Tuesday 11 October 2016

दीक्षाभूमीचा जागतिक दर्जाचे स्थळ म्हणून विकास - देवेंद्र फडणवीस

  • धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळयाला लाखो भाविकांची उपस्थिती
  • एकात्मिक आराखडयानुसार दीक्षाभूमी स्मारक परिसराचा विकास
  • दादासाहेब गवईंच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये
  • इंदू मिलवरील स्मारकाच्या कामाला लवकरच सुरुवात

नागपूर, दि.11 :  दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूरच्या सांस्कृतिक जीवनातील महत्वाचा सोहळा असून दीक्षाभूमीमुळे जागतिक स्थळावरील पर्यटक व उपासक येथे येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या पवित्र दीक्षाभूमी स्मारक व परिसर अत्यंत सुंदर करण्यासाठी एकात्मिक आराखडयाला मान्यता दिली असून निश्चित कालावधीत आराखडयानुसार काम सुरु करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दीक्षाभूमी येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने 60 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपप्रज्वलीत करुन देशातून तसेच राज्याच्या विविध भागातून आलेल्या लक्षावधी बुध्द अनुयायांसमोर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोवींद, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रविण दटके, श्रीमती कमलताई गवई, आंध्रचे माजी मंत्री श्रीधर बाबू, खासदार अजय संचेती, आमदार प्रकाश गजभिये, डॉ. मिलिंद माने, विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.
आम्हाला युध्द नको ही बुध्दाची भूमी आहे. जगात शांतीची स्थापना करायची असून जगाला गौतम बुध्दाचे विचार तारु शकतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचार व्यक्त केले असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मानवाच्या कल्याणाचा आत्मिक विचार पंचशीलाच्या विचारामध्ये आहे. ज्या देशांनी प्रगती व विकास साधला आहे, त्या देशांनी गौतम बुध्दाच्या विचारांचा स्विकार केला आहे. शांती व मानवतेकरिता कर्म कांडाच्या पलिकडे जाऊन पंचशीलाचे आचरण करुन मोठे होता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर केवळ संविधानाचे निर्माते नव्हते तर ते खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माते होते. अखंड राष्ट्राचे व विकासाची संधी पाहयला मिळते ते केवळ बाबासाहेबामुळे. सविधानाच्या माध्यतातून एकता व एकात्मतेच्या धाग्यामुळे राष्ट्र विकासाकडे जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर हे जागतिक नेते असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, युनो जगातील सर्व राष्ट्रांनी त्यांची 125 वी जयंती साजरी केली. इंदू मिल येथे बाबासाहेबांचे यतोचित स्मारक व्हावे व हे स्मारक वादातीत असू नये यासाठी सर्वांना एकत्र घेऊन आराखडा तयार करण्यात आला असून त्यांना साजे असे भव्य स्मारकाचे काम लवकरच सुरु करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दादासाहेब गवई स्मारकासाठी 25 कोटी रुपये
माजी राज्यपाल व बाबासाहेब आंबडेकर स्मारक समितीचे माजी अध्यक्ष दादासाहेब गवई यांच्या दीक्षाभूमी स्मारकासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दादासाहेब गवई यांचे यतोचित स्मारकासाठी अमरावती येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यांच्या कार्याची माहिती जनतेला व्हावी यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.
बिहारचे राज्यपाल रामनाथ कोवींद म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी महाराष्ट्र असली तरी प्रेरणाभूमी ही बिहार आहे. भगवान गौतम बुध्द यांच्या प्रेरणेने सामाजिक अन्याय विरुध्दच्या लढयाला सुरुवात केली. शिक्षण तज्ञ, विधी तज्ञ, अर्थशास्त्री, समाजसुधारक, पत्रकार, मजूर नेते अशा विविध सामाजिक जबाबदाऱ्या स्विकारतांना राष्ट्रहीत सर्वोच्च मानून समाजातील शेवटच्या घटकला न्याय देण्याचे कार्य केले आहे. त्यांनी दिलेल्या समाज परिवर्तनाच्या विचाराच्या सर्वांनी स्विकार करुन आत्मसात करावा, असे प्रतिपादन केले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दीक्षाभूमीमुळे नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले असून या परिसराचा तसेच बुध्द सर्किटच्या प्रस्तावासाठी केंद्र शासनाने शंभर कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. बाबासाहेबांचे चिंतन व बुध्दांचा शांतीचा संदेश संपूर्ण जगात पोहचविण्याचा प्रयत्न करुन हा संदेश प्रत्येकाने येथून घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भाषणात बाबासाहेबांनी समाजाच्या उत्कर्षासोबतच विक्षमता दूर करण्यासाठी आयुषभर कार्य केले. सविधानाच्या माध्यमातून सर्वांना समानता व न्याय मिळवून दिला. त्यामुळेच सामान्य व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो. आरक्षणाला धक्का न लावता इतरांनाही आरक्षण मिळावे, अशी भूमीका असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, दीक्षाभूमीवर लाखो भाविक येत असून त्यांना जागा कमी पडत आहे. या परिसराचा विकास करतांना आवश्यक असलेली जागा उपलब्ध करुन द्यावी. केंद्र शासनातर्फे याकरिता आवश्यक सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रविण दटके, आंध्रचे माजी मंत्री श्रीधर बाबू यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष भाषणात भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी बिहाराच्या राज्यपालांनी दिलेली भगवान गौतम बुध्दांची प्रतिमा दीक्षाभूमीसाठी महत्वाची आहे. बौध्द गया येथील गौतम बुध्दांच्या विचारासंदर्भातही यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.
स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी प्रास्ताविकात दीक्षाभूमीच्या विकास व विस्तारासाठी केंद्र व राज्य शासनाची सभोवतालची जागा स्मारक समितीला मिळावी, अशी मागणी करतांना येथील शैक्षणिक विकासासाठी तसेच विधी महाविद्यालयासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी केली. जगातील बौध्द बांधवांना आंबेडकरी चळवळीचा इतिहास माहिती व्हावा यासाठी वेबसाईट व मोबाईल ॲप्स तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी स्मारक समितीतर्फे डॉ. राजेंद्र गवई, आर्यन सुटे, विजय चिकाटे यांनी स्वागत  व आभार प्रदर्शन यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अशोक जांभुळकर यांनी केले. यावेळी स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनीधी व असंख्य भाविक लाखोच्या संख्येने उपस्थित होते.
00000000

आसूरी शक्तिवर सज्जन शक्तिने विजय मिळवू या - मुख्यमंत्री



जयताळा येथे रावण दहन कार्यक्रम

नागपूर, दि.11 :  आजचा दिवस हा आसूरी शक्तिचा दहन करण्याचा आहे. प्रभू रामचंद्र यांनी आसूरी शक्तिवर सज्जन शक्तिने विजय मिळविला होता, आपणही आज चांगल्या कर्माने वाईट कर्मावर विजय मिळविण्याचा निर्धार करु या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते झुंजार नागरिक मंच, जयताळा नागपूर यांच्या वतीने आयोजित भव्य रावण दहन कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले व झुंजार नागरिक मंच, जयताळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सामान्य माणूस आसूरी शक्तिवर विजय मिळवू शकतो हे प्रभु रामचंद्र यांनी दाखवून दिले आहे. आपणही चांगले कर्म करून आसूरी शक्तिला पराभूत करण्याचा संकल्प करु या ऐसे मुख्यमंत्री म्हणाले. आजचा दसरा अतिशय ख़ास असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, आपल्या सैनिकांनी अभिनंदनीय कामगिरी केली. त्यांचा देशाला सार्थ अभिमान आहे. सत्याचा नेहमी जय होईल असा निर्धार आपण करु या. सत्याच्या मार्गाने मार्गक्रमण करु तरच आपल्याला आदर्श जीवन प्राप्त होईल असे ते म्हणाले.
झुंजार नागरिक मंच, जयताळाचे पदाधिकारी दत्तू वानखेड़े व नानाजी सातपुते यांनी जलयुक्त शिवार अभियानासाठी प्रत्येकी 21 हजाराचा धनादेश मुख्यमंत्री यांना सुपुर्द केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय राऊत यांनी केले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत रावण दहन करण्यात आले.
00000000

तथागत गौतम बुध्दांच्या विचारामुळेच जगाला शांतीचा मार्ग गवसेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






नागपूर, दि.11 :  तथागत गौतम बुध्दांनी जगाला शांतीचा मार्ग दिला. त्यांचा शांतीचा संदेश ज्या देशानी आत्मसात केला ते देश आज विकासाच्या प्रगतीपथावर वाटचाल करीत आहेत. आज जपान या देशाच्या प्रगतीचे मूळ हे तेथे रुजलेल्या भगवान गौतम बुध्दांच्या विचारांमध्ये आहे. आज ‘दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस’ येथे तथागत गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाथेय मिळावे, यासाठी देशविदेशातून नागरिक येतात. या भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव 2016 च्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तथागत गौतम बुध्दांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन बुध्दवंदना घेतली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते वाहतूक, जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार डॉ. मिलिंद माने,  ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संस्थापक ॲड. सुलेखा कुंभारे उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दादासाहेब कुंभारे मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 7 पासून ड्रॅगन पॅलेसला जोडणाऱ्या पोचमार्गावर रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ड्रॅगन पॅलेस येथे तथागत गौतम बुध्दांच्या पंचशील तत्त्वाची, दिव्यत्त्वाची आणि असिम शांततेची अनुभूती प्राप्त होते. दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस येथे येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती लवकरच करण्यात येईल. तसेच दादासाहेब कुंभारे मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथील विद्यार्थ्यांसाठी लवकरच वसतीगृहाची निर्मिती करण्यात येईल. टाटा ट्रस्ट सारखी कौशल्य विकासावर आधारित कंपनी येथे आणण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त कौशल्य विकासावर आधारित उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दरवर्षी नागपूर येथे लाखो भाविक येतात. त्यांच्यासाठी दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि शांतीवन या तिन्ही ठिकाणांना बुध्दिस्ट सर्किट म्हणून मान्यता मिळाली आहे. ड्रॅगन पॅलेस येथील तथागत गौतम बुध्दांची संपूर्ण चंदनाची मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. ड्रॅगन पॅलेसच्या विकासासाठी ॲड. सुलेखा कुंभारे यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. त्यांनी समाज सेवेचे हित लक्षात ठेवून चालविले कार्य पुढेही असेच सुरुच ठेवावे, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, दादासाहेब कुंभारे मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे यंत्रमाग विकसित करुन येथील महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन द्यावा. तसेच कौशल्य विकासावर आधारित टाटा कन्सलटन्सी सारख्या कंपन्यांना येथे बोलविण्यात येऊन येथील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.
00000000

विभागीय लोकशाही दिनात 1 तक्रार प्राप्त


नागपूर, दि. 10 : विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या विभागीय लोकशाही दिनात नागरिकांकडून 1 तक्रार स्वीकारण्यात आली. प्राप्त झालेल्या तक्रारी जिल्हाधिकारी, नागपूर-1 अशी 1 तक्रारीचा विभागीय लोकशाही दिनात समावेश होता. तसेच जुन्या 3 तक्रारींवर  सुनावणी देण्यात आली.
या लोकशाही दिनाला विशेष  पोलीस महानिरीक्षक, नागपूर परीक्षेत्र, नागपूर, महानगरपालिका, जिल्हाधिकारी, सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर, पोलीस अधीक्षक ग्रामीण, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर तसेच  इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मागासवर्गीयांच्या हितासाठी “कास्ट्राईब”ने यापुढेही कार्य करीत रहावे --- सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले


नागपूर दि. 10 : गेल्या अनेक वर्षांपासून कास्ट्राईब ही संघटना मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करीत आहे. या संघटनेने कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. शासन, प्रशासन आणि कर्मचारी संघटना एकमेकांना पूरक असतात. कृष्णा इंगळे यांनी सातत्य ठेवून काम करणारे कार्यकर्ते म्हणून नावलौकिक मिळविला आहे. यापुढेही त्यांनी विधायक काम करीत राहावे, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
खामला येथील विजयश्री पराते सभागृह येथे आज कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे 36 व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, प्राचार्य बबनराव तायवाडे, ज्येष्ठ पत्रकार रणजीत मेश्राम, ॲड. प्रभाकर मारपकवार, अधीक्षक अभियंता कुलदीप रामटेके, माजी न्यायमूर्ती पी.पी.पाटील तसेच राज्यभरातील कास्ट्राईब संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात राजकुमार बडोले पुढे म्हणाले की, मागासवर्गीय समाजातील मुले शासन सेवेत येतात. त्यांना मार्गदर्शन करणारे कोणीतरी असावे लागते. ते काम कास्ट्राईब संघटना आवाहनपणे करीत आली आहे, असे गौरवोद् गार त्यांनी यावेळी केले.
आपल्या भाषणात कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे म्हणाले की, या संघटनेच्यहा माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. या संघटनेचे कर्मचारी, एकदिलाने काम करतात. त्यामुळे प्रोत्साहन व ऊर्जा मिळते. गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेली या संघटनेच्या अधिवेशनाची पंरपरा अशीच पुढे चालू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी कास्ट्राईब संघटनेने अनुसूचित जाती व जमातीच्या हितासाठी काम करत रहावे. पंरतु इतर मागासवर्गीयांच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीही सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत  पोहचविण्यासाठी  या  संघटनेच्यावतीने  मदत  केली,  असे  गौरवोद् गार  काढले.  ॲड. प्रभाकर मारपकवार व अधिक्षक अभियंता कुलदीप रामटेके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन विभागीय अध्यक्ष डॉ.बाळासाहेब बन्सोड तर आभार कार्याध्यक्ष रवींद्र पालवे यांनी मानले.
** * * * **

Sunday 9 October 2016

कोराडीचा महोत्सवाला राष्ट्रीय स्वरुप - पर्यटन मंत्री ----सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री जुही चावला हिने रसिकांची मने जिंकली जुही चावला, डॉ.निशीगंधा वाढ महाआरतीत सहभागी



नागपूर, दि.9 : श्री महालक्ष्मी जगदंबा देवीच्या नवरात्र उत्सवा सोबतच कोराडी सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाच्या उत्कृष्ट आयोजनामुळे या महोत्सवाला राष्ट्रीय महोत्सवाचा दर्जा मिळाला असून यापुढेही कोराडी महोस्तव मोठया प्रमाणात आयोजन करण्यात संपूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही, राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
अष्टमीच्या शुभ पर्वावर पर्यटन मंत्री जयकुमार रावल, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री जुही चावला, डॉ. निशीगंधा वाढ यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी जगदंबा देवीच्या दर्शनानंतर महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पर्यटन मंत्री बोलत होते.
मध्यभारतातील जागृत देवस्थान असलेल्या श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिराच्या महोत्सवास लाखो भाविक सहभागी होतात. त्यांना धार्मीक पर्यटनासोबतच सांस्कृतिक परंपरेची माहिती व्हावी यादृष्टीने पर्यटन महोत्सव आयोजनास पर्यटन विभागातर्फ आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व ज्योतीताई बावनकुळे यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला व डॉ. निशीगंधा वाढ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जुही चावला यांनी मराठीत भाषणाला सुरुवात करतांना कोराडी वाशियांना नमस्कार करुन नवरात्र व दुर्गा पुजेच्या शुभेच्छा दिल्या. गणेश चतुर्थीला श्रीमती अमृता फडणवीस यांनी दर्शनासाठी बोलाविले होते. त्यावेळी कोराडी महोत्सवाला उपस्थित राहण्याचा आग्रह केला होता. मनोकामना पूर्ण करणाऱ्या या धार्मिक स्थळाला भेट देण्याचे सौभाग्य लाभले असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी विकासासाठी सुरु केलेल्या उपक्रमालाही शुभेच्छा दिल्या.
मराठी सिने अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाढ यांनी आदीशक्तीला प्रणाम करुन कोराडी सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे आयोजनामुळे सांस्कृतिक वारसा या महोत्सवामुळेच जतन होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मी भारतीय आहे, मला सार्थ अभिमान आहे या कवितेच्या ओळी गातांनाच कोराडी धार्मिक स्थळाच्या पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी 185 कोटी रुपयाच्या आराखडा लवकरच पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रांरभी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करुन पर्यटन विभागातर्फ महोत्सवासाठी 50 लाख रुपये दिल्याबद्दल पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे आभार मानले. यापुढेही यापेक्षा मोठा महोत्सव  आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उदे गं अंबे उदे  हे महानाटय तसेच लोकनृत्य संध्या या कार्यक्रमाला भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.
                 आज विवेक ओबेराय व मनोज तिवारी  

कोराडी पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध सिने अभिनेते सुरेश ओबेराय सांयकाळी 6 वाजता महाआरतीत सहभागी होणार आहे तसेच मनोज तिवारी यांचे जस गीत गायन होत आहे. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहन मंत्री नितीन गडकरी तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. त्यानंतर आतिशबाजी व फटाका शो होणार आहे.

******

सुंदरलालजी राय यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी -राज्यपाल राम नाईक ,---- सुंदरलालजी म्हणजे संघर्षातून जीवन उभं करणारं व्यक्तिमत्व- मुख्यमंत्री




नागपूर, दि.9 : पंडित दिनदयाळ उपाध्याय व सुंदरलालजी राय यांच्या जन्मशताब्दीला आज पासून सुरुवात होत आहे. दोन्हीही नेत्यांचे कार्य समाजासाठी आजही प्रेरणादायी असून त्यांच्या  व्यक्तिमत्वाच्या व कार्याच्या सर्व पैलुंना एकत्र करुन  समाजासमोर मांडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केले. सुंदरलालजी राय जन्मशताब्दी समारोहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, अनुपम राय व डॉ. रुपा राय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुंदरलाल राय यांनी प्रतिकुल परिस्थितीत जनसंघाचे कार्य  अतिशय नेटाने  केले.  त्यांनी  घेतलेल्या कष्टाला अनुरुप असे काम या समितीने करावे असे राम नाईक म्हणाले. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी समारोहास दिल्ली येथून तर सुंदरलाल राय यांच्या जन्मशताब्दी सोहळयास नागपूर येथून आज सुरुवात होत आहे. या दोघांचे कार्य मोठया प्रमाणात समाजापुढे येणे गरजेचे असून समारोह समितीने त्यांच्या सर्व पैलूंना व संघर्षाला  एकत्रित करुन समाजा समोर ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.




पंडित दिनदयाळ उपाध्याय व सुंदरलालजी यांच्या कार्यात साम्य आहे. विपरीत परिस्थितीत सुंदरलालजींनी काम केलं. जनसंघाचा पाया ज्यांनी रचला, त्यात सुंदरलालजी सुद्धा   होते. त्यांच्या  पुण्याईमुळे माझ्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांना आता संधी मिळाली आहे. त्यांचे व्यक्तिमत्व नेहमीच प्रेरणादायी राहिले  असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आजच्या कार्यक्रमाला चार पिढयाचे लोकं उपस्थित असून त्यांनी  नि:स्पृह भावनेने काम केले. जनसंघाच्या यशस्वीतेसाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांच्या स्मृतीला उजाळा नव्हे तर प्रेरणा घेण्यासाठी कार्यक्रम आवश्यक आहे. आपल्या परिवाराला त्यागून त्या काळात या लोकांनी काम केले असे मुख्यमंत्री म्हणाले. सुंदरलालजी यांच्या घटना व कार्य संकलीत करुन ते समाजासमोर आणावे, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी समितीला  केले.
कुठलाही  जनाधार नसतांना अतिशय प्रतिकुल परिस्थितीत काम करणाऱ्या त्या काळातील नेत्यांच्या संघर्षाचा इतिहास आजच्या पिढीला प्रेरणा देणारा असून स्वर्गीय सुंदरलालजी हे त्यापैंकीच एक असल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले. सुंदरलाल राय यांच्या सारख्यांनी संघर्ष केला म्हणून आज आजचे सत्तेचे दिवस आम्हाला पहायला मिळाले असे ते म्हणाले. जुना इतिहास नवीन पिढीला माहिती करुन द्यावा म्हणून सुंदरलालजी राय जन्मशताब्दी समारोह आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले. पंडित दिनदयाळ उपाध्याय व सुंदरलालजी यांनी सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्र निर्माणासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. त्यांच्या कार्यांची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी समितीने कार्य करावे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अनिल सोले यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. रुपा राय यांनी मानले. कार्यक्रमास जनसंघाच्या जुन्या पिढीतील अनेक नेते तसेच कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
******

प्रिंट मीडियाचे महत्व आजही अबाधित - देवेंद्र फडणवीस




  • टाईम्स ऑफ इंडियाच्या नागपूर टाईम्स नवीन अवतरणात

नागपूर, दि.9 : न्याय व्यवस्था आणि प्रिंट मीडियाची आजही समाजात विश्वासहार्यता असून इतर माध्यमांपेक्षा प्रिंट मीडियाचे महत्व आजही अबाधित असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
हॉटेल तुली इंपीरियल येथे टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या नागपूर टाईम्सच्या नवीन अवतरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर टाईम्स ऑफ इंडियाचे राजकीय संपादक प्रफुल्ल  मारपकवार, तसेच सहायक कार्यकारी संपादक दरेग डिसूजा, संचालक पराग रस्तोगी, निवासी संपादक सुनील वारियर होते.
यावेळी महापौर प्रवीण दटके, आमदार प्रकाश गजभीये, वीज वितरण कंपनीचे संचालक श्याम वर्धने, विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलिस आयुक्त पी. व्यंकटेश्वर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी उपस्थित होते.
विविध माध्यमामध्ये स्पर्धा निर्माण होत असतांना प्रिंट माध्यमाबद्दल विश्वासहार्यता कायम असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे प्रभावी असले तरी यामाध्यमावरील बातमी परत घेता येते. परंतू प्रिंट मीडियामध्ये परत घेता येत नाही. टाईम्स ऑफ इंडिया हे संपूर्ण वृत्तपत्र असून नागपूर मधून टाईम्स ऑफ इंडिया प्रसिद्ध होतो ही नागपूरसाठी गौरवाची बाब आहे. नागपूरच्या विकासात टाईम्स वृत्तपत्राचे मोठे महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर व विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात टाईम्सने महत्वाची भूमिका घेतली असून नागनदी संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये सहभागी होतो. तसेच स्वत:ला नागपूरकर म्हणून घेण्याचा मला अभिमान आहे. असे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले अब्दुल कलाम यांनी नॅशनल मिशनसाठी वृत्तपत्राचे महत्व अधोरेखीत केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या नागपूर टाईम्स या नवीन अवतरणाला शुभेच्छा दिल्यात. तसेच पहिल्या अंकाचे प्रकाशन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी संपादक सुनील वारियर यांनी तर आभार सुनील शांडिल्य यांनी मानले.
******

कोराडी येथील महानिर्मितीच्या 660 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाचे पंतप्रधानाच्या हस्ते राष्ट्रार्पण -देवेंद्र फडणवीस






  • स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन
  • मध्यभारतातील आकर्षणाचे स्थळ म्हणून कोराडी पर्यटन विकास
  • तलावाचे खोलीकरण व सौदर्यींकरणासाठी 50 कोटी रुपये
  • कोराडी येथील स्टेडियम बांधकामाचा शुभारंभ

नागपूर, दि.9: राज्यात ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात  मागील दोन वर्षात लक्षणीय वाढ झाली असून कोराडी येथील महानिर्मितीच्या 660 मेगावॅट क्षमतेच्या सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक वीज निर्मिती संचाचे राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासंदर्भात प्रत्यक्ष भेटून विनंती करण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
कोराडी येथील स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कोराडी मंदिराजवळील तलावाचे खोलीकरण, कोराडी स्टेडियम बांधकाम तसेच सिमेंट क्राँक्रीट बॉक्स कंडयूट द्वारे कॅनलच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास कुंभारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर, प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता यावेळी उपस्थित होते.
ऊर्जा विभागामध्ये मागील दोन वर्षामध्ये  कोळश्याचे स्वॅपिंग, वीज निर्मिती क्षमतेत वाढ व गुणवत्ता वाढीसाठी घेतलेल्या महत्वाकांक्षी निर्णयामुळे वीज निर्मितीमध्ये  लक्षणीय वाढ झाली असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अधिकारी, कर्मचारी व कामगारांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच चांगले शिक्षण व घराची सुविधाही निर्माण करण्यात येत आहे.
कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबादेवीच्या दर्शनासाठी मध्यभारतातून मोठया प्रमाणात भाविक एकत्र येतात. त्यांची योग्य व्यवस्था व्हावी तसेच भक्ती सोबत पर्यटनाचा निखळ आनंद मिळावा यासाठी पर्यटन विकासाचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असून संस्कृतीचे पर्यटनाचे नाते जोडतांना स्वच्छता व चांगले वातावरण निर्माण करण्यात येईल. मध्यभारतातील आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून या परिसराचा विकास करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने  प्रेरित होऊन गरीब माणसाला आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दयावेत या उद्देशाने विवेकानंद मेडिकल मिशन हे रुग्णालय चालविणार आहे. येथील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा कामगारासोबतच ग्रामस्थानीही लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
प्रमुख  पाहुणे म्हणून बोलतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीमार्फत कामगारांना तसेच येथील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 5 कोटी 67 लक्ष रुपये खर्चुन अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. हे हॉस्पिटल भविष्यात 50 खाटांचे करण्याचा मानस असून अत्याधुनिक रुग्णवाहिका  24 तास उपलब्ध राहणार आहे.
कोराडी परिसरातील तलावाच्या खोलीकरण व सौदर्यीकरणासाठी 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून केंद्र शासनामार्फत 100 कोटी रुपये जलक्रीडा केंद्रासाठी मागण्यात येऊन भावीक व पर्यटकांसाठी पर्यटनासोबतच सीप्लेन सारख्या अत्याधुनिक सुविधा निर्माण करुन मध्यभारतातील महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे सांगतांना पालकमंत्री पुढे म्हणाले की, कोराडी महादुला परिसरातील भुमिगत विद्युत वाहिन्यासाठी 20 कोटी रुपये तसेच क्रीडा संकुलाचे बांधकामाचा शुभारंभ होत आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी 186 कोटी रुपयांच्या विकास आराखडयाला मान्यता मिळाली असून त्यापैंकी 80 कोटी रुपये उपलब्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील जनतेला स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्प्टिलच्या माध्यमातून चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळण्यासोबत प्रत्येक गावात फिरत्या वैद्यकीय दवाखान्यामार्फत सेवा उपलब्ध करुन दयाव्यात, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, जागतिक पर्यटकांच्या दृष्टीने निर्सग, जंगल तसेच वाघाची सफारी हे मुख्य आकर्षण असून विदर्भात  या पर्यटनाला मोठी संधी असल्यामुळे जगातील पर्यटकांना येथे आणण्यासोबतच त्यांना आवश्यक सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येतील. पर्यटनासोबतच रोजगारांच्या संधी उपलब्ध होत असल्यामुळे पर्यटन विकासाला चालना देण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रांरभी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी यांनी महानिर्मितीच्या सांघीक, सामाजिक जबाबदारी अंतर्गत कोराडी येथील कॅनल व तलावाचे गाळ काढण्यासोबतच सौदर्यीकरणासाठी 50 कोटी 84 लाख रुपयाची योजना तयार केली असून या योजनेमुळे पाणी साठवणूक क्षमतेत वाढ होणार असून शेती व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता यांनी जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कोराडी येथील हॉस्पिटल मध्ये सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये प्रकल्पग्रस्त व कामगारांना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध असून परिसरातील जनतेनेही या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. हॉस्प्टिल निर्मितीसाठी केलेल्या कार्याबद्दल मुख्य अभियंता उमाकांत निखारे, अनंत देवतारे, आरोग्य संचालक संजय जयस्वाल, डॉ.दिलीप गुप्ता यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रांरभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीप प्रज्वलीत करुन स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्प्टिलचे उद्घाटन केले तसेच स्टेडियम बांधकाम, भुमिगत वीज वाहिन्या कामांचा शुभारंभ केला.
प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर आभार प्रदर्शन शंकर शंखपाळे यांनी मानले तर संचलन मिलींद राहटगावकर यांनी केले. याप्रसंगी कामठी पंचायत समिती सभापती अनिताताई चिकटे, जिल्हा परिषद सदस्या कोराडी श्रीमती सरीताताई रंगारी, अध्यक्षा नगरपंचायत महादुला श्रीमती सीमाताई जयस्वाल, उपाध्यक्ष नगरपंचायत महादुला राजेश रंगारी,  पंचायत समिती सदस्या केसरताई बेलेकर, सरपंच ग्रामपंचायत कोराडी अर्चनाताई मैंद, उपसरपंच ग्रामपंचायत कोराडी, अर्चनाताई दिवाने,  जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महानिर्मितीचे  विश्वास पाठक, चंद्रकांत थोटवे, विकास जयदेव, श्याम वर्धने, अनिल नंदनवार, राजू बुरडे व मुख्य अभियंते, महावितरणचे  प्रसाद रेशमे व मुख्य अभियंते, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे सर्वपदाधिकारी  तसेच कोराडी महादुला परिसरातील प्रकल्पग्रस्त कुंटुंबीय, कंत्राटी कामगार, अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
*****

कोराडी देवीचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन




नागपूर, दि.9: अश्विन नवरात्रीच्या पावन पर्वामध्ये कोराडी येथील श्री महालक्ष्मीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दर्शन घेतले व मनोभावे पूजा केली.
त्यानंतर त्यांच्या हस्ते कोराडी मंदीर परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. कोराडी मंदीर परिसरात कोराडी ग्रामपंचायतच्या वतीने बालोद्यान उभारण्यात आले आहे. या बालोद्यानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. महानिर्मितीच्या वतीने कोराडी पॉन्ड नं.3 चे खोलीकरण व साठवण क्षमता वाढविण्याच्या विकास कामाचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले. तसेच जलसंपदा विभाग निर्मित कोराडी मंदीराजवळील कॅनॉलवर सिमेंट क्राँक्रीट बॉक्स कंडयुटचा बांधकामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदीर परिसरातील अपारंपारिक ऊर्जा प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, कोराडी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सरिता रंगारी, महादुला नगरपंचायत अध्यक्षा श्रीमती सीमा जयस्वाल, कोराडी पंचायत समिती सदस्या श्रीमती केशर बेलेकर, सरपंच श्रीमती अर्चना मैंद, उपसरपंच श्रीमती अर्चना दिवाने तसेच महानिर्मिती, जलसंपदा विभागाचे पदाधिकारी, कोराडी देवस्थानाचे विश्वस्त प्रामुख्याने उपस्थित होते.
*****

रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट




नागपूर, दि.9: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात जाऊन आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ व कामांक्षी देवीची प्रतिकृती देवून स्वागत केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर  बावनकुळे, राजेश पुरोहित, राकेश पुरोहित, प्राचार्य राजेश पांडे व सचिव गोविंदलाल अग्रवाल उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेवबाबा अभियांत्रिकी  महाविद्यालयाच्या परिसरातील रामदेवजीबाबा मंदिरात जावून दर्शन घेतले. यावेळी आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही रामदेवजीबाबा यांचे दर्शन घेतले.
*****