाट किंवा पांधण रस्त्यांसंदर्भात असलेल्या तक्रारीवर प्राधान्याने कार्यवाही करणे, महिला बचत गटांना कर्जपुरवठा करण्यास विशेष मोहिम राबविणे, रोजगार हमी योजनेतील महिला जाबकार्ड धारकांना विशेष मेळावे घेवून मार्गदर्शन करणे, शिधापत्रिकेवर कुटूंब प्रमुख म्हणून महिलांची नोंदणी करणे, मतदार यादीमध्ये 18 वर्षे पूर्ण झालेल्या मुली व मतदार नोंदणी न झालेल्या महिलांच्या नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविणे, महिला खातेदारांचा अधिकार अभिलेख विषयीचे अर्जावर प्राधान्याने कार्यवाही करणे, वन जमीनीचे पट्टे वाटप करणे, उज्ज्वला योजना अंतर्गत गॅस कनेक्शन देणे, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करणे व विविध योजनांची माहिती देणे, महिलांना आधार कार्ड / निवडणूक ओळखपत्र देणे, ग्रामपंचायत मधील नमुना 8-अ मध्ये पतीच्या नांवासोबत महिलांच्या नावाची नोंद करणे, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवेच्या नावाने ॲटोरिक्षा परवाना देणे, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन वाटप.

00000000

राज्यात 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान पशुधन विमा पंधरवडा

नागपूर दि.30 :  जनावरांचा विमा उतरविणेकरिता राज्यात 1 ते 15 ऑगस्ट पशुधन विमा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय पशुधन विमा योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत देशी व संकरीत (गायी, म्हशी), पाळीव पशू  (घोडे, वळु, बैल व रेडे) आणि शेळया, मेंढयांचा समावेश करण्यात आला आहे.
योजनेअंतर्गत लाभ देणेकरिता जास्तीत जास्त प्रति लाभार्थी प्रति कुटुंब 5 जनावरांचा समावेश आहे. विमा रक्कम ही जनावराच्या प्रत्यक्ष किंमतीवर आधारित असते. जनावरांची किंमत ही वय, स्वास्थ्य व दुध उत्पन्नावर पशुपालक, पशुवैद्यकीय अधिकारी व विमा प्रतिनिधी यांचेमार्फत निश्चित करण्यात येते. शेळया, मेंढया, डुकरे व ससे यांना लाभ द्यावयाचा झालेस अनुदान देय ठरविणेसाठी एक पशुधन घटक यावर आधारीत अनुदानाचा लाभ निश्चित करण्यात आला आहे. एक पशुधन घटक म्हणजे 10 शेळया, मेंढया, डुकरे असलेल्या लाभार्थींना एक पशुधन घटक समजून या योजनेचा लाभ देण्यात आहे.
दुभत्या जनावराची किंमत ही किमान तीन हजार रुपये प्रति लिटर प्रति गायीकरिता व चार हजार रुपये प्रति लिटर प्रति म्हैशीकरीता प्रति दिन दुध उत्पादनावर आधारी किंवा शासनाने ठरविले प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थानिक बाजारातील आधारभूत किंमतीनुसार निश्चित करण्यात येते. अशा प्रकारे 50 हजार रुपये किंमतीच्या जनावरांचा विमा उतरविणेकरीता सर्वसाधारण लाभार्थीसाठी 705 रुपये व दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, तसेच अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीसाठी 441 रुपये खर्च अपेक्षित आहे.
जनावराची ओळख निश्चित करण्याकरिता बारा अंकी विशिष्ट क्रमांकाचा बिल्ला जनावराच्या कानात मारण्यात येतो. क्लेम देतेवेळी जनावरांचे कानात बिल्ला असणे आवश्यक आहे. कानातील बिल्ल्याद्वारेच जनावरांची पुर्णत: ओळख निश्चित करता येते. नेहमीच्या प्रचलीत पध्दतीने जनावरांचे कानात बिल्ला मारण्यात येतो. विमा उतरविलेले जनावर पशुपालकाने विमा मुदतीत विक्री केलेस, हस्तांतरीत केलेस सदर विमा नवीन लाभार्थीस हस्तांतरीत करता येईल. तथापी सदर हस्तांतरणाची कार्यवाही त्यासाठी आवश्यक फी, सेलडीड याबाबत विमा कंपनीस कंत्राट देणेपूर्वी सदरची भूमिका विमा कंपनीच्या संमतीने निश्चित करण्यात येते.
विमा क्लेम निकाली काढणेची पध्दत : विमा क्लेम निकाली काढणेकरीता कवेळ चार कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक राहील. लसे की, जनावरांचा विमा उतरविलेची मुळ पॉलिसी, जनावर मृत झालेबाबत विमा कंपनीस दिलेली सूचना, क्लेम फॉर्म व शविच्छेदन प्रमाणपत्र, तसेच मृत जनावराचा कानातील टॅगसह व विमा लाभार्थी यांचा एकत्रित छायाचित्र. अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या 1800 2330418 व विमा कंपनीच्या 1800 2091415 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा किंवा www.ahd.maharashtra.gov.in संकेतस्थळवर भेट द्यावी.
00000000

Friday 29 July 2016

वाघांचे संरक्षणासाठी संकल्प करुया -मुख्यमंत्री


Ø  जल-जंगल-जमीन आणि जनावरे याकडे विशेष लक्ष देणार
Ø  पडी जमीनीवर बांबू लागवड करावी
Ø  येत्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईत टायगर महोत्सव घेणार
Ø  वन खात्याला देशात आदर्श करणार
Ø  आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन  उत्साहात संपन्न
Ø  वाघाशिवाय अन्न साखळी संतुलित राहू शकत नाही
Ø  निसर्गाने भरपूर दिले, आता परतफेड करण्याची गरज आहे.

नागपूर, दि.29 :  वन विभाग महाराष्ट्राचे भाग्य बदलू शकते. अशाप्रकारचे कार्य या खात्याने केले आहे. दोन कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णही करुन दाखविला. राज्यात सातत्याने येणारा दुष्काळ हा मानव निर्मित आहे. निसर्गाच्या सततच्या शोषणामुळे हे अस्मानी संकट आपल्यावर ओढवले आहे. ते कायमचे दूर करावयाचे असेल तर जल-जंगल-जमीन आणि जनावरे या चार गोष्टीकडे  भविष्यात विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
छिंदवाडा रोडवरील विभागीय क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदघाट्क म्हणून बोलत होते.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक, रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी हे होते. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, वन राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, वन सचिव विकास खारगे, आमदार समीर मेघे, प्रा. अनिल सोले, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, हे प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडायचे असेल तर निसर्गाचे रक्षण करणे आवश्यक आहे. निसर्गाने आतापर्यंत आपल्याला भरपूर दिलेले आहे. आता त्याची परतफेड करण्याची गरज आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी वाघांचे रक्षण करावे लागेल. कारण वाघच वन संपदा, जलसंपदा, मातीचे रक्षण करुन निसर्गाला सुरक्षित ठेवू शकतो. वाघाशिवाय अन्नसाखळी संतुलित राहू शकत नाही. जंगलाच्या राजा वाघामुळेच अन्नसाखळी जीवंत आहे. एकीकडे वाघाचे संवर्धन करणे, तसेच वृक्ष लागवड करुन वनांची जोपासना करणे या दोन पातळयांवर आपल्याला काम करण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात वनांचे क्षेत्रा वाढवित असतांना वृक्ष लागवड करतेवेळी दोन वर्षाचे झाड लावण्याची गरज आहे. त्यामुळे लावलेली झाडे जीवंत राहू शकतील. पुढील वर्षी पाच कोटी नवीन वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे.  यासाठी मागील एक वर्षापासूनच वृक्ष लागवडीची तयारी करुन ठेवली आहे. यावर्षी लावलेल्या प्रत्येक झाडाची माहिती नवीन तंत्रज्ञानामुळे उपलब्ध आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या जागेवर नवीन झाडे लावण्याचा प्रसंगच येणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
                        आज राज्यातील ज्या वन समित्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात आले, त्यांचे मी यावेळी विशेष अभिनंदन करतो. कारण त्यांनी खऱ्याअर्थाने वनांचे रक्षण केले आहे. वनालगत राहणारे शेतकरी नेहमी वन्यप्राण्यामुळे आम्हाला शेती करण्यास अडथळे निर्माण होतात अशी तक्रार करीत होते. परंतु माया नावाच्या वाघिणीमुळे गावकऱ्यांना 18 कोटी रुपयाचा महसूल मिळाला आहे. ‘जय’ नावाच्या वाघाचा जो आज शोध सुरु आहे. त्याच्यामुळे 14 कोटी रुपयाचा महसूल गावकऱ्यांना मिळाला आहे. असेही मुख्यामंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वनांच्या बफर एरियाच्या बाहेर जेथे शेतकऱ्यांना शेती करणे शक्य होत नाही. अशा ठिकाणी इकोटुरिझम सुरु करुन पर्यटकांना आकर्षित करण्याची योजना आहे. त्यामुळे गावकऱ्यांना रोजगार प्राप्त होईल. अलीकडे वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण कमी झाले आहे. समाज मनात प्राण्यांविषयी आस्था निर्माण झाली आहे. ‘जय’च्या न दिसण्यामुळे समाज मन अस्वथ झालेला आहे. हा फारमोठा बदल प्राण्यांच्या बाबतीत दिसून येत आहे. वनसंपदेमुळे आपल्याला 9 हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
नितीन गडकरी
            केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात जल-जमीन-जंगल यावर आपले भविष्य अवलंबून आहे. महाराष्ट्रात नागपूरच्या परिघात वाघांची संख्या मोठयाप्रमाणात आहे. जगाच्या इतिहासात एवढे वाघ उपलब्ध असणे हा योगायोग आहे. जनतेच्या सहयोगामुळे येणाऱ्या काळात वाघाचे संरक्षण करण्यात निश्चितपणे यशस्वी होऊ अशी ग्वाही दिली.
            वनाधारित उपक्रमांची सुरुवात राज्यात करण्याची गरज आहे. गडचिरोली, मेळघाट सारख्या भागात वनऔषधी मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. वनांवर आधारित उद्योग उभारल्यास रोजगार निर्मिती मोठया प्रमाणात होऊ शकेल. वने समृध्द तर व्हावीच सोबतच पर्यावरण व विकास यांचा समतोल राखण्याची गरजही गडकरी यांनी व्यक्त केली.
            नागपूर विभागात 18 नवीन कोल माईन्स सुरु करण्यात आल्या आहेत. या कोल माईन्समुळे अनेकांना रोजगार मिळणार आहे. यातून बाहेर पडणाऱ्या रेतीचे डम्प दिसणार नाही. या रेतीचा उपयोग उद्योगासाठी करण्यात येईल. कोल माईन्सच्या ठिकाणी 35 हेक्टर क्षेत्रात बांबूचे वन लावण्यात येणार आहे. देशात बांधण्यात येणाऱ्या दोन लाख किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा बांबूचे वन लावण्यात येईल. या बांबूद्वारे इथेनॉल तयार होते. याचा उपयोग प्रदूषण टाळण्यासाठी होईल. राज्यात असलेल्या पडीत जमीनीवर मोठे हिरवे वन व वनावर आधारित उद्योग सुरु करण्याची सूचनाही गडकरींनी यावेळी केली.
सुधीर मुनगंटीवार
            राज्याचे वन, अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ग्रीन आर्मीची सुरुवात करण्यात येत असल्याची घोषणा केली. प्रत्येक व्यक्तीने या वसुंधरेचे दूत व्हावे व चार वृक्ष लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही केले. 2019 पर्यंत राज्यात 50 कोटी वृक्ष लावणारच असा संकल्पही यावेळी मुनगंट्टीवार यांनी जाहीर केला.
            वन समृध्द करणे हे सर्वांचे काम आहे. सात हजार वर्षांपूर्वी शेतीची सुरुवात झाली. त्याही पूर्वी वाघाचे अस्तित्व होते. भारताच्या राष्ट्रीय प्राण्याच्या संवर्धनामध्ये घनदाट ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्प केंद्रस्थानी आहे. 2014 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेच्या निकालानुसार भारतात 2010 मध्ये केवळ 1706 वाघच उरले होते, परंतु ती संख्या 2014 मध्ये 2226 पर्यंत वाढली. महाराष्ट्रातील वाघांची संख्या 190 च्या घरात आहे. जी 2010 मध्ये 169 इतकीच होती. असेही ते म्हणाले.
            येत्या 11, 12 व 13 नोव्हेंबरला मुंबईस टायगर महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. वन विभागाच्या या सर्व उपक्रमास सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात हा वन विभाग आदर्श विभाग म्हणून नावलौकीक मिळवेल याची मला खात्री आहे, असेही मुनगंट्टीवार म्हणाले.
विकास खारगे
            राज्याचे वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात दरवर्षी 29 जुलै रोजी साजरा केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाला दोन अंग आहे. तो जसा जागृतीचा दिवस आहे, तसाच तो साजरा करावयाचाही दिवस आहे. जगभरात वाघांची संख्या अत्यंत कमी होऊन हा प्राणीच नामशेष होण्याचा मार्गावर होता परंतु प्राण्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या अनेक संस्थांनी हा अदभूत प्राणी नामशेष होण्यापासून वाचविण्यासाठी शपथ घेतली. ताडोबा, अंधारी, पेंच, मेळघाट, बोर, सह्याद्री आणि नागझिरा हे विभाग व्याघ्र प्रकल्पासाठी ओळखले जातात. वाघांची संख्या वाढावी यासाठी शासन पाऊले उचलित असल्याचेही खारगे यांनी सांगितले.

यावेळी राज्याचे वन्यजीव विभागाचे प्रधान वन मुख्य संरक्षक श्री. भगवान यांचेही भाषण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बोर टायगर, जलयुक्त शिवार, फुलपाखरु व गिधाडे या पुस्तकाचे तसेच आमदार प्रा. अनिल सोले यांनी वन संवर्धनासाठी काढलेल्या दिंडी यात्रेच्या सीडीचे, तसेच वाघांच्या टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अमोल बैस व रमण कुळकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संत तुकाराम वनग्राम योजनाचे पुरस्कार वितरण करण्यात आले. 2013-14 या वर्षात ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी गडचिरोली जिल्हयातील गोठणगाव व अहमदनगर जिल्हयातील गुंडेगाव, तसेच नागपूर जिल्हयातील निमजी या गावास प्रथम पुरस्कार देण्यात आला. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2014 हे पुरस्कारही यावेळी वितरीत करण्यात आले.
            तसेच 1 जुलै रोजी साजरा करण्यात आलेल्या वृक्ष लागवड दिनी सेल्फी विथ ट्री ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याच स्पर्धेत विजयी ठरलेले ऋषिकेष बावणे (अमरावती), मनीष मंत्री (वाशिम), सुरेश पॉल, देवांश चौरसिया, नितीन रेवतकर (नागपूर) यांना पिरॉमिड सिटीचे प्रदीप तातावार यांच्या वतीने ॲपल आयफोन 6 देण्यात आले.
            सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. पाहुण्याचे स्वागत पिंपळ वृक्ष, वाघाचे स्मृतीचिन्ह व पर्यावरणाचे रक्षक विष्णोईची प्रतिकृती देवून करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासोदकर यांनी, तर आभार उपवनसंरक्षक किशोर मिश्रीकोटकर यांनी मानले.
            या कार्यक्रमास राज्यभरातून वनप्रेमी आले होते. क्रीडा संकुल संपूर्णपणे भरले होते. जी.एच रायसोनी विद्यालय, दिल्ली पब्लीक स्कूल, ईरा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर नाटीका सादर केल्या.

कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद
             आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त वन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम अप्रतिमच होता. मानकापूर येथील इनडोअर स्टेडियम खचाखच भरला होता. वन आणि व्याघ्रचे संरक्षण आणि लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, त्यामागचा उद्देश होता. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी शासनाने उचललेलं पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. गेल्या 1 जुलै  रोजी एकाच दिवशी अडीच कोटीच्यावर वृक्ष लावून वेगळा संदेश दिला.
            नागपूरची ओळख आता टायगर कॅपिटल म्हणून होत आहे. नागपूरच्या तिनशे किलोमीटरच्या परिघात तिनशेच्या जवळपास वाघ आहेत. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नागझिरा व बोर हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहेत. आता पर्यटकही आकर्षित होताना दिसत आहे. आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नेटके नियेाजन,  उत्तम बैठक व्यवस्था व सर्वांगसुंदर प्रकाश योजना होय. टपाल तिकिटाचे प्रकाशन याच कार्यक्रमात झाल्याने ताडोब्याचा वाघ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. याच कार्यक्रमात संत तुकाराम वनग्राम योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्राम समित्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिवाय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
            या  कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. जिथे वाघाचे अस्तित्व तेथे वनसमृद्ध, जेथे वनसमृद्ध तेथील जीवन समृद्ध एक वृक्ष दहा पुत्र समान भारतातील 350 नद्यांचा उगम, वाघांच्या नैसर्गिक अधिवासातून; आपला महाराष्ट्र 190 वाघांचे घर आदी  घोष वाक्य इनडोअर स्टेडियम टिकवण्यासाठी लावण्यात आले होते, त्यामुळे वातावरण निर्मिती झाली होती.
            पुरस्कार प्राप्त व्यक्तिंची बसण्याची सोय उत्तम पद्धतीने करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी पर्यावरण, जल, जंगल, जमीन व जनावरांचे महत्त्व विषद करताना उत्तम आयोजनाबद्दल कौतुकही केले.
            आजच्या व्याघ्र दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाबद्दल निश्चित जनजागृती झाली. ही सुरु झालेली चळवळ अधिक दृढ होईल, हे मात्र निश्चित.
00000000



पूर्व नागपूर परिवहन कार्यालयात सर्वात अत्याधुनिक सुविधा -देवेंद्र फडणवीस



    *उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इमारतीचे भूमिपूजन
    *अत्याधुनिक इमारतीवर रुपये 30 कोटी 63 लक्ष खर्च
नागपूरदि.29 :  नागपूर शहरातील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे दोन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असावे,  यादृष्टिने नागपूर शहर पूर्व विभागासाठी स्वतंत्र कार्यालयाची निर्मिती करण्यात आली असून या कार्यालयामध्ये देशातील परिवहन विभागाच्या अत्याधुनिक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यत येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर मौजा चिखली येथे 18 हजार चौरस मीटर जागेवर बांधण्यात येणाऱ्या पूर्व नागपूर शहर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. तर विशेष अतिथी म्हणून ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री जयप्रकाश रावल, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव अत्राम, महापौर प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, प्रा. अनिल सोले, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन आयुक्त श्याम वर्धने तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर आदी उपस्थित होते.
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यामार्फत वाहनचालकांना जलद सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पूर्व नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारतीचे बांधकाम आकर्षक पद्धतीने व एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन देणारे असावे. अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे बांधण्यात येणाऱ्या व सर्व सुविधायुक्त दोन मजली बांधकाम असलेल्या  इमारतीचे भूमिपूजन करुन कोनशिलेचे अनावरण केले. आमदार कृष्णा खोपडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात पूर्व नागपूरमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची सुरुवात केल्यामुळे येथील जनतेला सहज सुलभपणे सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे नाममात्र दरात साडे चार एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून कार्यालयासोबतच परिवहन विभागाचे  अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रही येथे सुरु करावे. अशी सूचना केली. पूर्व नागपुरात गृहनिर्माण, रस्ते विकास, पाणी पुरवठा तसेच मूलभूत सुविधा असलेल्या  दोन हजार कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात झाली असल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.
नागपूर सुधार प्रन्यासच्या चिखली (व्यवस्था) या जागेवर पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत बांधण्यात येणार असून दोन मजली असलेल्या या इमारतीमध्ये तळमजल्यावर वेटिंग हॉल, परमिट सेक्शन, ट्रान्सपोर्ट सेक्शन, नॉन ट्रान्सपोर्ट सेक्शन, परवाना सेक्शन आदी सुविधा राहणार असून पहिल्या मजल्यावर कॉन्फरन्स हॉल बांधण्यात येणार आहे.
यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष सुधीर (बंडू) राऊत, नगर रचना सहसंचालक, एन. एस. अढारी,प्रादेशिक परिवहन अधिकारी, डॉ. डी. टी. पवार, शरद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, श्री. बेलसरे, रविंद्र भुयार, विजय चव्हाण, प्रशांत झाडे, श्री. निमजे, नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता अशोक गौर, श्री. गुज्जलवार, कार्यकारी अभियंता राजेश मेघराजानी तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त, नगरसेवक, विविध संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
                                                                                            ******