नागपूर, दि.७ :- विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये नागपूर व परिसराच्या आर्थिक विकासासाठी कार्यपद्धती आखण्याच्या दृष्टीने येत्या १२ ऑक्टोबर रोजी नागपूर स्थित भारतीय व्यवस्थापन संस्थेमध्ये (आयआयएम) ‘नागपूर ग्रोथ हब किक कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत नागरी क्षेत्र विकास, उद्योग, कृषी, वने, खाण या पाच गटांमध्ये तज्ज्ञ मंडळी विचार मांडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समारोप सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) चे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे नागपूर ग्रोथ हब किकच्या आयोजनाबाबत आज बैठक झाली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार परिणय फुके आणि सुमित वानखेडे, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीणा, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
नागपूर व परिसरातील उपलब्ध स्त्रोतांचा
प्रभावी उपयोग करुन विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक थिंक टँक
निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. वाढते नागरीकरण व भविष्यातील
उद्दिष्टे यांची सांगड घालणे, मिहान परिसरात सुरु असलेले विविध उद्योग तसेच नागपूर
व परिसरात विविध उद्योगांची श्रृंखला व त्याची वाढ करणे, या भागातील कृषी व कृषी आधारित
उद्योगांच्या विकासासाठी कार्यपद्धती तयार करणे, वने व वन्यजीव क्षेत्रामध्ये रचनात्मक
कार्य करुन विकास साधणे, कोळसा व खनिजांनी समृद्ध असलेल्या या भागाचा विकास साधण्यासाठी
महत्वाची पावले उचलण्यासंदर्भात तज्ज्ञ मंडळीचे गट स्थापन करण्याबाबत यावेळी सूचना
करण्यात आल्या. या कार्यशाळेच्या अनुषंगाने विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
श्रीमती बिदरी, डॉ. विपिन इटनकर आणि डॉ. अभिजित चौधरी यांनी यावेळी विचार मांडले.
००००००
No comments:
Post a Comment