Wednesday 31 January 2024

विभागीय आयुक्त कार्यालयात हुतात्मा दिनी आदरांजली


 

नागपूर,दि.30 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी हुतात्मा दिनानिमित आज विभागीय आयुक्त कार्यालयात दोन मिनिट मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, दीपाली मोतीयेळे, कमलकिशोर फुटाणे, चंद्रभान पराते, तहसिलदार महेश सावंत, एन.एम ठाकरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती  होती.

000000

ध्येयप्राप्तीसाठी आत्मविश्वास महत्वाचा - डॉ.सिध्दार्थ गायकवाड



 

•सामाजिक न्याय विभागाच्या स्पंदन युवा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

 

नागपूर,दि. 30 :  आजचा काळ हा आर्टिफिशयल इंटेलिजेंसचा आहे. त्यामुळे भविष्यातील आव्हाने ओळखून विद्यार्थ्यांनी ध्येयनिश्चीती करावी. स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय आणि आत्मविश्वास अंगी असणे आवश्यक आहे. सातत्य आणि वेळेचे नियोजन महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय विशेष सहाय्य  विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड यांनी केले.

            सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या वतीने ‘स्पंदन युवा सांस्कृतिक महोत्सवाचे’  आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे प्रादेशिक उपायुक्त मंगेश वानखेडे, शासकीय निवासी शाळेच्या विशेष अधिकारी अंजली चिंवडे, गृहपाल किशोर रहाटे यांची उपस्थिती होती.

            पुढे बोलताना श्री. गायकवाड म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने स्पंदन युवा महोत्सवाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना नवीन प्लॅटफार्म निर्माण करून दिला. जिल्हास्तरावर झालेला सांस्कृतिक महोत्सव लवकरच विभागस्तरावर आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी  घ्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.  विद्यार्थ्यांनी ग्रंथसंपदेसोबतच महापुरूषांच्या जीवन चरित्राचे वाचन करावे. या महोत्सवामध्ये २६ शासकीय वसतिगृह आणि 3निवासी शाळा सहभागी झाल्या आहे.

 

नवीन वेबसाईटचे लोकार्पण

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने   WWW.acswnagpur.in या वेबसाईटचे उद्घाटन प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुकेशिनी तेलगोटे यांनी केले तर आभार अंजली चिंवडे यांनी मानले.

00000

 

 

 

पुरामुळे क्षतिग्रस्त झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



रस्ते विकास कामांचा घेतला आढावा

जिल्ह्यातील रस्त्यांच्या विविध कामांना गती देण्याचे निर्देश

नागपूर ,दि. २९ : पुरामुळे क्षतीग्रस्त झालेल्या गावांतील रस्ते दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेऊन तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवा. या कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करू असे सांगत  सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ,राष्ट्रीय महामार्ग आणि विविध योजनांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या व नियोजित रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.

     येथील देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचा आज आढावा घेतला त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी श्री. मिना यांनी यावेळी जिल्ह्यातील रस्त्यांच्या काम विषयी सादरीकरण केले. पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काही भागातील रस्ते क्षतिग्रस्त झाले आहेत. या रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवा. या कामांसाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद  करण्यात येईल व या गावांमध्ये दळणवळणाच्या सेवा पूर्ववत होतील यादृष्टीने कामे  करण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या.

       जिल्ह्यामध्ये 'मिनरल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर' अंतर्गत येणाऱ्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली. या कामांसाठी आवश्यक जमीन अधिग्रहनाची कामे पूर्ण करून कामांना गती देण्याचे निर्देश श्री फडणवीस यांनी यावेळी दिले. या प्रकल्पांतर्गत नवेगाव मोरे ,हैदरी, आलापल्ली बायपास, वडाळा पेठ, येलची आदी रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत.

      राष्ट्रीय महामार्गाची जिल्ह्यातील एकूण ५५२ किमी ची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये आलापल्ली -भामरागड- लाहेरी आदी संवेदनशील भागातील रस्त्यांनी जवळपास ११२ कि.मी.च्या रस्त्यांची कामे तीन टप्प्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्याच्या  सूचना यावेळी श्री. फडणवीस यांनी दिल्या. या कामांना आवश्यक मंजुरी घेण्यासाठी  राज्य शासनाच्या वर्ष २०१७ मध्ये निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाचा आधार घेण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय पुढील टप्प्यात राष्ट्रीय महामार्गाची ११७ कि.मी. च्या ५ कामांची माहितीही यावेळी देण्यात आली.

       बिरसा मुंडा योजनेतून जिल्ह्यातील वाड्या, पाडे  मुख्य गावांना जोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या २१३ कि.मी. रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव दुरुस्त करून शासनाच्या परवानगीसाठी पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या पहिल्या टप्प्या अंतर्गत जिल्ह्यात एकूण ८६०.४८ कि.मी. पैकी ५९८ कि.मी. रस्त्यांची कामे झाली आहेत. या टप्प्यातील उर्वरित कामे तसेच  टप्पा -२ अंतर्गत प्रस्तावित १६६ कि.मी. रस्त्यांच्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली. 
        जिल्ह्यातील रस्त्यांच्या ज्या   कामांना केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी घ्यावयाची आहे अशा कामांचा आपण स्वतः पाठपुरावा करून हे विषय मार्गी लावू असेही श्री. फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले.
       ००00000००

मानकापूर क्रीडा संकुलासाठी 683 कोटीचा आराखडा अंतिम



नागपूर दि. २९ :  येथील मानकापूर क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा तसेच वाणिज्यीक सुविधा उभारणीच्या मुळ कामाकरिता रुपये 473 कोटी व विमा, जीसटी व इतर सेवा शुल्क मिळून एकूण 683 कोटीचा आराखडा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने अंतिम करण्यात आला असून हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेसाठी शासनाकडे तातडीने सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. 
 विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक श्रीमती बिदरी यांच्या दालनात आज आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी  धात्रक, क्रीडा प्रशिक्षक विजय मुनिश्वर पियुष अंबुलकर आदि उपस्थित होते.
नागपूर येथे ऑलम्पीक व एशीयन क्रीडा स्पर्धांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्यावत क्रीडा संकुल उभारण्याच्या कामाला गती मिळण्यासाठी निधी उपलब्धतेनुसार क्रीडा सुविधेची कामे प्राधान्याने करण्याचे व इतर कामे टप्प्याटप्याने पूर्ण करण्याचे आयुक्त बिदरी यांनी आराखड्याचा आढावा घेतांना सांगितले. तर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सर्व कामे आंतरराष्ट्रीय मानकानुसार समाविष्ठ करण्याच्या सूचना दिल्या. 
  अंतिम आराखड्यानुसार सदयःस्थितीतील क्रीडा सुविधांचे बळकटीकरण, स्पोर्ट्स क्लब,  स्पोर्ट्स सायन्स सेंन्टर, साहसी क्रीडा प्रकारासाठी सुविधा, अद्यावत फुटबॉल स्टेडियम, हॉकी अॅस्ट्रोटर्फ, अद्यावत अॅथलेटीक्स स्टेडीयम, टेनिस कोर्ट्स, मल्टीजीम, स्पोर्ट्स एज्युकेशन अॅन्ड इनफॉरमेशन सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर, ऑलम्पिक साइज जलतरण तलाव, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, कुस्ती, आर्चरी, शुटींग, फेंन्सींग, स्क्वाश, बॉक्सींग, जुडो, कराटे, तायक्वांडो, टेबल टेनिस, बास्केटबॉल, सॉफ्टबॉल, हॅन्डबॉल, क्रीकेट व आवश्यकतेनुसार इतर खेळांच्या सुविधा, तसेच एकूण 1200 खेळाडूंकरिता निवास व्यवस्था, 700 वाहनांकरिता पार्कींग व त्यावर सोलर विद्युत प्रणाली उभारण्यात येणार आहे
क्रीडा सुविधा व सदर संकुल उभारणी नंतर त्याचे व्यवस्थापनाचा खर्च भागवण्यासाठी वापरा व हस्तातर तत्वार क्लब हाऊस, शॉपींग कॉम्प्लेक्स, तारांकीत हॉटेल, स्पोर्टस् क्लब आदी वाणिज्यीक प्रकल्प उभारण्याचा देखील आराखड्यात समावेश आहे. 
बैठकीला क्रीडा, सार्वजनिक बांधकाम, महानगरपालीका व इतर सबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
000

Monday 29 January 2024

अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेचे उद्घाटन · २२ राज्यांचा सहभाग


नागपूर, दि.२९ : अखिल भारतीय नागरी


सेवा संगीत, नृत्य व लघुनाट्य स्पर्धा  २०२३-२४ चे उद्घाटन आज वसंतराव देशपांडे सभागृह येथे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते करण्यात आले.

  महाराष्ट्र शासनाच्यावतीने सचिवालय जिमखान्यामार्फत आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत २२ राज्यासह ५६५ स्पर्धक सहभागी झाले आहेत. 2 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या स्पर्धेत दररोज  संगीत, नृत्य, लघुनाट्य यासह  संगीत कला प्रकारातील हिंदुस्तानी शास्त्रीय (गायन) हिंदुस्थानी उपशास्त्रीय (गायन) कर्नाटकी शास्त्रीय (संगीत) कर्नाटकी उपशास्त्रीय (गायन)  पाश्चात्य संगीत (गायन) लोकसंगीत गायन (एकल) आणि लोकसंगीत समूह गायन सादर करण्यात येणार आहे.

संगीत कला प्रकारातील शास्त्रीय नृत्य (एकल) पाश्चात्य संगीत (गायन) लोकसंगीत  (एकल) लोकनृत्य समूह सादर केली जाईल. जनतेचा सहभाग लक्षात घेता वारकरी संप्रदायातील दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्यावतीने महाराष्ट्र दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्घाटनानंतर ‘जय महाराष्ट्र’ या नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.  कार्यक्रमाला मंगल नाखवा, सहाय्यक स्पर्धा सचिव मारुती कवालदार, सभापती अनंत शेटे, उपसभापती तुषार हिरेकर, मानद सचिव अरविंद शेट्टी मानद खजिनदार सती सोनवणे, मानद सहसचिव सुनील आगरकर व मानद सहसचिव मकरंद गयावळ यांची उपस्थिती होती.

दिनांक 2 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय नागरी सेवा संगीत नृत्य व लघुनाटय स्पर्धेचा समारोप  सायंकाळी सहा वाजता होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर उपस्थित राहणार आहेत.

श्रीमती बिदरी यांच्या हस्ते पंथसंचलनामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या हरियाणा, तर व्दितीय क्रमांक छत्तीसगड राज्यातील स्पर्धेकांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित स्पर्धकांना मानद सचिव अरविंद शेट्टी यांनी शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगल नाखवा यांनी केले. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

 

00000


नागपुरात लवकरच ‘सिंधू आर्ट गॅलरी’ - देवेंद्र फडणवीस




उपमुख्यमंत्री सिंधी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी

नागपूर दि. २७ : जगातील सर्वात जुनी संस्कृती असलेल्या सिंधू समाजाच्या प्राचीन परंपरेची महती सर्वांपर्यत  पोचविण्यासाठी नागपूर येथे लवकरच ‘सिंधू आर्ट गॅलरी’ स्थापन करण्यात येईल.यासाठी जागा निश्चिती करण्यात आली असल्याचे व 140 कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूरीसाठी प्राप्त झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित सिंधी सांस्कृतिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

    आमदार कुमार आईलानी, सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुखरामानी, सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर,अकादमीचे सदस्य राजेश बटवानी, मंजु कुंगवानी,तुलसी सेनिया तसेच ॲड. डॉ.  दयाराम लालवानी, घनश्याम कुकरेजा, विरेंद्र कुकरेजा आदी यावेळी उपस्थित होते.

    अनेक शतकाची परंपरा असलेल्या व सनातन संस्कृती जीवीत ठेवणाऱ्या सिंधी समाजाने कष्टाने उद्योग व्यापारात प्रगती केली आहे.  फाळणीनंतर या समाजाला येणाऱ्या अडचणीची आपल्याला जाणीव असून त्यांना राज्यात मालकी हक्काचे पट्टे मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री यांनी दिले.


    याप्रसंगी आ. कुमार आईलानी, घनश्याम कुकरेजा, महेश सुखरामानी, विरेंद्र कुकरेजा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी सिंधी  समाजातील ज्येष्ठ समाजसेवक ॲड. डॉ.  दयाराम लालवानी यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तद्नंतर ‘वरसो न विसार’ या सिंधी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाला सिंधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

विदर्भ-मराठवाड्यातील उद्योजकांसाठी सवलतीचा वीजपुरवठा 'पॅटर्न ' आणणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नागपूरमध्ये खासदार औद्योगिक महोत्सव तसेच ॲडव्हांटेज विदर्भाच्या तीन दिवसीय कार्यक्रमाला सुरुवात

गडकरी-फडणवीस यांचे 'डबल इंजिन ' विदर्भाचा सुवर्णकाळ

: नारायण राणे

नागपूर येत्या काळात देशातील गुंतवणुकीचे हब बनणार

: नितीन गडकरी

 

नागपूर दि. 27 : उद्योग व्यवसाय तुलनेने कमी असणाऱ्या विदर्भ, मराठवाडा या भागात उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या समूहांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करणारा पॅटर्न महाराष्ट्रात लवकरच राबविला जाईल, असे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रांगणात खासदार औद्योगिक महोत्सव अर्थात ॲडव्हाँटेज विदर्भ या तीन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. विदर्भातील मोठ्या उद्योगांचे प्रदर्शन तसेच उद्योजकांचे संमेलन यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

    खासदार औद्योगिक महोत्सव नागपूर अर्थात ॲडव्हांटेज विदर्भ उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी निर्माण केलेले व्यासपीठ असून विदर्भातील मोठया उद्योग समूहाचे प्रदर्शन आणि गुंतवणुकीचे संमेलन सध्या नागपूर येथे सुरू आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट यांच्यामार्फत या विचार मंथनाचे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

 

     कार्यक्रमाच्या मंचावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी,सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार,नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, व्हीएनआयटीचे संचालक प्रमोद पडोळे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, खासदार अनिल बोंडे,माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल,माजी खासदार व उद्योजक अजय संचेती,आमदार आशिष जायस्वाल,नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी उपस्थित होते.

        उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी गुंतवणुकदारांशी संवाद साधला. ते म्हणाले,उद्योग व्यवसायामध्ये सर्वाधिक महत्वाचा वीजपुरवठा असून अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय उभारताना यामध्ये सवलत मिळण्याची मागणी योग्य आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या संदर्भातील एक पॅटर्न आम्ही तयार करीत आहोत. याचा फायदा उद्योग समूहांना होईल. मात्र, मराठवाडा-विदर्भ यासारख्या मागास भागात उभारल्या जाणाऱ्या उद्योगांनाच या पॅटर्नचा लाभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

     कोणताही उद्योग उभारण्यासाठी वीज, पाणी, मध्यवर्ती ठिकाण व अन्य पायाभूत सुविधांची गरज असते.केंद्रीय रस्ते, महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून विदर्भातील रस्त्यांचे जाळे मजबूत व दीर्घकाळासाठी उत्तम झाले आहे. समृद्धी महामार्गामुळे एक वातावरण निर्मिती झाली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये आवश्यक असणारी पुरवठा साखळी विदर्भात निर्माण झाली आहे.मोठे लॉजिस्टिक क्लस्टर आम्ही नागपूरमध्ये निर्माण करणार आहोत. लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून नागपूरला जगामध्ये पुढे आणायचे आहे.

     समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया ,गडचिरोली, चंद्रपूरकडे होणार आहे. नागपूर पासून मुंबई प्रमाणे गोवा महामार्ग आम्ही तयार करीत आहोत. त्याला शक्तीपीठ महामार्ग संबोधले जाईल.नागपूरचे नवीन विमानतळ जागतिक मानांकनाचे असेल याकडे आम्ही लक्ष वेधले आहे. सोबतच अमरावती, अकोला विमानतळाला अद्यावत करणार आहोत.गडचिरोलीमध्येही आमचे विमानतळ तयार होत आहे. चंद्रपूरचेही विमानतळ आम्ही लवकरच पूर्णत्वास घेऊन जाऊ, त्यामुळे रस्ते लोहमार्ग व विमान मार्गाने नागपूर व विदर्भ प्रत्येक प्रदेशाशी जोडला गेला आहे.

     चार्मोशी पासून 'वॉटर वे ' तेलंगानापर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. वैनगंगा ते नळगंगा  ५५० किलोमीटरचा कॅनॉल आम्ही तयार करीत आहोत. 2024 मध्ये या कामाला सुरुवात होऊन सात वर्षात हा प्रकल्प पूर्ण व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. यामुळे विदर्भातील जास्तीत जास्त शेतीला पाणी पुरवठा करता येईल.

 गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोह उद्योगाचा पाया रचला असून याठिकाणी उत्तम भविष्य दिसून येत आहे . मुख्यमंत्री असताना सुरू केलेला लोह उद्योग आता विस्तारित होत असून लवकरच गडचिरोली पोलाद उद्योगाचे हब होईल याची मला खात्री आहे.

 

    केवळ नागपूर नव्हे संपूर्ण विदर्भातील सर्व जिल्हे विकसित व्हावे व त्यादृष्टीचे नियोजन,क्लस्टर निर्मितीला आणि प्राधान्य देत आहोत. याशिवाय कोळशावर तयार होणाऱ्या गॅसपासून (कोल गॅसीफिकेशन ) घरगुती वापराच्या गॅस निर्मिती संदर्भात चंद्रपूरमध्ये काही प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता आहे.यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.

 भांडवल, पायाभूत सुविधा यासोबतच मनुष्यबळांची आवश्यकता ही महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे नागपूरमध्ये मनुष्यबळ कौशल्य युक्त व्हावे यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. संरक्षण ,पर्यटन, या क्षेत्रातही मोठे उद्योग उभारण्याची विदर्भात संधी आहे.स्टार्टअप इकोसिस्टम डेव्हलप करण्याचेही आमचे प्रयत्न सुरू आहे.

 

 गडकरींच्या परिस्पर्शात विदर्भ विकासाची सूत्रे आहेत

                                                                             :मुनगंटीवार

   तत्पूर्वी, राज्याचे सांस्कृतिक कार्य व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित गुंतवणुकदारांना संबोधित केले. विदर्भात वन, पाणी,वीज, जागा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला काय सुविधा हवी ते सांगा. आम्ही सगळे तत्पर आहोत. ज्यांच्या कर्तुत्वाला अवघ्या भारताने सलाम केला असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या ठिकाणी मदतीला तयार आहेत. त्यांनी ज्या कामाला हात लावला त्याचे सोने होते. त्यामुळे विदर्भात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी वनविभागामार्फत एमआयडीसीच्या धरतीवर वनविभागावर आधारित उद्योगांची एमआयडीसी, प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपूर येथे सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 नागपूर येत्या काळात देशातील गुंतवणुकीचे हब बनणार

: नितीन गडकरी

 विदर्भाच्या विकासासाठी काय करता येईल,याच्या विचार मंथनासाठी ॲडव्हांटेज विदर्भ व खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.गडचिरोलीपासून वाशिम पर्यंत आणि बुलडाण्यापासून गडचिरोलीपर्यंत आम्ही चांगले रस्ते तयार केले.

   पाणी, वीज, पायाभूत सुविधा, विस्तीर्ण रस्ते, तंत्रज्ञान यासह  केंद्रातून कोणतीही मदत लागल्यास मी तत्पर आहे. राज्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार आहेत. सोबतीला राज्याचे माजी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म लघू मध्यम मंत्री नारायण राणे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे .त्यामुळे आता विदर्भात विकास झाला पाहिजे. गुंतवणूकदारांनी आरोग्य ,अभियांत्रिकी, औषधी,पर्यटन, हॉटेल व्यवसाय व अन्य लॉजिस्टिक सारख्या मोठ्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

 गडकरी फडणवीस यांचे डबल इंजिन विदर्भाचा सुवर्णकाळ

: नारायण राणे

कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विदर्भाचा पूर्ण अभ्यास आहे. कुठे काय निर्माण होऊ शकते, कोणत्या जिल्ह्याला कोणता उद्योग उपयोगी पडू शकते यशस्वी होऊ शकते, याची माहिती असणारे हे नेतृत्व आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाचा हा सुवर्णकाळ आहे.

 वीज, सुरक्षा,पायाभूत सुविधा आदी सर्व सुविधा विदर्भात उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने विदर्भामध्ये गुंतवणूक करणे, ही गुंतवणूकदारांसाठीची सध्याची संधी आहे त्याचा लाभ घ्यावा ,असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित गुंतवणूकदारांना केले.

  मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारतामध्ये, महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलरच्या इकॉनोमीमध्ये,नव्या जगाच्या भारतामध्ये आपला विदर्भ दिसायला पाहिजे. यासाठी सगळ्या उद्योजकांनी पुढे या, असे आवाहनही त्यांनी केले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष काळे व सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

                                                0000000



मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी वरदान - देवेंद्र फडणवीस तायवाडे मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलचे उद्घाटन




 

नागपूर, दि. २७ : सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून डॉ.बबनराव तायवाडे काम करीत आहेत.नागपूर मेडिकल हब म्हणून विकसित होत असताना दक्षिण पश्चिम नागपुरात उभारण्यात आलेले तायवाडे मस्टिस्पेशालीटी हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी वरदान ठरणार आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

तायवाडे मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

अद्ययावत आणि अत्याधुनिक रुग्ण सेवेने सज्ज असलेले तायवाडे मटिस्पेशालिस्ट हॉस्पीटल मधील रुग्णसेवेचा लाभ दक्षिण व पश्चिम नागपुरातील तसेच आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांना होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मध्य भारतातील विविध भागातून रुग्ण नागपुरात उपचारासाठी येत असतात. या भागामध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलची आवश्यकता होती. तायवाडे मलिस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे ती पूर्ण झाली असल्याचे मत श्री. फडणवीस यांनी व्यक्त केले.

मध्य भारतातील किफायतशीर व खात्रीलायक उपचाराचे केंद्र म्हणून नागपूरची ओळख होत आहे येथील वैद्यकीय व्यवसायाने आपल्या निष्ठेने व सेवाभावाने आपले नावलौकिक मिळवले आहे. आरोग्य हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरातील वैद्यकीय क्षेत्रात याच पद्धतीने तायवाडे हॉस्पिटलमुळे नागपुरच्या वैद्यकीय क्षेत्राचा लौकिक वाढीस लागेल, असा विश्वास हॉस्पीटलचे संचालक डॉ.शौनक तायवाडे यांनी व्यक्त केला.


जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

  



 

नागपूर दि.26 : जिल्हाधिकारी कार्यालयात  भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 74 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी तसेच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. पोलीस पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या

00000

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान




 

नागपूर, दि. 26 : प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभानंतर विविध पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यात भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा, यशस्वी लघुउद्योग जिल्हा पुरस्कार, महाराष्ट्र  स्टुडन्ट  इनोव्हेशन  चॅलेंज उपक्रमाचे जिल्हास्तरीय विजेता, उत्कृष्ट पोलीस पथक, पोलीस आयुक्तालयाच्या वतीने देण्यात येणारी पोलीस पदकांचे वितरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा २०२२-२३

 

अटल भूजल योजना, भूजल सर्वेक्षण आणि पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत देण्यात येणाऱ्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा २०२२-२३ चे वितरण करण्यात आले. यात प्रथम पुरस्कार खेडी, गोवारगोंदी, ता. नरखेड या ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला. खुर्सापार, ता.काटोल यांना द्वितीय तर डोली, भांडवलकर ता. काटोल ग्रामपंचायतीला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

 

यशस्वी लघु उद्योग जिल्हा पुरस्कार २०२२

 

यशस्वी लघुउद्योग जिल्हा पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले. यात  मे. शुभलक्ष्मी फुड इंडस्ट्रीज प्रो. अंकित अग्रवाल, लिहिगांव ता.कामठी यांना प्रथम,  मे. ब्रामनी इंडस्ट्रीज प्रो. हरीश पुरुषोत्तम शर्मा बुटीबोरी  परिसर, नागपूर यांना द्वितीय  तर  मे. डॅफोडिल इंन्गीव्हिन्स इंडिया पा. लि. प्रो. रेखा प्रमोद अग्रवाल बुटीबोरी परिसर, नागपूर यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला. गौरव चिन्ह प्रमाणपत्र व रोख पंधरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेज उपक्रम

 

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेज उपक्रमाचे जिल्हास्तरीय पुरस्कारांचे क्रिष्णा किर्तीकुमार सेदानी, प्रथमेश कारंजेकर, प्रणय छगन डोबळे, उदय सिंग ठाकुर, प्रथमेश नंदकिशोर कुईटे, सौम्या सुनिल यादव, तान्या सत्तुजा, अवंती पुसदेकर, डॉ. कोमल रविद्र देवतळे, प्रतिक मेश्राम यांना प्रदान करण्यात आला.एक लक्ष भांडवल या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे.

 

उत्कृष्ट पोलीस पथके व विद्यार्थी पुरस्कार

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पथसंचलनात सहभागी पथकांपैकी तिघांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. पोलीस पथकामध्ये पहिल्या क्रमांकाने नागपूर शहर महिला पोलीस यांना द्वितीय नागपूर शहर पोलीस तर तृतीय क्रमांक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ४ यांना सन्मानित करण्यात आले. तर विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक प्रहार डिफेन्स अकॅडमी प्रहार डिफेन्स अकॅडमी खामला, द्वितीय क्रमांक वर्धमान सैनिकी शाळा वडधामना तर तृतीय क्रमांक प्रहार सैनिकी शाळा रवी नगर यांच्या पथकांना सन्मानित करण्यात आले.

 

जिल्हाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान

 

निवडणूक  सुधारणासंदर्भात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते भारत निवडणूक आयोगाचा 'बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड 2023 ' हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्त उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते डॉ. इटनकर यांचा  सन्मान करण्यात आला. तसेच राष्ट्रपती पोलीस पदक मिळाल्याबद्दल पोलीस अधिकारी संजय पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

 

०००००

उच्च न्यायालयात प्रजासत्ताक दिन साजरा

  


 

नागपूर दि.26 : उच्च न्यायालयाच्या  नागपूर खंडपीठात  भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 74वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. नागपूर खंडपीठाचे प्रबंधक रविंद्र सादरानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

उच्च न्यायालयातील न्यायालयीन प्रबंधक डी.पी.सातवलेकर, विधीसेवेचे सचिव अनिल शर्मा, उपप्रबंधक योगेश रहांगडाले, अे.एम.सावंत, सुरेश शिंदे, फैजल कश्मिरी, सहायक प्रबंधक आर.आर.सोंधीया, राजशिष्टाचार अधिकारी विलास पुंडलिक तसेच न्यायिक अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण


 

नागपूर दि.26 : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  यांच्या निवासस्थानी  भारतीय प्रजासत्ताकदिनाचा 74वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जिल्हाधिकारी यांच्या पत्नी, तहसिलदार, इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. पोलिसांनी मानवंदना दिली.

00000

जेष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापडकर यांचे उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन


 

नागपूर, दि. 26 : अनाथाचे नाथ म्हणून सुप्रसिध्द असलेले जेष्ठ समाज सेवक शंकरबाबा पापडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंकरबाबांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी शंकरबाबा पापडकर यांच्यासोबत वझ्झर येथिल बालगृहात सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.

            शंकरबाबा पापडकर यांना पद्मश्री हा सर्वोच्च पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीव्दारे शंकरबाबांना शुभेच्छा दिल्यात. तसेच समाजासाठी करत असलेल्या कामाचा गौरव केला.

            अमरावती जिल्हयातील वझ्झर येथे स्वर्गीय अंबादास पंत बालगृहाच्या माध्यमातून अंध, अपंग तसेच पुर्णत: मतीमंद असलेल्या १२५ मुलांचा सांभाळ करत असून त्यांना स्वत:चे नाव देवून ओळख दिली आहे. राज्यभरातून विविध ठिकाणी सापडलेल्या मतीमंद बालकांचा स्विकार करुन त्यांच्या पुर्नवसनासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मतीमंद अपंग, अंध मुलांच्या पुर्नवसनासाठी १९९२ पासून त्यांचे सातत्याने कार्य सुरु आहे.  या कामाची दखल घेवून त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री हा नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे. समाजसेवेतील त्यांचे हे कार्य अव्दितीय असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना पद्‌मश्री; उपमुख्यमंत्र्यांकडून निवासस्थानी भेट व अभिनंदन



 

नागपूर, दि.26 :  नागपुरातील  प्रसिद्ध न्यूरोसर्जन  डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना  पद्‌मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या रहाटे कॉलनी येथील निवासस्थानी भेट देत अभिनंदन केले. यावेळी त्यांनी डॉ. मेश्राम यांच्याशी आरोग्यासह विविध विषयावर चर्चा करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

छोट्याश्या गावातून आलेल्या व जगाच्या नकाशावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध मेंदू रोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री हा देशाचा नागरी पुरस्कार जाहीर  करण्यात आला.  मेंदू  विकारावरील  जनजागृतीसाठी  त्यांना हा पुरस्कार जाहीर  करण्यात आला.  यानिमित्त  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेतली.

 

डॉ. मेश्राम यांनी न्युरो सर्जन म्हणून केलेले कार्य अद्वितीय आहे. विदर्भातीलच नव्हे तर देशभरातील रुग्ण  त्यांच्याकडे उपचारासाठी येतात.  त्यांची ही रुग्णसेवा अशीच अखंडित पुढे सुरू राहो, असे  उपमुख्यमंत्री  यावेळी म्हणाले.

 

     जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, डॉ. मेश्राम यांच्या पत्नी नम्रता,  मुले डॉ. अविरल व आशय, अलंकार रामटेके यावेळी उपस्थित होते.

                                                           00000 

Thursday 25 January 2024

विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ



 

नागपूर, दि. 25:  राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षामध्ये आज  उपायुक्त दीपाली मोतीयेळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली.

लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परपरांचे जनत करुन आणि मुक्त नि:पक्षपाती  शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलेाभनास बळी न पडता मतदान करू, अशी शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली.

यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, चंद्रभान पराते, धनंजय सुटे, तहसिलदार महेश सावंत, आर.के.डिघोळे, संध्या खोडे यांच्यासह अधिकारी  व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

*******

मराठी भाषेतील साहित्य व्यवहार सर्व माध्यमांवर सर्वदूर पोहोचावा "भाषा विकासाच्या नव्या दिशा" विषयावरील परिसंवादाचा सूर




*नागपूर, दि.२४* : कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानामुळे मराठी भाषेवर होत असलेले आक्रमण थोपवून धरण्याकरिता मराठी भाषेतील विविध साहित्य व्यवहार सर्व माध्यमांवर सर्वदूर पोहोचण्याची गरज असल्याचा सूर "भाषा विकासाच्या नव्या दिशा" विषयावरील परिसंवाद निघाला.

      महाराष्ट्र शासनाचे भाषा संचालनालय आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवड्याच्या औचित्याने 
येथील विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात 
परिसंवाद आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी अर्थतज्‍ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते. 
सुप्रसिद्ध कथाकार विजय तांबे,  चिंतनशील लेखक मिलिंद कीर्ती आणि भाषा संचालनालयाच्या माजी सहसंचालक अनुराधा मोहनी यांनी यावेळी विचार मांडले. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते आणि भाषा संचालनालयाचे सहाय्यक संचालक हरीश सूर्यवंशी यावेळी मंचावर उपस्थित होते.

       विजय तांबे यांनी 'मानवी सर्जनशीलता आणि भाषा’ विषयावर प्रकाश टाकला. चॅट जीपीटी, बार्ड ,बिंग आदी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे साहित्यिक व्यवहारात होत असलेल्या घुसखोरीबद्दल त्यांनी विविध उदाहरणांद्वारे माहिती दिली. साहित्य, संगीत, कला आदी क्षेत्रांमध्ये दडवून ठेवलेली सर्जकता आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून सर्वत्र पसरल्याचे वास्तवही त्यांनी विविध उदाहरणांद्वारे मांडले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानामुळे होणारे संपत्तीकरण, वाढणारी बेरोजगारी आदी येत्या काळातील ५व्या औद्योगिक क्रांती समोरील समस्या त्यांनी मांडल्या. १९९०नंतर विचारवंतांच्या लिखाणात या परिस्थितीची अंधुक कल्पना देण्यात आल्याचे अधोरेखित करत भाषिक मुल्यांच्या आधारावर या समस्येला पुढे जावे लागेल व सर्जकतेच्या कक्षांचा विस्तार करावा लागेल असे विचार त्यांनी मांडले.

      वर्ष १९९० आणि २००८ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक मंदीचा संदर्भ  देऊन मिलिंद कीर्ती यांनी 'कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भाषा'  हा विचार मांडला. आर्थिक मंदीच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ते सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राद्वारे समाजमन मनोरंजनात गुंतविण्यासाठी होत असलेल्या विभिन्न प्रयोगाबद्दलही त्यांनी यावेळी विचार मांडले. कृत्रिम बुद्धिमत्तेची सध्या प्राथमिक स्थिती असून यामुळे निर्माण झालेले भाषेपुढील प्रश्न हे येत्या काळातील या तंत्रज्ञानाच्या ऑटोनॉमस आणि परसेप्शन या पुढील टप्प्यात आणखी जटील होत जातील आणि त्यासाठी मराठी भाषेतील साहित्यिक व्यवहार सक्षमपणे होवून हे आव्हान स्वीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

      ‘ज्ञानभाषा मराठी-संभाव्यता आणि दिशा’ याबद्दल अनुराधा मोहनी यांनी विचार व्यक्त केले. मानवी भावनांचे व्यवस्थापन करण्यासाठी भाषेची गरज असल्याचे अधोरखित करून त्यांनी  मराठी मातृभाषेतून जास्तीत-जास्त साहित्य आणि भाषिक व्यवहार होऊन या भाषेचा ज्ञानभाषेकडे प्रवास होण्याची गरज असल्याची मांडणी केली. इंग्रजी भाषेकडे वळलेला समाज आणि मातृभाषेकडे समाजाने फिरवलेलीपाठ हे वास्तव त्यांनी मांडले.परिसर विज्ञानात मराठीचा वापर, मराठी परिभाषेचा वापर होण्यासाठी बीज ग्रंथ निर्मिती, गटचर्चा, प्रश्नोत्तरे आदींच्या माध्यमातून मराठी भाषा व्यवहार व्हावे ,अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

       कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञामुळे मानवी सर्जकता,विचार प्रणालीवर व भाषिक व्यवहारावर होणारे आक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज डॉ. खांदेवाले यांनी अध्यक्षीय उद्बोधनात व्यक्त केली. शहरांसोबतच ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या आकर्षणामुळे 
व्यवहारातील अतिक्रमणही त्यांनी विविध उदाहरणांद्वारे उलगडून दाखवले. भाषिक स्वातंत्र्य अबाधीत राखण्यासाठी भाषांची संरचना वाचविणे व ती जनसामान्यापर्यंत जास्तीत - जास्त प्रमाणात व सहज पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
       
    तत्पूर्वी, युगवाणी चे संपादक प्रफुल्ल शिलेदार यांनी प्रास्ताविक केले.भाषा संचालनालयाचे सहाय्यक संचालक हरीश सूर्यवंशी यांनी संचालनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रदीप दाते यांनी विदर्भ साहित्य संघाच्यावतीने मराठी भाषा संवर्धनासाठी भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. प्रा. विवेक अलोनी यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
        ०००००