Monday 30 January 2017

‍जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन

प्र. प. क्र. 74 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनाचा 67 वा वर्धापन दिन सोहळा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करुन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पोलिस दलाची मानवंदना स्वीकारली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी के. एन. के. राव, स्वागत अधिकारी प्रकाश पाटील, उप जिल्हाधिकारी मनीषा जायभाय, शिर्रीष पांडे, सुभाष चौधरी, लिना फलके, गिरीष जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. एन. वंजारी, श्री. वार्डेकर मुद्रांक शुल्क अधिकारी अरविंद पाटील, श्री. उघाडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दीपक लिमसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी एस. पी. कडू आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****

राज्यातील पहिल्या संगणकीकृत सात-बारा एटीएम व्हेंडिंग मशीनचा शुभारंभ


शेतकऱ्यांसाठी सात-बारा एटीएम पथदर्शी

नागपूर, दि. 26 : शेतकऱ्यांना आपल्या शेतीसंदर्भातील महत्त्वपूर्ण असलेल्या सात-बारा या दस्तावेजासाठी तलाठ्यांकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. संगणकीकृत व प्रमाणित सात-बारा एटीएम व्हेंडिंग मशीनच्या सहाय्याने तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या राज्यातील पहिल्या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते झाला.
नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात सात-बारा व्हेंडिंग एटीएम मशीनद्वारे केवळ  20 रुपये वरुन अद्ययावत संगणीकीय सात-बारा उपलब्ध होत असल्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी एटीएम सात-बारा ही अभिनव संकल्पना नागपूर जिल्ह्यात राबवायला सुरुवात केली असून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात एटीएम व्हेंडिंग मशीन बसविण्यात येणार आहे.
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांना नागपूर जिल्हा प्रशासनातर्फे पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून अभिनव भेट असल्याचे सांगतांना विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की, जनतेला सात-बाराचा उतारा सुलभ व एक मिनिटात ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत आहे. हा उपक्रम म्हणजे जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हे यंत्र मंडल अधिकारी कार्यालयापर्यंत बसविल्यास जनतेला सात-बारासाठी त्रास होणार नाही. सात-बारा मिळविण्यासाठी अत्यंत सुलभ  व सुटसुटीत प्रक्रिया असून जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केलेल्या कार्याचा गौरव विभागीय आयुक्तांनी केला.
गोधनी येथील शेतकरी सिद्धेश्वर कोळे यांनी एटीएम मशीमध्ये 20 रुपये जमा करुन आपल्या शेतीचा सात-बारा घेतला. यापूर्वी सात-बारासाठी तलाठ्याकडे जावे लागत होते. एटीएमवर सात-बारा मिळत असल्यामुळे सुविधा झाल्याचे  यावेळी सिद्धेश्वर कोळे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्वागत करुन सात-बारा एटीएम व्हेंडिंग मशीनबाबत माहिती दिली.
यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी के. एन. के. राव, उपजिल्हाधिकारी गिरीष जोशी, उप विभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी  कृष्णा फिरके, एनआयसीच्या श्रीमती क्षमा बोरोले, उप जिल्हाधिकारी सुभाष चौधरी, शिरीष पांडे, अधीक्षक भूमी अभिलेख सूर्यकांत मोरे, एनआयसीचे खोब्रागडे,  तहसीलदार बन्सोडे आदी अधिकारी उपस्थित होते.

******

वैभवशाली उज्ज्वल परंपरा कायम राखू या --- चंद्रशेखर बावनकुळे





  • प्रजासत्ताक ‍दिन उत्साहात साजरा
  • पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजवंदन
  • पथसंचलन, विद्यार्थ्यांच्या आकर्षक कवायती

नागपूर, दि. 26 : भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा कायम राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय उत्सव साजरा करु या, असे आवाहन  राज्याचे ऊर्जा, नवीन व नवकरणीय ऊर्जा, उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनाच्या मुख्य सोहळ्यात केले.
कस्तुरचंद पार्क येथे प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन झाले. त्यानंतर पथसंचलनाची मानवंदना स्वीकारली. यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम,  जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. पाटणकर उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस, राज्य राखीव पोलिस, होमगार्ड, राष्ट्रीय छात्रसेना व विद्यार्थ्यांच्या पथसंचलनाची पाहणी करुन मानवंदना स्वीकारल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतांना म्हणाले की, शासन, प्रशासन आणि जनता सर्वांनी मिळून एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करतांना माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या व्हिजन  2020 चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होवू या. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहचविण्यासाठी शासन प्रशासन मिळून कटिबद्ध होवू या, असे त्यांनी यावेळी  सांगितले.
उत्कृष्ट पथसंचलन आणि पुरस्कार वितरण

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात पोलिस उपनिरीक्षक विक्रम कदम व त्र्यंबक प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या पथसंचलनामध्ये उत्कृष्ट ठरलेल्या प्रहार मिलिटरी स्कूलच्या मुलांच्या चमूला प्रथम पारितोषिक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पथसंचलनामध्ये सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूलच्या मुलींच्या बॅण्ड पथक द्वितीय तर एनसीसी प्लाटूनला तृतीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पथसंचलनामध्ये 21 पथक तसेच चित्ररथ सहभागी झाले होते.
पोलिस सेवेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस उपायुक्त सुहास प्रकाश बावणे, अप्पर पोलिस अधीक्षक दत्तात्रय राठोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वेश्वर संभाजी हनुमंते यांना पोलिस महासंचालकांचे  सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. जिल्हा क्रीडा पुरस्कारामध्ये अनूज आदमने (तलवारबाजी), कुमारी पुनम कढव(हॅण्डबॉल), कुमारी दामिनी रंभाळ(तलवारबाजी), मोहम्मद शोएब, मो. अल्ताफ, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त स्काऊट गाईडमध्ये कु. ऐश्वर्या बांगडकर, कु. किरण रेवतकर, गौरव दुबे आणि प्रत्युष बिसेन यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सामूहिक कवायतीमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या सेंट जोसेफ स्कूल प्रथम, सेंट ऊर्सुला गर्ल्स हायस्कूल द्वितीय व सेंट जॉन्स स्कूलची चमू तृतीय ठरली.  यावेळी  वंदेमातरम देशभक्तीपर गीत, डंबेल कवायत व कराटे प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रध्वज वंदन केल्यानंतर समारंभास उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक, लोक प्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व जनतेला भेटून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे संचालन डॉ. दीपक साळीवकर यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, स्वातंत्र्य सेनानी यादवराव देवगडे, माजी जिल्हा परिषद विठ्ठलराव टालाटुले, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, हातमाग संचालक संजय मीना, न्यायाधीश, ज्येष्ठ विधिज्ञ, विविध स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय व पोलिस अधिकारी  तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

राज्यस्तरीय मिनी गोल्फ क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करा - जिल्हाधिकारी सचिन कुर्वे

नागपूर, दि. 25 :    महाराष्ट्र मिनी गोल्फ संघटना व जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे 62 व्या राष्ट्रीय शालेय मिनी गोल्फ स्पर्धांचे आयोजन येत्या 2 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले असून या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शालेय मिनी गोल्फ स्पर्धांच्या आयोजना संदर्भात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. कुर्वे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र मिनी गोल्फ संघटनेचे डॉ. सूरजसिंह येवतीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
62 वी राष्ट्रीय शालेय मिनी गोल्फ 19 वर्ष मुले व मुली यांचे स्पर्धा दिनांक 2 ते 5 फेब्रुवारी 2017 पर्यंत आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धांमध्ये 12 राज्यांचा सहभाग राहणार आहे. स्पर्धांसाठी 288 खेळाडू, 20 पंच, 24 मार्गदर्शक, तसेच 12 व्यवस्थापक उपस्थित राहणार आहे. खेळाडू व इतर मान्यवरांची निवास व्यवस्था तसेच खेळाचे मैदान यामध्ये अठरा होल असलेले मिनी चेअर कोर्ट तयार करण्यात येणार आहेत. या स्पर्धांसाठी जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे सहकार्य करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यावेळी सांगितले.

0000000

राष्ट्रीय मतदार दिनी नवमतदारांच्या प्रोत्साहनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन - सचिन कुर्वे


  • 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस
  • यशस्वी युवा आदर्शांचा गौरव
  • राज्यस्तरीय मतदार दिनाचे बुधवारी आयोजन

नागपूर, दि. 23 :  लोकशाही प्रक्रियेमध्ये नवमतदारांचा सहभाग वाढावा, तसेच मतदारांनी मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य बजावावे यासाठी 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीचा राष्ट्रीय मतदार दिवसाचा राज्यस्तरीय कार्यक्रम बुधवार, दिनांक 25 जानेवारी रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय मतदार दिन आयोजना संदर्भात विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या प्रमुख उपस्थित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहड, महसूल उपायुक्त जितेंद्र पापडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी लिना फलके आदी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली होती. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नवमतदारांचा लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात युवकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव अश्वनी कुमार, ज्येष्ठ समाज सेवक डॉ. विकास आमटे, कुलगुरु डॉ. सिध्दार्थ विनायक काने, ज्येष्ठ गांधीवादी श्रीमती विभा गुप्ता, विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यशस्वी युवा आदर्शांचा सहभाग
लोकशाही प्रक्रियेमध्ये नवतरुण मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी माजी क्रिक्रेट पटू प्रशांत वैद्य, तरुण उद्योजक हसन शफिक, प्रशासकीय अधिकारी अमन मितल, प्रसिध्द सर्जन डॉ. समीर जहागीरदार, बॅडमिटन पटू श्रीमती अरुणदती पानतावणे, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू श्रीमती मल्लिका भांडारकर हे नवमतदारांना प्रोत्साहन देणार आहेत.
यावेळी तरुण नवमतदारांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने पहिल्यांदाच मतदार झालेल्या युवकांना छायाचित्र मतदार ओळखपत्राचे वाटप करुन लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात येणार आहे.
मतदार जागृतीनिमित्त विविध महाविद्यालयातील 15 ते 17 वयोगटातील मतदारांना मतदानाचे महत्व तसेच मतदान प्रक्रियेविषयी माहिती देऊन लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांचा सहभाग वाढावा यासाठी महाविद्यालयीन स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
जिल्हयात 37 लाख 54 हजार 948 मतदार
मतदानामध्ये युवा मतदार व महिलांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्हास्तरावर विशेष प्रयत्न करण्यात आले. यामध्ये 16 सप्टेंबर  रोजीच्या मतदार यादीनुसार 37 लाख 54 हजार 948 मतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये 19 लाख 47 हजार 005 पुरुष मतदार व 18 लाख 7 हजार 865 महिला मतदार आहेत. इतर मतदारांची संख्या 78 आहे.
नवीन कार्यक्रमाअंतर्गत नोंदणी व वगळणी व स्थांनतरण झालेल्या 1 लाख 15 हजार 204 अर्जांपैकी 97 हजार 916 मतदारांचा नव्याने समावेश झाला असून यामध्ये 44 हजार 306 महिला मतदारांचा समावेश आहे.
मतदार नोंदणीसाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये जिल्हयांतर्गत नोडल अधिकाऱ्यांचे नियुक्ती, स्टूडंट अॅम्बेसिडर  व कॅम्प ॲम्बेसिडर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडून नियोजनबध्द पध्दतीने पात्र युवकांना मतदार करुन घेण्यात आले आहे.
यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहड यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली.

0000000

आदर्श आचार संहितेची कठोर अंमलबजावणी करा - ज.स. सहारिया


महानगर पालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूकांचा आढावा
नागपूर, दि.23 : नागपूर महानगरपालिका तसेच वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व उपायोजनांची अंमलबजावणी कठोरपणे करा, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी आज नागपूर येथे दिलेत.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात निवडणूकीसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूर्व तयारीचा  आढावा श्री. सहारिया यांनी घेतला.  याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करतांना मतदारांवर प्रभावासाठी दारु, रोख रक्कम अथवा वस्तूरुपाने साहित्य वाटप होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना करतांना राज्य निवडणूक आयुक्त श्री. सहारिया म्हणाले की, पहिल्यांदाच  रेल्वे, वन विभाग, बँक तसेच आयकर विभागांच्या अधिकाऱ्यांची मदत घेणार असून इतर राज्यातून येणारे रेल्वे व इतर वाहतूकीवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.
उमेदवारांना नामनिर्देशन पत्र संगणकाच्या सहाय्याने भरावयाचे असल्यामुळे उमेदवार  त्यांच्या सोयीप्रमाणे नामनिर्देशन पत्र भरता येईल. तसेच नामनिर्देशन पत्र नामंजूर होण्याचे प्रमाणही कमी होणार आहे. संगणकाच्या सहाय्याने नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सहाय्य व मदत व्हावी यासाठी हेल्प डेस्क तयार करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून निवडणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी पोलिस विभागानेही आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना पूर्ण केल्या आहेत.
नागपूर महानगरपालिका तसेच वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील निवडणुकीची तयारी योग्य दिशेने सुरु असून मतदानासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ व मतदान यंत्र उपलब्ध आहेत.  तीन जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या 159 गट व 318 गणामध्ये निवडणुका घेण्यात येणार असून 26 लक्ष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 1456, वर्धा 1113 व गडचिरोली जिल्ह्यात 998 अशी एकूण 3567 मतदान केंद्र राहणार आहेत.
नागपूर महानगरपालिकेमध्ये 151 जागेसाठी मतदान घेण्यात येणार असून 2800 मतदान केंद्र राहणार आहेत. 12 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून एक खिडकी योजनेद्वारे उमेदवारांना विविध परवाणग्या देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणीसाठी 16 पथके निर्माण केली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत शपथपत्राद्वारे माहिती देणे. बंधनकारक असून उमेदवारासंदर्भात मतदारांना माहिती असावी यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात स्वरुपात तसेच मतदान केंद्राच्या बाहेर फ्लॅक्सवर माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांचे शिक्षण, स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, असलेले गुन्हे, झालेली शिक्षा व प्रलंबित असलेले गुन्हयासंदर्भात माहितीचा समावेश आहे.
उमेदवारांना खर्चाची माहिती देणे बंधनकारक असून तपासणीसाठी आयकर विभागाच्या चमुची मदत घेण्यात येणार आहे. मतदारांनी मतदानांचा हक्क बजावावा यासाठी विशेष उपक्रम राबवावे अशी सूचना करताना येत्या निवडणूकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक बिपिन बिहारी, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलिस आयुक्त  डॉ. के. व्यंकटेशम, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप सिंह पाटणकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, वर्धाचे जिल्हाधिकारी शैलेश नवल तसेच विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000000

Thursday 26 January 2017

एकही मूल लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या --- सचिन कुर्वे


  • 29 जानेवारीला 1799 गावात पल्स पोलिओ मोहिम
  • 2528 लसीकरण केंद्र
  • 2 लाख 14 हजार 494 बालकांना लस पाजणार

    नागपूर दि. 17 : एकही मूल पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही यादृष्टीने जिल्ह्यातील 5 वर्षे वयोगटापर्यंतच्या सर्व बालकांच्या लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
जिल्ह्यात 29 जानेवारी व 2 एप्रिल 2017 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. शून्य ते 5 या वयोगटातील एकही मूल लसीकरणापासून वंचित राहणार नाही यादृष्टीने प्रत्येक गावातील बालकांचे सर्वेक्षण करुन त्यादृष्टीने नियोजन करण्याचा सूचना करताना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे म्हणाले की, पल्स पोलिओ जनजागृतीसाठी ग्रामस्तरावर 26 जानेवारी रोजी ग्रामसभा आयोजित करुन ग्रामसभेसमोर बालकांचा नावाची यादीचे वाचन करावे. व सुटलेल्या बालकांचा नावाचा या यादीमध्ये समावेश करावा.
लसीकरण मोहिम राबविताना ग्रामीण भागात 2 हजार 317 बूथ तयार करण्यात येत असून नागरी क्षेत्रात 211 बूथचा समावेश राहणार आहे. लसीकरण केंद्रामध्ये सर्व नागरिकांना सहजपणे पोहचता यावे यासाठी अंगणवाडी अथवा शाळांमध्ये बूथ लसीकरण केंद्र ठेवण्यात यावे. 29 जानेवारीला सर्व बालकांना पोलिओचा डोस पाजल्यानंतर पुढील तीन दिवस घरोघरी जाऊन बालकांच्या यादीनुसार तपासणी करावी, अशी सूचना करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, लसीकरणासाठी मोबाईल टीम तसेच विविध उद्योगामध्ये बाहेरुन आलेल्या कामगारांच्या मुलांना पोलिओचा डोस देणे तसेच एसटी बसस्टँड, टोलनाके, यात्रास्थळे व गर्दीच्या ठिकाणीही बालकांना लस देण्याची व्यवस्था करावी. जिल्ह्यात 5 वर्षाखालील ग्रामीण भागात एक लाख 80 हजार 422 तर शहरी भागात 36 हजार 574 अशी दोन लाख 16 हजार 986 बालके आहेत. या सर्व बालकांना लसीकरण करावे, असेही त्यांनी सांगितले.
223 मोबाईल टीम तयार करणार
लसीकरण मोहिमे संदर्भात घरोघरी माहिती पोहचावी यासाठी शाळेतील मुलांचा सहभाग घेऊन त्या मुलांचा टोळ्या तयार कराव्यात. मुले प्रत्येक भागात जाऊन बालकांचा शोध घेतील व अशा बालकांच्या पालकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणतील. यादृष्टीने शाळांमध्ये जागृती करावी व लसीकरणाच्या दिवशी गावात प्रभात फेरी काढावी अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.
लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व स्वयंसेवी संघटनाचाही सहभाग घेण्यात येणार आहे. बाहेर गावहून आलेल्या बांधकाम, कृषी, विटभट्टी तसेच औद्योगिक क्षेत्रातील आस्थांपणामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांचा मुलांना लसीकरण करण्यासाठी 223 मोबाईल टीम तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनी सांगितले. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.साजीव, कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक डॉ. चहांदे, साथरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वाळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. त्यागी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी प्रशांत थोरात आदी उपस्थित होते.

*****

नोंदणी होताच तात्काळ फेरफाराची सुविधा - सचिन कुर्वे

फेरफार करण्यासाठी चकरा मारण्याची गरज नाही
फेर फार संदर्भात एसएमएसद्वारा कळविण्यात येणार माहिती

नागपूर, दि.16 :     महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाअंतर्गत दस्ताची नोंदणी होताच नोंदणी झालेल्या प्रकरणासंदर्भात नोंदणीकृत फेरफार करण्यासाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नसून नोंदणी विभागाकडून फेरफार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिली.
दस्त नोंदणी होताच फेरफारीची प्रक्रिया संदर्भातील उपक्रम आजपासून संपूर्ण जिल्हयात सुरु झाला आहे. जिल्हयातील नागरिकांचे मिळतीच्या हस्तांतरणाचे व्यवहार दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात नोंदविले जातात. नोंदणीकृत दस्तानुसार फेरफार करण्यासाठी मिळकत धारकांना संबंधित नगर भूमापन अथवा भूमिअभिलेख कार्यालयात नामांतरण अर्ज करावा लागत होता. वस्तुत: नोंदणी झालेल्या दस्ताची माहिती संबंधितांना पाठविणे तसेच कलम 50 अन्वये संबंधित भूमापन अधिकारी अथवा तलाठी यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे फेरफार करण्यासाठी आवश्यक असतानाही नागरिकांना नामांतरणासाठी वेगळा अर्ज करावा लागत होता.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी या संदर्भात नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी महसूल जमीन अधिनियमाअंतर्गत दस्ताची नोंदणी होताच फेरफारीची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार जिल्हयात प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. भूमिअभिलेख कार्यालयातर्फे फेरफार योग्य दस्ताची माहिती नोंदणी विभागाकडून प्राप्त होताच त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. प्रकरणामध्ये त्रृटी आढळलयास अर्जदाराला एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. अशा त्रृटींचीपुरतता करण्यासाठी दरमहिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी नगर भूमापन कार्यालयामार्फत विशेष शिबीर घेऊन त्रृटीची पूरतता करण्यात येऊन फेरफार झाल्यानंतर संबंधितांना एसएमएसद्वारा कळविण्यात येणार आहे.
दस्त नोंदणी व फेरफार प्रक्रिया संदर्भात भूमिअभिलेख, सहजिल्हा निबंधक नागपूर शहर व ग्रामीण, सर्व नगर भूमापन अधिकारी, उपअधीक्षक भूमिअभिलेख, सर्व दुय्यम निबंधक यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. नोंदणी होताच फेरफाराची प्रक्रिया या उपक्रमाची सुरुवात आजपासूनच जिल्हयात सुरु झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

000000000

विभागीय क्रीडा संकुलातील कामांचा आढावा


नागपूर, दि. 13 : विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज पार पडली.
नागपूर सुधार प्रन्यास यांचेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या व सद्य:स्थितीत सुरु असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला.
या बैठकीत नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कादंबरी बलकवडे-भगत, उपायुक्त पराग सोमण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश इंदुरकर, क्रीडा व युवक सेवा नागपूरचे उपसंचालक सुभाष रेवतकर उपस्थित होते.
क्रीडा संकुलातील सुरु असलेली कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. सुरु असलेल्या कामांना वेळोवेळी संबंधित यंत्रणांनी वारंवार भेटी देऊन योग्यप्रकारे होतील याकडे लक्ष देऊन त्यामधील उणीवा वेळेवर निदर्शनास आणाव्यात, असे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी यावेळी सांगितले.
क्रीडा संकुल परिसरात अतिक्रमण होणार नाही व परिसर स्वच्छ राहील याकडे लक्ष देऊन सभोवती  वृक्षारोपण करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
*****

कॅशलेश व्यवहार आर्थिक प्रगतीचा टप्पा


*  अपूर्व मिश्रा यांचे आवाहन
*  कॅशलेस व्यवहाराबाबत मार्गदर्शन कार्यशाळा
नागपूर,दि.13 : ‘कॅशलेश’ व्यवहार हा आर्थिक प्रगतीचा टप्पा आहे. यामुळे प्रत्येकाने कॅशलेस व्यवहार करावा, असे आवाहन एस बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक अपूर्व मिश्रा यांनी केले. वरिष्ठ कोषागार कार्यालय व यस बँक यांच्या संयुक्त विद्यामाने बचत भवन येथे आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते.
          यावेळी सहसंचालक विजय कोल्हे, वरिष्ठ कोषागार अधिकारी मोना ठाकूर, अप्पर कोषागार अधिकारी श्रीमती दिपाली राऊत, उपकोषागार किशोर कोढे, लेखाधिकारी शैलेश कोठे, साइबर क्राईम शाखेचे पोलिस निरीक्षक उमाकांत एस.अदके, एस बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक अपूर्व मिश्रा, बँक उपप्रबंधक समीर कुळकर्णी, आदित्य व्यास आदी उपस्थित होते.
       अपूर्व मिश्रा मार्गदर्शन करताना म्हणाले की, कॅशलेश व्यवहार बँक कार्ड, प्रिपेड कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्डने  करू शकता. तसेच आधार कार्ड नंबर व बँक खाते नंबर बँकेशी लिंक केल्यास लाभार्थ्यांना सबसिडी सहज मिळू शकते.  विविध वॉलेट्सच्या माध्यमातून  ऑनलाईन खरेदी करता येते. सर्व कॅशलेस व्यवहार करताना बँकेकडे आपला मोबाईल नंबर अचूक असणे गरजेचे आहे. प्रिपेड कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्डचा पिन कोड नंबर कुणालाही देऊ नये तसेच डेबिट व क्रेडीट कार्डचा 25 हजार रूपयांपर्यंतचा विमाही काढता येतो. तो प्रत्येकाने काढावा. असे आवाहन त्यांनी केले. ही संपूर्ण माहिती स्टाईड शोच्या माध्यमातून देण्यात आली.
             साइबर क्राईम शाखेचे पोलिस निरीक्षक उमाकांत अदके म्हणाले की, कॅशलेस व्यवहार हा सर्वसामान्य नागरिकांकरिता सुलभ आहे. परंतु व्यवहार करताना दक्षता घेणे गरजेचे आहे.आपल्या प्रिपेड, डेबिट आणि क्रेडीट कार्डचा उपयोग व्यवहार करण्याकरिता दुसऱ्याला करू देऊ नये. कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये, एटीएममधून  पैसे काढताना दक्षता बाळगा व मोबाईमध्ये ऑनलाईन शॉपिंग करण्याकरिता डाउनलोड केलेल्या ॲप’ विषयी खात्री करून घ्या. असे ते म्हणाले.
कार्यशाळेचे संचालक व आभार प्रदर्शन एस.एस. चहांदे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेकरिता संजय बुलबुले, निलेश बोनगिरवार, प्रियंका पाठे, प्रणय भोगे, जितेंद्र ठाकूर व कोषागार व एस बँकेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

******

माहिती आयुक्त पदाची सूत्रे धारुरकर यांनी स्वीकारली

नागपूर दि. 12 :  राज्य माहिती आयोगाच्या नागपूर येथील खंडपीठातील माहिती आयुक्त म्हणून श्री. दिलीप धारुरकर यांनी आज सूत्रे स्वीकारली.
श्री. धारुरकर यांची नुकतीच माहिती आयुक्त पदावर नियुक्त झाली असून मुंबई राज्य माहिती आयुक्त कार्यालयात त्यांचा शपथविधी झाला.
त्यांचे आज येथे आगमन झाले आणि येथील माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. श्री. पाटील यांच्याकडे येथील माहिती आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.
श्री. पाटील यांनी तसेच माहिती आयुक्त कार्यालयातील अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्री. धारुरकर यांचे स्वागत केले.
संक्षिप्त परिचय :
नवीन माहिती आयुक्त श्री. दिलीप लक्ष्मीकांत धारुरकर यांचा जन्म  8 मे 1962 रोजी उमरगा  (जि. उस्मानाबाद) येथे झाला. त्यांनी अभियांत्रिकी पदवी तसेच राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण संपादन केले. ते 11 वर्षे पाटबंधारे खात्यात अभियंता म्हणून कार्यरत होते. विद्यार्थी दशेपासून पत्रकारिता केल्यामुळे 1994 साली सरकारी नोकरीचा राजीनामा त्यांनी दिला.  तरुण भारत(अहमदनगर) संस्थापक संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले.  1998 पासून नगर, नाशिक, जळगाव व देवगिरी तरुण भारत या समूहाचे संपादक म्हणून कार्यरत राहिले. दैनिक लोकाशा, दैनिक सांजवार्ता, सा. आजकाल यामध्ये संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्यांनी विविध नियतकालिकात लेखन केले आहे.
पुरस्कार :
श्री. धारुरकर यांना पत्रकारितेतील कार्याबद्दल दा. प. आपटे पुरस्कार, पंडीत दीनदयाळ उपाध्याय पुरस्कार, समाजशिल्पी पत्रकारिता पुरस्कार, राजाभाऊ नेने पुरस्कार, पुणे विश्वसंवाद केंद्राचा देवर्षि नारद जीवनगौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.

*****

विभागीय आयुक्त कार्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

नागपूर दि. 12 :  राजमाता जिजाऊ मा साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आले.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी राजमाता जिजाऊ मा साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

         यावेळी अप्पर आयुक्त अरूण उन्हाळे, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष मनोजकुमार सूर्यवंशी, महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर,  उपायुक्त श्रीकांत फडके, सहआयुक्त सुधाकर कुळमेथे, तहसीलदार श्रीराम मुंदडा, प्रशांत पाटील, सहसंचालक भाग्यश्री जाधव, नाझर प्रमोद जोंधुळकर यांच्यासह  विभागीय आयुक्त कार्यालयातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tuesday 10 January 2017

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया आजपासून


नागपूर दि.9, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघ मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी कळविले आहे.
      यासोबतच औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघ, तसेच अमरावती व नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणूक कार्यक्रमाचा समावेश आहे.
    विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रिया 10 जानेवारी 2017 पासून सुरु होत असून, 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये मंगळवार दि. 10 जानेवारी ते 17 जानेवारी 2017 पर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहेत. मात्र, शनिवार, दि.14 जानेवारी आणि रविवार दि. 15 जानेवारी या सार्वजनिक सुटीच्या दिवशी  उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे स्विकारली जाणार नाहीत.  बुधवार दि. 18 जानेवारी 2017 रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल. तर शुक्रवार दि. 20 जानेवारी 2017 पर्यंत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.

   3 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सोमवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सुरु होणार असून निवडणूक प्रक्रिया गुरुवार दि. 9 फेब्रुवारी 2017 रोजी पूर्ण करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
0000000000

सुरक्षित वाहतुकीसाठी स्वयंशिस्त पाळा -श्रावण हर्डीकर




रस्ता सुरक्षा पंधरवडा अभियानास प्रारंभ
नागपूर दि. 9 :  सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सार्वजनिक वाहतूक सेवेचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक नागरिकाच्या जीविताचे रक्षण करताना सुरक्षित वाहतुकीसाठी वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.
                             प्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित 28 व्या रस्ता सुरक्षा अभियान -2017च्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता रजनिकांत शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार व डॉ. रुपकुमार बेलसरे व्यासपीठावर उपस्थित होते.
अपघातमुक्त नागपूरसाठी नागरिकांनी स्वत:हून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. त्यासोबत अवैध पार्कींग करणे टाळले पाहिजे. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ मोकळे ठेवले पाहिजेत. यात प्रत्येक नागपूरकरांचा सक्रीय सहभाग असणे आवश्यक आहे. त्याशिवाय स्मार्ट, सुंदर, स्वच्छ व अपघातमुक्त नागपूरची कल्पना करणे अशक्य असल्याचेही  हर्डीकर यांनी सांगितले.
                               सर्व नागरिकांच्या सहकार्याने रस्ते अपघातमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. केवळ आकडेवारीवर न जाता अपघात आणि त्यातून होणाऱ्या जीवितहानीवर नियंत्रण मिळविणे नागपूरकर या नात्याने सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे.  त्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले.
                      वाहतूक सुरक्षेसंबंधी कार्य करणारी जनआक्रोश व जीवन सुरक्षा प्रकल्प या समाजसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात माहिती दिली.  यावेळी जीवन सुरक्षा प्रकल्पाचे अध्यक्ष राजीव वाघ यांनी उपस्थितांना अपघातमुक्त नागपूरची शपथ दिली.
                      रस्ता सुरक्षा अभियान या पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत जनजागृतीसाठी मोबाईलव्हॅनला मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, शरद जिचकार यांनी हिरवी झेंडी दाखविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद आंबेकर यांनी, प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी प्रास्ताविक व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांनी आभार मानले.

00000