Saturday 19 February 2022

आदिवासी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा - राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

नागपूर, दि. १९ : आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व घटकांनी प्रभावीपणे काम करणे आवश्यक आहे. अद्यापही अनेक योजना आदिवासींपर्यंत पोहचल्या नाहीत. दुर्गम भागातील आदिवासी गावे-तांडे, पाड्यापर्यंत शासकीय वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जनजागृती करावी, असे आदेश राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. नागपूर येथील अपर आदिवासी आयुक्त कार्यालयात श्री. तनपुरे यांनी बैठक घेतली. तुमसर विधानसभा मतदारसंघातील नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन आदी विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाचा राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांच्यासह उपायुक्त दशरथ कुळमेथे, सहायक आयुक्त नयन कांबळे, सहायक आयुक्त (वित्त) विलास कावळे, सहायक आयुक्त (शिक्षण) एम. एस. जोशी, नागपूरचे प्रकल्प अधिकारी अशोक वाहणे, अधीक्षक अभियंता उज्ज्वल डाबे आदी उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यातील तुमसर मतदारसंघातील वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजनांचा आढावा घेत ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा. शेतकऱ्यांना वैयक्तिक आणि सामूहिकपणे सौर पॅनल घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. या योजनेमुळे त्यांना दिवसा शेतीसिंचन करता येईल. पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी सौरकुंपण योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या. आदिवासी विकास विभागाच्या विविध वैयक्तिक योजनांचा आढावा घेताना श्री. तनपुरे यांनी ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना, भूमिहीन अनुसूचित जमातीच्या शेतमजूर कुटुंबासाठी स्वाभिमान व सबलीकरण योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, राजीव गांधी अपघात विमा योजना, अनु. जमातीच्या कुटुंबासाठी घरगुती गॅस संचचा पुरवठा योजनांचाही त्यांनी आढावा घेतला. सोबतच प्रशिक्षण योजनांही प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना केल्या. त्यामध्ये वाहन प्रशिक्षण, कंडक्टर प्रशिक्षण, सुरक्षागार्डचे प्रशिक्षण, प्लम्बरचे प्रशिक्षण, इलेक्ट्रोनिक, जैविक तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, एमएचसीआयटी प्रशिक्षण, पीएमटी प्रशिक्षणासोबतच संगणक टॅली प्रशिक्षण आदी योजनांवर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मानव संसाधन व संपत्तीच्या योजनांमध्ये हैण्डबॅगचे वाटप, शिलाई मशीन, पिको फॉल मशीन, दुचाकी सायकल, अपंगांना तिनचाकी सायकल, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत अनुसूचित जमातीच्या लोकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी कर्जरूपात बीजभांडवल देण्यात येते. तसेच महिलांच्या सबलीकरणासाठी आर्थिक मदत कर्जरूपात दिली जाते. या बीजभांडवल योजनेमध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी उपायुक्त श्री. कुळमेथे यांनी गौंडी पेंटिंग देऊन त्यांचे स्वागत केले. *****

आजपासून जिल्ह्यात कोविड निर्बंध शिथिल

· सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना 200 ची मर्यादा · लग्न समारंभ, सोहळे 25 टक्के क्षमतेने किंवा 200 व्यक्तींची मर्यादा · कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण बंधनकारक नागपूर, दि. 19 : राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन अधिनियमानुसार नागपूर जिल्ह्यात पहिल्या डोसचे 99 टक्के तर दुसऱ्या डोसचे 71 टक्क्यांवर कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाले आहे. तसेच कोविड पॉझिटीव्हीटी दरही तीनपेक्षा कमी झाला असल्यामुळे कोविड साथरोगाची परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे कोविड निर्बंध शिथिल करण्यासाठी जिल्हा पात्र ठरला असल्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष श्रीमती आर. विमला यांनी आजपासून नागपूर महानगरपालिका क्षेत्र वगळून कोविड निर्बंध शिथिल केले असल्याचे आदेश जाहीर केले आहेत. राष्ट्रीय उद्यान, सरकारी, बाग-बगीचे, प्रेक्षणीय, पर्यटनस्थळे, अम्युझमेंट पार्क, थीम पार्क, जलतरण तलाव, जल उद्याने, किल्ले व इतर मनोरंजन स्थळे, ब्युटी पार्लर, सलून, हेअर कटींग सलून, वेलनेस सेंटर, जीम, रेस्टारंट, हॉटेल, उपहारगृहे, सिनेमागृह, नाट्यगृह ही नियमित वेळेनुसार 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी कार्यक्रम, लग्न समारंभ, सोहळे नियमित वेळेनुसार 25 टक्के क्षमतेने किंवा 200 व्यक्ती यामध्ये जी संख्या लहान असेल त्यानुसार सुरु राहतील. अंत्यसंस्कारासाठीची मर्यादा काढून घेतली आहे. नियमितपणे करता येईल. क्रीडा क्रियाकलाप - प्रेक्षकांशिवाय, नियमित वेळेनुसार 50 टक्के क्षमतेने किंवा 200 व्यक्ती यामध्ये जी संख्या लहान असेल, शाळा व कॉलेज - शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे 20 जोनवारीचे व उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे 25 जानेवारी 2022 च्या शासन परिपत्रकानुसार तसेच आठवडी बाजार नियमित सुरु राहतील. या सर्व ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या भेटी देणाऱ्या सर्व अभ्यागतांचे, येणाऱ्या नागरिक, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांचे तसेच खेळाडू व व्यवस्थापकांचे पूर्णपणे लसीकरण करणे अनिवार्य असेल. कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर संबधीत नियंत्रित अधिकाऱ्यांनी, व्यवस्थापकांनी कोविड संसर्ग, प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने व कोविड योग्य वर्तनाची अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे श्रीमती आर. विमला यांनी आदेशात म्हटले आहे. हे आदेश नागपूर जिल्ह्यासाठी (महानगर पालिका क्षेत्र वगळून) पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. *****

Monday 14 February 2022

जागतिक पर्यटक विदर्भाकडे वळेल असे नियोजन करा - आदित्य ठाकरे

 नागपूर जिल्ह्याच्या पर्यटन आढावा बैठकीत विविध प्रस्तावांवर चर्चा नागपूर, दि.14 : नागपूर आणि विदर्भामध्ये विपूल वनसंपदा, वाघासारख्या वन्यजीवांची वाढती संख्या, विस्तीर्ण खाणी, मोठे जलसाठे, ऐतिहासिक धार्मिक स्थळे, रस्ते आणि सर्व प्रकारच्या वाहतुकीचे जाळे उपलब्ध आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या पर्यटनाला पूरक अशा प्रस्तावांचे नियोजन करा. पर्यटक चार दिवस नागपूर विदर्भात थांबेल अशा समन्वयाचे नियोजन करा, अशी सूचना राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणातील बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे केली. नागपूर जिल्ह्याच्या पर्यटन आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, अभिजित वंजारी, राजू पारवे, नरेंद्र बोंडे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी आर.विमला, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक पुरातत्वविद् विजयकुमार नायर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई, राज्य पूरातत्व विभागाच्या जया वाहने यासह पर्यटन, पर्यावरण विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी चंद्रपूर येथे भेट दिली. त्यानंतर आज नागपूर येथे सकाळी नांदगाव येथील फ्लॅयॲश पाँडची पाहणी केली. त्यानंतर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पर्यटन विकासाबाबत चर्चा केली. विदर्भाकडे प्रेक्षणीय, ऐतिहासिक, अध्यात्मिक असे अनेक पर्यटनस्थळ आहेत. यामध्ये उत्तम समन्वय आवश्यक आहे. कोणताही प्रकल्प बघण्यासाठी जागतिक पर्यटक एका दिवसांसाठी येणार नाही. तो काही दिवस येथे थांबला पाहिजे. त्यामुळे देशाचे नव्हे जगाचे टायगर कॅपिटल, विस्तीर्ण खाणी, विपुल जनसंपदा यासोबत आणखी काही भव्यदिव्य बघण्याची अपेक्षा पर्यटकांना असते. त्यामुळे पर्यटनातील सर्व घटकांचा सेतू बांधून उत्तम प्रस्ताव तयार करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी त्यांनी नागपुरात जंगल सफारीसोबतच ‘हेरीटेज वॉक’ आयोजित करण्याबाबतही सांगितले. या बैठकीत ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पर्यटन विकासाबाबत जिल्ह्याला वाढीव निधी उपलब्ध करण्यात यावा. मध्यप्रदेशच्या धर्तीवर युको टुरीजमचा विकास करण्यात यावा. विदर्भातील पर्यटनाचे मुंबई व राष्ट्रीय स्तरावर ब्रॅडींग आणि मार्केटींग करण्यात यावे. गोरेवाडा प्रकल्पातील उर्वरीत कामे तातडीने पूर्ण व्हावीत. रामटेक परिसरातील अंभोरा येथे धार्मिक पर्यटनाचा प्रस्तावाला तातडीने मान्यता द्यावी. अंभोरा ते पेंच प्रकल्प क्रूझ व हाऊसबोट प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी केली. खासदार कृपाल तुमाने यांनी खाण पर्यटनाला विदर्भात वाव असून त्यासाठी नव्याने विभागाने तयारी करण्याची मागणी केली. आमदार आशिष जयस्वाल यांनी पर्यटनाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यासोबतच सर्व ठिकाणी प्लॅस्टीक बंदीबाबत धोरणात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या सर्व प्रस्तावांवर सकारात्मक विचार करण्याचे तयांनी स्पष्ट केले. विदर्भात पर्यटन विकासाची क्षमता आहे. त्यामुळे निश्चितच पर्यटनाला चालना मिळेल असेही त्यांनी सांगितले. 00000

विमान उड्डाण क्षेत्रात विदर्भातील युवकांना नवीन संधी उपलब्ध - आदित्य ठाकरे

v वैमानिक प्रशिक्षणाचा प्रारंभ v नागपूर उड्डाण क्लबला आवश्यक सुविधा देणार नागपूर, दि.14 : नागपुरातील उड्डाण क्लबची गौरवशाली परंपरा असून हा क्लब पुनरुज्जीवित झाल्यामुळे विदर्भातील युवकांना विमानउड्डाण प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. नागरी उड्डाण क्षेत्रात जागतिक स्तरावर निर्माण होत असलेल्या विविध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात असलेल्या नागपूर उड्डाण क्लबच्या हॅंगरमध्ये वैमानिक प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष प्रारंभ श्री. ठाकरे यांचे हस्ते झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत होते. यावेळी मदत व पुनर्वसन तसेच इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार कृपाल तुमाने, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आमदार आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त तथा नागपूर उड्डाण क्लबच्या अध्यक्ष प्राजक्ता लवंगारे-वर्मा, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी आर. विमला, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे आदी उपस्थित होते. नागपूर उड्डाण क्लब हा पुनरुज्जीवित होवून प्रशिक्षणासाठी पुन्हा उपलब्ध झाला आहे. मध्य भारतातील सर्वात गौरवशाली असलेला हा क्लब भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा कार्यान्वित होत असल्याचे सांगताना आदित्य ठाकरे म्हणाले की, येथील युवकांना विमान उड्डाणाच्या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांच्या पंखांना हा क्लब बळ देणार असून या क्षेत्रात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या युवकांसाठी नवे दालन खुले झाले आहे आणि युवक सुद्धा भरारी घेण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, नागपूर उड्डाण क्लबची स्थापना 1947 मध्ये झाली असून या क्लबने भारताला व जगाला अनेक वैमानिक दिले आहेत. मध्यंतरी उड्डाण क्लब बंद झाल्यामुळे शासनाने स्वतःच्या नियंत्रणाखाली आणून परत सुरु करण्याचा प्रयत्न केला. आज या क्लबच्या प्रत्यक्ष उड्डाणाला सुरुवात होत आहे. नागपूर उड्डाण क्लब येथे प्रशिक्षणार्थीसाठी पायाभूत सुविधा तसेच मध्य भारतातील सुसज्ज अशी प्रशिक्षण संस्था निर्माण व्हावी, यादृष्टीने शासनाने 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील युवकांना वैमानिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाज्योतीकडून 20 विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून या क्लबला अडीच कोटी रुपये निधी सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. चंद्रपूर येथे सुद्धा उड्डाण क्लब सुरु करण्यासाठी डीजीसीएची परवानगी घेण्यात येत असून येथे व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणाला सुद्धा सुरुवात होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. प्रारंभी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वैमानिक प्रशिक्षणाचा प्रारंभ केला. तसेच येथे बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले. नागपूर उड्डाण क्लबच्या अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी स्वागत करून नागपूर उड्डाण क्लब वैमानिक प्रशिक्षणासाठी सज्ज असून क्लबकडे प्रशिक्षणासाठी चार विमाने आहेत. या क्लबने आतापर्यंत देशाला बरेच वैमानिक दिले आहेत. उड्डाण क्षेत्रातील करिअरच्या संधी तसेच युवकांची या क्षेत्रातील आवड लक्षात घेता, वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. या क्लबमध्ये आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे प्रशिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमएडीसीने 5.97 एकर जागा नवीन हँगर बांधकामासाठी उपलब्ध करून दिली असून यामध्ये मल्टीइंजिन विमान, दोन सी-प्लेन, हेलिकॉप्टर आणि सिम्युलेटर ठेवण्याचा देखील प्रस्ताव आहे. यासाठी 20 कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आभार प्रदर्शन व संचालन सहायक आयुक्त मनोहर पोटे यांनी केले. *****

प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात छात्रसेनेची कामगिरी अभिमानास्पद - क्रीडामंत्री सुनील केदार

नागपूर, दि. 14 : राष्ट्रीय छात्रसेनेच्या 20 व्या महाराष्ट्र बटालियनने प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील पथसंचलनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळविला ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची, सन्मानाची आणि स्वाभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गगार क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले. या पथसंचलनात सहभागी झालेल्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या 20 व्या महाराष्ट्र बटालियनचे सात कॅडेट सहभागी झाले होते. क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित‌ कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रूप कमांडर कँप्टन एम. कलीम, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, छात्रसेना कमांडट्सचे प्रशिक्षक कश्मीर सिंह आदी यावेळी उपस्थित होते. दरवर्षी दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनात सहभागी होऊनही हा सन्मान राज्याला हुलकावणी देत होता. यावर्षी मात्र पथसंचालनात प्रथम क्रमांक मिळवून एनसीसीने राज्याचे नाव उंचावले. नागपुरातील सात कॅडेट्सकडून प्रेरणा घेत अनेक छात्रसेना कॅडेट्सनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी एनसीसीला आवश्यकता असल्यास सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन श्री. केदार यांनी दिले. क्रीडा क्षेत्रात विविध संस्थांची कामे सुरु आहेत. या क्षेत्रात नागपूरचा अमिट ठसा उमटविण्यासाठी विविध प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात येत असून, येथे घोडेस्वारी प्रशिक्षण संस्थेचे काम सुरु आहे. तसेच भविष्यात एअर मॉडलिंग शो आयोजित करणार असल्याचे क्रीडामंत्र्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय छात्रसेना कॅडेटमध्ये सहभागी होण्याची वेगळी मजा असते. येथे जीवनाला शिस्त लागते आणि आयुष्यभरासाठी स्वयंशिस्तीचे धडेही शिकण्यासाठी ही फिल्ड महत्त्वपूर्ण भूमिका निभावते, असे सांगत महाराष्ट्र छात्रसेनेतील कँडेट्सची संख्या यापुढेही वाढेल, असा विश्वास श्री. केदार यांनी व्यक्त केला. सुभेदार जसपाल सिंह, नायब सुभेदार भारत सिंह, बटालियन हवालदार किरण केएस, हवालदार एम.व्ही. प्यारेलाल, कुलबीर सिंह, अवतार सिंह, अमित मेमाने, मेंगडे निवृत्ती यांच्यासह अशोक कुमार, सत्पालसिंह यादव, संदीप कुमार भाईटा, प्रवीण सोरते, सिनिअर अंडर ऑफिसर प्रिया मिश्रा, ओम झाडे, तृषाली कुथे, मनीष वावरे, मयंक चिंचुलकर, हर्ष पुरी, ज्युनिअर अंडर ऑफिसर श्रुती ओझा यांचा मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रूप कमांडर कॅप्टन एम. कलीम यांनी केले. तर सूत्रसंचालन तस्वीन दुजावाला हीने केले. ****

विकास आणि पर्यावरण हातात हात घालूनही पुढे जाऊ शकतात - आदित्य ठाकरे

v ‘माझी वसुंधरा' ही मोहीम अभियान व अभियानातून सवय व्हावी v ‘माझी वसुंधरा' मोहीमेचा विभागीय आढावा नागपूर, दि. 14 : पर्यावरण संवर्धन करतांना विकासाला खोळंबा होतो हा गैरसमज आहे. अनेक प्रकल्प उत्तम समन्वयातून यशस्वीरित्या साकारले आहे. त्यामुळे योग्य नियोजनातून व राजकीय तसेच अन्य व्यासपीठांवर पर्यावरण विषयक चर्चा घडवून आणल्यास मार्ग निघू शकतो. विकास आणि पर्यावरण हातात हात घालूनही पुढे जाऊ शकतात, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणातील बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात ‘माझी वसुधंरा’ या मोहिमेचा विभागीय आढावा आज त्यांनी घेतला. या आढावा बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, ‘माझी वसुधंरा’ अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे, विभागातील सहाही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर व चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नगर प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त संघमित्रा ढोके यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. पर्यावरणातील बदल बघता, पडसाद आपल्या दारात उमटायला लागले आहे. त्यामुळे पर्यावरण विषयक तात्काळ प्रतिसाद देण्याची हीच वेळ आहे. पुढच्या पिढीसाठी नाही तर आता आपल्या स्वत:साठी काम करण्याची गरज आहे. डोळसपणे काम केल्यास विकासाच्या आड पर्यावरण येत नाही. सुरुवातीला अडथळा म्हणून बघणाऱ्या विभागाचे माझी वसुधंरा अभियानामुळे महत्व बदलले आहेत. त्यामुळे आता माझी वसुधंरा मोहिमेचे अभियान झाले आहे. लोकसहभागातील या अभियानाला प्रत्येक नागरिकांची सवय बनविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी उत्तमपणे काम करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पर्यावरण संरक्षणासाठी जागृती, निर्धारण आणि प्रतिसाद या त्रिसृत्रीचा वापर करणे आवश्यक आहे. समस्येच्या मूळापर्यंत जाऊन निराकरण करणे आवश्यक आहे. पर्यावरण विषयाची चर्चा आता घरा-घरात झाली पाहिजे. संकट दारावर आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या राजकीय व्यासपीठावरही चर्चा झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. नागपूर विभागाने या अभियानात अतिशय उत्तम काम केले आहे. त्यामुळे विभागाच्या टीमकडून आणखी अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या दूरदृष्टीमुळे या विभागाची ओळख बदलली आहे. ‘माझी वसुधंरा’ या अभियानातील सहभागाने हे अभियान लोकचळवळ झाले आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने हे अभियान आपल्या महत्वपूर्ण योजनेत समाविष्ट केल्यास प्रत्येक जिल्ह्यांमध्ये लक्षणीय कामे होऊ शकतात. त्यामुळेच उंच उडी मारण्याची स्पर्धा आम्ही अभियानात ठेवली आहे. काही कामे अधिकाऱ्यांच्या आयुष्यात स्वत:साठी असतात. त्यामुळे स्वत:चे समाधान म्हणून या अभियानाकडे लक्ष वेधा. नागपूर विभाग माझी वसुधंराच्या दुसऱ्या पर्वात पहिल्या तीनमध्ये नक्कीच असले पाहिजे, असे नियोजन करा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. तत्पूर्वी ‘माझी वसुधंरा’ अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे यांनी अभियानासंदर्भात राज्यस्तरीय माहिती दिली. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी विभागातील अभियानाअंतर्गत झालेल्या कामाचा आढावा सादर केला. तर प्रत्येक जिल्ह्यातील अभिनव प्रयोगाची माहिती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त संघमित्रा ढोके यांनी केले. 00000

नांदगाव, वारेगाव येथील तलावामध्ये राख सोडणे कायमस्वरूपी बंद करणार - आदित्य ठाकरे

·नांदगाव तलावाची पाहणी, ग्रामस्थांशी चर्चा ·शाश्वत विकासासह पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न नागपूर, दि. 14 : खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रामधील राख नांदगाव व वारेगाव तलावात टाकण्यात येत असल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळे या दोन्ही तलावात राख टाकणे कायमचे बंद केले जाईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. नांदगाव येथील ग्रामस्थांशी चर्चा व ॲश पाँडची पाहणी यावेळी त्यांनी केली. खासदार कृपाल तुमाने, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आमदार आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी आर. विमला, महाजेनकोचे संचालक चंद्रकांत थोटवे, कार्यकारी संचालक प्रकाश खंडारे, एस. एम. मारुठकर, एन. एस. वाघ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक व्ही. एम. मोरघरे, प्रादेशिक अधिकारी अशोक करे, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यावेळी उपस्थित होते. नांदगाव तलावात राख टाकल्यामुळे जल व वायू प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून आल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याचा आढावा घेतला. यामध्ये राखेमुळे प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तलावात राख टाकणे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, येथील प्रत्यक्ष परिस्थिती व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे श्री. ठाकरे यांनी नांदगाव येथील ग्रामस्थांशी बोलताना सांगितले.प्रदूषण रोखण्यासाठी नांदगाव तलावात राख टाकणे कायमचे बंद केले जाईल. ही राख वाहून आणणारी पाईपलाईन काढून टाकण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सध्या टाकण्यात आलेली राखही तातडीने उचलण्यात येईल. केंद्र सरकारच्या नियमांनुसार शंभर टक्के फ्लाय अॅशचा वापर रस्ते बांधकामासह इतर पायाभूत प्रकल्पांसाठी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. याबाबत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि महाजेनकोची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल. विकास कामांसोबतच पर्यावरणाचे संरक्षण सुद्धा महत्वाचे आहे. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे श्री. ठाकरे यांनी फ्लाय ॲश पाँडच्या पाहणीप्रसंगी सांगितले. नांदगावमधील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. तसेच या परिसरातील कोळसा वाहतूक बंदिस्त वाहनातूनच होईल, याची दक्षता घ्यावी. नांदगाव तलावासाठी जमिनी अधिग्रहित केलेल्या प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत. त्यासाठी आराखडा तयार करावा. बचतगटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जावा, असे श्री. ठाकरे यावेळी म्हणाले. औष्णिक विद्युत प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा अभ्यास करून हे प्रदूषण कमी करण्यासाठी व्यापक अभ्यास होणे आवश्यक आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी राज्यातील सर्व वीज प्रकल्पांचे प्रदुषणासंदर्भात ऑडीट करण्यात येईल. तसेच निर्धारित मानकांची पूर्तता करण्याला प्राधान्य दिले जाईल. असे श्री. ठाकरे यांनी सांगितेल. *****

Wednesday 9 February 2022

सामान्य नागरिक हाच महसूल प्रशासनाचा केंद्रबिंदू - श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा

नागपूर, दि. 9 : महसूल प्रशासन संगणकीकृत होत असून त्या अंतर्गत येणाऱ्या सेवा नागरिकांना जलद व घरबसल्या मिळाव्यात, यासाठी आवश्यक बदल होत आहेत. सामान्य नागरिक हा महसूल प्रशासनाचा केंद्रबिंदू असून त्यांना जलद गतीने सेवा मिळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे, असे विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज सांगितले. हिंगणा येथे आयोजित फेरफार अदालतीमध्ये श्रीमती लवंगारे-वर्मा बोलत होत्या. जिल्हाधिकारी आर. विमला, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, उपजिल्हाधिकारी शिवनंदा लंगडापुरे व तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर आदींची यावेळी उपस्थिती होती. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा व जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात फेरफार अदालत घेण्यात आली. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत आयोजित करण्यात येत आहे. नागरिकांना त्यांचे जमिनीचे फेरफार व इतर अनुषंगिक नोंदी अद्ययावत करून घेण्याबाबत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आवाहन केले. तसेच मंडळ अधिकारी व तलाठीस्तरावर फेरफार विहित कालावधीत निकाली काढण्याबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या. सामान्य नागरिकांचे विहित कालावधी पूर्ण झालेले फेरफार यावेळी मंडळ अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करण्यात आले व अर्जदारास फेरफारची नोंद झालेल्या अद्ययावत सातबाराचे वाटप करण्यात आले. *****

Tuesday 8 February 2022

‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ वर विकासकामांची माहिती

· द्विवर्षपूर्तीनिमित्त विशेष उपक्रम नागपूर, दि. 8 : राज्य शासनाने दोन वर्षात केलेली विविध विकासकामे आणि योजनांची माहिती रेल्वेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी पाच विशेष गाड्यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर–गोंदिया ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ वरही आकर्षक पद्धतीने योजनांची माहिती देण्यात आली आहे. या गाडीचे आज दुपारी नागपूर रेल्वेस्थानकावर आगमन झाले. ‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’, ‘दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची’ या घोषवाक्यांसह योजनांची माहिती देण्यासाठी रेल्वेचा वापर करण्यात आला असून, त्यामध्ये गोंडवाना विद्यापीठात पदव्युत्तर अभ्‌यासक्रम आणि डाटा सेंटर सुरु केल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भविष्य उजळणार आहे. पर्यावरणपूरक प्रवासाला राज्य शासन प्राधान्य देत असून, विद्युत बस सेवेत वाढ होणार आहे. परिणामी राज्यातील प्रदूषणाला आळा बसणार आहे. राज्य शासनाने मुंबईतील ‘आरे’ जंगलामध्ये वृक्षांसाठी 808 एकर क्षेत्र आरक्षित झाले असून वनसंपदेचे रक्षण झाल्याची माहिती राज्यातील जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे. समृद्ध शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी राज्य शासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे असून, गतवर्षी चक्रीवादळबाधित फळबागांसाठी पुनर्लागवड व पुनरुज्जीवन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच कोरोना महामारीमध्ये पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाच लाखाची मुदत ठेव योजना सुरु करण्यात आली असल्याचा संदेशही देण्यात आला आहे. चिंतामुक्त शेतकरी, मोफत सातबारा आता दारी येणार, ई-पीक पाहणी या योजनांनाही येथे प्राधान्य देण्यात आले आहे. सोबतच युवकांमध्ये कौशल्य निर्मिती व्हावी, त्यांच्या हाताला काम मिळावे, त्यासाठी जिथे ‘सारथी’ तिथे प्रगती, क्षमता आणि कौशल्य, वृद्धीसाठी शिक्षण- प्रशिक्षण आदींची माहिती देण्‍यासोबतच ‘माझी वसुंधरा’ आणि संयुक्त राष्ट्र हवामानबदल परिषदेत पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्यामुळे आश्वासक नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच कोकणातील समुद्रकिनारे, येथील पर्यटन वाढीस राज्य शासन चालना देत असून, येथे देश - विदेशातून पर्यटकांना आकर्षित करण्यासोबतच त्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर विमानसेवेचा प्रारंभ झाल्याचाही उल्लेख आहे. राज्यात शेती, क्रीडा, सामाजिक इत्यादी क्षेत्रात राज्य शासनाचे विविध उपक्रम सुरू केले आहेत. दोन वर्षांत राज्य सरकारने अनेक विविध विकासकामे केली आहेत. राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचावी, यासाठी दि. 1. फेब्रुवारी ते दि. 2 मार्चदरम्यान एक महिना हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. अजनी, नागपूर मुख्य रेल्वेस्थानकावर आणि पुढे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ही विशेष रेल्वेगाडी संदेश पोहचविणार आहे. कोल्हापूर ते नागपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेवर दिलेल्या विविध योजना, विकासकामांच्या आदीं संदेशाचे कौतुक केले. *****

महिलांच्या सक्षमीकरणासोबतच सुरक्षित वातावरणही महत्वाचे - प्राजक्ता लवंगारे-वर्मा

·
महाराष्ट्र राज्य सुधारित महिला धोरणाच्या मसुद्यावर चर्चा · विभागस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक नागपूर, दि. 08 : महिलांचे आरोग्य, सक्षमीकरणासोबतच सुरक्षिततेलाही प्राधान्य असायला हवे. राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध झाला असून सुधारित महिला धोरण कसे असावे, यासंदर्भात नागरिकांनी आपले अभिप्राय कळविणे आवश्यक आहे. यासंदर्भात चर्चा करूनच धोरण ठरविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य सुधारित महिला धोरणाच्या अनुषंगाने विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, महिला व बाल विकास उपायुक्त आर. एच. पाटील, शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार तसेच विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या प्रारूप आराखड्यावर प्रत्येक विभाग प्रमुखांचा अभिप्राय महत्वाचा असल्याचे सांगताना विभागीय आयुक्त म्हणाल्या की, राज्याचे सुधारित महिला धोरण येत्या 8 मार्च रोजी म्हणजेच जागतिक महिला दिनी जाहीर करण्याचे विचाराधीन आहे. या धोरणाचा मसुदा महिला व बाल कल्याण आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जनतेसाठी उपलब्ध आहे. सुधारित महिला धोरण कसे असावे, यासंदर्भात सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या सूचना व अभिप्राय कळविण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. महिलांबद्दल असलेला समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी व महिलांना सन्मानाची, समानतेची वागणूक मिळावी, यादृष्टीने स्त्री-पुरुष समानता हे धोरण अधिक प्रभावीपणे राबविताना शालेय जीवनापासूनच मुलांवर संस्कार आवश्यक आहेत. बांधकामासह विविध क्षेत्रात काम करत असलेल्या महिलांच्या सुरक्षेसोबतच कामाच्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या मुलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे, तसेच बालकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण व्हाव्यात, यादृष्टीने असलेले कायदे अधिक परिणामकारक कसे होतील, यादृष्टीने विचारमंथन आवश्यक असल्याचेही विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले. महिलांच्या संदर्भातील योजनांची अंमलबजावणी विविध विभागांकडून करण्यात येते. या सर्व योजनांचा एकत्रित लाभ मिळावा, यादृष्टीने संपूर्ण योजनांचा एकत्रित आढावा घेताना आरोग्य, पोषण, रोजगार, स्वयंरोजगार आदी महिला सक्षमीकरणा संदर्भात एकत्रित लाभ देणारी यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. महिलांमध्ये आरोग्य विषयक अनेक प्रश्न असतात. यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील महिला यांना योजनांची योग्य माहिती मिळावी. तसेच त्यांच्या संदर्भात असलेल्या सुरक्षाविषयक कायद्याची सुद्धा संकेतस्थळ अथवा टोल फ्री हेल्पलाईनच्या माध्यमातून मदत उपलब्ध होईल, आदीबाबतही विविध सूचना करण्यात आल्या. महिलाविषयक योजनांची विशेषतः आरोग्यविषयक प्रश्नांसंदर्भात महिलांमध्ये असलेली अनास्था दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला स्वयंसहाय्यता बचतगटांचा सहभाग महत्वपूर्ण ठरणार आहे. ग्रामीण भागात आरोग्यविषयक येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आशा स्वयंसेविकासोबतच महिला बचतगटांकडे ही जबाबदारी सोपविल्यास सर्वसामान्य महिलांचे आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्याला मदत होईल, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले. आर्वी येथे नुकत्याच घडलेल्या घटनेचा संदर्भ बघता अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर पीसीपीएनडीटी या प्रसूतीपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यासंदर्भात असलेली यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. या कायद्यात त्रुटी राहणार नाहीत व अधिक सक्षमपणे कायद्याची अंमलबजावणी होईल, त्यासोबतच जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद या कायद्याला मिळेल, यादृष्टीने प्रभावी व परिणामकारकता निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुंभेजकर म्हणाले. सुधारित महिला धोरणाच्या मसुद्यावर विविध विभाग प्रमुखांनी आपले अभिप्राय यावेळी नोंदविले. प्रारंभी महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त आर. एच. पाटील यांनी सुधारित महिला धोरण 2022 चा मसुदा बैठकीत सादर केला. या मसुद्यावर महिला अधिकाऱ्यांनी सुद्धा उपयुक्त सूचना केल्या. सांख्यिकी अधिकारी रुपाली कुकडकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे, विधी सल्लागार सुवर्णा धानकुटे आदी यावेळी उपस्थित होते. ooooo