Sunday 9 October 2016

कोराडी येथील महानिर्मितीच्या 660 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाचे पंतप्रधानाच्या हस्ते राष्ट्रार्पण -देवेंद्र फडणवीस






  • स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन
  • मध्यभारतातील आकर्षणाचे स्थळ म्हणून कोराडी पर्यटन विकास
  • तलावाचे खोलीकरण व सौदर्यींकरणासाठी 50 कोटी रुपये
  • कोराडी येथील स्टेडियम बांधकामाचा शुभारंभ

नागपूर, दि.9: राज्यात ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात  मागील दोन वर्षात लक्षणीय वाढ झाली असून कोराडी येथील महानिर्मितीच्या 660 मेगावॅट क्षमतेच्या सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक वीज निर्मिती संचाचे राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासंदर्भात प्रत्यक्ष भेटून विनंती करण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
कोराडी येथील स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कोराडी मंदिराजवळील तलावाचे खोलीकरण, कोराडी स्टेडियम बांधकाम तसेच सिमेंट क्राँक्रीट बॉक्स कंडयूट द्वारे कॅनलच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास कुंभारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर, प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता यावेळी उपस्थित होते.
ऊर्जा विभागामध्ये मागील दोन वर्षामध्ये  कोळश्याचे स्वॅपिंग, वीज निर्मिती क्षमतेत वाढ व गुणवत्ता वाढीसाठी घेतलेल्या महत्वाकांक्षी निर्णयामुळे वीज निर्मितीमध्ये  लक्षणीय वाढ झाली असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अधिकारी, कर्मचारी व कामगारांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच चांगले शिक्षण व घराची सुविधाही निर्माण करण्यात येत आहे.
कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबादेवीच्या दर्शनासाठी मध्यभारतातून मोठया प्रमाणात भाविक एकत्र येतात. त्यांची योग्य व्यवस्था व्हावी तसेच भक्ती सोबत पर्यटनाचा निखळ आनंद मिळावा यासाठी पर्यटन विकासाचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असून संस्कृतीचे पर्यटनाचे नाते जोडतांना स्वच्छता व चांगले वातावरण निर्माण करण्यात येईल. मध्यभारतातील आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून या परिसराचा विकास करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने  प्रेरित होऊन गरीब माणसाला आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दयावेत या उद्देशाने विवेकानंद मेडिकल मिशन हे रुग्णालय चालविणार आहे. येथील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा कामगारासोबतच ग्रामस्थानीही लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
प्रमुख  पाहुणे म्हणून बोलतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीमार्फत कामगारांना तसेच येथील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 5 कोटी 67 लक्ष रुपये खर्चुन अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. हे हॉस्पिटल भविष्यात 50 खाटांचे करण्याचा मानस असून अत्याधुनिक रुग्णवाहिका  24 तास उपलब्ध राहणार आहे.
कोराडी परिसरातील तलावाच्या खोलीकरण व सौदर्यीकरणासाठी 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून केंद्र शासनामार्फत 100 कोटी रुपये जलक्रीडा केंद्रासाठी मागण्यात येऊन भावीक व पर्यटकांसाठी पर्यटनासोबतच सीप्लेन सारख्या अत्याधुनिक सुविधा निर्माण करुन मध्यभारतातील महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे सांगतांना पालकमंत्री पुढे म्हणाले की, कोराडी महादुला परिसरातील भुमिगत विद्युत वाहिन्यासाठी 20 कोटी रुपये तसेच क्रीडा संकुलाचे बांधकामाचा शुभारंभ होत आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी 186 कोटी रुपयांच्या विकास आराखडयाला मान्यता मिळाली असून त्यापैंकी 80 कोटी रुपये उपलब्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील जनतेला स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्प्टिलच्या माध्यमातून चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळण्यासोबत प्रत्येक गावात फिरत्या वैद्यकीय दवाखान्यामार्फत सेवा उपलब्ध करुन दयाव्यात, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, जागतिक पर्यटकांच्या दृष्टीने निर्सग, जंगल तसेच वाघाची सफारी हे मुख्य आकर्षण असून विदर्भात  या पर्यटनाला मोठी संधी असल्यामुळे जगातील पर्यटकांना येथे आणण्यासोबतच त्यांना आवश्यक सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येतील. पर्यटनासोबतच रोजगारांच्या संधी उपलब्ध होत असल्यामुळे पर्यटन विकासाला चालना देण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रांरभी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी यांनी महानिर्मितीच्या सांघीक, सामाजिक जबाबदारी अंतर्गत कोराडी येथील कॅनल व तलावाचे गाळ काढण्यासोबतच सौदर्यीकरणासाठी 50 कोटी 84 लाख रुपयाची योजना तयार केली असून या योजनेमुळे पाणी साठवणूक क्षमतेत वाढ होणार असून शेती व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता यांनी जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कोराडी येथील हॉस्पिटल मध्ये सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये प्रकल्पग्रस्त व कामगारांना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध असून परिसरातील जनतेनेही या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. हॉस्प्टिल निर्मितीसाठी केलेल्या कार्याबद्दल मुख्य अभियंता उमाकांत निखारे, अनंत देवतारे, आरोग्य संचालक संजय जयस्वाल, डॉ.दिलीप गुप्ता यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रांरभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीप प्रज्वलीत करुन स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्प्टिलचे उद्घाटन केले तसेच स्टेडियम बांधकाम, भुमिगत वीज वाहिन्या कामांचा शुभारंभ केला.
प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर आभार प्रदर्शन शंकर शंखपाळे यांनी मानले तर संचलन मिलींद राहटगावकर यांनी केले. याप्रसंगी कामठी पंचायत समिती सभापती अनिताताई चिकटे, जिल्हा परिषद सदस्या कोराडी श्रीमती सरीताताई रंगारी, अध्यक्षा नगरपंचायत महादुला श्रीमती सीमाताई जयस्वाल, उपाध्यक्ष नगरपंचायत महादुला राजेश रंगारी,  पंचायत समिती सदस्या केसरताई बेलेकर, सरपंच ग्रामपंचायत कोराडी अर्चनाताई मैंद, उपसरपंच ग्रामपंचायत कोराडी, अर्चनाताई दिवाने,  जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महानिर्मितीचे  विश्वास पाठक, चंद्रकांत थोटवे, विकास जयदेव, श्याम वर्धने, अनिल नंदनवार, राजू बुरडे व मुख्य अभियंते, महावितरणचे  प्रसाद रेशमे व मुख्य अभियंते, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे सर्वपदाधिकारी  तसेच कोराडी महादुला परिसरातील प्रकल्पग्रस्त कुंटुंबीय, कंत्राटी कामगार, अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment