Tuesday 24 December 2019

जिल्ह्यात कडधान्ये, तेलबिया खरेदी केंद्र सुरु

नागपूर दि. 24: केंद्र शासनाच्या व नाफेडच्या वतीने आधारभूत किंमत धान्य खरेदी योजना 2019-20 करीता मार्केटिंग फेडरेशन तर्फे नागपूर जिल्ह्यातील रामटेकमहादुला (मौदा)भिवापूर आणि उमरेड या चार ठिकाणी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत कडधान्य व तेलबिया खरेदी केंद्र सुरु करण्यात असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले.
एफ. ए. क्यू. ज्वारी व मका खरेदीसाठी कळमेश्वरहिंगणासावनेरकाटोलनरखेडनागपूरबुटीबोरी या ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. सदर केंद्र स्थानिक तालुका सह. खरेदी विक्री संघामार्फत संचालित करण्यात येत आहे.
तसेच एफ.ए.क्यु. सोयाबीनसाठी चार केंद्र भिवापूरकाटोलउमरेड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरु करण्यात आले आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी वरील ठिकाणी तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संस्थेच्या कार्यालयात व कृषी उत्पन्न बाजार समितीत अधिक माहितीकरिता संपर्क साधावा.
शेतकऱ्यांनी धान्य हमी भावापेक्षा कमी भावाने कुठल्याही परिस्थितीत कडधान्य व तेलबिया विकू नयेत  तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  रविंद्र ठाकरे यांनी  केले आहे.
******
--

दहावी परीक्षेसाठी अतिविलंब शुल्क भरण्याच्या तारखा जाहीर


 नागपूर दि. 24: दहावीच्या परीक्षेसाठी नियमित, पुनर्परीक्षार्थी व खाजगी विद्यार्थ्यांनी नियमित व विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारण्याची मुदत  संपली आहे. त्यामुळे विलंब शुल्कानंतरच्या अतिविलंब व अतिविशेष अतिविलंब शुल्कासह अर्ज स्वीकारण्याच्या तारखा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्या आहेत.
अतिविलंब शुल्क दि. 13 जानेवारी 2020 पर्यंत प्रतिदिन 50 रुपये याप्रमाणे आकारले जाईल. विशेष अतिविलंब शुल्क दि. 14 ते 28 जानेवारी  2020 या कालावधीत प्रतिदिन 100 रुपये याप्रमाणे आकारले जाईल. अतिविशेष अतिविलंब शुल्क दि. 29 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2020 दरम्यान प्रतिदिन 200 रुपये याप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयांनी ही प्रक्रिया विद्यार्थ्यांकडून वेळेत करून घ्यावी, असे आवाहन मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी केले आहे.
दहावीच्या फेब्रुवारी-मार्च 2020 मधील नियमित विद्यार्थी किंवा पुनर्परीक्षार्थी, तुरळक विषयाचे परीक्षार्थी, श्रेणीसुधार योजनेतील, तसेच खाजगी विद्यार्थ्यांचे विलंबाच्या कालावधीनुसार शुल्क स्वीकारण्यात येणार आहे.  
           माध्यमिक शाळांनी www.mahahsscboard.maharashtra.gov.in  या किंवा www.mahahsscboard.in 
या संकेतस्थळावर सदर शुल्कासह आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने भरावी. त्यानंतर विद्यार्थी व प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह आवेदनपत्राची मूळ प्रत शुल्कासह विभागीय मंडळाकडे सादर करावी, असे निर्देश शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी दिले आहेत.

निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्याच्या सूचना


नागपूर, दि. 24 :  नागपूर कोषागारांतर्गत निवृत्तवेतन घेत असलेल्या निवृत्तीवेतनधारकांनी  नोव्हेंबर  महिन्यात सादर करावयाचे हयातीचे दाखले ऑनलाईन अथवा बँकेमार्फत सादर केले नसल्यास त्यांनी  तातडीने हयातीचा दाखला ऑनलाईन अथवा बँकेमार्फत सादर करावा. अन्यथा त्यांचे डिसेंबर 2019 चे निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन बँकेत जमा केल्या जाणार नाही, याची संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी नोंद घ्यावी, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी  प्रकाश आकरे यांनी  पत्रकाद्वारे कळविले आहे.
हयातीचा दाखला सादर केलेल्या निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचेच माहे डिसेंबर 2019 चे निवृत्तीवेतन संबंधितांच्या बँकेत जमा करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.
****  

गोरेवाडा परिसरात 216 विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे वास्तव्य






पक्षी निरीक्षकांना 55 स्थलांतरित पक्ष्यांचे आकर्षण

नागपूर, दि. 24 :   गोरेवाडा संरक्षित अभयारण्यासह येथील समृद्ध अशा गोरेवाडा तलावाच्या परिसरात 216 विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे वास्तव्य असून यापैकी 50 ते 55 प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनामुळे पक्षी  निरीक्षकांसह पर्यटकांना पक्ष्यांचा जवळून अभ्यास करण्याची  संधी  उपलब्ध झाली आहे.  गोरेवाडा तलावातील पक्ष्यांचे विश्व पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आकर्षित होत आहेत.
            वनविकास महामंडळातर्फे  गोरेवाडा प्रकल्प विकसित करण्यात येत असून गोसेखुर्द प्रकल्पामध्ये गेलेल्या वन जमिनीच्या पर्यायी वनीकरणासाठी  गोरेवाडा येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. सुमारे 21 किलोमीटर परिसरात वन्य प्राण्यांच्या विविध प्रजातींचे संरक्षण व संवर्धन करण्यात आल्यामुळे नागपूर शहराला लागून असलेल्या गोरेवाडा बायोपार्कला पाहण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.
            गोरेवाडा बायोपार्क परिसरात सुमारे 120 वर्षांपूर्वी  गोरेवाडा तलावाची निर्मिती  सीती गोंडीन यांनी केल्याची नोंद असून  हा तलाव नागपूर शहराला  पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी करण्यात आला होता. गोरेवाडा जंगलाच्या विस्तीर्ण परिसरात असलेल्या या तलावाच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे वास्तव्य असून  स्थलांतरित पक्षी हे या तलावाचे मुख्य आकर्षण आहे. क्रेस्टेड ग्रेब हा पक्षी सुमारे पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच पाहायला मिळाला. यासोबतच रेड क्रेस्टेड पोचार्ड, रुडी सेल्डक, गडवाल, नॉर्थन शॉलर, शेंडीवाला बदक, हूडहूड, रेड स्टार्ट आदी स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे.
            पक्षी निरीक्षकांसाठी वन विकास महामंडळातर्फे विविध सुविधा उपलब्ध करुन दिली असून बायनाकुलर (दुर्बीण) तसेच पक्षी निरीक्षकांसाठी गाईडची व्यवस्था सुद्धा उपलब्ध असल्यामुळे पक्षांच्या नावासह त्यांची वीण, वास्तव्याचे ठिकाण आदी सर्व माहिती उपलब्ध होत आहे. तलावाच्या सभोवताल बर्ड हायडर लावण्यात आले आहे, याशिवाय दहापेक्षा जास्त ठिकाणी बर्ड स्टडीची व्यवस्था करण्यात आली आहे.
            गोरेवाडा परिसरातील समृद्ध वनसंपदा तसेच तलावातील पक्ष्यांची माहिती व्हावी, यासाठी  अडीच किलोमीटरची नेचर ट्रेल तयार करण्यात आली आहे. त्यासोबतच सायकलवरुनही  नेचर ट्रेल बघण्याची सुविधा आहे. गोरेवाडा बायोपार्कमध्ये निलगाय, सांबर, ससे, विविध प्रकारचे फुलपाखरे, पक्षी, सरपटणारे प्राणी यामध्ये साप, अजगर यांसह मोर आदींचे वास्तव्य आहे. हा परिसर मानवी वस्तीला लागून असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाळीव जणावरांचा  त्रास टाळण्यासाठी 21 किलोमीटर परिसराला संरक्षण भित्त बांधून पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे येथील समृद्ध वनसंपदेचे रक्षण करणे शक्य होत आहे. 
            गोरेवाडा बायोपार्कच्या सौंदर्यीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगताना या प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी पांडुरंग पाखले यांनी  परिसरातील 216 प्रकारच्या वास्तव्य असलेल्या समृद्ध पक्षी जगताची माहिती  दिली. हिवाळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी हजारो ‍ किलोमीटरचा प्रवास करुन या परिसरात वास्तव्याला येतात. त्यामुळे पक्षी निरीक्षणाची सुविधा गोरेवाडा प्रकल्पात प्राधान्याने करण्यात आली असल्याचे यावेळी  त्यांनी सांगितले.
*****

‘दिलखुलास’ कार्यक्रमात 'ग्राहकांचे हित व संरक्षण' या विषयावर उद्या मुलाखत

             मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात ग्राहकांचे हित व संरक्षण’ या विषयावर अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक व राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे न्यायिक सदस्य दिलीप  शिरासाव यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि.२५ आणि गुरुवार दि.२६ डिसेंबर 2019 रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
            राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्वग्राहक संरक्षणाकरिता कार्यरत यंत्रणाकंझ्युमर क्लबचे कार्यवैधमापनशास्त्र यंत्रणेमध्ये अधिकाधिक ग्राहकांचा सहभाग असावा यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्नराज्य ग्राहक कल्याण निधीचे कामकाजग्राहक कायदा,  ग्राहकांना तत्काळ न्याय मिळावा यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न,  राज्यातील ग्राहक न्यायालयांचे कामकाज या विषयांची सविस्तर माहिती श्री. पाठक व श्री. शिरसाव यांनी दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.
००००

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई, दि. 24 : मराठी भाषेला  अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेअशी विनंती  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात श्री.ठाकरे म्हणतातमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे  16 नोव्हेंबर 2013 रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला.
अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पूर्ण करते. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.
 संबंधित विभागाने सदर प्रकरण साहित्य अकादमीच्या भाषा समितीकडे विचारार्थ असल्याचे कळविले आहे. बराच कालावधीपासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालून मराठीला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावाअसे श्री.ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.
००००

Monday 23 December 2019

मतदानासाठी 9 जानेवारी रोजी स्थानिक सुटी

        नागपूर, दि.23 : जिल्हयात नागपूर ग्रामीण व कुही या तालुक्यातील 9 जानेवारीला ज्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहेत त्याच ठिकाणी मतदारांना मतदान करता यावे म्हणून संबंधित ग्रामपंचायतीच्या क्षेत्रापुरती स्थानिक सुटी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
*******

जिल्हास्तरीय युवा महोत्सव 27 डिसेंबरला

नागपूरदि.23 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन शुक्रवार, दिनांक 27 डिसेंबर 2019 रोजी सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कुलनागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
            या महोत्सवाअंतर्गत लोकगीतलोकनृत्यएकांकिका (हिंदी किंवा इंग्रजी)शास्त्रीय वाद्य वादन (सितारबासरीतबलाविणामृदुंगहार्मोनियम {लाईट}), गिटारशास्त्रीय गायनभरतनाट्यमकथ्थकमनीपूरीओडीसीकुचीपुडीस्वयंस्फुर्तवक्तृत्व (हिंदी किंवा इंग्रजी) कला बाबींच्या सहभाग राहणार आहे. युवा महोत्सव स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकाचे वय 15 ते 29 या वयोगटात असावे. स्पर्धकाचा जन्म दिनांक 12 जानेवारी 2005 पूर्वीचा व दिनांक 12 जानेवारी 1991 नंतरचा असावा. तसेच गट तीन (सन 2015-16, 2016-17, 2017-18) वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी झालेल्या युवक युवतींना सहभाग घेता येणार नाहीयाची नोंद घ्यावी अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी पत्रका द्वारे दिली आहे.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये विजयी स्पर्धकांना (प्रथमद्वितीयतृतीय) सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. जिल्हास्तरीय युवा महोत्सवात जास्तीत जास्त शाळामहाविद्यालय तसेच सांस्कृतिक मंडळे यांनी आपला प्रवेश अर्ज दिनांक 26 डिसेंबर 2019 पूर्वी  सादर करावा. सोबत जन्मतारखेचा दाखला व आधारकार्डपासपोर्ट फोटो व नागपूर जिल्ह्याचा रहिवासी दाखला अनिवार्य असून कार्यालयीन कामाच्या दिवशी व वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयविभागीय क्रीडा संकुलकोराडी रोडमानकापूरनागपूर येथे सादर करावे. अधिक माहितीकरिता क्रीडा अधिकारी श्रीमती माया दुबळे यांच्याशी दूरध्वनी क्रमांक 8857944259 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
*******

‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात' ग्राहकांचे हित व संरक्षण' या विषयावर मुलाखत


       मुंबई,दि. २३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'ग्राहकांचे हित व संरक्षणया विषयावर अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक व राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे न्यायिक सदस्य दिलीप  शिरासाव यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून  मंगळवार दि. २४ डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे. निवेदक  राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
   दिनांक २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्व, ग्राहक संरक्षणाकरिता कार्यरत यंत्रणा,कंझ्युमर क्‍लबचे कार्य,वैधमापनशास्त्र यंत्रणेमध्ये अधिकाधिक ग्राहकांचा सहभाग असावा यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, राज्य ग्राहक कल्याण निधीचे कामकाज,ग्राहक कायदा, ग्राहकांना तत्काळ न्याय मिळावा यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न,राज्यातील ग्राहक न्यायालयांचे कामकाज या विषयांची  सविस्तर  माहिती  श्री. पाठक व श्री. दिलीप  शिरसाव  यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात दिली आहे.
0000
                                        

आयएमसी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस 50 लाखांची मदत



मुंबई, दि. 23 : आयएमसी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे आज मुख्यमंत्री सहायता निधीस 50 लाख रुपयांची मदत करण्यात आली. या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे सुपूर्द करण्यात आला. यावेळी आयएमसी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आशिष वेद, उपाध्यक्ष राजू पोदार, महासंचालक अजित मंगळूरकर, उपसंचालक संजय मेहता, आदी उपस्थित होते.
0000

वैविध्यपूर्ण संस्कृती हेच भारताचे वैशिष्ट्य - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी


मुंबई, दि 23 - भारत हा वैविध्यपूर्ण संस्कृतीने नटलेला आहे. विविध राज्य आणि दुर्गम भागातील नागरिक देशाच्या कोणत्याही प्रदेशात वास्तव करीत असले तरी ते स्वत:च्या संस्कृतीसोबत त्या - त्या प्रदेशाची संस्कृती जपून विकासात योगदान देतात. भारताचे हेच वैशिष्ट्य आहे. विविधतेत एकता जपणाऱ्या देशाचे नागरिक असणे ही सौभाग्यशाली बाब असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.
बोरिवली येथील प्रमोद महाजन स्पोर्टस क्लब येथे मुंबई -उत्तराखंड महोत्सवाचे गढवाल भातृ मंडळाने आयोजन केले होते. याप्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.
राज्यपाल म्हणाले, देशात कुठेही वास्तव्यास असणाऱ्या व्यक्तीने आपली मातृभाषा जगवली पाहिजे. जगात भारताची ओळख ही विविधतेत एकता असलेला देश म्हणून आहे. पूर्वी ग्रामीण भागात प्रवासासाठी वाहन अथवा रस्ते नसायचे मात्र आज देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात शासनाच्या सक्रिय सहभागाने दळणवळणासाठी रस्ते उपलब्ध झाले आहेत. गावांना शहरासाठी जोडून देश एकसंध करण्यात शासनाने यशस्वी प्रयत्न केला असून, जगात भारत देश उत्तरोत्तर प्रगती करीत राहिल, असे मत राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, गढवाल भातृ मंडळाचे अध्यक्ष भगतसिंह बिश आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना गढवाल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
0000

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या याद्या उपलब्ध

        नागपूर, दि.23 : राज्य शासनाने माहे जुलै व ऑगस्ट, 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरपरिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी पुरामुळे नुकसान झालेल्या पीकासाठी एक हेक्टरपर्यंत घेतलेले पीककर्ज माफ करण्याचा निर्णय 23 व 27 ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. शेतकऱ्यांकडील बाधित पिकांचा पंचनामा जिल्हा महसूल यंत्रणेमार्फत करण्यात आला असून शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने ठरविलेल्या निकषाप्रमाणे तयार करण्यात आलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित तहसिल कार्यालयाकडून संबंधित सहाय्यक निबंधकसहकारी संस्था यांच्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. या याद्या जिल्हयातील सर्व बँक शाखा विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच तालुका सहाय्यक निबंधकसहकारी संस्था यांच्या कार्यालयास कर्जमाफी मागणी प्रस्ताव तयार करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती जिल्हा उपनिबंधकसहकारी संस्थानागपूर यांनी दिली आहे.
*******

बारावी परीक्षेसाठी अतिविलंब शुल्क भरण्याच्या तारखा जाहीर

 नागपूर दि. 23: बारावीच्या परीक्षेसाठी नियमित, पुनर्परीक्षार्थी व खाजगी विद्यार्थ्यांनी नियमित व विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारण्याची मुदत संपली असून, विलंब शुल्कानंतरच्या अतिविलंब व अतिविशेष अतिविलंब शुल्कासह अर्ज स्वीकारण्याच्या तारखा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्या आहेत.
अतिविलंब शुल्क दि. जानेवारी 2020 पर्यंत प्रतिदिन 50  रुपये याप्रमाणे आकारले जाईल. विशेष अतिविलंब शुल्क सोमवारदि.6 जानेवारी 2020 ते सोमवार 20 जानेवारी 2020 या कालावधीत प्रतिदिन 100 रूपये याप्रमाणे आकारले जाईल. अतिविशेष अतिविलंब शुल्क दि. 21 ते 31 जानेवारी 2020 दरम्यान प्रतिदिन 200 रूपये याप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे. 
कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयांनी ही प्रक्रिया विद्यार्थ्यांकडून वेळेत करून घ्यावी, असे आवाहन मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी केले आहे.
 बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2020 मधील नियमित विद्यार्थी किंवा पुनर्परीक्षार्थीतुरळक विषयाचे परीक्षार्थीश्रेणीसुधार योजनेतील, तसेच खाजगी विद्यार्थ्यांचे विलंबाच्या कालावधीनुसार शुल्क स्वीकारण्यात येणार आहे.  
            कनिष्ठ  महाविद्यालयाने  www.mahahsscboard.maharashtra.gov.in  या किंवा  www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सदर शुल्कासह आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने भरावी. त्यानंतर विद्यार्थी व प्राचार्यमुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह आवेदनपत्राची मूळ प्रत शुल्कासह विभागीय मंडळाकडे सादर करावी, असे निर्देश शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी दिले आहेत.   
                                                                                                                       000

आंचल कांबळेच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 1 लाख रुपये मंजूर

                
नागपूर, दि. 23 :   जिल्ह्यातील खळबंदा येथील कु.आंचल कैलाश कांबळे या मुलीवर ॲसीड हल्ला करण्यात आल्यामुळे तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे तिच्या पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून 1 लाख रुपये तातडीने विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आले.
        सदर सहाय्यता निधीचा धनादेश कु.आंचल कांबळे हिला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी नागपूर कक्षाचे प्रमुख व सदस्य सचिव डॉ. के. आर. सोनपुरे यांचे हस्ते 21 डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील वार्ड क्र.4 मध्ये उपचारा दरम्यान प्रदान करण्यात आले. सहाय्यता निधीचा धनादेश देतेवेळी नागपूर शहर तहसिलदार श्री. वासनिक, डॉ. मुरारी सिंग, वरिष्ठ सहाय्यक जॉन अनभोरे, व आंचल कांबळे हिचे भाऊ उपस्थित होते.
00000

Saturday 21 December 2019

शिरवळ ते बारामती रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार - डॉ.नितिन राऊत


नागपूर, दि. 21 : पुणे जिल्ह्यातील शिरवळ ते बारामती एमआयडीसीला जोडणाऱ्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम  दहा वर्षापासून सुरु आहे. यामध्ये शिरवळ ते लोणंद व फलटण ते बारामती रस्त्याचे काम सध्या अपूर्ण असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री डॉ. नितिन राऊत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
या संबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य रामहरी रुपनवर यांनी मांडली.
यावेळी श्री.राऊत म्हणाले, पुणे जिल्ह्यातील शिरवळ ते बारामती एमआयडीसीला जोडणाऱ्या चौपदरी रस्त्याच्या कामामध्ये बारामती-फलटण, रा.मा.10 कि.मी. 42/400 ते 64/300 (एकूण लांबी 29.90 कि.मी.) आणि शिरवळ-लोणंद-फलटण कि.मी. 80/00 ते 136/00 (एकूण लांबी 56.00 कि.मी) अशी एकूण 77.90 कि.मी. लांबीचा एकूण रु. 355.65 कोटी रकमेचे चौपदरीकरणाचे काम खासगीकरणांतर्गत हाती घेण्यात आले होते. रस्त्याचे 65 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित 35 टक्के वेळीच भूसंपादन न झाल्यामुळे ऑक्टोबर 2012 पासून काम बंद आहे. या संबंधीच्या सर्व अडचणी सोडवून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याची माहिती मंत्री श्री.राऊत यांनी दिली.
यावेळी उपसभापतींनीही या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लवकर करण्याचे निर्देश दिले.
0000

रायगड जिल्ह्यातील आरोग्य योजनेच्या अनियमिततेची विभागामार्फत चौकशी - जयंत पाटील


नागपूर, दि. 21 : रायगड जिल्ह्यामध्ये शासनाच्या वतीने आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत माता व बालकांसाठी शालेय मुलांसाठी, क्षयरोग, कुष्ठरोग नियंत्रण इत्यादी आरोग्यविषयक बाबींसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये अनियमितता असल्याची लोकप्रतिनिधींची तक्रार असल्याने  या योजनेतील अनियमिततेची विभागामार्फत चौकशी करणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
या संबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य अनिकेत तटकरे यांनी मांडली.
या चर्चेत सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, रणजित पाटील आदींनी सहभाग घेतला.
0000

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती - जयंत पाटील



नागपूर, दि. 21 :  राज्य शासनाने गिरणी कामगारांना घरे पुरविण्यासाठी सुरु केलेल्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी  लोकप्रतिनिधी व गिरणी कामगार संघटना प्रतिनिधी यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.
या संबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य प्रसाद लाड यांनी मांडली.
श्री.पाटील म्हणाले, बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली 1991 मधील सुधारित 58 (1) ब नुसार मुंबईतील गिरण्यांची मोकळी जागा व शिल्लक चटई क्षेत्र यांचे वाटप साधारणत: प्रत्येकी 1/3 हिस्सा बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा व गिरणीमालक यांना देण्याची तरतुद आहे. म्हाडास उपलब्ध होणाऱ्या जमिनीवर गिरणी कामगारांसाठी 2/3 गाळे व संक्रमण सदनिकांसाठी 1/3 गाळे बांधण्याची तरतुद आहे. म्हाडाने गिरणी कामगारांच्या माहिती संकलनासंदर्भात राबविलेल्या तीन मोहिमेमध्ये सुमारे 1 लाख 74 हजार गिरणी कामगार/त्यांच्या वारसांनी गिरणी कामगारांच्या घरांसाठी अर्ज केले आहेत. गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ही समिती काम करेल, असे श्री.पाटील यांनी सांगितले.
या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाई जगताप, भाई गिरकर आदींनी सहभाग घेतला.
0000

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अतिविशेषोपचार रुग्णालय नागपूरसाठी उच्च दर्जाच्या सोयीसुविधा पुरविण्याबाबत लवकरच बैठक – बाळासाहेब थोरात


नागपूर, दि. 21 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय नागपूर येथे रुग्णांना चांगल्या व उच्चदर्जाच्या सोयीसुविधा पुरविण्याबाबत शासन प्रयत्नशील असून लोकप्रतिनिधी व त्यातील संबधित अधिकाऱ्यांची   लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानपरिषदेत दिली. यासंबधीची लक्षवेधी सूचना सदस्य अनिल सोले यांनी मांडली होती.
श्री. थोरात म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय संलग्नित अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर येथे उपचारार्थ येणाऱ्या बाह्यरुग्णांची संख्या 550 ते 600 असून दररोज साधारणत: 230 ते 250 आंतररुग्ण दाखल होत असतात. या रुग्णालयातील दैनंदिन स्वच्छतेची कामे कंत्राटी सेवेच्या कर्मचाऱ्यांकडून व संस्थेच्या नियमित सफाईगार कर्मचाऱ्यांकडून केली जाते. रुग्णालयाची इमारत चार मजली असून  त्यामध्ये दोन उद्ववाहने कार्यरत आहेत. त्यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत नाही. रुग्णालयाच्या वॉर्डातील जैविक कचरा संकलन केंद्रात ठेवला जातो. हा जैविक कचरा नागपूर महानगरपालिका मान्यताप्राप्त कंपनीकडून संकलन केंद्रातून दररोज उचलला जातो. रुग्णालयामधील अजैविक कचराही महानगरपालिकेमार्फत उचलला जातो. यामुळे दुर्गंधी पसरत नाही. रुग्णालयातील रुग्णांना लागणारे जेवण रुग्णालयातील पाकगृहातून व आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तयार केले जाते. जेवणाच्या दर्जाची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येते. रुग्णांना पोषक आहार आवश्यक असणाऱ्या कॅलरीजप्रमाणे पुरविला जातो. रुग्णालय प्रशासनामार्फत रुग्णाच्या आरोग्याबाबत व त्याअनुषंगाने पुरवावयाच्या सुविधेबाबत योग्य काळजी घेतली जाते. तरीसुद्धा नागरिक व लोकप्रतिनिधींना यांबाबत काही शंका असल्यास संबंधीतांची लवकरच रुग्णालयात बैठक आयोजित केली जाईल, असे श्री. थोरात यांनी सांगितले.
या चर्चेत डॉ.रणजित पाटील, रामदास आंबटकर, नागोराव गाणार, गिरीष व्यास, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, निलय नाईक आदींनी सहभाग घेतला.

वंजारी समाजाच्या आरक्षणाबाबत शासन सकारात्मक - डॉ. नितीन राऊत


नागपूर, दि. 20 : वंजारी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळण्याबाबत क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचे  निवेदन राज्य मागासवर्ग आयोगाकडे अभिप्रायार्थ पाठविण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यात येईल. आयोगाचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर आवश्यक त्या संविधानिक प्रक्रियेचा अवलंब करुन वंजारा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या मुद्यावर शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे इमाव, सावशैमाप्र, विजाभज  व विमाप्र कल्याण मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज विधान परिषदेत सांगितले.
यासंबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य नरेंद्र दराडे यांनी मांडली होती.
डॉ.राऊत म्हणाले, या लक्षवेधीअन्वये विजाभज प्रवर्गाला विहित करण्यात आलेल्या 11 टक्के आरक्षणापैकी 2 टक्के आरक्षण वंजारी समाजाला दिले असून, हे आरक्षण वंजारी समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नसल्यामुळे वंजारी समाज आरक्षणापासून वंचित राहत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणण्यात आली आहे.
कोणत्याही समाजासाठी आरक्षणाची टक्केवारी निश्चित करताना त्या समाजाचा आर्थिक स्तर, मागासलेपणा, लोकसंख्या तसेच अन्य अनुषंगिक बाबी विचारात घेऊन संपूर्ण राज्यात सर्वेक्षण करण्यात येते. सर्वेक्षणाअंती राज्य मागासवर्ग आयोगाच्या निदर्शनास आलेल्या वस्तुस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरक्षणाबाबतची शिफारस आयोगामार्फत शासनाकडे केली जाते. आयोगाकडून प्राप्त शिफारशीवर विचारविनिमय करुन आरक्षणाचे प्रमाण निश्चित करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात येतो. वंजारी समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.
 या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य, सर्वश्री विनायक मेटे, सुरेश धस यांनी सहभाग घेतला.
००००