Sunday 11 September 2016

गरिबांची सेवा हाच संत मदर तेरेसाचा संदेश --- मुख्यमंत्री





  • मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदर तेरेसाच्या पुतळ्याचे अनावरण
 
नागपूर दि. 11 :-   गरिबांची सेवा करताना मदर तेरेसांना ईश्वराची अनूभूती झाली. आता त्या जगाच्या आई झाल्या आहेत. त्यांचे कार्य जगाच्या 52 देशात सुरु आहे. समाजातील शेवटच्या घटकाची सेवा हाच संत मदर तेरेसाच्या जीवनाचा संदेश आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
कामठी रोडवरील सेंट फ्रान्सिस डिसेल्ट कॅथेड्रालच्या प्रांगणात मदर तेरेसा यांना संत ही सर्वोच्च पदवी बहाल केल्याबद्दल आयोजित संत समारोहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. याप्रसंगी आर्च बिशप अब्राहाम विरुया कुलंगरा, आमदार सुधाकर देशमुख, प्रकाश गजभिये, माजीमंत्री अनिस अहमद, विविध धर्माचे धर्म गुरु उपस्थित होते.
व्यक्तीचे संस्कार व धर्माचे अनुष्ठान सेवेसाठी आवश्यक आहे. आज जगातील सर्व शक्ती संत मदर तेरेसाला नमन करतात. त्यांचे सेवेचा वसा आपण पुढे चालवावा. गरीब अनाथांची सेवा करावी व त्यांचे कार्य समाजाच्या सर्व थरात पोहचवावे असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
नितीन गडकरी
संत मदर तेरेसा या ममतेच्या सागर होत्या. त्यांचे जीवन रंजल्या गांजल्यासाठी समर्पित होते. जीवनामध्ये ऐहिक सुखापेक्षा गरीबांच्या सेवेला मी जास्त महत्व देतो. मी आमदार असतांना अनेक हृदयरुग्णांना उपचारासाठी मदत केली. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझी कमाई आहे. आतापर्यत अशा 6 हजार रुग्णांवर शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याची संधी मला लाभल्याचे नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले.
जात धर्म पंथ भाषेच्या पलिकडे जाऊन काम करावे. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटल्या प्रमाणे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा या मार्गावर मदर तेरेसा चालल्या आणि त्यांना संतत्व बहाल झाले. सेवेसाठी कुठल्याही देशाच्या सिमा आडव्या येत नाही. त्यांचे कार्य जगभर होते असेही गडकरी म्हणाले.  
प्रास्ताविक भाषण आर्च बिशप अब्राहाम विरुया कुलंगरा यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते मदर तेरेसाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत आर्च बिशप अब्राहाम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पत्रकार जोसेफ राव यांनी करुन दिला. मोमबत्ती पेटवून मदर तेरेसा यांची प्रार्थना करण्यात आली.
संचालन फादर प्रशांत यांनी केले तर आभार सिस्टर कुरिया कोसा यांनी मानले. यावेळी बिशप पॉल दुपारे, रेव्हरंट फादर क्रिस्टोफर, नेल्सन फ्रान्सिंस, फिलिप्स जैसवाल, पिटर घाटगे, गुरुद्वाराचे गुरुग्रंथी मनदीप सिंग, मौलाना पारेख, अर्चना सिंग उपस्थित होत्या.
00000

No comments:

Post a Comment