Friday 29 May 2020

शेतकऱ्यांकडे असलेली संपूर्ण कापूस खरेदी करणार - सुनील केदार





     
·        चिमणाझरी केंद्रावर कापूस खरेदी
·        मांडवा, बाजारगावसह येथेही कापूस खरेदी सुरु
·        जिल्ह्यात 16 लक्ष 756 क्विंटल कापसाची खरेदी

नागपूर, दि. 22 : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कापूस जिल्ह्यातील 23 जिनिंग ॲन्ड प्रेसिंग येथे कापूस पणन महासंघ व सीसीआयमार्फत खरेदी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडे असलेला संपूर्ण कापूस खरेदी करण्यात येईल,अशी ग्वाही राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.
चिमणाझरी येथी जिनिंग ॲन्ड प्रेसिंग केंद्रावर कापूस खरेदीचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी कापूस विक्रीसाठी आलेल्या पहिल्या पाच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देवून गौरव करण्यात आला. यावेळी सीसीआयमार्फत 250 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यातील मांडवा, बाजारगाव येथेही कापूस खरेदी सुरु आहे.
जिल्ह्यातील 81 हजार 648 शेतकऱ्यांकडून 16 लाख 75 हजार 28 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये कापूस पणन महासंघातर्फे 12 हजार 863 शेतकऱ्यांकडून 3 लाख 5 हजार 72.55 क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली आहे. तसेच सीसीआयमार्फत  2 हजार 114 शेतकऱ्यांकडून 83 हजार 643.93 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. त्यासोबतच खासगी बाजार पणन परवानाधारक तसेच बाजार समित्यांमध्ये अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांकडूनही कापसाची खरेदी करण्यात येत आहे.
यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, जिल्हा परिषद सदस्या वृंदा नागपुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अहमद बाबू शेख,निर्मल समूहाचे प्रमोद मानमोडे आदी उपस्थित होते.
नागपूर तालुक्यातील चिमणाझरी येथील निर्मल जिनींग ॲन्ड प्रेसिंग सेंटर येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत तसेच पशू संवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत आज सीसीआयद्वारे ( कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) शेतकऱ्यांचा 250 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. मांडवा, बाजारगावप्रमाणेच चिमणाझरी येथे देखील  कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर अंतर्गत येणाऱ्या मांडवा आणि बाजारगांव येथे कापूस विक्रीसाठी ज्या शेतकऱ्यांनी टोकण प्रणालीद्वारे नोंदणी केली आहे, त्या शेतकऱ्यांचा कापूस निर्मल जिनिं ॲन्ड प्रेसिंग सेंटर येथे आजपासून मोजण्यात येत आहे. मान्सूनचे दिवस समोर आले आहे.  पेरणी करण्यासाठी बी-बियाणे खरेदी करायची आहेत. यासाठी शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी तात्काळत राहावे लागू नये, यासाठी मांडवा, बाजारगावप्रमाणेच चिमणाझरी येथे कापूस खरेदी करण्यात येत आहे.
 निर्मल जिनींग ॲन्ड प्रेसिंग सेंटरची खरेदी केलेल्या कापसाची साठवणूक क्षमता 8 हजार क्विंटल आहे. येथे आज शेतकऱ्यांच्या 9 गाडयातील 250 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. येथे कापूस विक्रीकरिता आलेल्या कोणत्याही  शेतकऱ्याला परत पाठविण्यात येणार नाही. प्रारंभी डॉ. नितीन राऊत आणि  सुनील केदार यांनी कापूस मोजणी यंत्राचे पूजन केले. त्यानंतर कापूस विक्रीकरिता आलेल्या शेतकऱ्यांपैकी मनोज पिसार (पांजरी), धमेंद्र गारघाटे (ब्राम्हणी), अरुण मांडवगडे (आलागोंदी), विष्णू मातनकर (रामा) आणि चिरकूट रोकडे (जामठा) या शेतकऱ्यांना प्रातिनिधि स्वरुपात शाल, श्रीफळ, गुलाबपुप्ष देवून डॉ. राऊत तसेच श्री. केदार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
*****

कोरोनासंदर्भातील उपाययोजनांना गती द्या

 पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आढावा

नागपूर, दि. 29 : जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेतील उत्तम समन्वयाच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णवाढीवर ब-याच अंशी नियंत्रण मिळविले आहे. यापुढील पावसाळ्याच्या काळात आरोग्य यंत्रणेने  कोरोनासंदर्भातील उपाययोजनांना गती द्यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. 
 विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया आदी उपस्थित होते.
पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने कोरोनासंबंधी उपाययोजना राबविताना केलेल्या तयारीचा घेताना खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करण्याबाबत असलेल्या मार्गदर्शक तत्वाचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही, याबाबतची अद्ययावत माहिती सर्व संबंधित यंत्रणांनी ठेवावी. सोबतच कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवांना वगळले असले तरीही कोरोनाबाधित रुग्णांसह इतर रुग्णही तात्काळ रुग्णालयांत दाखल करण्यासाठी सुट देण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी दिले. 
शासकीय वैद्यकीय रुग्णालये व महानगरपालिकेची रुग्णालये असली तरीही भविष्यात खासगी रुग्णालये शासकीय दरांमध्ये रुग्णांच्या सेवेत कायम सुरु ठेवण्याची सक्ती करावी. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याची वेळोवेळी खात्री करुन घ्यावी. त्यासाठी जबाबदार अधिकारी नियुक्त करावा. पावसाळ्यात प्रशासनाला महानगरपालिका क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला विशेष तयारी करावी लागणार असून, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर व परिचारिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यासोबतच याचे योग्य नियोजन व तशी संपूर्ण तयारी करण्याबाबतही पालकमंत्र्यांनी सांगितले. 
बाहेर जिल्ह्यातून किंवा शहरातून ग्रामीण भागात आलेल्या मजुरांना आणि नागरिकांना गावातील शाळेत संस्थात्मक विलगीकरण सक्तीने करण्याचे निर्देश देताना शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री करावी. ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
 जिल्ह्यातील स्थलांतरीत मजूर, शिधापत्रिकाधारक व शिधापत्रिका नसलेले नागरिकांना पुरेशा प्रमाणात अन्नधान्य पुरवठा याबाबतचे नियोजन करावे, त्याची अद्यावत माहिती ठेवावी, शिधापत्रिका नसलेल्यांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
***

Thursday 28 May 2020

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


          नागपूरदि. 28 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे साजरी करण्यात आली. यावेळी  अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
 निवासी उपजिल्हाधिकारी  रविंद्र खजांजी   तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


*****

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन



          नागपूर, दि. 28 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार नितीन डोईफोडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            संदीप डाबेरा, विकास डोंगरे, जॉन मॅथ्यू  तसेच इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
*****

भूगोल व कार्यशिक्षण विषयाची गुणदानपद्धती


* गुणांची सरासरी काढून होणार गुणदान
                                 * दहावीच्या भूगोल व कार्यशिक्षण विषयाबाबत निर्णय

          नागपूर, दि. 28 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत  3 ते 23 मार्च 2020 दरम्यान इयत्ता दहावीची शालान्त प्रमाणपत्र परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून  राज्यात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आला. त्यामुळे  दिनांक 23 मार्च 2020 रोजी  आयोजित इयत्ता दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला. त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.
            या रद्द झालेल्या विषयांचे गुणदान सरासरी गुणांच्या आधारे करण्यात येतील.
            सामाजिक शास्त्रे पेपर-2 (भूगोल) या विषयाचे गुणदान हे उमेदवाराने दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी  निर्धांरित  केलेल्या गुणांमध्ये करण्यात येईल.
            तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान त्याने अन्य विषयांच्या लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारत घेवून त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येईल.
            यानुसार भूगोल व कार्यशिक्षण या विषयांच्या परीक्षेसाठी गुणदान करुन निकाल जाहीर करण्यात येईल, असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
****


Wednesday 27 May 2020

कोरोना नियंत्रणासाठी सहा हजारांचे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध

* विभागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे यशस्वी नियोजन
                                                           * दोन हजार  तज्ज्ञ डॉक्टर, अडीच हजार परिचारिकांचा समावेश
                                                            * प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न ठरला यशस्वी 
               नागपूरदि. 27 : कोरोना विषाणूच्या प्रभावी  व परिणामकारक  नियंत्रणासाठी  राष्ट्रीय व राज्यपातळीवर विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे.  कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे वैद्यकीय सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. नागपूर शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन त्यानुसार आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेवून विभागातील 5 हजार 808  तज्ज्ञ, डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून सज्ज ठेवण्यात आले आहे. त्यामुळे देशातच नव्हे तर राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात यश आले आहे.
            कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात दहशत निर्माण झाल्यामुळे या विषाणूच्या नियंत्रणासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर आराखडा तयार करण्यात आला आहे. नागपूर विभागात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नागपूरसह पाचही जिल्ह्यांचा भविष्यातील उद् भवनाऱ्या परिस्थितीचा तसेच लोकसंख्येचा अभ्यास करुन त्यानुसार सर्वंकष आराखडा तयार करण्यात आला आहे.
            कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रणासाठी  विभागस्तरावर तयार करण्यात आलेल्या वैद्यकीय सुविधांच्या आराखड्यानुसार 393 तज्ज्ञ डॉक्टर, 1 हजार 957 डॉक्टर, 2 हजार 488 परिचारिका व 970 वर्ग चारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे. अशा प्रकारे प्रशिक्षण देवून तज्ज्ञ वैद्यकीय मनुष्यबळ केवळ विभागात उपलब्ध झाले आहे.
            कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटिलेटरपासून स्वतंत्र कोविड एअर सुसज्ज रुग्णालय तयार करण्याचा समावेश आहे. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, वर्ध्याच्या सावंगी मेघे वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. कोविड रुग्णांवर उपचारासाठी प्रशिक्षित आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा अभ्यास करुन त्यानुसार राज्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर चालविण्यासह इतर आवश्यक प्रशिक्षण देवून तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्यात आली आहे.
            जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या आयसीयू व एचडीयू  सुविधांचा अभ्यास करुन त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करुन त्यानुसार प्रशिक्षण  5 हजार 808 वैद्यकीय अधिकारी व संलग्न कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. अशा प्रकारचा उपक्रम राज्यात केवळ नागपूर विभागात राबविण्यात आल्यामुळे नागपूर शहर संपूर्ण विभाग कोरोनावर प्रभावी व परिणामकारक उपचाराच्या सुविधा निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहे. 
            वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना कोविडसंदर्भात प्रशिक्षण देण्याच्या नियोजनानुसार विभागात 288 विशेषज्ञ, 996  एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टर, 2 हजार 280 परिचारिका तसेच 996 वैद्यकीय सहाय्यक असे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले होते.  परंतु प्रत्यक्षात यापेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. यासाठी  विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. नागपूर शहरात तसेच जिल्ह्यात 180 विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) 600 एमबीबीएस, बीएएमएस डॉक्टर, 1 हजार 380  परिचारिका तसेच 600 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या  प्रशिक्षणामुळे  कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशात तसेच राज्यात सर्वाधिक आहे.
            शासकीय आरोग्य संस्थांबरोबरच 16 खाजगी रुग्णालये, वेस्टर्न कोल फिल्ड, आयुर्वेदिक महाविद्यालय, महानगरपालिका व जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा तीनपट जास्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा तीन शिफ्टमध्ये सुरु करण्यात आल्या आहेत.  कोविड रुग्णालयातील कर्मचारी सतत 15 दिवस कामावर असल्यामुळे त्यांना विश्रांती देवून त्यांच्या ऐवजी बदली कर्मचाऱ्यांच्या सेवांचा सुद्धा या प्रशिक्षणामध्ये समावेश करण्यात आला आहे.
            कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विभागात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विविध विभागांचे प्रमुख तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद अधीक्षक, आरोग्य यंत्रणेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, महसूल आदी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाखाली विशेष कृती  गट तयार करुन सूक्ष्म नियोजन करुन प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा सज्ज ठेवल्यामुळे नागपूर विभाग हा राज्यात व देशात कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.
****

Friday 22 May 2020

निसर्ग पर्यटन धोरण मंत्रिमंडळासमोर ठेवणार - वनमंत्री



        नागपूर, दि. 22 : राज्यातील निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन देणारे व या क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण करणारे नविन निसर्ग पर्यटन धोरण तयार करण्यात आले आहे. लवकरच निसर्ग पर्यटन धोरण मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
नविन निसर्ग पर्यटन धोरणासंदर्भात वन भवन येथे वनमंत्री संजय राठोर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. वन पर्यटनाला चालना देणे, वनालगतच्या गावातील जनतेला रोजगार मिळवून देणे आणि राज्यातील वनांच्या योग्य व्यवस्थापनातून त्यांचे संवर्धन करणे तसेच वनांवर आधारीत उद्योगांना चालना देणारे पुढील 10 वर्षांचे धोरण तयार करणे. त्यातून वनविभाग व पर्यटनस्थळांचा विकास, निसर्गाचे रक्षण व पर्यटनाशी सुसंगत असे निसर्ग पर्यटन आदी बाबींचा यात समावेश राहणार असल्याचे वनमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
विदर्भाला मोठ्या प्रमाणावर वनसंपदा लाभली असून, तिचे संवर्धन करणे आणि स्थानिकांना त्यापासून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन देण्यास राज्य शासन प्राधान्य देत आहे. अशा प्रकारचे धोरण केंद्र शासनाने 2018 मध्ये आस्तिवात आणले आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाच्या धर्तीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणाचा महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळ पर्यटन मंडळ अभ्यास करुन तसा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमेार सादर केला जाणार आहे.
      वन्यजीव मानव संघर्ष, त्यामुळे वाढलेले मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर व्याघ्र प्रकल्पाचे सादरीकरण, निसर्ग पर्यटन धोरण 2020, जंगल कामगार सहकारी संस्थांना बांबू कुपाचे वाटप, जंगलात लागणाऱ्या वणव्याच्या नियंत्रणासाठी ॲप विकसीत करण्यात येत असून, तेंदूपत्ता संकलन, वाटप यासंबंधी आढावा घेण्यात आला. तसेच अर्थसंकल्पात वनविभागाला किमान निधी मिळावा, याबाबतचा आढावा वनमंत्री श्री. राठोड यांनी घेतला.
     जंगल कामगार सहकारी संस्थांना बांबूच्या कुपांचे वाटप करण्यासाठीचे सादरीकरण करण्यात आले. स्थानिक व जंगलालगतच्या गावांना कुपाच्या वाटपामधून 50 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यापैकी 25 कोटी रुपयांचा निधी जंगल कामगार सहकारी संस्थांना उपलब्ध होणार आहे. यामुळे जंगलातील बांबूच्या वनांचे योग्य व्यवस्थापन, संवर्धन आणि बांबू वनांच्या वाढीस प्रोत्साहन मिळेल, असेही ते म्हणाले.
      तसेच बांबूच्या वनांचे व्यवस्थापन, संवर्धन आणि जंगलातील वनांच्या वाढीस प्रोत्साहनातून गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी आणि जंगलालगतच्या आदिवासी आणि नागरिकांना या धोरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
*****

निसर्गाचे संवर्धन हाच मानवी समस्येवर उपाय - वनमंत्री संजय राठोड


       आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस

            नागपूर, दि. 22  : सर्व सजिवांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. मानवी जीवन सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असून, निसर्गाच्या कृपेमुळेच मानव आपले जीवन शाश्वत पध्दतीने जगत आहे. मानवी जीवनाच्या सुखाचे उगमस्थान निसर्ग असून मानवाला त्याचे जीवन शाश्वत पध्दतीने जगावयाचे असेल, तर निसर्गातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण हा त्यावरील एकमेव उपाय असल्याचे मत  वनमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाच्या निमित्ताने वन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
           बैठकीच्या सुरुवातीला प्रधान मुख्य वन संरक्षक, वन बल प्रमुख सुरेश गैरोला यांनी आंतरराष्ट्रीय जैव  विविधता दिवसाचे महत्त्व विषद केले.सर्व सजिवांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने, संयुक्त राष्ट्रसंघाने 22 मे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. संपूर्ण जगभरात जैवविविधतेच्या संवर्धनाच्या संबंधित संकल्पनेवर हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी स्थानिक स्तरावरील कार्यक्रमाशिवाय महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने वेबीनार चे आयोजन केले आहे. या वर्षी' ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस’ साजरा करण्यासाठी संकल्पना 'Our Solutions are in Nature' अशी आहे. 1 जानेवारी 2012 पासून शासनाने महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे गठण केले असून नागपूर मुख्यालयातून मंडळाचे कामकाज सुरू झालेले आहे.
            महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन झालेल्या असून त्यांचेमार्फत स्थानिक क्षेत्रातील जैवविविधता संरक्षण व संवर्धनाचे काम अपेक्षित आहे. यासाठी लागणारी तांत्रिक मदत महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर मार्फत देण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सावंतवाडी, पूर्व नाशिक, पुणे, यावल, भंडारा, गडचिरोली, वडसा व चंद्रपूर वन विभागातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे माध्यमातून गठीत करण्यात आलेल्या जैविक विविधता व्यवस्थापन समित्यांनी लोक सहभागातून तयार केलेल्या निवडक जैविक विविधता संवर्धन योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये आबोली, सिंधुदुर्ग येथील malbar gliding frog संवर्धन, हिरबाबाई अमरावती येथीत महासीर मत्स्य संवर्धन प्रकल्प, सिंधुदुर्ग येथील धाणेश संवर्धन यांचा समावेश आहे.
            वन विभागाने 'आलापल्ली-वन वैभव" म्हणून जतन केलेल्या वनक्षेत्रास जैविक विविधता वारसा क्षेत्र म्हणून घोषित करावे म्हणून मंडळाने शासनास प्रस्ताव सादर केला होता, त्या आधारे शासनाने अलिकडेच 'आलापल्ली-वन वैभव' ह्याची जैविक विविधता वारसा क्षेत्र म्हणून अधिघोषित केले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मानवी जीवन सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असून, निसर्गाच्या कृपेमुळे मानव आपले जीवन शाश्वतपध्दतीने जगत आहे. मानवी जीवनाच्या सुखाचे उगमस्थान निसर्ग आहे. मानवाच्या प्राथमिक गरजांची पुर्तता करण्याचे माध्यम आहे. अशा परिस्थितीत मानवाला त्याचे जीवन शाश्वत पध्दतीने जगावयाचे असेल, तर निसर्गातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण हा त्यावरील एकमेव उपाय असे राठोड म्हणाले.

0000