Tuesday 10 January 2017

सुरक्षित वाहतुकीसाठी स्वयंशिस्त पाळा -श्रावण हर्डीकर




रस्ता सुरक्षा पंधरवडा अभियानास प्रारंभ
नागपूर दि. 9 :  सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सार्वजनिक वाहतूक सेवेचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक नागरिकाच्या जीविताचे रक्षण करताना सुरक्षित वाहतुकीसाठी वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.
                             प्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित 28 व्या रस्ता सुरक्षा अभियान -2017च्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता रजनिकांत शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार व डॉ. रुपकुमार बेलसरे व्यासपीठावर उपस्थित होते.
अपघातमुक्त नागपूरसाठी नागरिकांनी स्वत:हून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. त्यासोबत अवैध पार्कींग करणे टाळले पाहिजे. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ मोकळे ठेवले पाहिजेत. यात प्रत्येक नागपूरकरांचा सक्रीय सहभाग असणे आवश्यक आहे. त्याशिवाय स्मार्ट, सुंदर, स्वच्छ व अपघातमुक्त नागपूरची कल्पना करणे अशक्य असल्याचेही  हर्डीकर यांनी सांगितले.
                               सर्व नागरिकांच्या सहकार्याने रस्ते अपघातमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. केवळ आकडेवारीवर न जाता अपघात आणि त्यातून होणाऱ्या जीवितहानीवर नियंत्रण मिळविणे नागपूरकर या नात्याने सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे.  त्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले.
                      वाहतूक सुरक्षेसंबंधी कार्य करणारी जनआक्रोश व जीवन सुरक्षा प्रकल्प या समाजसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात माहिती दिली.  यावेळी जीवन सुरक्षा प्रकल्पाचे अध्यक्ष राजीव वाघ यांनी उपस्थितांना अपघातमुक्त नागपूरची शपथ दिली.
                      रस्ता सुरक्षा अभियान या पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत जनजागृतीसाठी मोबाईलव्हॅनला मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, शरद जिचकार यांनी हिरवी झेंडी दाखविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद आंबेकर यांनी, प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी प्रास्ताविक व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांनी आभार मानले.

00000

No comments:

Post a Comment