Saturday 17 December 2016

वनौषधी शेतीतून शेतक-यांना चांगले उत्पन्न मिळवून देणार - सुधीर मुनगंटीवार



 नवरगावातील शेतक-यांना धनादेशाचे वाटप 
 विवेक ओबेरॉय यांची विशेष उपस्थिती

      नागपूर दि 16 -   वन क्षेत्राला लागून असलेल्या गावातील शेतकऱ्यानां  वनौषधी लागवडीचे प्रशिक्षण देऊन त्यांना लागवडी साठी  वनौषधी उपलब्ध  करून  देणार आहे. या वनौषधी शेतीतून उत्पादित वनौषधी खरेदी करण्याची हमी शेतक-यांना देणार असून या शेतीतून शेतक-यांना एका एकरामागे 50 हजारापेक्षा जास्त नफा मिळेल असा प्रकल्प मुख्यमंत्रांशी चर्चा करून तयार केला असल्याची  माहिती वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.
       बोर धरण प्रकल्पातील नवरगाव या पुनर्वसित गावाच्या शेतक-यांना धनादेश वाटप  कार्यक्रम बोर धरण येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटन संकुल येथे घेण्यात आला. याप्रसंगी      श्री मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार पंकज भोयर, समीर मेघे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी , अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ रामबाबू तर विशेष अतिथी म्हणून सिने अभिनेते विवेक ओबेरॉय, उपस्थित होते.
         यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेतक-यांना धनादेश,  एल. पी. जी आणि शिलाई मशिनचे वितरण करण्यात आले. तसेच गावात वाघ, वन, पर्यावरण आणि इतर वन्य प्राण्यांबद्दल जनजागृती करणाऱ्या 9 गावातील व्याघ्र सरंक्षण मित्र व मैत्रिणी मंडळाच्या युवक - युवतींना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
       वनापासून  मिळणार उत्पन्न हे दरडोई आनंदाचे उत्पन्न म्हणून गणल्या जाते. माणसाच्या जगण्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पासून ते अंत्यविधीसाठी आवश्यक असणाऱ्या लाकडापर्यंत सर्वच वस्तू जंगल पुरविते. नागपूर पासून 350किलोमीटरच्या क्षेत्रात देशातील 352 वाघ आहेत. म्हणून नागपूरला टायगर कॅपिटल म्हटले जाते.  वाघ बघण्याचा आनंद काही औरच असतो. वाघ केवळ आनंदच देत नाही तर एक - एक वाघ कोट्यवधींचा महसूल मिळवून देतो. म्हणूंन जंगलाचं संरक्षण करणारा जगलाशेजारील गावांमध्ये राहणारा शेतकरी हा या पर्यावरणाचा जंगलाचा सैनिक आहे, असेही            श्री. मुनगंटीवार म्हणाले.
     शासनाने जंगलाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या गावातील शेतक-यांना वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसान भरपाई मध्ये दुपटीने वाढ केली आहे. या गावांना 100 टक्के गॅस जोडण्या देण्याचा निर्णय घेतला आहे.   या गावातील शेतक-यांना80 टक्के अनुदानावर तारेचे कुंपण देणार आहे. ही गावे जलयुक्त शिवारच्या निकषात बसत नव्हती. प्रवीण परदेशी यांच्या प्रयत्नाने आता बफर झोनमधील गावांनाही जलयुक्त शिवार योजनेचा लाभ मिळेल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
        वनविभाग हे रोजगार देणार क्षेत्र आहे त्यामुळे या क्षेत्राच्या  संवर्धनासाठी  1 कोटी वृक्षदूत नेमणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोहफुलाच व्यवस्थित मार्केटिग केलं तर एका जिल्ह्यात 220 कोटी रुपयांचा रोजगार आदिवासी बांधवाना मिळू शकतो. यासाठी सुद्धा वनविभाग प्रयत्न करीत आहे असेही श्री मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
         सिनेअभिनेते विवेक ओबेरॉय म्हणाले की,  येथील जिल्ह्यांसाठी अर्थमंत्र्याच्या रूपात  मौल्यवान विहीर मिळाली आहे. त्याचा फायदा आमदारांनी जिल्ह्याच्या विकासासाठी करून घ्यावा.  वन हेच खरं धन आहे आणि या धनाच संरक्षण करण्याचे मोठे काम सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेच यावे ही प्रकृतीची इच्छा आहे. इतर लोक कामना करतात आणि वनमंत्री काम करतात त्यामुळे मी त्यांचा चाहता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विवेक ओबेरॉय यांनी मुख्यमंत्रयांचे सचिव प्रवीण परदेशी यांच्या कामाचेही कौतुक केले. परदेशी भारतीय प्राशासानिक सेवे पेक्षा भारतीय वन सेवेत असायला पाहिजे होते इतके  त्यांना जंगलाविषयी प्रेम  आणि  अभ्यास आहे.त्यांचे सारखे अधिकारी या देशाला मिळालेत तर प्रधानमंत्री यांच्या स्वप्नातील भारत घडू शकतो. असे सांगून  या यज्ञासाठी तन, मन आणि धनाची आहुती देण्यासाठी सदैव तयार आहे, अशी हमी त्यांनी यावेळी दिली. 
       यावेळी जिल्हा माहिती कार्यालयतर्फे निर्मित वर्धा यात्री कॉफीटेबल बुक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विवेक ओबेरॉय यांना भेट  दिले.
          या कार्यक्रमाला पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी, बोर अभयारण्याचे  विभागीय वन अधिकारी एल. बी भलावी इतर अधिकारी तसेच पर्यावरण प्रेमी, शेतकरी व लाभार्थी उपस्थित होते.

*******

No comments:

Post a Comment