Sunday 28 August 2016

मेयोचा कायापालट करणार -चंद्रशेखर बावनकुळे

  • 8 लाख 84 हजार बाहय रूग्णांवर उपचार
  • मेयातील अतिक्रमणे तातडीने हटविणार
  • सी.टी.स्कॅन एम आय आर साठी 17.50 लाखांची तरतूद करणार
  • अपंगांच्या प्रमाणपत्रासाठी जिल्हयात शिबीरे
  • सिकल शेल व मानसिक विभाग सूरू करणार
  • मेयोत वाकीटॉकी व सीसी टीव्ही कार्यान्वित
  • पाळणा घर बांधणार    
नागपूर दि. 25 : - मेयो हॉस्पीटलचा विकास करण्यासाठी शासन व डीपीसीतर्फे  जी मदत आवश्यक आहे. ती तातडीने करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.
इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयात अभ्यागत मंडळांच्या सभेत पालकमंत्री चेद्रशखर बावनकुळे यांनी कामाचा आढावा घेतला.त्यावेळी ते बोलत होते. या वेळी अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार विकास कुंभारे,आमदार सुधाकर देशमुख,आरोग्य शिक्षण सहसंचालक डॉ प्रकाश वाकोडे, अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी (वहाने) गजभिये, डॉ. उमेश शिंगणे व इतर सदस्य उपस्थित होते.
मेयोतील  रूग्णांवर चांगले उपचार होत आहे.जूलै अखेरपर्यंत 8 लाख 84 हजार बाहय रुग्णांनी उपचार करून घेतले आहे. यात अजून भर पडावी आरोग्य सेवेचा जास्तीत जास्त रूग्णांना फायदा व्हावा यासाठी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
सी.टी स्कॅन, एम आर आय,व एम सी आय मानकानूसार रूग्णसेवा व राजीव गांधी जीवनदायी योजना प्रकरणात अत्यावशक चाचण्यांसाठी लागणारा 17 कोटी 50 लाख रुपयाच्या निधीची येत्या डिसेंबर अखेरपर्यंत अर्थसंकल्पात तरतूद होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यात सी.टी स्कॅन साठी 7 कोटी 50 लाख व एम आर आय साठी 10 कोटी लागतील असेही पालकमंत्री म्हणाले.
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची 96 क्वार्टस तातडीने तोडण्यात यावी  यासाठी पोलीस सुरक्षा पूरविण्यात येईल. सोबतच राज्य सुरक्षा मंडळाकडून आवश्यक सुरक्षा कर्मचाऱ्यांची मागणी नोंदवावी.त्यांच्यावर होणाऱ्या खर्चाची तरतूद डीपीसीच्या निधीतून करण्यात येईल असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्याकडून प्राप्त 17.60 लक्ष रूपयाचे अनूदान परत देण्यात येईल या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात यावे. तसेच मेयो इस्पितळात बगीचा निर्मिती करण्यासाठी नासूप्र अध्यक्षाना भेटावे
असे निर्देशही पालकमंत्र्यांनी अधिष्ठात्यांना दिले.
अपंग प्रमाणपत्रासाठी जिल्हयात शिबीरे
ग्रामीण भागातील अपंगांना अपंगत्वाचा दाखला मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हयात तालुकास्तरावर शिबीर आयोजित करण्यात येतील. जिल्हा शल्य चिकित्सकांनी या कामी पुढाकार घेवून शिबीराच्या तारखा निश्चित कराव्यात असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मेयो हॉस्पीटल परिसरात प्रतिक्षालय व सूलभ शौचालय विकास आराखडयानुसार राखून ठेवलेल्या जागेवर बांधावे. पुढील वर्षी होणाऱ्या गोल्डन ज्युबिली समारंमाची तयारी आतापासूनच सूरू करावी असेही बैठकीत सूचविण्यात आले.इंदोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात सिकलसेल युनिट,तसेच मेयोमध्ये मानसिक रूग्ण विभाग सूरू करण्यासाठी जागाउपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
मेयोच्या विकासासाठी शासनाकडे सादर केलेल्या सर्व प्रस्तावाची माहिती घेवून आपला प्रतिनिधी मंत्रालयात पाठवावा. शासन स्तरावरील सर्व प्रस्तावाच्या पाठपूरावा करण्यात येईल असेही पालकमंत्री  म्हणाले.सध्या मेयोमध्ये 96 सी.सी. टि. व्ही. बसविले आहेत. अजून 56 बसवायचे आहे. सोबतच उर्वरित वॉकीटॉकीसाठी आवश्यक परवाना पोलीस आयुक्तांकडून मिळवून घ्यावा. यासाठी अधिष्ठात्यांनी सीपींना जाउन भेटावे अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.

अवयवदान अभियान
जिल्हयात अवयवदान अभियान प्रभावीपणे राबवावे. या अभियानाची सूरूवात येत्या 30 ऑगस्टला आमदार सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करावी. समारोपात मी स्वत:उपस्थित राहील अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.
मेयो दुरूस्ती देखभालाची चौकशी होणार
मेयो हॉस्पिटलच्या दुरूस्ती व देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे व्यवस्थित होत नाही. नेमकी रक्कम कुठे खर्च होते याबाबत माहिती व्हावी अशी मागणी अभ्यागत मंडळाच्या सदस्यांनी बैठकीत केली. यावर पालकमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची यादी व अनूपालन अहवाल मागवावा व कामाचा दर्जा तपासण्यासाठी क्वालिटी कंट्रोल विभागाला पत्र द्यावे. यानंतर पूढीलवर्षी घ्यावयाच्या कामाची यादी सा.बा. विभागाला 31 मार्च पूर्वी देण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.
मेया हॉस्पीटल परिसरात पाळणाघर
मेयो हॉस्पीटल मध्ये काम करण्याऱ्या डॉ. व नर्सेसच्या छोटया मुलांसाठी एक पाळणाघर बांधण्यात येणार आहे.नाविण्ये पूर्ण योजना म्हणून डीपीसीतून या कामाला निधी देण्यात येईल असेही पालकमंत्री म्हणाले.
अतिक्रमण हटविणार
मेयो परिसराच्या आत असलेले चहाच्या टपरी व पानठेले कडक सूरक्षा व्यवस्थेत हटविण्यात यावे. असे निर्देश सहआयुक्त रस्तोगी यांचेही चर्चा करून पालकमंत्र्यांनी दिले. थॉयराईड तपासणी विभाग तातडीने सूरू करणे, चतूर्थ श्रेणी कर्मच्याऱ्यांची अनुपस्थित कमी असणे यावर विशेष चर्चा झाली. या पूढे कर्मच्याऱ्याची अनुपस्थिती आढळल्यास सफाई निरिक्षकावर कडक कार्यवाही करण्याचे सभेत ठरले. रूग्णाला देण्यात येणारे औषधीचे विवरण या पूढे ऑनलाईन मिळेल जेनेरिक फॉमसी सूरू करण्यासाठी मेयोत जागा देण्यात येणार आहे.
या सभेत अभ्यागत मंडळीचे सदस्य डॉ. उमेश शिंगणे, डॉ. प्रतिभा मांडवकर, गीता छाडी,सुभाष कोटेला,जितेंद्र ठाकूर रविन्द्र डोंगरे,डॉ. मिलिद गणवीर, विजय मोटघरे,डॉ. परचंड,डॉ. खामगावकर, डॉ.कोईचाडे, डॉ. उईके, डॉ. जैन, डॉ. जोशी, डॉ. एम.सी.मेहता हे उपस्थित होते. पालकमंत्र्यांचे स्वागत डॉ. प्रकाश वाकोडे यांनी केले.

Saturday 20 August 2016

नॅशनल कॅन्सर ग्रीडमध्ये महाराष्ट्राचा सकारात्मक पुढाकार --- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*   तरुणांनो सिगरेट, तबांखूपासून दूर रहा
*   थायराईड कॅन्सर सोसायटीमुळे तात्काळ उपचार शक्य
नागपूर, दि 20 : वेगाने वाढणाऱ्या कॅन्सर आजाराला पायबंद घालण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या नॅशनल कॅन्सर ग्रीडमध्ये महाराष्ट्र राज्य सक्रीय पुढाकार घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राष्ट्रीय थायराईड कॅन्सर व्यवस्थापन परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
हॉटेल प्राईड वर्धा रोड, नागपूर येथे थायराईड सोसायटी नागपूर आणि विदर्भ व सोसायटी ऑफ हेड अँड नेक ऑनकॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अधिवेशनास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, आयोजन समिती अध्यक्ष डॉ. मदन कापरे, सचिव डॉ.देवेन माहोरे, डॉ. आर. रवी, डॉ.प्रथमेश पै प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीप प्रज्वलन करुन पहिल्या राष्ट्रीय थायराईड कॅन्सर परिषदेचे उद्घाटन केले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, जागतिक स्तरावर कॅन्सर रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
थायराईड कॅन्सरच्या रुग्णात मोठी वाढ होतांना दिसत असून याबाबत जाणीव जागृती होणे आवश्यक आहे. ही परिषद यासाठी पुढाकार घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. थायराईड कॅन्सर विशेषज्ञ डॉक्टरांनी मिळून स्थापन केलेल्या या परिषदेमुळे सामान्य माणसाला तात्काळ आरोग्य सेवा मिळणे सोईचे होईल. राज्याने अवयव दान रजिस्ट्रेशन मोहीम हाती घेतली असून याचा फायदा गरजू व गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित झाले असून या तंत्रज्ञानाच्या आधारे परवडेल अशा खर्चात रुग्णसेवा देणे शक्य झाले आहे. यंत्रोपचारामुळे कुठल्याही आजारावर तात्काळ उपचार करणे शक्य होत आहे. अशातच आपण कोकीळाबेन रुग्णालयाला भेट दिल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात.
कॅन्सर विरोधी लढा देण्यासाठी थायराईड सोसायटी नागपूर मोठ्या प्रमाणात जागृती करेल. तरुण व युवा वर्गात सिगरेट तथा तंबाखूचे व्यसन पहायला मिळते, अशी खंत व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले, तरुणांनी सिगरेट व तंबाखूपासून दूर राहावे. नॅशनल कॅन्सर ग्रीडमध्ये महाराष्ट्र सकारात्मक पुढाकार घेईल असा पुनरुच्चार त्यांनी केला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थायराईड सोसायटीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना खासदार संचेती म्हणाले की, कॅन्सर हा मधुमेहापेक्षाही वेगाने वाढणारा आजार असून थायराईड कॅन्सर सोसायटी या आजाराच्या निर्मूलनासाठी पुढाकार घेईल, असा विश्वास आहे. यावेळी डॉ. तुलसीदास भिलावेकर यांचा उत्कृष्ट सेवेसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. देवेंद्र माहुरे यांनी केले. यावेळी डॉ. मदन कापरे यांचे भाषण झाले. आभार प्रदर्शन डॉ.आर. रवी यांनी केले. या कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

नागरिकांना पारदर्शी व गतिमान सेवा देण्यासाठी डिजिटल प्लॅटफार्मचा वापर करा -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


*  भूखंड नियमितीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
*  1 लाख 14 हजार 451 भूखंड धारकांना मागणीपत्र दिली
*  नागपूरची डिजिटल शहर म्हणून ओळख
*  सीसीटीव्ही, वायफाय सेवा, ई-प्लॅटफार्म
*  ना-विकास झोनमधील विकास शुल्क 56 रुपये

नागपूर, दि 20 :  नागपूर सुधार प्रन्यास तसेच महानगरपालिकेतर्फे नागरिकांना सेवा देताना पारदर्शी व गतिमान असाव्या यासाठी डिजिटल प्लॅटफार्मचा वापर सुरु करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही, वायफाय सुविधा आदी स्मार्ट सिटीच्या सर्वसुविधा उपलब्ध करुन नागपूर शहराचा सर्वांगिण विकास करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
नागपूर सुधार प्रन्यास तर्फे दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील मौजा भामटी, परसोडी व जयताळा येथील नागरिकांना गुंठेवारी नियमित अभिन्यासाठी भूखंडाचे नियमितीकरण शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर प्रविण दटके,  खासदार अजय संचेती, डॉ.विकास महात्मे, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, प्रकाश गजभिये, प्रा.अनिल सोले, कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, डॉ.मिलिंद माने आदी उपस्थित होते. यावेळी सुधार प्रन्यासचे विश्वस्त भूषण शिंदे, सुधीर राऊत, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी, नासुप्रचे सभापती डॉ.दीपक म्हैसेकर उपस्थित होते.
गुंठेवारी अधिनियमाअंतर्गत शहरातील अनधिकृत अभिन्यासातील भूखंड धारकांना गुंठेवारी अधिनियमाअंतर्गत भूखंड नियमित करण्याचा महत्वपूर्ण नागपूर सुधार प्रन्यासने राबविल्यामुळे 197 अभिन्यास नियमित करण्यात आले असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की 1 लाख 5 हजार 573 भूखंड धारकांना मागणीपत्र सादर केले असून त्यापैकी 95 हजार 698 भूखंडधारकांना नियमितीकरण पत्र देण्यात आले आहे. सुधार प्रन्यास तर्फे ना-विकास क्षेत्रातील भूखंडधारकांना पूर्वी 112 रुपये भरावे लागत होते. त्याऐवजी आता 56 रुपये करण्यात आले आहे.
नागपूर सुधार प्रन्यास तर्फे विकसित केलेल्या भूखंडावर दरवर्षी ग्राऊंड रेंट लावण्याची पद्धत बदलण्यात येणार असून यापुढे नव्याने भूखंड देतांना एकदाच ग्राऊंड रेंट घ्यावे अशी सूचना करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भूखंड अथवा गाळा वितरित करताना लीजवर देण्यात येतो. यासाठी कायम ना हरकत प्रमाणपत्र नागरिकांना द्यावे लागते. ना हरकत प्रमाणपत्रासाठी होणारा त्रास टाळण्यासाठी यापुढे ही अट रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. ---  2 ---
:     2    :
नागपूर सुधार प्रन्यास तसेच महानगरपालिकेतर्फे इमारत बांधकाम नकाक्षा मंजुरीसाठी तसेच इतर सुविधांसाठी यापुढे नागरिकांना चकरा माराव्या लागू नये तसेच त्वरीत सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने डिजिटल प्लॅटफार्म तयार करण्यात येणार असून सुधार प्रन्यासच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टी धारकांना नागपूर सुधार प्रन्यासतर्फे पट्टे वाटपाचा अधिकार देण्यात आला असून यासंबंधीताचा शासन निर्णय काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूरचा डिजिटल सिटी म्हणून विकास
नागपूर शहर स्मार्ट शहर म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी एलअँड टी सोबत करार करण्यात आला आहे. सेफ अँड स्मार्ट शहराअंतर्गत संपूर्ण शहर सीसीटीव्ही सर्व्हिलन्स अंतर्गत आणून शहरात वायफाय सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, देशात पहिल्यांदा पश्चिम नागपूरमध्ये   डिजिटल स्क्रीप्ट तयार करण्यात येवून येथे वायफायसह सर्व डिजिटल सेवा उपलब्ध राहणार आहे. जपानी गार्डन ते शंकरनगर चौक या सहा किलोमीटरच्या परिसरात ही सेवा उपलब्ध राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शहरातील पार्किंग, स्क्रीप्ट लाईट, वाहतूक व्यवस्था जनतेला अधिक प्रभावी व परिणामकारक मिळावी यासाठी स्मार्ट इनोवेशनच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडविण्यात येईल. डिजिटल कनेक्टिव्हीटीच्या माध्यमातून तसेच मोबाईल अप्लीकेशनद्वारा या सुविधा जनतेला उपलब्ध होतील. नागपूर शहराचा सर्वांगिण विकास करताना येत्या दोन वर्षात शहराचा चेहरा बदलेला दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
चंद्रशेखर बावनकुळे
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील नागरिकांची अनेक वर्षापासून प्रलंबीत गुंठेवारी नियमित पट्ट्याचा प्रश्न सोडवून नागरिकांमध्ये नवचैतण्य निर्माण केले आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांनी आता पर्यंत नागपूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी महानगर पालिकेच्या 64 तर नागपूर सुधार प्रन्यासच्या 49 सुधारणा करुन विकासाचे अनेक मार्ग मोकळे केले आहेत.
ते पुढे म्हणाले की, नागपूर शहरातील जनतेला उत्तम प्रकारच्या सेवा देण्यासाठी व त्यांना महानगर व एनआयटीमध्ये कामांसाठी वारंवार हेल्पाटया माराव्या लागू नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संमतीने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच एक समिती स्थापन करुन या समितीच्या माध्यमातून नागपूर सुधार प्रन्यासचे लेआऊट महानगर पालिकेकडे हस्तांतरण करण्यात येणार असून त्यासाठी खर्चाचे अंदाजपत्रक डीपीआर नागपूर सुधार प्रन्यासने तयार करुन तेवढा निधी महानगरपालिकेला उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रारंभी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात भूखंड नियमितीकरण शिबिराची माहिती देताना सांगितले की, गुंठेवारी अधिनियमाअंतर्गत 1997 अभिन्यासाचे नियमितीकरणानंतर नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. 1 लाख 54 हजार 035 अर्जापैकी 1 लाख 14 हजार 451 भूखंड धारकांना मागणीपत्र देण्यात आले आहे. तसेच नियमित अभिन्यासातील 22 हजार 343 अर्जांची छाननी करण्यात आली.
गुंठेवारी अधिनियमानुसार अकरा भागातील प्रलंबित असलेल्या भूखंड नियमित करण्यात आले आहेत. नागपूर शहरातील मतदार संघनिहाय शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जयताळा येथील श्रीमती लिली पवार, दयाराम भोयर, विजय पगारे, श्रीमती उषा इंगळे, श्रीमती सुरेखा डहाके यांना भूखंड नियमितीकरणाचे मागणीपत्र देण्यात आले. यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता ए.ए.गौर, एस.एच.गुज्जलवार आदी अधिकारी पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

वंचितांना न्याय देण्यासाठी शासन सदैव कार्यरत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे उद्यान नामकरण

नागपूर, दि 20 : महाराष्ट्र शासन मातंग समाजाच्या विकासासाठी कटिबध्द आहे. दलित वस्ती सुधार योजना बदलून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजना सुरु केली असून दलित व वंचितांकरिता हे राज्य सदैव कार्यरत राहील असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 नागपूर येथील महानगरपालिकेच्या वतीने अंबाझरी उद्यानात आयोजित आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर प्रविण दटके, आमदार सर्वश्री मिलिंद माने, सुधाकर देशमुख, अनिल सोले, तसेच दयाशंकर तिवारी, संदीप जाधव आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.    
मुख्यमंत्री म्हणाले की, 13 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर महापालिकेने या उद्यानारचे आद्य क्रांतीगुरु लहूजी साळवे उद्यान असे नामकरण केले. लहुजी साळवेंचा सुंदर पुर्णाकृती पुतळा बसविला, त्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन केले. लहुजी साळवे हे शूर लढवय्ये होते. त्यांचे संपूर्ण घराणे स्वराज्याच्या स्थापनेत लढणारे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शूर सैनिक म्हणून भाग घेतला. शिवाजी महाराजांनी पुरस्कृतही केले होते. हिंदवी स्वराज्याच्या लढाईत इंग्रजांविरुध्द प्राणपणाने ते लढले. इंग्रज सैनिकही त्यांच्या चपळाई पाहून अवाक व्हायचे.
मुख्यमंत्री म्हणाले की, स्वाभिमानाने जगायचे तर अगोदर व्यायाम आवश्यक आहे म्हणून पुण्यात पहिली तालिम लहुजींनी सुरु केली. क्रांतीगुरु म्हणून लहुजी साळवे सुपरिचित होते. शस्त्रास्त्र व तालिमिचे धडे तरुणांना त्यांनी दिले. महात्मा फुले यांच्या शिक्षण कार्यात सक्रीय सहभाग म्हणून लहुजींनी पहिल्यांदा आपली कन्या शाळेत पाठविली. महात्मा फुलेंना सर्वप्रथम संरक्षण लहुजी साळवे यांनी दिले. स्वातंत्र्याच्या लढ्यात साळवेंचे योगदान मोठे होते. त्यांची प्रेरणा आपणास सदैव मिळत राहील. प्रत्येकास स्वातंत्र्याचे मोल समजावे म्हणून महापालिकेने लहुजी साळवेंचा पुतळा उभारुन उत्कृष्ट कार्य केले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपणास स्वराज्य मिळाले आहे, आता प्रत्येकाने सुराज्याकडे वाटचाल करण्यासाठी संकल्प करावा.
राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, एकोणिसाव्या शतकातील एक महाराष्ट्रीय क्रातिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक, लहुजी वस्ताद या नांवानीही ते परिचित होते. त्यांचे घराणे राऊत या नांवाने ख्यातनाम होते. त्यांचे घराणे धाडसी व देशभक्त परिवार म्हणून ओळखले जात. युवक युवतींनी स्वावलंबी होण्यासाठी महामंडळाचे कर्ज घेऊन सन्मानाने जीवन जगावे. शासनातर्फे नागरिकांना घरे बांधून देण्यात येणार असून त्यामध्ये मातंग समाजांनाही घरे उपलब्ध करुन देण्यात येईल. यावेळी महापौर प्रविण दटके यांनी आपल्या भाषणात लहुजी यांच्या कार्याचा आढावा घेतला.   
00000

विमानसाठीच्या निर्माण उद्योगामध्ये नागपूर हे जगातील प्रमुख केंद्र -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि 20 : बोईंग विमानासाठी टाटा उद्योग समूहाच्या ‘ताल’ मॅन्युफॅक्चरिंग सोलुशन उद्योग समूहातर्फे अत्यंत उच्च दर्जाचे फ्लोअर बिम निर्माण करुन मिहानचे नाव जागतिक स्तरावर पोहचविले असून बोईंग एमआरओ व ताल उद्योग समूहामुळे विमानासाठी लागणाऱ्या सुटे भाग निर्मिती व देखभालीसाठी जगातील प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
मिहान येथे टाटा उद्योग समूहाच्या ताल मॅन्युफॅक्चरिंग सोलुशनतर्फे ड्रीमलायनर 787 या बोईंग विमानासाठी निर्माण केलेल्या पाच हजाराव्या फ्लोअर बिमच्या पुरवठा संदर्भातील कन्साईनमेंटचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तसेच विमानासाठी लागणाऱ्या सुटे भाग निर्मिती विभाग जेनेरिक  मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, बोईंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, पद्मश्री डॉ. रघुनाथ माशेलकर, खासदार कृपाल तुमाने, तालचे चेअरमन आर. एस. ठाकूर, टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक गुंटेर बस्चेक, कार्यकारी संचालक राजेश खत्री आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
एअरो स्पेस इको सिस्टिमसाठी मिहान येथे जागतिक स्तराच्या आवश्यक सर्व सुविधा निर्माण झाल्या असल्यामुळे टाटा उद्योग समूहाचे तालतर्फे बोईंग 787 या विमानासाठी फ्लोअर बिम निर्माण करुन नागपूरचे नाव जागतिक स्तरावर पोहचविल्याबद्दल विशेष अभिनंदन करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बोईंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर यांच्या प्रयत्नामुळे एमआरओ नंतर ‘ताल’ सुरु झाले आहे. ताल हे मिहानसाठी ब्रँड अम्बॅसेडर ठरणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या संकल्पनेतील नागपूर हे मेड फॉर वर्ल्ड झाले आहे.
एअर बससाठी आवश्यक असणारे सुटे भाग सुद्धा निर्माण करणारी ‘ताल’ ही जगातील एकमेव कंपनी असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नागपूर येथील युवकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बोईंगसाठी  लागणारे महत्त्वाचे फ्लोअर बिम तयार करण्यासाठी सहभाग दिला असून युवकांचे अभिनंदन करतांना जागतिक स्तरावरील उत्पादनासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ नागपूरसह विदर्भात असल्यामुळे जागतिक स्तरावरील एव्हिएशन कंपनी तसेच प्रवासी विमाने मिहान येथील एमआरओमध्ये देखभाल व दुरुस्तीसाठी येणार असून यासंदर्भात स्पाईस जेटसोबत करार करण्यात आला आहे.

मिहानला अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मान्यता देण्यात आली असून उद्योगांना 4.40 रुपये दराने वीज पुरवठा करण्यात येणार असून येथे भारतातील पहिले फॅब युनिट सुरु करण्यासंदर्भात संबंधित कंपनीने मान्यता पत्र दिले आहे. त्यासोबतच सोलर निर्मिती संदर्भातील संपूर्ण युनिट आदी उद्योग येण्यास उत्सुक असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करतांना प्रवासी वाहतूक आणि कार्गो हबसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून माल वाहतूक सुविधेमुळे तालसह इतर उद्योगांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत पाठविणे सुलभ होणार आहे. मिहान परिसरातील तसेच नागपूर  जिल्ह्यातील युवकांना प्राधान्याने रोजगार देण्यासंदर्भात उद्योगांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मिहान येथे तालसारख्या जागतिक दर्जाच्या उत्पादन निर्मिती उद्योगामुळे नागपूर जागतिक स्तरावर पोहचले असून बोईंग देखभाल व दुरुस्ती केंद्रामुळे या क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली आहे. नागपूर परिसरातील अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे विमानसाठी लागणाऱ्या सुट्या भागाच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे. उद्योग सुरु करतांना प्राधान्याने स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या संकल्पनेनुसार 50 हजार युवकांना रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. मिहानमध्ये सीप्लेन तयार करण्यासोबत सरंक्षण उत्पादनाला सुरुवात करावी. केंद्र व राज्य शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
बोईंगच्या विक्री विभागातील वरिष्ठ उपाध्यक्ष दिनेश केसकर यांनी मिहान येथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्यामुळे येरोस्पेस उपयोगासोबतच विमानासाठी लागणाऱ्या सुट्टयाभाग निर्मितीमध्ये नवे दालन येथे निर्माण झाले आहे. मोहिमच्या ड्रिमलायनर 787 या विमानासाठी प्लोअर बिम तयार करताना त्याची गुणवत्ता व दर्जा उत्तम ठेवल्यामुळेच जगात नागपूर हे केंद्र महत्वाचे ठरले आहे. मोहिम देखभाल दुरुस्तीचे केंद्र तसेच ताल हे विमानाचे सुट्टयाभाग निर्मितीचे केंद्र सुरु करुन येथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मी ज्या शहरात शिकलो त्या मातीचे ऋण मी फेडू शकला याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी बोईंग इंडियाचे अध्यक्ष प्रत्युष कुमार, पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशलकर यांनी मार्गदर्शन केले. ताल चे कार्यकारी संचालक तथा सीइओ राजेश खत्री यांनी स्वागत करुन प्रास्ताविक भाषणात बोईंगसाठी आवश्यक असणाऱ्या प्लोअर बिमची निर्मिती पहिल्या 22 महिण्यातच करण्यात आली असून 5 हजारावे प्लोअर बिम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बोईंग अमेरिकेला पाठविण्यात येत आहे. 300 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या या उद्योगामध्ये अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे तसेच तज्ज्ञ  550 कौसल्यपूर्ण तज्ज्ञ कर्मचारी कार्यरत आहेत. 80 टक्के स्थानिक कौसल्यपूर्ण कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिका वगळता जगातील ताल ही एकमेव कंपनी बोईंगच्या 787, 9 आणि 787-10 ड्रिमलायनर विमानासाठी सुटे भाग पुरवित आहेत. बोईंगसोबत सहकार्य करुन जागतिक गुणवत्तेनुसार सुट्टेभाग पुरविणारी ही संस्था असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 हजाराव्या प्लोअर बिम निर्यात कन्सांइटमेंटला झेंडी दाखवून रवाना केली. तसेच विमानासाठी लागणाऱ्या सुट्टयाभाग निर्मितीच्या जनरिक फॅसेलिटीचे उद्घाटन केले. यावेळी ताल मॅन्युफॅक्चरिंग सोलुशनचे तसेच टाटा उद्योग समुहाचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, बोईंगचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, मिहानचे उपाध्यक्ष विश्वास पाटील तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

                                                          *****

शहरातील 44 शाळांमधील 5 हजार 500 विद्यार्थ्यांना मोफत भोजन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



           माध्यान्ह भोजन योजना प्रायोगिक तत्वावर सुरु
·         मनपाच्या 24 व 20 खाजगी शाळांचा समावेश
·         अक्षय पात्र फाउंडेशनचा पुढाकार
·         मनपाच्या सर्व शाळा डिजिटल होणार

नागपूर, दि 20 : नागपूर महानगर पालिकेतील सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्याची क्षमता केन्द्रीकृत स्वयंपाकगृह प्रणालीत आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर शहरातील 44 शाळांमधील साडेपाच हजार विद्यार्थ्यांना मोफत पोषण आहार पुरविण्यात येईल. यात महानगरपालिकेच्या 24 व 20 खाजगी शाळांचा समावेश आहे. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम अक्षय पात्र फाउंडेशन तर्फे राबविण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
वर्धा रोडवरील विकासनगरातील विेवकानंदनगर मनपा हिंदी माध्यमिक शाळेत केन्द्रीकृत आहार वितरण प्रणाली मार्फत शालेय पोषण आहार वितरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, उपमहापौर सतीश होले, आमदार सर्वश्री आशिष देशमुख, सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, अक्षय पात्र फाउंडेशनचे उपाध्यक्ष चंचलापती दासा, गार्डियन डोनर श्रीमती वंदना टिळक व रवि टिळक, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त रविंद्र कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते.
बंगळूरच्या अक्षय पात्र फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजनाची संकल्पना मांडण्यात आली. खरे तर ही कल्पना 11 वर्षापूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्र्यासमोर मी मांडली होती. पण ती पूर्ण झाली नाही. आता ती प्रभावीपणे राज्यात राबविण्यात येत आहे. मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून अतिशय आरोग्यदायी अशा यंत्रणेच्या माध्यमातून हे सकस आणि जीवनसत्वयुक्त भोजन विद्यार्थ्यांना दिले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
केंद्रीभूत किचनच्या पद्धतीमुळे शारीरिक आरोग्याचे संवर्धन करतांना बचत गटांनाही यात सामावून घेतले आहे. नागपुरात या योजनेअंतर्गत 32 बचतगटांना वितरणाचे काम देण्यात आले आहे. श्रीमती वंदना टिळक यांचे यावेळी विशेष आभार मानावे लागेल. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रिर्त्यथ वर्षभर मोफत जेवण देण्याची तयार दर्शविली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.                                                    
महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण रोखण्यासह त्यांचे योग्य पोषण होण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. टाटा ट्रस्ट सारख्या संस्थांसोबत झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विविध उपेक्षित भागात मदतीचा हात मिळाला असून कुपोषण निर्मूलन, दर्जेदार आरोग्य सेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण या उद्दिष्ठांसाठी शासन गेल्या दोन वर्षापासून प्रभावी योजना राबवित आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आदिवासी आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक आहार देण्यासाठी सरकारकडून केंद्रीभूत किचनची सुविधा पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली आहे.  महिला आणि बालविकासासाठी सरकारच्या अधिक प्रभावी उपाययोजनांमुळे माता मृत्यू दरात 84 वरुन 67 इतकी लक्षणीय घट झाली आहे. त्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अर्भक मृत्यू दरातही शासनाने गेल्या दोन वर्षात चांगली कामगिरी केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातही केंद्रीभूत किचनची सुविधा शाळांना उपलब्ध करुन द्यावयाची असल्यास या संदर्भात पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सकस आहार देता येणे शक्य होईल. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या महत्वकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत जून 2015 ते 2016 या कालावधीत राज्यातील 66 हजार प्राथमिक शाळांमधील 11 हजार शाळां 100 टक्के प्रगत म्हणून जाहीर झाले आहे. पुढील जून पर्यंत या शाळांची संख्या 33 हजारांपर्यंत करण्यात येणार आहे. या शाळांनी 100 टक्के लर्निंग आऊट कमची श्रेणी प्राप्त केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूर जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायतीमध्ये नुकताच डिजिटल उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळांमध्ये व्हर्चुअल व डिजिटल क्लासरुम सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थी व पालकांचा असलेला ओढा कमी होईल. नागपूर शहर हे स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये डिजिटल क्लासरुम तयार करण्यासाठी महापौरांनी योजना तयार करावी. शासनातर्फे डिजिटल कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. त्यामुळे महानगरपालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात अक्षय पात्र फाउंडेशनतर्फे माध्यम भोजन योजना सुरु केल्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊन विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढेल. या योजनेचा फायदा झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे होईल, असा विश्वास व्यक्त केला.
महापौर प्रवीण दटके यांनी आपल्या भाषणात महानगरपालिकां शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत होती. परंतु हे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आल्यामुळे मागीलवर्षी फक्त 600 विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळात प्रवेश घेतला होता. आता सर्वं शाळा डिजिटल करण्याचा आमचा मानस आहे असे सांगितले.
प्रास्ताविक भाषण मनपाचे शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांनी केले. यावेळी अक्षय पात्र फाउंडेशनचे उपाध्यक्ष चंचलापती दासा यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात अक्षय पात्र तर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण दटके दीप प्रज्ज्वलन केले. यावेळी श्रीमती वंदना टिळक यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हिंदी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यन्ह भोजनाचे पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.
या कार्यक्रमास नगरसेवक, शालेय विद्यार्थी, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****

अविकसित व मागास भागात सहकाराचे जाळे निर्माण होण्याची आवश्यकता -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



       
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडीट को-ऑप. सोसायटीच्या
                    11 व्या शाखेचा थाटात शुभारंभ
नागपूर, दि 20 : अविकसित व मागास भागात सहकाराचे जाळे विणल्यास त्या भागाची निश्चित प्रगती होईल. गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडीट सोसायटीने नागपुरात शाखा सुरु करुन या भागातील लोकांना संधी प्राप्त करुन दिली आहे. आपण चांगल्या भावनेने एखादी संस्था सुरु केली तर त्याची प्रगती कोणी रोखू शकत नाही. असे उद् गार देवेंद्र फडणवीस यांनी केले.
  गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडीट को-ऑप. सोसायटीच्या 11 व्या शाखेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार कृपाल तुमाने, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, आमदार कृष्णा खोपडे, आमदार सुरेश धानोरकर, आमदार सुधाकर कोहळे, आमदार विकास कुंभारे, आमदार आशिष देशमुख कार्याध्यक्ष राजुदास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  90 टक्के भांडवल पुरविणाऱ्या संस्थांचे जाळे प्रगत भागात असल्यामुळे त्या भागाची प्रगती होत गेली. तेथील उद्योग व्यवसायाची वाढ झाली. मागास व अविकसित भागात सहकारी संस्थांच्या शाखा टिकत नाहीत. भांडवल पुरविणाऱ्या संस्था नसतात. त्यामुळे मागास व अविकसित भागात सहकारी संस्थांचे जाळे अधिक प्रमाणात निर्माण करण्याची आवश्यकता आहे. विकास हा संधीच्या आधारावर होत असतो. बचतगटांना अशाचप्रकारची संधी मिळाल्यामुळे बचतगटांची चळवळ मोठी झाली आहे. राष्ट्रीयकृत बँका व महिला विकास महामंडळाच्या माध्यमातून बचतगटाकरिता करण्यात आलेले अर्थसहाय्याची पूर्णपणे परतफेड नियमितपणे होते. कुणीही डिफॉल्टर नसतात. असे सांगून महिला बचतगटांना देण्यात आलेले 51 लक्ष रुपये ते परत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, सहकार क्षेत्रात राज्याने मोठी प्रगती केली आहे. बँका, सोसायट्या, विविधप्रकारचे औद्योगिक युनिटचे मोठे जाळे तयार झाले. त्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी अशा संस्थेत कर्ज मागणाऱ्यांना चांगली वागणूक मिळेलच याची हमी नसायची. लोकांवर पूर्वी दडपण असायचे. काहींनी सहकाराचा स्वाह:कार केला. आता विश्वास वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे सहकाराशी मोठे नाते जुळले आहे. सहकार संस्काराने चालतो. तेव्हा सहकारात सकारात्मक बदल होतात. असाच बदल गोदावरी अर्बन सोसायटीने करुन विकासात मोठे काम केले आहे.
दक्षिण-नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी तसेच सोसायटीच्या अध्यक्षा सौ. राजश्री हेमंत पाटील यांनी महिला बचतगट, समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना एकत्र घेवून सामान्यांचा फायदा करण्याच्या उद्देशाने नागपूर येथे 11 वी शाखा उघडली. या शाखेचे वटवृक्षात रुपांतर होईल. असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. व सोसायटीला शुभेच्छा दिल्या. गोदावरी अर्बन सोसायटी ही प्रगतीची शिखरे गाठत जाईल. असा विश्वास व्यक्त करुन या भावनेने हेमंत पाटील, राजश्री पाटील यांनी ही संस्था सुरु केली हीच भावना कायम ठेवल्यास प्रगती कोणीही रोखणार नाही, असे उद् गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
यावेळी आमदार हेमंत पाटील, प्रवीण दरेकर यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविकात सोसायटीच्या अध्यक्षा सौ. राजश्री हेमंत पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा सांगितला. या सोसायटीच्या माध्यमातून बचतगटांच्या महिलांनी ग्रामीण भागात सहकार नेला. त्यांचे चांगले कार्य सुरु आहे. मुंबईत महिला बचतगटाच्या उत्पादनासाठी मोठे विक्री केंद्र सुरु व्हावे, असे सांगितले.
                                                                         *****

Thursday 18 August 2016

जलयुक्त शिवार अभियानाची कालबद्ध अंमलबजावणी करा -प्रा. राम शिंदे

  • जलयुक्त शिवार कामांचा आढावा
  • 1 सप्टेंबर पासून जलयुक्त कामांचे ऑनलाईन छायाचित्र
  • 1077 गावांमध्ये 21 हजार 599 कामे पूर्ण
  • विभागात 1 लक्ष 31 हजार 854 टीसीएम पाणीसाठा
  • माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनाला प्राधान्य
  • सिंचन क्षमता वाढेल अशीच कामे घ्या
                        
नागपूर दि. 18 : जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत कामांची निवड करतांना शेतीसाठी प्रत्यक्ष संरक्षित सिंचनाचा लाभ होईल अशाच कामांना प्राधान्य देवून कालबद्ध कार्यक्रमानुसार कामे पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे दिल्यात.
नागपूर विभागातील जलयुक्त शिवार अभियान कामांचा आढावा जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी घेतला त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन  करतांना ते बोलत होते.
डॉ.आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ते होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर, आमदार सर्वश्री सुनील केदार, डॉ.आशिष देशमुख, समीर मेघे, प्रा. अनिल सोले, सुधाकर देशमुख, राजेश उर्फ बाळा काशीवार, समीर कुणावार, चरण वाघमारे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जलसंधारण सचिव पुरुषोत्तम भापकर, कृषी आयुक्त विकास देशमुख, संचालक एस. एस. जाधव, मुख्य अभियंता शिवकुमार गिरी, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त अभय महाजन,  अपर आयुक्त हेमंत बसेकर, उपसचिव किशोर पठारे, नारायण सराफ आदी अधिकारी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमामुळे सातत्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या  पाण्याची टंचाई दूर करण्यासोबत शेतीला संरक्षित सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी तसेच कायम टंचाई दूर करण्यासाठी आवश्यक असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना करताना प्रा.राम शिंदे म्हणाले की, अभियानाअंतर्गत नागपूर विभागात मागील वर्षी 1077 गावांमध्ये 21 हजार 599 कामे पूर्ण झालेली आहेत. यावर्षासाठी 904 गावांमध्ये 2307 कामे पूर्ण झाली असून 914 कामे प्रगतीपथावर असून यासाठी 316 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध देण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
जलयुक्त शिवार अभियानामध्ये मागीलवर्षी अपूर्ण राहिलेली कामे डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण करावी तसेच यावर्षी प्रस्तावित केलेली संपूर्ण कामे याचवर्षी पूर्ण होतील. यादृष्टीने नियोजन करण्याचा सूचना करताना जलसंधारण मंत्री पुढे म्हणाले की, अपूर्ण कामांबद्दल विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी वेळेत काम पूर्ण होईल याची खबरदारी घ्यावी.
जिल्ह्यात जलयुक्त अभियानाअंतर्गत झालेल्या कामांसंदर्भातील संपूर्ण छायाचित्र एमआरसॅ या प्रणालीच्या माध्यमातून 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन टाकणे बंधनकारक करण्यात आले असून जीओ टॅगींगच्या माध्यमातून झालेल्या कामांचा दर्जा व योग्य वेळेत झाले किंवा नाही याची माहितीही देण्यात येणार असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, नागपूर विभागात मागील वर्षी 43 कोटी रुपयाचा निधी शिल्लक असून हा निधी खर्च करण्यासाठी कामाच्या वेळापत्रक तयार करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे
जलयुक्त शिवार कार्यक्रमामध्ये लोकसहभागातून वाढविण्यासोबतच विविध उद्योगाकडून मिळणाऱ्या सीएसआर निधीमधील कामे ही संबंधित प्रकल्पाच्या क्षेत्रांतर्गत वापरण्याची तरतूद केल्यास या अभियानाला चालना मिळणार असल्याचे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की विदर्भ सिंचन विकास कार्यक्रम अंतर्गत 3 हजार 250 कोटी  रुपयांच्या प्रकल्पासाठी 3 वर्षांची मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे.
जलसंधारण विभागातर्फे शंभर एकरापर्यंत सिंचन क्षमता असलेल्या प्रकल्पाचा 319 कोटी रुपये तसेच नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी 350 कोटी रुपयाच्या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावेत असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी व कालबद्ध अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात असलेल्या सर्व यंत्रणाकडून कामे पूर्ण केल्यास कामे त्वरित पूर्ण होतील, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
नागपूर विभागातील माजी मालगुजारी तलावाच्या पुनरुज्जीवनाचा महत्त्वाकांक्षी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागात असलेल्या 6 हजार 489 मालगुजारी तलावापैकी 1 हजार 414 तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी 207 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी शासनाने 150 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करुन दिली आहे. या तलावाच्या पुनरुज्जीवनामुळे सरासरी 1 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल असेही यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.
जलसंधारण विभागाचे सचिव पुरुषोत्तम भापकर यांनी नागपूर विभागात जलयुक्त शिवार अंतर्गत चांगले काम झाले असून मागील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करुन यावर्षीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा. नदी पुर्नरजीवन कार्यक्रमाअंतर्गत विभागाला 22 कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता असून तातडीने 11 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विभागात शेतकऱ्याच्या मागणीनुसार 11 हजार विहिरींचा कार्यक्रम प्रस्तावित असून नरेगा अंतर्गत 10 हजार कोटीचे कामे राज्यात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात नागपूर विभागात मागील वर्षी व यावर्षी जलयुक्त शिवार अभियानात नागपूर विभागात 1 हजार 981 गावांची निवड करण्यात आली होती. मागील वर्षाचे अपूर्ण व यावर्षी सूचविण्यात आलेल्या एकूण 28 हजार 740 कामांसाठी 750 कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यावर्षी 3 हजार 216 कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी 3 हजार 207 कामे पूर्ण झाली आहेत.
‘मागेल त्याला शेततळे’ या कार्यक्रम अंतर्गत 8 हजार 474 च्या उद्दिष्टापैकी 8 हजार 882 ऑन लाईन अर्ज केले. त्यापैकी 7 हजार 594 कामे सुरु झाली आहेत.
विदर्भातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यात नागपूर, चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये 6 हजार 489 मामा तलाव अस्तित्वात आहे. या तलावातील पूर्ण गाळ काढला तर 1 लक्ष सिंचन क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर विभागाचे जिल्हानिहाय आढावा जिल्हाधिकारी यांनी सादर केला. यावेळी लोकप्रतिनिधींनी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत लोकसहभाग वाढविण्यासाठी तसेच नियोजित वेळात कामे पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींना गावनिहाय कामांची माहिती उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना केली. भंडारा जिल्ह्याची जलयुक्त शिवार या पुस्तिकेचे विमोचन जलसंधारण मंत्री यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासुळकर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी कमलकिशोर फुटाणे व विजयी बोंद्रे यांनी केले. आभार प्रदर्शन उपायुक्त पराग सोमण यांनी मानले. यावेळी नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच विभाग प्रमुख यांनी जलयुक्त शिवार विभागनिहाय सादरीकरण करुन विभाग व जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची व प्रगतीची माहिती दिली.  
****