Thursday 21 September 2023

१ ते ८ ऑक्टोबर दरम्यान खादी व ग्रामोद्योग वस्तुंचे प्रदर्शन- आर.विमला

प्रदर्शनात ५० स्टॉल्स ; सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन नागपूर दि.२१: महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त दि. १ ते ८ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नागपूरच्यावतीने खादी व ग्रामोद्योग वस्तुंचे प्रदर्शन येथील विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या उपस्थितीत दि.१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी आज रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन जगताप, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके उपस्थित होते. खादी पासून निर्मित विविध कापडांचे २५ स्टॉल्स या प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात येणार असून महात्मा गांधी जयंतीच्या औचीत्याने खादी ग्रामोद्योग मंडळाकडून खादीच्या वस्तूंवर २० टक्के सवलत असणार आहे. या सोबतच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, मध केंद्र योजना योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध झालेल्या उद्योजकांचेही स्टॉल्स राहणार आहेत. या प्रदर्शनात महाबळेश्वर येथील शुद्ध मधुबन मध, वर्धा नागपूर येथील खादीचे दर्जेदार कपडे, विविध प्रकारचे मसाले, लाकडी घाण्यावरील तेल, लाकडी हस्तकलेच्या वस्तू, फायबर मूर्ती, बांबूच्या कलात्मक वस्तू, आवळा खाद्य पदार्थ, गुळ, मेणबत्ती आदी वस्तूंचे स्टॉल या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत. या प्रदर्शनात भेट देणाऱ्या ग्राहकांसाठी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही असणार आहे. ग्रामीण उद्यो जकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जास्तीत-जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन वस्तू खरेदी कराव्या असे आवाहन,आर विमला यांनी केले आहे. दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी निःशुल्क खुले असणार आहे. ०००००

‘शिकेल त्याला रोजगार’ अशा शिक्षण व्यवस्थेची तयारी - उपमुख्यमंत्री

*कौशल्यप्राप्त मनुष्यबळ देशाच्या अर्थव्यवस्थेचे चालक बनतील *आयटीआय पदवीदान समारंभ नागपूर दि. 17 :- उद्योग क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाच्या मागणीनुसार औद्योगिकरण व शिक्षण यांची सांगड घालून अभ्यासक्रमात केलेल्या बदलामुळे प्रशिक्षीत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शासनाद्वारे मोठ्या प्रमाणात उद्योगांशी सामंज्यस्य करार करून त्यांच्याकरिता कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. त्यामुळे जो शिकेल, त्याला रोजगार मिळेलच अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला निश्चितपणे तयार करता येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभ आज येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला. कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रविण दटके, आमदार मोहन मते, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी याप्रसंगी उपस्थित होते. छोट्या-मोठ्या 32 प्रकारच्या उद्योगांना कौशल्य प्रशिक्षीत मनुष्यबळाची गरज नियमीत लागत असते. ही बाब लक्षात घेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये मोठ्या प्रमाणात कौशल्य प्रशिक्षणाची सुरूवात केली. त्यामुळे आयटीआयचे आधुनिकीकरण होवून येथील अभ्यासक्रमात रोजगाराभिमुख बदल करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून 2014 मध्येथ अकराव्या स्थानी असलेली आपली अर्थव्यवस्था आज जगात पहिल्या पाच मध्ये आली असल्याचे श्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. जागतिक अर्थव्यवस्थेतील आपली भरारी, जी20चे आयोजन व चंद्रायानाचे यशस्वी प्रक्षेपण या यशामुळे जगाचे लक्ष भारताकडे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला अजून पुढे नेण्यासाठी कौशल्य विकसित मनुष्यबळाचे महत्त्वाचे योगदान राहणार आहे. आज कौशल्य प्राप्त करणारे विद्यार्थी पुढे देशाच्या अर्थव्यवस्थेचे चालक बनतील, असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले. यावेळी नागपूर व अमरावती विभागातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आयटीआय संस्थांना गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते यावेळी आयटीआय च्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासवर आधारीत ‘कौशल्य ज्योती’ या मराठीतील पहिल्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच आयटीआय संस्थेची स्वच्छता व सुशोभिकरण पंधरवाडाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते. *****

'इंडस्ट्री मिट’च्या माध्यमातून उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

426 सामंजस्य करार, विदर्भातील 28 कंपन्यांचा सहभाग कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती नागपूर दि. 17 :- देशाच्या अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण होत असून अनेक संधी उपलब्ध होत आहेत. कुशल मनुष्यबळाची गरज उद्योग जगताला आहे. कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबरोबरच उद्योगाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. ‘इंडस्ट्री मिट’ सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक असलेले कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासन, उद्योगसमूह आणि प्लेसमेंट एजन्सीज यांच्यात आज ‘इंडस्ट्री मिट’ च्या माध्यमातून ४२६ सामंजस्य करार करण्यात आले. यात विदर्भातील २८ कंपन्यांचा सहभाग आहे. कराराच्या माध्यमातून सुमारे १ लाख २५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या परिसरातील गुरुनानक भवन येथे ‘इंडस्ट्री मिट’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, आयुक्त डॅा. रामास्वामी एन., जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, उपायुक्त (नागपूर विभाग) प्रकाश देशमाने, उपायुक्त (अमरावती विभाग) दत्तात्रय ठाकरे, सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या विश्वकर्मा जयंतीच्या औचित्याचा उल्लेख करीत उपमुख्यमंत्री म्हणाले की, आज इंडस्ट्री मिटच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचा आनंद आहे. कौशल्य विकासाला पाठबळ देण्याचे शासनाचे धोरण आहे. या धोरणांतर्गत महाराष्ट्रातील पहिले कौशल्य विद्यापीठ पनवेलजवळ सुरू करण्यात आले आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आधुनिकीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रोजगार मेळावे प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येत आहेत. विविध उद्योगांशी संपर्क साधून ‘इंडस्ट्री मिट’च्या माध्यमातून करार करून आवश्यक मनुष्यबळ पुरविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातून अनेक रोजगाराभिमुख उपक्रम विभागामार्फत राबविण्यात येत असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. *****

‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमात जास्तीत जास्त जनसहभाग वाढवा -विभागीय आयुक्त सेवा महिन्यांतर्गत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा व्हावा

नागपूर, दि.18: भारत देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत नागपूर विभागातील ७ हजार ७८ गावांमध्ये येत्या ३० सप्टेंबरपर्यंत ‘अमृत कलश’ तयार करण्यासाठी जास्तीत जास्त जनसहभाग वाढविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आज दिल्या. विभागात सेवा महिन्यांतर्गत विविध सेवांसदर्भात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करुन जनतेपर्यंत शासनाच्या सेवा पुरविण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. श्रीमती बिदरी यांनी आज नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा बैठक घेतली. उपायुक्त (विकास) डॉ.कमलकिशोर फुटाणे, उपायुक्त (प्रशासन) प्रदीप कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत १ ते ३० सप्टेंबर दरम्यान देशातील गावांमधून माती गोळा करुन अमृत कलश तयार करण्यात येत आहेत. नागपूर विभागातील गावांमध्ये या उपक्रमांतर्गत आतापर्यंत तयार झालेल्या अमृत कलशाची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील एकूण ग्रामीण घरांची संख्या, त्यांच्याकडून कलशामध्ये गोळा करण्यात आलेली माती किंवा तांदुळ, जिल्ह्यांतील ग्रामपंचायती आदींची माहिती यावेळी देण्यात आली. आतापर्यंत ४ हजार ४५५ गावांमधून अमृत कलश तालुक्याला पाठविण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. उर्वरित गावांमध्ये लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘अमृत कलश’ तयार करण्याच्या उपक्रमात जनसहभाग वाढविण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी दिल्या. या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात तालुका स्तरावर १ ते १३ ऑक्टोबर दरम्यान ग्रामपंचायतींकडून गट विकास अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात ‘अमृत कलश’ जमा करुन घेण्यासंदर्भात तसेच तालुक्यातून ‘अमृत कलश’ मुंबई मार्गे दिल्ली येथील मुख्य कार्यक्रमात नेण्यासाठी एका तालुक्यातून दोन युवकांची निवड करण्याचे श्रीमती बिदरी यांनी सांगितले. २२ ते २७ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील सर्व तालुक्यातील कलश घेवून युवक मुंबई येथे गोळा होतील. यानंतर २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमासाठी हे युवक रवाना होतील. १ नाव्हेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातील ‘अमृत कलश’ महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमात अमृत वाटिकेमध्ये वापरण्यात येणार आहेत. राज्यात १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत असलेल्या सेवा महिन्यांतर्गत नागपूर विभागात विविध सेवांसदर्भात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी दिल्या. तसेच या कार्यक्रमांतर्गत नव्याने २५ सेवा देण्याचे ठरविण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन व अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मागील वर्षी सेवा पंधरवाड्यांतर्गत १३ लाख म्हणजेच ९९ टक्के प्रलबिंत प्रकरणांचा निपटारा करण्यात आला होता. 0000000000

Tuesday 12 September 2023

56 हजार प्रकरणांचा तडजोडीने निकाल राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

Ø 143 कोटी रुपयांचे दावे निकाली Ø 23 कुटूंबांचे मनोमिलन, 153 अपघात दाव्यांमध्ये तडजोड, 80 कोटीची कर्जवसूली नागपूर दि. 11 : राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 56 हजार 831 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली आहेत. या प्रकरणांचे एकुण तडजोड मुल्य 143 कोटी रुपये आहे. जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कर्ज वसूली न्यायाधीकरण, सहकार न्यायालय, औद्योगिक व कामगार न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालूका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन 9 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश जे. पी. झपाटे, जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सचिन पाटील यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय लोकअदालतीत 23 घटस्फोट व कौटुंबिक वाद प्रकरणांतील पती-पत्नी यांच्यामध्ये आपसी समझोत्याने मनोमिलन होउन पुन्हा नव्याने सुखाचा संसार सुरू झाला याशिवाय 153 मोटार अपघात दाव्यांमध्ये तडजोड झाल्याने रुपये 9 कोटी 8 लाख नुकसान भरपाई प्राप्त झाली तसेच बॅंक व वित्तीय संस्थाकडील 125 प्रकरणामध्ये तडजोड होउन रुपये 80 कोटी 57 लाखाची कर्ज वसूली झाली. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी दावे, भुसंपादन प्रकरणे, तडजोडीयोग्य फौजदारी प्रकरणे, वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, विद्युत अधिनियमाची प्रकरणे, पराक्रम्य लेख अधिनियम कलम 138 ची प्रकरणे, कामगार वाद, रक्कम वसुली प्रकरणे आणि इतर दाखलपूर्व प्रकरणे समोपचाराने निपटारा करण्यासाठी ठेवण्यात आली होती. यात पक्षकारांची 29 हजार 913 प्रलंबित प्रकरणे व एक लाख 12 हजार 649 दाखलपुर्व अशी एकूण एक लाख 42 हजार 562 प्रकरणे आपसी तडजोडीसाठी हाताळण्याकरीता एकूण 48 पॅनल तयार करण्यात आले होते. पॅनलमध्ये न्यायिक अधिकारी व सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी, वकील व समाजसेवक यांचा समावेश होता. प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.आर.पडवळ, जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम. व्ही देशपांडे, दिवाणी न्यायाधीश डी. बी. म्हालटकर अॅड. सुष्मा नालस्कर, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष रोशन बागडे तसेच जिल्हातील सर्व न्यायिक अधिकारी, अन्य पदाधिकारी व विधीज्ञ, पॅनल सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, विधी स्वयंसेवक तसेच जिल्हा न्यायालयीन कर्मचारी वर्ग, जिल्हा व तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार आदी राष्ट्रीय लोकअदालतच्या आयोजनात सहभागी झाले होते. 000 --

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा जनतेशी संवाद

नागपूर, दि.११: उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी जनतेशी संवाद साधला व निवेदने स्वीकारली. नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघातील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमातील सहभागानंतर श्री.फडणवीस यांना भेटण्यासाठी व आपल्या समस्या मांडण्यासाठी नागपुरच्या विविध भागातील नागरिक आले होते. श्री. फडणवीस यांनी येथील त्यांच्या कार्यालयात नागरिकांची भेट घेतली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांची निवेदने स्वीकारली. विविध सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या श्री. फडणवीस यांच्याकडे मांडल्या. उपमुख्यमंत्र्यांनी या सर्वांची निवेदने स्वीकारत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ०००००

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उच्च न्यायालयातील बार असोसिएशनच्या नवीन सभाकक्षाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उच्च न्यायालयातील बार असोसिएशनच्या नवीन सभाकक्षाचे भूमिपूजन सभाकक्षात गुणात्मक व सुसज्ज सुविधा
नागपूर दि. 11 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील हायकोर्ट बार आसोसिएशच्या सुमारे आठ हजार चौरस फुट जागेत बांधण्यात येणाऱ्या बार सभाकक्षाचे आज भूमिपूजन झाले. नागपूर उच्च न्यायालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमास न्यायमुर्ती (प्रशासकीय) अतुल एस. चांदुरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी न्यायमुर्ती अनिल सांबरे, अविनाश घरोटे, अनिल किलोर, मुकालीका जवळकर, उर्मिला जोशी, जी. ए. मेननाजीस, जी.ए. सानप, ए.एल. पानसरे,वृषाली जोशी, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे आदी उपस्थित होते. नागपूर खंडपीठातील विस्तारीत साऊथ विंग येथे बार असोसिएशनच्या सुमारे 8 हजार 227 चौरस फुट टेरेसच्या जागेवर सभाकक्ष बांधण्यात येणार आहे.या बांधकामासाठी 317 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. या कक्षामध्ये 55 कर्मचारी बसण्याची व्यवस्था, माहिती कक्ष, प्रशस्त स्वतंत्र दालने त्यासोबत बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसाठी सार्वत्रिक आसन व्यवस्था राहणार आहे. बार काँसीलच्या सदस्यांना दैनंदिन कामासाठी आवश्यक असलेल्या सुविधा या सभाकक्षात पुरविण्यात येणार आहेत. उमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी हायकोर्ट बार असोसिएशनसाठी बांधण्यात येणाऱ्या सभाकक्षाची माहिती जाणून घेतली. बार काँसीलच्या सभासदांना येथे गुणात्मक व सुसज्ज सुविधा उपलब्ध होतील या दृष्टीने बार काँसीलच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. या कामासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ॲड. अतुल पांडे यांनी श्री. फडणवीस, न्या. अतुल एस. चांदुरकर यांचे शाल व रोपटे देऊन स्वागत केले. भूमिपूजनासाठी बसविण्यात आलेल्या कोनशीलेचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी सिनीयर काँसीलर कुमकुम शिरपूरकर, ए.एच. देशपांडे, सुरेंद्र मिस्त्रा, कप्तान खापरे समर्थ, हायकोर्ट बार असोसिएशनचे सचिव अमोल जलतारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.कुचेवार उपस्थित होते. शासकीय अभियोक्ता कार्यालयास भेट उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील शासकीय अभियोक्ता कार्यालयास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी शासकीय अभियोक्ता ए. एम. देशपांडे यांनी उपमंख्यमंत्र्यांचे स्वागत केले. शासकीय अभियोक्ता कार्यालयाच्यावतीने सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता आनंद फुलझेले, देशाचे उपमहाधिवक्ता नंदेश देशपांडे, बार काँसीलचे पारिजात पांडे, तसेच सहायक शासकीय अभियोक्ता यावेळी उपस्थित होते. 00000

Friday 8 September 2023

पथविक्रेत्यांच्या आत्मनिर्भरतेसाठी 50 हजार पर्यंतच्या कर्ज योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने करा विभागीय आयुक्तांच्या नगरपालिकांना सूचना

नागपूर दि. 7 : कोविड काळात टाळेबंदीमुळे पथविक्रेत्यांची बाधीत झालेली उपजीविका पुन्हा सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत पथ विक्रेत्यांना १० हजार ते ५० हजार रुपये पर्यंतच्या कर्ज पुरवठा योजनेची अंमलबजावणी प्राधान्याने करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. नगरपरिषद प्रशासनाचे विभागीय सहआयुक्त मनोजकुमार शहा, सहायक आयुक्त संघमित्रा ढोके तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे विभागातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींचे अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (नागरी) अंमलबजावणीत गती आणण्याचे तसेच नवनिर्मित नगरपंचायतींमध्ये सर्व शासकीय योजना पूर्ण क्षमतेने राबविण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी यावेळी दिले. पी.एम. स्व-निधी योजना, प्रधानमंत्री गती शक्ती योजना, प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), अमृत -2 अभियान, इंटेग्रेटेड वेब बेस्ड पोर्टल, स्वच्छ भारत अभियान आदी योजनांचा आढावा श्रीमती बिदरी यांनी घेतला व योजनेंतर्गत दिलेले उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पी.एम.स्वनिधी योजनेंतर्गत www.pmsvanidhi.mohua.gov.in या संकेत स्थळाच्या माध्यमातून प्राप्त अर्जानुसार प्रथम टप्प्यात देय होणारे रुपये १० हजार कर्ज विभागातील ५२ हजार ८५८ पथविक्रेत्यांना, दुसऱ्या टप्प्यातील २० हजाराचे कर्ज १२ हजार २५७ पथविक्रेत्यांना व तीसऱ्या टप्प्यात देय होणारे ५० हजार रुपयांचे कर्ज १२६३ पथविक्रेत्यांना वितरीत करण्यात आल्याची माहिती मनोजकुमार शाह यांनी बैठकीत दिली. बैठकीला नगरपालिका प्रशासन विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते. 00000

१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट आयटी कंपनीत नोकरी Ø महाराष्ट्र शासन व एचसीएल कंपनीमध्ये सामंजस्य करार

Ø विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी नागपूर, दि. 8 : बारावीचे शिक्षण पूर्ण करून आयटी कंपनीत आंतरवासिता(इंटर्नशिप) करण्याची व कायम नोकरीची संधी महाराष्ट्र समग्र शिक्षा कार्यक्रमाद्वारे एचसीएल कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे मिळाली आहे. बारावीनंतर आयटी कंपनीतील कामाच्या अनुभवासोबतच आवडत्या विषयात पदवी व उच्च शिक्षण पूर्ण होत आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया आज मिहान येथील एचसीएल कंपनीमध्ये रुजू झालेल्या विद्यार्थ्यांनी दिली. 'अर्ली करीअर प्रोग्राम'द्वारे हक्काची नोकरीही मिळाली आणि शिक्षणही पूर्ण होत असल्याचे समाधान व आनंद आहे.अन्य विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेत जीवनाचा मार्ग प्रशस्त करावा,अशा भावना आज या विद्यार्थ्यांनी ‘प्रिंसिपल मिट’ कार्यक्रमात शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांसमोर व्यक्त केल्या. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि एचसीएल टेक कंपनीने शिक्षक दिनाच्या औचित्याने ‘प्रिंसिपल मिट’ कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात उपस्थित जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक शिक्षण) रवींद्र काटोलकर आणि एचसीलएलचे सहायक महाव्यवस्थापक साजेश कुमार यांच्यासह नागपूर शहरातील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसमोर विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले. महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या सहभागी विद्यार्थ्यांनी १०वी आणि १२वीचे शिक्षण घेत असताना योग्य नियोजनकरून अर्ली करीअर प्रोग्रामद्वारे आयटी कंपनीत सुरू असलेली नोकरी व शिक्षणाच्या प्रवासाची माहिती दिली. या प्रवासात उद्योग क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार सुत्रबद्धपणे होणारी तयारी, नोकरीच्या प्रत्यक्ष अनुभवातून अर्जित केलेले ज्ञान व आत्मविश्वास अशा विविध बाबी या विद्यार्थ्यांनी अधोरेखित केल्या. शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांनी विचारलेले प्रश्न व शंकांचे या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व समर्पकरित्या दिलेले उत्तरही विशेष ठरले. तत्पूर्वी, साजेश कुमार यांनी आपल्या उद्बोधनात या कार्यक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्यास उद्योग क्षेत्राला चांगले मनुष्यबळ मिळेल आणि कंपनीतील कौशल्य अर्जीत केल्याने नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य शिक्षणाचा उद्देशही पूर्ण होणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या. रवींद्र काटोलकर म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील 1100 शाळा आणि 500 कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपर्यंत 'अर्ली करीअर प्रोग्राम' विषयी माहिती पोचवू. दर महिन्याच्या २५ तारखेला मुख्याध्यापकांसोबत होणाऱ्या संवाद कार्यक्रमांतर्गत येत्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 'अर्ली करीअर प्रोग्राम' अंतर्गत विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे माहिती पोचविणाऱ्या नागपुरातील तीन प्रमुख शाळांना यावेळी गौरविण्यात आले. अन्य शाळांचाही यावेळी सन्मान करण्याल आला. Ø असा आहे 'अर्ली करीअर प्रोग्राम' Ø विद्यार्थ्यांना १० हजार रुपये महिन्याचा भत्ता माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या ‘एचसीएल टेक’ कंपनीशी महाराष्ट्र समग्र शिक्षा मार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. याअंतर्गत राज्य शासनातर्फे ‘महाराष्ट्र यंग लीडर ॲस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम' राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत २० हजार विद्यार्थ्यांना सशुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत बारावी गणित विषय असणाऱ्या इच्छुक व २०२४ मध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ,प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ६ महिने सशुल्क प्रशिक्षण व ६ महिने लाईव्ह प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळणार आहे. या ६ महिन्यांच्या आंतरवासिता कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना १० हजार रुपये प्रशिक्षण भत्ता मिळत आहे. तर एका वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आयटी प्रोफेशनल म्हणून कायम नोकरी, तसेच पगार व सोबतच उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे बिटस् पिलानी, शास्त्रा, ॲमिटी, आयआयएम-नागपूर व केएल अशा नामवंत विद्यापीठांमधून उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधीही मिळत आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च काही प्रमाणात एचसीएल कंपनी स्कॉलरशीप स्वरूपात देत आहे. 0000

विभागीय लोकशाही दिन सोमवारी

नागपूर, दि.8: प्रत्येक‍ महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी होणारा लोकशाही दिन सोमवार 11 सप्टेंबर 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. विभागाशी संबंधित असलेल्या प्रलंबित तक्रारीचा निपटरा तसेच जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, टोकनची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराची प्रतीसह विभागीय लोकशाही दिनास माहितीसह उपस्थित राहावे, असे उपायुक्त (सामान्य) प्रदीप कुलकर्णी यांनी प्रसिद्धी प्रकाव्दारे कळविले आहे. 000000

Wednesday 6 September 2023

गणेशोस्तव शांततेत, उत्साहात साजरा करा प्रशासनाचे जनतेला आवाहन

 पोलीस ,स्थानिक प्रशासनाची गणेशमंडळासोबत बैठक  गणेश मंडळांना ऑनलाईन परवानग्या  मनपाकडून मूर्ती स्वीकार केंद्र
 पर्यावरणपूरक गणेशोत्सव आयोजनाला प्रोत्साहन  उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत सहभागाचे आवाहन नागपूर, दि.६ : पर्यावरणपूरक,शिस्तीत व उत्साहात गणेशोस्तव साजरा करण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून जनतेने यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आज पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले. महापालिकेकडून गणेश मंडळांना प्रथमच ऑनलाईन परवानगी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच, विसर्जनस्थळी मूर्ती स्वीकार केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूर शहर व जिल्ह्यामध्ये यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्यादृष्टीने पोलीस आयुक्तालय, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने संयुक्तरित्या येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात गणेशमंडळ आणि स्वयंसेवी संस्थांची बैठक आयोजित केली. यावेळी ही माहिती देण्यात आली व सूचना करण्यात आल्या. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांच्यासह पोलीस, मनपा व जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती अमितेश कुमार यांनी दिली. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सवा दरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण न होता कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी सहकार्याचे आवाहनही त्यांनी केले. गणेश मंडळांनी वर्गणीसाठी नागरिकांना जबरदस्ती करु नये, पावसाची स्थिती पाहता गणेश मंडळांनी शॉर्ट सर्कीट होणार नाही याची दक्षता घ्यावी, सीसीटिव्ही लावावेत,आपत्तीजनक देखावे उभारु नये आदी सूचना त्यांनी दिल्या. ‘गणेश विसर्जन’ आणि ‘ईद’ उत्सव हे 28 सप्टेंबर रोजी साजरे होणार आहेत, हे लक्षात घेता सामाजिक सौहार्द राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सव काळात ध्वनीक्षेपक वापरण्यासंदर्भातील सूचना तसेच विसर्जनासाठी शहरात उभारण्यात आलेले कृत्रिम तलाव, मार्ग याविषयीही त्यांनी सविस्तर माहिती अमितेश कुमार यांनी दिली. शहरात पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती डॉ. अभि्जित चौधरी यांनी दिली. मातीच्या व पर्यावरणपूरक गणेशमुर्त्यांची स्थापना व्हावी तसेच विसर्जनासाठी होणारी गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी मनपातर्फे झोनस्तरावर मूर्ती स्वीकार केंद्र उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या केंद्रांवर गणेश मुर्त्यांचे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. गणेश मूर्ती स्थापना व विसर्जन मिरवणुकीप्रसंगी नागरिकांनी स्वयं शिस्त पाळण्याचे आवाहनही श्री. चौधरी यांनी केले. महानगरपालिकेने प्रथमच गणेश मंडळांना आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी व या कार्यपध्दतीत सुसूत्रता आणण्याकरिता ऑनलाईन परवनगी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याबाबत आचल गोयल यांनी सादरीकरण केले व सविस्तर माहिती दिली. यापूर्वी एक खिडकी योजनेद्वारे गणेश मंडळांना परवानगी देण्यात येत असे. मनपाने पोर्टलद्वारे ऑनलाईन परवानगी सुविधा उपलब्ध करुन दिल्याने 48 तासात संबंधीत विभागांकडून नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त होऊन अंतिम परवानगी देण्यात येणार आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती गोयल यांनी केले. गणेश मंडळांना मनपातर्फे आकारण्यात येणारे विविध शुल्क माफ करण्यात आले असून सफाई व प्रवेशद्वार शुल्कच मंडळांना द्यावे लागणार असल्याची माहितीही श्रीमती गोयल यांनी दिली. राज्यात देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ पुरस्काराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत त्यानुसार जिल्ह्यातही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ विपीन इटनकर यांनी दिली. राज्यातून पहिल्या तीन पुरस्कारांमध्ये नागपूर जिल्ह्यातील गणेश मंडळ पुरस्कार पटकावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यस्तरावर या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या गणेश मंडळाला रुपये 5 लाख, द्वितीय क्रमांकास 2.5 लाख आणि तृतिय क्रमांकास 1 लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा व राज्य स्तरावर निवड समिती नेमण्यात येणार आहे. जिल्ह्यातून एकूण 41 उत्कृष्ट गणेश मंडळांची निवड करुन त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच शासन निर्णय निर्गमित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेतील सहभागासह गणेश मंडळांनी पुढील वर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता निवडणूक प्रक्रिया व जनतेच्या सहभागाबाबत जनजागृती करणारे देखावे उभारण्याचे आवाहनही डॉ. इटनकर यांनी केले. यावेळी उपस्थित गणेश मंडळ व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी अडचणी मांडल्या व प्रशासनातर्फे त्याचे निराकरण करण्यात आले. मनपा उपायुक्त सुरेश बगळे यांनी प्रास्ताविक केले तर जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले. 000

Tuesday 5 September 2023

शेवटच्या माणसापर्यंत लाभ पोहोचवून त्यांचे जीवन सुखकर करू - देवेंद्र फडणवीस

 उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासन आपल्यादारी कार्यक्रमात लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप  नागपुरात २० लाखांपर्यंत लाभार्थ्यांचे ध्येय गाठा नागपूर, दि.५ : 'शासन आपल्या दारी' अभियानाद्वारे शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोचवून त्याचे जीवन सुखकर करण्याचे शासनाचे ध्येय आहे. या अभि यानांतर्गत नागपुरात जनसामान्यांना लाभ देण्याचे चांगले कार्य सुरू असून प्रशासनाने लवकरच २० लाख लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचविण्याचे उद्दिष्ट गाठावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. येथील मॉडेल मिल चौकातील गाडीखाना क्रीडा मैदानावर मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आमदार विकास कुंभारे यांनी 'शासन आपल्यादारी' अभियानांतर्गत आयोजित केलेल्या शिबिरात श्री. फडणवीस बोलत होते. आमदार सर्वश्री प्रवीण दटके, मोहन मते, कृष्णा खोपडे, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते. श्री. फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील जनतेला सरकारी योजनांचे लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राज्यात या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत दीड कोटी जनतेला लाभ देण्यात आला आहे. नागपुरात या कार्यक्रमांतर्गत विविध शिबिरांचे आयोजन करून आजपर्यंत ७ लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणेने गतीने कार्य करीत या कार्यक्रमांतर्गत २० लाख लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याचे ध्येयपूर्ण करण्याचे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले. लोकशाहीत शासन हे जनतेला जबाबदार असते आणि त्याच दिशेने राज्यशासन कार्य करीत असून विविध जनकल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहेत. जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच जनतेला ५ लाखा पर्यंतचे लाभ देण्यात येत आहेत.नागपुरातील दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयात उच्च व गुणात्मक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत,असेही त्यांनी सांगितले. श्री. फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.मध्य नागपूर विधानसभा मतदासंघात ४ सप्टेंबर पासून 'शासन आपल्यादारी' अभियानांतर्गत आयोजित शिबिरातून जनतेला रेशन कार्ड, चष्मे वितरण, भूमी पट्टे वितरण असे विविध लाभ देण्यात येत असून ही समाधानाची बाब असल्याचे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या. 00000

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी साधला जनतेशी संवाद

नागपूर, दि.५: उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी जनतेशी संवाद साधला व विविध निवेदने स्वीकारली. शासन आपल्या दारी कार्यक्रमातील सहभागानंतर श्री. फडणवीस यांना भेटण्यासाठी व आपल्या समस्या मांडण्यासाठी नागपुरच्या विविध भागातील नागरिकांनी देवगिरी बंगल्यावर एकच गर्दी केली होती. श्री. फडणवीस यांनी येथील सभागृहात नागरिकांची भेट घेतली ,त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांची निवेदने स्वीकारली. वेगवेगळ्या सामाजिक संस्था, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी आपल्या विविध मागण्या श्री. फडणवीस यांच्याकडे मांडल्या. उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाचे निवेदन स्वीकारत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी साधला जनतेशी संवाद

नागपूर, दि.५: उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी जनतेशी संवाद साधला व विविध निवेदने स्वीकारली. शासन आपल्या दारी कार्यक्रमातील सहभागानंतर श्री. फडणवीस यांना भेटण्यासाठी व आपल्या समस्या मांडण्यासाठी नागपुरच्या विविध भागातील नागरिकांनी देवगिरी बंगल्यावर एकच गर्दी केली होती. श्री. फडणवीस यांनी येथील सभागृहात नागरिकांची भेट घेतली ,त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांची निवेदने स्वीकारली. वेगवेगळ्या सामाजिक संस्था, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी आपल्या विविध मागण्या श्री. फडणवीस यांच्याकडे मांडल्या. उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाचे निवेदन स्वीकारत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

Monday 4 September 2023

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावे - सुधीर मुनगंटीवार Ø जलसंपदा, जलसंधारण व मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावे - सुधीर मुनगंटीवार  जलसंपदा, जलसंधारण व मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा नागपूर दि. 1 : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या विविध सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंचन विभागाला दिल्या. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील जलसंपदा, जलसंधारण व मत्स्यव्यवसाय विभागांच्या प्रश्नांबाबत येथील हरीसिंग नाईक सभागृहात आयोजित बैठकीत श्री मुनगंटीवार बोलत होते. अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, मृदू व जलसंधारणचे अधीक्षक अभियंता नितीन दुसाने, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे बैठकीला उपस्थित होते. वनबाधित सिंचन प्रकल्पात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सिंचन व वनविभागाने विशेष बैठक घेवून वेगाने पूर्ण होऊ शकणाऱ्या निवडक प्रकल्पाची यादी तयार करावी व त्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर करावा. वन कायद्यामुळे 1983 पासून प्रलंबित असलेल्या ताडोबा वनक्षेत्रातील हुमान नदी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीनुसार झालेला बदल लक्षात घेता या सिंचन प्रकल्पामुळे वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्गात खरोखरच अडचण येते का, यासंबंधीची तपासणी करण्यासाठी अभ्यास समिती नेमण्याबाबत शासनाकडे शिफारस करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागपूर विभागात नवीन सिंचन प्रकल्पांना मान्यता मिळण्यासाठी सिंचन अनुशेष तपासणीतील माजी मालगुजारी (मामा) तलाव यादीतून वगळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे अवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मृदा व जलसंधारण विभागाचा आढावा घेताना चंद्रपूर जिल्ह्यातील 1678 पैकी 1100 मामा तलाव व गडचिरोली जिल्ह्यातील 1603 पैकी 475 मामा तलावांच्या दुरुस्ती कार्यक्रम राबवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. दृष्काळसदृष परिस्थिती टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनसाठी राखीव जिल्हा नियोजनचा पाच टक्के निधी मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी वापरण्याचे त्यांनी सांगितले. तलाव दुरूस्ती व बंधारे बांधकामात उच्च गुणवत्ता राखण्याचे निर्देशही त्यांनी दिले. चंद्रपूर जिल्हा मत्स्यव्यवसायाठी मॉडेल जिल्हा म्हणून विकसित करावयाचा आहे. यासंबंधात विशेष बैठक घेण्याचे त्यांनी सांगितले. मृद जलसंधारण महामंडळांतर्गत दोन्ही जिल्ह्यातील सुरू असलेले व प्रस्तावित कामांचा त्यांनी आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात 151 योजनांच्या कामांमधून 11 हजार 658 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार असून गडचिरोली जिल्ह्यात 156 कामांतून सहा हजार 726 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, अशी माहिती नितीन दुसाने यांनी सादर केली. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बांधकामाधिन दिंडोरा बॅरेज, बेंडारा मध्यम प्रकल्प, हल्दी पुरानी, डोंगरगाव, कोटगल बॅरेज, तळोधी मोकासा, चिंचडोह बॅरेज, कोटगल उपसा सिंचन तसेच वनबाधीत प्रकल्पांतर्गत हुमन, तुलतुली ,चेन्ना नदी,कारवाफा, उमीनाला, डुरकानगुड्रा पुलखल आदी प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला. बैठकीला वन, जलसंपदा, जलसंधारण व मत्स्यव्यवसाय विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते. 0000

Friday 1 September 2023

सुधारित ऑफिसर्स क्लबच्या नुतनीकरणासाठी सल्लागाराची नेमणुक

नागपूर,दि.1 : ऑफिसर्स क्लब येथील विविध विकास कामांसोबतच क्रिडा संबंधित नुतनीकरण व दुरुस्ती करण्यासाठी डिझाइन व बांधकामासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंटची नेमणुक करण्यात येणार आहे. शासकीय तसेच निमशासकीय संस्थांमध्ये नोंदणीकृत प्रोजक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट यांनी दिनांक 11 सप्टेंबर पर्यंत कार्यालयीन वेळात दरपत्रक सादर करावे, असे आवाहन पुर्नवसन उपायुक्त तथा ऑफिसर्स क्लबचे सचिव प्रदीप कुळकर्णी यांनी केले आहे. 000000