Friday 22 October 2021

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील








 

·         हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

·         सहा महिला पोलीस विश्रांती कक्षांचे उद्घाटन

·         पोलीस नूतनीकरण निवासस्थानांचे लोकार्पण

 

      नागपूरदि. 22 राज्यातील पोलीस दलाच्या सक्षमीकरणासोबतच बदलत्या काळातील गुन्ह्यांचे स्वरुप लक्षात घेऊन गुन्हे अन्वेषणाकरिता आधुनिक तंत्रज्ञान व साधनांचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहेत. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी पदभरती करण्यात येत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सांगितले. नागपूर येथील वनामती सभागृहात आयोजित पोलीस विभागाच्या विविध इमारतींच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

 पालकमंत्री डॉ. नितीन राऊतआमदार अभिजित वंजारीपोलीस आयुक्त अमितेश कुमारसहपोलीस आयुक्त अश्वती दोरजेअपर पोलीस आयुक्त सुनील फुलारीनवीनचंद्र रेड्डी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

राज्यातील पोलीस दल कर्तव्यदक्ष आणि चाणाक्ष असून, कोविड काळात पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विपरीत परिस्थितीतही कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लवकरच राज्यात पोलिसांसाठी एक लाख निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. याकरिता यंदा अर्थसंकल्पात 700 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये भविष्यात आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईलअसे गृहमंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले. तसेच राज्य शासनाने महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही घेतला आहे. सोबतच मनुष्यबळ वाढविण्यासाठी बारा हजार पोलिसांची भरती करण्यात येत आहे. सध्या पाच हजार 200 पदांची भरती प्रक्रिया सुरु असून उर्वरित पदभरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस दलात रुजू झालेला शिपाई हा नंतर पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त होईलयाबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासोबतच पोलिसांचे प्रश्नप्रशासकीय बाबी सोडविण्यासाठीपोलिसांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहेअसे गृहमंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले. नागपुरात पोलिसांची वाहनेमहिला पोलिसांच्या विश्रांती कक्षांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्मार्ट पोलिसिंगवर भर देण्यात येत आहे. गुन्हेगाराला कठोर शासन व्हावेगुणवत्तापूर्ण तपास करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करावे, असे त्यांनी सांगितले.

युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जावू नयेयासाठी पोलीस विभागाने योग्य पावले उचलावीत. नक्षलवाददहशतवाद्यांविरोधात करण्यात येणाऱ्या कारवाईप्रमाणेच याविरोधात सुद्धा कठोर भूमिका घ्यावी, अशा सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या. तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा विधेयक नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशात मंजूर करून घेण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड काळात पोलिसांनी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजाविले. पोलिसांना चांगला निवारा मिळावायासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निवासस्थानाबाबतच्या कामांना प्राधान्य दिले. महिला पोलिसांसाठी विश्रांती कक्ष स्थापन करण्यात आलेही चांगली बाब आहे. पोलिसांच्या जुन्या निवासस्थानांचे नूतनीकरण गरजेचे होतेते झाल्याने पोलिसांना चांगली घरे उपलब्ध झाली असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

नागपूर पोलिसांना दुचाकीसीसीटीव्हीआठ पोलीस ठाण्यात महिला पोलिसांसाठी विश्रांती कक्ष यासह आवश्क साधनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलीस दलाचे बळकटीकरण करण्यासाठी यापुढेही निधी दिला जाईलअसे पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले. शहराचा झपाट्याने विकास होत असून लगतची कामठीबुटीबोरीवाडी आणि हिंगणा ही शहरेही आता वाढत आहेत. त्यामुळे ग्रामीण पोलिसांच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रास्ताविकात उद्घाटन होत असलेल्या इमारतींविषयी माहिती दिली. 

महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळामार्फत लाल व हुडको बिल्डींग येथील नूतनीकरण केलेली 288 निवासस्थानेहुडकेश्वर पोलीस ठाणे इमारतगिट्टी खदान पोलीस ठाण्यातील महिला पोलीस विश्रांती कक्षांचे कोनशीला अनावरण व उद्घाटन गृहमंत्री श्री. वळसे पाटीलपालकमंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते झाले. तसेच वनामती सभागृहातून दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी अंबाझरीसोनेगावअजनीयशोधरानगरगणेशपेठ पोलीस ठाण्यातील महिला पोलीस विश्रांती कक्षहिंगणा पोलीस ठाणे अंतर्गत कान्होलीबारागुमगाव (वागधरा) येथील पोलीस चौकी व पोलीस अंमलदार निवासस्थानांचे उद्घाटन केले.

महिला पोलीस विश्रांती कक्ष, नूतनीकरण करण्यात आलेली निवासस्थाने यांची चावी प्रातिनिधिक स्वरुपात संबंधित पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. नूतनीकरण करण्यात आलेली निवासस्थानेविश्रांती कक्ष आणि पोलीस ठाणे इमारतींची बांधकामे केलेल्या अभियंत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये धनंजय चामलवारजनार्धन भानुसेदिलीप देवडे आणि हेमंत पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांनी मानले.

दोष सिध्दीचे प्रमाण वाढेल अशा रितीने गुन्ह्यांचा तपास करा - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील





नागपूर व गडचिरोली परिक्षेत्राचा गृहमंत्र्यांकडून आढावा

नागपूर दि. 22 : एकदा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांचे काम संपणार नाही. यापुढे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रमाण हे गुन्हा सिद्धतेवरून ठरेल. त्यामुळे दोष सिध्दीचे प्रमाण वाढेल अशा रितीने गुन्ह्यांचा तपास करा, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज येथे दिले. नागपूर येथे पोलिस मुख्यालयात नागपूर व गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला.

             पोलिसांनी गुन्हे दाखल करताना घटनेचा सांगोपांग विचार करून दोष सिद्धीचे अंतिम लक्ष डोक्यात ठेवावे. एकदा गुन्हा दाखल झाला तर कायद्याच्या कचाट्यातून आपण सुटणार नाही, अशी भीती गुन्हे करणाऱ्यांना वाटली पाहिजे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवण्याची हिंमत कोणी करू नये, महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यशैलीबद्दल भ्रम निर्माण करणाऱ्यांना पारदर्शी कारभाराने, व्यापक जनसंपर्काने उत्तर द्या, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांची गय करू नका, असे स्पष्ट निर्देश आज त्यांनी या बैठकीत दिले.

            या बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, दोन्ही परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस उपअधीक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

            आजच्या बैठकीमध्ये गृहमंत्र्यांनी पुढच्या दोन महिन्यात विभागातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासंदर्भातील दृष्टिपथात पडेल असे कार्य पुढे आले पाहिजे, असे स्पष्ट केले. बलात्कार आणि लुटमार या संदर्भातील घटनाक्रम गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आहे. छोट्या-मोठ्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही संख्या वाढ झाली आहे का ? याचा विचार करण्याची ही योग्य वेळ असून अवैध दारू व व्यसनाधीनता अशा या गुन्ह्यांच्या उगम स्थळांना वेळीच ठेचून काढा, स्थानिक लोकप्रतिनिधी, माध्यमे यांच्याकडे आपला पारदर्शी कारभार मांडा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

            समाजातील माफिया कोणत्याही स्तरातील असतील, दारू माफिया, वाळू माफिया, मोका केसेस लागलेले घटक यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्या हालचालीची नोंद ठेवा. या विभागात प्रत्येक जिल्ह्याचा गुन्हेगारी दर घटला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ठरवले तर जिल्ह्यामधील गुन्हे कमी होऊ शकतात. ठाणेदाराने ठरवले तर ठाण्याच्या परिसरात गुन्हे घडू शकत नाही. मात्र तरीही गुन्हे का घडत आहे याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. शाळा कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात मादक पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढत आहे ही बाब धोकादायक आहे. नव्या पिढीला विश्वासात घेण्याची गरज आहे. पोलिसांची आदरयुक्त भीती निर्माण होण्यासाठी तुम्ही केलेल्या चांगल्या कामाला पुढे आणा, असेही त्यांनी आवाहन यावेळी केले.

            तत्पूर्वी त्यांनी प्रथम नागपूर परिक्षेत्रातील गुन्ह्याची नोंद, दोष सिद्धता, प्रतिबंधात्मक कारवाई, मोक्का व अन्य गुन्ह्यांच्या संदर्भातील कार्यवाही, मादक पदार्थ सेवन संदर्भातील घटना, अवैध धंदे, पोलिसांची घरे, वाहनांची उपलब्धता, पदांची कमतरता, पोलिसांमार्फत सुरू असलेल्या सामाजिक कार्य याबाबतचा आढावा घेतला. यावेळी जिल्हानिहाय गुन्हे आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावाही घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांसंदर्भातील गुन्हे, वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी संदर्भातील गुन्हे याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले. गडचिरोली परीक्षेत्राचा विशेष आढावा घेताना, या भागातील पोलिसांच्या सुविधा संदर्भात सातत्याने मुंबईला पाठपुरावा करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निर्देशित केले. दर दोन महिन्यात गडचिरोली परिक्षेत्राचे संदर्भात मागणी आणि पूर्तता या बाबतचा आढावा घेतला गेला पाहिजे, असे त्यांनी सुचविले. वाहनांसाठी जिल्हा नियोजनमध्ये प्रस्ताव दाखल करण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील काही सामाजिक प्रश्नांना गंभीरतेने ऐकून घेत धोरणात्मक निर्णय घेऊ असा सूतोवाच केला. कोणत्याच परिस्थितीत या जिल्ह्यातील युवक नक्षल चळवळीकडे वळता कामा नये. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास शासन तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी आश्वस्त केले.

 

 

एक महिला ठाणे निर्माण करा

महिला संदर्भातील वाढते गुन्हे, घटना, यातील दोष सिध्दी याचा अपप्रचारच अधिक असतो. यामध्ये पोलिसांची भूमिकेबाबत योग्य संदेश जावा, या गुन्ह्यांकडे शासन बारकाईने बघत आहे, ही वस्तूस्थिती जावी, त्यांच्या मनात पोलिसांबद्दलची भीती जाऊन त्याबद्दल आदर निर्माण व्हावा, यासाठी संपूर्णतः महिलांनी चालविलेले एक पोलीस ठाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

गुन्ह्याला वाचा फोडण्यासाठी, गुन्हेगाराला हमखास शिक्षेसाठी फास्टट्रॅक डीएनए युनिट उपयुक्त ठरेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे





         ·         निर्भया योजनेंतर्गत नव्या तीन फास्टट्रॅक प्रयोगशाळेचे उद्घाटन

         ·         नागपूरमध्ये वन्यजीवांच्या पहिल्या प्रयोगशाळेची सुरुवात

 

            नागपूर दि. 22 : महाराष्ट्र पोलीस दलाची जागतिक पोलीस दल म्हणून ख्याती आहे. नागपुरात आज उद्घाटन झालेल्या फास्टट्रॅक डीएनए युनिट व वन्यजीव डिएनए विश्लेषण विभागामुळे कायद्याला बळकटी आणण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध करणेगुन्ह्याला वाचा फोडणे व गुन्हेगाराला कडक शासन करणे या प्रक्रियेला गती मिळणार आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

            नागपूर येथे गृह विभागामार्फत रहाटे कॉलनीस्थित प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये देशातील वन्यजीवांच्या पहिल्या तर मानवी डिएनएच्या राज्यातील नव्या प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने केले. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊतपशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील केदारगृह विभागाच्या न्यायिक व तांत्रिक शाखेचे महासंचालक संदीप बिश्नोईप्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोग शाळेच्या संचालक संगीता घुमटकरउपसंचालक डॉ. विजय ठाकरे नागपूर येथे उपस्थित होते. या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवारपर्यटन मंत्री आदित्य ठाकरेगृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटीलगृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाईउपस्थित होते.  

            यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये भारतातील वन्यजीवांच्या पहिल्या तर निर्भया योजनेतंर्गत मानवी डिएनएच्या एकत्रित तीन प्रयोगशाळेचे उद्घाटन करताना गृह खात्याच्या कामकाजाला बळकटी देत असल्याचा आनंद आहेअसे स्पष्ट केले. श्री.ठाकरे म्हणालेमहिला व बालके यांच्या संदर्भातील गुन्ह्यांचा तपास जलदगतीने करताना अडचण येते. या प्रयोगशाळेमुळे तपासाला गती येणार आहे. वन्यजीवांच्या हत्येप्रकरणी तस्करी रोखतानाअशा तस्करांवर कारवाई करताना आता ही प्रयोगशाळा उपयुक्त ठरणार आहे.

            आपले तंत्रज्ञान हे गुन्हेगारांच्या पुढे असले पाहिजे. त्यामुळे जगातील बदल लक्षात घेऊन आज मुंबईनागपूरपुणे येथील फास्टट्रॅक प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन केले जात आहे. महाराष्ट्राचे पोलीसमुंबई पोलीस यांचा संपूर्ण देशात दरारा आहे. तपासामध्ये या नव्या प्रयोगशाळेचा निश्चितच लाभ होईलअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही संबोधित केले. राज्यात लवकरच महिलांच्या संरक्षणासाठी शक्ती कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात संमत होईलगृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. ते म्हणालेमहिला व मुलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी शक्ती कायदा तयार करण्यात आला आहे. हा कायदा लवकरच संमत केला जाईल. या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यासाठी फास्टट्रॅक डीएनए युनिटची मोठी भूमिका राहणार आहेअसेही त्यांनी सांगितले.

            निसर्गातील समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे आवश्यक आहे. वाघासह इतर लहान-मोठ्या प्राण्यांची शिकार केली जाते. यामुळे निसर्गातील समतोलावर विपरित परिणाम होत आहे. हे टाळण्यासाठी व या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी वन्यजीव डीएनए विश्लेषण विभाग मोलाची भूमिका बजावणार असल्याचे श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले.

            ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या प्रयोगशाळेमुळे तपास यंत्रणेच्या नव्या पर्वाला सुरूवात होत असल्याचा आनंद व्यक्त केला. मंत्री डॉ. राऊत म्हणालेया युनिटमुळे पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करण्यास लागणारा कालावधी कमी होणार आहे. एवढेच नव्हे तर तपासामध्ये अधिक अचुकता येणार आहे. महिलांची सुरक्षितता ही शासनाची प्राथमिकता आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करून कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

            या युनिटमध्ये वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागही सुरू होणार आहे. राज्यातील सर्वाधिक जंगल विदर्भात आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या कामात हे युनिट मोठी भूमिका बजावणार आहे, असेही ते म्हणाले.

            डीएनए विश्लेषण विभाग सुरू झाल्याने नागपुरातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिक अद्ययावत झाली आहेअसे पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

            श्री. केदार म्हणालेजे बघता येत नाहीजे दिसत नाहीते सर्व येथे पुरावा म्हणून पुढे येते. फास्टट्रॅक डीएनए युनिट व वन्य डीएनए विश्लेषण विभागामुळे पोलिस व वनविभागाच्या तपास यंत्रणेला नक्कीच लाभ होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी संचालक संगिता घुमटकरसंचलन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. विजय ठाकरे यांनी केले.

Monday 18 October 2021

नागपूर अधिवेशनाच्या तयारीसाठी विशेष कोविड प्रतिबंधात्मक नियोजन


 
विधिमंडळातील उच्चस्तरीय बैठकीत चर्चा

             नागपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधिमंडळाचे यंदाचे तिसरे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सात डिसेंबरपासून  प्रस्तावित आहे. याबाबतच्या तयारीचे नियोजन करण्यासाठी आज सर्व संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात येणार आहे.

नागपूर येथे विधानभवनातील मंत्रीपरिषद दालनात प्रधान सचिव श्री.भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा,  जिल्हाधिकारी विमला आर , नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांसह विविध संबंधित विभागांचे प्रमुख  उपस्थित होते.

महाराष्ट्र विधान परिषद सभापतींचे सचिव म. मु. काज, उपसचिव राजेश तारवी,अवर सचिव रविंद्र जगदाळे, महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अनिल महाजन, 

विधानभवनाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी तथा व सचिव सुनील झोरे, विधान भवनाच्या वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, विधिमंडळाचे पध्दती विश्लेषक अजय सर्वणकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.

मुंबई येथे पुढील आठवड्यात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यादृष्टीने आजच्या बैठकीत अनुषंगिक तयारीसाठी सर्व विभागांनी केलेल्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यात आला.  यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.  त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक करण्यात आले आहे. याशिवाय दोन्ही डोस घेतल्यानंतरही या  अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असेल.

विधिमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण सूचना श्री. भागवत यांनी आरोग्य विभागाला आज केली. कोरोना पार्श्वभूमीवर मर्यादित प्रवेश राहील. त्यामुळे विधिमंडळ परिसरात  सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्यासाठीची आवश्यक व्यवस्था परिसरात करण्यात यावी. याशिवाय सभागृहामध्ये सोशल डिस्टंसिंग  राखायचे असल्यामुळे सदस्यांना एक आसन सोडून बसण्याची व्यवस्था लक्षात घेता यावेळी अभ्यागतांना कामकाज बघण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही. 

तत्पूर्वी, विधिमंडळ परिसरात सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सर्वप्रथम चर्चा झाली. विधिमंडळ परिसरात नवीन इमारत कार्यान्वित झाली आहे. या  इमारतीसाठी आवश्यक असणारी सुरक्षा व्यवस्था व अनुषंगिक उपाययोजना करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. यासोबतच विधान भवन, विधान भवनाबाहेर परिसर, आमदार निवास, रविभवन, 160 खोल्यांचे गाळे, सुयोग पत्रकार निवास या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतचे निर्देश देण्यात आले. आमदार निवासामध्ये महिला आमदारांसाठी एक मजला राखीव ठेवण्यात यावा व विशेष पोलीस सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, असे निर्देशित करण्यात आले.

अधिवेशन काळात करण्यात आलेल्या वाहन व्यवस्थेबाबत तसेच पार्किंग व्यवस्थेबाबत सूचना करण्यात आल्या. दूरध्वनी व्यवस्था, वाहन व्यवस्था, अखंडित वीज पुरवठा, अहोरात्र वैद्यकीय सुविधा, नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्कालीन व्यवस्था, अग्निशमन दलाची उपलब्धता, विनाअडथळा इंटरनेट, वाय-फाय सुविधा, रेल्वे आरक्षण, खानपान व्यवस्था, अन्नपदार्थ व पेय यांची तपासणी तसेच उत्तम स्वच्छता या संदर्भातही सर्व विभाग प्रमुखांशी चर्चा करण्यात आली.

Sunday 17 October 2021

विदर्भातील बेरोजगारांना कल्पना सरोज यांची कंपनी रोजगारासोबतच प्रगतीचे पंख देईल - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत



· ‘मिहान’मध्ये प्रकल्प उभारताना स्वत:च्या क्षेत्रासाठी काम करण्याचा आनंद- डॉ. कल्पना सरोज
· सुमारे 500 कोटींच्या विमान दुरुस्ती प्रकल्पाचे भुमीपूजन

नागूपर, दि. 17 : टेलरींग काम ते कोट्यवधीच्या उद्योगाचे यशस्वी वहन करणाऱ्या डॉ. कल्पना सरोज यांना बेरोजगारीचे चटके माहित आहे. त्यामुळे विमान इंजन दुरुस्तीच्या त्यांच्या कोट्यवधीच्या प्रकल्पातून विदर्भातील बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळेल. सोबतच प्रतिकूल परिस्थितीत उद्योग, व्यवसायात कसे उभे राहायचे याची प्रेरणाही मिळेल, त्यामुळे कल्पना सरोज ग्लोबल एव्हीऐशन प्रा. लि. प्रकल्पाचे भुमीपूजन करताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.
मिहान येथील परिसरात उभारण्यात येणाऱ्या कल्पना सरोज ग्लोबल एव्हीऐशन प्रकल्पाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रकल्पाच्या संचालिका डॉ. कल्पना सरोज, मिहान सेझचे विकास आयुक्त डॉ. व्ही. श्रमण, कॅप्टन विनय बांबूळे, व्यवस्थापकीय संचालक एम. के. गोरे यांच्यासह विमानचालन क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते.
डॉ. राऊत म्हणाले की, मिहान सेझ हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून याठिकाणी विविध उद्योग, व्यवसायांच्या उभारणीतून विदर्भातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. नवनवीन उद्योग, व्यवसायांच्या उभारणीमुळे प्रदेशाच्या सर्वांगिण विकासात भर पडत आहे. कल्पना सरोज यांच्या एव्हीऐशन प्रकल्प अंतर्गत जेट विमान, हेलीकॉप्टर यांच्या इंजन दुरुस्ती, देखभालसह विविध सुटे भाग उभारणीचे व दुरुस्तीचे आणि पायलट प्रशिक्षण आदी महत्वपूर्ण कामे होईल. एव्हिऐशन प्रकल्प निर्मितीमुळे मिहानमध्ये विमानचालन या क्षेत्रात जिल्हा अग्रेसर होणार असून रोजगाराच्या नवीनतम संधी उपलब्ध होणार आहे. कल्पना सरोज यांचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लाखो-करोडो महिलांसाठी प्रेरणास्त्रोत ठरलेल्या पद्मश्री पुरस्कारविजेत्या विदर्भातील प्रसिद्ध उद्योजिका डॉ. कल्पना सरोज यांना नुकतेच वनराई फाउंडेशनतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले. कल्पना सरोज यांची यशोगाथा ही संघर्षमय व तेवढीच प्रेरणादायी आहे. तरुण उद्योजकांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहनही डॉ. राऊत यांनी यावेळी केले.
श्रीमती सरोज यांनी आपल्या यशप्राप्ती विषयी कथन केले. त्या म्हणाल्या की, महिला उद्योजकांना अडचणींमुळे घाबरून न जाता जिद्दीने सामोरे जाण्याचा सल्ला दिला. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे मेहनत केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे सांगून हिंमतीने आयुष्याला सामोरे जाण्याचे आवाहन त्यांनी महिलांना केले.
डॉ. सरोज म्हणाल्या, एका बंद पडलेल्या कंपनीला न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतले. या कंपनीत साडेतीन हजार कामगार, 140 न्यायालयीन खटले आणि पाच बँकांचे 116 कोटींचे कर्ज, अशा विपरित परिस्थितीत कामगारांच्या मदतीने अवघ्या काही वर्षांत तोट्यातील कंपनीला नफ्यात आणले. यशाचे शिखर गाठायचे असेल तर जिद्द, चिकाटी व समर्पणासोबतच स्वतःवर विश्वास आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
मिहान (मल्टी मोडल आंतरराष्ट्रीय कार्गो हब आणि विमानतळ) येथे विमानचालन या क्षेत्रात एमआरओ (विमानाची दुरुस्ती व देखभाल) उभारताना माझी जडणघडण झालेल्या क्षेत्रामध्ये उद्योग उभारल्या जात असल्याचा आनंद आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील बेरोजगारी न्याय तसेच नव्या क्षेत्रातील संधी उपलब्ध करुन देता येणार आहे. विदर्भामध्ये काम करण्याचा वेगळा आनंद असून आज एका छोटेखानी कार्यक्रमातून आम्ही याची सुरुवात केली आहे. भविष्यातही विदर्भासाठी यापेक्षाही भव्य करण्याची ईच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
विमानचालन क्षेत्रातील दिर्घ अनुभव असणारे कॅप्टन विनय बांबूळे व व्यवस्थापकीय संचालक गोरे यांनी प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली.

Thursday 14 October 2021

दीक्षाभूमीवर स्वयंसुरक्षेसाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करा : पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

 





दीक्षाभूमी परिसराची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसह पाहणी

या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही ; गर्दी टाळण्याचे आवाहन

दीक्षाभूमीसह, कोराडी, कामठी येथील गर्दी नियंत्रित करण्याचे आदेश

 नागपूर दि. 14 : महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळेच यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा टाळण्यात आला होता. तथापि, दोन डोस घेतलेल्या अनुयायांना सध्या दीक्षाभूमीवर दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे. दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांचे स्वागत आहे. मात्र त्यांनी स्वतःच्या जिवीताच्या रक्षणासाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, प्रशासनाला शिस्त राखण्यासाठी मदत करावी, असे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

आज गुरुवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला त्यांनी दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला आहे. मात्र सलग दुसर्‍या वर्षीही हा सोहळा होत नसल्यामुळे अनेक अनुयायी दीक्षाभूमीवर उद्या येण्याची शक्यता आहे. तथापि, कोरोनाच्या सावटात आलेल्या या सोहळ्याला स्वयंसुरक्षेसाठी कोविड प्रोटोकॉल पाळावा, गर्दी टाळावी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना शक्यतो आणू नये, तसेच प्रशासनाला सहकार्य करावे.

तत्पूर्वी त्यांनी दीक्षाभूमी परिसरात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सदस्यांसह प्रशासनातील जेष्ठ अधिकाऱ्यासोबत उद्याच्या आयोजनासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपालिस आयुक्त अस्वती दोरजे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, ट्रस्टी विलास गजघाटे, नामदेव सुके, विशेष पोलिस महानिरीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व पोलीस अधिकारी सहभागी होते.

दीक्षाभूमीवर येणारी जनता ही अतिशय श्रद्धेने याठिकाणी येते. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करतांना द्विस्तरीय पद्धतीने तपासणी आणि चौकशीचे काम महानगरपालिका व पोलीस विभागाने समन्वयाने करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शांत डोक्याने करायचे हे एक टीम वर्क असून सामान्य नागरिकांना कोणतीच अडचण जाणार नाही, तसेच त्यांच्या आरोग्यालाही धोका पोहोचणार नाही याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली .कोविड तपासणी, लसीकरण तसेच दोन डोस घेतलेल्यांची तपासणीबद्दल प्रशासनातील वरिष्ठांचे मत जाणून घेतले. दीक्षाभूमी, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस व कोराडी येथील देवीच्या मंदिरातील सामान्य नागरिकांच्या सोई-सुविधा बाबतची माहिती त्यांनी यावेळी घेतली. तीनही ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे. दर दोन-तीन तासांनी आढावा घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना कोरोना काळात यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन न घेण्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. शासकीय नियमानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी टाळणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे शक्यतो घरीच महामानवाला अभिवादन करण्यात यावे. दीक्षाभूमीवर येताना दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तसेच कोणते तरी ओळख पत्र जवळ बाळगावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, प्रशासनाने कोरोना अधिक  असणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी या ठिकाणी न येण्याचे आवाहन केले आहे. दीक्षाभूमीवर उद्या फक्त दोन- डोस घेतलेल्यांनाच तपासणीअंती प्रवेश दिला जाणार आहे. 65 वर्षावरील ज्येष्ठांना तसेच दहा वर्षाखालील बालकांना दीक्षाभूमी परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. आजारी व्यक्ती, गरोदर महिलांनी न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दीक्षाभूमी परिसरात मुक्काम करता येणार नाही. खाद्यान्न वाटप स्टॉल, मोफत अन्नदान प्रतिबंधित करण्यात आले आहे, या शिवाय या परिसरात पुस्तक,मूर्त्यांचे स्टॉल, लावले जाणार नाही. लक्षणे असणाऱ्यांची तपासणी केली जाणार असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेने कोरोना तपासणी तसेच, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र लावले आहेत. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहे. आज दीक्षाभूमी परिसरात लसीकरण केंद्रावर हजारो नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. नागरिकांनीदेखील शिस्तीत दीक्षाभूमीला भेट दिली. उद्याही याच पद्धतीची अपेक्षा प्रशासनाने केली असून नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tuesday 12 October 2021

राष्ट्रीय एकता आणि अखंडता राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कटीबद्ध रहावे - राज्यपाल कोश्यारी


 सीआरपीएफच्या सायकल रॅलीस गडचिरोलीतून प्रारंभ 

नागपूर, दि.12: देशाबाहेरील तसेच देशातील विविध समाजविघातक प्रवृत्तींचा बीमोड करण्यात आपल्या सुरक्षा दलांनी मोठे योगदान दिले असले तरी राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता राखण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची आहे. यामुळे सर्वसामान्यांनी त्यासाठी निर्धाराने कटीबद्ध राहण्याची गरज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली. त्यांच्या हस्ते आज गडचिरोली येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गडचिरोली- केवडीया सायकल रॅलीस हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गडचिरोली बटालियनकडून आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, सीआरपीएफच्या अतिरिक्त महानिर्देशक (दक्षिण विभाग) रश्मी शुक्ला, पश्चिम विभागाचे महानिर्देशक रणदीप दत्ता आदी उपस्थित होते.

देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या महान प्रयत्नांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करुन  राज्यपाल म्हणाले, वल्लभभाई हे अत्यंत दुरदृष्टीचे नेते होते. त्यांच्या नियोजनामुळे आज देशाला मोठा लाभ झाला आहे. अलिकडच्या काळात त्यांच्या कार्याची महती विशेषत्वाने जाणवू लागली आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सीआरपीएफने आयोजित केलेली ही रॅली देशातील विविध भागातील नागरिकांना एकतेचा संदेश देणारी ठरेल. समाजविघातक प्रवृत्तींमुळे आज समाजाला अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. आपली सुरक्षा दले त्यांचा मुकाबला करण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्नशील आहेत. त्यांचे मनोबल उंचावण्याची जबाबदारी सगळयांचीच आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी त्यांना यथाशक्ती पाठबळ द्यावे. असे आवाहन करुन राज्यपालांनी आपल्या भाषणात सीआरपीएफच्या योगदानाचा विशेष गौरव केला.

पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशाची एकता आणि अखंडता सर्वाधिक महत्त्वाची असून त्यासाठी सर्वानीच निष्ठेने प्रयत्न करावेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध दलातील जवान आज खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यांचे प्रयत्न मोलाचे आहेत. एकता आणि अखंडतेची भावना संवर्धित करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. गडचिरोली परिसरात काही समस्यांच्या निराकरणासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील. विशेषत: रोजगार निर्मितीसह पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही प्रयत्न होणार आहेत. कोविड काळात राज्यात उत्तम समन्वयाने काम झाल्याचेही यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले. सीआरपीएफने बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

'आजादी का अमृत महोत्सव' या उपक्रमांतर्गत सीआरपीएफच्या पुरुष आणि महिला सदस्यांचे पथक आज गडचिरोली येथून गुजरातमधील केवडीया येथे जाण्यासाठी रवाना झाले. या सायकल रॅलीला राज्यपालांनी यात्रेला हिरवी झेंडी दाखविली. ही रॅली केवडीया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी म्हणजे 31 ऑक्टोबरला पोहोचणार आहे. 20 दिवसात 925 किलोमीटर अंतर पार करुन रॅलीतील सदस्यांकडून राष्ट्रीय एकतेसाठी संदेश देण्यात येणार आहे. देशाच्या इतर भागातूनही या दलाची पथके केवडीया येथे पोहोचणार आहेत. शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींचा राज्यपालांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला.

    श्रीमती शुक्ला यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सीआरपीएफच्या उपक्रमांची माहिती दिली. सीआरपीएफच्या जवांनाकडून यावेळी विविध देशभक्तिपर गीतांवर नृत्ये आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. स्थानिक कलावंताकडून लोकनृत्ये सादर झाली. उपमहानिरीक्षक मानसरंजन यांनी आभार मानले. या कार्यक्रमास राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार,  नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे, जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक पी.आर. जम्बोलकर आदी यावेळी उपस्थित होते.