Monday 27 September 2021

‘हेरिटेज वॉक’ने इतिहासाच्या पाऊलखुणांना उजाळा

§ विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सहभागी § नागपूरचे ऐतिहासिक वैभव पर्यटकांपर्यंत पोहचविणार
नागपूर, दि. 27: जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘हेरिटेजवॉक’ मध्ये विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सहभागी होऊन शहरातील ऐतिहासिक वारसाच्या वैभवाची जवळून पाहणी केली. तसेच संवर्धनासोबत पर्यटकापर्यंत पोहचविण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन संचालनालयातर्फे ‘हेरिटेज वॉक’ चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे आज इतिहासाच्या पाऊलखुणांना उजाळा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला, नागपूर‍ विभाग पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई, विदर्भ हेरिटेज सोसयटीचे अध्यक्ष प्रद्युम्न सहस्त्रभोजनी यांची या उपक्रमात उपस्थिती होती. शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असून विविध परकीय आक्रमणे शहराने झेलली आहेत. या परकीय आक्रमणांमुळे मोठ्या प्रमाणावर येथील ऐतिहासिक वास्तूवैभव नष्ट झाले आहे. तरीही ऊर्वरित वास्तूंचे जतन करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांच्या सहकार्यातून जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला, पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई आणि इतिहासप्रेमी, टूर आणि ट्रॅव्हल्स एजंट यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करणार असल्याचे श्रीमती लवंगारे -वर्मा सांगितले. महाल येथील टिळक पुतळा येथे जागतिक पर्यटन दिनानिमित्त हेरिटेज वॉकला सुरुवात झाली. त्यानंतर विठ्ठल रुख्मिणी मंदिर, शुक्रवार दरवाजा, मोठा राजवाडा (सिनीअर भोसला पॅलेस) गांधी दरवाजा, कल्याणेश्वर मंदिर, गोंड किल्ला अणि चिटणवीस वाडा येथे हा ‘हेरिटेज वॉक’ समाप्त झाला. दरम्यान श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी मोठा राजवाडा येथे श्रीमती लवंगारे - वर्मा, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला यांचा शाल श्रीफळ देत सत्कार केल्यानंतर त्यांनी उपस्थितांसोबत चर्चा केली. श्रीमंत राजे मुधोजी भोसले यावेळी म्हणाले, नागपूरला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. भोसल्यांचे साम्राज्य कटक ते अटकपर्यंत होते. हा इतिहास जनतेपुढे आला नाही. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाकडून भोसल्यांचा इतिहास, वैभव नव्या पिढीपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. सतत ऑनलाईन राहणाऱ्या नव्या पिढीने इतिहासाचे वाचन करावे. तसेच पर्यटन संचालनालयाने बदलत्या परिस्थितीनुसार लोकांपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी नवतंत्रज्ञान आणि नवमाध्यमांचा वापर करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. श्रीमंत जयसिंगराजे भोसले यांनी राजवाड्यातील शाही शस्त्रागार आणि राम मंदिर, शस्त्रांबाबतची उपस्थितांना माहिती दिली. ‘पर्यटनातून सर्वांगीण विकास’ या घोषवाक्यानुसार आज दिवसभरात ‘हेरिटेज वॉक’सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नागपूर परिसरातील पर्यटनस्थळाच्या चित्रफित स्पर्धेचे बक्षीस वितरण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे सिताबर्डी किल्ल्याची भिंत, झिरो माईल येथील भिंत्तीचित्राचे ऑनलाईन लोकार्पण, तसेच पर्यटन संचालनालय आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरींग टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन वेबिनार, प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. हेरिटेज वॉकला मोठ्या प्रमाणावर शहरातील टूर्स अँड ट्रँव्हल्सचे एजंट उपस्थित होते. ******

Tuesday 7 September 2021

थोरांचा वारसा जपणे काळाची गरज - प्राजक्ता लवंगारे-वर्मा

राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात नागपूर, दि. 7 : महाराष्ट्र ही थोर संतांची भूमी आहे. अशा थोरांचा वारसा जतन करणे आज गरजेचे आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. राजे उमाजी नाईक यांच्यासारख्या राष्ट्रभक्तांच्या विचाराचा वारसा आपण जपला पाहिजे. आज नवीन पिढीला त्याचा विसर पडत चालला आहे. म्हणून महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे जतन करण्यासाठी तसेच त्यांच्या विचाराची नवीन पिढीला जाण व्हावी, यासाठी असे उपक्रम साजरे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. अतिरिक्त आयुक्त संजय ढिवरे यांनी अभिवादन केले. श्री. ढिवरे यांनीही राजे उमाजी नाईक यांच्या जीवन चरित्र्यावर प्रकाश टाकला. सहाय्यक आयुक्त शैलेंद्र मेश्राम, विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश कातकर, उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, अनिल सवई, नागपूरचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, तहसीलदार सुधाकर इंगळे, राहुल सारंग, सीमा गजभिये, मृदूला मोरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. *****

कार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा - प्राजक्ता लवंगारे-वर्मा

ि
* सुंदर माझे कार्यालय अभियानाचा प्रारंभ * स्वच्छ व सुंदर कार्यालयांचा गौरव करणार * दर तीन महिन्यांनी आढावा घेणार नागपूर, दि. 7 : कार्यालयांची कार्यसंस्कृती वाढविण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छ, सुंदर तसेच आल्हाददायक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. ‘सुंदर माझे कार्यालय’ या अभियानाच्या माध्यमातून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी सुलभ व कर्मचाऱ्यांसाठी उत्साहवर्धक वातावरण निर्माण करावे, असे आदेश विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सुंदर माझे कार्यालय या अभियानाचा कार्यपद्धतीचा आढावा श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. सुंदर माझे कार्यालय हे अभियान 30 नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. जुने सचवालय इमारतीतील सर्व विभागप्रमुखांनी या अभियानामध्ये सहभागी होवून कार्यालयासह संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा. असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. माहिती व जनसंपर्क संचालक हेमराज बागुल, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त हरिष भामरे, अर्थ व सांख्यिकी विभागाचे सहसंचालक कृष्णा फिरके, सार्वजनिक बांधकाम, नगर रचना, वस्त्रोद्योग, सहकार आदी विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. जुने सचिवालय ही ऐतिहासिक वास्तू असून या परिसरात असलेली सर्व कार्यालये स्वच्छ, सुंदर व नीटनेटकी असावी, तसेच येथील वातावरण नागरिकांसाठी सुलभ व कर्मचाऱ्यांसाठी काम करण्यायोग्य, प्रेरक, उत्साहवर्धक असणे आवश्यक आहे. सुंदर माझे कार्यालय या अभियानाच्या माध्यमातून कार्यसंस्कृती वृद्धिंगत करण्याला प्राधान्य असून कार्यालयीन शिस्त तसेच कामाच्या वेळा पाळणे आवश्यक असल्याचे सांगताना विभागीय आयुक्त म्हणाल्या की, हे अभियान तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत या अभियानातील निकषानुसार कार्यालय सुसज्ज व नेटके कसे राहील याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सुंदर माझे कार्यालय या अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्यालयाची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असून ही निवड मूल्यांकन पद्धतीने होणार आहे. यासाठी कार्यालय प्रमुखांनी तीन टप्प्यात काम करणे आवश्यक असून यामध्ये कार्यालयाची स्वच्छता, कार्यपद्धती व सुलभीकरण, कर्मचारी लाभविषयक प्रकरणे व इतर बाबी, अभिलेख्यांची वर्गवारीनुसार विभागणी तसेच अनावश्यक साहित्याचे निर्लेखीकरण यावर विशेष कार्य करण्याची आवश्यकता आहे. अभिलेख्याच्या वर्गवारीसाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. आपले कार्यालय स्वच्छ व सुंदर ठेवा कोविडच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता तसेच डेंग्यू डासांच्या उत्पत्तीमुळे निर्माण झालेली परिस्थिती टाळण्यासाठी संपूर्ण कार्यालय स्वच्छ राहून डासांची उत्पत्ती होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना करताना श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या की, कार्यालयातील कुलर तसेच अनावश्यक सर्व फर्निचर यांची येत्या पंधरा दिवसांत विल्हेवाट लावावी. कार्यालयातील मोकळी जागा, स्वच्छतागृहे येथे घाण साचणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जुने सचिालय इमारतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, परिसरातील उपयोगात नसणारी सर्व वाहने निर्लेखित करावी तसेच कार्यालयातील अनावश्यक साहित्य संगणक, अभिलेखे यासंदर्भात योग्य नियोजन करुन कार्यवाही करावी. कार्यालयाच्या व परिसराच्या स्वच्छतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार करुन प्रत्येक कार्यालयाकडे वापरात असणाऱ्या जागेच्या स्वच्छतेसाठी शुल्क आकारणीचे नियोजन करावे, अशा सूचना बैठकीत दिल्या. प्रारंभी उपायुक्त हरिष भामरे यांनी ‘सुंदर माझे कार्यालय’अभियानासंदर्भात माहिती देवून सर्व कार्यालयांनी अभियानामध्ये सहभाग घ्यावा, अशी माहिती यावेळी दिली. कार्यालय व परिसर स्वच्छतेबद्दल यावेळी विभागप्रमुखांनी विविध सूचना केल्या. *****

Monday 6 September 2021

नागपूर तिसऱ्या लाटेच्या वाटेवर कडक निर्बंध लावणार - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर, दि. 6 :गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्याने कोरोना बाधितांची दोन आकडी संख्या पुन्हा गाठली आहे. ही धोक्याची घंटा असून जिल्हा नागपूर ‍तिसऱ्या लाटेच्या वाटेवर आहे. त्यामुळे वेळीच निर्बंध लावणे आवश्यक आहे. पुढील दोन-तीन दिवसात व्यापारी, उद्योजक व अनुषंगिक घटकांच्या बैठकी घेवून नागपूर जिल्ह्यामध्ये कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज कोरोनासंदर्भात आढावा घेण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आढावा बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी विमला आर., महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त अस्वती दोरजे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, आएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर व कोविड टास्क फोर्सचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोविडसोबतच डेंग्यूसंदर्भातही आढावा घेण्यात आला. सध्या शहरामध्ये डेंग्यूची रुग्णवाढ होत असून त्याचे विश्लेषण वैद्यकीय तज्ज्ञाकडून केले गेले. तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याला लक्षात घेवून सध्या मेडिकलमध्ये दोनशे खाटा कोविडसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता जिल्ह्यामध्ये आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरापर्यंत ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची उपलब्धता करण्यात आली आहे. असा आढावा विविध विभागामार्फत सादर करण्यात आला. या बैठकीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने आवश्यकता नसताना घराबाहेर पडत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी उत्सव, सण, कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करणे अत्यावश्यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. सध्या गेल्या दोन दिवसांपासून बाधित रुग्ण दोन आकडी संख्येत वाढले आहेत. अशीच सुरुवात दुसऱ्या लाटेची देखील झाली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेची सुरुवात जिल्ह्यात झाली आहे. असे समजून उपाययोजना करण्याबाबत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी एकमत व्यक्त केले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची व शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यवसायी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या बैठकी घेवून कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा, पुढील तीन दिवसांत यासंदर्भातील निर्णय घोषित करावा, अशी सूचना त्यांनी केली. सध्या रात्री दहापर्यंत हॉटेल्स सुरु आहेत. त्यावेळेत कपात करण्याबाबतचे सुतोवाच या बैठकीत करण्यात आले. प्रशासनामार्फत पुढील तीन दिवसानंतर नागपूर जिल्ह्यातील निर्बंधाची घोषणा केली जाणार आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, गर्दी टाळणे आवश्यक असून दोन लसी घेतलेल्या नागरिकांपासून सगळ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ****

Saturday 4 September 2021

भारतीय कंपनी सचिव संस्थानामुळे नागपूरच्या शैक्षणिक समृद्धीत भर -डॉ. नितीन राऊत

भारतीय कंपनी सचिव संस्थान ही राष्ट्रीय शिक्षण संस्था आहे. या शैक्षणिक संस्थेमार्फत कंपनी सचिव अभ्यासक्रमाचा लाभ येथील विद्यार्थ्यांना मिळत असून शहराच्या समृद्धीतही भर पडली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. वर्धा रोडवरील हॉटेल ली मेरिडीयन येथे भारतीय कंपनी सचिव संस्थानातर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करतांना डॉ.राऊत बोलत होते. माजी न्यायाधीश विजय डागा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय कंपनी सचिव संस्थानाचे राष्ट्रीय अध्यक्ष नागेंद्र राव, राष्ट्रीय उपाध्यक्ष देवेंद्र देशपांडे, विभागीय अध्यक्ष पवन चांडक, नागपूर विभागाच्या अध्यक्षा खुशबू पसारी, सचिव रेश्मा मिटकरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ.राऊत म्हणाले, आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत विविध उद्योगधंद्याना शासनामार्फत प्रोत्साहन दिले जात आहे. कोणताही उद्योग व्यवसाय विकसित करतांना कंपनी सचिवाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. भारतीय कंपनी सचिव संस्थानाचा अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम शहरात उपलब्ध झाल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना निश्चितच मदत होणार आहे. या शिक्षण संस्थेत देशभरातील तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून 55 हजार नोंदणीकृत सदस्य आहेत. तर नागपूर शहरात दोन हजार विद्यार्थी या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत असून 350 नोंदणीकृत सदस्य आहेत. देशाच्या आर्थिक विकासासाठी अशा शिक्षण संस्थाचे महत्त्व वादातीत असल्याचे ते यावेळी म्हणाले. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतांना कोरोना मार्गदर्शक नियमावलींचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाचे संकट अजून गेलेले नसून विद्यार्थ्यांचे जास्तीतजास्त प्रमाणावर कोरोनाचे लसीकरण करुन घ्यावे, असेही ते म्हणाले. न्यायाधीश डागा म्हणाले, उद्योग अधिक विकसित होण्यासाठी कंपनी सचिवाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. उद्योग उभारणी आणि ते चालविण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. यासाठी कंपनी सचिवाचे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण असल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय कंपनी सचिव संस्थानातर्फे पालकमंत्र्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तुषार पहाडे, दिप्ती जोशी, रोहन मेहरा, शांतनू जोग आदी यावेळी उपस्थित होते. भारतीय कंपनी सचिव या संस्थेच्या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध विषयातील तज्ज्ञ मंडळीनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रियंका श्रीवास्तव तर आभार सचिव रेश्मा मिटकरी यांनी मानले. *****