Tuesday 22 December 2020

 

मुद्रांक शुल्क दस्त नोंदणीच्या सवलतीमध्ये 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

·         चार महिन्यापर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ मिळणार

·        दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये गर्दी करु नये

नागपूर दि. 22:  राज्यात कोरोनामुळे मालमत्ता खरेदीसंदर्भातील मुद्राक शुल्कांमध्ये राज्य शासनाने दोन टक्के दराने सवलत दिली होती. आता 1 जानेवारी 2021 ते 31 मार्च 2021 दरम्यान नोंदणी शुल्कामध्ये 1.5 टक्क या दराने सवलत देण्यात आली असल्याचे सह जिल्हा निबंधक अशोक उघडे यांनी कळविले आहे.

 राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अधिसूचनेनुसार कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्री करारपत्राच्या दस्तऐवजावर या अधिनियमान्वये आकारणी योग्य असलेल्या मुद्रांक शुल्कावर  ही सवलत देण्यात येत आहे. तथापि दस्त निष्पादनाच्या दिनांकास मुद्रांक शुल्क भरल्यानंतर असे मुद्रांकीत दस्तनोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार दस्त निष्पादनापासून चार महिन्यापर्यंत नोंदणी करता येईल. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्क लावून निष्पादित केलेल्या दस्तऐवजांना पुढील चार महिने मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ मिळणार असल्याने पक्षकारांनी कोरोना संक्रमणकाळात दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

 ****

 

‘स्मार्ट’ प्रकल्पासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

·        पात्र संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन

·        वैयक्तिक शेतकरी पात्र राहणार नाही

नागपूर दि. 22:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गंत ‘बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन’ म्हणजे स्मार्ट प्रकल्पाचा नुकताच प्रारंभ करण्यात आला असून, त्याचा लाभ घेण्यासाठी पात्र संस्थांनी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत ण्याचे आवाहन प्रकल्पाचे नोडल अधिकारी तथा कृषी उपसंचालक अरविंद उपरीकर यांनी केले आहे.

 राज्यात या प्रकल्पाची 2027 पर्यंत अंमलबजावणी करण्यात येणार असून, या प्रकल्पाला 11 विविध  अंमलबजावणी यंत्रणांसह जागतिक बँक सहाय्य करत आहे. लहान व सीमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्य साखळी विकासासाठी मदत करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यात येत असून, समुदाय आधारित संस्थांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी माविमचे लोकसंचालित साधन केंद्र, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महिला बचत गटाचे प्रभाग संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था स्मार्ट प्रकल्पामध्ये लाभार्थी असतील.

या प्रकल्पामध्ये उत्पादक –भागीदार उप प्रकल्प, बाजार संपर्क वाढ, धान्य गोदाम आधारित प्रकल्प, नाविन्यपूर्ण पूरक प्रकल्प व कापूस मूल्य साखळी विकास उपप्रकल्प समुदाय आधारित संस्था सहभागी होऊ शकतात. या संस्था शेतमाल, शेळ्या आणि परसबागेतील कुक्कुटपालन यांच्या मूल्य साखळी विकासाच्या प्रकल्पासाठी अर्ज करु शकतात. निवड झालेल्या प्रकल्पांना 60 टक्क्यांपर्यंत पायाभूत सुविधा निर्मिती व तांत्रिक सहाय्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येणार असून, www.smart-mh.org या संकेतस्थळावर अर्ज करायचे आहेत. या प्रकल्पासाठी खरेदीदार म्हणून संस्थात्मक नोंदणीकृत खरेदीदारांनी प्रपत्र 5 भरावे. योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   

 ****

Wednesday 16 December 2020

ऑनलाईन शस्त्रखरेदी करण्यास आता बंदी

   नागपूर, दि.16 : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, शॉपक्युज यासारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन ऑनलाईन पध्दतीने शस्त्र खरेदी करण्यावर आता बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारे ऑनलाईन शस्त्र खरेदी करावयाची असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कळवले आहे.

            वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील काही गंभीर गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली शस्त्रे ऑनलाईन पध्दतीने खरेदी केल्याचे लक्षात आले आहे. अशाप्रकारे ऑनलाईन माध्यमातून गुन्हेगारांना  शस्त्र सहजरित्या घरपोच उपलब्ध होत आहे. त्यामुळे ऑनलाईन शस्त्र विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

             या निर्बंधानुसार प्राणघातक शस्त्रांची 9 इंचापेक्षा जास्त लांबी आणि 2 इंचापेक्षा जास्त पात्याची रुंदी असणारे तीक्ष्ण शस्त्र बाळगणे हा कायदेशीर दखलपात्र गुन्हा आहे. अशा प्रकारे शस्त्रांची कोणी खरेदी करीत असल्यास संबंधित ग्राहकाची विस्तृत माहिती पोलिसांना देणे अनिवार्य आहे. त्यामध्ये खरेदी  करणाऱ्या व्यक्तीचे पूर्ण नाव  व पत्ता, मोबाईल नंबर ई-मेल आयडी, खरेदी केलेल्या शस्त्राचा प्रकार, शस्त्राचा फोटो, खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा पत्ता इत्यादी माहिती ऑनलाईन खरेदीची ऑर्डर आल्यानंतर नागपूर पोलिसांच्या ई-मेल आयडीवर (dcpcrime@nagpurpolice.in) द्यावी. तसेच ऑनलाईन शस्त्राची पोच झाल्यानंतर याबाबत वरील ई-मेल आयडीवर कळवावे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती फौजदारी तसेच व इतर कारवाईस पात्र राहील, असे अमितेश कुमार यांनी कळवले आहे.

******

 

 

रोजगार मेळाव्यासाठी 20 पर्यंत ऑनलाईन नोंदणी

  

    नागपूर, दि.16: कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत आयोजित ऑनलाईन महारोजगार मेळाव्यास जिल्ह्यातील युवक-युवतींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे ऑनलाईन नोंदणीची मुदत आता 20 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. बेरोजगार युवक-युवतींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त  प्र.ग. हरडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे 12 डिसेंबरपासून सुरु झालेल्या मेळाव्यात आजपर्यंत जवळपास सात हजार उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली असून, नोंदणी प्रक्रियेला मिळालेला प्रतिसाद पाहून ही मुदत वाढविण्यात आली आहे.  

राज्यस्तरीय महारोजगार मेळावा http//www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर आयोजित करण्यात आला आहे. नागपूर विभागाला साडे आठ हजार तर नागपूर शहराला चार हजार उमेदवारांचे लक्ष्यांक दिले आहे. आतापर्यंत निरनिराळ्या क्षेत्रातील 6 हजार 680 पदांबाबत मागणी प्राप्त झाली असून, येत्या दोन- तीन दिवसात 8 हजार जागांबाबत मागणी प्राप्त होण्याची शक्यता आहे. तसेच आतापर्यंत 6 हजार 748 उमेदवारांनी निरनिराळ्या पदांसाठी नोंदणी केली आहे.

ऑनलाईन मेळाव्यात उच्चशिक्षित तसेच अशिक्षित उमेदवारांनाही रोजगाराच्या संधी प्राप्त हो असून डॉक्टर्स, नर्स, रुमबॉय, एचआर मॅनेजर, सुरक्षा रक्षक तसेच आयटीआय प्रशिक्षण प्राप्त टर्नर, फिटर, प्लंबर, मशिनिस्ट, मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, सीएनसी ऑपरेटर, ब्रायलर अटेंडंट, कुशल व अकुशल कामगार, तंत्रनिकेतन पदविका, अभियांत्रिकी पदवी, कृषी पदवीधर, व्यवस्थापनातील पदवी, लेखापाल इत्यादी विविध क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध हो आहेत.

            कोरोनाच्या संकटाने अर्थचक्र काही प्रमाणात संथ झाले होते. रोजगाराच्या संधीद्वारे अर्थचक्र गतिमान करण्यासाठी शासनाने राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आयोजित केला आहे.  बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करुन हमखास नोकरी मिळवावी. त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असल्याचे श्री. हरडे यांनी सांगितले.

***

 

Thursday 10 December 2020

  शहरात साडेसहा हजारांवर नोकरीच्या संधी 

तरुणांना एका क्लिकवर मिळणार रोजगार 

Ø  12 व 13 डिसेंबर रोजी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन                                                               

 

नागपूर, दि10 :  कोरोनाच्या संकटात अनेकांचा रोजगार हिरावला गेला होता. यातून अनेकांना दिलासा मिळणार आहे. महारोजगार मेळाव्याने महास्वयम ॲपद्वारे क्लिकवर नागपूर शहरात 6 हजार 564 नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. नागपूर विभागात तब्बल 8 हजार890 इतक्या संधींद्वारे बेरोजगारांसाठी नोकरीची दारे उघडणार आहेत. यासाठी बेरोजगारांनी  ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन कौशल्य विकास विभागाद्वारे करण्यात आले आहे.

उच्चशिक्षित उमेदवारांपासून ते अशिक्षित उमेदवारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार असून डॉक्टरनर्सरुमबॉयएचआरमॅनेजरगार्ड पर्यंत तसेच आयटीआय प्रशिक्षण प्राप्त टर्नरफिटरप्लंबरमशिनिस्टमोटार मॅकनिकडिझेल मॅकेनिकसीएनसी ऑपरेटरब्रायलर अटेंडंटकुशल व अकुशल कामगारतंत्रनिकेतन पदविकाअभियांत्रिकी पदवीकृषी पदवीधरव्यवस्थापनातील पदवीलेखापाल इत्यादी विविध क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

            येत्या 12 व 13 डिसेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याअनुषंगाने आयुक्तालयामार्फत http//www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर रोजगार मेळाव्याचा आयोजन करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून लाख उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये नागपूर विभागाला हजार 500 उमेदवारांचे लक्ष्य दिलेले असून नागपूर शहराला हजार उमेदवारांचे लक्ष्य दिलेले आहे.

            उच्चशिक्षित उमेदवारांपासून ते अशिक्षित उमेदवारांना रोजगाराच्या हमखास संधी प्राप्त होणार असून डॉक्टरनर्सरुमबॉयएचआरमॅनेजरगार्ड पर्यंत तसेच आयटीआय प्रशिक्षण प्राप्त टर्नरफिटरप्लंबरमशिनिस्टमोटार मेकॅनिकडिझेल मेकॅनिकसीएनसी ऑपरेटरब्रायलर अटेंडंटकुशल व अकुशल कामगारतंत्रनिकेतन पदविकाअभियांत्रिकी पदवीकृषी पदवीधरव्यवस्थापनातील पदवीलेखापाल इत्यादी विविध क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

राज्यात साधारणत: एक लक्षपेक्षा अधिक बेरोजगार उमेदवारांना या महारोजगार मेळाव्यातून रोजगार उपलब्ध करुन देण्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी  आश्वस्त केले आहे. स्मार्ट फोन वापरणारे उमेदवार महास्वयम ॲप (Mahaswayamapp) डाऊनलोड करुन सुद्धा या सुविधांचा लाभ घेवू शकतो. विशेष म्हणजे मेळाव्यासाठी कोणतेही शुल्क नसून या मेळाव्यात उमेदवरांना  मोफत सहभाग घेता येईल.

तरी उपलब्ध रोजगार संधीनुसार विभागातील व जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी  या रोजगार मेळाव्या माध्यमातून आालेल्या संधीचे सोने करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त प्रभाकर हरडे यांनी केले आहे.

****

  सिकलसेल सप्ताहाला आजपासून प्रारंभ                           

नागपूर, दि.10:  जिल्हास्तरीय सिकलसेल सप्ताहाचे उद्घाटन उद्या (ता. 11) रोजी सकाळी अकराला डागा स्त्री रुग्णालय येथे करण्यात येणार आहे. या सप्ताहादरम्यान सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये सिकलसेलग्रस्त रुग्णांना आरोग्य तपासणी शिबिरामध्ये नि:शुल्क औषधोपचार मिळेल. 

सामान्य नागरिक तसेच रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार, 15 डिसेंबरला डागा स्त्री रुग्णालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 5 ते 18 वर्षे वयोगटातील सिकलसेल रुग्णांसाठी 2 डी ईकोची नि:शुल्क तपासणी करण्यात येईल. तसेच डागा स्त्री रुग्णालयात या सप्ताहादरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी शिबीरामध्ये रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

*****  

Tuesday 8 December 2020

 

जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

नागपूर, दि. 8 :  जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे  महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी  त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उप जिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. अर्चना कोठारी आदी मान्यवरांनी यावेळी श्री. जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

                                                                         *****



 



विभागीय आयुक्त कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त अभिवादन
नागपूर
, दि. 8 :  विभागीय आयुक्त कार्यालयात संत संताजी जगनाडे  महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त चंद्रभान पराते यांनी  त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (विभागीय चौकशी) शैलेश मेश्राम यांनी पुष्पार्पण करुन अभिवादन केले. आयुक्त कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

****

 



दिव्यांग बालकांच्या जन्मापासूनच उपचाराला प्राधान्य

                                              -रविंद्र ठाकरे

दिव्यांगासाठी शिघ्र निदान व उपचार केंद्राची सुरुवात

        नागपूर, दि. 8 : मतिमंद अथवा दिव्यांग असलेल्या बालकांची विशेष काळजी घेताना त्यांच्या संगोपनासोबतच वैद्यकीय उपचारासाठी शिघ्र निदान व उपचार केंद्र पालकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. कुटुंबातील  दिव्यांग बालकाबाबत पालकांनी  अधिक जागृतपणे संगोपन करण्यासाठी या उपचार केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

            उत्तर अंबाझरी मार्गावरील दिव्यांगासाठी मुक आणि बधीर औद्योगिक संस्थेत विद्यार्थ्यांसाठी शिघ्र निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

            यावेळी  जिल्हा समाज कल्याण अधीक्षक प्रवीण मेंढे, मुकबधीर औद्योगिक संस्थेच्या प्राचार्या डॉ. सौ. मीनल सांगोळे, वाचार उपचार तज्ज्ञ सौ. अरुणा आढाव आदी उपस्थित होते.

            दिव्यांग बालकांचे निदान व उपचार वेळीच केल्यास त्यांचे पुनर्वसन करणे सोयीचे असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी  रविंद्र ठाकरे म्हणाले की, दिव्यांग बालकांचे संगोपन ही मोठी  जबाबदारी असल्यामुळे पालकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करतानाच शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी शिघ्र निदान व  उपचार केंद्राची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. या केंद्रामार्फत अशा पालकांचे समुपदेशन करण्यासोबतच विविध सोयी व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रविंद्र ठाकरे यांनी केले.

            मुक आणि बधीर औद्योगिक संस्था, शंकरनगर या संस्थेमार्फत उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. सहा वर्षापर्यंतच्या वयोगटातील बालकांचे निदान व दिव्यांगांचे प्रकार वेळीच निदर्शनास आणून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी ही संस्था पुढाकार घेणार आहे. या संस्थेमार्फत दिव्यांगांसाठी विशेष सवलती सुद्धा उपलब्ध आहेत.

            प्रारंभी मुक आणि बधीर औद्योगिक संस्थेच्या प्राचार्या डॉ. सौ. मीनल सांगोळे यांनी स्वागत करुन केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सौ. अरुणा आढाव यांनी  उपचार केंद्राबद्दल पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिक्षकांनी तयार केलेल्या पथनाट्याबद्दल माहिती दिली. यावेळी दिव्यांग संस्थेच्या सौ. वर्षा साठवणे, श्रीमती मीनाक्षी गुंडेवार, राजेंद्र आढाव तसेच  शिक्षक-पालक आदी उपस्थित होते.

*****





 कोरोना विषाणू लसीकरणाबाबत सर्व स्तरावर सूक्ष्म नियोजन करा

                                      - जिल्हाधिकारी ठाकरे

·         कोविड लसीकरण मोहिमेबाबत जिल्हा टास्क फोर्सची आढावा बैठक




·      
जिल्हा प्रशासनाची लसीकरणासाठी तयारी सुरु

नागपूर, दि. 8: कोरोना विषाणूवरील लस डिसेंबर महिन्याच्या अखेर अथवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्सेस तसेच जोखमीच्या रूग्णांना प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात येईल. प्रत्येक कोरोना योध्याला लसीकरण करण्यात येईल, यासाठी आरोग्य विभागाने सर्व स्तरावर सूक्ष्म नियोजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज मंगळवारी येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे कोरोना विषाणू लसीकरणाबाबत करावयाच्या नियोजनासंदर्भात जिल्हा टास्क फोर्सची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उप जिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचे अश्विनी नागर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. महम्मद साजीद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक थेटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. अर्चना कोठारी आदी यावेळी उपस्थित होते.

कोरोना विषाणूवरील लसीकरण मोहीम ही शहर ते ग्रामीण पातळीपर्यंत राबवायची आहे. याबाबत नियोजन करताना श्री. ठाकरे म्हणाले, लसीकरणाचा लाभ वैद्यकीय क्षेत्राला सर्वप्रथम दिला जाईल. यासाठी महानगरपालिका क्षेत्र तसेच पंचायत समितीअंतर्गत रुग्णालयांनी त्यांच्या येथील डॉक्टर्स तसेच नर्सेस यांची लसीकरणासाठी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी केलेल्यांची संपूर्ण माहिती ही केवळ लसीकरणाच्या नियोजनासाठीच वापरण्यात येणार आहे. ॲलोपॅथीप्रमाणेच आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी उपचार करणाऱ्या डॉक्टर्स तसेच नर्सेसचा यात समावेश करण्यात येणार आहे. कोरानावरील लसीकरण म्हणजे पूर्णत: सुरक्षा नसून नंतरच्या कालावधीतही काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लसीकरणासाठी जिल्ह्यामध्ये एकूण 597 लस टोचणाऱ्यांची (नर्सिंग स्टाफ) संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये महानगरपालिकेकडील 209 तर ग्रामीण भागातील आरोग्य विभागातील 388 नर्सेसचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 661 ठिकाणी लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येईल. त्यामध्ये महानगरपालिका हद्दीत 902 तर ग्रामीण भागात 1 हजार 759 लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येतील. लस टोचणाऱ्या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी केल्या जाईल. तसेच लसीकरण केलेल्या व्यक्तीला अर्धा तास लसीकरण केंद्रावर थांबविण्यात येईल. लसींच्या साठ्यांसाठी सर्व केंद्रांवर शीत कपाटे उपलब्ध राहतील, अशी माहिती श्री. नागर यांनी यावेळी दिली.

महानगरपालिका क्षेत्राच्या रुग्णालयातील लसीकरणासंदर्भात स्टाफ नर्सेसची नाव नोंदणी सुरु आहे. नाव नोंदणीनुसारच लसीकरण करण्यात येईल. यासाठी  ज्यांनी अद्यापही नाव नोंदणी केली नाही त्यांनी तातडीने नाव नोंदणी करावी, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.

*****