Sunday, 12 October 2025

दर महिन्याला रोजगार मेळाव्याद्वारे जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा - महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 


 रोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान 

नागपूर, दि. 12 :  जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री रोजगार मेळाव्याचे आयोजन सुरु आहे. जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी दर महिन्याला हा उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. 

             श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तथा युवा फाउंडेशन व नॅशनल रिअल इस्टेट काउन्सिल (नरेडको) विदर्भच्या वतीने महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथे ‘पालकमंत्री रोजगार मेळावा 2.0’ चे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री. बावनकुळे बोलत होते. कोराडीचे सरपंच नरेंद्र धनोले, माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 

            रोजगार मेळावा आयोजन समितीने यापूर्वी आयोजित केलेल्या पहिल्या रोजगार मेळाव्यात 136 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान केली होती. उपक्रमातील आजचा हा दुसरा मेळावा असून यातही युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी व्यक्त केला. या उपक्रमांतर्गत दर महिन्याला रोजगार मेळावा आयोजित करून जास्तीत-जास्त रोजगार उपलब्ध करून द्यावा व पुढील रोजगार मेळाव्याची तयारी आतापासूनच सुरू करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. मेळाव्यात सहभागी कंपन्याच्या प्रतिनिधींचे आभार मानत यापुढेही तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

            पालकमंत्री रोजगार मेळाव्यासाठी 1 हजार युवक-युवतींनी नोंदणी केली. यातील 500 जणांनी रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊन विविध क्षेत्रातील 16 कंपन्यांसाठी मुलाखती दिल्या. 100 पेक्षा जास्त उमेदवारांना या मेळाव्यात नियुक्तीपत्र देण्यात येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. 

पालकमत्र्यांच्या हस्ते 20 पात्र लाभार्थ्यांना पट्टेवाटप

            या कार्यक्रमातच महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कामठी तालुक्यातील नांदा गावातील 20 पात्र लाभार्थ्यांना पट्टेवाटप करण्यात आले.

 

000000


Tuesday, 7 October 2025

देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्थाच्या ‘ब’ श्रेणीत ‘नागपूर फ्लाईंग क्लब टॉप टेन’ मध्ये

 

 

डिजीसिएचे नामांकन जाहीर 

 

नागपूर, दि.७ :- केंद्र शासनाच्या नागरी विमान महासंचालनालयाच्या (डिजीसिए) तर्फे भारतातील ब श्रेणीतील उत्कृष्ट विमान चालक प्रशिक्षण संस्थांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहे. यात राज्य शासनाच्या नागपूर फ्लाईंग क्लबला ब श्रेणीमध्ये टॉप टेन नामांकन जाहीर करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाईंग क्लबच्या अध्यक्ष श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली. 

नागपूर फ्लाईंग क्लबचे महाराष्ट्र शासनातर्फे संचलन करण्यात येत असून या क्लबकडे चार प्रशिक्षणार्थी विमान आहेत. केंद्र शासनाच्या भारतीय नागरी विमान महासंचालनालयातर्फे उड्डान प्रशिक्षणाकरिता मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नागपूर येथे प्रशिक्षणासाठी पुरेशा वेळ उपलब्ध होत नसल्याने चंद्रपूर येथील मोरवा विमानतळावर दुसरा बेस तयार करण्यात आला आहे. मोरवा विमानतळावरील प्रशिक्षणालाही डिजीसिएची उड्डाण प्रशिक्षणाकरिता मान्यता मिळाली आहे. फ्लाईंग क्लबच्या व्यवस्थापनाची जबाबदारी अपर आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक तेजुसिंग पवार यांच्याकडे आहे. 

भारतातील मान्यता प्राप्त विमान प्रशिक्षण संस्थांमध्ये असलेल्या सुविधा संदर्भात नागरी विमान महासंचालनालयातर्फे नामांकन यादी जाहीर करण्यात येते. दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर  करण्यात आलेल्या नामांकनातील प्रत्यक्ष विमान प्रशिक्षणासंदर्भातील वर्गवारीनुसार ब श्रेणीमध्ये एकूण १३ संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर फ्लाईंग क्लब दहाव्या क्रमांकावर आहे. 

मोरवा विमानतळावर प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व सूविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ पासून ८३५ पेक्षा जास्त तास उड्डाण प्रशिक्षण पूर्ण केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी सेसना-१५२ या श्रेणीतील तीन विमाने तर सेसना-१७२ या श्रेणीतील एक विमान आहे. प्रत्येक प्रशिक्षण तुकडीत ४२ प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा समावेश असून यापैकी वाणिज्य विमान प्रशिक्षणासाठी ३७ तर वैयक्तिक प्रशिक्षणासाठी ५ प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. अल्पावधितच नागपूर उड्डाण क्लबने प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्था पूर्ण केल्यामुळे भारत सरकारच्या नागरी विमान महासंचालनालयातर्फे ब श्रेणीमध्ये समावेश होऊन पहिल्या दहा मध्ये रँकिग मिळविली असल्याचे श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.

    

००००००

 


महर्षी वाल्मिकी यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 

 

        नागपूर, दि.07 :  आदिकवी व रामायण महाकाव्याचे रचेते महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. 

आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार  यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

00000

 

 

 

‘नागपूर ग्रोथ हब किक कार्यशाळा’ आयोजनाबाबत बैठक - विविध पाच गटांमध्ये होणार विचारमंथन ; मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन

 


 

 

नागपूर, दि.७ :- विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये नागपूर व परिसराच्या आर्थिक विकासासाठी  कार्यपद्धती आखण्याच्या दृष्टीने येत्या १२ ऑक्टोबर रोजी नागपूर स्थित भारतीय व्यवस्थापन संस्थेमध्ये (आयआयएम) ‘नागपूर ग्रोथ हब किक कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत  नागरी क्षेत्र विकास, उद्योग, कृषी, वने, खाण या पाच गटांमध्ये तज्ज्ञ मंडळी विचार मांडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समारोप सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. 

राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) चे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे नागपूर ग्रोथ हब किकच्या आयोजनाबाबत आज बैठक झाली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार परिणय फुके आणि सुमित वानखेडे, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीणा, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. 

नागपूर व परिसरातील उपलब्ध स्त्रोतांचा प्रभावी उपयोग करुन विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक थिंक टँक निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. वाढते नागरीकरण व भविष्यातील उद्दिष्टे यांची सांगड घालणे, मिहान परिसरात सुरु असलेले विविध उद्योग तसेच नागपूर व परिसरात विविध उद्योगांची श्रृंखला व त्याची वाढ करणे, या भागातील कृषी व कृषी आधारित उद्योगांच्या विकासासाठी कार्यपद्धती तयार करणे, वने व वन्यजीव क्षेत्रामध्ये रचनात्मक कार्य करुन विकास साधणे, कोळसा व खनिजांनी समृद्ध असलेल्या या भागाचा विकास साधण्यासाठी महत्वाची पावले उचलण्यासंदर्भात तज्ज्ञ मंडळीचे गट स्थापन करण्याबाबत यावेळी सूचना करण्यात आल्या. या कार्यशाळेच्या अनुषंगाने विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. श्रीमती बिदरी, डॉ. विपिन इटनकर आणि डॉ. अभिजित चौधरी यांनी यावेळी विचार मांडले.

  

००००००