Monday 27 April 2020

‘सरकारी व खाजगी आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र इआर-1 सादर करावे’



            नागपूर, दि. 27 : केंद्र व राज्य शासनाचे  अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी रिक्त पदाचे त्रैमासिक विवरणपत्र ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. हे विवरण पत्र रोजगार विभागाच्या https://rojgar.mahaswayanm.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध  असून या संकेतस्थळाचा वापर विवरणपत्र भरण्यासाठी करावा, असे  आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
            विवरण पत्र सादर करताना इआर-1 या नमुन्याचा वापर करावा. प्रत्येक तिमाही संपल्यानंतर हे विवरण पत्र 30 दिवसांचे आत ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
            कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर लॉग ईन केल्यानंतर एम्प्लॉयर  (लिस्ट अ जॉब) वर क्लिक करुन  एम्प्लॉयर युजर आयडी व पासवर्ड वापरुन लॉग ईन करुन इआर रिपोर्टमध्ये इआर-1 या ऑप्शनवर क्लिक करुन तिमाही विवरणपत्र ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. तांत्रिक अडचण आल्यास nagpurrojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क करावा. 31 मार्च 2020 या तिमाहीअखेर वेतनपटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाच्या माहितीचे विवरणपत्र इआर-1 30 एप्रिलपर्यंत महास्वयम वेबसाईटवर ऑनलाईन सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र. गं. हरडे यांनी  केले आहे.
****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित



            नागपूर, दि. 27 : महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2018-19 व 2019-20 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. पुरस्काराचे स्वरुप व अर्हता पुढीलप्रमाणे आहे.
            राज्यस्तरीय पुरस्कार – रु 1,00,001/- रोख स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलीतमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्या महिला तो पुरस्कार मिळाल्याचे 5 वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
विभागीय पुरस्कार -  रु.,25,001/- रोख स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ महिला व बाल विकास क्षेत्रात संस्थेचे किमान 10 वर्षे कार्य असावे. नोंदणीकृत संस्थेस दलितमित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था राजकारणापासून अलिप्त असावे. तसेच तिचे कार्य व सेवाही पक्षातील व राजकारणापासून अलिप्त असावी.
जिल्हास्तरीय पुरस्कार -  रु.10,001/- रोख स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ महिला व बाल विकास क्षेत्रात संस्थेचे किमान 10 वर्षे सामाजिक कार्य असावे. ज्या महिलांना दलित मित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरसकार मिळालेला आहे, त्या महिलांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही.
            वरीलप्रमाणे अहर्ता असणाऱ्या इच्छुक व्यक्ती, संस्थांनी अहर्तेशी संबंधित खालील आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
पुरस्काराचे स्वरुप
अ) राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार
1) प्रस्ताव धारकाची माहिती व केलेल्या कार्याचा तपशील., वृत्तपत्र, फोटोग्राप्स इ., सध्या कोणऱ्या पदावर कार्यरत आहे., यापूर्वी पुरस्कार मिळाले आहे काय? असल्यास तपशील., यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाला असल्यास प्रस्ताव सादर करण्यात येवू नये., चारीत्र्य चांगले असलेबाबत, आपले विरुद्ध कोणताही फौजदारी तसेच सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे पोलीस विभागाचे प्रमाणपत्र.
ब) विभागीयस्तर पुरस्कार
1) संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल., वृत्तपत्र कात्रणे., संस्थेस यापूर्वी पुरस्कार मिळाले आहे काय ? असल्यास तपशील., संस्था नोंदणी प्रमाणपत्र व घटनेची प्रत., यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाला असल्यास प्रस्ताव सादर करण्यात येवू नये., चारीत्र्य चांगले असलेबाबत, आपले विरुद्ध कोणताही फौजदारी तसेच सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांचे व संस्था राजकारणापासून अलीप्त असल्याचे पोलीस विभागाचे प्रमाणपत्र.
            इच्छूक व्यक्ती, संस्थांनी विहित नमुन्यातील आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह आपला प्रस्ताव दोन प्रतीत ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाचे आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नविन प्रशासकीय इमारत क्रं. 2 सिव्हील लाईन, नागपूर या कार्यालयास सादर करावा. मुदतीनंतर येणाऱ्या प्रस्तावाचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही.
***


मध्य भारतातील पहिले मेडीकलचे कोविड हॉस्पिटल रुग्णांसाठी सज्ज



            नागपूर, दि. 27 : दिवसेंदिवस कोरना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरना संसर्गाला समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासन परिश्रम घेत आहे. याच प्रयत्नांतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात मेडिकलने पुढाकार घेतला असून मेडिकल मध्येच असलेल्या ट्रामा केअर सेंटरला 220 खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर कले आहे.  मध्यभारतातील पहिले कोविड रुग्णालय आजपासून रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे.  ट्रामा केयर सेंटरला कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, ट्रामा केअर सेंटरचे प्रमुख डॉ. प्रवीण पटनाईक, नोडल अधिकारी डॉ.मोहम्मद फैजल, बाधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. नरेश तिरपुडे, औषधी वैद्यकशास्त्र प्रमुख डॉ.राजेश गोसावी यांनी अहोरात्र परिश्रम घेत केवळ 10 दिवसात केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानगीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली असल्यामुळे हे कोविड रुग्णालय रुग्णांच्या सेवेत रुजू झाले.
विशेष म्हणजे या कोविड रुग्णालयात 60 खाटांच्या आयसीयू सोबत स्वतंत्र क्ष-किरण विभाग, स्वतंत्र शस्त्रक्रिया गृह, स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र रक्तसाठा केंद्र असणार आहे. मध्य भारतातील सर्व सोयींनी युक्त असे हे अत्याधुनिक पहिले कोविड रुग्णालय ठरले आहे. या रुग्णालयात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रुग्णांवरील उपचाराला 3 भागात विभागणी करण्यात आल असून यात कोरना लक्षणे नसलेल्यांसाठी कोविड केअर सेंटर, सामान्य लक्षणे असलेल्यांसाठी कोविड हेल्थ सेंटर तर गंभीर रुग्णांसाठी विशेष केअर सेंटर उभारण्यात आले आहे. कोविड हॉस्पिटल मधून कोरनाचा संसर्ग पसरू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून रुग्णांसाठी आणि डॉक्टरांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवण्यात आला आहे. रुग्णालयाच्या सर्व वार्डात रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी काचेचा विशेष कक्ष तयार करण्यात आल्याचे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा यांनी सांगितले आहे.
डायलिसिसवर असलेल्या रुग्णामध्ये कोरनाचे लक्षण आढळल्यास त्याच्या सोयीसाठी 3 डायलिसीस यंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर यांचे विशेष सहकार्य मिळाले. 
असे आहे कोविड हॉस्पिटल
ट्रॉमा केअरचे संपूर्ण ससज्ज इमारत कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत. * 60 आयसीयू बेड * 30 प्रिझमटीव्ह बेङ * संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड * कोरोनाबाधित रुग्णांसाठी 130 खाटांचे एचडीयू  * 40 व्हेन्टिलेटर * तीन डायलिसीस यंत्र * प्रत्येक खाटेजवळ ऑक्सिजन व सक्शन यंत्र * स्वतंत्र रेडिओलॉजी विभाग, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे. * सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग * रक्त तपासणी, रक्ताची साठवणूक व प्लाझ्मा स्टोरेज सुविधा. *  डॉक्टर व रुग्णांसाठी येण्या-जाण्याचा स्वतंत्र मार्ग.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड-19चे नोडल अधिकारी व ट्रॉमा केअर सेंटरचे प्रमुख डॉ.मोहम्मद फैजल, कोविड हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.पवित्र पटनाईक, वैद्यकीय अधीक्षक  डॉ.अविनाश गावंडे, डॉ.जयेश मुखी, डॉ.कांचन वानखेडे, डॉ.मनीष ठाकरे, डॉ.मेश्राम, डॉ.सोमा चाम व मेट्रन मालती डोंगरी यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.
संसर्ग पसरु नये याकडे विशेष लक्ष
कोविड हॉस्पिटलमधून संसर्ग पसरु नये यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. रुग्णांसाठी व डॉक्टरांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आहे.
            डॉक्टरांना बाहेर जाण्यासाठीही वेगळा मार्ग आहे. पीपीई किट घालण्याचा व तो काढण्याचा कक्षही वेगळा आहे. वॉर्डात रुग्णांवर देखरेख करण्यासाठी काचेचा कक्ष तयार करण्यात आला आहे.
                                        ** * * * **


कोरोना रुग्णांसाठी मेयो, मेडिकलमध्ये 1250 खाटांची सुसज्ज व्यवस्था



                        * सार्वजनिक बांधकाम विभागाचे विशेष नियोजन
                        * मेयोमध्ये 172 तर मेडिकलमध्ये 230 खाटांचा अतिदक्षता विभाग
                        * नागपुरात साकारले दोन समर्पित कोविड रुग्णालय
            नागपूर, दि. 27 :   कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी राज्याच्या उपराजधानीत 1 हजार 250 खाटां क्षमतेची दोन कोविड समर्पित विशेष रुग्णालये सुरु होत आहेत. कोरोनाग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावा यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील या विशेष रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष नियोजनामुळे अत्यावश्यक सुविधा असलेली ही सुसज्ज इमारत अल्पावधीत उभी झाली आहे.
            कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव सातत्याने वाढत असल्यामुळे अशा बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र व समर्पित कोविड रुग्णालय तयार करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने केलेल्या सूचनेनुसार मेयो व मेडिकल येथे अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेमध्ये बदल करुन अतिदक्षता विभाग, आयसोलेशन वार्ड तसेच ऑक्सिजन असलेली संपूर्ण व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्रीय सहभागामुळे अल्पावधीत पूर्ण झाली आहे. राज्यातील पहिले कोविड रुग्णालय जनतेच्या सेवेत दाखल झाले आहे.
            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना बाधित रुग्णांसाठी 230 खाटांचा अतिदक्षता विभाग व्हेंटीलेटरसह पूर्ण झाला असून 400 खाटांची क्षमता असलेला आयसोलेशन वार्ड सुद्धा तयार होत आहे. ट्रामा केअरची इमारत कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहे. येथील 50 आयसीयू बेड तसेच व्हेंटीलेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासोबत 212 एसडीयू बेड्सला ऑक्सिजन व सक्शनची सुविधा सुद्धा राहणार आहे. ही संपूर्ण इमारत कोविड रुग्णालासाठी सज्ज झाली आहे.
            इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे 172 खाटांचा अतिदक्षता विभाग व 394 खाटांचा एचडीयू (23 वार्ड) असलेले सर्जिकल कॉम्प्लेक्स इमारत कोविड रुग्णांसाठी विकसित करण्यात येत आहे. या संपूर्ण रुग्णालयाचे काम दिनांक 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करुन इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरित करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत वेगाने काम पूर्ण करुन या इमारतीमध्ये 600 बेडचे हॉस्पिटल पंधरा दिवसाच्या कालावधीत कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरित केले आहे.
            कोविड समर्पित रुग्णालयासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 120 खाटांचा अद्ययावत तीन मजली अतिदक्षता विभागाचे काम सुरु केले असून हा विभाग सुद्धा 30 एप्रिलपर्यंत हस्तांतरित करण्यात येत आहे. वार्ड क्रमांक 1, 2, वार्ड क्रमांक 11 ते 16, वार्ड क्रमांक 25 व 26 येथे 330 खाटांची क्षमता विकसित करण्यात येत आहे. हे काम 10 मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे 1250 खाटापैकी 262 खाटांचे काम रुग्णालय प्रशासनाला हस्तांतरित करण्यात आले असून 686 खाटांचे हस्तांतरण 30 एप्रिल रोजी व उर्वरित 330 खाटांची सुविधा 10 मे पर्यंत पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी दिली.
            कोविड समर्पित रुग्णांलयासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा तसेच विद्युत यंत्रणा निर्माण करण्यासाठी तसेच योग्य मांडणी केल्यानंतर या कामाची चाचणी घेऊन प्रमाणित करणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार व अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता राजकुमार जयसवाल, उपअभियंता डी.डी.रामटेके, प्रमोद वानखेडे, श्रीमती श्यांभवी चाचेरे, कंत्राटदार अभिजित सपकाळ, मिलिंद सोनी यांनी ही कार्यवाही पूर्ण केली आहे.
                                        ** * * * **

कोरोनामुक्त झालेल्या सहा नागरिकांना आज सुटी



                        *  डॉक्टरांनी टाळ्या वाजवून दिला निरोप

        नागपूर, दि. 27 :    कोरोना बाधित सहा नागरिकांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यशस्वी उपचारानंतर तसेच त्यांच्या दोन्ही तपासणीमध्ये कोरोना विषाणू आढळून न आल्याने आज सुटी देण्यात आली. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्याने टाळ्या वाजवून निरोप दिला.
            इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये जबलपूरचे चार, संतरजीपुरा व कामठी येथील सहा नागरिकांना 12 एप्रिल रोजी तपासणीमध्ये कोरोना विषाणू आढळून आल्यानंतर भरती करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांना आमदार निवास येथे कॉरान्टाईनमध्ये ठेवण्यात आले होते. 25 एप्रिल रोजी त्यांचे तपासणी केली असता व त्यानंतरही दुसऱ्यांदा तपासणी केली असता त्यांची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे आज त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
            मेयो रुग्णालयात कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भरती करण्यात आले असून या काळात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांने अत्यंत चांगल्या वातावरणात उपचार केले. त्यामुळेच कोरोनामधून बाहेर पडणे शक्य झाले. कोरोनाबाधित रुग्णांनी डॉक्टरांना संपूर्ण सहकार्य केल्यास कोरोनापासून सहजपणे बरे होऊ शकतो असे यावेळी त्यांनी सांगितले.
            यावेळी इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता अजय केवलिया, डॉ.सागर पांडे, मेडिसीन विभागाचे डॉ. पराते, कोविडच्या प्रमुख डॉ.राखी जोशी, डॉ. रवि चव्हाण आदी उपस्थित होते.

                                        ** * * * **

Saturday 25 April 2020

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कापूस खरेदी केंद्रे सुरू करा - रविंद्र ठाकरे



नागपूर, दि. 25 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी  उत्पादित केलेल्या कापसाची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कापूस खरेदी तत्काळ सुरू करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिल्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ही खरेदी करण्यात यावी असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील जिनीग प्रेसिंग मालकांची बैठक घेऊन कापूस खरेदीबाबत आवश्यक सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राबविण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात कापूस खरेदी केंद्रे बंद होती. परंतू केंद्र शसनाने  15 एप्रिलपासून कापसाची हमी भावाने पुन्हा खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी. जिल्ह्यात केंद्रीय कापूस खरेदी निगम (सीसीएय), महाराष्ट्राचे सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ, खासगी बाजार व थेट पणन खरेदीदार त्यांच्यामार्फेत खरेदी करण्यात येणार आहे.    
कापसाची खरेदी करतांना जिनींग प्रेसिंग परिसरात कापूस खरेदी व प्रक्रियेच्या कामकाजासाठी सेवक आणि मजूर यांची उपस्थित आवश्यक असल्याने त्या संदर्भात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यात यावे. एका दिवशी कमाल 20 वाहने किंवा बाजार समितीच्या क्षमतेनुसार येण्याजाण्यासाठी वाहनांना पास देण्यात यावे. हमी भावाने कापसाची खरेदी करणे बंधनकारक असून खासगी व्यापाऱ्यांना कोरोनासंदर्भात दिलेल्या सुधारित नियमानुसार अधिन राहून कापूस खरेदी करण्यात यावी.
कापसावरील प्रक्रिया झाल्यानंतर जिल्हाअंतर्गत व जिल्हाबाह्य सरकी - गाठीची वाहतूक करावयाची असल्यास परवानगी आवश्यक आहे. तसेच कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देणे बंधनकारक आहे असे जिल्हाधिकारी  श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले.
*****


चिमुकल्या सांज सोमकुंवरची वाढदिवसानिमित्त अनोखी भेट

                                     
नागपूर, दि. 25 :    वाढदिवस म्हणजे मौज मस्ती, छान छान कपडे पदार्थ, मित्र-मैत्रिणी पाहणे यांची चंगळ. मात्र चिमुकल्या सांज संजय सोमकुंवर हिचा  25 एप्रिल 2020 ला 10 वा वाढदिवस. या वाढदिवसाच्या दिवशी चिमुकल्या सांजने मोठ्यानांही लाजवेल, असा निर्णय घेवून आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करून  त्यासाठीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली. पालकमंत्री डॉ. नितीन राऊ यांच्याकडे  मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कोवीड 19 करीता दहा हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी  यांच्याकडे धनादेश सुपुर्द केला.

उद्योग व्यापाराच्या समस्यांबाबत शासन गंभीर - डॉ.नितीन राऊत



                            पालकमंत्र्यांचा उद्योजकांसोबत संवाद                                       
नागपूरदि. 25 :   लॉकडाऊन  मुळे उद्योग व  व्यापार क्षेत्राला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या लढाईत सर्वाचे योगदान महत्वाचे शासनाने उद्योग व व्यापार सुरू करण्यास काही प्रतिबंधात्मक उपायानंतर परवानगी दिली आहे. उद्योगाच्या अडचणी सोडण्यासाठी  निश्चित पाठ पुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. नितीन राऊन यांनी दिली.
चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडच्या सदस्यांशी  व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, उद्योग सहसंचालक अशोक धर्माधिकारी, सीएएमआयटी अध्यक्ष दिपेन अग्रवाल, महासचिव निकुंज तुराखिया व राज्याच्या विविध जिल्ह्यातून सीएएमआयटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
विजेचे दर, कामगारांचे पगार, उद्योगाला सवलत, छोटे व्यापाऱ्यांना पॅकेज, खेळते भांडवल, बँकेचे हप्ते व विमा संरक्षण हे आजच्या चर्चेतील महत्वाचे प्रश्न असून यातील 20 टक्के राज्य शासन तर 80 टक्के प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारितील आहेत. आपल्या अनेक मागण्यासंदर्भात राज्य शासन गंभीर असून या मागण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उद्योगमंत्री व पणनमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. लॉकडाऊन नंतरच्या अर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी व धोरण ठरवण्यासाठी सरकारने समिती बनविली आहे. या बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने आपल्या सूचनांचा यात समावेश करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे ते म्हणाले.    
बँकाचे हप्ते, एनपीए, जीएसटी आदी धोरणाबाबत केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा असे सांगून राऊत म्हणाले की, आपल्या भावना केंद्र सरकारपर्यत पोचविल्या जातील. 15 एप्रिल रोजी जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार उद्योग सुरू करण्यात यावेत. कामगारांचे समुपदेशन करून विश्वास संपादन करावा असे ते म्हणाले. कामगारांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेण्यात यावी. रेड झोन बाहेर उद्योग व्यापाऱ्यांला अधिकच्या सवलती देण्यावर शासन विचार करेल, असे ते म्हणाले. उद्योग व्यापार सुरू केल्यास आर्थिक परिस्थिती पूर्व पदावर येण्यास हातभार लागणार आहे. महत्वाचे उद्योग लवकर सुरू व्हावेत अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. या चर्चेत त्यांनी उद्योग, व्यापार व लघु उद्योजकांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.     
देशभरात 22 मार्च पासून लॉकडाऊन असल्यामुळे उद्योग व्यापार पूर्णपणे बंद आहेत. अशा परिस्थितीत उद्योग, व्यापारी, कामगार व मजूर अर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा कठिण प्रसंगी शासनाने उद्योगासोबत संवादाची व सहकाऱ्याची भूमिका घेतली आहे. अनेक दिवसापासून उद्योग ठप्प असल्यामुळे खेळते भांडवल कसे उभारावे व बँकेचा हप्ता कसा भरावा या  मोठ्या समस्या उद्योगासमोर आहेत. अशा वेळी शासनाने उद्योगांना सवलती देणे अपेक्षीत आहे. पेट्रोल आणि डिजेलचा जीएसटी मध्ये समावेश कारावा. कामगारांना येजा करण्यासाठी पासेस द्याव्यात, विज दरात सवलत द्यावी अशा सूचना सीएएमआयटी सदस्यांनी केल्या.  





कोरोनासंदर्भातील परिस्थिती नियंत्रणात - डॉ. नितीन राऊत





·         जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे
·         बाधित रुग्णांच्या आरोग्य सुधारणा प्रमाणात वाढ

        नागपूर दि. 25: कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या संख्येत देशात तसेच राज्यात सातत्याने वाढ होत असतानाच प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनामुळे तुलनेने प्रमाण नियंत्रणात आहे. सध्या ते 14 दिवसांवर आले असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बैठकीत दिली. हे जिल्हा प्रशासनाचे यश आहे. सद्यसि्थतीत नागपुरातील कोरोना रुग्णांची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
   पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे, अपर विभागीय आयुक्त अभिजित बांगर, मेडीकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. अविनाश गावंडे उपस्थित होते.
            आरोग्य सेवा सुविधा, कायदा व सुव्यवस्था, नागरी सुविधा, अन्नधान्य वाटप, कम्युनिटी किचन, उद्योगविषयक, अत्यावश्यक सेवांचा पालमकंत्र्यांनी तपशीलवार आढावा घेतला. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केंद्र शासनाच्या 15 आणि 24 एप्रिल रोजीच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील आस्थापना काही प्रमाणात सुरु करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे त्यांनी सांगितले.
            औद्योगिक वसाहतीमधील उद्योगधंदे, आस्थापना सुरु करण्यासाठी संबंधित उद्योजकांनी केंद्र शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन, त्यानुसार आराखडा तयार करावा. उद्योग सुरु करण्यापूर्वी सोशल डिस्टन्सिगचे काटेकोरपणे पालन करावे. कामगारांना वेळोवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ धुणे आणि मास्क वापरुनच आस्थापनांमध्ये प्रवेश द्यावा. महानगरपालिका, जिल्हा प्रशासनाकडून फक्त आस्थापनांचे मालक आणि मुख्य कार्य अधिकारी यांना स्वत:च्या जबाबदारी आणि सुरक्षेवरच ये-जा करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. मात्र कामगारांना औद्योगिक वसाहतींमध्येच राहणे तथा जेवणाची व्यवस्था करणे कंपनी मालकास अनिवार्य असेल, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिल्या.
क्वारंटाईन सेंटर सुरु करताना विश्वासात घ्या
कोरोना बांधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन केंद्रामध्ये 14 दिवस तपासणीसाठी ठेवण्यात येते. संपर्कातील व्यक्तींची संख्या वाढत असल्याने नवीन क्वारंटाईन सेंटर सुरु करताना प्रशासनाने लोकप्रतिनिधीला विश्वासात घ्यावे, अशी सूचना पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी या बैठकीत केली.
            विभागातील कोरोनावर नियंत्रण मिळविताना प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी तपशीलवार माहिती दिली. तसेच जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मनपा आणि जिल्हा प्रशासन योग्य समन्वय ठेवून काम करत असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. महानगरपालिका प्रशासनाकडून सतरंजीपुरा, मोमिनपुरा आणि कोरोनामुळे बाधित भागात करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी माहिती दिली. तर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच कोरोना विलगीकरण कक्षाभोवती असलेल्या पोलीस यंत्रणेबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली.
            मेडीकल आणि मेयोचे अधिष्ठातांनी कोरोना बाधितांची संख्या वाढू नये, यासाठी आरोग्य्‍ विभागाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, त्यासाठी सदैव तत्पर आरोगय यंत्रणा, आरोग्य सुविधा, उपलब्ध बेड्स, व्हेंटीलेटर्स, अतिदक्षता विभागाची आरोग्य प्रशासनाची असलेली तयारी याबाबत माहिती दिली. रमजान महिना सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारी करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिल्या.
*****

Friday 24 April 2020

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11 लाख रुपयांचा धनादेश

नागपूर दि. 24: हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट मोठा ताजबाग, नागपूर यांच्याकडून 11 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
     यावेळी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट मोठा ताजबागचे प्रशासक जी. एम. कुबडे, कार्यकारी सदस्य अमानउल्लाह खान, सामाजिक कार्यकर्ते सलीम खान, बुरझीन रंडोलिया उपस्थित होते.
******

Thursday 23 April 2020


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिन
साधेपणाने साजरा करणार      

नागपूर, दि. 23 : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात ‘महाराष्ट्र दिन’ साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे.
            राज्यातील मंत्रालय व सर्व जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच ठिकाणी सकाळी 8 वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावे. या ठिकाणी केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयातील पदाधिकारी / अधिकारी यांनीच फक्त उपस्थित रहावे. या ध्वजारोहण साहेळ्यास कोणत्याही मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये.
तसेच महाराष्ट्र दिन ध्वजारोहण सोहळ्यात कवायतीचे आयोजनही करण्यात येवू नये. विधिमंडळ. मा. उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्याच्या सूचाना शासनातर्फे देण्यात आल्या आहेत. ध्वजारोहण कार्यक्रमास पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, अशा जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. अशा सूचना शासन निर्णयाद्वारे निर्गमीत केल्या आहेत.
*****