- प्रायोगिक तत्वावर तीन महिलांना मिळणार संयंत्र
- सहा राज्यात टसर धागा निर्मिती यंत्राचे वितरण
नागपूरचाही समावेश
नागपूर, दि. 7 : टसरपासून धागा तयार करण्यासाठी पारंपारिक पद्धतीमुळे विणकरांना लागणारा विलंब आणि त्यासाठी मिळणारा अत्यल्प मोबदला यातून अत्याधुनिक पद्धतीचे बुनियाद हे संयंत्र केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाने विकसित केले असून या यंत्राचा वापर उद्या, दिनांक 8 मार्च या जागतिक महिला दिनापासून संपूर्ण देशात होत आहे. नागपूर विभागातील तीन महिलांना बुनियाद हे संयंत्र प्रायोगिक तत्वावर वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रिय रेशीम बोर्डाच्या क्षमता, विकास व प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रिय रंजन यांनी आज येथे दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी महिला दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमाची माहिती दिली. त्याप्रसंगी टसर रिलींग मशीनबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे उद्या, बुधवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयातील टसर विणकाम करणाऱ्या 150 महिलांना बुनियाद या विणकाम संयंत्राबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून यापैकी 3 महिलांना प्रायोगिक तत्वावर तसेच इतर महिलांच्या प्रशिक्षणासाठी बुनियाद विनामुल्य यावेळी देण्यात येईल.
या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे, हातमाग संचालक संजय मीना आदी उपस्थित राहणार आहे.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथून केंद्रिय वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती इराणी बुनियादचे उद्घाटन करणार असून विणकर महिलांशी थेट संवाद साधणार आहेत. हा उपक्रम देशातील दहा ठिकाणी होणार असून नागपूर येथेही या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त
विभागीय कार्यशाळेचे आयोजन
नागपूर, दि. 7 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला बाल विकास विभाग व राज्य महिला आयोगा मार्फत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरंक्षण अधिनियम 2005 या विषयावर या विषयावर जिल्हा व विभागीय एकत्रित एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे.
मातृसेवा संघ सभागृह येथे होणाऱ्या कार्यशाळेला विभागीय आयुक्त अनूप कुमार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे. पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आणि जिल्हाधिकारी सचिन कुर्वे तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही.आय. परदेशी तसेच राज्य महिला आयोगाचे सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहे.
यावेळी कौटुंबिक हिंसाचाराची स्वरुप व व्याप्ती, कारणे व उपाय, हिंसाचारास प्रतिबंध करणाऱ्या तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी, संरक्षण अधिकारी यांची भुमिका व न्यायालयीन प्रक्रिया या विषयावर तज्ञ मार्गदर्शका मार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 विषयक माहिती उपस्थित मान्यवराकडून या कार्यशाळेमध्ये देण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment