Thursday 27 February 2020

अभिव्यक्तीसाठी मातृभाषा प्रभावी माध्यम - शैलजा वाघ-दांदळे

          *शासकीय ग्रंथालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

नागपूर, दि. 27 :  भारतासारख्या बहुभाषिक देशात एकापेक्षा अधिक भाषा सहज बोलल्या जातात. यामुळे आपल्या भाषेविषयी कुठलाही न्यूनगंड न बाळगता दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा जास्तीत-जास्त वापर करावा. निर्विवादपणे अभिव्यक्तीसाठी मातृभाषा प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती शैलजा वाघ-दांदळे यांनी केले. 
   विभागीय  शासकीय ग्रंथालय येथे आज मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला वरिष्ठ ग्रंथपाल श्रीमती वि. मु. डांगे, जिल्हा माहिती अधिकारी (विशेष कार्य) अनिल गडेकर, श्रीमती अपर्णा डांगोरे- यावलकर तसेच शासकीय ग्रंथालयातील अधिकारी, कर्मचारी वाचक उपस्थित होते.
   व्यावहारिक यशाशी इंग्रजीचे नाते जोडले गेले आहे, त्याचा परिणाम जाणवत असला तरी आपण आपल्याच भाषेला कमी लेखून न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही, असे सांगून श्रीमती वाघ म्हणाल्या की, माणूस  मातृभाषा सहज आत्मसात करतो आणि त्याच्या विचाराची तीच भाषा असते, हे लक्षात घेता शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतले जाणे गरजेचे आहे.  वाचनाने भाषा आणि अभिव्यक्ती सोपी होते, हे लक्षात घ्यावे. भाषा हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे. कुठलीही भाषा ही श्रेष्ठ -कनिष्ठ नसते. प्रत्येक प्रदेशात भाषेमध्ये बदल दिसून येतो. मातृभाषेला समृद्ध करण्यासाठी  सर्वसामान्यांनी  प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
श्री. गडेकर म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या  संवर्धनासाठी  मराठी भाषाप्रेमी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहे. आपली भाषा आपला स्वाभीमान आहे. म्हणून प्रत्येकाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी स्वत:पासून सुरुवात करण्याचा संकल्प मराठी दिनी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.   
 प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्रीमती वि. मु. डांगे म्हणाल्या, प्रत्येक बारा कोसावर मराठी भाषेमध्ये बदल झालेला दिसतो. आपल्या मातृभाषेचा सन्मान होणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सतत कार्यरत राहिले पाहिजे. यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 
यावेळी कुसुमाग्रजांच्या निवडक पुस्तकांचे वाचकांसाठी ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. वाचकांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी  तांत्रिक सहाय्यक रं. वा. शेंडे, श्रीमती शोभा मासुरकर, कनिष्ठ लिपिक तुषार राखडे, संतोष वाघाडे, श्री. गणवीर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
*****  

प्रकल्प बाधितांसाठी गाऱ्हाणी निराकरण समिती गठीत

नागपूर, दिनांक 27 : पुनर्वसन अधिनियम कायद्यानुसार अधिसूचित झालेल्या प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या व्यक्तींना पर्यायी  जमीन व रहिवासी प्रयोजनार्थ पुनर्वसित गावठाणामध्ये ‘भूखंड’ यासंदर्भात केलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गाऱ्हाणी निराकरण समिती गठित करण्यात आली आहे.
या समितीची बैठक प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणार आहे. त्यानुषंगाने माहे मार्च 2020 या महिन्याची पहिली बैठक येत्या सोमवारी दिनांक 2 मार्च रोजी  सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
संबधितांनी आपले अर्ज किंवा तक्रार आवश्यक कागदपत्रासह 3 प्रतीमध्ये उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), नागपूर यांच्या कार्यालयात सादर करावी. पर्यायी  जमीन व रहिवासी प्रयोजनार्थ पुनर्वसित गावठाणामध्ये ‘भूखंड’ या संदर्भातीलच अर्ज किंवा तक्रारी समितीसमोर स्वीकारल्या जातील याची संबंधित अर्जदार किंवा तक्रारकर्त्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांनी केले आहे.
*****

सुटीच्या दिवशी होणार वाहन परवाना परीक्षा

नागपूर, दिनांक 27 :प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर येथे 29 फेब्रुवारी रोजी सुटीच्या दिवशीही पक्के वाहन परवान्यासाठी तपासणी परीक्षा घेण्यात येणार आहे. असे परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. पक्के परवान्यासाठी  29 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन अर्जाद्वारे ज्यांनी अपॉइंटमेन्ट घेतली आहे. ते आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या वेळेवर कार्यालयात उपस्थित राहावे.
तसेच दिनांक 29 फेब्रुवारी (शनिवार) रोजी शिकाऊ अनुज्ञप्तीबाबतचा संदेश अर्जदाराने अर्ज करतेवेळी जो मोबाईल क्रमांक नमूद केला आहे, त्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झाला असेल. तरी अर्जदारांनी सुधारित प्राप्त झालेल्या संदेशानुसार अपॉइंटमेंट तारखेची नोंद घ्यावी व कागरपत्रासह त्या तारखेस कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) यांनी केले आहे.

कृषी विभागाचे बोधचिन्ह करण्यासाठी जाहीर आवाहन

नागपूर, दिनांक 27 : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यानुषंगाने सध्या वापरण्यात येत असलेल्या प्रचलित बोधचिन्ह (लोगो)बदल करण्याचे प्रस्तावित असल्याचे कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
यासाठी सध्या प्रचलित असलेल्या लोगोमध्ये सुधारणा करुन डी. टी. पी. डिझाईन चे सॉफ्ट व हार्ड (रंगीत) कॉपी कृषी माहिती विभाग, कृषी भवन, 2 रा मजला, शिवाजीनगर, पुणे-5 येथे प्रत्यक्ष व  ddinfor@gmail.com या ई-मेलद्वारे दिनांक 25 मार्च 2020 पर्यंत सादर करावी
उत्कृष्ट लोगो तयार करणाऱ्या व्यक्ती, संस्था, फर्म्स यांना 1 लाख रुपये पारितोषिक  देऊत विजेता घोषित करण्यात येईल. परंतु सदर लोगो वापरण्याचे स्वामित्व हक्क केवळ कृषी विभागाकडे राहील, याची नोंद संबंधित व्यक्ती, संस्था, फर्म्स यांनी घ्यावी, असे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषी आयुक्तालय,  पुणे यांनी कळविले आहे.
अधिक माहितीसाठी कृषी उपसंचालक (माहिती), कृषी भवन, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे-5 दूरध्वनी क्रमांक 020-25537865 भ्रमणध्वनी क्रमांक  9823356865 यावर संपर्क साधावा, असेही कृषी विभागकडून कळविण्यात आले आहे.
*****

निवृत्ती वेतनधारकांचे वेतन 6 मार्चपर्यंत होणार


नागपूर, दिनांक 27 : आयकर पात्र निवृत्तीवेतन धारकांचे आयकर कपातीचे काम तसेच संगणक प्रणालित काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे माहे फेब्रुवारी 2020 चे निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन दिनांक 6 मार्चपर्यंत संबंधित बँकेमार्फत होईल. याची सर्व निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी प्रकाश आकरे यांनी केले आहे.
****

दैनंदिन व्यवहारात मराठीला प्राधान्य द्या - डॉ. विभावरी डांगे

विभागीय माहिती केंद्रात मराठी भाषा गौरव दिन साजरा

नागपूर, दि. 27 प्रत्येक मराठी माणसाने दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करताना मराठी आणि इतर भाषेतील अलंकार समजून घेतले पाहिजेत. मराठी भाषेला काळानुरुप इतर भाषांनी समृद्ध केले असले तरीही दैनंदिन व्यवहरात मराठी भाषेला प्राधान्य देण्याचे आवाहन विभागीय ग्रंथालयाच्या वरिष्ठ ग्रंथपाल डॉ. विभावरी डांगे यांनी केले.
       मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विभागीय माहिती केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला सहाय्यक संचालक शैलजा वाघ-दांदळेजिल्हा माहिती अधिकारी विशेष कार्य अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-यांनी अवांतर वाचन केले पाहिजे. त्यामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. देशावर परदेशी आक्रमणे झाली. परिणामी मराठी भाषेवर इतर भाषांचा प्रभाव पडला. ती समृद्ध झाली. मात्र इंग्रजी भाषेमुळे अनेकांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाले असले तरीही मातृभाषेचा जास्तीत जास्त वापर करावा. इंग्रजी भाषेचा वापर वाढल्यामुळे मराठी भाषा महानगरापेक्षा सध्या ग्रामीण भागात मराठी जास्त वापरली जातेअसे डॉ. डांगे म्हणाल्या.
       विविध शब्दांचे महत्त्व त्यांचे अर्थही त्यांनी उदाहरणांच्या माध्यमातून सांगताना संपन्न मराठी भाषेच्या शब्दश्रीमंतीवर भाष्य केले. तसेच मराठी माणसाने मराठीशिवाय इतर भाषेचा अट्टाहास करु नये. समाजात मराठी भाषा ही एकमेकांचे सुख- दु;ख वाटून घेण्याचे काम करते. प्रमाण भाषा ही  व्यवहारातील असली तरीही मराठीला प्राधान्य देण्यास त्यांनी सांगितले.    
       मराठी भाषा दिन साजरा करण्यामागची कुसुमाग्रजांची भूमिका समजावून सांगताना सहाय्यक संचालक  श्रीमती शैलजा वाघ- दांदळे यांनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर कमी होत असल्याची खंत व्यक्त केली. सद्य:स्थितीत मराठीत विविध भाषेचे शब्द वापरतो हा भाषिक मोठेपणा आहे. भाषा भगिनी असतात. त्या सोबत असल्याने भाषेचा अभिमान असणे स्वाभाविक आहे. कारण भाषा ही केवळ भाषा नसून एक संस्कृती असते. एक संस्कार असतो. कोणतीही भाषा ही इतर भाषेचा दुस्वास करत नाही. सद्य:स्थितीत समाजमाध्यमांवर व्यक्त होत असताना इंग्रजी भाषेचा वापर जास्त होत असल्यामुळे मातृभाषा व्यवस्थित बोलता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
       मराठी भाषा बोलताना ती स्वच्छसरळ आणि स्पष्ट बोलता आली पाहिजे. साहित्याचे नऊ रस भाषेमध्ये आहेत. सतत वाचल्यामुळे माणूस समृद्ध बनतो. त्यामुळे मराठी भाषेचा व्यवहारात वापर वाढायला हवाअसे सांगून त्यांनी कसं सांगू मुला’ ही कविता सादर केली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविलेला आहे. प्रत्येकाला मातृभाषेचा अभिमान असायला हवा. दैनंदिन व्यवहारात इंग्रजी भाषेचा वापर कामापुरता व्हावा. मात्रबोलताना मराठी भाषेतच संवाद साधा.  मराठी बोलण्यातून आत्मियता वाढते. कुटुंबही बोलीभाषेत एकसंघ ठेवता येते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी तर मराठीतून अवांतर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून मराठी भाषेचा आग्रह धरण्याचा सल्ला दिला.
       विभागीय माहिती केंद्राच्या अभ्यासिकेमध्ये येणा-या दक्षता आडसेनवनीत कुर्वेमिनाक्षी बागडेतेजस्विनी बोबडेमाहिती सहायक अपर्णा यावलकरमाहिती केंद्रातील कविता फाले यांनी  काव्यवाचन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषा दिनानिमित्त प्रतिज्ञा वाचन करण्यात आले. प्रास्ताविक कविता फाले यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा यावलकर यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजि कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
****** 

Wednesday 26 February 2020

रस्ता सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी - डॉ. विकास महात्मे

                                                         
  रस्ते सुरक्षा समितीची बैठक संपन्न

नागपूर, दिनांक 26 : वाढत्या अपघातांची संख्या व भीषणता पाहता अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये  वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी रस्ता  सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन खासदार तथा जिल्ह्यातील रस्ते सुरक्षेसंदर्भात गठीत कामकाज समीतीचे  उपाध्यक्ष डॉ. विकास महात्मे यांनी आज केले.
छत्रपती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे रस्ते सुरक्षा समितीची आढावा बैठक श्री. महात्मे याच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
            सदस्य सचिव जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे तसेच रस्ता सुरक्षा संदर्भात काम करणा-या सामाजिक संस्थाचे प्रतिनीधी  अशोक करंदीकर, चंद्रशेखर मोहिते यावेळी उपस्थित होते.
दरवर्षी  देशभरात 5 लाख अपघात होवून यात सरासरी दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. 3 लाख लोक या अपघातात  गंभीर जखमी होतात.  यामुळे  जवळपास 2 टक्के जीडीपीचे नुकसान होते. यामध्ये  18 ते 35 वयोगटातील 62 टक्के तरुण  मुलांचे प्रमाण आहे.  ही चिंताजनक बाब असल्याचे वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी  जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळ म्हणजेच ब्लॅक स्पॉटची पाहणी करून जिल्हा रस्ता सुरक्षा समीतीने तात्काळ अहवाल देण्याचे निर्देश श्री. महात्मे  यांनी यावेळी दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने  जास्तीत जास्त सजग राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपले कर्तव्य पार पाडावे. यात ब्लॅक स्पॉट, खड्डे दुरुस्ती, रस्ते तयार करणे, साईनबोर्ड व माहितीचे बोर्ड तयार करणे, दुभाजकाचे व रंगरंगोटीचे काम करणे, वाहतूक साधनांची दुरुस्ती करणे, झेब्रा क्रॉसिंग, प्रवासी मार्गदर्शक बोर्ड लावणे, रस्ता दुरुस्तीच्या ठिकाणी सावधानतेचा इशारा व  उपाययोजना राबविल्यास रस्ते अपघाताचे प्रमाण फारच कमी होईल. वाहतूक पोलिसांनी  पार्किंग व्यवस्थेवर काटेकोरपणे लक्ष दिल्यास बरेच अपघात होणे टाळता  येईल. महामार्ग पोलीस विभागाने ब्लॅक स्पॉटची पाहणी करून तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाययोजना करव्यात. जिल्ह्यात अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मदत करणाऱ्या जीवनरक्षकांची संख्या वाढवावी अशी सूचनाही श्री. महात्मे यांनी केली.
यावेळी  जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी  नागपुरातील रस्ते सुरक्षासंदर्भातील कृतींची सविस्तर माहिती दिली. अपघातांतील जखमींचा जीव वाचविणे व त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिली. तसेच अपघातग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून वाहतूक पोलिसांना प्रथमोचाराचे प्रशिक्षण द्यावे, असेही ते यावेळी म्हणाले.
****

Monday 24 February 2020

सातबारा फेरफार ऑनलाईन प्रक्रिया ग्रामीण तहसील कार्यालयाशी संलग्नित - रवींद्र ठाकरे


       नागपूर, दि. 24 :  जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरील भूमी अभिलेख कार्यालयांची सात बाराचे ऑन लाईन फेरफार बनविण्याची प्रक्रिया सुरु असूनती सर्व तहसील कार्यालयांशी संलग्नित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी  दिली.
जिल्ह्यातील  नागपूर  ग्रामीणहिंगणारामटेकमौदाभिवापूरपारशिवनीकुहीकाटोलनरखेडकळमेश्वरउमरेडसावनेर आणि कामठी या सर्व ग्रामीण तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांची लिंक फेरफार करण्यासाठी संबंधित तहसील कार्यालयाशी जोडण्यात आलेली आहे.  या सर्व क्षेत्रातील सात बारा उता-यांवरील ऑनलाईन फेरफारचे कामकाज सुरळीत सुरु आहे. मात्र ही ऑनलाईन प्रक्रिया नागपूर महानगर क्षेत्रासाठी नसल्याचेही त्यांनी सांगितले.
                                                                                                     *******  

कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास प्रारंभ


* कान्होलीबारा व धापेवाडा येथून पथदर्शी योजनेचा शुभारंभ

       नागपूर, दि. 24 :  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा व कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथून आधार प्रमाणीकरण योजनेचा शुभारंभ जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांच्या हस्ते करण्यात आला.
            जिल्ह्यातील 50 हजार 232 पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर कान्होलीबारा व धापेवाडा येथील अनुक्रमे 212 व 77 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध झाली. ही यादी संबंधित बँक व ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. दोन्ही गावातील शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम सुरळीतपणे सुरु आहे. यावेळी हिंगण्याचे सहाय्यक निबंधक चैतन्य नासरे तर धापेवाडा येथे जिल्हा मध्यवती सहकार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नाईक उपस्थित होते.
            यावेळी गजानन काशिनाथ सायम, रमेश कृष्णाजी लाड, हनुमान माणिक बुधवाडे, रामाजी वऱ्हाडे या शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेच्या जलद अंमलबजावणीसाठी समाधान व्यक्त केले.
            शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याच्या दृष्टीने महात्मा  जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु करण्यात आली. या योजनेनुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठित कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम दोन लाखांपेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास दोन लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. याचा लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे ही कर्जमुक्ती देताना शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात घेतले जाणार नाही याचाच अर्थ अल्पभूधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहेच शिवाय जे शेतकरी अल्पभूधारक नाहीत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
            कान्होलीबारा व धापेवाडा येथील 289 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणीकरण सुरळितपणे सुरु आहे. या याद्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याची त्रुटीपूर्तता केली जाईल, असे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी सांगितले.
*******  

Sunday 23 February 2020

वाकी वार्षिक उर्सोत्सवात भाविकांना सोयी-सुविधा द्याव्यात - सुनिल केदार




        नागपूर दि.23 : सर्व धर्म समभावाची शिकवण देणारे वाकी येथील धार्मिक स्थान श्री ताजुद्दीन बाबा दर्गा येथील वार्षिक उर्सोत्सवानिमित्त येणा-या भाविकांना सर्व सोयी-सुविधा देण्याचे निर्देश पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी आज दिले. 
            सावनेर तालुक्यातील श्री क्षेत्र वाकी येथ 77 वा वार्षिक उर्स येत्या 3 ते 9 मार्च 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. उर्सनिमित्त राज्यभरातील सर्व धर्मीय भाविक वाकी येथे येतात. येथे हिंदु आणि मुस्लीम या दोन्ही धर्मांचे धार्मिक विधी संपन्न होतात. उर्स काळात कीर्तन,भजन, गोपालकाला यासह कुराण पठाणही करण्यात येते. या कालावधीत भाविकांना पुरविण्यात येणा-या सोयी-सुविधांचा श्री. केदार यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री बाबा दर्गा वाकी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर डाहाके, सचिव ज्ञानेश्वर डाहाके, विश्वस्त मधुकर टेकाडे, सावनेर मंडळ अधिकारी होमेश्वर पवार, उप कार्यकारी अभियंता गजानन डाबळे आदी उपस्थित होते.
            श्री ताजुद्दीन बाबा दर्गा येथील वार्षिक‍ उर्ससाठी दरवर्षी राज्यभरातून 5 ते 6 लाख भाविक येतात. या भाविकांनी सर्व सोयी-सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाने समन्वय ठेवून काम करावे. आरोग्य विभागाने पाटणसावंगी येथील 108 नंबरची रुग्णवाहीका वाकी येथे सुसज्ज ठेवावी. उर्जा विभागाने पथ दिवे नादुरस्त असल्यास तात्काळ दुरुस्त करुन घ्यावेत. उर्स दरम्यान अखंडित वीज पुरवठा करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली. भाविकांना शुध्द पिण्याचे पाणी, प्रथमोपचार, फिरते प्रसाधन गृह यांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच या परिसरात  चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत श्री. केदार यांनी संबंधितांना निर्देश दिले.
            मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत  वाकी -डोहणघाट -वाकोडी या रस्त्याचे तसेच कवठा ते हत्तीसरा येथील डांबरी रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची सूचना श्री. केदार यांनी सबंधितांना दिली. सिव्हील लाईन्स येथील ताजुद्दीन बाबा मिठा नीम दर्गा येथे भाविकांसाठी प्रसाद म्हणून मोठया प्रमाणावर रस्त्यावरच अन्न शिजविण्यात येते. यामुळे  वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.  या दृष्टीने वाहतूक  अन्न व औषधे प्रशासनाने लक्ष पुरवावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
ग्रामपंचायत रुई येथील जलकुंभाचे लोकार्पण
       मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत  ग्रामपंचायत रुई येथील 30 हजार लीटर क्षमता असणा-या जलकुंभाचे  लोकार्पण श्री. केदार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, रुई ग्रामपंचायतच्या सरपंच मंगला गाडबैल, उपसरपंच नम्रता भगत आदी मान्यवर उपस्थित होते. जलकुंभाच्या बांधकामाला 37 लाख रुपये निधी खर्च झाला असून यामुळे ग्रामपंचायत रुई येथील ग्रामस्थांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

******


Saturday 22 February 2020

जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा - अनिल देशमुख

        नागपूर, दि.22 :  काटोल-नरखेड तालुक्यात सिंचनासोबतच पिण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहेत. यासोबतच कार प्रकल्पाची ऊंची वाढविण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांसोबत आढावा बैठक आयोजित करण्यात येईलअसे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
            काटोल आणि नरखेड परिसरात पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनासाठी वापरण्यात येणा-या पाण्याचा अभाव असल्यामुळे शेतीवर पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. शेतीला सिंचनाच्या सुविधा मिळाल्यास या भागातील शेतीत संत्र्यांसोबत विविध पिकांचे उत्पादन घेता येणे शेतक-यांना सुलभ होणार आहे. यासाठी हा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्यात येणार आहे. श्री. देशमुख यांनी सिंचन व पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांची  रविभवन येथे आज आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले.  
      जिल्हा परिषद सदस्य सलिल देशमुख  यांच्यासह जि. प. सदस्यपाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता बानाबाकोडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
      काटोल- नरखेड तालुक्यातील विविध सिंचन प्रकल्पांचा आढावा घेताना पाणी उपलब्धतेनुसार त्या-त्या भागातील तलाव बांधकामांची मंजुरी मिळविण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना श्री. देशमुख यांनी दिल्या. नरखेड व सावरगाव परिसरातील गावांच्या पिण्याचे पाणी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी कन्हान नदीवरील कोच्छी धरणातून पाणी आणावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर करुन घेता येईल. सिंचन प्रकल्पांच्या निधी उपलब्ध करुन देण्याबाबत अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी अधिवेशनादरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठकही घेण्यात येईलअसे श्री. देशमुख यांनी सांगितले.
      हिंगणखेडा प्रकल्पाची उंची वाढविणेजाम प्रकल्पाचे पाणी पेठमिर्झापूरपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे कालव्यात वाढलेली झुडपे तोडून होणारी पाणीगळती थांबवित पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचविण्याच्या सूचना केल्या. तसेच बोर सिंचन प्रकल्पमदार नदीवर बांधण्यात येणा-या चार बंधाऱ्यांच्या कामांचा आढावा घेताना निधीची अडचण असल्यास तसे प्रस्ताव तयार करा. याकामी  जिल्हा परिषद सदस्य आणि पाटबंधारे व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून कामे मार्गी लावण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले.
      यावेळी कार उपसा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास सात गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. चिखलीजामथडी पवनी प्रकल्पखरपडी प्रकल्पांच्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच वर्धा नदीवरील देवळी बंधा-याचे अर्धवट झालेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी सिंचन व पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांनी अमरावती जिल्ह्याच्या अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करण्याबाबत सांगितले.
******

Thursday 20 February 2020

शेतीला सहाय्यभूत ठरतील अशा कामांना ‘मग्रारोहयो’मध्ये प्राधान्य द्या - रोहयो मंत्री संदिपान भुमरे






·         नागपूर अमरावती विभागाचा जिल्हानिहाय आढावा

                                  ·         फळबाग योजनेचे लाभार्थी वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश

       नागपूर, दि. 20 :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गंत शेतीला सहाय्यभूत ठरतील अशा कामांना प्राधान्य देतानाच अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज दिलेत.
            मग्रारोहयो योजनेमध्ये निधी उपलब्ध असून सिंचन विहिरी फळबाग योजना आदी विकास कामांना प्राधान्य द्या. असेही श्री. भामरे यांनी यावेळी सांगितले.
        नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय  येथे  नागपूर व  अमरावती विभागाचा ‘मग्रा रोहयो’चा आढावा श्री. भुमरे यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  नरेगा आयुक्त ए. एस. आर. नायक, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरेमुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादवभुवनेश्वरी एस.सचिन ओम्बासे, उपायुक्त मनषा जायभायेअतिरिक्त कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे तसेच अमरावती विभागातील संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

        जिल्ह्यात असलेली कुशल व अकुशल मजुरांची संख्या, मनरेगाचा आर्थिक प्रगती अहवाल, आर्थिक वर्ष 2017-18 व त्यापूर्वीच अपूर्ण कामे, कामाची सद्यस्थिती, अपूर्ण कामाची वर्गवारी, फळबाग लावगड, सिंचन विहीर, रस्ते, पालकमंत्री पाणंद रस्ते, वृक्ष लावगड व रोपवाटीका,  आर्थिक वर्षनिहाय अपूर्ण कामे ग्रामपंचायत, वनीकरण, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग आणि इतर विभागांतर्गंत रोजगार हमी योजनेतून सुरु असलेली कामे यांचा रोहयोमंत्री श्री. भुमरे यांनी आढावा घेतला.
            जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची अपूर्ण माहिती आणल्यामुळे श्री. भुमरे यांनी नाराजी व्यक्त करताना जिल्हानिहाय बैठकांवेळी परिपूर्ण माहिती सोबत आणावी. रोहयो अंतर्गत विभागातील सुरु असलेली कामे, खर्च होणारा निधी, येणा-या अडचणी, आदी  बाबींबाबत समन्वय ठेवून ही कामे अधिक वेगाने पूर्ण करण्याची सूचना करताना ते पुढे म्हणाले की,  पालकमंत्री पांदण, शेत रस्ते जलसंधारणातंर्गंत नाला खोलीकरण व सरळीकरणातून रस्ते निर्मिती व जलसंधारण अशी दुहेरी कामे करण्याबाबत यावेळी सूचना केल्या.
  ‘मग्रारोहयो’ सुरु असलेल्या कामांवर पुरुष मजुरांच्या तुलनेत महिला कमी असून, त्यांची संख्या वाढवावी.  पांडुरंग फुंडकर फळबाग योजना, रस्ते आणि वृक्षलागवड तसेच रोपवाटीकांच्या कामांची पूर्ण होण्यातील टक्केवारी कमी दिसत असून, ती वाढविण्यावर लक्ष द्यावे. सिंचन विहिरींबाबत कामांचा आढावा घेऊन कार्यविवरण अहवालानुसार ती कामे हाती  घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
विदर्भातील विविध जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांमधील जेसीबी आणि पोकलँड आदी यंत्रसामुग्री वापराबाबतच्या दरपत्रकात तफावत असून ते निश्चित करावेत. त्यासाठी स्थानिक यंत्रसामुग्री असण्याचा अट्टाहास न धरता वेळेत कामे पूर्ण करण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच नाविण्यपूर्ण कामांमध्ये वर्धा जिल्ह्यात 14 ग्रामपंचायतीमध्ये ऑक्सिजन पार्क उभारणी तसेच  चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात अभिसरणांतर्गंत केलेल्या कामांबाबत  त्यांनी समाधान व्यक्त केले.
           यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्याचा गेल्या तीन वर्षात 15 कोटी तर गतवर्षी 12 कोटीचा निधी खर्च झाला असून, यंदा फक्त दीड कोटी रुपये खर्च झाल्याबाबत नाराजी व्यक्त केली.  यापुढे कारणे न देता कामाला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. आर्णी व केळापूर तालुक्यातील 2013-14 पासून झालेल्या कामांची चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
           पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये कृषी विभागाने पांढरकवडा, झरी जामणी, मोरगाव, घाटंजी, नेर या तालुक्यांमध्ये कामे थांबविली असून, फळबाग वाढीकडे लक्ष देत ते सुरु करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील भूसंपादनाचा निधी असल्यामुळे तो प्रश्न तात्काळ मार्गी लावावा. विदर्भात कामे चांगली सुरु असली तरी काही भागातील कामांची गती वाढवून ती वेगाने पूर्ण करण्याबाबत निर्देशही श्री. भुमरे यांनी सांगितले.
        पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील सिंचन विहिरींबाबत आढावा घेताना कुपनलिका असलेले लाभार्थी मिळत नसल्यास ते बदलून योजना प्रभावीपणे राबवाव्यात. पूर्ण झालेल्या सिंचन विहिरींचे जिओ टॅगींग करावे. तसेच जलसंधारणातून नाला खोलीकरण व सरळीकरण करताना बी. जे. एस. आदी एनजीओंची मदत घ्यावी. त्यातून शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणावर करावीत. रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी तुती लागवड क्षेत्र वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना यावेळी अधिका-यांना केल्या.
******