Friday 27 April 2018

नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांचा नागपूर दौरा

नागपूरदि. 27 : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांचे रविवार, दिनांक 29 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता नागपूर विमानतळावर आगमन. स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7.50 वाजता नागपूर येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण.
*****

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचा नागपूर दौरा

नागपूरदि. 27 : पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचे सोमवार, दिनांक 30 एप्रिल रोजी रात्री 7.20 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन व जिल्हा भंडाराकडे प्रयाण.
मंगळवार, दिनांक 1 मे रोजी दुपारी 1 वाजता भंडारा येथून शासकीय विश्रामगृह रविभवन, नागपूर येथे आगमन व राखीव. रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून विमानतळाकडे प्रयाण. रात्री 9.45 वाजता नागपूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
****

समान निधी योजनेसाठी 15 मेपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

नागपूरदि. 27 : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता अंतर्गत शासकीय ग्रंथालयास समान निधी योजनेतून अर्थसहाय्य देण्यात येते. समान निधी योजना 2017-18 अंतर्गत शासकीय ग्रंथालयांनी निधीच्या मागणीकरीता दिनांक 15 मे पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी केले आहे.
            केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानाच्या सहकार्याने शासकीय सार्वजनिक ग्रंथालयांना कार्यान्वीत करण्यासाठी समान निधी तसेच सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्तार-बांधणीसाठी अर्थसहाय्य (कमाल मर्यादा 10 लक्ष) योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत इच्छूकांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे आवश्यक कागदपत्रासह इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील चार प्रतिसह दिनांक 15 मेपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, अधिक माहितीसाठी कार्यालयाचे संकेतस्थळ www.rrrlf.nic.in वर संपर्क करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालनालय मुंबईचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी केले आहे.
*****

महाराष्ट्रातील 15 उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार


नवी दिल्ली 27 : बांधकाम, उत्पादन , सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात सुरक्षा विषयक उत्कृष्ट कार्य करणा-या महाराष्ट्रातील 15 उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराने केंद्रीय उद्योग राज्यमंत्री  संतोष गंगवार यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेच्या वतीने देण्यात येणा-या सुरक्षा पुरस्काराचे वितरण आज नवी दिल्ली येथे करण्यात आले. देशातील 72 व्यवस्थापनांना सुरक्षा विषयक केलेल्या उल्लेखनीय कामासाठी सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेचे अध्यक्ष सतीश रेड्डी, उपाध्यक्ष अरविंद दोशी,  राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेच्या वित्त विभागाचे अध्यक्ष कल्याण चक्रवर्ती, श्रम व रोजगार विभागाचे अतिरिक्त सचिव हिरालाल समरीया व राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेचे महासंचालक व्हि.बी. संत उपस्थित होते.
महाराष्ट्रातील 15 व्यवस्थापनांना पुरस्कार
उत्पादन, बांधकाम व सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात कार्यरत असणा-या व्यवस्थापनांना सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार, श्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार, सुरक्षा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कामगारांच्या सुरक्षा विषयक व आरोग्य विषयक बाबींसाठी उल्लेखनीय काम करणा-या व्यवस्थापनांना राष्ट्रीय सुरक्षितता परिषद विविध सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करते. यावर्षी महाराष्ट्रातील 15 व्यवस्थापनांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्पादन क्षेत्रात कार्य करणारी रायगड जिल्ह्यातील सुप्रीम पेट्रोकेम लि., पुणे जिल्ह्यातील स्पायसर इंडिया प्रा. लि.  व चंद्रपूर  जिल्ह्यातील जी.एम.आर. वरोरा एनर्जी या कंपनीस उत्पादन क्षेत्रातील श्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रौप्य चषक व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.  
सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील आर.एम.सी. रेडीमिक्स (नवी मुंबई ) व चिपळुण येथील कृष्णा ॲन्टीऑक्सीडंटस्‍ या व्यवस्थापनांना श्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालघर येथील एन.पी.सी.आय.एल. तारापूर ॲटोमिक पॉवर स्टेशन या आस्थापनेस सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बांधकाम क्षेत्रातील शापुरजी पल्लोनजी अन्ड कंपनी प्रा. लि. मुंबई या व्यवस्थापनांस कास्य चषक व प्रशस्तीपत्र देऊन सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील नवी मुंबई येथील गॉजेस बार्डन प्रा. लि. , विक्रोळी येथील गोदरेज अन्ड बॉयसी कंपनी लि. व पुणे जिल्ह्यातील हेनकेल ॲडेसीव्ह टेक्नॉलॉजीस या आस्थापनांना सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
पाच व्यवस्थपनांना प्रशंसापत्र
महाराष्ट्रातील 5 व्यवस्थापनांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले . यामध्ये ठाणे जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्रातील घरडा केमीकल्स लि. , प्रिवी ऑरगॅनिक्स (रायगड) व राजणगांव पुणे येथील टाटा स्टील प्रोसेसिंग अन्ड ड्रिस्ट्रीब्युशन लि. तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील हडपसर पुणे येथील आर.एम.सी. रेडीमिक्स व मालाड येथील आर.एस.सी रेडीमिक्स या कंपन्यांचा समावेश आहे. 
००००

देशाच्या प्रगतीसाठी सर्व समाज एकसंघ ठेवण्याची गरज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्राचीन संस्कृतीमुळे भारतीय संस्कृती अबाधित
सोलापूर दि. 27 : भारतावर अनेक आक्रमणे होवूनही प्राचीन परंपरांमुळेच भारताची संस्कृती टिकून आहे. देशातील विविध मठ संस्कार व शिक्षण प्रसार करण्याची ठिकाणे आहेत, देशातील सर्व समाज एकसंघ ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
येथील अक्कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी मंदिरात श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या श्री संकल्पसिध्दी कार्यमहोत्सव २०१८ अंतर्गत वीरशैव लिंगायत संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टीआमदार प्रशांत परिचारक, आमदार सिध्दराम म्हेत्रे, डॉ. मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामी, श्री श्री श्री १००८ उज्जयनी जगदगुरू, श्री श्री श्री १००८ श्रीशैल जगदगुरू, श्री श्री श्री १००८ काशी जगदगुरू उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, कोणत्याही संकल्पाची पूर्ती ही आपली भारतीय  संस्कृती आहे. होटगी मठाचे शिवाचार्यानी श्री श्री श्री १००८ जगदगुरु भगवतपाद यांची  १०८ फुट उंच मुर्तीचे लोकार्पण व १००८ शिवलिंगांची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा संकल्प सोडला होता. हा संकल्प पूर्ण होईपर्यंत केवळ पाण्यावर राहण्याची कडक उपासना त्यांनी केली. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी ते अडीच वर्ष केवळ पाण्यावर राहिले. त्यांच्या पश्चात त्यांचा संकल्प त्यांच्या शिष्यांनी आणि समाजबांधवांनी पूर्ण केला ही मोठी उपलब्धी आहे.
देशातील मठांना ऐतिहासिक वारसा आहे. या मठातून शिक्षण आणि संस्कार देण्याचे काम चालते. होटगी मठालाही शिक्षण प्रसाराची मोठी परंपरा आहे. प्राचिन परंपरांमुळेच देशाची संस्कृती टिकून आहे. मठांच्या माध्यमातून समाज एकसंध ठेवण्याचे काम चालते. देशाच्या प्रगतीसाठी समाजातील दरी कमी होवून समाज एकसंध राहण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
श्रध्दा टिकली तरच देशाची अखंडता टिकणार आहे. समाजाला एकसंध ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. लिंगायत समाजाला इतर मागासवर्गीयांच्या सवलती मिळूवन देण्यासाठी राज्य शासन विशेष प्रयत्न करणार आहे. त्याच बरोबर बसवेश्वर महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘संकल्प सिध्दीला आपल्या संस्कृतीत मोठे महत्व आहे. गुरुंनी केलेला संकल्प यानिमित्ताने सर्व शिष्यांनी व समाजाने सिध्दीला नेला आहे. समाजाच्या उत्थानासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे’.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, बृहन्मठ होटगी मठाला प्राचिन इतिहास आहे. या मठाला अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा आहे. समाजाच्या उन्नतीसाठी या मठाच्या माध्यमातून काम सुरू आहे. योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामींच्या संकल्पाची आज संकल्पपूर्ती होत आहे. शासनाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास सुरु आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते श्री श्री श्री १००८ जगदगुरू पंडिताराध्य भगवतपाद यांच्या १०८ फूट उंच मुर्तीचे लोकार्पण आणि १००८ शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना समारंभ पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते संकल्प सिध्दीविशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी होटगी मठ आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्यावतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यातील वधू-वरांना मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी आशीर्वाद दिले.
यावेळी  माजी मंत्री सिध्दराम म्हेत्रे, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचे भाषण झाले. या संमेल्लनाला राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातील वीरशैव समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.   
००००

डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्त‍ी



मुंबई, दि. 27 : रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी शुक्रवारी (दिनांक २७) डॉ पेडणेकर यांना राजभवन येथे बोलावून नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले.
डॉ पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल ते) करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी दिनांक २४ ऑक्टोबर रोजी डॉ संजय देशमुख यांना विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरुन कार्यमुक्त केल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ  देवानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. डॉ श्यामलाल सोनी, संचालक, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, पौडी गढवाल, उत्तराखंड व भूषण गगराणी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको हे समितीचे अन्य सदस्य होते.
००००



पत्रकारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पत्रकार आरोग्य शिबीराला मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, दि.27 : पत्रकार हे क्षेत्रियस्तरावर अत्यंत मेहनतीचे काम करतात. त्यांना वेळे काळाचं बंधन नसते, प्रसंगी चार-पाच तास थांबावे लागले तरी ते बातमी मिळवितात. त्यांच्याबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या घराच्या प्रश्नबाबतही शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
आझाद मैदान येथे टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित पत्रकार आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पत्रकारांना 24 तास काम करावे लागते, यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. ताण तणाव वाढतो. पत्रकारांना सुदृढ आरोग्य लाभण्यासाठी या आरोग्य शिबीराचेआयोजन करण्यात आले आहे. पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे शिबीर फायदेशीर आहे, याचा लाभ सर्व पत्रकारांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच सर्व पत्रकारांना सुदृढ आरोग्य लाभो, अशा शुभेच्छाही दिल्या.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, आमदार राज पुरोहित, डॉ. तात्याराव लहाने, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विमल सिंग, उपाध्यक्ष अतुल कदम, महासचिव विलास आठवले यांच्यासह विविध दूरचित्रवाहिन्यांचे पत्रकार उपस्थित होते.
या शिबिरात सर्व माध्यमातील पत्रकारांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात येणार आहेत.
००००

Thursday 26 April 2018

मुख्यमंत्री समाधान शिबिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

v  समाधान शिबिरात 6 हजार 977 अर्ज, 879 तक्रारी प्राप्त
v  23 विभागांकडून जनतेला विविध योजनांचा लाभ
v दोन दिवस समाधान शिबिराच्या माध्यमातून प्रश्नाची सोडवणूक

नागपूरदि. 26 :  दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समाधान शिबिराचे उद्घाटन शनिवार दि. 28 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री समाधान शिबिरात 6 हजार 977 अर्ज  तर 879 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारी व अर्ज निकाली काढून लाभार्थ्यांना समाधान शिबिराच्या माध्यमातून थेट लाभ मिळणार आहे.
हैद्राबाद हाऊस परिसरात आयोजित मुख्यमंत्री समाधान शिबिरास विशेष अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व प्रमुख पाहुणे म्हणून महापौर श्रीमती नंदा जिचकार राहणार आहे. समाधान शिबिर दि. 28 व 29 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून शासनाच्या विविध 23 विभागांचे दालने राहणार असून नागरिकांच्या अर्ज व तक्रारी स्विकारणार आहे.
शासनाच्या विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी मुख्यमंत्री समाधान शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्या असून नागरिकांच्या शंकाचे समाधान, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनाचा लाभ देण्यासोबतच आपले हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी समाधान शिबिर हे जनतेसाठी उपलब्ध झाले आहेत. प्रश्न तुमचे प्रयत्न आमचे, आपले शासन आपल्या दारी यानुसार दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे प्रश्न मुख्यमंत्री समाधान शिबिराच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शासनाच्या विविध योजनांच्या लाभाचे वाटप यावेळी करण्यात येणार आहे. जनतेने मुख्यमंत्री समाधान शिबिराच्या माध्यमातून आपल्या प्रश्नाची सोडवणूक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री समाधान शिबिर आयोजनासाठी जिल्हाधिकारी नागपूर, नागपूर महानगरपालिका, सुधार प्रन्यास तसेच प्रशासनाच्या विविध विभागाच्या समन्वयाने आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समाधान शिबिराचा समारोप रविवार दि. 29 एप्रिल रोजी दुपारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
मुख्यमंत्री समाधान शिबिरामध्ये नागरिकांच्या तक्रारी, प्रश्न व समस्या स्विकारण्यासाठी हैद्राबाद हाऊस परिसरात विविध विभागांची दालने राहणार आहेत. यामध्ये महानगरपालिका, सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय, नगर भूमापन, विज वितरण कंपनी, अन्न व नागरी पुरवठा, जिल्हा उद्योग केंद्र, गृह निर्माण, सामाजिक न्याय, संजय गांधी निराधार योजना, जातपडताळणी, कामगार प्रधानमंत्री मुद्रा योजना, महिला व बाल कल्याण, आरोग्य सेवा, परिवहन विभाग, शिक्षण, पोलीस, ज्येष्ठ नागरीक ओळखपत्र, आधारकार्ड आदींचा समावेश राहणार आहे.
                                                                        ******

पश्चिम क्षेत्रीय परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर निर्देश मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी केंद्र सरकारच्या विभागांसोबत लवकरच चर्चा


मुंबई, दि. 26: मुंबईत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या ताब्यात असलेल्या जमिनींवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी संबंधित विभागांसोबत राज्याची बैठक घेऊन लवकर तोडगा काढण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीत याबाबत मागणी केली होती.
गांधीनगर (गुजरात) येथे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम क्षेत्रीय परिषदेची 23 वी बैठक आज पार पडली. यावेळी श्री. फडणवीस यांनी परिषदेत राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेसह मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासाच्या प्रश्नावर भूमिका मांडली. श्री. फडणवीस यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गोव्याचे मंत्री विनोद पालिनकर, दीव-दमणचे प्रशासक प्रफुल्ल पटेल आदी या परिषदेस उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या विविध 11 विभागांची मिळून मुंबईमध्ये एकूण 517 एकर जमीन आहे. यातील काही ठिकाणी असलेल्या जमिनींचा झोपडपट्टी पुनर्विकासाशी संबंध येतो. अशा प्रकरणांमध्ये त्वरित मार्ग काढून झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रश्न सुटावेत, यासाठी श्री. फडणवीस यांनी परिषदेला विनंती केली. या समस्येचे लवकर निराकरण करण्यासाठी केंद्रातील सर्व संबंधित मंत्रालयांची महाराष्ट्र सरकारसमवेत बैठक आयोजित करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिले.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत परवडणाऱ्या घरांची निर्मिती करताना, मिठागरे जमिनींचा विकास करण्याविषयीचे धोरण निश्चित करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी केंद्राच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
 पेसा कायद्यांतर्गत तरतुदींची अंमलबजावणी, राष्ट्रीय महामार्गांवरील सरकारी रुग्णालयांमध्ये ट्रॉमा केअर सुविधा विकसित करण्यासाठी क्षमता बांधणी, संपूर्ण लसीकरण यासह इतर विविध विषयांवर परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. एकूण 11 पैकी 9 मुद्यांवर समर्पक तोडगा काढण्यात आला.
----0---



आपलेच सीड-आपलेच फीड ही संकल्पना राबवून महाराष्ट्राला मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात स्वावलंबी करावे - सुधीर मुनगंटीवार



मुंबई, दि. 26 : आपलेच सीड- आपलेच फीडही संकल्पना राबवून महाराष्ट्राला मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात स्वावलंबी करावे, यासाठी विभागाने नियोजनबद्ध योजना आखावीअशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
मत्स्यव्यवसाय विकासासंदर्भात राज्यस्तरीय बैठकीत तेआज बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार अशोक नेते, आमदार नानाभाऊ श्यामकुळे, मल्लिकार्जून रेड्डी, पशुसंवर्धन दुग्धविकास विभागाचे सचिव किरण कुरुंदकर, पशुसंवर्धन आयुक्त अरूण विधळे, तेलंगनाच्या पशुसंवर्धन आयुक्त डॉ. सी.सुवर्णा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यात नीलक्रांती आणायची असेल तर आपलेच सीड- आपलेच फीडही संकल्पना वेगाने राबविणे, त्यासाठीच्या अत्यावश्यक पायाभूत सुविधांची उभारणी करणे ही अगत्याची बाब आहे,  असे सांगून अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात मत्स्यव्यवसायाला चालना देताना या क्षेत्रातील योजना, योजनांची गती आणि नियोजन या सर्वच क्षेत्रात मिशनमोड स्वरूपात काम होण्याची गरज आहे. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. वित्त विभाग पूर्ण ताकदीने या विभागाच्या मागे उभा राहील. विभागाने काही कालबाह्य योजनांमध्ये बदल करण्याची, काहीचे नियम, निकष आणि अनुदानाचे स्वरूप बदलण्याची गरजही अर्थमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्राला ७२० कि.मी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. राज्यात विविध विभागांतर्गत शेततळे निर्माण होत आहेत. जलसंपदा प्रकल्पांमध्ये, तलावांमध्ये, नद्यांमध्ये मोठ्याप्रमाणात मत्स्यत्पोदनाला वाव आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत मासेमारी केंद्रे अत्याधुनिक करण्याचे आपले नियोजन आहे.  काम सुरु ही झाले आहे. राज्यातील ही क्षमता लक्षात घेऊन या क्षेत्रात काम करणाऱ्या परंपरागत तसेच रोजगार म्हणून या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या लोकांचे हित लक्षात घेऊन योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी व्हावी असेही ते म्हणाले.
मत्स्यव्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न वाढावे, याक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, हा विभागाचा उद्देश असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी यावेळी  सांगितले. राज्यात नीलक्रांती, मिशन बोटुकली, राष्ट्रीय कृषी विकास योजना, सागरमाला, नाबार्ड अशा विविध माध्यमातून मत्स्यव्यवसाय विषयक योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.  कारखान्यांचे दुषित पाणी नद्यांमध्ये जाऊन नद्यांचे पाणी प्रदुषित होते. त्यामुळे मत्स्योत्पादनावर परिणाम होतो हे लक्षात घेऊन गावांमधील सांडपाणी नद्यांमध्ये येऊ नये,  यासाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
विभागाच्यावतीने यावेळी राज्यातील मत्स्यव्यवसायविषयक योजनांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. राज्यात २२ हजार ५९७ जलसंपदा प्रकल्प आणि तलावांची संख्या आहे. याचा ४ लाख १८ हजार ८६३ हेक्टरचा वॉटर स्प्रेड एरिया आहे. राज्यातील नद्यांची लांबी १९ हजार ४५६ कि.मी आहे. ४६ मत्स्यबीज केंद्रे राज्यात कार्यरत आहेत. याशिवाय राज्यात सागरी मत्स्योत्पादनाला मोठा वाव आहे. सागरी किनारपट्टी भागात १७३ फिश लॅण्डिंग सेंटर्स आहेत. त्यात मिरकरवाडा, भाऊचा धक्का आणि ससून डॉक यासारखी मोठी बंदर आहेत. सातपती, वसई, वर्सोवा, अलिबाग, रत्नागिरी, मालवण या सहा ठिकाणी फिशरिज ट्रेनिंग सेंटर्स आहेत मशिनयुक्त बोटींची संख्या  १३ हजार २ असून विना मशिन बोटींची संख्या २७१४  इतकी आहे. यासाठी राज्यात २८ कोल्ड स्टोअरेज आहेत. २०१६-१७ नुसार राज्यातील खाऱ्या तसेच गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन ६ लाख ६२ हजार ९१३ मे.टन एवढे आहे. याच कालावधीत ४११६ कोटी रुपयांचे मासे  मलेशिया, सिंगापूर यासारख्या देशांमध्ये निर्यात करण्यात आले अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
तेलंगनाच्या पशुसंवर्धन मत्स्यव्यवसाय आयुक्त श्रीमती डॉ. सी. सुवर्णा यांनी ही त्यांच्या राज्यात राबविण्यात येत असलेल्या मत्स्यव्यवसाय विषयक योजनांचे सादरीकरण केले.
००००

राहूल आवारे ऑलिंपिकचे मैदानही जिंका! महाराष्ट्र तुमच्या पाठीशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




मुंबई, दि. 26 : राहुल आवारे ऑलिंपिकचे मैदानही जिंका. त्यासाठी प्रशिक्षणासह आवश्यक त्या सर्व सुविधांसाठी शासन खंबीर पाठबळ देईल, संपूर्णमहाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक पटकाविणाऱ्या राहूल आवारे यांना आज येथे गौरविले.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे प्रमुख उपस्थित होते.
ऑस्ट्रेलियामध्ये गोल्डकोस्ट येथे नुकताच पार पडलेल्या २१ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहूल आवारे यांनी ५७ किलो वजनी गटात फ्रि-स्टाईल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. या यशासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मल्ल राहूल यांचे कौतुक केले. ते म्हणाले, महाराष्ट्रासाठी हे यश अभिमानास्पद आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर क्रीडास्पर्धांत पदक पटकाविणाऱ्या क्रीडापटूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीचा निर्णय यापुर्वीच आम्ही घेतला आहे. त्यामुळे आता राहूल यांनी २०२०मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या तयारीला लागावे आणि ऑलिंपिकचे मैदानही जिंकावे. या स्पर्धेच्या तयारीसाठी प्रशिक्षणासह आवश्यक त्या सर्व सुविधांसाठी शासन खंबीर पाठबळ देईल.
यावेळी मल्ल राहूल यांनीही कुस्तीमधील यापुढेही चमकदार कामगिरी व्हावी यासाठी मेहनत घेईन, एवढ्यावरच थांबणार नाही, असे आश्वस्त केले.
यावेळी राहूल यांचे प्रशिक्षक अर्जून पुरस्कार विजेते मल्ल काका पवार, दिलीप भरणे, दत्ता गायकवाड, गोविंद पवार आदी उपस्थित होते.
००००

विधानपरिषद निवडणूक - प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी आवाहन


            मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2018 जाहीर झाली असून मतदान 21 मे, 2018 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार आहे. तर मतमोजणी 24 मे, 2018 रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीचे वृत्तसंकलन/छायाचित्रण करण्याकरिता भारत निवडणूक आयोगाचे विहित प्राधिकार पत्र मिळविण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
            महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकार मतदार संघ, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघ, परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघ, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघात निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकीच्या मतदान/मतमोजणीचे वृत्तसंकलन/छायाचित्रण करण्याकरिता भारत निवडणूक आयोगाचे विहित प्राधिकार पत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. ही प्राधिकार पत्रे प्राप्त होण्याकरिता भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या निकषाची पूर्तता करणाऱ्या उच्छूक प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधिंच्या नावाच्या शिफारशी भारत निवडणूक आयोगाकडे पोहोचविण्याचा अंतिम दिनांक 6 मे, 2018 आहे. या शिफारशी महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांनी 5 मे, 2018 पर्यंत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई यांच्याकडे सादर करावयाची आहेत.
            प्रसिद्धी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधिंना महाराष्ट्र विधानपरिषदेच्या या निवडणूकीकरीता प्राधिकार पत्रे हवी असतील अशा प्रतिनिधींनी आपली नावे, आपल्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या दोन प्रतीसह (मतदान/मतमोजणी दोन्ही प्राधिकार पत्रे हवी असल्यास तीन प्रतीसह) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे 5 मे, 2018 पर्यंत पाठवावीत. छायाचित्राशिवाय प्राप्त झालेली मागणी तसेच 5 मे, 2018 नंतर या कार्यालयास प्राप्त झालेली प्राधिकार पत्राची मागणी स्वीकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारीयांनी कळविले आहे.
००००