Thursday 26 January 2017

माहिती आयुक्त पदाची सूत्रे धारुरकर यांनी स्वीकारली

नागपूर दि. 12 :  राज्य माहिती आयोगाच्या नागपूर येथील खंडपीठातील माहिती आयुक्त म्हणून श्री. दिलीप धारुरकर यांनी आज सूत्रे स्वीकारली.
श्री. धारुरकर यांची नुकतीच माहिती आयुक्त पदावर नियुक्त झाली असून मुंबई राज्य माहिती आयुक्त कार्यालयात त्यांचा शपथविधी झाला.
त्यांचे आज येथे आगमन झाले आणि येथील माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. श्री. पाटील यांच्याकडे येथील माहिती आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.
श्री. पाटील यांनी तसेच माहिती आयुक्त कार्यालयातील अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्री. धारुरकर यांचे स्वागत केले.
संक्षिप्त परिचय :
नवीन माहिती आयुक्त श्री. दिलीप लक्ष्मीकांत धारुरकर यांचा जन्म  8 मे 1962 रोजी उमरगा  (जि. उस्मानाबाद) येथे झाला. त्यांनी अभियांत्रिकी पदवी तसेच राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण संपादन केले. ते 11 वर्षे पाटबंधारे खात्यात अभियंता म्हणून कार्यरत होते. विद्यार्थी दशेपासून पत्रकारिता केल्यामुळे 1994 साली सरकारी नोकरीचा राजीनामा त्यांनी दिला.  तरुण भारत(अहमदनगर) संस्थापक संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले.  1998 पासून नगर, नाशिक, जळगाव व देवगिरी तरुण भारत या समूहाचे संपादक म्हणून कार्यरत राहिले. दैनिक लोकाशा, दैनिक सांजवार्ता, सा. आजकाल यामध्ये संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्यांनी विविध नियतकालिकात लेखन केले आहे.
पुरस्कार :
श्री. धारुरकर यांना पत्रकारितेतील कार्याबद्दल दा. प. आपटे पुरस्कार, पंडीत दीनदयाळ उपाध्याय पुरस्कार, समाजशिल्पी पत्रकारिता पुरस्कार, राजाभाऊ नेने पुरस्कार, पुणे विश्वसंवाद केंद्राचा देवर्षि नारद जीवनगौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.

*****

No comments:

Post a Comment