Monday 30 March 2020

‘लॉक डाऊन’मुळे बेघर-विस्थापित 13 हजार 563 नागरिकांना निवारा - डॉ. संजीव कुमार


·         भोजन व औषध आदि सुविधा

नागपूर दि 30: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या ‘लॉक डाउन’मुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशा कामगारांसह बेघर झालेल्या 13 हजार 563 नागरिकांची  141 निवारागृहे (शेल्टर होम) व्यवस्था करण्यात आली आहे. निवारागृहातील विस्थापितांसाठी 141 सामूहिक किचनच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्थासुद्धा करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली.   
       ‘लॉक डाऊन’च्या  कालावधीत मोठ्या प्रमाणात बेघर झालेले नागरिक, विस्थापित झालेले तसेच  परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य, व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिल्या आहेत, यासाठी राज्य,  विभाग व जिल्हास्तरावर  नियंत्रण कक्ष  सुरू करण्यात आले आहेत, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी  आज  अडकलेल्या व बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू केली आहेत, 
    विभागात नागपूर - 73 निवारागृहे ( 8 हजार 179 नागरिकांची सुविधा),  वर्धा जिल्हा - 7 निवारागृहे ( 240 नागरिक) भंडारा जिल्हा- 9 ( 1032 नागरिक) गोंदिया जिल्हा- 8 (1723 नागरिक)  चंद्रपूर जिल्हा - 8 ( 1650 नागरिक) व गडचिरोली जिल्हा - 36 (739 नागरिक) अशा पध्दतीने एकूण 13 हजार 563  विस्थापित कामगार व बेघरांची व्यवस्था करण्यात आली आहे.
      बेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन,  पाणी, वैधकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

                                                141 सामूहिक किचनची सुरुवात
      जमावबंदो व लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगार व नागरिकांची निवारागृहात सुविधा करण्यात आली आहे. निवारागृहातील नागरिकांसाठी भोजनाची सुविधा 141 सामूहिक किचनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यात 73, वर्धा 7, भंडारा 9, गोंदिया, चंद्रपूर प्रत्येकी 8 व गडचिरोली जिल्ह्यातील 36 सामूहिक किचनची सुविधा करण्यात आली आहे. सध्याच्या ठिकाणीच थांबून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या निवारागृहातच राहावे, आपल्या गावी अथवा परराज्यात जाण्यासाठी प्रवास करू नये, असे आवाहन करतानाच विभागात विस्थापितांच्या मागणीनुसार अजून शेल्टर होम सुरू करण्यात येतील, असेही विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी कळविले आहे.
*****



जीवनाश्यक वस्तूंच्या साठेबाजीवर आळा घालावा - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले




·         भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचे सूक्ष्म नियोजन करा
·         वैद्यकीय साहित्य स्थानिक स्तरावर खरेदी करावे
·         गावनिहाय नियोजन आराखडा बनवावा
         नागपूर दि: 30 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करतानांच  नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवनाश्यक वस्तूंच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवावे असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. यानिमित्ताने भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचे सूक्ष्म नियोजन आवश्यक असून सर्वसामान्य कष्टकरी माणसाला या नियोजनात प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना त्यांनी केल्या.
            विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, ॲड. आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            ‘लॉक डाऊन’च्या काळात लोकांना रोजगार नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरी व ग्रामीण भागातील समस्या वेगवेगळ्या असून ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शहरावर अवलंबून आहे. दुध व भाजीपाला या जीवनाश्यक वस्तूंची विक्री कमी झाली आहे. अशावेळी नागरिकांच्या उदरनिर्वाहासाठी प्रशासनाने घरपोच अन्नधान्य पोहचवण्याची व्यवस्था करावी अशा सूचना श्री. पटोले यांनी केल्या. सामान्य दुकानदार, रिक्षाचालक, पानठेलाधारक यांचा या वितरण व्यवस्थेत प्रामुख्याने समावेश असावा असे ते म्हणाले.
            येणाऱ्या काळात वैद्यकीय सेवेवर ताण निर्माण होणार असून शासकीय व्यवस्थेसोबतच खाजगी डॉक्टर व परिचारिकांच्या सेवा घेण्यात याव्यात असे ते म्हणाले. कोरोना हे नैसर्गिक संकट असून या संकटाचा आपण एकजुटीने सामना करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
            कोरोना आपत्तीचे प्रशासन योग्य प्रकारे नियोजन करत असले तरी या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्या व प्रश्नांबाबत दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले की, बंदच्या काळात जीवनाश्यक वस्तूंची साठेबाजी होत असल्याचे तक्रारी प्राप्त होत आहे. साठेबाजावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी. असंघटीत कामगार व विस्थापित नागरिकांची व्यवसथा युध्द पातळीवर करण्यात यावी. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू ठेवोवे. शहरातील काही स्वयंसेवी संस्था गरजूंना अन्नदान करतात. अशा ठिकाणी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. कम्युनिटी किचनमध्ये निर्जंतूकीकरण आवश्यक असल्याचे  डॉ. राऊत यांनी सांगितले.
           
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
            कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत खाजगी डॉक्टरांची मदत घेण्यात यावी. ज्या डॉक्टरांनी सध्या वैद्यकीय सेवा बंद केली आहे. अशा डॉक्टरांना नियमित सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिले.
            नागरिकांना मुलभुत सुविधा मिळाव्यात तसेच दुध, भाजीपाला आदी सुविधा सुलभपणे कशा मिळतील यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. असेही यावेळी त्यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार
         संचारबंदीमुळे जिवनाश्यक वस्तूसह इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होणार नाही. तसेच किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी अनावश्यक साठेबाजी करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्याच्या सुचना बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केल्यात
            असंघटीत क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाची सुलभपणे विक्री करण्याच्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते व बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी सेवा केंद्र सुरू राहिल्यास नियोजन करणे सोयीचे होईल. स्थानिक तसेच परराज्यातील कामगारांना शासनाच्या निर्णयानुसार आहे तेथेच निवारा तसेच भोजनाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर नियोजन करणे आवश्यक असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
            प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी कोरोना संदर्भात नागपूरसह विभागात आरोग्य विषयक राबविण्यात येत असलेल्या विविध उपायोजनांची माहिती दिली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुमार 800 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच अतिजोखीम असलेल्या नागरिकांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयात 1 हजार खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून 7 हजार लोकांना विलगीकरण कक्षात ठेवता येईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच चंद्रपूर, वधा, भंडारा, गोंदिया व गडचिरोली येथे अशाच प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे.
            पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ए. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर आयुक्त अभिजीत बांगर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, ‘मेयो’चे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, ‘मेडीकल’चे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी यावेळी विविध उपाययोजनांची माहिती दिली.
*****

Friday 27 March 2020

गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप -डॉ.नितीन राऊत


















* संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन
* आंतरराज्य सीमेवर अडकलेल्या नागरिकांसाठी कॅम्प
* आमदार निधीतून 25 लाख रुपये खर्च करणार
* उद्योजकांकडून 1 कोटी 10 लाखांची मदत
* गुरांसाठी चाऱ्यांची सुविधा उपलब्ध करणार

नागपूर, दि. 27 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील अत्यंत गरीब व झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनातर्फे तांदूळ, पीठ, तेल, तिखट-मीठ, साखर आदी जीवनावश्यक वस्तू असलेल्या किटचे घरपोच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. नागरिकांनी  या संचारबंदीचे कटाक्षाने पालन  करावे.  असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना व संचारबंदीच्या काळात गरीब व गरजू नागरिकांना अत्यावश्यक साहित्याच्या पुरवठ्याबाबत आढावा डॉ. नितीन राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात  घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सोलर उद्योग समूहाचे मनीष सत्यनारायण नोवाल, क्रेडाईचे सुनील दुद्दलवार, गौरव अग्रवाल, सोमेश्वर मुंदडा, राजा करवाडे, संतोष चावला आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तसेच शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे झोपडपट्टी तसेच इतर भागातील नागरिकांच्या दैनंदिन रोजगाराचा  प्रश्न निर्माण झाला आहे. शासनातर्फे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य व इतर साहित्याचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु या गटात न मोडणाऱ्या गरजू नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप जिल्हा प्रशासनातर्फे तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्यात येत आहे. त्यात पाच किलो तांदूळ, पाच किलो पीठ त्यासोबत मूगडाळ, मीठ, हळद, मिरची, साखर, चनाडाळ, पोहे, रवा, चहापत्ती, बेसन तसेच बटाटे व कांदे यांचे एकत्र पॅकेट करुन महसूल, पोलीस व महापालिकेच्या मदतीने वाटप करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.  
  संचारबंदीच्या काळात जिल्हाबंदी असल्यामुळे विविध क्षेत्रातील कामगार आपल्या मूळ गावी जाण्यासाठी सीमेवर थांबलेले आहेत. अशा नागरिकांसाठी सीमेवर कॅम्प तयार करुन राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहतूकबंदी असल्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून चारा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
आमदार निधीतून 25 लाख रुपये खर्चासाठी प्रस्ताव
संचारबंदी असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यकता असेल तेथे भोजनासह इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी स्थानिक विकास निधीमधून मतदार संघात 25 लाख रुपये खर्च करण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळावी यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात मुख्य सचिव यांनी अनुकुलता दर्शविली असल्याचेही पालकमंत्री  डॉ. राऊत यांनी सांगितले.
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी एक कोटी
संचारबंदीच्या काळात नागरिकांना अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घेतली असून जिल्ह्यातील गरजू नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. सोलर उद्योग समूहाचे मनीष सत्यानारायण नोवाल यांनी एक कोटी रुपयाचा धनादेश आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना सुपूर्द केला. तसेच क्रेडाईतर्फे सुनील दुद्दलवार व गौरव अग्रवाल यांनी 10 लाखांचा धनादेश दिला. 
संचारबंदीच्या काळात गरीबांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात आली असून उद्योजक, स्वयंसेवी संस्था, संघटना व व्यक्तींनी आपली मदत जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे देण्याचे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.
*****



Tuesday 24 March 2020

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाच्या उपाययोजनांना गती - डॉ. संजय जयस्वाल


*    817 आयसोलेशन तर 220 विलगीकरण बेडची सुविधा
*   व्हेंटीलेटर हाताळण्यासाठी आजपासून प्रशिक्षण
*   88 प्रकारच्या जीवनावश्यक औषधांची उपलब्धता
        नागपूर दि. 24 : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासोबतच संशयित व्यक्तींची तपासणी करण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार विभागातील सर्व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागपूरसह जिल्हास्तरावर  अलगीकरणासाठी 817 तर विलगीकरणासाठी 220 बेड तयार करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जयस्वाल यांनी दिली.
            कोरोना विषाणू संदर्भात नागपूर विभागात आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनासंदर्भात माहिती देताना डॉ. जयस्वाल म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हास्तरावर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात उपचार व तपासणीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आशा वर्कर, आरोग्य सेविका, परिचारिका, तंत्रज्ञ त्यासोबतच सर्व वैद्यकीय अधिकारी यांना उपचारासंदर्भात अवगत करण्यात आले आहे.
            वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनासंदर्भात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून त्याअंतर्गत 420 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. वर्धा जिल्ह्यात 100, भंडारा 60, गोंदिया 20, चंद्रपूर 156 तर गडचिरोली 61 अशा विभागात अलगीकरणासाठी एकूण 817 बेड आहेत. त्यासोबतच विलगीकरण, आयसोलेशनसाठी 220 बेड राखीव आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 70 तर मेयोमधील 60 बेडचा समावेश आहे. यासोबतच आवश्यकतेनुसार खाजगी हॉस्पिटलमध्ये असलेल्या 1 हजार 661 आयसीयू बेड सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहेत.
            कोरोना विषाणूसंदर्भात आरोग्य यंत्रणेला आवश्यक असलेले एन-95 मास्क, पर्सनल प्रोटेक्शन कीट, ट्रिपललेअर मास्क, सेफ्टी कीट आदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असून जिल्हास्तरावरही ते मागणीनुसार उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कोरोना प्रादूर्भाव टाळण्यासोबतच आवश्यक खबरदारी घेण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा शल्य चिकित्सक नियंत्रण ठेवत असून त्यांच्या मागणीनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या 88 प्रकारच्या जीवनावश्यक औषधी विभागातील सर्व जिल्ह्यात उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली.


व्हेंटीलेटर हाताळण्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात
            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत व्हेंटीलेटर हाताळण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व्हेंटीलेटर हाताळण्याचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे.
            व्हेंटीलेटर हाताळणीच्या प्रशिक्षणाअंतर्गत विभागातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यातून 40 अशा विभागातील 240  जणांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यामुळे विभागात तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होईल. हे प्रशिक्षण प्रात्यक्षिक स्वरुपाचे असून भविष्यातील उद् भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

******

Monday 23 March 2020

शहीद दिनानिमित्त अभिवादन

 नागपूर, दि. 23: विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या प्रतिमेला उपायुक्त (विकास) अंकुश केदार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            यावेळी उपायुक्त सुनिल निकम, सहायक आयुक्त हरिश भामरे, विभागीय चौकशी अधिकारी शैलेश मेश्राम, तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी कार्यालय                     
        जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या प्रतिमेला अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****  

कार्यालयीन खरेदी-विक्री व्यवहार ३१ मार्चपर्यंत बंद - जिल्हाधिकारी

        नागपूर, दि. 23: राज्य शासनाने कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयीन खरेदी व विक्रीचे व्यवहार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांनी अधिसूचनेद्वारे दिले आहेत. 
प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून शासकीय कार्यालयाअंतर्गंत होणा-या खरेदी विक्री व इतर व्यवहार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी आवश्यक खबरदारी व दक्षता घेण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. ठाकरे यांनी दिले आहेत. 
*****

कामगारांचे वेतन कपात करु नये - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत



·        वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम व बळकट करणार
·        मेडीकलमध्ये 100 बेडचे स्वतंत्र अतिदक्षता कक्ष 
·        जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा पुरवठा सुरु राहील
          नागपूर दि. 23 : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तुंची पुरेशी उपलब्धता असून, नागरिकांनी यासाठी गर्दी करु नये तसेच औद्योगिक तसेच खाजगी आस्थापनेवर असलेल्या कामगारांची वेतन कपात करु नये, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.
कोरोनासंदर्भात जनतेमध्ये पसरलेला गैरसमज दूर करतानाच वैयक्तिक स्वच्छतेच्या संदर्भात  स्वयंसेवी (एनजीओ) संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही यावेळी पालकमंत्र्यांनी केले.   
            विभागीय आयुक्त कार्यालयात आज पालकमंत्री डॉ. राऊत यांनी विविध घटकांशी संवाद साधला. त्यात खासगी वैद्यकीय व्यावसायिक, उद्योजक, व्यावसायिक आणि अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अपर आयुक्त अभिजित बांगर, वनराई संस्थेचे विश्वस्त गिरीश गांधी, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे सुरेश राठी, प्रताप मोटवानी, संतोष अग्रवाल, श्री. वाधवानी, नंदू गौर, अजय पाटील, कौस्तुभ चटर्जी, लिना बुधे, रोटरी क्लबचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
            प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने कोरोना रुग्णांची संख्या सद्या स्थिर असून, ही सकारात्मक बाब असल्याची माहिती देऊन पालकमंत्री म्हणाले. सध्या नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तुंचा कोणताही तुटवडा नाही. त्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी करु नये. जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी प्रशासनाला दिले.
कोरोनाला प्रतिबंध हे मानवी जातीशी विषाणूचे असलेले महायुद्ध आहे. त्यात विषाणूला हरवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र वॉर्ड तयार करणार असल्याचे सांगून पालकमंत्री राऊत म्हणाले
नागपुरातील महत्त्वाच्या स्वयंसेवी संस्थांनी कोरोना साथीविषयी जनजागृती व प्रचार-प्रसार करण्यासाठी काम करावे. उद्योजकांनी सॅनिटायझर, मास्क गाऊनचे उत्पादन करुन पुरवठा करावा. निराधार, बेघर, आजारी व्यक्तीस मदतीचा हात द्यावा. जिल्हा प्रशासनातर्फे हेल्पलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अशा कठीण प्रसंगी सर्वांनी मिळून काम करु या, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील सर्व घटकांनी यथाशक्ती सहयोग दिल्यास कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकू शकतो, असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनासाठी स्वतंत्र सुविधा
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसह उपचारासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे प्रभावी व परिणामकारक उपचार सुरु आहेत. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता शासनासोबत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे सहकार्य आवश्यक आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना उपचारासाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यामध्ये 100 खाटांचे स्वतंत्र अतिदक्षता कक्ष प्राधान्याने पूर्ण करण्यासोबतच दीड हजार खाटा यासाठी आरक्षित ठेवण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्यात.
महाविद्यालयात येणा-या दैनंदिन रुग्णांच्या उपचारासाठी तसेच दाखल करण्यासाठी शहरातील रुग्णालयांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगताना पालकमंत्री म्हणाले की, वैद्यकीय व्यावसायिकांनी सामाजिक भावनेतून यासाठी सहकार्य करावे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांची तसेच साहित्याचीही आवश्यकता भासल्यास ती उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
            आमदार निवास येथे सुरु असलेल्या विलगीकरण केंद्रात स्वच्छतेसह आवश्यक सुविधा तात्काळ पुरविण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला यावेळी त्यांनी दिल्यात.
संचारबंदीदरम्यान सहकार्याचे आवाहन
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात आजपासून संचारबंदी व जिल्हाबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरातही सद्यसि्थतीचा आढावा डॉ. नितीन राऊत यांनी  घेतला. या कालावधीत सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे बंद राहतील. मात्र अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सवलत दिली जाणार आहे. मात्र ही वाहने प्रशासनाकडून प्राधिकृत करुन घेणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा या कालावधीत नियमित सुरु राहणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील, असेही ते म्हणाले.   
******