- “अभंगाचे रंग” कार्यक्रमात रसिक भावविभोर
नागपूर, दि. 14 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कालिदास समारोह आयोजन समिती यांच्यावतीने राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या सन्मानार्थ सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या “अभंगाचे रंग” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची विशेष उपस्थिती होती.
चिटणवीस सेंटर येथे आयोजित अभंगाचे रंग भक्ती संगीत संध्या कार्यक्रमाला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय व त्यांच्या सुविद्य पत्नी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.के. गोविंद राज, प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, पुण्याचे विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन भक्ती संगीत संध्येला सुरुवात करण्यात आली. यावेळी राज्यपालांनी गायक, संगीतकार पं. संजीव अभ्यंकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर राज्यपालांचे स्वागत विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.
संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा यांच्या अभंगांना सुरेल संगीताने स्वरबद्ध करुन पं. संजीव अभ्यंकर यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. संताची पंरपरा लाभलेल्या महाराष्ट्राला संतांनी ज्ञान, शक्ती, भक्ती आणि क्रांतीचा मार्ग दाखविला. याच संत परंपरेतील संत एकनाथाचा अभंगाने या कार्यक्रमातील पहिला अभंग रसिक प्रेक्षकांना सुखावून गेला.
ऐसे पंढरीचे स्थान, याहुनी आणिक आहे हो या अभंगाने रसिक प्रेक्षकांना भाव विभोर केले.
एकनाथांच्या “कशी जाऊ मी वृदांवना, मुरली वाजवी कान्हा,
पैल तिरी हरी वाजवी मुरली, नदी भरली यमुना
कृष्णाच्या लिलांवर तक्रार करणाऱ्या गोपिकांवर आधारित या अभंगाने या भक्ती संध्येला रंगत आणली.
नामाची संगत केली तर मोहमायाची यमुना अलगत पार करता येते. म्हणून नामाची संगत करावी हे “देवा आदि देवा पांडुरंगा, कृष्णा, विष्णू, हरी, गोविंदा, माधवा, तुचि नारायणा नामधारी, या अभंगातून उलगडून दाखविले.
संत ज्ञानदेवांचा अतिशय प्रसिद्ध असा अभंग
श्री गुरु सारीखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी !!
राजयाची कांता, काय भिक मागे, मनाचिये जोगे सिद्धी पावे !!
ज्ञानदेव म्हणे तरलो] तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे !!
असा गुरुंचा महिमा सांगणारा अभंग गाऊन त्यांनी रसिक प्रेक्षकांना सुरेल स्वरांचा माध्यमातून गुरुंची आठवण करुन दिली.
*******
No comments:
Post a Comment