Tuesday 30 June 2020

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विधान भवन येथे अभिवादन

नागपूर, दि. १ : हरित क्रांतिचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवन येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
नागपुरातील विधान भवन परिसरात सहायक अभियंता  संजय सतदेवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रा. मोहन चव्हाण, तुकाराम चव्हाण, शिक्षणाधिकारी श्रीराम चव्हाण यांच्यासह अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. 
******

Monday 29 June 2020

राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा


शाश्वत विकासाच्या ध्येय्यामधील
उत्तम आरोग्याची सुनिश्चिती  
        नागपूर, दि. 29शाश्वत विकासाच्या ध्येयामधील उत्तम आरोग्याची सुनिश्चिती व चांगल्या जीवनमानास चालना, लिंग समभाव या मध्यवर्ती संकल्पनेवर अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला.
            विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सांख्यिकी तज्ज्ञ व भारतीय सांख्यिकीचे जनक प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबीस यांचा जन्मदिवस सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रादेशिक सहसंचालक कृष्णा फिरके यांनी महालनोबीस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी नियोजन उपायुक्त ध. ग. सुटे, सहसंचालक प्र. श्रा. डायरे, उपसंचालक श्रीमती स. मि. मुऱ्हेकर तसेच जिल्हा सांख्यिकी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
            राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्त केंद्र व राज्य शासनातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे अर्थ व सांख्यिकी संचालक र. र. शिंगे यांच्या अध्यक्षतेखाली गुगलमिटद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतिरिक्त संचालक वि. कृ. अहेर, जितेंद्र चौधरी, वामन काळे यांनी अर्थ व सांख्यिकी दिनानिमित्त संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
            यावर्षाकरीता सांख्यिकी दिनाची मध्यवर्ती संकल्पना, शाश्वत विकासाचे ध्येयामधील उत्तम आरोग्याची सुनिश्चिती व चांगल्या जीवनमानास चालना व ध्येय,लिंग समभाव याबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळेस मा. संचालकांनी शाश्वत विकासाचे ध्येय साध्यतेच्या मोजमापाकरीता वेगवेगळ्या विभागाकडील निर्देशांक तयार करुन त्यांना मॉनिटर करण्याकरीता प्रथम प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगून राज्य निर्देशांक तयार करण्यात येत असून त्यानुसार विकास ध्येयाचे मोजमाप करण्यात येत असल्याचे सांगितले.  उत्तम आरोग्याची सुनिश्चिती व चांगल्या जीवनमानास चालना याकरीता आरोग्य सेवेचा दर्जा वाढविणे, त्याकरीता राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य सेवेकरीता निधीत वाढ करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच राज्याची सांख्यिकीय माहिती गोळा करण्याची प्रणाली मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
*****

कोरोनामुक्त झालेल्या 1 हजार 148 रुग्णांना डिस्चार्ज

  • 282 बाधित रुग्णांवर उपचार सुरु      
        नागपूर, दि. 29कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर प्रभावी व परिणामकारक उपचारांमुळे 1 हजार 148 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात 282 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर विशेष तयार करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
            कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यास प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 473 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 1 हजार 148 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे, तर 282 बाधित रुग्ण येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील कोविड रुग्णालयात 156 रुग्ण उपचार घेत आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 86, कामठी येथील मिल्ट्री हॉस्पिटल येथे 18 तर नागपूर एम्स येथे 22 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 25 कोरोनाबाधित रुग्ण दगावले असून त्यापैकी 10 रुग्ण हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत.
            नागपूर शहर व जिल्ह्यात एकत्र विशेष शोध मोहीम राबविण्यात येत असून ज्या नागरिकांमध्ये कोरोना विषाणूसंदर्भात संशय आहे, अशा नागरिकांची तात्काळ तपासणी करण्यात येत आहे. शोध मोहिमेमध्ये आढळून आलेल्यापैकी 263 नागरिकांना होमकॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आयसोलेशन सेंटरमध्ये 1 हजार 330 भरती करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
*****

संजिवनी सप्ताह 1 ते 7 जुलै दरम्यान राबविणार


        नागपूरदि. 29 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात येतो. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे आता ग्रामस्तरावर दिनांक 1 ते 7 जुलै 2020 दरम्यान  संजिवनी  सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
            शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी यावर्षी ‘पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ’ या त्रिसुत्रीचा अवलंब कृषी विभाग शासनाच्या निर्देशनुसार करणार आहे. या सप्ताहात खरीप हंगाम 2020 यशस्वी करण्यासाठी  व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, आत्मा, कृषी व कृषी संलग्न विभाग यांच्या सहकार्याने कृषी संदर्भातील माहिती या सप्ताहात  शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
            सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात आयोजित करण्यात येत असलेल्या कृषी संजीवनी  सप्ताह कार्यक्रमात सहभागी होवून कृषी ज्ञानाच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी केले आहे.
*****

निवृत्ती वेतनधारकांना सूचना

        नागपूरदि. 29 :  संगणक प्रणालित काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे  माहे  जून, 2020 चे निवृत्तीवेतन दिनांक 6 जुलै 2020 पर्यंत संबंधित बँकेमार्फत होईल. सर्व शासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी प्रकाश आकरे यांनी केले आहे.
                                                                                                 **** 

Saturday 27 June 2020

औद्योगिक आस्थापनांनी कोरोनाबाबतचे निर्देशाचे कठोर पालन करावे - रविंद्र ठाकरे

नागपूर, दि. 27 : जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळले आहेत. याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून सर्व औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांची तपासणी करण्यात येणार आहे. उद्योग आस्थापनांमध्ये शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांच्या पालनाबाबत तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, निर्देशांचा भंग करणाऱ्या औद्योगिक आस्थापनांवर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिलेत.  
  कोरोना विषाणूचे रुग्ण ग्रामीण भागातही आढळून येत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील   हिंगणा व बुटीबोरी  या दोन्ही औद्योगिक वसाहती ग्रामीण क्षेत्रात येतात. हिंगणा औद्योगिक वसाहतीमध्ये तीन उद्योगातील कामगारांना लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात येत आहे. 
शासनाच्या निर्देशित नियमावलीनुसार कामाच्या ठिकाणी मास्क किंवा फेस कव्हर घालणे, प्रवेशद्वार, सभेचे हॉल, मोकळी जागा, व्हरांडा, भिंती, यंत्रसामुग्री, लिफ्ट, वॉशरुम, टॉयलेट, जेवणाची जागेचे दररोज निर्जंतुकीकरण करणे, कामगारांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्कॅनिंग सुविधा ठेवणे, वारंवार हात धुण्याची व्यवस्था व सॅनिटायझरची सुविधा,  गैरहजर असणाऱ्या कामगाराचा तपशील ठेवणे, गैरहजर असल्यास त्या कारणाचा तपशील ठेवणे, सामाजिक अंतर ठेवणे, कामगारांच्या जेवणाच्या वेळा विभागून देणे, लिफ्टऐवजी पायरींचा वापर आणि तंबाखू -गुटखा वापरावर बंदी घालण्याचे निर्देश आहेत.
या विशेष मोहीमेअंतर्गत हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील 900 उद्योगांची तपासणी पूर्ण झाली असून,  त्यासाठी विविध विभागातील 90 अधिकारी - कर्मचाऱ्यांची नियुक्ती  केली आहे. या तपासणीमध्ये ज्या उद्योगांनी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिले आहेत. 
*****

बकरा मांस निर्यातीसाठी अद्ययावत सुविधा उभारणार - सुनील केदार

     
    नागपूर, दि. 27 : पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून कृषीपूरक व्यवसायाला चालना देतांना  नागपुरात बकरा  निर्यातीसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली. मिहान येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
 खासदार कृपाल तुमाने, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातूरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी (मिहान) प्रकाश पाटील, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. के. एस. कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन आरोग्य अधिकारी डॉ. ए. जी. ठाकरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, कस्टम विभागाचे विवेक सिरीह, कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजेश भुसारी, एमआयएलचे एम. ए. आबेद रुही, कार्गोचे यशवंत सराटकर यावेळी उपस्थित होते.  
टाळेबंदी संपल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पशुसंवर्धन हा महत्त्वपूर्ण विभाग ठरणार आहे. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण असून रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने जोडले गेले आहे. आतापर्यंत विदर्भासह मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात येथील बकरा मांस हैद्राबाद येथून निर्यात केले जात असे. मात्र आता नागपुरातूनच बकरा मांस विदेशात निर्यात केले जाणार आहे. भविष्यात नागपूर हे बकरा निर्यातीचे मोठे केंद्र होणार असून, कळमना बाजार समितीमध्ये पशुधनासाठी मोठे आणि अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त केंद्र उभारण्यात येणार आहे. निवारा केंद्र आणि विमानतळ असे दोन ठिकाणी निर्यातीपूर्वी पशुधनाची तपासणी करणारे हे देशातील पहिले केंद्र असेल. त्यासाठी पशुसंवर्धन विभागातील शेळीपालन महामंडळाकडील आवश्यक निधी तात्काळ मंजूर करून दिला जाईल असे श्री. केदार म्हणाले. 
कस्टम विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच बोकड कापणी, पॅकेजिंग व विक्री आदीबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करुन निर्यात केली जाईल. निर्यातीसाठी आवश्यक सर्व तपासण्या कळमना मार्केट आणि विमानतळावर केल्या जातील. देशातील इतर विमानतळाच्या तुलनेत नागपूर येथून जास्त निर्यात होणार आहे. निर्यात करताना चांगल्या प्रतिचे, तात्काळ उपलब्ध होणारे आणि उत्तम पद्धतीचे बकरे उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येईल. त्यामुळे भविष्यातील निर्यातीसाठी येथील बकरा निर्यात मार्केटमध्ये मोठी मागणी वाढेल. परिणामी कृषीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसायास अधिक प्रोत्साहन मिळेल. हे काम विहित कालमर्यादेतच पूर्ण करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री श्री. केदार यांनी दिले.  
  विदर्भातील शेतकऱ्यांना केवळ शेतीवर विसंबून न राहता, त्यांना कृषिपूरक व्यवसायाकडे वळवून अतिरिक्त उत्पादनाचे स्रोत निर्माण करण्यावर पशुसंवर्धन विभागाचा भर राहणार आहे. विदर्भातील बकऱ्याचा दर्जा आणि चव उत्तम असून मोठी बाजारपेठ उभारण्याचे काम सुरु असल्याचे ते म्हणाले.   
टाळेबंदीनंतर सेवा, उद्योग, व्यापार क्षेत्र वाढीसाठी मोठा कालावधी जावू शकतो. मात्र, कृषीक्षेत्र आणि त्यास पूरक असलेले इतर क्षेत्र यातून लवकर गती घेतील, असा विश्वास व्यक्त करताना श्री. केदार यांनी केंद्र शासनाच्या मदतीने महाराष्ट्र शासन दोन हजार कोटी रुपयांचा शेळीपालन (गोट फार्मिंग) चा प्रस्ताव पाठवत असून, यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाची समसमान भागीदारी असेल, असे ते म्हणाले.  
  कुलगुरु श्री. पातूरकर यांनी इमारत बांधकामाबाबत माहिती दिली. तर अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांनी बकरा मांस तथा पशुधन निर्यातीसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सोयी सुविधा मिहानमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले. बकरा निर्यातीसाठी आवश्यक प्राणी विलगीकरण केंद्र, शेड, यांच्यासह सर्व बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. 
*******

Wednesday 24 June 2020

वन विकास महामंडळाच्या व्यवस्थापनाबाबत वनमंत्र्यांनी घेतला आढावा




       नागपूर, दि. 24 : वन विकास महामंडळाचे व्यवस्थापन, वनोपजांची निर्मिती व विक्री, इको टुरिझम याबाबत वन मंत्री संजय राठोड यांनी आज महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या कामकाजाचा  आढावा घेतला.
          वन विकास महामंडळाच्या सभाकक्षात श्री. राठोड यांनी आज विविध विकास कामांबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. प्रधान मुख्य वनसंरक्षण व वनबल व  वनबलप्रमुख  डॉ. सुरेश गौरोला, व्यवस्थापकीय संचालक  डॉ. एन. रामबाबू, बांबू विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस. के. रेड्डी, मुख्य महाव्यवस्थापक  श्रीनिवास राव, श्रीमती  एम्तिएन्ला आओ, महाव्यवस्थापक डॉ. ऋषीकेश रंजन आदी यावेळी उपस्थित होते.
          वन विकास महामंडळाच्या ताब्यातील जंगलाचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन होण्याच्या दृष्टीने 14 वन प्रकल्प विभागाकरिता व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आले असून त्यास केंद्र शासनाकडून मंजरी प्रदान करण्यात आली आहे. मंडळाच्या विविध योजनांमधून सागवान, बांबू, शिसव इतर मिश्र प्रजातींची उत्कृष्ट रोपवने तयार करण्यात आली आहे. मंडळातर्फे एकूण 5 लाख 46 हजार  684  हेक्टर क्षेत्रामध्ये रोपवन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शिवाय साग बियाणांची ऑनलाईन विक्री त्याचप्रमाणे इमारतीसाठी लागणारे लाकूड, जळावू लाकूड व बांबूची विक्री करण्यात येते. श्री. राठोड यांनी यावेळी वनोपज विक्री ई-लिलाव व जाहीर लिलावाद्वारे  वन विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली  येणाऱ्या 15 विक्री आगारांची  माहिती  घेतली.
          वन विकास महामंडळातर्फे निसर्ग पर्यटन उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये मोहर्ली व कोलारा, नागझिरा, पिटेझरी, उमरझरी, बोर तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात कोसमतोंडी येथे गृह पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत, याबाबत श्री. राठोड यांनी समाधान व्यक्त केले.
         
                                                                 **** 

Tuesday 23 June 2020

कोरोना बाधित रुग्ण बरे होण्यासोबतच विभागाचा मृत्यूदरही राज्यात सर्वात कमी


        नागपूर, दि. 23कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विभागात राबविण्यात आलेल्या प्रभावी व परिणामकारक उपाययोजनासोबतच कोविड हॉस्पिटल सुरु करुन रुग्णांवरील औषोधोपचारामुळे बरे होण्याच्या प्रमाणाबरोबरच मृत्यूदरही राज्यात सर्वाधिक कमी ठेवण्यात नागपूर विभागाला यश आले आहे. विभागात 70.15 टक्के रुग्ण बरे झाले असून मृत्यूचे प्रमाण केवळ 0.91 टक्के असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी  दिली.
          विभागात  1 हजार 645 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 1 हजार 154 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 15 रुग्ण मृत्यू पावले. मृत्यूचे प्रमाण हे 0.91 टक्के एवढे आहे. तर बरे होण्याचे प्रमाण 70.15 टक्के आहे. नागपूर जिल्ह्यात 1 हजार 320 रुग्ण बाधित असून 927 रुग्णांवर उपचार करुन त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली तर 13 मृत्यू झाले. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 70.23 टक्के तर मृत्यूचे प्रमाण 0.98 टक्के एवढे आह. गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गोंदिया, भंडारा  व चंद्रपूर जिल्ह्यात एकही रुग्ण दगावला नाही.
          कोरोना बाधितांपैकी उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांमध्ये गोंदिया 68.63 टक्के, भंडारा 63.64 टक्के, गडचिरोली 73.77 टक्के, चंद्रपूर 75.74 टक्के तरे वर्धा जिल्ह्यात 71.43 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. 
          कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक बरे होण्याचे प्रमाण नागपूर मंडळाबरोबरच लातूर मंडळात 66.28 टक्के, कोल्हापूर 75.97 टक्के, अकोला 62.92 टक्के, औरंगाबाद 58.48 टक्के, नाशिक 55.87 टक्के, पुणे 54.08 टक्के तर ठाणे मंडळात 47.13 टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
*** 

Monday 22 June 2020

वर्धा जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे !






·        रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल 85 टक्के
·        प्रशासनाच्या उपाययोजना देशासाठी मार्गदर्शक

        नागपूर, दि. 22: राज्यातच नव्हे तर देशात कोरोनाविरोधातील लढाई नेटाने लढली जात असताना या संघर्षातील वर्धा जिल्ह्याची यशोगाथा संपूर्ण देशासाठी प्रेरक आणि मार्गदर्शक ठरली आहे. सध्या या जिल्ह्यात केवळ एकच सक्रिय रुग्ण आहे. राज्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर तब्बल पन्नास दिवस त्याला रोखण्यात यश मिळवणाऱ्या वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत केवळ तेरा रुग्ण आढळले. त्यापैकी एकाचा मृत्यू होऊन इतर सर्व बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल 85 टक्के इतके लक्षणीय असून यासंदर्भात वर्धा जिल्हा प्रशासनाने एक मोठे यश मिळवले आहे.
            इतर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वीच वर्धा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या 2 तारखेला महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात चीनच्या बीजिंग शहरातून 13 विद्यार्थिनी शिक्षणासाठी आल्या होत्या.  त्यावेळी जगात केवळ चिनमध्येच या विषाणूचा संसर्ग झालेला होता. विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थिनींची जिल्हा प्रशासनाला माहिती  देताच त्यांना विद्यापीठाच्या वसतिगृहातच विलगिकरण केले गेले. विलगिकरणाच्या कालावधीत त्यांच्यावर काटेकोर लक्ष ठेऊन त्यांना बाहेर फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला. या घटनेनंतर जिल्हा प्रशासन अतिशय सजग व सक्रिय झाले.
            परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती मिळण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन माहिती देण्याचे जाहीर आवाहन केले. परदेशातून आलेल्या लोकांनी गृह विलगिकरण गांभिर्याने पाळावे यासाठी काहींवर दंडात्मक कारवाई सुद्धा करावी लागली.  यामध्ये एका व्यावसायिकाचे दुकान सील करण्याची कारवाई ही राज्यातील पहिलीच ठरली. 
                                                गर्दीच्या ठिकाणी हँड वॉश स्टेशन 
            हात धुण्याबाबत जनजागृती आणण्यासाठी मुख्य बाजारात गर्दीच्या ठिकाणी हँड वॉश स्टेशनची  उपलब्धता करून दिली.  यासाठी सामाजिक संस्था आणि व्यापारी वर्गाने सहकार्य केले. जिल्हाबंदी झाल्यानंतर जिल्ह्यात प्रवेश करणारे मुख्य 16 मार्ग आणि नदी, नाले, गावमार्ग, एका गावातून दुसऱ्या गावात निघणारे  छोटे 96 असे 112 मार्गांवर 24 तास निगराणी पथक नेमण्यात आले. यामध्ये, होमगार्ड, पोलीस,  शिक्षक आणि इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात आली.  परवानगी नसलेल्या लोकांवर चोर मार्गाने प्रवेश केल्यावर कारवाई सुद्धा करण्यात आली.  
गर्दीच्या भाजीबाजाराचे स्थलांतर
            भाजी बाजार हे सर्वात गर्दीचे ठिकाण. सोशल डिस्टन्सिंगचा इथे फार अवलंब होत नाही. त्यामुळे प्रशासनाने सुरुवातीलाच गर्दीचे भाजी बाजार मोठ्या मैदानात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. 10 नगर पालिका क्षेत्रातील असे बाजार आणि मोठ्या गावात भरणारे आठवडी बाजार मोठ्या मैदानात भरवल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा हा वर्धा पॅटर्न राज्यात चांगलाच दखलपात्र ठरला. यामध्ये रोटरीच्या सहकार्याने वर्धा शहरात सुरू केलेल्या आदर्श भाजी बाजाराची दखल देशपातळीवर घेण्यात आली. अनेक जिल्ह्यानी या बाजाराचे अनुकरण केले.   

अनलोडिंग पॉईंट
            इतर  जिल्ह्यातून जीवनावश्यक माल घेऊन येणा-या ट्रकसोबत रोज 15 हजार लोकांचा थेट शहरात प्रवेश होत असल्याचे लक्षात येताच या ट्रकसाठी  शहराबाहेरच अनलोडिंग केंद्र तयार करण्यात आले. तिथे ट्रक निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, त्यासोबत येणाऱ्या  वाहनचालक व सहाय्यक यांच्यासाठी तिथेच थांबण्याची व्यवस्था करण्यात आली. यासोबतच जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या भाजीवर बंदी आणण्यात आली. केवळ बटाटे, अद्रक, लसूण व कांदे आणि जिल्ह्यात न पिकणारी फळे इतर जिल्ह्यातून मागविण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला जिल्ह्यात वापरण्यावर भर देण्यात आला.  


संपूर्ण कुटुंब विलगिकरणाचा वर्धा पॅटर्न
          जिल्ह्यात 5 मे नंतर अडकलेल्या नागरिकांना स्वगावी जाण्याची मुभा देण्यात आली. त्यावेळी  जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक विलगिकरणाऐवजी त्यांना गृह विलगिकरणाचा पर्याय देताना संपूर्ण कुटुंबाचे गृह विलगिकरण करण्यात आले. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी घरपोच सेवा देणाऱ्या दुकानदार आणि भाजी  विक्रेत्यांचे  दूरध्वनी क्रमांक असलेलं डीलिव्हर अॅप तयार करण्यात आले. या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकारी नेमण्यासोबतच  सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सोशल पोलिसिंगचा वापरही करण्यात आला. गृह विलगिकरणात असलेल्या साडेसात हजार  लोकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन  घरी राहा ‘कोरोना योद्धा व्हा’ असा संदेश  देणारी मोहीम राबवली. यात जिल्हाधिकारी यांच्यासोबतच लोकप्रतिनिधीनींही सहभाग घेतला. आजपर्यंत जिल्ह्यात 50 हजार लोकांनी प्रवेश केला आहे. 
1150 सर्वेक्षण पथक
            इतर जिल्ह्यातून आलेल्या लोकांना शोधण्यासोबतच घरोघरी तपासणी करण्याचे काम आरोग्य विभागाने चोख बजावले. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 1150 आरोग्य सर्वेक्षण पथकाने आजपर्यंत 12 लक्ष लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये सर्दी, खोकला या आजाराचे 1230  आणि सारीच्या  108 रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना पूर्ण बरे  करण्यात या पथकाचा महत्त्वाचा वाटा आहे. 
कंटेन्मेंट झोनमध्ये सीसीटीव्ही कॅमेराची नजर
            हिवरातांडा या गावातील एका महिलेचा 8 मे रोजी कोरोनाने मृत्यू झाला. ही वर्धेतील कोरोनाची पहिली केस होती. या रुग्णाचा कोरोना अहवाल 10 मे रोजी आल्यावर हिवरातांडा गावासहित 10 गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली. मुख्य गाव असलेले हिवरातांडा येथे सीसीटीव्ही कॅमेराच्या साहाय्याने तेथील हालचालीवर नजर ठेवण्यात आली.  त्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत 12 कोरोना  रुग्ण  आठळून आलेत. हे सर्वच इतर जिल्ह्यातून आलेले असून सर्वजण कोरोनामुक्त झाले आहेत.. रुग्ण निघताच प्रतिबंधित क्षेत्र तयार करणे आणि तिथे कडक अंमलबजावणी करण्यासोबतच हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी  सीसीटीव्ही कॅमेराचा केलेला वापर वैशिष्ट्यपूर्ण  ठरला. 
रिकव्हरी रेट 85 टक्के
            सद्य:स्थितीत जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरू आहेत. आणि प्रशासनही ‘ॲक्टिव्ह मोड’मध्ये काम करत आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढू नये म्हणून प्रशासन मास्कचा वापर, हात वारंवार धुणे आणि सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीवर काम करीत आहे. जिल्ह्यात राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे  जिल्ह्यात आतापर्यंत 13 रुग्ण सापडले. यापैकी एका रुग्णाचा अहवाल येण्यापूर्वीच दुर्दैवाने मृत्यू झाला आणि इतर 11 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकावर उपचार सुरु आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे होण्याचा वर्धा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा 85 टक्के आहे. हा दर  राज्याच्या  दरापेक्षा 36 टक्के अधिक  तर देशाच्या दरापेक्षा 29 टक्के अधिक आहे.   
            जिल्ह्याने राबवलेल्या या उपाययोजनांमध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत  नागरिकांचा सहभाग आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे.  

जिल्हा माहिती अधिकारी,  वर्धा
*****