नागपूर, दि. 15 : गो-विज्ञान अनुसंधान केंद्र अतिशय चांगले काम करीत आहे. मात्र वैयक्तिकरित्या काम करतांना काही मर्यादा येतात. या केंद्रांनी इतर विभागांसोबत संपर्क ठेवला तर आणखी चांगले प्रकल्प राबविता येतील. त्याचा फायदा इतरांनासुद्धा होऊ शकतो. त्यामुळे गो-शाळा केंद्रांनी शासनाच्या इतर विभागांसोबत नेहमी समन्वय ठेवावा, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
रामटेक तालुक्यातील देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्राला आज राज्यपालांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार मल्लिकार्जून रेड्डी, राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अनंत रोकडे, गो-विज्ञान अनुसंधान केंद्रांचे अध्यक्ष हेमंत जांभेकर, उपाध्यक्ष देवेंद्रजी भरतीया, सचिव सुरेश डवले, केंद्रांचे समन्वयक सुनील मानसिंहका, देवलापारचे सरपंच संजय जयस्वाल उपस्थित होते.
राज्यपाल सी. विद्यासागर राव पुढे म्हणाले, गो-विज्ञान शाळेतील नैसर्गिक तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, गोबर गॅस प्रकल्प अतिशय चांगले आहे. संपूर्ण भारतात या उपक्रमांची माहिती होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाशी तसेच राज्य शासनाच्या कृषी, आरोग्य आदी विभागांसोबत समन्वय ठेवला तर त्याचा फायदा सामान्य नागरिकांना होऊ शकतो. गो-विज्ञान अनुसंधान केंद्रांने येथे जास्तीत जास्त गायींच्या प्रजाती आणण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच शिक्षण, विकास, पदवी, तंत्रज्ञान हे विषय तर आहेच. मात्र गावागावात लुप्त झालेल्या पक्षांचा किलबिलाट, विविध प्रकारचे पक्षी कसे परत येतील, याबाबतही विचार व्हावा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
यावेळी राज्यपालांनी परिसरातील औषध विभाग, गो-शाळा, सेंद्रीय शेती प्रकल्प, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प औषधी वनस्पती शेती आदींची पाहणी केली. केंद्रांचे अध्यक्ष हेमंत जांभेकर यांनी राज्यपालांना स्मृती चिन्ह भेट दिले. कार्यक्रमाला निरीचे पूर्व निर्देशक तपन चक्रवती, औषधी विद्या विभागातील नंदिनी भोजराज यांच्यासह इतर विभागाचे शास्त्रज्ञ, शिक्षक, नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तत्पूर्वी देवलापार येथील गुरुकुल आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, बँडपथक आणि स्वागत गिताने राज्यपालांचे स्वागत केले.
****
No comments:
Post a Comment