Tuesday 30 April 2019

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभागाचा संकल्प करु या - चंद्रशेखर बावनकुळे



 महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापन दिन
कस्तुरचंद पार्क येथे मुख्य सोहळ्याचे आयोजन

नागपूर दि. 01 : अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या भिषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व तातडीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जनतेनेही दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रध्वज वंदन करुन सशस्त्र पोलिस दलाच्या पथसंचलनाची पाहणी करुन मानवंदना स्विकारली. त्यानंतर जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देतांना चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यावेळी पालकमंत्र्यांसमावेत उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सुरु असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभागातून विविध जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. काटोल, नरखेड या भागात लोकसहभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कामांना सुरुवात झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

राज्याच्या सर्वांगिण प्रगतीमध्ये शेतकरी उद्योजक तसेच विविध उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व कामगार बंधूचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. लोकसभा निवडणुकीचा उत्सव नुकताच साजरा झाला असून जनतेने लोकशाहीच्या या उत्सवामध्ये जनतेने उत्साहात सहभागी होवून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीपणे हाताळल्याबद्दल जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अभिनंदन केले.

यावेळी महापौर श्रीमती नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, खासदार डॉ.विकास महात्मे, सहपोलिस आयुक्त रविंद्र कदम यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक आणि जिल्हा व पोलिस प्रशासनाचे विविध अधिकारी व कर्मचारी तसेच नागरीक उपस्थित होते.

यावेळी परेड कमांडर सहाय्यक पोलिस आयुक्त विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध पोलिस पथकाचे संचलन झाले. त्यांच्यासोबत सेकंड इन कमांडर राखीव पोलिस उपनिरीक्षक त्रंबक प्रधान तर राज्य राखीव पोलिस बल गट क्रं.4 चे पोलिस उपनिरीक्षक मधुकर मोर्ला, गडचिरोलीचे दिलीप तरारे, गोंदियाचे अरुण धुळसे, नागपूर शहर सशस्त्र पोलिस बल शशिकांत नागरगोजे, नागपूर ग्रामीणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेष गावंडे, लोहमार्ग पोलिसचे विनोद तिवारी, नागपूर शहर (महिला) पोलिसचे उपनिरीक्षक विजयकुमार पुंडे, राज्य आपत्ती प्रतिसाद पथकचे घनश्याम दुजे, वाहतुक शाखेचे जितेंद्र ठाकूर, होमगार्ड जिल्हा समादेशकचे प्लॉटून कमांडर रोशन गजभिये आणि श्रीमती संजिवनी बोदेले, बँड पथकाचे प्रदिप लोखंडे, रामु ससाने, संजय पंचभुते, चंद्रकांत मानवटकर, सुरेश सनेश्वर, श्वानपथक ‘जीवा’सह शिवशंकर जोशी, “वज्र” चे विरेनशहा खंडाते, बॉम्ब नाशक पथकाचे विजय मैंद, वरुनवॉटर कॅनानचे संतोष श्रीवास, अग्निशामक दलाचे विनोद जाधव आणि सामान्य रुग्णालयाच्या डॉ.रोहीना शेख यांचा पथसंचलनात सहभाग होता. कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक साळीवकर यांनी केले.





जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजावंदन सोहळा

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र स्थापना दिनाच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते ध्वजारोहण वंदनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा आदी उपस्थित होते. यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.

*****

मतमोजणी सकाळी 8 वाजतापासून सुरु होईल यादृष्टीने संपूर्ण नियोजन करा - अश्विन मुदगल



*        कळमना मार्केट येथील मतमोजणी व्यवस्थेचा आढावा
*        23 मे रोजी नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी
*        मतमोजणीसाठी 14 टेबलची व्यवस्था
*        प्रसार माध्यमांकरिता स्वतंत्र कक्ष    

नागपूर,  दि. 30  :  लोकसभेच्या रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी 23 मे रोजी कळमना मार्केट परिसरात करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळासह व्यवस्थेसंदर्भात नियोजन करुन आवश्यक सर्व सुविधा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिल्यात.
छत्रपती सभागृहात लोकसभा निवडणुकीसंदर्भातील प्रत्यक्ष मतमोजणीसाठी करावयाच्या व्यवस्थेचा आढावा नोडल  अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, अविनाश कातडे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारींगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, अन्न धान्य वितरण अधिकारी लिलाधर वार्डेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र भुयार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहसंचालक एस.आर. केकरे, लेखाधिकारी विनित तिवारी आदी उपस्थित होते.
रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी कळमना मार्केट परिसरात दोन स्वतंत्र हॉल तयार करण्यात येणार आहे. यामध्ये निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार यांच्यासह विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्यक्ष मतमोजणीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय होणार असून यासाठी प्रत्येकी 14 टेबलवर ही मतमोजणी होईल. मतमोजणीच्यावेळी संपूर्ण व्हीडिओग्राफी करण्यात येणार असून 50 व्हीडिओग्राफर यासाठी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन स्ट्राँगरुममध्ये केंद्रीय राखीव दलाच्या सुरक्षिततेखाली ठेवण्यात आल्या असून दि. 23 मे रोजी सकाळी 6.30 वाजता विविध राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर उघडण्यात येतील. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात होईल. प्रारंभी पोस्टल बॅलेटची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या मोजणीला सकाळी 8.30 वाजता सुरुवात होईल. मतमोजणीसाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना प्रत्यक्ष मतमोजणी संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मनुष्यबळ व्यवस्थापनाची जबाबदारी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांची असून तेथील सुरक्षा तसेच फेरीनिहाय मतमोजणी करण्याकरिता आवश्यक व्यवस्था जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारींगे हे करणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतमोजणी कक्षाची रचना तयार करणे, व त्यानुसार टेबलची मांडणी, प्रसार माध्यम केंद्र, संवाद कक्ष, अग्निशमन व्यवस्था तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा आदी पायाभूत सुविधांची जबाबदारी कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांच्याकडे राहणार आहे. वाहन व्यवस्थेची जबाबदारी अन्न धान्य वितरण अधिकारी लिलाधर वार्डेकर, भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अन्न धान्य वितरण अधिकारी प्रशांत काळे तसेच अन्न व औषध प्रशासनाचे सहसंचालक एस.आर.केकरे हे करणार आहेत. सिलिंग व्यवस्था जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, मतदान यंत्राची वाहन व्यवस्था उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र भुयार आदि करणार आहेत. मतमोजणी अत्यंत पारदर्शक व सुरळीतपणे पार पडण्याच्यादृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी दिली.     
****  

कस्तुरचंद पार्क येथे सकाळी 8.00 वाजता पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रमुख सोहळा

                 

नागपूर,  दि. 30  :   महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दिनांक 1 मे 2019 रोजी  सकाळी  8.00 वाजता कस्तुरचंद पार्क येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल तसेच पथसंचलनाची पाहणी करुन मानवंदना स्वीकारतील.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनाच्या मुख्य सोहळ्यास उपस्थित राहावे, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी नागरिकांना राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी  5.30 वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
****

Monday 29 April 2019

सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.07 टक्के मतदान

लोकसभा निवडणूक चौथा टप्पा :


मुंबई दि 29:  लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.07 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
17 लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेले मतदान : नंदुरबार- 62.44 टक्के धुळे- 50.97 टक्के,दिंडोरी-58.20 टक्केनाशिक-53.09 टक्केपालघर-57.60 टक्केभिवंडी-48.90 टक्केकल्याण-41.64 टक्केठाणे-46.42 टक्केमुंबई उत्तर-54.72 टक्केमुंबई उत्तर-पश्चिम-50.44 टक्केमुंबई उत्तर-पूर्व-52.30 टक्केमुंबई उत्तर-मध्य-49.49 टक्के,मुंबई दक्षिण-मध्य-51.53 टक्केमुंबई दक्षिण-48.23 टक्के,मावळ-52.74 टक्केशिरुर-52.45 टक्के आणि शिर्डी-56.19 टक्के.

0 0 0

आता वस्त्रोद्योग आयुक्तालय

संचालनालयाच्या नाव व पदनामात बदल
नागपूर, दि.29 : राज्य शासनाच्या 24 एप्रिल 2019 रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार आता वस्त्रोद्योग संचालनालयाच्या नावात बदल करण्यात आला असूनया विभागाला आता वस्त्रोद्योग आयुक्तालयमहाराष्ट्र शासननागपूर अशी शासन मान्यता देण्यात आली असल्याचे  सहआयुक्त वस्त्रोद्योग यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
तसेच कार्यालयातील अधिका-यांच्या पदनामात संचालक ऐवजी आयुक्त  (वस्त्रोद्योग)सहआयुक्त (वस्त्रोद्योग)उप आयुक्त (वस्त्रोद्योग)प्रादेशिक उप आयुक्त (वस्त्रोद्योग)सहाय्यक आयुक्त (वस्त्रोद्योग) आणि सहाय्यक आयुक्त  (तांत्रिक) या शब्दांद्वारे बदल करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.  
याबाबत सर्व संबंधित कार्यालयेआस्थापना यांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले असूननवीन आयुक्तालयाचा तसा सुधारीत आकृतीबंध इमारतबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला असल्याचेही सहआयुक्त वस्त्रोद्योग यांनी कळविले आहे.
***** 

वस्त्रोद्योग विभागाच्या सरळसेवा पदभरतीबाबतची ‘ती’ जाहिरात खोटी


वस्त्रोद्योग आयुक्तालयाचा खुलासा

नागपूर, दि.29 : राज्य शासनाच्या सहकार वस्त्रोद्योग पणन विभागाच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात  संचालनालयाकडून सरळसेवा पदभरतीची कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नसून,व्हॉट्स ॲपवरील जाहिरात ही खोटी असल्याचे वस्त्रोद्योग प्रशासन सहसंचालक एस. एन. कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
   वस्त्रोद्योग संचालनालय नागपूर यांच्या स्तरावर लिपिक एकूण जागा 7, वाहनचालक एकूण जागा आणि शिपाई एकूण जागा 11 अशी तिन्ही मिळून या संवर्गांतील 25 पदे भरण्याबाबतची जाहिरात प्रकाशित झाल्याबाबतचा संदेश व्हॉट्स ॲपद्वारे प्रसारित होत आहे. या सर्व जागा विदर्भातील 11  जिल्ह्यासांठी असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवाय या खोट्या जाहिरातीमध्ये निवडणूक संपल्यानंतर जिल्हानिहाय पदभरती करण्यात येणार असल्याचाही खोटा दावा करण्यात आला आहे. तरी ही जाहिरात खोटी असूनवस्त्रोद्योग संचालनालयनागपूर यांच्या स्तरावरुन अशा प्रकारे पदभरती करण्याबाबत संचालनालयास कोणतेही अधिकार नसूनअशी जाहिरात संचालनालय स्तरावरुन प्रसिद्ध करण्यात आली नाही.
   तरी सदर खोट्या पदभरतीच्या अनुषंगाने कोणी मध्यस्थी असल्याचा दावा करुन फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांनी वस्त्रोद्योग संचालनालयजुने सचिवालय इमारतजीपीओ समोर सिव्हील लाईन्सनागपूर-01, दूरध्वनी क्रमांक 0712-2561247, 2526408 आणि directortextiles@rediffmail.com  या वर संपर्क साधण्याचे आवाहन सहसंचालक एस. एन. कदम यांनी केले आहे.   
*****

1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त कस्तुरचंद पार्क येथे राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रम


नागपूर, दि. 29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दिनांक 1 मे 2019 रोजी  सकाळी  8.00 वाजता कस्तुरचंद पार्क येथे राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी राष्ट्रध्वज मानवंदनेसाठी राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावे. तसेच  डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी  5.30 वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
*****

उष्माघातापासून बचावासाठी तातडीच्या उपाययोजना करा - अश्विन मुदगल


*        मे महिन्यात शाळा व महाविद्यालय बंद
*        परीक्षा, अतिरिक्त वर्ग सकाळी 11.00 पर्यंत
*         सीबीएसई, आयसीएसई शाळा सुद्धा बंद राहतील

नागपूर,  दि. 29  :  हवामान खात्याने विदर्भात उन्हाळ्याची तीव्रता अधिक राहणार असल्याचे स्पष्ट केले असून उष्ण लहरीचा घातक परिणाम आरोग्यावर पडण्याचे संकेत आहेत. उष्माघातापासून बचाव करण्याकरिता तातडीच्या उपाययोजनांतर्गत मे महिन्यात सर्व शासकीय, अशासकीय, खाजगी शाळा व विद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी  दिले आहेत.
वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना अतिप्रमाणात बसत आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिक तापमानाच्या कालावधीत विशेषत: मे महिन्यात सर्व शासकीय, अशासकीय, खाजगी शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष अश्विन मुदगल यांनी  दिले आहेत. अतिरिक्त वर्ग किंवा परीक्षा घेण्याची आवश्यकता असल्यास सकाळच्या सत्रात सकाळी 11.00 वाजेपर्यंतच शाळा व महाविद्यालये सुरु ठेवावीत. तसेच खाजगी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळा व महाविद्यालयांच्या प्रायार्यांनी मे महिन्यात शाळा बंद ठेवण्याबाबतच्या सूचना शिक्षण उपसंचालक तथा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी  देण्याचे आदेशही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत.
***

Wednesday 24 April 2019

विदर्भ पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची बैठक

            
नागपूर,दि.24: विदर्भातील पर्यटनाच्या दृष्टीने विविध पर्यटन स्थळांचा विकास करणे, पर्यटन स्थळी सोयीसुविधा उपलब्ध करुन देत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विदर्भ पर्यटन विकास महामंडळाची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी महामंडळाचे मुख्यलेखा अधिकारी तथा नियंत्रण अधिकारी दिनेश कांबळे यांनी टूर्स ऑपरेटर्स, एजंट आणि स्टेकहोल्डर्स यांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हा शासनाचा अंगीकृत उपक्रम असून राज्यामध्ये पर्यटन विकासासाठी सदैव कार्यरत आहे. या बैठकीमध्ये महामंडळाचे पर्यटक निवास, नागपूर, ताडोबा, बोदलकसा तसेच निवास न्याहारी व महाभ्रमण या योजनांची माहिती देण्यात आली तसेच विदर्भातील टूर्स ऑपरेटर्स, ट्रॅव्हल्स एजंट व स्टेकहोल्डर्स यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली व समस्यांवर निराकरण व मार्गदर्शन दिनेश कांबळे यांनी केले.
*****

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या परिणामकारक अमंलबजावणीसाठी अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा


                                                      *विभागीय दक्षता व संनियंत्रण समितीतर्फे कार्यशाळेतील सूर

नागपूर, दि. 24 :  अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयाच्या परिणामकारक अमंलबजावणीसाठी दक्षता समीतीचा कामाचा वरीष्ठ अधिका-यांनी वारंवार आढावा घ्यावा असे मत विधी व न्याय,गृहृ विभाग व समाजकल्याण  विभागातील तज्ञांनी   व्यक्त केले. विभागीय दक्षता व नियंत्रण समिती तर्फे आज विभागीय आयुकत कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.                 
या कार्यशाळेला विशेष पोलिस महानिरीक्षक, नागरी हक्क व संरक्षण विभाग, कैसर खालीद, जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. काझी, मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत सावळे, महाराष्ट्र अनुसूचित आयोगाचे विधी सदस्य सी. एल. थूल, गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंग, जिल्हाधिकारी नागपूर अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी गोंदिया कादंबरी बलकवडे कार्यशाळेला उपस्थित होते.
   सुरुवातीला जिल्हा शासकीय अधिवक्ता नितीन तेलगोटे यांनी  ॲट्रासिटी ॲक्टची प्रकरणे जलदगतीने मार्गी लागण्यासाठी  विशेष न्यायालयांची गरज अधोरेखित केली. तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक, नागरी हक्क व संरक्षण विभाग, कैसर खालीद यांनी  सादरीकरणाद्वारे अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने पोलिस विभागाशी संबंधित विविध कायदे, त्या कायद्याच्या तरतुदी तसेच कायदा राबवताना येणाऱ्या अडचणी त्याबाबतीत सखोल व विस्तृत मार्गदर्शन केले. त्यानंतर  जिल्हा न्यायाधीश ए. एम. काझी यांनी ॲट्रासिटी प्रकरणातील त्रुटी, उणिवा व संबंधित विविध कायदे व त्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश  शशिकांत सावळे यांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने न्यायालयीन प्रकरणांमध्ये उद् भवणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. तर महाराष्ट्र अनुसूचित जाती (विधी) आयोगाचे सदस्य सी. एल. थूल  यांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अनिनियमातील महत्त्वाच्या तरतुदीबाबत मार्गदर्शन केले.
मुख्य जिल्हा न्यायाधीश शशिकांत सावळे  यांनी ॲट्रासिटी कायद्यातील आवश्यक ते पुरावे गोळा करण्यावर व प्रक्रियेतील विलंब  दूर करण्यावर भर दण्याचे आवाहन केले. तर जिल्हा न्यायाधीश ए. एम. काझी यांनी तक्रारदार अथवा साक्षीदाराच्या जीवास धोका असल्यास त्यांना आधी संरक्षण द्यावे व त्यानंतर तपास करावा असे सांगितले.
कार्यशाळेत राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सी. एल. थूल यांनी अधिनियमातील तरतुदीबाबत सखोल मार्गदर्शन केले. ॲट्रासिटी सुधारित अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्रात चार स्पेशल कोर्ट नव्याने सुरु करण्यात आले आहेत. ॲट्रासिटी ॲक्टनुसार पीडितांच्या आर्थिक व सामाजिक पुनर्वसनावर भर देण्यात आला आहे. तसेच त्यांना अन्नधान्य पुरवठा आवश्यक आहे. ॲट्रासिटी केसेसवर सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवण्यासाठी आढावा बैठकी  घ्याव्यात. दक्षता समितीमधील सर्व सदस्यांना जबाबदाऱ्या ठरवून देण्यात आल्या आहेत. त्या त्यांनी गंभीरतेने पार पाडाव्यात. तसेच पीडित व्यक्तीला पात्रतेनुसार शासकीय विभागात अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी.
कार्यशाळेचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी तर आभार विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मानले. या कार्यशाळेला विभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य व गृह तसेच सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपथित होते.
******

Tuesday 23 April 2019

लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा : सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57.01 टक्के मतदान


मुंबई दि. 23 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 14 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57.01 टक्के मतदान झालेअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
14 लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेले मतदान : जळगाव 52.28 टक्केरावेर 56.98 टक्केजालना 59.92 टक्केऔरंगाबाद 58.52 टक्केरायगड 56.14 टक्केपुणे 43.63 टक्केबारामती 55.84 टक्केअहमदनगर 57.75 टक्केमाढा 56.41 टक्केसांगली 59.39 टक्केसातारा 55.40 टक्केरत्नागिरी-सिंधुदुर्ग 57.63 टक्केकोल्हापूर 65.70 टक्केहातकणंगले 64.79 टक्के.
००००

Monday 22 April 2019

नवीन दुचाकी नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी अर्ज आमंत्रित

       
नागपूर, दि. 22 :   उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (पूर्व) येथे दुचाकीसाठी नवीन मालिका MH-49-BF दिनांक 25 एप्रिल 2019 पासून सुरु होणार आहे. मालिका सुरु होण्याच्या दिवशी अर्ज कार्यालयात 11 ते 2.30 वाजेपर्यंत स्वीकारले जातील. एकाच दिवशी एकाच पसंतीचा क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सदरचा पसंती क्रमांक बंद लिफाफ्यात विनिर्दिष्ट केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रकमेचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) सादर केल्यानंतर जाहिररित्या जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्याला देण्यात येईल, याची नोंद घ्यावी. पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची पद्धतीची माहिती कार्यालयीन सूचना फलकावर उपलब्ध आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (पूर्व) यांनी कळविले आहे.
****

‘कशी कराल स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत


            मुंबईदि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  जय महाराष्ट्र’  कार्यक्रमात  कशी कराल स्पर्धा परीक्षेची तयारी’  या विषयावर स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ प्रा.मीनल मापुस्कर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दिनांक 23 एप्रिल2019 रोजी रात्री 8:00 वाजता प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
              महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणा-या परीक्षांचे स्वरूपपरीक्षांची तयारी कशी करावीवस्तुनिष्ठ अभ्यास कसा करावाअवांतर वाचन म्हणजे काय,स्पर्धा परीक्षाकरिता मार्गदर्शनाची आवश्यकतापहिली ते दहावीचा अभ्यास कसा करावापदवी चा अभ्यास करताना विषय कोणता असावा आदी विषयांची माहिती प्रा. मापुस्कर यांनी जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
000

‘दिलखुलास’मध्ये ‘विज्ञान क्षेत्रातील संधी’ या विषयावर मुलाखत

मुंबईदि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात विज्ञान क्षेत्रातील संधी’ या विषयावर करिअर मार्गदर्शक आनंद मापुस्कर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून मंगळवार दि. 23, बुधवार दि. 24 आणि गुरुवार दि.25 एप्रिल रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
            करिअरच्या दृष्टीने  विज्ञान शाखा ही एक महत्वाची शाखा मानली जाते. या शाखेतील करिअरच्या संधीदहावी व बारावी नंतरचे विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमविज्ञान शाखेच्या माध्यमातून संरक्षणकृषीसंशोधनहॅास्पिटॅलिटीवास्तुविशारद या क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या संधीकरिअरच्या दृष्टीने आवश्यक असणारी कल चाचणी आदी विषयांची माहिती श्री. मापुस्कर यांनी दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
000

Sunday 21 April 2019

फॉर्म क्रमांक 7 भरून मतदान करता येणार ही माहिती चुकीची; मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे बंधनकारकच



व्हॉट्सॲपवरील चुकीच्या संदेशाबाबत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मुंबई, दि. 21 : मतदार ओळखपत्र नसले तरी किंवा मतदान यादीत नाव नसले तरी फॉर्म क्र.7 भरून मतदान करता येते, अशी माहिती सध्या व्हॉटस्ॲप व इतर समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) व्हायरल होत आहे. ही माहिती खोटी असून फॉर्म क्र. 7 हा इतर व्यक्तिंचे नाव समाविष्ट करण्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी, स्वतःचे नाव वगळण्यासाठी, इतर कोणत्याही व्यक्तिंचे नाव मृत्यू/स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी करावयाचा अर्ज आहे. त्यामुळे हा मेसेज खोटा असून मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे, असे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिले आहे.

व्हॉटस्ॲप व फेसबुक या समाज माध्यमांवर फॉर्म 7 भरून मतदान करता येते, अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. या संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने खुलासा केला आहे. फॉर्म क्रमांक 7 हा इतर व्यक्तिंचे नाव समाविष्ट करण्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी, स्वतःचे नाव वगळण्यासाठी, इतर कोणत्याही व्यक्तिंचे नाव मृत्यू/स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी अर्ज करण्यासंदर्भातील आहे. या फॉर्मद्वारे मतदान करता येणार नाही. त्यामुळे समाज माध्यमांवर फिरणारी यासंबंधिच्या पोस्टवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. यादीत नाव असेल आणि मतदार ओळख पत्र नसले तरी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या इतर अकरा ओळखपत्रांच्याद्वारे मतदानाचा हक्क बजावता येतो, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. 
000