Tuesday 20 September 2016

स्पर्धा परीक्षेसाठी मोठे ध्येय ठेवा --- श्रावण हर्डिकर




नागपूर दिनांक 20- स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लहान ध्येय न ठेवता असामान्यत्व राखण्यासाठी  कठोर परिश्रम करण्याची गरज नागपूर महानगर पालिका आयुक्त श्री. श्रावण हर्डिकर यांनी आज येथे व्यक्त केली.
माहिती व जनसंपर्क खात्याच्या सिताबर्डी येथील माहिती केंद्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. हर्डिकर बोलत होते.
अध्यक्षस्थानी माहिती संचालक श्री. मोहन राठोड होते, तर  प्रमुख पाहुणे म्हणून मनपाच्या प्रभाग नगरसेविका श्रीमती लता यादव, कौशल्य विकास उपसंचालक सुनिल काळबांडे, जेष्ठ पत्रकार राहुल पांडे, नाथे करिअर अकादमीचे संजय नाथे, जिल्हा माहिती अधिकारी  सर्वश्री अनिल गडेकर, अनिल ठाकरे हे उपस्थित होते.
स्पर्धा आणि परीक्षा या दोहोमधील फरक स्पष्ट करतांना श्रावण हर्डिकर पुढे म्हणाले की, परीक्षा केवळ पास व्हावी लागते, परंतु स्पर्धा ही सगळयांना मागे टाकून जिंकावी लागते. स्पर्धा ही करिअर असल्यामुळे उपलब्ध संधी मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी. अभ्यास करतांना सामुहिकपणे तयारी केल्यास विविध विषयाचे आकलन होण्यास मदत होते. स्पर्धा मीच जिंकेन असा आत्मविश्वास ठेवून पुढे जा असा सल्ला  त्यांनी यावेळी दिला.
स्पर्धा परीक्षासाठी माहिती केंद्रातर्फे निशुल्क अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. काही जादा सुविधा येथे महानगर पालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यामुळे अभ्यासिकेसाठी येथे चांगले वातावरण निर्माण होईल, अशी ग्वाही देखील मनपा आयुक्त यांनी शेवटी दिली.
अध्यक्षीय भाषणात संचालक मोहन राठोड यांनी विभागीय माहिती केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षासाठी विविध सुविधा उपलब्ध करतांनाच संदर्भ ग्रंथालय, विविध विषयावर चर्चासत्रे आदी उपक्रम येथे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. माहिती केंद्राच्या स्थापनेचा हाच हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कौशल्य विकास उपसंचालक सुनिल काळबांडे यांनी शासनाने युवकांमध्ये कौशल्य विकसित करुन प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण देण्याचा उपक्रम  राबविण्यात येत असल्याचे सांगितले .
जेष्ठ पत्रकार राहूल पांडे यांनी विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षाची तयारी करतांना जिद्द, परिश्रम व चिकाटी ठेवली तरच यश निश्चित आहे असे सांगितले. आपण परिश्रम करतांना कुठेही कमी पडणार नाही याची खबरदारी  घ्या असेही त्यांनी आवाहन केले.
माहिती केंद्राच्या दुरुस्तीसाठी धंतोली झोनचे विभागीय अधिकारी जयदेव व अभियंता श्री. सांभारे यांचा आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात आला.
माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी प्रास्ताविकामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिकेबद्दल माहिती केंद्रात स्पर्धा परीक्षासाठी 160 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून येथे संदर्भ ग्रंथासह आवश्यक सुविधा निशुल्क उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे सांगितले.  विभागीय विशेषत: ग्रामीण भागातील गरिब विद्यार्थी अभ्यासिकेचा लाभ घेतात, असे ते म्हणाले.
प्रारंभी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी व्दिप प्रज्वलीत करुण अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. स्वागत  सचिन काळे, अपर्णा यावलकर, श्रीमती फाले यांनी  केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे यांनी मानले. यावेळी वृत्तपत्र विभागाचे प्रमुख बबन नाखले, माहिती विभागाचे माजी संचालक शरद चौधरी, भि. म. कौशल, माजी जिल्हा माहिती अधिकारी  नरेश मेश्राम आदि अधिकारी  तसेच विद्यार्थी  व विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.
******

No comments:

Post a Comment