Wednesday 30 June 2021

कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप

कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप गुरुवार, दिनांक 1 जुलै कृषीदिनी होणार आहे. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या कृषी संजीवनी मोहिमेचा राज्यस्तरीय कार्यक्रमात समारोप होणार असून शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कृषी सह संचालक रवींद्र भोसले यांनी केले आहे. 21 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे राबतविण्यात आली आहे. जिल्ह्यात या सप्ताहात आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन 1 जुलैला कृषी विभागामार्फत वर्ष 2020 च्या रब्बी हंगामाचे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा आणि करडई या पिकांसाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीचे पीकस्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले आहे. उद्या मंत्रालयात होणाऱ्या कृषी दिन कार्यक्रमामध्ये या राज्यस्तरीय रब्बी हंगाम 2020 मधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाचे यूट्यूब चॅनल www.youtube.com/C/AgricultureDepartmentGoM वरुन होणार असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी केले आहे. 00000

उमरेड येथील आठही रुग्ण दुसऱ्या लाटेतील

उमरेड येथील कोरोना बाधित असलेल्या आठही रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून कोरोना बाधित रुग्ण दुसऱ्या लाटेतील डेल्टा विषाणूचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व रुग्ण नवीन स्ट्रेन ‘डेल्टा प्लस’ नसल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिली. उमरेड येथे आठ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासण्यात आली होती. त्यानुसार त्यांचे कोरोनासंदर्भातील नमुने नीरी संस्थेमार्फत राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. या संपूर्ण रुग्णांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून दुसऱ्या लाटेतील डेल्टा प्रकारचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नवीन स्ट्रेनमधील डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण नाहीत, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ****

Tuesday 29 June 2021

गोसीखुर्द’मध्ये शंभर टक्के जलसाठ्याचे नियोजन करावे

विभागीय आयुक्तांचे आदेश गोसीखुर्द प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा पूर्ण करण्याचे नियोजन करावे. तसेच या प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे दिले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभा कक्षात विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता प्रकाश पवार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राजेश सोनटक्के, गोसीखुर्द प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई आदी यावेळी उपस्थित होते. गोसीखुर्द सिंचन प्रकल्प हा महाराष्ट्रातील एकमेव ‘राष्ट्रीय सिंचन प्रकल्प’ आहे. या प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करावीत. कुही तालुक्यातील सोनारवाही गावातील प्रकल्पग्रस्तांना आवश्यक त्या सर्व सुविधा व सहकार्य जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येईल. येथील ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत महसूल व जलसंपदा विभागाची संयुक्त बैठक लवकरच घेवून पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच गोसीखुर्द प्रकल्पासाठी शिल्लक भूसंपादनाचा जिल्हानिहाय आढावा घेवून येत्या सहा महिन्यात भूसंपादनाची बहुसंख्य प्रकरणे मार्गी लावण्यात येतील, असा विश्वास श्रीमती लवंगारे-वर्मा यावेळी व्यक्त केला. गोसीखुर्द प्रकल्पाबाबतची प्रमुख प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. गोसीखुर्द प्रकल्पाची कामे पूर्ण झाले असून नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील 13 तालुक्यात 718 गावांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत 85 गावठाणे बाधित आहेत. त्यांचे पुनर्वसन 63 नवीन गावठाणात करण्यात येणार आहेत. त्यापैकी 61 नवीन गावठाणासाठी सुविधा निर्माण झाल्या असून दोन गावांची कामे प्रगतीपथावर आहेत. प्रकल्पातील 14 हजार 984 प्रकल्पग्रस्त कुटुंबांपैकी 11 हजार 676 कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. गोसीखुर्द धरणात सद्य:स्थितीत 50 टक्के सिंचन क्षमता निर्माण होवून 82 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. या प्रकल्पांतर्गत दोन खाजगी जलविद्युत प्रकल्प ‘बांधा-वापरा-हस्तांतर करा’ या धोरणावर विकसित करण्यात आले आहे. याद्वारे साडेसव्वीस मेगावॅट उर्जा निर्मिती होत आहे. गोसीखुर्द प्रकल्पामुळे 1 लाख 24 हजार 658 हेक्टर क्षेत्रावर क्षमता निर्माण झाली आहे. एकूण क्षमता 2 लाख 50 हजार 800 हेक्टर एवढी आहे. यावर शेतकरी धान पीक घेत आहेत. या प्रकल्पाच्या एकूण सिंचनक्षमतेपैकी 49 टक्के क्षेत्राला बंदनलिका वितरण प्रणालीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याची कामे प्रगतीपथावर आहेत. नागपूर जिल्ह्यात 22 हजार 997 हेक्टर, चंद्रपूर जिल्ह्यात 1 लाख 40 हजार हेक्टर तर भंडारा जिल्ह्यात 87 हजार 648 हेक्टर क्षेत्राला या सिंचन प्रकल्पाचा लाभ होणार आहे. गोसीखुर्द धरणाची एकूण साठवण क्षमता 1146 दशलक्ष घनमीटर आहे तर प्रकल्पाचा पाणी वापर 1540 दशलक्ष घनमीटर एवढा आहे. प्रकल्पाला उजवा व डावा असे दोन मुख्य कालवे आहेत. तसेच बुडीत क्षेत्रातून टेकेपार, आंभोरा, नेरला आणि मोखाबर्डी या चार उपसा सिंचन योजना आहेत. तर कालव्यावर पवनी, शेळी, अकोट, गोसी व शिवनाळा या छोट्या उपसिंचन योजना आहेत. याव्यतिरिक्त आसोलामेंढा ब्रिटीशकालीन सिंचन प्रकल्प हा या प्रकल्पाचा भाग असून या धरणाची उंचीवाढ व कालवे प्रणालीचा विस्तार व सुधारणा यांची कामेही प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती श्री. अंकुर देसाई यांनी यावेळी दिली. 00000

Saturday 26 June 2021

समाजकल्याण विभागाच्या योजनांची माहिती सर्वदूर पोहचवा -डॉ. प्रशांत नारनवरे

• समाजकल्याण विभागात सामाजिक न्याय दिन साजरा समाजकल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गरजूंपर्यत पोहचणे म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना खरी आदरांजली होय, असे प्रतिपादन समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज येथे केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त सुरेंद्र पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक ईलमे, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. मानव जातीच्या कल्याणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे योगदान फार मोठे आहे. असे सांगून डॉ. नारनवरे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायावर आधारित समाज व्यवस्थेचा आग्रह धरला. त्यांनी त्या काळात अनेक अनिष्ट चालिरिती-प्रथांना पायबंद घातला. शिक्षण, आरोग्य अशा सामान्यांच्या जीवनांशी निगडीत क्षेत्रात दूरगामी अशी धोरणे राबविलीत. खऱ्या अर्थाने ते ‘सामाजिक न्यायाचे अग्रदूत’ होते. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरक आणि मार्गदर्शक असल्याचे ते यावेळी म्हणाले. सामाजिक न्याय विभागाच्या योजना राबविण्यासाठी शासनाचे इतर सर्व विभाग हे साखळी पध्दतीने काम करीत असतात. या विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी, यासाठी समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी इतर विभागातील अधिकाऱ्यांशी या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करुन त्याचे योग्य नियोजन करावे. आपण समाजकल्याण विभागात कामाला आहोत, ही आपल्यासाठी समाजामध्ये समता प्रस्तापित करण्याची सुवर्ण संधी आहे. या संधीचा उपयोग करुन समाजासाठी चांगले कार्य करा. आपल्या विभागातील योजनांना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा. कार्यालयात काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपआपले काम प्रामाणिकपणे केले तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अपेक्षित असलेला समाज निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास श्री. नारनवरे यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषण करताना श्री. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राला थोर समाजसुधारकांची परंपरा लाभलेली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये ‘कल्याणकारी राज्या’ची स्थापना केली. दिव्यांग, सामाजिक न्यायाची गरज असणारे समाजातील वंचित घटकांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्याच्या विचारांचा आदर्श ठेवून समाजातील विविध घटकांमधील दरी कमी करण्याचे महत्त्वाचे काम समाजकल्याण विभागामार्फत होत असल्याचे ते यावेळी म्हणाले. समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे मूल्यमापन करुन लाभार्थ्यांना किती लाभ झाला, याचे विश्लेषण होणे गरजेचे आहे. समाजपयोगी योजनांचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत व्हावा, यासाठी सामाजिक न्याय विभागाची गरज असल्याचे प्रतिपादन राधाकृष्णन बी. यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना ‘आपत्ती व्यवस्थापन गुरू’ म्हणून ओळखल्या जाते. 122 वर्षांपूर्वी देशात प्लेग व दुष्काळामुळे दहा लाख नागरिक मृत्यूमुखी पडले. अशा साथरोग आपत्तीच्या काळात शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानातील साथरोग नियंत्रणात राहीला. यावरुन महाराजांची दूरदृष्टी बघायला मिळते. सध्याच्या कोरोना-19 काळात राजर्षी शाहू महाराजांचे विचार अंगीकारून या आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत श्री. गायकवाड यांनी व्यक्त केले. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती श्री. देशमुख यांनी यावेळी दिली. नागपूर जिल्ह्यात एकूण 25 मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह, नोकरी करणाऱ्या महिलांचे एक वसतिगृह तसेच दोन शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत. रमाई घरकुल योजनेंतर्गत महानगर पालिका क्षेत्रात एकूण 929 लाभार्थ्यांना व नगरपालिका क्षेत्रात एकूण 1 हजार 12 लाभार्थ्यांना व ग्रामीण क्षेत्रात 9 हजार 111 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत एकूण 2 हजार 29 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. मिनी ट्रॅक्टर योजनेंतर्गत सन 2019-20 मध्ये एकूण 123 बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले आहे. तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी ‘स्टॅन्डअप इंडिया मार्जीन मनी’ ही योजना सन 2020-2021 पासून नव्याने सुरू झालेली असून यामध्ये 17 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन स्नेहल शंभरकर यांनी तर आभार जनसंपर्क अधिकारी जयश्री धवराळ यांनी मानले. *****

Thursday 24 June 2021

सर्व_सिटी_सर्वे_ऑनलाईन_होणार -जमाबंदी आयुक्त एन.के. सुधांशू

जिल्ह्यात कामठी येथे ई-पीक पायलट प्रोजेक्ट
सर्व सिटी सर्वे कार्यालय ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड, सातबारा, शहरातल्या फेरफारची नकलसुद्धा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना मिळणार असून विनाकारण कार्यालयात येणाची गरज भासणार नाही, असे जमाबंदी आयुक्त तथा भूमि अभिलेख संचालक एन. के. सुधांशू यांनी सांगितले. नागपूर विभागाच्या दौऱ्यावर जमाबंदी आयुक्त आले असताना रवी भवन येथे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी निशीकांत सुके, उपसंचालक भूमी अभिलेख बाळासाहेब काळे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख गजानन डाबेराव यावेळी उपस्थित होते. ई-पीक डिजिटल सेवांची माहिती देतांना सुधांशू म्हणाले की, शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहिती अचूक भरणे अत्यावश्यक आहे. माहिती अचूक राहिल्यास शासनास शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देणे सोयीचे होणार आहे. त्याबरोबरच वित्तीय संस्थांना शेतकऱ्यास कर्ज देतांना त्रास होणार नाही. या सेवेचा लाभ शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अपडेट माहितीमुळे अचूक सातबारा शेतकऱ्यास मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात कामठी येथे प्रथमच प्रायोगिक तत्वावर ई-पीकचा पायलट प्रोजेक्ट करण्यात आला आहे. याचा फायदा ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांना सुद्धा होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी सांगितले. नागरिक स्वत:ही माहिती डिजिटल पद्धतीने भरु शकतो. नागरिकांनी (डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन) digitalsatbara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून अचूक माहिती भरावी व सेवेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी भूमि अभिलेख विभागातील नगर भूमापन अधिकारी भूषण मोहिते व राहूल काटकर यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल जमाबंदी आयुक्त श्री. सुधांशू यांनी प्रमाणपत्र देवून गौरव केला. 00000

तृतीयपंथीयांच्या_हक्कांचे_संरक्षण_करा -श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा

* समाजकल्याण विभागाचा आढावा * तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना * कोविड लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणार तृतीयपंथीयांच्या कल्याण्यासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली असून या अंतर्गत स्वयंरोजगारासाठी बीजभांडवलासह विविध योजनांची तात्काळ अंमलबजावणी करा, असे निर्देश विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षामध्ये श्रीमती लवंगारे-वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समाजकल्याण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. कल्याण मंडळाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे. त्यांना कोणत्याही शाळा-महाविद्यालयातून प्रवेश नाकारला जावू नये, याबाबत जनजागृती करण्यात यावी. त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालून स्वयंरोजगार मिळावा यासाठी त्यांनी सुरु केलेला व्यवसाय, लघु उद्योगांसाठी बीज भांडवल योजना सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. समाजकल्याण विभागामार्फत तृतीयपंथीयांना ओळखपत्र बनवून द्यावे. तसेच सर्व तृतीयपंथींयांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात यावे. यासाठी जिल्हाधिकारी तसेच समाजकल्याण विभाग यांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. विभागातील गावे, वस्त्या तसेच रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबत येत्या 15 ऑगस्टपूर्वी कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. यासाठी जिल्ह्यातील जातीवाचक गावे, वस्त्यांची माहिती गोळा करुन शहरी भागासाठी नगरविकास विभागाने नावे बदलविण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच ग्रामीण भागासाठी ग्रामविकास विभागाने कार्यवाही करावी. याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी स्थानिक स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करावे. यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी, डॉक्टर्स, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची मदत घ्यावी. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गंत जिल्ह्यातील घडलेले गुन्हे या संदर्भासाठी यावेळी आढावा घेण्यात आला. अनुसूचित जाती, जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत घडणाऱ्या गुन्ह्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. तसेच अशा प्रकरणांचा तपास विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावा, अशी सूचना करताना विभागीय आयुक्त म्हणाल्या की, विभागात 104 गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. यामध्ये तीन महिने ते एक वर्षापर्यंतच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. विभागातील न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणेसुद्धा तातडीने निकाली काढावीत. विभागात 1 हजार 419 प्रकरणे प्रलंबित आहेत. अनुसूचित जाती, जमातीच्या पीडित कुटुंबांना जिल्हा दक्षता समितीमार्फत 10 कोटी 57 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. यामध्ये विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कोणतीही पीडित व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये. अत्याचार पीडितांना शासकीय मदत मिळावी यासाठी त्वरित कार्यवाही करण्यात यावी. खून, मृत्यू प्रकरणे तसेच कायम अपंगत्व आले असल्यास पीडितांना नोकरी व निवृत्तीवेतन, पुनर्वसन इत्यादी सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. अशी न्यायालयीन प्रकरणे निकाली निघण्यासाठी अंमलबजावणी प्राधिकरणातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी विहित वेळेत न्यायालयाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सादर करुन पीडितांना न्याय मिळण्यासाठी पाठपुरवठा करावा. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीमार्फत अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आर्थिक व इतर लाभ मंजूर करण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, असेही त्या यावेळी म्हणाल्या. 00000

Wednesday 23 June 2021

विकास कामांची कालमर्यादा पाळून जनतेला तात्काळ प्रतिसाद द्या - प्राजक्ता लवंगारे-वर्मा

विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देवून ते सोडविण्यासाठी महसूल यंत्रणेच्या माध्यमातून मिळणारा प्रतिसाद महत्त्वाचा आहे. त्यासाठी विकास कामांची कालमर्यादा पाळा, अशा सूचना नव्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज दिल्यात. नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून आज पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामामधून जनतेला अधिक लोकाभिमूख व परिणामकारक प्रशासन देण्याला प्राधान्य द्यावे, असे सांगताना श्रीमती वर्मा म्हणाल्या की, कोरोना काळात नागपूर विभागाने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केले होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत झाली. नैसर्गिक आपत्तीच्या काळातही अशाच पद्धतीने विभागात काम करण्याची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांनी सोपवलेल्या कामाच्या वेळा निश्चित करुन त्या कालमर्यादेत सोडविण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. विभागीय आयुक्तालय हे नियंत्रण अधिकाऱ्याच्या भूमिकेत न राहता जिल्हास्तरीय यंत्रणेला पूरक म्हणून काम करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्याने स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्यासोबतच केवळ जिल्ह्यातून आलेल्या अहवालावर विसंबून न राहता शेवटच्या घटकाकडून मिळणारा प्रतिसाद यावर अधिक काम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विविध विभागांचा आढावा घेतला. दैनंदिन कामामध्ये येणाऱ्या अडचणी, प्रलंबित असलेले प्रश्न तसेच ते सोडविण्यासाठी विभाग प्रमुखांकडे होत असलेली कार्यवाही याबद्दल श्रीमती वर्मा यांनी विभागनिहाय माहिती घेतली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संजय धिवरे, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, उपायुक्त सर्वश्री चंद्रभान पराते, शैलेंद्र मेश्राम, धनंजय सुटे, अंकुश केदार, रमेश आडे, श्रीमती राजलक्ष्मी शहा, श्रीमती रेश्मा माळी तसेच सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला भारतीय प्रशासन सेवेतील 2001 च्या तुकडीच्या सनदी अधिकारी असलेल्या श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथून प्रांत अधिकारी या पदापासून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. मराठी भाषा विभागाच्या सचिव या पदावर कार्यरत असताना श्रीमती वर्मा यांनी शासनाने नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त पदावर त्यांची नियुक्ती केली. त्या नागपूर विभागाच्या पहिल्या महिला आयुक्त आहेत. आज दुपारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडून नवीन पदाची सूत्रे स्वीकारली. श्रीमती वर्मा यांनी यापूर्वी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळेच्या जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक, सह विक्रीकर आयुक्त, मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव, राज्य उत्पाद शुल्क आयुक्त, सिडको सहव्यवस्थापकीय संचालक अशा विविध पदावर त्यांनी यापूर्वी काम केले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच लोकाभिमुख प्रशासनासाठी त्यांचा गौरव झाला आहे. ****

Saturday 19 June 2021

मतदान ओळखपत्रावर छायचित्र नसलेल्या मतदारांनी 30 जूनपर्यंत छायाचित्रे बीएलओ कार्यालयात जमा करावीत

नागपूरृ दि. 19: जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघातील एकूण 42 लाख 30 हजार 388 मतदारांपैकी 2 लाख 46 हजार 928 एवढ्या मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये नसल्याचे निदर्शनास आले आहे. यादीत नसलेले फोटो जमा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या पत्त्यावर जाऊन फोटो जमा करण्याचे काम करीत आहेत. परंतु अनेक मतदार स्थलांतरित असल्याचे निदर्शनास आले असून, केंद्रस्तरीय अधिकारी स्थलांतरित मतदारांच्या घरी तीन वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या वेळी जाऊन आले असून त्यावेळी अशा स्थलांतरित मतदारांचा मतदार यादीवर दिलेल्या पत्त्यांवर आढळून आले नसल्यामुळे त्यांनी पंचनामा केला आहे. अशा मतदारांनी आपली छायाचित्रे 30 जूनपर्यंत केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पंचनाम्याच्या याद्या तयार करुन त्या सार्वजनिक स्वच्छतागृह, तहसील कार्यालय, मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या nagpur.nic.in या संकेतस्थळावप्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या स्थलांतरित मतदारांच्या नावांची यादी संबंधित तालुक्यातील तसेच शहरातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना देण्यात आली आहे. मतदार यादीतून नावे वगळणी करण्यात येणाऱ्या मतदारांची यादी nagpur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून आपले नाव सदर यादीत नाही याची खात्री करुन घ्यावी. वगळणी करावयाच्या मतदारांचे नाव यादीत असल्यास मतदारानी आपला फोटो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे तात्काळ जमा करावा. सदर यादीतील मतदाराला आपण ओळखत असल्यास त्या मतदाराचा रंगीत फोटो तात्काळ संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावा. फोटो जमा करण्यासाठी दिनांक 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली असून विहित मुदतीत केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे फोटो जमा न केल्यास यादीतील मतदार स्थलांतरित आहे असे समजून त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल, याची संबंधित मतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी केले आहे. ****

छायाचित्र नसणाऱ्या मतदारांची नावे वगळणार 30 जूनपर्यंत मुदतवाढ

* दक्षिण नागपुरातील मतदार यादीत 33 हजार 348 मतदारांचे छायाचित्र नाही * मतदारांनी छायाचित्र जमा करण्याचे आवाहन नागपूर, दि. 19 : नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 78 हजार 201 मतदार आहेत. यापैकी 33 हजार 348 एवढ्या मतदारांचे छायाचियत्र मतदार यादीत नसल्यामुळे हे फोटो गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे मतदारांकडून फोटो गोळा करणार आहेत. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या व्यक्तींनी 30 जूनपर्यंत त्यांचे फोटो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी आशिष बिजवल यांनी केले आहे. दिलेल्या मुदतीत छायाचित्र जमा न केल्यास मतदार यादीतून संबंधितांची नावे वगळली जातील, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. यादीमध्ये मतदारांचे छायाचित्र असलेल्या अद्ययावत मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरु आहे. हे मतदार स्थलांतरित असल्याचे मतदान बीएलओंच्या निदर्शनास आले असून मतदान ते स्थलांतरित मतदारांच्या घरी तीन वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या वेळी जाऊन आले. अशा स्थलांतरित मतदारांच्या ते मतदार यादीवर दिलेल्या पत्त्यावर आढळून आले नाहीत, तेथे राहत नसल्याबाबत त्यांनी पंचनामा केला आहे.या पंचनाम्यांच्या याद्या तयार करुन दोन वेळा नाव असलेल्या मतदारांचे नाव वगळणे सुरु असून तहसील कार्यालय मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या कार्यालयीन संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. nagpur.gov.in या संकेतस्थळावर स्थलांतरित मतदारांच्या नावांची यादी सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही देण्यात आली आहे. यादीतून नावे वगळण्यात आलेल्या मतदारांनी nagpur.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात किंवा मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जाऊन त्यांच्या नावाची खात्री सर्व मतदार मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधींनी करुन घ्यावी. वगळण्यात आलेल्या मतदारांच्या यादीमध्ये नाव असल्यास आपले छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) यांच्याकडे तात्काळ जमा करावे. यादीतील एखाद्या मतदाराला आपण ओळखत असाल तर त्या मतदाराचे रंगीत छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे 30 जूनपर्यंत जमा करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मिनल कळसकर यांनी केले आहे. *****

कृषीपूरक व्यवसायातूनच शेतकऱ्यांची प्रगती शक्य - सुनील केदार

नागपूर, दि. 19 : प्रयोगशील शेतकऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत परंपरागत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवीन पीकपद्धती अनुसरावी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि जोडधंद्याला प्राधान्य देत कृषी मालावर प्रक्रिया करावी. कृषीपूरक व्यवसायातूनच शेतक-यांची प्रगती होणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले. जिल्हा परिषदेच्या कै. आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित प्रयोगशील अशा 65 शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, इतर पदाधिकारी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे प्रामुख्याने उपस्थित होते. कोरोना काळात सर्व घटक लॉकडाऊन होते. मात्र शेतकरी राबत होता. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे सर्व जग थांबले होते. मात्र शेतकरी थांबला नव्हता, असे सांगून श्री. केदार म्हणाले की, शेतकऱ्यांना शैक्षणिक अनुभव नसला तरी शेतकरी त्यांच्या कष्टातून अनुभव घेत शिकतात. त्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे. नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कृषीविषयक विशेष उपक्रम राबविताना कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पंचायत समितीचे पदाधिकारी व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनांची माहिती घेताना त्याचा फायदा होईल. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी वारंवार बैठका घेत प्रयोगशील शेतकऱ्यांकडून परंपरागत शेती करणाऱ्या शेतक-यांना मार्गदर्शन केले पाहिजे. या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असे आवाहन श्री. केदार यांनी केले. पीक विमा योजनेत राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी दिला असून, त्यासाठी तालुका स्तरावरील पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी पदाधिकारी व अधिकारी यांनी लक्ष घातले पाहिजे. पारंपरिक पीक पद्धतीने शेती करण्यापेक्षा इतर नगदी पिकांकडे शेतकऱ्यांना वळवा. रामटेक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पानमळे होते. ते कमी झाले‌ आहेत. आता नागपुरात लागणारे खायचे पान पश्चिम बंगालमधून येते, हे चित्र बदलले पाहिजे, असे आवाहन करुन श्री. केदार म्हणाले की, कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 300 ट्रक भाजीपाला येतो. त्यातील जवळपास 200 ट्रक हे परराज्यातून येतात. यात नागपूर जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा भाजीपाला का येत नाही, याचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. खुबाळा येथील शेतकरी उत्तम शेती करतात. तिथे दाळमिलसह विविध कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग सुरु असून, त्यातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्वात जास्त रोजगार मिळवून देणारा कृषी विभाग असून, त्याला संलग्नित बकरी पालन व कुक्कुटपालनाचे नवे जोडधंदे सुरु करण्याचे शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केले. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी बकरी व कुक्कुटपालनाकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे सांगून प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशकथा सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. त्यातून इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. या यशकथांच्या माध्यमातून नागपूर जिल्हा परिषदेने चांगला उपक्रम सुरु करावा, असे आवाहनही श्री. केदार यांनी यावेळी उपस्थितांना केले. यावेळी कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांचेही समयोचित भाषण झाले. पीक पद्धती बदला - बळवंत गडमल प्राध्यापकाची नोकरी करायची होती पण नोकरी न करता मी शेती करण्याला प्राधान्य दिले. 2009पासून शेती करायला सुरु केली असून, ते बीबीएफ तंत्रज्ञान वापरतात. तसेच त्यांनी कापसाचे पीक घेणे जवळपास बंद केले असल्याचे सांगून परंपरागत शेतीला फाटा देऊन नवनवीन पीकपद्धतीने शेतीचे उत्पादन घेण्याचे आवाहन करताना प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतीकडे वळण्याचे आवाहन श्री. गडमल यांनी केले. सेंद्रीय शेतीकडे वळा – सेवक उईके शेती व पशुधन, मत्स्य, बकरीपालन उत्पादक शेतकरी म्हणून नावाजलेले सेवक उईके यांनी रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे शेतीचा पोत बिघडत चालला असून, हे थांबविण्याचे आवाहन केले. तसेच दूध उत्पादन अर्थात पशुपालन करण्याचा उपस्थितांना सल्ला दिला. शेतीचा पोत आणि माणसांचे पोट सध्या बिघडले आहे, असे सांगून रासायनिक खतांवर मिळणारे अनुदान कमी करावे. जेणेकरून शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळेल. तसेच शेतकऱ्यांनी कृषी उत्पादन प्रकियाकडे वळावे, असे सांगून श्री. उईके यांनी दुधातील भेसळ वाढली आहे. हे भेसळीचे प्रकारही थांबविण्याचे आवाहन मंत्री केदार यांना केले. हिरवा चारा उत्पादनाकडे वळा - डॉ. उल्हास निमकर शेतकऱ्यांच्या मुलांना अनंत अडचणी येतात. शेतकऱ्यांकडून त्या अडचणी सोडविताना शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. दूध उत्पादक शेतक-यांना दुभत्या जनावरांसाठी वर्षभर हिरवा चारा मिळत नाही. त्यामुळे त्यांनी हिरवा चारा उत्पादन करणा-या 55 शेतक-यांचा गट बनविला असून, या गटाच्या माध्यमातून ते थेट ग्राहकांना घरपोच चारा उपलब्ध करुन देत असल्याचे सांगितले. या प्रयोगशील शेतकऱ्यांचा झाला सत्कार यावेळी सेंद्रीय शेती उत्पादक तुळशीराम बेहरे, सचिन कवडूजी सरवदे, लिंगा, अविनाश पारधी,दीपक मधुकर वासेकर, धामना लिंगा, विठ्ठल मोहनदास मनियार, धानउत्पादक हेमराज नारायण धोंगडे, ढवळी पेंढरी, देवराव राऊत, अविनाश सहदेवराव गवळी, सेवक उईके लिहगाव, श्रावण देवराव मासूरकर, प्रफुल्ल वानखेडे, विनोद कृष्णराव येळणे, विजय गंगाधर महाकाळकर, चंद्रभान श्रीराम सावरकर, शिशुपाल मेश्राम कुही, दिलीप मुळे, गुमथळा, सुरेश ढोले सोनेगाव, महादेव झाडे, उमरी, सरपंच सुधीर गोतमारे, खुर्सापार, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सुनील हुमदे, सावंगी, कैलास गुरव, सतीश मोहोड, मेघराज तागडे गोगली, श्रीमती सुनंदा सालोडकर, सेंद्रीय शेती पुरस्कार प्राप्त शेतकरी सुधाकर कुबडे, सेलू, रमेश मेंढे, मोहदी, श्याम डवरे, चेतन होडे, हळद उत्पादक अनंत गोडबोले, वासुदेव वाडकर, रुपचंद शेंडे रिसाळा, श्रीराम लांजेवार कान्हा देवी, संजय रमेश नेमाडे, सुखदेव गुरवे करंभाड, सुनील गोठवाड, राजेश शिवरकर, पारशिवनी कमलाकांत बसबुजे, उमाकांत पोफळी मानापूर, चंद्रभान धोटे, जनार्दन भगत, अरुण खडसे, भिलेवाडा, विजय मोहरे, चिचाला, किरण चौधरी, मनसर, राजू खोब्रागडे, चिरवा, राहुल मेश्राम, गजानन घाडगे, अरुण बालपांडे खुर्सापार, हरीभाऊ शिंदे, मकरधोकडा, ईश्वर ठाकरे, कुराडी, श्री. बैस आकोली, श्री. चापले विरखंडी, रामभाऊ ईरगुडकर, मांढळ, नारायण रांबड, रियाज शेख, रोहन राऊत उखळी, प्रवीण वंजारी मोखाळा यांच्यासह इतरही शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी कामडी –भस्मे यांनी तर वंदना भेले यांनी आभार मानले

Tuesday 15 June 2021

खरीप पीक कर्ज वाटपाला बँकांनी गती द्यावी - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर दि. 15:- खरीप पीक कर्ज वाटपाची टक्केवारी कमी असून बँकांनी कर्ज वाटपाला गती देण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले. छत्रपती सभागृहात आयोजित खरीप पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा उपनिबंधक अजय कडू, अग्रणी बँक व्यवस्थापक पंकज देशमुख, खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जून महिना उजाडला असून खरीपाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. कर्जवाटपाच्या धिम्या गतीबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. कोविडशी झुंजत असतांना शेती व शेतकऱ्यांच्या आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात 1 लाख 8 हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचा लक्षांक असताना आतापर्यंत फक्त 15002 सभासदांना 169 कोटी 43 लाख कर्ज वाटप झाल्याचे दिसून येते. हे प्रमाण 16 टक्के असून कमी असल्याने त्यांनी असमाधान व्यक्त केले. कर्जवाटपाला गतीमान करण्यासाठी गाव पातळीवर सभा आयोजित कराव्यात. जिल्हा तसेच तालुका पातळीवर व बँकस्तरावर कॅम्प आयोजित करण्यात यावेत. पात्र खातेदारांना सभासद करून घ्यावे व अशा सभासदांना कर्ज वाटप करण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे श्री. राऊत यांनी सांगितले. यावेळी बँकनिहाय कर्जवाटपाच्या टक्केवारीची माहिती घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्याचे त्यांनी निर्देशित केले. शिवाजी महाराज कर्जमाफी योजना व महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनांच्या माध्यमातून अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. तरी देखील जे शेतकरी कर्ज घेण्यास पात्र आहेत त्यांच्यापर्यत खरीप पीक कर्ज नियोजनाने वाटप करण्यात यावे. अडीअडचणी सोडविण्यासाठी टोल फ्री नंबर सुद्धा प्रसिद्ध करण्याचे निर्देश त्यांनी सहकार विभागाला दिले. शेतकऱ्यांना सावकारी पाशातून सुटका होण्यासाठी व बँक स्तरावर शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. वेळेत मिळालेले पीक कर्ज हे शेतकऱ्यांसाठी संजीवनीच असते. गेल्या वर्षी सुद्धा नागपूर जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटप चांगली कामगिरी करण्यात आली होती. यावर्षी कोरोना प्रतिबंधात्मक परिस्थितीमुळे मेळावे आयोजित करण्यावर मर्यादा होती, मात्र आता निर्बध शिथील झाल्यानंतर कोविड त्रिसूत्रीचे पालन करत बँकांनी क्षेत्रीय पातळीवर उतरून शेतकऱ्यांशी संपर्क करावा. जिल्हा मध्यवर्ती बँक, ग्रामीण बँक आणि राष्ट्रीयीकृत बँक यांनी सामूहिकपणे लक्षांक गाठण्यासाठी प्रयत्न करावेत असे पालकमंत्र्यांनी निर्देशित केले. गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर पीक कर्ज मेळावे घेताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे अशी देखील सूचना त्यांनी यावेळी केली. 00000

कृषी संजीवनी मोहिमेला 21 जूनपासून सुरुवात

नागपूर, दि. 15: आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहीम सुरु करण्यात येत आहे. राज्यात 21 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत प्रत्येक कार्यालयीन दिवशी महत्वाचे तंत्रज्ञान व मोहिमांवर विशेष भर देवून प्रचार, प्रसार व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी कळविले आहे. कृषी संजीवनी मोहिमेमध्ये 21 जून रोजी बी.बी. एफ लागवड तंत्रज्ञान (रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान, 22 जून रोजी बिजप्रक्रिया, 23 जून रोजी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, 24 जून रोजी कापूस ‘एक गाव एक वाण’, भात क्षेत्रात सुधारित भात लागवड, कडधान्य क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान, 25 जून रोजी विकेल ते पिकेल, 28 जून रोजी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, 29 जून रोजी तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढ करण्यासाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, 30 जून रोजी महत्वाच्या पिकांची किड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना व 1 जुलै 2021 रोजी कृषी दिन आणि मोहिमेचा समारोपीय कार्यक्रम होणार आहे. कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कृषी विद्यापीठाचे संशोधित व अद्ययावत तंत्रज्ञान या मोहिमेत प्रसारित करण्याचा मानस आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाच्या महत्वाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. कृषी योजनांची माहिती व्हॉटस्ॲपवर मिळण्यासाठी Auto reply सुविधा विकसित करण्यात आली आहे. व्हॉटस्ॲपवर योजनेची माहिती मिळण्यासाठी 918010550870 या क्रमांकावर keywords असे टाईप केल्यास त्या योजनांची माहिती तात्काळ प्राप्त होईल. या Auto reply सुविधेचा सुद्धा या मोहिमेदरम्यान प्रसार, प्रचार करुन माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल. www.youtube.com/agriculturedepartment Gom असे कृषी विभागाचे चॅनल आहे. या मोहिमेदरम्यान यू-टयुबवरील शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांना दाखविण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कृषी संजीवनी मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 00000

Monday 14 June 2021

स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करा -डॉ. नितीन राऊत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाची पाहणी नागपूर, दि. 14 : स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका क्रीडा संकुलात आवश्यक सर्व क्रीडा सुविधा निर्माण कराव्या. येथे सिंथेटिक ट्रॅक, व्हॉलीबॉल कोर्ट तसेच लहान मुलांसाठी जलतरण तलावाची निर्मिती करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले. जरीपटका भागातील आहुजा नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाची डॉ. राऊत यांनी पाहणी करून संबंधितांशी चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यासच्या अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, तहसीलदार सूर्यकांत पाटील, क्रीडा उपसंचालक अविनाश पुंड, अतिरिक्त तालुका क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, नागपूर सुधार प्रन्यासचे उत्तर विभागीय अधिकारी पंकज आंभोरकर, कार्यकारी अभियंता संजय पोहेकर आदी यावेळी उपस्थित होते. नागपूर सुधार प्रन्यासच्या नियोजित आराखड्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाच्या कामांच्या सद्य:स्थितीची पाहणी श्री. राऊत यांनी केली. लहान वयापासूनच मुलांना विविध क्रीडा प्रकारांची माहिती व्हावी यासाठी संकुलामध्ये लहान मुलांसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात यावा. शिवाय त्यांच्यासाठी लहान जलतरण तलावाची निर्मिती करण्यात यावी. तसेच संकुलातील 200 मीटर धावनपथाचे नुतनीकरण करुन येथे सिंथेटिक ट्रॅक तयार करा. बॉक्सिंग हॉल, व्हॉलीबॉल कोर्ट तसेच टेबल टेनिस क्रीडाप्रकारासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करुन संकुलासाठी सुसज्ज कार्यालयाची निर्मिती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. उत्तर नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल 11 हजार 602 चौरस मीटर क्षेत्रावर वसले आहे. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत संकुलाच्या विकास कामासाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याबाबत सुधारित मागणी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. सद्य:स्थितीत येथे बॅडमिंटन, स्केटिंग, रायफल शूटिंग, टेबल टेनिस, कराटे, तलवारबाजी तसेच योगवर्गाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. येथील प्रत्येक कक्षाची श्री. राऊत यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी रायफल शूटिंगचे प्रात्यक्षिकही केले. या संकुलातून प्रशिक्षित झालेली रायफल शूटिंगची राष्ट्रीय खेळाडू अनन्या शारदा नायडू तसेच प्रशिक्षक शशांक चव्हाण यावेळी उपस्थित होते. संकुलाच्या परिसरात श्री. राऊत यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. *******

Wednesday 9 June 2021

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे शुक्रवारी आगमन

नागपूर, दि. 9 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे शुक्रवार, दिनांक 11 जून रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शासकीय विमानाने मुंबई येथून आगमन होईल. विमानतळावरुन राजभवनसाठी प्रयाण करतील. राज्यपाल श्री. कोश्यारी यांचा शनिवार, दिनांक 12 जून, रविवार, दिनांक 13 जूनपर्यंत राजभवन येथे मुक्काम राहील. सोमवार, दिनांक 14 जून रोजी दुपारी 2.20 वाजता राजभवन येथून विमानतळासाठी रवाना होतील. राज्यपाल दुपारी 3 वाजता शासकीय विमानाने मुंबईसाठी प्रयाण करतील. *****

Sunday 6 June 2021

ग्रामविकासाचा पाया शिवछत्रपतींनी घातला - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात अस्मितादर्शक सोहळा
ग्रामीण भागाचा विकास म्हणजेच सर्वसामान्य जनतेचा विकास आहे. हे जाणून अत्यंत कुशाग्र आणि दूरदृष्टी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात ग्रामविकासाचा पाया घातला, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस म्हणजेच ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा करण्यात आला. पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी गुढीचे पूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, विषय समिती सभापती भारती पाटील, नेमावली माटे, जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले यांच्यासह जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी ए. एस. इनामदार, प्रकल्प संचालक विवेक इलमे आदी यावेळी उपस्थित होते. प्रांरभी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात गुढी उभारण्यात आली. महाराष्ट्र गीतांच्या पार्श्वसंगीतात हा अस्मितादर्शक सोहळा पार पाडला. त्यानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत झाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी प्रथम संबोधित केले. ग्रामविकास मंत्रालयाने अतिशय उत्तम असा कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेची वाटचाल शिवाजी महाराजांच्या ग्रामविकास धोरणाप्रमाणे चालेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. संबोधित करताना श्री. राऊत म्हणाले, शिवस्वराज्य दिन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस. स्वराज्याची, रयतेच्या राज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणाऱ्या या सुवर्ण दिवसाचे महत्त्व विशेष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले. शिवस्वराज्यापूर्वी राजाचे सैनिक त्यांच्या मनात येईल त्या शेतात जाऊन हवे ते बळजबरीने घेऊन जायचे. परंतु 'शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका' ही शिवरायांची आज्ञा होती. शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेल्या वस्तूंची मालकी ही शेतकऱ्यांची आहे .राजाची किंवा सरदारांची नाही. शस्त्र आहे म्हणून ती बळजबरीने घेता येणार नाही. परंतु धान्य, भाजीपाला हवे असल्यास त्याचे योग्य मूल्य द्या, हा क्रांतिकारी विचार पहिल्यांदा शिवरायांनी रुजविला. हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व सर्वत्र पोहोचावे, शिवछत्रपतीच्या उदात्त कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन उत्तुंगपणे मार्गक्रमण करावे, या उद्देशाने शिवराज्याभिषेक दिन विविध उपक्रमाने साजरा केला जातो. गनिमी काव्याच्या युद्धतं‌त्राने महाराष्ट्रातील गोरगरीब, सर्वसामान्य, अठरा पगड जातीच्या मावळ्यांच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र लढा आरंभ करुन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तसेच सर्वधर्मसमभाव व धर्मनिरपेक्षता याचे आजच्या काळासाठी आदर्श ठरेल, असे उदाहरण शिवरायांनी घालून दिले आहेत. सर्वधर्मियांचा त्यांनी आदर केला. ‘राज्य हे रयतेचे राहील’,यासाठी त्यांनी सैनिक, सरदार तसेच मंत्रीमंडळ यांच्यासाठी आज्ञापत्रे लिहिली. भारतीय संविधानात जनतेच्या कल्याणाची जी मूल्ये आहेत, त्यापैकी अनेक मूल्ये शिवरायांच्या आज्ञापत्रात पाहायला मिळतात. म्हणूनच शिवबा ‘जाणता राजा’ ठरतात, असेही ते यावेळी म्हणाले. शिवरायांचा आदर्श ठेवून जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे . कोरोना काळात ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ग्रामीण भागात हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारा पहिला प्रकल्पही नागपूर जिल्ह्यातील कामठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात विक्रमी वेळेत उभारून आरोग्यविषयक आदर्श निर्माण केला आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून ग्रामीण भागात कोरोना केअर केंद्र उभारण्यावर तसेच उपलब्ध रुग्णालयांची क्षमता वृद्धी करण्यावर भर देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाशिवाय शिवरायांच्या स्वप्नातील राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही. यासाठी शेतकऱ्यांना थकीत बिल प्रकरणी दिलासा देणारी योजना आणली आहे. हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. शेतीचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांच्या दारी आणि गावोगावी समृद्धी व्हावी, या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करीत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंजुषा सावरकर यांनी केले. *****

Saturday 5 June 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरचे बांधकाम अंतीम टप्प्यात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली पाहणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर हे जागतिक दर्जाचे नागपूरातील एक वैभव होईल. ऑगस्टपर्यंत कन्व्हेंशन सेंटरचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने कामाला गती द्या, असे निर्देश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे दिले. कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरच्या बांधकामाची पालकमंत्री डॉ. राऊत यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. जागतिक दर्जाच्या या वास्तूचे बांधकाम अंतीम टप्प्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन येत्या काही महिन्यात करण्याचा मानस असल्याने या बांधकामाला गती देण्यात यावी. तसेच कन्व्हेंशन सेंटरमध्ये कार्यालये सुरु करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांशी सपंर्क साधावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, नासुप्रच्या अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये, प्रकल्प वास्तुशिल्पकार संदीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर हा 113 कोटींचा प्रकल्प असून केवळ उत्तर नागपूरमधील नव्हे तर मध्य भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थासाठी हे उत्कृष्ट केंद्र ठरणार आहे. या केंद्रात बँकिंग, तसेच राष्ट्रीय दर्जाचे रेस्टॉरंट, ऑडिटोरीयम, बिझनेस सेंटर, ग्रंथालय, आर्ट गॅलरी आदी स्थापन करण्यात येणार आहेत. आगामी नियोजनात पार्कींग सुव्यवस्थेवर भर देण्यात यावा, असेही ते यावेळी म्हणाले. पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुगत नगर येथे ‘अशोक’ वृक्ष लावून वृक्षारोपण केले. तसेच कल्पनानगर येथील धम्मप्रिय बौद्ध विहार बगीचा येथेही वृक्षारोपण केले. त्यांनी येथील ग्रीन जीमची पाहणी केली. नगरसेविका नेहा निकोसे तसेच नागरीक यावेळी उपस्थित होते. *****

प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणखी सात रुग्णवाहिका पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांच्याहस्ते लोकार्पण

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते आज सात रुग्णवाहिकेंचे लोकार्पण करुन त्या हस्तांतरीत करण्यात आल्यात. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 49 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यात आणखी सात रुग्णवाहिकेची भर पडली आहे. जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, हिवरा बाजार (तालुका-रामटेक), प्राथमिक आरोग्य केंद्र, मोहपा (तालुका-कळमेश्वर), प्राथमिक आरोग्य केंद्र, खापा (तालुका-सावनेर), प्राथमिक आरोग्य केंद्र, भुगावमेंढा (तालुका-कामठी), प्राथमिक आरोग्य केंद्र, धानला (तालुका-मौदा), प्राथमिक आरोग्य केंद्र, भिष्णूर (तालुका-नरखेड) तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, सालई गोधनी (तालुका-नागपूर) अशा एकूण सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. भुगावमेंढा, धानला, भिष्णूर तसेच सालई गोधनी ही नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रांना या रुग्णवाहिकेची मदत होणार आहे. तसेच पंचायत राज बळकट करण्यासाठी हिंगणा, कळमेश्वर, काटोल, भिवापूर आणि रामटेक या पंचायत समितीच्या सभापतींना श्री.केदार यांच्या हस्ते बोलेरो वाहन सूपूर्द करण्यात आले. *****

Wednesday 2 June 2021

नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी होणार नाही यासाठी खबरदारी घ्या -डॉ. संजीव कुमार

* मान्सूनपूर्व तयारीचा आढावा * एसडीआरएफची पथके तैनात * सिंचन प्रकल्पांची स्ट्रक्चरल ऑडिट हवामान विभागाकडून मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्यामुळे विभागातील नद्यांच्या पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये जीवित तसेच पिकांची व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मान्सूनपूर्व करण्यात आलेल्या तयारीचा आढावा डॉ. संजीव कुमार यांनी घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीत भारतीय सेनादलाचे कर्नल बढिये, भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर लक्ष्मण के. राव, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे कमांडर पंकज डहाणे, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता श्री. पवार, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त श्रीकांत फडके, विकास उपायुक्त अंकुश केदार, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जैस्वाल, पोलीस उपायुक्त राजमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख तसेच विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. सिंचन प्रकल्पामधून पुराचे पाणी सोडताना नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देणारी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देताना विभागीय आयुक्त म्हणाले की, मागील वर्षी पुरामुळे बाधित झालेली गावे तसेच पूर नियंत्रण रेषेनुसार बाधित होणाऱ्या गावांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून विभागात मॉक ड्रिल आयोजित करावी यासाठी जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणा उपस्थित राहील याबाबत खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. जिल्हा तसेच तालुकास्तरावरील नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरु राहतील तसेच या नियंत्रण कक्षामध्ये आवश्यक माहितीसह तात्काळ प्रतिसाद मिळेल याची खबरदारी घेण्यात यावी. आंतरराज्य वाहणाऱ्या नद्यासंदर्भात पावसाची तसेच पुराच्या माहितीचे आदान-प्रदान करावे. जिल्ह्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत आपत्ती निवारणासाठीचे सर्व साहित्य सुस्थितीत असून तात्काळ वापर करणे शक्य आहे यादृष्टीने प्रमाणित करुन त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे मान्सून कालावधीत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात कोविड-19 च्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याची खबरदारी घ्यावी. शेतपीक, फळपीक नुकसानीसंदर्भातही आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच पुरामुळे नुकसान झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल तयार करणाऱ्याला प्राधान्य द्यावे. नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानी झाल्यास अशा कुटुंबांना तात्काळ मदत उपलब्ध होईल यादृष्टीने जिल्हास्तरावर नियोजन करावे. आदी सूचना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिल्या. नैसर्गिक आपत्तीच्या बैठकीत तात्काळ उपाययोजनेच्यासंदर्भात विभागामध्ये समन्वय ठेवावा. तसेच कर्मचाऱ्यांना यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात यावे. यासाठी एसडीआरतर्फे जिल्हास्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. हवाई दलातर्फे पूर परिस्थिती बाधित कुटुंबांना अन्नाचे पाकिटे वितरित करताना ती सुस्थितीत राहतील यादृष्टीने जिल्हास्तरावर खबरदारी घेणे आवश्यक आहे. पुराचे पाणी सोडण्यापूर्वी संबंधित यंत्रणांना आवश्यक पूर्वसूचना मिळाल्यास यंत्रणा सज्ज ठेवता येईल. बाधित गावांमध्ये भारतीय सेनेतर्फे मदत पुरविण्यासाठी प्रशासनातर्फे समन्वय असणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करावी आदी सूचना यावेळी विविध विभागाकडून करण्यात आल्या. *****

बियाण्यांची उगवणक्षमता तपासल्यानंतरच पेरणी करा - डॉ. संजीव कुमार

* खरीप हंगामातील नियोजनाचा आढावा आगामी खरीप हंगामात पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासल्यानंतरच प्रत्यक्ष पेरणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे. खरीप हंगाम नियोजन तसेच खते व ‍बियाण्यांच्या उपलब्धतेबाबतचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी घेतला. विभागात खरीप हंगामात 19.35 लाख हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असून शासनाने यावर्षी कमी दिवसाच्या पीक पद्धतीचा अवलंब करण्यासंदर्भात आवाहन केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मागणीनुसार बियाण्यांची उपलब्धता करण्यासंदर्भात यावेळी निर्देश देण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागातील खरीप आढावा घेण्यात आला. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, सामान्य उपायुक्त श्रीकांत फडके, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता उत्तम पवार, अधीक्षक अभियंता ज. ग. गवळी, कृषी सहसंचालक प्रज्ञा गोडघाटे तसेच विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. विभागात खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करुन त्याऐवजी निंबोळी आदी जैविक खतांचा वापर वाढविण्याला प्राधान्य देण्यात येत असून सरासरी दहा टक्के रासायनिक खत कमी करण्यासोबतच उत्पादन वाढीच्या दृष्टीने धान व सोयाबीनची पेरणी करताना पट्टापद्धतीचा वापर करणे, कापूस कापसाची लागवड, बीबीएस पद्धतीने करणे तसेच किड रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना करताना डॉ. संजीव कुमार म्हणाले की, सोयाबीन बियाण्यांची मागणीनूसार पुरवठा करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर नियोजन करावे. विभागात 1 लाख 61 हजार क्विंटलची मागणी असून पुरवठा त्यानुसार नियंत्रित करणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. विभागात रासायनिक खतांच्या मागणीनुसार युरीया, डीएपी, संयुक्त खते आदींचा साठा उपलब्ध आहे. ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत नागपूर विभागाला 6 हजार 300 चे लक्ष्यांक आहे, त्यानुसार शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना जोडण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. खरीपासाठी 4 लाख 32 हजार हेक्टर नियोजन जलसंपदा विभागातर्फे खरीप हंगामासाठी 4 लाख 29 हजार 177 हेक्टरचे क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. मागील वर्षी 3 लाख 30 हजार 306 हेक्टर खरीप क्षेत्राला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता ज. ग. गवळी यांनी दिली. खरीप हंगामासाठी 2020-21 या वर्षासाठी एकूण 5 लाख 86 हजार 406 हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत एकूण 5 लाख 43 हजार 313 हेक्टर सिंचन साध्य झाले आहे. यावर्षी खरीपासाठी 4 लाख 32 हजार 055 हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. विभागात खरीप सिंचनाच्या 10 मोठे प्रकल्प, 51 मध्यम व 336 लघु असे एकूण 397 प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना प्रचलित पीक पद्धतीत बदल करणे, सगुणा पद्धतीने धान पिकांची लागवड करणे, पाणी वापर काटकसरीने करणे याबाबत गावांमध्ये जावून जागृती करण्यात येत असल्याची माहिती अधीक्षक अभियंता श्री. गवळी यांनी दिली.