Sunday 16 August 2020

‘कोविड रुग्णांसाठी मानकापूर येथे जम्बो हॉस्पिटल’ -डॉ.नितीन राऊत

 

                               



                                                          

Ø  एक हजार बेड ची सुविधा

Ø  कोरोना रुग्णांना दिलासा

 

            नागपूर दि. 16 :  विदर्भातील  कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असे जम्बो रुग्णालय मानकापूर येथे उभारण्यात येणार असून सुमारे एक हजार रुग्णांसाठी सुविधा येथे उपलब्ध होईल, अशी माहिती आज  पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

            विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात नागपूर येथे जम्बो  कोविड हॉस्पिटलसाठी  शहरातील योग्य  जागा सुलभ होईल, यादृष्टीने  डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.

            एएए हेल्थ कन्संटन्सी सर्विसेसचे  डॉ. अहमद मेकलाई, डॉ. अमृता सूचक, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप गोडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा चिकीत्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, डॉ. दीपक सेलोकर, मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवि चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

            विदर्भातील वाढत्या कोविड रुग्णांसाठी अतिरिक्त तसेच तातडीची आरोग्य सुविधा निर्माण करणे तसेच शासकीय रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी जम्बो हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येत आहे.’ जम्बो हॉस्पिटल’च्या निर्मितीमुळे कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना सोयीचे होईल, असा विश्वास डॉ. राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

            कोवीड रुग्णांसाठी मुंबई तसेच पुणे येथे जम्बो हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने शहरात देखील एक हजार रुग्णांसाठी जम्बो हॉस्पिटलची स्थापना करण्याच्या दृष्टीने राधास्वामी सत्संग (कळमेश्वर), शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय, यशवंत स्टेडियम, पटवर्धन मैदान, व्हीसीए स्टेडियम, मानकापूर स्टेडियम या ठिकाणांची डॉ. राऊत यांनी माहिती घेतली. मानकापूर स्टेडियम  सर्व दृष्टीने सुलभ असल्याचे डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले. 

****

 

जिल्ह्यात “जागर अस्मितेचा” मोहिमेचा शुभारंभ

 

             

 

  नागपूर दि. 16 : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या अस्मिता प्लस या योजनेच्या माध्यमातून जागर अस्मितेचा या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या हस्ते सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करून करण्यात आले. 

     यावेळी जि. प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सभापती उज्ज्वला बोढारे, भारती पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमल किशोर फुटाणे, प्रकल्प संचालक विवेक इलमे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर तसेच सर्व विभाग प्रमुख  उपस्थित होते. तसेच संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये मोहिमेचा शुभारंभ आज करण्यात आला आहे.  

     ग्रामीण भागातील महिला आजही मोठ्या प्रमाणात मासिक पाळीच्या काळात कापडाचा वापर करतात. त्यांना त्यामुळे अनेक आरोग्याशी संबंधित व्याधी जडतात. मासिक पाळीच्या काळात अस्मिता प्लस सारख्या उत्तम गुणवत्ता असलेल्या सॅनेटरी नॅपकिनचा वापर केल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होणार नाही. तसेच मानसिक स्वास्थ देखील चांगले राहील. शिवाय आपण आपल्या जबाबदाऱ्या अधिक सक्षमपणे निभावू असे मत जिल्हा स्तरावर मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी श्रीमती बर्वे यांनी व्यक्त केले.

    उमेद अभियानाच्या महत्त्वाकांक्षी उद्देशानुसार मासिक पाळीच्या काळात सर्व महिलांनी तसेच किशोरवयीन मुलींनी सॅनेटरी नॅपकिनचा वापर करावा.  तसेच आपण इतरत्र कापडाचा वापर करीत असल्यामुळे आरोग्याचा धोका वाढत असून तो टाळावा. अस्मिता प्लस या सॅनेटरी नॅपकिनचा वापर करून आपण आपल्या आरोग्याची सुरक्षितता ठेवू शकतात. त्यामुळे स्वातंत्र्यदिनापासून ते 31 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्याभरात जागर अस्मितेचा ही मोहीम राबविण्यात येत आहे.  ग्रामीण भागातील महिलांना सॅनेटरी नॅपकिनच्या वापराविषयी जनजागृती या पंधरवाड्यात केली जाणार आहे. अस्मिता योजनेमुळे ग्रामीण महिलांना शाश्वत उपजिविका मिळणार असून शासनाच्या धोरणाला चालना मिळणार आहे.  तसेच अस्मिता प्लसचे सॅनेटरी पॅड सर्वसामान्य महिला व किशोरवयीन मुलींना फक्त 24 रुपयाला आठ पॅडचे पाकीट घेता येईल. तर शाळेतील विद्यार्थिनींना हेच पाकीट फक्त 5 रुपयाला विकत घेता येईल. खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील उमेद अभियानाच्या महिला स्वयं सहाय्यता समूहातील नोंदणीकृत समूहाला संपर्क करावा, असे आवाहन प्रकल्प संचालक विवेक ईलमे  यांनी केले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.    

 

                                                ******

 

शून्य मृत्यू संख्येसाठी नियोजन करा - राजेंद्र पाटील यड्रावकर

 


                            
                      आरोग्य विभागाचा आढावा                  

        नागपूर,  दि. 16 :  नागपूर  शहरासह ग्रामीण भागातील  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासोबतच शून्य मृत्यू संख्येसाठी नियोजन करा, अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. आरोग्य राज्यमंत्री यांनी सर्व आरोग्य अधिकारी यांची नुकतीच बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना विषयक बाबींचा नागपूर शहर व ग्रामीण भागाचा आढावा घेतला.

            आरोग्य यंत्रणेने सतर्क व सज्ज राहून कोरोनामुक्तीसाठी उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले. सद्यस्थितीत नागपुर शहरात 13478  रुग्ण असून त्यापैकी  3679  हे रुग्ण ग्रामीणचे आहेत. आतापर्यंत 6300 रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण मृत्यू संख्या 461 असून 75 मृत्यू ग्रामीण तर शहरातील 326 मृत्यू व 60 हे बाहेर जिल्हयातील आहेत. रुग्ण बरे होण्याचा नागपूर जिल्हयाचा दर  46.74 % आहे. नागपूर जिल्हयात सद्यस्थितीत 12 डेडीकेटेड कोविड रुग्णालय सुरु झालेले असून एकून 23 डेडीकेटेड कोविड रुग्णालय (डीसीएच)  निश्चित करण्यात आले आहे. एकूण आयसोलेशन बेड 3215 , ऑक्सीजन सपोर्टेड  2370    724 आयसीयू बेड उपलब्ध आहेत. या व्यतिरीक्त 34  डी.सी.एच. निश्चित करण्यात आले आहेत. डीसीएच मध्ये एकुण 446 व्हेंटिलेटरर्स आहेत. तसेच एकुण 51  कोविड केयर सेंटर निश्चित करण्यात आलेले आहेत. एकुण बेड संख्या 14428 आहे. सद्यस्थितीत 12 कोविड केयर सेंटर ग्रामीण व 5 कोविड केयर सेंटर महानगरपालिका  क्षेत्रात कार्यरत आहेत. तपासणीकरिता 7 शासकीय व 6 खाजगी प्रयोगशाळा सुरु असून  आतापर्यंत 114184  तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भागात आतापर्यत 27045 अँटीजेन टेस्ट करण्यात आलेल्या असून 1485 पॉझिटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती या वेळी आरोग्यमंत्र्यांना देण्यात आली.
            मनुष्यबळाची उपलब्धता व त्यांच्या मानधनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांना वैद्यकीय महाविद्यालयात पदस्थापना  देण्याबाबात चर्चा झाली. मेडिकल आयसोलेशन  व तज्ज्ञ पुरवण्याबाबत चर्चा करावी, अशी मंत्री महोदय यांनी सूचना केली. या बैठकीला आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, इंदिरा गांधी वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.  सेलोकर, डॉ. अविनाश गावंडे व आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

*****

 

 

 

Saturday 15 August 2020

कर्ज वाटपाच्या लक्षांकाची पूर्तता करण्यात यावी -डॉ. विश्वजीत कदम

नागपूर,  दि. 15 :  नागपूर जिल्हयातील कर्ज वाटपाच्या लक्षांकाची पूर्ण पूर्तता करण्यात यावी, असे प्रतिपादन सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.

          विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षामध्ये सहकार विभागातील अधिकाऱ्यांची कर्ज वाटपाच्या सद्यस्थितीबाबत डॉ.कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेतली,  त्यावेळी ते बोलत होते. विभागीय सहनिबंधक संजय कदम तसेच नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्हयांचे जिल्हा उपनिबंधक, कापूस पणन महासंघाचे अधिकारी, जिल्हा पणन अधिकारी उपस्थित होते.

          डॉ.कदम यांनी विभागातील सर्व जिल्हयातील कर्ज वाटपाचा यावेळी आढावा घेतला. ते म्हणाले, महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत कर्जमुक्त झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना नव्याने कर्ज वाटप होईल. नागपूर विभागातील सर्व राष्ट्रीयकृत बॅकांनीही पीक कर्ज वाटपाच्या लक्षांकाप्रमाणे मुदतीत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे. शासकीय कापूस खरेदी व शेतकऱ्यांची रक्कम चुकती करण्याबाबत कापूस पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे राहिलेले चुकारे लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा, अशा सूचना यावेळी दिल्यात.

          नागपूर विभागातील कर्ज वाटप व कर्जमाफीच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच विभागातील अडीअडचणी समजावून घेऊन त्याबाबत पुढील कार्यवाहीसाठी संबंधितांना निर्देश दिले.

 

****

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

           



          

        नागपूर,  दि. 15:  भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर त्यांनी सशस्त्र पोलिस दलाची मानवंदना स्विकारली.

            भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी यांनी स्वातंत्र्य सेनानी, ज्येष्ठ नागरिक तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

            अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, सुजाता गंधे, आशिष बिजवल, रविंद्र कुंभारे, विजया बनकर, शिवनंदा लंगडापुरे, पोलिस उपअधीक्षक संजय पुरंदरे, पोलिस निरिक्षक विकास तिडके, पोलिस उपनिरिक्षक मधुकर प्रधान, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे तसेच वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  

*****

 

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

नागपूर, दि. 15 : भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूती आर. के. देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

न्यायमूर्ती झेड. ए. हक, ए.एस.चांदूरकर, सुनील शुक्रे, मनिष पितळे, अविनाश घरोटे, विनय जोशी, एम.जी. गिरडकर यांच्यासह रजिस्ट्रार अंजू शेंडे, अमित जोशी तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

******