Thursday 2 May 2024

समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प घेवूया - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


 








नागपूर, दि. 1 : महाराष्ट्राने देशाच्या विकासात सामाजिक सुधारणांचा भक्कम पाया रोवला आहे. राज्याने औद्योगिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे तसेच विविध क्षेत्रात राज्याने प्रगतीचे मानके साध्य केले आहे. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने आपण सिंहावलोकन करून समृद्ध राज्य घडवण्याचा संकल्प करुया, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

 

येथील कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विशेष पोलीस आयुक्त छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह केंद्र व राज्य सरकारच्या नागपूर स्थित विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी-कर्मचारी  यावेळी उपस्थित होते.

 

राज्याने स्थापनेपासून विविध क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली आहे. विकासाच्या वाटचालीत नागपूर व विदर्भाने नागरी सुविधांवर भर देवून पायाभूत सुविधेच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीने अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल आदी नव्या प्रगतीची नांदी असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

 

श्रमातून नवनवीन सृजन करणाऱ्या कामगारांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत कामगारदिनाच्या शुभेच्छा  दिल्या.

 

तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री  श्री. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलीस बँडपथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताचे सादरीकरण केले. पथसंचलनात सहाभागी होणाऱ्या विविध पथकांचे त्यांनी निरीक्षण केले. परेड कमांडर सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक कोते यांच्या नेतृत्वात राज्य राखीव पोलीस बल, नागपूर शहर व ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस अशा विविध पथकांचे पथसंचलन झाले.

00000

No comments:

Post a Comment