Sunday 18 December 2016

संपूर्ण नागपूर होणार वायफाय --- मुख्यमंत्री फडणवीस

·        मनपाच्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे उद्घाटन

नागपूर दि. 17 -:  नागपूर हे स्मार्ट सिटी होणारच आहे. सोबतच संपूर्ण नागपूरला वायफाय करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशवंत स्टेडियम येथे नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यावतीने आयोजित नागपूर महोत्सवात ते बोलत होते.
कार्यक्रमाला रोजगार हमी व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, नागपूरचे महापौर प्रवीण दटके, आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, नागपूर महोत्सवात नागपूरचा लोगो लॉन्च करण्यात आला आहे. नागपूर महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद पाहून वाटते की, हा महोत्सव नागपूरकरांनी स्वीकारला आहे. त्यामुळे हा लोकांचा महोत्सव आहे. विदर्भ आणि विशेषत: नागपूर हा भाग कोळशासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व वेस्टर्न कोल्डफिल्ड लि.ने सुरु केलेले माईन टुरिझम ही एक नवीन संकल्पना आहे. या टुरिझमचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. महानगरपालिकेने ग्रीन बस सुरु केली आहे. देशात सर्वोत्तम काम करणारी महानगरपालिका म्हणून नागपूरचा उल्लेख होतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या 42 मीटर उंच टर्न टेबल लॅडर व क्वीक रिस्पॉन्स व्हेईकलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात ग्रीन व्हीजन फाऊंडेशन, ग्रीन अँड क्लीन फाऊंडेशनच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माईन टुरिझम, वेस्टर्न कोल्डफिल्डच्या इको पार्कच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. सोबतच ऑरेंज सिटी कॉफीटेबल बुक, विदर्भ बुकलेट, मॅप ऑफ नागपूर आणि नागपूर महोत्सव 2016 स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे तसेच एमटीडीसी आणि वेस्टर्न कोल्डफिल्डचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                          00000 

विदर्भ विकासासाठी शासनाची भरीव कामगिरी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 17 : मागास भागाचा विकास झाल्याशिवाय राज्याचा विकास शक्य नाही, ही बाब लक्षात घेता विदर्भाच्या विकासासाठी शेती, सिंचन, उद्योगाच्या विकासासोबत उत्तम कायदा व सुवव्यवस्था राखण्याची भरीव कामगिरी राज्य शासनाने केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विधानसभेत विदर्भ विकास आणि कायदा व सुव्यवस्थेच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
    मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भाच्या अनुशेषाच्या बाबतीत केवळ सभागृहात चर्चा होत होती. मात्र प्रत्यक्षात आवश्यक असणारा निधीचे वितरण आणि आवश्यक असणारे भूसंपादन कधीच झाले नाही. त्यामुळे शेतीचा विकास होऊ शकला नाही. राज्यातील एकूण 376 प्रकल्पांपैकी 157 प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. येत्या तीन वर्षात 4 लाख 75 हजार हेक्टर सिंचनक्षमता निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे साडेतीन हजार कोटी रूपये विदर्भात खर्च करण्यात येणार आहे. विदर्भात सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी शासनाने न्याय देण्यास सुरवात केली आहे. 72 प्रकल्पांना मान्यता देऊन भूसंपादनासाठी पाच पट मोबदला देण्याची शासनाची तयारी आहे. शासनाने दिलेल्या आश्वासक मोबदल्यामुळे 10 हजार 594 हेक्टर जमीन अधिग्रहित झाली आहे. त्यासोबतच 240 कोटी रूपये पुनर्वसनासाठी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पुनर्वसनासाठी आवश्यक असेल तेवढी रक्कम शासनाकडून देण्यात येणार आहे. शासनाच्या या प्रयत्नांमुळे 26 हजार हेक्टरचा अनुशेष भरून निघणार आहे. माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून  यातून सुमारे 99 हजार हेक्टर सिंचनक्षमता येत्या तीन वर्षात होणार आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सौरकृषि पंपाची योजना शासनाने आणली आहे. यातून 1 लाख 60 हजार कृषि पंपाचे उर्जीकरण करण्यात येणार आहे. यासाठी तीन कोटी रूपये प्रती मेगावॅट निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना 12 तास दिवसा पाणीपुरवठा करता येणार असल्यामुळे कृषि क्षेत्रात क्रांती होणार आहे. दुधाच्या क्षेत्रात मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची हमी मिळणार आहे.
उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक असणारा बंदरांना जोडणारा रस्ता आवश्यक असल्याने समृद्धी महामार्गाची संकल्पना साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पांसाठी लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून जमिनी उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची या प्रकल्पात भागीदारी राहणार असून यातून शेतकऱ्यांचे हित जपल्या जाणार आहे. या रस्त्यामुळे जेएनपीटीला थेट जोडणी मिळणार असल्यामुळे या भागातील उद्योग, शेतमाल निर्यातीला चालना मिळणार आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत साडेसात हजार किलोमिटरचे रस्त्यांचे जाळे तयार होणार आहे. यासाठी 4 हजार 200 कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात येत्या वर्षात तीन हजार किलोमिटरचे रस्ते तयार होणार आहे. नागपूरचा चेहरामोहरा बदलणाऱ्या नागपूर मेट्रोचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. या मेट्रोची ट्रायल 2017 अखेर करण्यात येणार आहे. मिहान प्रकल्पात कार्गो आणि प्रवासी हब तयार करण्यात येत आहे. रेल्वेच्या भूसंपादनाचे काम जलद गतीने करण्यात येत आहे.
कायदा व सुव्यवस्था उत्तम असून गुन्ह्यांची संख्या कमी करण्यात शासनाला यश आले आहे. गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी शिक्षा होण्याचे प्रमाण 56 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांवर आळा घालण्यात यश आले आहे. महिलांवरील अत्याचाराबाबत राज्य शासन सजग असून अशा प्रकारचे गुन्हे होणार नाहीत, तसेच यातील शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. गुन्हा सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी पोलिसांना सर्व मदत करण्यात येत आहे. मोबाईल फॉरेंसिक लॅब, सायबर लॅब आदींच्या माध्यमातून या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नोटाबंदीमुळे बँकांमध्ये जमा झालेल्या चलनाच्या माध्यमातून कृषि क्षेत्रात गुंतवणूक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शासनाने केलेल्या सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे देशातील एकूण परदेशी गुंतवणूकीपैकी 50 टक्के गुंतवणूक राज्यात आली असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.                                                             00000

विधीमंडळ अधिवेशनात भरीव कामकाज 27 विधेयकांवर विचार, 23 विधेयके संमत -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नागपूर दि. 17 -:  विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये भरीव कामकाज झाले असून सर्वाधिक 27 विधेयके सादर झाली. त्यापैकी दोन्ही सभागृहात 23 विधेयके मंजुर झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात झालेल्या भरीव कामकाजाबद्दल पत्रकारांना माहिती दिली.
हिवाळी अधिवेशन अत्यंत यशस्वीपणे पूर्ण झाले असून प्रथमच दोन्ही सभागृहात सर्वाधिक विधेयके मंजूर झाली असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, तीन विधेयके विधानसभेत तर एक विधेयक विधान परिषदेत प्रलंबित‍ आहे. संमत झालेल्या विधेयकामध्ये महाराष्ट्र स्थानिक सदस्य प्राधिकरण अनहर्ता (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र आधार (वित्तीय आणि अन्य सुधारणा), लाभ व सेवा यांचे लाभार्थी यांना वितरण, महाराष्ट्र दारुबंदी सुधारणा विधेयक (ग्राम रक्षक दल स्थापने संदर्भातील तरतूदी), महाराष्ट्र, (नागरी क्षेत्र), वृक्ष संरक्षण व जतन सुधारणा विधेयक, महाराष्ट्र खनिज विकास निधी (निर्मिती व उपयोजना) (निरसन विधेयक), महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी (सुधारणा विधेयक), महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा विधेयक) आदी विधेयकांचा यात समावेश आहे.
 छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई याचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असा नामविस्तार तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई याचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा नामविस्तार करण्यासंदर्भात केंद्र शासनाला शिफारस करण्याबाबत शासकीय ठराव मंजुर करण्यात आला आहे. त्यासोबतच एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनचे नामांतर प्रभादेवी करण्याबाबतही यामध्ये समावेश आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचा असलेला समृध्दी महामार्गासाठी शेतकऱ्यांनी संमती पत्र दिले असून या महामार्गासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे निश्चितच निर्धारित कालावधित पूर्ण करण्यात येईल असे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले, विकासाच्या प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र यावे ही शासनाची भुमिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संसदिय कार्यमंत्री गिरीश बापट, कृषिमंत्री पांडूरंग फूंडकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल,आदी लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
                                                          00000

समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना प्रभावीपणे राबवा --रोहयो मंत्री जयकुमार रावल


  • फूड फॉर वर्क योजना कार्यान्वित करा

नागपूर दि. 17 -: राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेली समृध्द महाराष्ट्र जनकल्याण
योजना ही ग्रामीण भागात अकुशल रोजगार उपलब्ध करुन देणारी महत्वाची योजना आहे. या
योजनेचा लाभ ग्रामीण भागातील जास्तीत- जास्त लोकांना मिळावा आणि त्यातून समृध्द
महाराष्ट्र साकार व्हावा, यासाठी समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना प्रभावीपणे राबवा, अशा
सूचना रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी बैठकीत दिल्या.
समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या अंमलबजावणी व आढावा संदर्भात
आयुक्त(मग्रारोहयो) यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते
बोलत होते. यावेळी आमदार राहूल कुल, आयुक्त(मग्रारोहयो) अभय महाजन, मुख्य
वनसंरक्षक(अर्थसंकल्प) शैलेश टेंभूरणेकर, सहआयुक्त (रोहयो) शरद भगत, उपायुक्त(रोहयो)
उदय पाटील, मिलींद सोमण, उपजिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांचेसह विभागाचे वरिष्ठ
अधिकारी उपस्थित होते.
श्री रावल म्हणाले की, राज्यातील ग्रामीण भागातील मजुरांना त्यांनी केलेल्या कामांचा
मोबदला त्याच दिवशी मिळावा यासाठी विभागानी इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम कार्यान्वित
करावी. सर्व मजुरांचे जॉब कार्ड तयार करण्यासाठी अनुषंगीक माहितीचे सॉफ्टवेअर तयार
करुन कायमस्वरुपी जॉब कार्ड पुरवावे. मजुरीचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा
होण्यासाठी बँक खाते आधार लिंक करावे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ लोकांचे मार्गदर्शन
घेऊन सॉफ्टवेअर तयार करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
ग्रामीण भागातील मजुरांना योजनेत सहभागी होण्यासाठी फूड फॉर वर्क ही संकल्पना राबवावी.
या योजने अंतर्गत मजूरांनी काम केल्यावर त्याच्या मजूरीसह त्यांच्या कुटूंबाकरीता
अन्नधान्याचे वितरण करावे. मग्रारोहयो योजना अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे नियंत्रण
व पाठपुरावा वेळोवेळी घेण्यात यावा. तसेच या योजने अंतर्गत विहीर बांधकाम, वृक्ष लागवड,
गाव तलाव व जलसंधारणाची कामे, रोपवाटिका निर्मल शोषखड्डे अशी सार्वजनिक हिताची
कामांचे ' जीओ टॅगींग ' करुन माहिती अपडेट करावी, अशा सूचना संबंधित विभाग प्रमुखांना
दिल्या.

बैठकीत आयुक्त(मग्रारोहयो) अभय महाजन यांनी राज्यात मग्रारोहयो योजने अंतर्गत सुरु
असलेल्या मजुरांची संख्या, जॉब कार्डची संख्या, अर्थसंकल्पीय तरतूद, निधीची सांख्यिकीय
आकडेवारी, पात्र लाभार्थी, समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना अंतर्गत 11 कलमी कार्यक्रम,
अहिल्यादेवी सिंचन विहीर, अमृतकुंड शेततळे, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय,
निर्मल शोषखड्डयाचे बांधकाम , समृध्दत गाव तलाव व इतर समृध्द जलसंधारणाची कामे,
अंकुर रोपवाटिका, नंदनवन वृक्ष लागवड, ग्राम सबलीकरणाची समृध्द ग्राम योजना, पूर्ण
झालेली कामे, जॉब कार्ड व्हेरिफीकेशन, जीओ मनरेगा स्थिती आदी विषयी सादरीकरणाच्या
माध्यमातून माहिती मंत्री महोदयांनी दिली.
मुख्य वनसंरक्षक श्री टेंभूरणेकर म्हणाले की, केंद्रीय वननिती अन्वये राज्याचा 33 टक्के भूभाग
हा वनांनी व्यापलेला असावा. परंतू राज्याचा 20 टक्के भूभाग हा वनाच्छादीत आहे. उर्वरित 13
टक्के भूभाग वनाच्छादीत करण्यासाठी राज्याने 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट
ठेवलेले आहे. सदर
उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वनविभागाव्दारे रोपवाटीका तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु
आहे. यामध्ये प्रामुख्याने सागवान, बांबू, गुलमोहर, चिंच, आंबा, हिरडा, बेरडा, आवळा, मोह,
बोर यासारखी दीर्घ काळ जगणारी वृक्षांची  लागवड करण्यात येणार आहे. सन 2019 पर्यंत 50
कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रुपरेषा व नियोजन करण्यात आले
आहे. बिहार राज्याच्या धर्तीवर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले
आहे. यासाठी केंद्र शासनाकडून निधीची मागणी करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण माहिती श्री.
टेंभूरणेकर यांनी बैठकीत दिली.
******

Saturday 17 December 2016

समाजजागृतीसाठी दीपस्तंभाप्रमाणे कार्य करा - आशिष आवारी

नागपूर दि.१७  समाजसेवा कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेत, समाजजागृती करण्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे कार्य करावे, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे उपप्रबंधक आशिष आवारी यांनी केले. ते मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात मानवाधिकार हक्कांचे संरक्षण या विषयावर बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. जॉन मेनाचेरी ॲड. सोनाली सावरे, उच्च न्यायालयाच्या विधी सेवा उपसमितीचे एन. डब्ल्यू डोये यांची प्रमुख उपस्थिती होती.
             विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आतापर्यंत वेगवेगळे क्लब असल्याचे पाहिले आहे. मात्र, मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयात मानव अधिकार क्लब असल्याचे प्रथमच पाहतो आहे. त्यामुळे संस्थेचे अभिनंदन करत त्यांनी विद्यार्थ्यांना मानवाधिकार आयोग आणि त्याचे प्रभावीपणे कार्य करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले पाहिजेत, यावर त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. मानवाधिकार आयोगाची स्थापना १९९३ मध्ये झाली असली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशावर मोठे उपकार केले असून, त्यांनी भारतीय संविधानात हे नमूद केले आहे. त्यांनी पर्यायाने संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क प्रदान करत मानवाधिकार कायद्याची बाजू भक्कमपणे मांडली. त्यामुळे समाजकार्याचे विद्यार्थी म्हणून समाजात वावरताना जिथेही मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन होत असेल तिथे निर्भिडपणे काम करा. आणि समाजात दीपस्तंभाप्रमाणे कार्य करा, असे त्यांनी सांगितले.
             ॲड . सोनाली सावरे यांनी विद्यार्थ्यांना मानवाधिकार हक्काबाबत सविस्तर माहिती दिली. मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन होत असल्यास त्या तक्रारीचा अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. ज्योती निसवाडे यांनी आभार मानले.
                                                                                      ****

प्रेस क्लबच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य - मुख्यमंत्री फडणवीस




बंगला हस्तांतरण व करार
नागपूर, दि. 17 : नागपूर येथे प्रेस क्लब व्हावा असे माझे व माझ्या पत्रकार बांधवाचे स्वप्न होते. यानिमित्ताने सर्वांच्या सहकार्याने हा प्रेस क्लब सुरु होत आहे. बंगल्याचे हस्तांतरण व करारावरील स्वाक्षरी माझ्या समक्ष होत असल्यामुळे एक चांगला प्रेस क्लब विकसीत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु. अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आज 17 डिसेंबर रोजी सिव्हिल लाईन नागपूर येथील स्वाती बंगला प्रेस क्लब ऑफ नागपूर यांचेसाठी हस्तांतरण व करारावर स्वाक्षरी कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव ब्रिजेश सिंह, नागपूर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी, सुयोग पत्रकार निवास शिबीर प्रमुख दिलीप जाधव, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, मुंबईला अधिवेशन काळात सायंकाळी पत्रकार मित्रांसोबत प्रेस क्लबमध्ये जेवण करायचो, त्यांच्याशी गप्पा करत असतांना वाटायचे की, नागपूरला सुध्दा असा प्रेस क्लब असावा. मुख्यमंत्री झाल्यावर इथल्या पत्रकार संघाचे पदाधिकारी याविषयी मला भेटले. प्रेस क्लबसाठी जागा शोधण्यापेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाचा एखादा बंगला मिळाल्यास तेथे तात्काळ प्रेस क्लब सुरु करता येईल. असे सांगितले. नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश भूषण गवई यांना स्वाती बंगला प्रेस क्लबला मिळावा, अशी विनंती केली. त्यांनी सुध्दा बैठक घेऊन सदर बंगला प्रेस क्लबला वापर करण्यासाठी मान्यता देण्याचे सांगितले.
टिळक पत्रकार संघाच्या इमारतीच्या विकासासाठी राज्य सरकार सहकार्य करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपूर येथील पत्रकार कॉलनीचे जे प्रश्न आहेत ते सोडविण्यात येतील. नवीन पत्रकार कॉलनी तयार झाली पाहिजे यासाठी पुढाकार घेण्यात येईल. नागपूर येथील प्रेस क्लब सुरु झाल्या नंतर आपण नक्की येणार असून, मुंबईच्या प्रेस क्लबमधील जेवणासारखे रुचकर जेवण इथेही मिळाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वाती बंगल्याची पाहणी केली. प्रेस क्लब ऑफ नागपूरसाठी 37 हजार स्केअर फुटचा स्वाती बंगला उपलब्ध झाला असून, या बंगल्याचे हस्तांतरण व करारावर सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 सदर चे कार्यकारी अभियंता संजय इंदुरकर व नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी स्वाक्षरी केली.
नागपूर प्रेस क्लबचे पहिले पॅट्रन सदस्य म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा प्रदीपकुमार मैत्र यांनी यावेळी केली. कार्यक्रमाला पत्रकार बांधवांची मोठया संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रदीपकुमार मैत्र यांनी केले. संचालन सरिता कौशिक यांनी तर उपस्थितांचे आभार ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांनी मानले.
                                             ******

सामाजिक सेवेचे व्रत जायंट्सने चालू ठेवावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



2 व्या जायंट्स आंतरराष्ट्रीय अधिवेशनचे उद्घाटन

नागपूर, दि. 17 : देशभक्ती आणि सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन जायंट्स परिवार काम करीत आहे. सामाजिक सेवेसाठी आपल्या देशातही इतकी मोठी संघटना उभी राहू शकते हे जायंट्सने  सिद्ध केले असून असेच सामाजिक सेवेचे व्रत जायंट्सने  पुढे चालू ठेवावे असे प्रतीपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले 
                  हेडगेवार स्मृती स्मारक येथे महर्षी व्यास सभागृहात जायंट्स च्या 42 व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशन चे उदघाटन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते पार पडले ,यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशीजायंट्स च्या  जागतिक अध्यक्ष शायना एन सीदिनशा चे अध्यक्ष एस बापुनातसेच जायंट्स चे पदाधिकारी उपस्थित होते. 
             जायंट्स ने बेटी बचावस्वच्छ भारतमुलींसाठी शौचालयअवयव दाननेत्रदानआत्महत्याग्रस्त शेतकऱयांसाठी  काम अशा अनेक सामाजिक विषयांवर काम केले आहे. या अभियानाला देशहित आणि समाज हितासाठी आणखी भव्य रूप द्यावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दीड लाख पेक्षा जास्त सामाजिक काम  सहकार्यवाह भैयाजी जोशी  सांभाळतात. त्यांचा अनुभव आणि त्यांच्या वाणीतून आपल्याला निश्चितच आज आणखी प्रेरणा मिळेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
             देशात एकीकडे संपन्नता आहे तर दुसरीकडे गरिबी. आजही 35 कोटी जनता दारिद्र रेषेखाली आहे. या दोन प्रकारच्या  व्यवस्थेमधील सेतू बनण्याचे काम जायंट्स सारख्या संघटना करीत आहेत. हे काम संवेदनानिष्ठाप्रामाणिकताआणि कर्तव्य भावनेतून करावे. भारत देश विश्वाचे मार्गदर्शन करणारा देश होईल इतके सामर्थ्यशाली बनवण्यासाठी सर्वानी सहकार्याने काम करण्याची गरज असल्याचे भैयाजी जोशी यांनी यावेळी प्रतिपादित केले. 
****

नागपूर महोत्सवाचे शानदार उदघाटन



नागपूर दि.16  - : नागपुरकरांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणाऱ्या नागपुर महोत्सव-2016 चे आज केंद्रीय
परिवहन, रस्ते व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन झाले.
नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने  यशवंत स्टेडियम
येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उदघाटन कार्यक्रमास ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्हयाचे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, महापौर प्रवीण दटके, माजी खासदर
दत्ता मेघे, पर्यटन व  सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव वल्सा आर. नायर सिंह, महानगर पालिकेचे
आयुक्त श्रावण हर्डीकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के.एच. गोविंद
राज, नागपूर महोत्सवाचे आयोजक सुधीर राऊ, संयोजक संदीप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. गडकरी म्हणाले की, नागपुर महोत्सवासारख्या स्तुत्य कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर
सांस्कृतिक विकासाकडे वाटचाल करीत आहे.  ही वाटचाल पुढे नेण्यासाठी शहरात कविवर्य सुरेश भट यांच्या
नावाने भव्य सभागृह बांधण्यात येत आहे. हे सभागृह नागपूर शहराच्या वैभवात भर घालणारे आहे. याच
महिन्यात या सभागृहाचे उदघाटन होईल. नागपुरच्या सांस्कृतिक विकासासाठी शासनाकडून भरीव सहकार्य
केले जाईल.
पर्यटन विकास मंत्री श्री. रावल म्हणाले की, संत्रा नगरी, टायगर कॅपीटल एवढीच नागपूरची ओळख न राहता हे
शहर आता पर्यटन नगरी म्हणूनही ओळखले जात  आहे. पर्यटन विकासासाठी या शहरात सातत्याने
नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी फुड फेस्टीवल सारख्या
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे ऑरेंज सिटी फेस्ट अंतर्गत
नागपूर दर्शन सहल बस सेवा सुरु करण्यात आली आहे. लवकरच खाण पर्यटन सारखा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु
करण्यात येणार आहे.
प्रास्ताविक सुधीर राऊ यांनी केले तर श्रावण हर्डिकर यांनी आभार मानले. आजादी 70 'भारतीय स्वतंत्रता की
संगीतमय गाथा' या अशोक हांडे रचित महानाटयाने नागपूर महोत्सवाची आज सुरुवात झाली. गुलामीच्या
जोखंडापासून कशा पध्दतीने भारताला स्वातंत्रय मिळाले याचे संगीतमय महानाटयाच्या माध्यमातून
कलाकरांनी यावेळी सादरीकरण केले. कार्यक्रमाला मोठया संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
दिनांक 19 डिसेंबर 2016 पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात दि. 17 डिसेंबर रोजी चला हवा येऊ द्या हा
मनोरंजक कार्यक्रम होणार आहे. दि. 18 डिसेंबर रोजी प्रसिध्द गायक शंकर महादेवन यांचे गायन तर दि. 19
डिसेंबर रोजी प्रसिध्द गायक तथा अभिनेता फरहान अख्तर याचा रॉकऑन शो होणार आहे. सर्व कार्यक्रम
सायंकाळी 6.00 वाजल्यापासून सुरु होणार आहे, असे आयोजकांनी कळविले आहे.

*****

अडेगांव पर्यटन सफारी गेट आणि पर्यटन संकुलाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते उद्घाटन

  • बोर व्याघ्र प्रकल्प तो जन्नत है- सिने अभिनेता विवेक ओबेराय
परिवारके साथ वापस आनेका वादा  

नागपूर, दि. 16:  बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत अडगांव पर्यटन सफारी गेट व अडेगांव पर्यटन संकुलाचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते झाले. यावेळी सुप्रसिध्द सिने अभिनेता विवेक ओबेराय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, आ.समिर मेघे, आ.पंकज भोयर, अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक राम बाबु, मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी, सरपंच संदिप जयस्वाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
ना.मुनगंटीवार म्हणाले की, सिने अभिनेता विवेक ओबेराय यांनी बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. वन्यजिवांचे त्यांना दर्शन झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. जंगलामुळे  सुख आणि आनंद प्राप्त्‍ होतो. बोर व्याघ्र प्रकल्पाचा देशभर, जगभर नावलौकिक होण्यासाठी आपण अडेगांव येथे रस्ता तसेच ऑडिटोरियम आदि सुविधा करु. राज्यात सर्वात मोठे जंगल विदर्भात आहे. राज्यात विविध कल्याणकारी योजना राबविण्याचा संकल्प करतांना विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या भागाला विशेष प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले. यावेळी  ना.मुनगंटीवार यांच्याहस्ते व्याघ्र मित्रांना स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
विवेक ओबेराय म्हणाले की, ‘दुनियामे सिर्फ अडेगांवमेही जन्नत है असे सांगून त्यांनी अडेगांव वासियांना त्यांनी धन्यवाद दिले. ‘मी अडेगांव वासियांच्या प्रेमात पडलो’ असे सांगून ते म्हणाले की, व्याघ्र प्रकल्प सुंदर आहे. येथील निवासी होण्याची माझी इच्छा होत आहे. मी माझ्या कुटूंबियांसमवेत पुन्हा व्याघ्र प्रकल्प येण्याचे वचन देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
बोर व्याघ्र प्रकल्प 138 चौ.कि.मी.क्षेत्र आहे. या प्रकल्पात 6 वाघ, 12 बिबटे, 25 अस्वल,10 हजारांपर्यंत हरिण, चितळ, निलगाय, सांबर आदि वन्यजीव आहेत. प्रकल्पांतर्गत 100 कि.मी.रस्ता देखभालीसाठी करण्यात आला आहे. वन्यजीव विभागाच्यावतीने विविध उपक्रम घेण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून अडेगांव पर्यटन सफारी गेट आणि  पर्यटन संकुल हा उपक्रम घेण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारील 8 गावात ग्राम परिसर विकास समित्या कार्यरत आहेत. वन व वन्यजीव समृध्दीसाठी डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना, वनधन विकास योजनेखाली विविध योजना राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
बोर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठे मत्स्योत्पादन होते. त्यामुळे प्रकल्प क्षेत्रात देशी विदेशी पक्षी सतत वाढ होत आहे. बोर प्रकल्पामुळे वनसाखळी मजबुत  होण्यास मदत होत आहे. बोर व्याघ्र प्रकल्प हा नागपूर पासून 54 कि.मी.अंतर असून एक्सप्रेस हायवेला लागू असल्यामुळे दिवसेंदिवस प्रकल्पास भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मागील वर्षी 15 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. येथे भेट देण्यासाठी ऑनलाईनची सोय आहे. सोमवार ते शुक्रवार प्रती व्यक्तीस 80 रु.आणि गाडीभाडे 440 रु. शनिवार आणि रविवारी प्रती व्यक्ती 90 रु. आणि गाडीभाडे 480 रु. आकारण्यात येतात. वन्यजिव विभागाने गाईड प्रशिक्षित करण्यात आले आहेत अशी माहिती यावेळी  देण्यात आली.
यावेळी आ.समिर मेघे, सरपंच संदिप जयस्वाल यांची समयोचित भाषणे झाली.
00000

वनौषधी शेतीतून शेतक-यांना चांगले उत्पन्न मिळवून देणार - सुधीर मुनगंटीवार



 नवरगावातील शेतक-यांना धनादेशाचे वाटप 
 विवेक ओबेरॉय यांची विशेष उपस्थिती

      नागपूर दि 16 -   वन क्षेत्राला लागून असलेल्या गावातील शेतकऱ्यानां  वनौषधी लागवडीचे प्रशिक्षण देऊन त्यांना लागवडी साठी  वनौषधी उपलब्ध  करून  देणार आहे. या वनौषधी शेतीतून उत्पादित वनौषधी खरेदी करण्याची हमी शेतक-यांना देणार असून या शेतीतून शेतक-यांना एका एकरामागे 50 हजारापेक्षा जास्त नफा मिळेल असा प्रकल्प मुख्यमंत्रांशी चर्चा करून तयार केला असल्याची  माहिती वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.
       बोर धरण प्रकल्पातील नवरगाव या पुनर्वसित गावाच्या शेतक-यांना धनादेश वाटप  कार्यक्रम बोर धरण येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटन संकुल येथे घेण्यात आला. याप्रसंगी      श्री मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार पंकज भोयर, समीर मेघे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी , अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ रामबाबू तर विशेष अतिथी म्हणून सिने अभिनेते विवेक ओबेरॉय, उपस्थित होते.
         यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेतक-यांना धनादेश,  एल. पी. जी आणि शिलाई मशिनचे वितरण करण्यात आले. तसेच गावात वाघ, वन, पर्यावरण आणि इतर वन्य प्राण्यांबद्दल जनजागृती करणाऱ्या 9 गावातील व्याघ्र सरंक्षण मित्र व मैत्रिणी मंडळाच्या युवक - युवतींना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
       वनापासून  मिळणार उत्पन्न हे दरडोई आनंदाचे उत्पन्न म्हणून गणल्या जाते. माणसाच्या जगण्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पासून ते अंत्यविधीसाठी आवश्यक असणाऱ्या लाकडापर्यंत सर्वच वस्तू जंगल पुरविते. नागपूर पासून 350किलोमीटरच्या क्षेत्रात देशातील 352 वाघ आहेत. म्हणून नागपूरला टायगर कॅपिटल म्हटले जाते.  वाघ बघण्याचा आनंद काही औरच असतो. वाघ केवळ आनंदच देत नाही तर एक - एक वाघ कोट्यवधींचा महसूल मिळवून देतो. म्हणूंन जंगलाचं संरक्षण करणारा जगलाशेजारील गावांमध्ये राहणारा शेतकरी हा या पर्यावरणाचा जंगलाचा सैनिक आहे, असेही            श्री. मुनगंटीवार म्हणाले.
     शासनाने जंगलाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या गावातील शेतक-यांना वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसान भरपाई मध्ये दुपटीने वाढ केली आहे. या गावांना 100 टक्के गॅस जोडण्या देण्याचा निर्णय घेतला आहे.   या गावातील शेतक-यांना80 टक्के अनुदानावर तारेचे कुंपण देणार आहे. ही गावे जलयुक्त शिवारच्या निकषात बसत नव्हती. प्रवीण परदेशी यांच्या प्रयत्नाने आता बफर झोनमधील गावांनाही जलयुक्त शिवार योजनेचा लाभ मिळेल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
        वनविभाग हे रोजगार देणार क्षेत्र आहे त्यामुळे या क्षेत्राच्या  संवर्धनासाठी  1 कोटी वृक्षदूत नेमणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोहफुलाच व्यवस्थित मार्केटिग केलं तर एका जिल्ह्यात 220 कोटी रुपयांचा रोजगार आदिवासी बांधवाना मिळू शकतो. यासाठी सुद्धा वनविभाग प्रयत्न करीत आहे असेही श्री मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
         सिनेअभिनेते विवेक ओबेरॉय म्हणाले की,  येथील जिल्ह्यांसाठी अर्थमंत्र्याच्या रूपात  मौल्यवान विहीर मिळाली आहे. त्याचा फायदा आमदारांनी जिल्ह्याच्या विकासासाठी करून घ्यावा.  वन हेच खरं धन आहे आणि या धनाच संरक्षण करण्याचे मोठे काम सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेच यावे ही प्रकृतीची इच्छा आहे. इतर लोक कामना करतात आणि वनमंत्री काम करतात त्यामुळे मी त्यांचा चाहता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विवेक ओबेरॉय यांनी मुख्यमंत्रयांचे सचिव प्रवीण परदेशी यांच्या कामाचेही कौतुक केले. परदेशी भारतीय प्राशासानिक सेवे पेक्षा भारतीय वन सेवेत असायला पाहिजे होते इतके  त्यांना जंगलाविषयी प्रेम  आणि  अभ्यास आहे.त्यांचे सारखे अधिकारी या देशाला मिळालेत तर प्रधानमंत्री यांच्या स्वप्नातील भारत घडू शकतो. असे सांगून  या यज्ञासाठी तन, मन आणि धनाची आहुती देण्यासाठी सदैव तयार आहे, अशी हमी त्यांनी यावेळी दिली. 
       यावेळी जिल्हा माहिती कार्यालयतर्फे निर्मित वर्धा यात्री कॉफीटेबल बुक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विवेक ओबेरॉय यांना भेट  दिले.
          या कार्यक्रमाला पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी, बोर अभयारण्याचे  विभागीय वन अधिकारी एल. बी भलावी इतर अधिकारी तसेच पर्यावरण प्रेमी, शेतकरी व लाभार्थी उपस्थित होते.

*******